दोन अधिक एक बरोबर शून्य

29
2012
Dec
बँड अँनटोगँस्ट, जर्मनी
प्रश्न: गुरुदेव, कृपा करून आपण आध्यात्मिकता आणि गणित यांचा एकमेकांशी काय संबंध आहे या बद्धल काही बोलाल काय?

श्री श्री : आध्यात्मिकतेचे गणित म्हणजे दोन अधिक एक बरोबर शून्य.

हे लक्षात येतेय काय? यावर विचार करा!

जेंव्हा शरीर आणि मन, या दोन गोष्टी एका आत्म्यात मिसळून जातात तेंव्हा काहीही शिल्लक राहत नाही. हे असे आहे!

प्रश्न: प्रिय गुरुजी, आजपर्यंत तुम्हाला येशूचा अर्थ, त्यांचा जन्म, आणि त्यांच्या या जगातील अस्तित्वाबाबत बोलण्यासाठी अनेक वेळा विचारणा झाली आहे. त्याबद्धल काही थोडे बोलाल काय?

श्री श्री : येशू हे एक प्रेमाचे प्रतिक आहे.

त्यांना किती अपमान आणि वेदना सहन करायला लागल्या त्याकडे पहा. येशुंनी त्या वेदना आणि जखमा सहन करताना आपला समभाव आणि शांतपणा कधीही सोडला नाही.लोकांनी त्यांना दोषी ठरविले. त्यांचे स्वतःचे शिष्य त्यांना सोडून पळून गेले.

त्यावेळा त्यांच्यासाठी ते किती यातनामय असेल याची कल्पना करा.जेंव्हा तुम्ही तुमच्या भक्तांसाठी तुम्हाला शक्य आहे ते सर्व काही करता आणि तरीही ते तुमचा त्याग करून निघून जातात, याच्या वेदना काय असतात याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. पण येशुंचे आयुष्य असेच होते. आणि मग जेंव्हा सर्वजण त्यांना सोडून गेले तेंव्हा त्यांनी देवाला विचारले कि “ तुम्ही पण माझा त्याग केला आहे काय?”

अशा तऱ्हेने त्यांचे आयुष्य म्हणजे एका बाजूला अशा सर्व वेदना आणि दुसऱ्या बाजूला प्रेम असे होते.

आता याचा अर्थ असा नव्हे कि कोणीही जेंव्हा इतके प्रेम करतो तेंव्हा त्यांना अशाच वेदना सहन करायला लागतात. ते तसे नसते. त्यांनी लोकांना सदैव असा संदेश दिला कि” कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हठवादी होऊ नका, कोणतीही तुलना करू नका आणि निर्दयी होऊ नका. सर्वांच्या बाबतीत दयाळू आणि प्रेमळ रहा कारण देव म्हणजे प्रेम आहे.”

त्याकाळी लोक डोक्याचा जास्त वापर करीत असत आणि ते फक्त पाप आणि शिक्षा याचाच विचार करीत असत.ते स्वर्गाची स्वप्ने पाहत असत आणि त्यांना नरकाची भीती वाटत असे.

येशूने अशी शिकवण दिली कि” वर्तमानात जगायला शिका. हा क्षण जगा आणि सर्वांप्रती दया आणि प्रेम असूद्यात.देवाला घाबरायचे कारण नाही कारण तो आपला पिता आहे आणि पित्याप्रमाणे तो आपला एक भाग आहे. माझा पिता आणि मी एकच आहोत.”

त्याकाळात त्यांनी असा क्रांतिकारी संदेश दिला आणि लोकांना याची जाणीव करून दिली कि हा आयुष्याचा प्रवास हा डोक्याकडून हृदयाकडे असा असून डोक्याकडून स्वर्गाकडे , ताऱ्यांकडे नव्हे.

त्यांनी असा संदेश दिला आणि सुमारे सत्तर वर्षे कोणीच त्याची नोंद घेतली नाही.

विद्वान लोकांकडून मी असे ऐकले आहे कि येशूच्या मृत्युनंतर सत्तर वर्षांनी बायबल लिहिले गेले. त्यानंतर त्या मूळ आराखड्यात अनेक बदल झाले असण्याची शक्यता आहे.म्हणून ख्रिस्ती धर्मात ७२ पंथ असून , प्रत्येकजण आपलाच खरा पंथ असल्याचा दावा करीत असतो.

येशू हा एकच होता पण त्या धर्मात ७२ पंथ असून त्या प्रत्येकाने बायबलचा आपल्यापद्धतीने अर्थ काढला आहे.

खरेतर त्यांनी त्यातील मतीतार्थ लक्षात घेऊन, त्यावर तार्किक वादविवाद करण्यात काही अर्थ नाहीये कारण मग तश्या तार्किक वादाला जगात काही अंत नाही.

भगवान बुद्धांच्या बाबतीत पण तसेच झाले आहे. भगवान बुद्ध हे एक होते पण बुद्ध धर्माचे ३२ पंथ आहेत आणि प्रत्येक जण स्वतःला अस्सल दस्तऐवज समजतो, आणि त्यांच्या शिकवणीचे योग्य स्वरूप असल्याचे समजतो.

प्रेषित महमद यांच्याबाबतीत पण काहीसे असेच आहे. इस्लामचे पांच पंथ असून ते एकमेकांचा दुस्वास करतात. खरे तर ते एकमेकांचे खंडन करीत असतात.

माणसाला खरेतर कल्पना वास्तवात न अनुभवता त्यांना उगीचच कवटाळून बसायची सवय असते.

लोक त्या कल्पनांना त्यांची ओळख बनवितात आणि मग त्या ओळखीसाठी ते काही पण करायला तयार असतात.

येशूचा संदेश असा होता “ जागे होऊन पहा कि स्वर्गाचे राज्य तुमच्यातच आहे. देव म्हणजे प्रेम आहे हे जाणून घ्या.”

म्हणून लहान मुलांसारखे व्हा. मुलांना काही पूर्वग्रह नसतात. मुलांसारखे झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात प्रवेश नाही. हा मूळ संदेश आता कोठेतरी हरवून गेला आहे.

लहान मुलांसारखा निरागसपणा आणि सर्वांप्रती आपलेपणा याचा सर्वत्र अभाव दिसतो. म्हणून धर्माच्या नावावर सगळीकडे गुन्हे घडताना दिसत आहे.

जेंव्हा धर्म हा राजकीय अधिकाराबरोबर मिसळायला लागल्यावर जातीयवाद डोके वर काढू लागतो.

हे सर्व घडायला कारण म्हणजे आपल्याला आपल्या अंतर-प्रकाशचा विसर पडला आहे कि आपण म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा प्रकाश आहोत.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जर काही न करिता आपल्याला जर एवढा आनंद आणि सुख मिळत असेल तर मग आपण इतर काही करायची काय आवश्यकता आहे?

श्री श्री : तुमचा स्वभाव धर्म असा आहे कि तुम्ही फार वेळ काही न करिता बसू शकत नाही. तुम्हाला माहित आहे कि आनंद हा घटनांच्या विरुद्ध क्रमाने मिळतो किंवा जाणवतो.

जेंव्हा तुम्ही एखादी गोष्ट करीत असता आणि तुम्ही त्यात १००% प्रयत्न केलेत तरच तुम्हाला काही न करण्याचे महत्व कळते.

असे पहा कि जेंव्हा तुम्ही सक्रीय आणि गतिशील असता, तेंव्हाच तुम्हाला गाढ विश्रांती मिळू शकते. पण जेंव्हा तुम्ही दिवसभर नुसते अंथरुणावर लोळत बसलात तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही. म्हणून तुम्ही जे करीत आहात ते करण्याची गरज असते.

तुम्हाला तुमची स्वतः ची काही कर्मे करायची असतात आणि मग ती कामे झाल्यावर, त्या काम करण्याच्या अवस्थेत आणि काम करीत असताना , काही न करण्याच्या स्थितीचा अनुभव आपण घेऊ शकतो.

प्रश्न: गुरुदेव, इच्छा या तयार केल्या जातात का आणि मग त्या बाजूला सारता येतात का? जर येत असतील तर कश्या?

श्री श्री : क्षणभर थांबा आणि तुमच्या लहानपणापासूनच्या आयुष्याचा आढावा घ्या. तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा होत्या, त्यातील काही पूर्ण झाल्या आणि बऱ्याच तुम्ही सोडून दिल्यात. लहान मुल असताना, किंवा तरुणपणीची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली असे नाहीये.

जर समजा तसे झाले असते तर तुम्ही फार विचित्र परिस्थिती उद्भवली असती. ते तसे झाले नाही म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि म्हणूनच तुमच्या बाबतीत जे व्हायला पाहिजे तेच होत आले आहे.

काही कडवट अनुभवांमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी खोली प्राप्त झाली आहे तर काही चांगल्या अनुभवामुळे तुमचे व्यक्तिमत्व व्यापक झाले आहे. त्या सर्व अनुभवांनी तुमचे आयुष्य समृद्ध केले आहे. चांगले किंवा वाईट अशा दोन्ही अनुभवांचे नेहमी स्वागत करायला पाहिजे कारण ते तुमचे आयुष्य बळकट करीत असतात.

तुम्ही कधीही कल्पना केली नसेल अशा तऱ्हेने ते तुमचे आयुष्य समृद्ध करीत असतात. ते सर्व तुमच्या साधनेचा एक भाग आहे असे समजा. म्हणून चांगले अनुभव हा तुमच्या साधनेचा एक भाग आहेत तसेच तुम्ही घेतलेले वाईट अनुभव हा पण तुमच्या साधनेचा एक भाग आहेत.

उदाहरणार्थ, लोकांनी तुमची केलेली वाहवा किंवा तुमचे केलेले अपमान हे दोन्ही तुमच्या साधनेचे भाग आहेत. या दोन्हीमुळे तुम्ही कणखर होता, तुम्ही केंद्रित होता आणि जशी तुमची वाढ व्हायला पाहिजे तशी ती होते.

हि सर्व स्तुती आणि अपमान, हे सर्व या पृथ्वीतलावर फक्त होत असतात आणि आपण त्यांचा धैर्याने सामना करून पुढे जायला पाहिजे.एक सशक्त आत्मा, एक सशक्त व्यक्ती व्हा. हीच खरी शक्ती आहे.आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात तुमच्या चेहऱ्यावर हसू कायम असते काय? या सर्वाचा तोच एकमेव उद्धेश आहे. तुम्ही तुमचे हास्य कायम ठेऊ शकता काय?

ते तसे कायम ठेवणे अवघड आहे हे मला माहित आहे, पण तुम्ही ते तसे करणे आवश्यक आहे.

तुम्ही जर काही गोष्टींपासून लांब पळायचा प्रयत्न केला तर त्या तुमचा पाठलाग करू लागतील. या आयुष्यात नाही तर पुढच्या आयुष्यात ते नक्की होईल. म्हणून असे म्हटले आहे कि आता जे घडत आहे ते तसे होऊ देत, आणि चेहऱ्यावर मोठे हास्य ठेऊन त्याचा स्वीकार करून धैर्याने आणि उत्साहाने पुढे जात रहा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, ध्यासाचा त्रास का होतो? माझा रोख परमेश्वर आणि त्या अव्यक्त अनंताच्या ध्यासाकडे आहे. या बाबतीत आपण कोठून आले आहोत?

श्री श्री : असे पहा कि प्रेम आणि वेदना हे दोन्ही नेहमी बरोबर आणि हातात हात घालून असतात.

जेंव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करीत असता तेंव्हा काही वेळा दुखः पण भोगायला लागते. हे नेहमी असेच होते असते आणि आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. त्यापासून सुटका करायचा प्रयत्न करू नका. वेदना हा प्रेमाचा एक भाग आहे.

आज कोणीतरी माझ्याकडे आले आणि सांगू लागले कि “ माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, तो माझे काही ऐकत नाही.”

असे पहा कि हे नैसर्गिक आहे. आई आपल्या मुलासाठी बरेच काही करीत असते आणि मग तो मुलगा जेंव्हा तिचे काही ऐकत नाही तेंव्हा साहजिकच तिला वाईट वाटते.

एका आईला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम तेच हवे असणे हे नैसर्गिक आहे, पण मुलगा असा विचार करीत असतो कि त्याला आपले बरे वाईट चांगले कळते. म्हणून तो मग आईचे काही ऐकत नाही. अशा वेळी कोणी काय करायचे?

आई मग माझ्याकडे आली आणि म्हणाली कि “ मी काय करावे असे तुम्हाला वाटते?”

मी तिला असे सांगितले “ असे पहा कि मला सर्वांचे चांगले व्हावे असेच वाटते. म्हणून मला तुमच्या मुलासाठी चांगले पाहिजे आणि तुमच्यासाठी पण चांगले पाहिजे”

मग तिने असे म्हटले कि “ पण गुरुदेव, माझा मुलगा माझ्यापेक्षा तुमचे अधिक ऐकतो”.

त्यावर मी असे म्हणालो कि “ जर तो तुमच्यापेक्षा माझे ऐकत असेल तर याचा अर्थ असा कि त्याची अशी खात्री आहे कि गुरुदेवांचा यात काही स्वार्थ नाही आणि ते योग्यच सांगतील.”

मी मुलाला सांगितले “ तुला हवे ते तू कर”

पहा मी कुणाला जबरदस्ती करीत नाही कि ” तुम्ही असे करा, तुम्ही तसे करा”.

दुःख हा खरोखरच प्रेमाचा एक भाग आहे. या वेदना टाळू शकत नाही.

जिथे प्रेम असते तेंव्हा काही वेळा त्याच्याबरोबर दुःख पण येते. पण बरेच लोक असे करतात कि त्या वेदना टाळण्यासाठी ते प्रेम करणे सोडून देतात , हे काही बरोबर नाही.

प्रेमाबरोबर येणाऱ्या वेदना टाळण्यासाठी प्रेम करणे सोडून देणे यात काही शहाणपणा नाही. असे कोणी केले तर तो एक मुर्खपणा होईल. पण जे कोणी त्या वेदना सहन करून पुढे जातात त्यांना निश्चितच खऱ्या आणि आनंददायी प्रेमाचा लाभ होतो.

प्रश्न: गुरुदेव, मनुष्याला आत्मज्ञान होण्यासाठी या साऱ्या प्रक्रियेतून जाण्याची काय गरज आहे?

श्री श्री : याची गरज आहे एवढेच फक्त आता ध्यानात ठेवा.

मन - मित्र की शत्रू

26
2012
Dec
बँड अँनटोगँस्ट, जर्मनी


प्रश्न: मला सतावणाऱ्या मनावर विजय कसा मिळवायचा?

श्री श्री : हा तर त्याचा स्वभावच आहे.

तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मनापेक्षा मोठे आहात? जागे व्हा. मनाला राहू द्या.

प्रश्न : गुरुदेव, मी माझी आत्मसखीला (माझ्या आत्मसख्याला) कसे ओळखू??

श्री श्री :सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या आत्म्याला ओळखा आणि नंतर मग आत्मसखीला. तुम्हाला तुम्हा स्वतःची ओळख नाही, तुम्ही कोण आहात ते माहिती नाही. तुम्हाला स्वतःबद्दल काहीसुद्धा माहिती नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला जाणत नाही; तुमच्या या मनामुळेच तुम्हाला वेड लागायची पाळी येते. या क्षणी मनाला हे पाहिजे तर पुढच्या क्षणी दुसरे काहीतरी त्याला हवे असते. मनाचा मनोदय तर सतत बदलत असतो, आणि यातच ते अडकून बसते.

म्हणूनच 'तुमच्या बंधनाला आणि तुमच्या मुक्ततेला तुमचे स्वतःचे मन कारणीभूत आहे' , आणि दुसरे काही नाही असे भगवद्गीतेत म्हटले आहे.

जर ते मित्राप्रमाणे वागत असेल तर ते शत्रूप्रमाणेसुद्धा वागेल असे आहे तुमचे स्वतःचे मन.

जर साधनेने ( अध्यात्मिक सरावाने) तुमच्या मनाला नीट वळण लावले तर ते तुमचे मित्र बनते आणि ते तुमची मदत करते. नाहीतर मग तुमचे स्वतःचे मन एका शत्रूप्रमाणे वागते. हे खरे आहे की नाही? हे किती खरे आहे!

मी इथे येण्याअगोदर गेल्या आठवड्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आश्रमाच्या समोर आश्रमाची पाटी लावलेली आहे. एका राजकारणी पक्षाच्या लोकांनी त्यांच्या पक्षाची भित्तीपत्रके आश्रमाच्या पाटीवर लावली,उगीचच द्वाडपणा करायला.

त्यांच्या पक्ष नेत्याचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी एकदम मोठे भित्तीपत्रक लावले. मग आपल्या सुरक्षा कर्मचारी आणि बाकीचे यांनी ते साहजिकपणे काढून टाकले कारण आश्रमात येणाऱ्याना आश्रमाची पाटी दिसत नव्हती आणि त्यामुळे त्यांना कुठे जावे ते कळत नव्हते.

आता, स्थानिक पक्ष नेता होता तो चिडला आणि तो आरडाओरडा करायला लागला आणि 'मी मोठ्या जमावाला घेऊन येतो आणि आम्ही इथे निदर्शने करणार. आणि त्या पुढे आम्ही उपोषणाला बसणार', अश्या धमक्या तो आपल्या शिक्षकांना देऊ लागला आणि अतिशय क्रुद्ध शब्दांची देवाण घेवाण झाली. आणि आपल्या सुरक्षा कर्मचार्यानेदेखील सांगितले, ' ठीक आहे, तुम्ही या. बघू या. आम्हीसुद्धा ताकदवान आहोत.'

मग शहरात दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना वाटेत माझ्या सहाय्यकाने मला ही गोष्ट सांगितली.

मी त्याला सांगितले,'या स्थानिक नेत्याला बोलवा आणि त्याच्याबरोबर बोलणी करा.'

माझ्या सहाय्यकाने त्याला बोलावणे धाडले ,' गुरुदेवांचे आत्ताच आगमन झालेले आहे, त्यांना ज्या तुमच्या नेत्याचा वाढदिवस होता त्याला टोपलीभर फळे, हार आणि शाल देऊ करायचे आहे आणि गुरुदेवांचे शुभाशीर्वाद त्यांना आपण द्यावेत', आणि त्याने ते मान्य केले. नंतर त्याने विचारले,'आमची भित्तीपत्रके त्यांनी का काढून टाकलीत?'

माझ्या सहाय्यकाने अजाणतेपणा आव आणत विचारले,'अरे,तुम्हाला काही त्रास झाला का?! तुम्ही मला सांगितले का नाही? तुम्ही मला कळवायचे होते. गुरुदेवांचे नुकतेच आगमन झाले आहे, ते दौऱ्यावर गेले होते. त्यांना जसे कळले की वाढदिवस साजरा झाला तसे त्यांनी त्यांचे आशीर्वाद पाठवले. म्हणून तुम्ही जा आणि या भेटवस्तू तुमच्या नेत्याला द्या आणि त्याला आशीर्वाद द्या.' अशा प्रकारे गंभीर प्रसंगाची हवा निघून गेली आणि त्याला बलवान झाल्यासारखे वाटले. आता तो त्याच्या नेत्या समोर हार आणि माझ्याकडून आशीर्वाद घेऊन हजर राहू शकतो, आणि आता त्याला त्याच्या पक्षाच्या मोठ्या माणसाबरोबर थेट व्यवहार करू शकणार होता.

जो काही मोठा तमाशा तो निर्माण करणार होता तो केवळ एका फोनमुळे संपला. तो आता त्याच्या पक्षाच्या साहेबांकडे गर्वाने जाऊ शकला आणि म्हणाला,' गुरुदेवांनी माझ्याकडे तुमच्याकरिता हार दिला आहे.'

आता त्याला शक्तिवान झाल्यासारखे वाटले आणि आपल्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बघा, जर तुम्हाला समस्या कशी सोडवायची हे माहिती असेल तर मग काम सोप्पे आहे. यासाठी केवळ एक फोन करण्याचा खर्च करावा लागला. पण ही युक्ती सगळीकडे नाही चालत. वेगवेगळ्या जागी तुम्हाला निराळेपणाने काम करावे लागते. काहीवेळेस तुम्हाला कणखर कारवाई करावी लागते,खंबीर राहून 'नाही ' म्हणावे लागते. काहीवेळेस तुम्हाला मुत्सद्दीपणे आणि चतुराईने कार्यभाग साधावा लागतो.

द्वाडपणा करणारे लोग हे नेहेमी असणारच, त्यांना आणि अशा प्रसंगांना हाताळण्याचे कौशल्य तुमच्याकडे असणे जरुरी आहे.

कोणत्याही प्रसंगाला हाताळण्याचे चार मार्ग आहेत असे प्राचीन काळातील लोकानी सांगितले आहे. ते म्हणजे- साम, दान, भेद आणि दंड.

१. साम म्हणजे बोलणी करणे, मन वळवायचा प्रयत्न करणे, चर्चा करणे आणि संवाद साधणे.

२. दान म्हणजे माफ करणे. 'हरकत नाही,सगळ्यांच्या हातून चुका होतात' , आणि तुम्ही समोरच्याला एक संधी देता.

३. भेद म्हणजे अलिप्त राहणे. थोडे कणखर होणे आणि आपला मुद्दा पटवणे.

४. दंड म्हणजे काठी उगारणे, हा शेवटचा उपाय आहे.

नेहमी आपण शेवटचे दोन उपाय सुरवातीलाच वापरतो. आपण शांतीच्या मार्गाने जात नाही.

आपण सर्वात आधी शांतीच्या मार्गाने जायला पाहिजे, आणि नंतर संधी देऊ केली पाहिजे, आणि मग भेदभाव करून, शेवटी जर कशाचाही उपयोग होत नसेल तेव्हा दंड म्हणजे हातात काठी घ्यावी. याला म्हणतात कोणत्याही प्रसंगाला कौशल्याने हाताळायचे चार मार्ग.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही म्हणता की आपल्या वागण्याचे लोकांकडे आपण समर्थन करू नये. परंतु आपल्या मनामध्ये जर काही असेल जे आपल्या काळजाला घर करीत असेल आणि अशा वेळी कोणाबरोबर बोलण्याची गरज भासत असेल तर काय करावे?

श्री श्री : यासाठी काही नियम नाहीये,काही वेळेस तुम्हाला बोलून मनःशांती प्राप्त होते तर काहीवेळेस बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही.

जागे व्हा आणि बघा हे संपूर्ण विश्व हे स्वप्नवत आहे. सगळे विचार सोडून निघून गेले आहेत, लोकांचे वर्तन नाहीसे होईल. काही लोक चांगले वागतात आणि काही वाईट, परंतु सगळ्यांना मृत्यू प्राप्त होणार आहे, आणि सगळे जग हे संपुष्टात येणार आहे.

या लोकांचा गट निघून जाईल. मग नवीन लोक येतील आणि त्यांचा मृत्यू होईल. नंतर अजून लोकांचा नवा गट येईल, ते आपापसात भांडतील, ते गळे मिळतील, प्रेम करतील, मुके घेतील, सगळे काही करतील, आणि त्यांचा सर्वांचा मृत्यू होईल.

सात अब्ज लोक आज या पृथ्वीतलावर आहेत आणि हे सगळेच्या सगळे सात अब्ज लोक मृत्यू पावणार आहेत. हे काही वर्षांच्या आतच घडेल. आणिक शंभर वर्षांनतर तुम्हाला काय वाटते की हेच लोक इथे असतील? आज इथे असलेला एकही माणूस जिवंत नसणार आहे. आणि दोनशे वर्षानंतर त्यांची नातवंडेसुद्धा नसतील. असे बघा, हे जग नदीसमान आहे, प्रत्येक क्षणी नदीमधील पाणी हे नवीन असते. असे काय आहे ज्याची चिंता तुम्हाला सतावते आहे?

जर काही मागे सोडून जायचे असेल तर ज्ञान सोडून जा ज्यामुळे कोणाला त्याची मदत होईल, ज्याचा कोणाला उपयोग होईल. त्याने काय म्हंटले, तिने काय म्हंटले आणि अमुक तमुक प्रसंगाबद्दल तुमचे काय मत असे हे सोडून जाऊ नका. हे सगळे सोडा, हे सगळे निरर्थक आहे!यांना खिडकीच्या बाहेर फेकून द्या. त्याला काही अर्थ नाही.

आता तुम्हाला जसे वाटते आहे तसे तुम्हाला का वाटले आणि कसे वाटले आणि बाकीच्यांना जसे वाटते आहे तसे का वाटते आहे,असे समर्थन देण्यात तुम्ही तासन तास व्यर्थ घालवता.

तुम्हाला माहिती आहे जसा समय बदलतो तसे मनसुद्धा बदलते.याबाबत एक सुंदर विज्ञान आहे. तुमच्या ग्रहस्थितीवरून तुम्हाला कळेल की मन हे काळाबरोबर जोडलेले आहे.

कधीतरी आपण मन, काळ आणि ग्रह यांच्या धाग्यांविषयी एक अभ्यासक्रम सुरु करूया.

हे पहा, मला ज्योतिषशास्त्र म्हणायचे नाहीये कारण त्याचा गैरवापर झालेला आहे आणि त्यातून चुकीचा अर्थ अनेक वेळा काढून झालेला आहे. आजच्या काळात ते विज्ञान अतिशय दुरावस्थेत आहे.

ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे यात काही शंका नाही परंतु त्याचे नाव इतके खराब झालेले आहे की आता त्यात खरे काय आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकत नाही.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तारकांचे गट बारा आहेत आणि नउ ग्रह आहेत.

असे म्हणतात की तुमचा जन्म झाल्यापासून गुरु जर अष्टम स्थानी गेला तर त्याने तुमच्या मनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे जर शनी अष्टम स्थानी स्तिथ झाला तर तुमच्या मनात भावनिक वादळ निर्माण होते. जेव्हा गुरु अष्टम स्थानी असतो तेव्हा तुम्ही तुमचे सर्व शहाणपण गमावून बसता. परंतु तुमची दयनीय स्तिथी होते हे केवळ अकरा महिन्याकरिताच. केवळ आणि केवळ जर तुम्ही खोल अध्यात्मिक ज्ञानात स्तिथ नसाल किंवा तुम्ही साक्षात्कारी नसाल तर यांने तुमच्या मनावर नक्कीच परिणाम होईल.

परंतु हे जर तुम्हाला माहिती असेल, 'येणारे तीन महिने माझ्या मनाकरिता आणि माझ्या भावनांकरिता कठीण असणार आहेत' ,तर तुम्ही निर्णय अथवा इतर काही या महिन्यामध्ये करणार नाही.

त्याचप्रमाणे दर अडीच दिवसानंतर मनाची मनःस्थिती बदलत असते.

जर तुम्ही दयनीय असाल तर हे अडीच दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. मध्ये हे थांबेल आणि नंतर ही मनःस्थिती पुन्हा परतून येईल.

त्याचप्रमाणे या अखंड विश्वाचासुद्धा मनावर परिणाम होतो.

या सर्वांपासून तुमचे संरक्षण हे सत्संग, ध्यान आणि जप याने होते. या सर्वांमुळे तुम्हाला एक संरक्षक चिलखत प्राप्त होते. समजा तुमच्या दिशेने एक बाण येत आहे आणि जर तुम्ही चिलखत घातलेले नसेल तर तो बाण तुम्हाला लागेल.

म्हणून 'ॐ नमःशिवाय' हे अनेक वेळा गायल्याने आणि जपल्याने तुमच्या सभोवती एक चिलखत निर्माण होते आणि ते तुम्हाला या सगळ्या गोंधळाच्या परिणामापासून रक्षण देते.

आपण बंगलोर आश्रमामध्ये सगळ्या जगाच्या आणि सगळ्या अनुयायींच्या कल्याणाकरिता यज्ञ करतो. दर सहा महिन्यांनी एक छोटा यज्ञ होतो आणि नवरात्रीच्या वेळेस सगळ्या जगाच्या आणि सगळ्या अनुयायींच्या शांती, उन्नती आणि रक्षणाकरिता मोठा यज्ञ करतो.

प्राचीन लोकांचे हेच मार्ग होते. याबद्दल आणखी ज्ञान आणि अभ्यासक्रम आपण भविष्यकाळात सुरु करू या.

प्रश्न : विचार हे कुठून येतात?

श्री श्री : हा विचार तुम्हाला आत्ताच आला? हा विचार कुठून आला? हा तुम्हाला आला, तर मग तुम्ही बसा आणि बघा की हा कुठून आला?

ज्या क्षणी तुम्ही बसता आणि विचाराच्या उत्पात्तीस्थानाविषयी विचार करू लागता तेव्हा मन निर्विकार होऊन जाते. हे विचार कुठून येतात याची खूण आहे.

विचारांचे,कल्पनांचे आणि भावनांचे उगमस्थान- ते आंतरिक अवकाश -तुम्हीच आहात. हे तर असे विचारणे झाले की,'ढग कुठून येतात?'

ढग तर आकाशात केवळ तरंगत असतात. त्याचप्रमाणे आपल्या आंतरिक आकाशामध्ये तीन आकाश आहेत- एक आहे बाह्य अवकाश,दुसरे आहे आंतरिक अवकाश जिथे विचार आणि भावना येतात आणि तिसरे अवकाश हे एक साक्षीदार असते. तिथे काही नसते, तिथे असतो तर केवळ परमानंद.

प्रश्न : काहीही न डळमळणारी श्रद्धा कशी मिळवायची?

श्री श्री : जर श्रद्धा खरी असेल तर तिला डळमळू दे.

सत्य हे अबाधित असते आणि जर श्रद्धेच्या सोबत सत्य आहे तर तिला डळमळू दे. ती कधीच हरवणार नाही. खरे तर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त संशय घेता येतील तितके घ्या.

"संशय घेऊ नका" असे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा एखादी वस्तू अस्सल नसते तेव्हा.

जेव्हा खरे सोने असते तेव्हा मी तुम्हाला सांगेन की पाहिजे तेव्हढे घासा. पण जर ती वस्तू केवळ सोन्याच्या पाण्यात बुडवलेली असेल किंवा त्या वस्तूवर केवळ सोन्याचा मुलामा चढवलेला असेल तर तुम्ही म्हणाल,'जास्त घासू नका त्याची चकाकी निघून जाईल.'

खऱ्या सोन्याला कितीही घासले तरीही त्याची चकाकी अजिबात कमी होणार नाही.

उर्जीची कमतरता म्हणजे संशय. जेव्हा तुमच्यामध्ये उच्च कोटीची उर्जा असते तेव्हा संशय कुठे असतो? संशय बळावतो जेव्हा उर्जेची पातळी कमी असते. खरी श्रद्धा तीच आहे जिला शंभरदा जरी हलवले तरी ती ढळत नाही. हीच खरी श्रद्धा आहे आणि ती कायम टिकून राहते.

प्रश्न : तुम्ही म्हणता की आम्ही आश्रमात येतो आणि आमचे पुनर्जनन होते-संपूर्ण जग आश्रम का नाहीये?

श्री श्री : माझ्याकरिता तर संपूर्ण जग हे माझा आश्रमच आहे.

जेव्हा तुम्ही आश्रमात येता किंवा अशा भौतिक जागी पोहोचता जिथे नेहमी सदैव ध्यान साधना होत असते तर तिथे त्या जागी त्याचे तरंग रहातात .

तुमच्या घरचेच पहा,जेवण्याची एक जागा,आराम करण्याची एक जागा आणि कचरा ठेवण्याची एक जागा असे असते. त्याचप्रमाणे या जगाचे सुद्धा तसेच आहे,प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा आहे.

तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या घराला जर आश्रम बनवलेत तर मला ते फारच आवडेल. आणि आश्रम म्हणजे काय? एक अशी जागा जिथे ज्ञान आणि प्रेम वस्ती करून आहे. जिथे कोणीही जरी आले तरी त्याचे स्वागत होते आणि त्यांना ग्रहण करण्याकरिता अन्न दिले जाते म्हणजे ते तिथे येऊन काही काळ विश्रांती घेऊ शकतील.

जर तुम्ही अशी शक्ती निर्माण करू शकलात तर संपूर्ण जग हे एक आश्रमच होऊन जाईल. खरे पाहता जेव्हा तुम्ही जंगलात, वनात निसर्गाच्या सहवासात असता तेव्हा ते सगळे काही आश्रमच असते.

मी तर म्हणतो की जगातला प्रत्येक वृक्ष हा माझ्या परसदारातील आहे, माझ्या आश्रमातील आहे. हे सत्य आहे परंतु काही वेळा तुम्हाला वाटते की या सगळ्याचा काही उपयोग होत नाहीये आणि तुम्हाला अशा एका जागेची आवश्यकता भासू लागते

जिथे जाऊन तुम्ही स्वतःला उर्जित करू शकाल तेव्हा तुम्ही इथे (आश्रमात) येता.

इथे तुम्हाला उर्जा जाणवते हे तर उघड आहे. हे तर असे आहे की तुम्ही तुमच्या घरात कुठेही फिरू शकता परंतु तुम्हाला जर अन्नाचा सुवास पाहिजे असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात जाता.

तुम्ही कुठेही बसून जेवू शकता परंतु स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या खोलीत अन्नाचा सुगंध दरवळत राहतो.

प्रश्न : आत्म्याचे काही लक्ष्य असते का?

श्री श्री : होय, आत्म्याचे निश्चितपणे लक्ष्य असते,ते म्हणजे महान आत्मा बनणे. छोट्या मनाचे ध्येय असते मोठ्या मनाबरोबर एकरूप होणे. प्रत्येक लाटेला किनाऱ्यावर पोहचायचे असते आणि सागराबरोबर एक व्हायचे असते, जे ती लाट अगोदरपासून असतेच!

प्रश्न : समय काय आहे?

श्री श्री : दोन घटनांमधील अंतर. आणि जर तुम्ही मला विचाराल की अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजे दोन वस्तूंमधील अवकाश होय.

प्रश्न : उगमाकडे परत कसे जायचे?

श्री श्री : केवळ शांत राहून, आजवर जे काही शिकलात ते मापदंड न वापरता स्वतःला शिथिल सोडल्याने तुम्ही उगमाकडे परतू शकाल.

प्रश्न : आम्हाला कलियुगाबाबत काही सांगा.

श्री श्री : चार युग आहेत; काळाचे चार स्वरूपामध्ये विभाजन केले आहे.

१. सत्य युग, जेव्हा अतिशय सकारात्मकता होती.

२. त्रेता युग, जेव्हा सकारात्मकता किंचित कमी झाली.

३. द्वापार युग, जेव्हा सकारात्मकता अजून खालावली.

४. कलियुग, जेव्हा सकारात्मकता आणखीन खालावत जात आहे.

हेच कलियुगाविषयी म्हंटले जाते. परंतु मी तर म्हणतो की कलियुगा मध्येच सत्ययुग आहे.

ज्यादिवसांमध्ये तुम्ही आनंद अनुभवता तेव्हा जाणून घ्या की तुम्ही सत्ययुगामध्ये आहात. आणि जेव्हा तुम्ही पूर्णतः दयनीय परिस्थितीत असता तेव्हा तुम्ही कलियुगामध्ये असता.

या दृष्टीने पहिले तर कलीयुगामध्येसुद्धा चांगला समय आहे.

प्रश्न : तुम्ही म्हणालात कि सत्य हे परस्परविरोधी आहे. हे समजण्याचा एक सोप्पा मार्ग तुम्ही आम्हाला दाखवाल का?

श्री श्री : दुध हे उत्कृष्ट आहे आणि दुध हे वाईट आहे.

तुम्ही एक कप दुध प्यायलात तर दुध चांगले आहे,पण दोन लिटर प्यायलात तर वाईट. कळले?

बँड अँनटोगँस्ट या जागी पोहोचण्यासाठी जर तुम्ही र्फुडेनस्टडट इथून आलात तर तुम्हाला सरळ जाऊन उजवीकडे वळायचे आहे. पण ओप्पेनाऊ इथून तुम्ही आलात तर तुम्हाला सरळ जाऊन डावीकडे वळावे लागेल. दोन्ही सूचना बरोबर आहेत परंतु त्या परस्परविरोधी आहेत.

सत्य हे वलयाकार असते, ते काही ओळीप्रमाणे सरळ नसते. जर काही वलयाकृती असेल तर तिथे पोहोचण्याचे अनेक मार्ग असतात.

प्रश्न : भारत २००० वर्षांपूर्वी जसा देश होता तसा बनण्याच्या मार्गावर आहे का?

श्री श्री : जर राजकारण्यांनी तसे घडू दिले तर होईल.

इटली,भारत आणि ग्रीस या देशांमध्ये राजकारणी लोक हे एक मोठी समस्या होऊन बसले आहेत. हे राजकारणी लोकच आहेत हे देशाला कर्जबाजारी बनण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत.

प्रत्येक देशाकडे पुरेशी साधनसामग्री आणि योग्य लोक आहेत. जोशपूर्णतासुद्धा आहे, परंतु भ्रष्टाचार हा देशांना आदिम आणि मध्ययुगीन काळाकडे घेऊन जात आहे.

मद्यपानाशी युद्ध करणे गरजेचे आहे.

05
2013
Jan
बंगलोर, भारत


प्रश्न : काही लोक म्हणतात की, ‘थोडीशी वाईन घेतली तर काही हरकत नाही’. महादेव सुद्धा सोमरस घेत होते.” या वक्तव्यावर काय म्हणावे ?

श्री श्री : लोकांना जे करायचं ते करतात आणि मग स्वत:चं समर्थन करण्यासाठी ते धर्माच्या किंवा देवाच्या नावावर घालतात.

दुसऱ्यांचं सोडा, फक्त तुमच्या आयुष्याचं बघा. महादेवांनी जर सोमरस घेतला असेल तर त्यांनाही त्रास झालाच असेल.

दिल्लीत त्या पाच लोकांनी निर्भयाबरोबर काय केलं बघा. ते सगळे दारूच्या नशेत होते. आणि जेव्हा कुणी दारूच्या नशेत असते तेव्हा त्यांच्या कृतीला तुम्ही त्यांना जाबाबदारही धरू शकत नाही.

समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी अर्ध्या गुन्ह्यांना नशाच कारणीभूत असते. त्यामुळे फक्त त्या पाच लोकांना तुरुंगात टाकू नका तर मादक पेये बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या लोकांनाही जबाबदार धरा.

हे जवळ जवळ सगळ्या गावांमध्ये होत असते. पुरुष रात्री दारू पिऊन घरी येतात आणि बायकांना मारतात. आणि दुसऱ्या दिवशी माफी मागतात कारण त्यांना माहित असते की रात्री ते, ‘ते स्वत:’ नव्हतेच. दारू हेच समाजातील गुन्ह्यांचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्ही दारू थांबवली तर देशातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

तुम्हाला ठाम निश्चय करायला हवा की, “ मी दारूला स्पर्श करणार नाडी.”

तुम्ही जर म्हणालात की “मी फक्त लोकांमध्ये असताना पितो” किंवा “ मी फक्त एक पेग घेईन” ही सगळी विधानं म्हणजे फक्त समर्थन आहे. तुम्ही जेव्हा दारूसाठी दार उघडता तेव्हा ती कधीही येऊन तुम्हाला वाहून नेऊ शकते. नुसते दारच नाही तर पुढचे मुख्य फाटकही बंद करून घ्या म्हणजे ती तुमच्या दारापर्यंतही पोहोचणार नाही.

तुम्ही स्वत:वरच बंधन घालून घेतले पाहिजे की, “ मी यापैकी कोणतेही मादक पेय पिणार नाही.” त्याने तुम्हाला प्रचंड मोठे बळ मिळते, माहितीये कां ? पण ज्या क्षणी तुम्ही जरासे ढिले पडाल की, “ मी फक्त एकदाच घेतो.” मग तुम्ही त्यात नक्की अडकलात म्हणून समजा.

आयुष्यात तुम्ही कधी नाराज होता तर कधी बेचैन होता. उगीचच अस्वस्थपणा येऊ शकतो. इथे असलेल्यांपैकी किती जणांना असा अनुभाव आला आहे ? .

सगळं चांगल चाललं आहे पण उगीचच अस्वस्थ वाटते. अस्वस्थ कां वाटते ते समजत नाही.

शरीरामध्ये अस्वस्थ वाटायला लागते आणि मग दारू प्यावीशी वाटायला लागते. आणि मग सुरुच होते. म्हणूनच मी म्हणतो तिला मुख्य फाटकाच्या बाहेरच ठेवा. गुन्हेगारी संपण्यासाठी दारूशी युद्ध करण्याची गरज आहे.

प्रश्न : जेव्हा मी आश्रमात असतो तेव्हा मला बाहेरच्या भौतिक जगात परत जावेसेच वाटत नाही. कधी कधी कुटुंबाची जबाबदारी हा एक अडथळा होतो. यावर काय करावे ?

श्री श्री : तुम्हाला चार्जर लावून तुमचा मोबाईल फोन चार्ज करावा कागतो. पण तुम्ही सतत तुमचा मोबाईल चार्जरवरच ठेवत नांही, नाहीतर तुम्ही तो वापरणार कसा ?!! त्याचप्रमाणे तुमचे चार्जिंग जेव्हा कमी झाले असेल तेव्हा तुम्हाला परत इथे येऊन स्वत:ला चार्ज करुन घ्यावे लागेल. माझ्यासाठी सगळं जगच एक आश्रम आहे. मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत रहातो.

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि घरची कामे याकडे बघितलेच पाहिजे. तुम्हाला ते सगळे करायलाच हवे; ते करणे आवश्यक आहे. जबाबदाऱ्यांपासून पळणे म्हणजे आध्यात्म नव्हे, उलट जास्त जबाबदारी घेणे होय.

पहिले म्हणजे तुमचे कुटुंब, मित्रमंडळी,भोवतालचा परिसर; त्यानंतर देशाची जबाबदारी ; आणि मग संपूर्ण जगाची जबाबदारी. अशी आपली जबाबदारी वाढत जायला हवी.

प्रश्न: माझ्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना मी कसे काय स्वीकारावे ?

श्री श्री : जर ते तुमच्या विरुद्ध वाईट गोष्टी करत असतील तर तुम्ही काय करू शकता ? जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला नाही तर तुमच्याकडे दुसरा काय पर्याय आहे ? जर तुम्ही त्यांचा स्विकार केला नाही तर तुम्ही अस्वस्थ व्हाल, हो की नाही ? तुमचे मन बेचैन होईल आणि अशा अवस्थेत तुम्ही जो निर्णय घ्याल त्याबद्दल तुम्ही खुश असाल कां ? नक्कीच नाही ! तर स्वत:साठीच लोक आणि परिस्थिती हे जसे असतील तसा त्यांचा स्विकार करा. म्हणजे तुमचे मन शांत राहिल. मग तुम्ही तुम्हाला जे करायचे असेल ते करा.

प्रश्न : एका शिक्षकाकडून मी ऐकले की १०० % जीवन जगण्यासाठी तुमच्या मनाची स्पष्टता पाहिजे. मनातला गोंधळ कसा घालवायचा ?

श्री श्री : तुम्ही अजूनही गोंधळलेले आहात कां ? प्रत्येक गोंधळ म्हणजे विकासाकडे जाणारी एक पायरी असते. गोंधळ म्हणजे काय ? कुठलीतरी जुनी संकल्पना मोडून पडणे. जुन्या कल्पना नाहीशा झाल्या आणि नव्या निर्माण होऊ लागल्या. नवीन कल्पना अजून केंलेली नाही आणि जुनी नाहीशी झालेली आहे; हाच गोंधळ आहे आणि हे चांगली संक्रमण स्थिती आहे, त्यातच रहा. मी तुम्हाला सांगतो, ही स्थिती जास्त काळ टिकणार नाही.

प्रश्न : नातेसंबंध म्हणजे खरेच काय असते ? एकदा दुधाने तोंड पोळले आहे त्यामुळे मी ताकही फुंकून पीत आहे. ही भीती कशी घालवू ?

श्री श्री : तुम्ही हा प्रश्न विचारताय म्हणजे तुमची भीती आधीच गेलेली आहे. जर गेलेली नसती तर तुम्ही हा प्रश्न विचारलाही नसता. तुम्ही फक्त म्हणाला असतात, “ नातेसंबंध, मला त्यात पडायचेच नाही.” आणि तुम्ही पळून गेला असतात. तुमच्यात आता तितकीशी भीती राहिलेली नाही , अगदीच थोडीशी आहे, आणि मन त्यादिशेने जाऊ लागले आहे, तुम्हाला फक्त त्यावर माझ्याकडून खात्रीचा शिक्का हवा आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीत धोका असतो. तुमच्या मनातच अनिश्चिती असते.तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनावरही भरवसा ठेवू शकत नाही. दुसऱ्या कुणावर भरवसा ठेवणे तर दूरची गोष्ट. तुम्ही तुमच्या मनावर भरवसा ठेवू शकता कां ? मी बऱ्याच लोकांना खरेदीला गेलेले असताना बघितले आहे. ते विचारतात, “ मी हे परत करू शकेन कां किंवा बदलून घेऊ शकेन कां ?”

लोक काहीतरी विकत घेऊन घरी येतात आणि मग त्यांना ते आवडत नाही. म्हणून ते परत जातात आणि म्हणतात की त्यांना ते बदलून हवे आहे. विशेषत: बायका, त्या एखादी साडी खरेदी करतात आणि घरी येऊन ती साडी उघडून बघतात तेव्हा त्यांना ती आवडत नाही आणि मग त्यांना ती बदलून हवी असते.

एक बाई माझ्याकडे येऊन म्हणायच्या, ‘गुरुजी मला आशिर्वाद द्या की मी चांगल्याच गोष्टी विकत आणीन. मी दरवेळी शॉपिंग करून घरी आले की मला पुन्हा परत जावे लागते.’ मन हे असंच चंचल असतं.

जेव्हा तुमचं मन चंचल असतं तेव्हा दुसऱ्याचंही चंचल असू शकतं, हो नां ?

निरनिराळे लोक असतात, निरनिराळ्या भावना, वागणुकीचे निरनिराळे प्रकार असतात आणि आपल्याला त्यांच्या बरोबरच पुढे जायचे आहे. आपल्याला दुसरा मार्ग नाही. स्विकार करा आणि पुढे जा. कोणाबरोबरही कोणत्याही व्यवहारात तरुण अथवा म्हातारे, कुणाबरोबरही वावरताना, जीवनात तडजोड ही असतेच.

प्रश्न : जगातील सगळे प्रश्न प्रेमानेच सुरु होतात आणि संपतात, असे कां?

श्री श्री : अन्यथा जीवन किती कंटाळवाणे झाले असते. कल्पना करा, जर काही समस्या नसत्या, की त्रास नसते, आयुष्य किती सपक झाले असते, हो की नाही ?

तुम्ही याच्या बद्दल अचंबा करत रहा. हे एक आश्चर्य आहे, प्रश्न नाही.

प्रश्न : भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग राजकीय पवित्रा कां घेत नाही.

श्री श्री :ज्या कुणाला असा पवित्रा घ्यायचा असेल त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग पाठिंबाच देईल. राजकारण हे आर्ट ऑफ लिव्हिंग साठी खूपच लहान असे क्षेत्र आहे. आम्ही सीमा पार केलेल्या असल्यामुळे आर्ट ऑफ लीव्हिंगने देशातील राजकारणात अडकून पडावे असे मला वाटत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग कितीतरी देशात कार्यरत आहे; ‘लोकांना योग्य मार्गावर रहाण्यासाठी प्रोत्साहन देणारे’, असे त्याचे स्वरूपच कायम राहील. मात्र ज्यांना राजकारणात जायचे असेल, विशेषत: युवक, तुम्हाला माझा पाठिंबा असेल. बाहेर पडा आणि करून दाखवा.

प्रश्न : गुरुदेव, कृपया मिथ्याचाराबद्दल सांगाल कां ? त्यातून बाहेर कसे पडायचे ?

श्री श्री : जेव्हा कुणी एखादी गोष्ट करण्याचा मनात विचार करत रहातो पण त्यावर कृती करत नाही तेव्हा त्याला मिथ्याचार म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही जेवणाबद्दल विचार करता पण जेवण करत नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि केले दुसरेच काही तरी तर त्यालाही मिथ्याचार म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही कुणाला तरी सांगितले की ,“ मी संध्याकाळी सहा वाजता येतो.” आणि तुम्ही मनात मात्र ठरवले आहे की तुम्ही जाणार नाही तर हा मिथ्याचार झाला. स्वत:शीच खोटे बोलणे किंवा स्वत:ला फसवणे म्हणजे मिथ्याचार.

प्रश्न :वाईटाची अपेक्षा करण्याने मी जास्त वास्तववादी होतो आणि अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीशीही सामना करू शकतो. हे चूक आहे कां ?

श्री श्री : एकेकाळी ‘वाईटाची अपेक्षा करणे’ हे फॅशनेबल समजले जायचे पण आज, बुद्धिवादी लोकांमध्ये या प्रवृत्तीने इतकी मर्यादा गाठली आहे की ती आता उपयोगाची ठरत नाही, नवनिर्मिती होत नाही. त्याने स्वत:चे किंवा समाजाचे काहीही भले होत नाही.

‘वाईटाची अपेक्षा करणे’ हे ताटातील एका कोपऱ्यात असलेल्या लोणच्यासारखे आहे. पण सगळे ताटच जर लोणच्याने भरून गेले आणि पोळीचा एक छोटासा तुकडाच कुठेतरी कोपऱ्यात असला तर काय होईल याची कल्पना करा. तुम्ही भूकेलेच रहाल आणि आज असेच झाले आहे.

‘वाईटाची अपेक्षा करणे’ गरजेचे आहे पण अगदी अल्प प्रमाणात. त्याने तुमच्यात वास्तवता यायला हवी हे खरे पण त्यामुळे तुमची कल्पनाशक्ती, तुमची परिवर्तनाची उर्मी हिरावली जाता कामा नये आणि तुमचा उत्साह नष्ट होता काम नये. त्याने तुमची सकारात्मकता, तुमची आकांक्षा, तुमचा आशावाद झाकाळून जाता कामा नये. असे असेल तर मग काही हरकत नाही. थोड्याशा वाईटाची अपेक्षा ठेवा.

वेदामध्येही काहीशी उपेक्षा दिसेल. असे म्हटले आहे की, “ सृष्टीची सुरवात कुणाला माहित. देवाला माहित किंवा कदाचित त्यालाही माहित नाही.” असे वेदात म्हटले आहे.

कुत्सितपणा आणि उपेक्षा ठीक आहे. फक्त लोणच्याचे उदाहरण लक्षात ठेवा. त्याला भात,डाळ किंवा पोळीची जागा घेता येणार नाही पण कोपऱ्यात कुठेतरी थोडेसे ठीक आहे.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा माझ्या हे लक्षात येते की या जगातील माझे अस्तित्व अगदी क्षुल्लक आहे तेव्हा मी आळशी बनतो. मी एकाच वेळी उत्साही आणि विस्तारलेला कसा असू शकतो ?

श्री श्री : मोठी स्वप्ने बघा. तुमचे संकल्प पक्के ठेवा आणि कोणत्याही अडचणींचा विचार न करता पुढे जात रहा. इतकेच.

प्रश्न : तुम्ही म्हणाला होतात की २०१२ हे परिवर्तनाचे वर्ष आहे पण काहीच बदलले नाहिये. तोच भ्रष्टाचार , तेच गुन्हे होत आहेत.

श्री श्री : थांबा ! तुम्हाला काय म्हणायचे आहे ? लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिले. २०१२ च्या शेवटच्या महिन्यात काय झाले बघा. संपूर्ण देश जागा झाला. लोक जागे होऊ लागलेत. पूर्वी महिलांवरचा हिंसाचार सहन केला जायचा.

आम्ही जरी महिला सबलीकरणाचे कार्यक्रम करत असलो, महिला परिषदा भरवून त्यात महिलांच्या प्रश्नाबद्दल आणि स्त्रीभृणहत्येबद्दल चर्चा करत असलो, तरी आज एका घटनेमुळे अचानक सगळा देश खडबडून जागा झाला आहे. अशी ही एकाच घटना नाहिये. अशा २०,००० घटना झालेल्या आहेत. फक्त दिल्लीत त्यावेळी अशा ८०० घटना झाल्या होत्या. ह्याला म्हणतात जागे होणे. लोक जागे होताहेत हेच परिवर्तन. हो की नाही ? त्यातही भारतीय वर्ष मार्चमध्ये सुरु होते हे लक्षात ठेवा.

तुम्हाला सगळ्या महिन्यांची नावं माहिती आहेत कां ? इंग्लिश महिने इंग्लिशमध्ये नाहीयेत, ते संस्कृतमध्ये आहेत. तुमच्यापैकी किती जणांना हे माहित नव्हतं ? (बरेच जण हात वर करतात.)

डिसेंबर म्हणजे काय माहित आहे ? दस म्हणजे दहा आणि अंबर म्हणजे आकाश, त्यामुळे दश अंबर म्हणजे दहावे आकाश. नोव्हेंबर म्हणजे नववे आकाश, ऑक्टोबर म्हणजे आठवा महिना. सप्त म्हणजे सात, अंबर म्हणजे आकाश. मग सप्तअंबर झाला सप्टेंबर. ऑगस्ट म्हणजे षष्ठ म्हणजेच सहावा, म्हणून ऑगस्ट हा सहावा महिना. जानेवारी हा ११वा महिना, फेब्रुवारी हा १२ व महिना. मार्च म्हणजे पुढे जाणे.म्हणजे जेव्हा नवीन वर्ष सुरु होते. त्याच वेळी, मार्च महिन्याच्या शेवटी, सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. अजूनही अफगाणिस्थान, इराण वगैरे देशात २१ मार्च हा नवीन वर्षाची सुरवात म्हणून साजरा केला जातो कारण तीच वैदिक परंपरा होती. मार्च म्हणजे नूतन. फेब म्हणजे सर्वात शेवटचा. आपण सर्वात टोकाचा म्हणतो नां ? तेच फेब्रुवारी. तर ही सगळी महिन्यांची नावे संस्कृत आहेत. तुम्ही जर एखाद्या इंग्लिशच्या प्राध्यापकाला विचारलं की सप्टेंबर किंवा नोव्हेंबरचा अर्थ काय तर त्यांना काहीच माहित नसेल.

मी याचा विचार केला आणि माझ्या लक्षात आले की संस्कृतशी किती जवळचे नाते आहे. आणि हे किती जुळते आहे. आज तुम्ही काही तरी महत्वाचे शिकलात. महिन्यांच्या नावांचे अर्थ.

संस्कृतची ही एक गोष्ट छान आहे की कुठलेच नाव बिनअर्थाचे नसते. तुम्हाला माहित आहे कां की पानांना पर्ण म्हणतात पर्ण म्हणजे काय माहित आहे कां ? जो सूर्यप्रकाश आणि आर्द्रता शोषून घेतो त्याला पर्ण म्हणतात. तुम्हाला माहित आहे कां, की येशू नाताळच्या दिवशी जन्मला नव्हता? तुमच्यापैकी किती जणांना हे माहित नव्हतं ? (बरेच हात वर येतात)

तुम्ही ती येशू आणि नाताळ बद्दलची डॉक्युमेंटरी फिल्म बघायला हवी. फक्त २०० वर्षांपूर्वी लोकांनी नाताळ आणि येशू यांचा संबंध जोडला. आधी तो फक्त आयन दिन म्हणून साजरा केला जायचा. वेदिक काळापासून जगभर तो सूर्यदेवाचा दिवस म्हणून साजरा केला जायचा. येशूच्या जन्माबद्दलचे वर्णन वाचले तर तुम्हाला दिसेल की ते सगळे वसंत ऋतूचे वर्णन आहे. अति थंडी असलेल्या हिवाळ्यात त्याचा जन्म झाला नव्हता. तसेच त्याची गर्भधारणा मे महिन्यात झाली असेल तर डिसेंबरमध्ये त्याचा जन्म होऊ शकत नाही. शुद्ध अशी गर्भधारणा झाली आणि डिसेंबर हा फक्त सातवा महिना असणार. येशू हे काही कमी दिवसात जन्मलेले बाळ नव्हते. त्याने पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेतले होते. पण लोकांना त्याच्या जन्माचा नक्की दिवस माहित नव्हता. त्यामुळे लोकांनी जरी क्रिस्ती धर्म स्वीकारला तरी चर्च त्यांना नाताळ साजरा करण्यापासून थांबवू शकले नाही. म्हणून त्यांनी त्यात अशी भर घातली की , “हाच येशूचा जन्म दिवस आहे असे समजा आणि आपण तो असा साजरा करुया.” अशाप्रकारे त्यांनी सूर्य देवाच्या जागी येशूला आणले.

प्रश्न : गुरुदेव, पृथ्वी, अग्नी आणि इतर देव जेव्हा महादेवाचा मुलगा कार्तिकेय आणि देवी पार्वती यांना तर्कासुरापासून वाचवायला गेले तेव्हा देवी पार्वतीने रागाच्या भरात त्यांना शाप दिला. देवी असूनही तीला राग अनावर झाला हे कसे शक्य आहे ?

श्री श्री : पुराणातील गोष्टींचे हे चुकीचे चित्र रेखाटले आहे. टीव्ही वाल्यांना हे नेहमीच जरा जास्त नाट्यपूर्ण करायचे असते.मी देवी पार्वती बघतो तेव्हा भावनांचे अति प्रदर्शन, रडणे, माफी मागणे वगैरे दिसते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यांनी देवांना सामान्य माणसाच्या आणि सामान्य माणसांच्या भावनांच्या स्तरावर आणून ठेवले आहे. निर्माते, दिग्दर्शक यांनाही मालिकेचा भाग लांबवायचा असतो त्यामुळे ते तिखट मीठ घालून प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीपेक्षा जरा जास्त नाट्यपूर्ण करतात. मूळ पुराणात ते असे नसते. देवी पार्वती अशा विविध भावनांमधून जात नाही. लोकांनी लिहिलेल्या दूरदर्शन मालिकेच्या पटकथेतच फक्त देवी तुम्हाला अशी दिसते आणि गणपती असा परत परत माफी मागताना दिसतो. तो स्वत:च देव असताना त्याला दुसऱ्यांची कोणत्याही प्रकारे माफी मागण्याची काय गरज आहे ?

हे बघा, जेव्हा तुम्ही कोणतेही पुरण वाचता तेव्हा त्यात आदिदाता हे मुख्य आणि वंदनीय पात्र असते .ज्या पूज्य देवतेच्या जीवनावर आणि शौर्यगाथांवर आधारित गोष्टी त्या पुराणात असतात.

उदाहरणार्थ, शिवपुराण बघितले तर शंकर महादेव सर्वात श्रेष्ठ आणि बाकीचे देव आणि इतर सगळे दुय्यम असतात. तसेच तुम्ही जर गणेश पुराण बघितले तर गणेश हा त्या पुराणातील सर्वात श्रेष्ठ असतो. तसेच देवी पुराणात ब्रह्मा, विष्णू, महेश हे, देवीचे त्या पुराणातील महत्व दाखवण्यासाठी देवीच्या चरणाशी असतात. देवी पुराणातील सर्व गोष्टी देवीलाच मुख्य देवाता मानून तिच्याच भोवती घडत असतात आणि बाकीच्या देवता दुय्यम भूमिका घेतात.

विष्णू पुराणात तुम्हाला दिसेल की विष्णूशिवाय दुसरा कोणताही देव श्रेष्ठ नाही. आणि बाकी सगळे देव त्याच्यापेक्षा गौण आहेत कारण तो त्या पुराणाचा मुख्य देव आहे.

म्हणूनच देवाला इष्ट म्हणजेच श्रेष्ठ असे म्हटले जाते, ज्याच्या भोवती सर्व काही घडत असते. त्यामुळे आपण ज्या देवतेला इष्ट मानतो ती देवता आपल्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि परमपूज्य असते.

आदि शंकराचार्यांनी लिहिलेला एक सुंदर श्लोक आहे. ज्यात ते म्हणतात, ‘मननाथा श्री जगन्नाथा, मद्गुरू श्री जगद्गुरू, मदात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्री गुरवे नम:’

याचा अर्थ माझा इष्ट देव हा सर्व सृष्टीचा देव आहे. माझे गुरु हे सर्व सृष्टीचे गुरु आहेत, माझा आत्मा सर्व जीवात आहे.

भक्ताच्या मनात आपल्या देवतेबद्दल जेव्हा अशी भावना असते तेव्हा त्याला विशिष्ठ भक्ती असे म्हणतात. ‘माझ्या देवापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही’ अशी जेव्हा भावना येते तेव्हा मन एकाग्र होते. कारण सर्वश्रेष्ठाकडे जाण्याची मनाची प्रवृत्ती असते.

जर तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे काही सापडले नाही तर तुमचे मन आणखी जास्त श्रेष्ठ शोधण्यासाठी भटकत राहील. त्यामुळे मनाला एकाग्र करण्यासाठी गहिऱ्या भक्तीमध्ये केंद्रित होण्यासाठी पुराणात या निरनिराळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळेच शिवपुराणात म्हटले आहे की शिवा हाच सर्व श्रेष्ठ बाकी सर्वजण शिवापुढे नतमस्तक होऊन वंदन करतात.हा त्यातला खरा अर्थ आहे.

पण दूरदर्शन मालिका बनवणाऱ्या या लोकांना जास्त नाट्यपूर्ण करावे लागते नाहीतर ते कंटाळवाणे होईल म्हणूनच ते त्यात जरा मसाला घालतात.

असे कधीच झालेले नाही की दुर्गादेवीने तिचा क्रोध असा जगात कुणावरही काढला. दुर्गेचा क्रोध फक्त महिषासुरावर होता. तोही पूर्णपणे क्रोध नव्ह्ता तर त्यात काहीसे सामंजस्य आणि सुखदपणा होता. देवी दुरगा फक्त हंऽऽऽऽऽऽ असा आवाज करत टाकलेल्या उत्छ्वासाने महिषासुराची (नकारात्मकता आणि निष्क्रियता यांचे प्रतिक) राख करून टाकते.

दूरदर्शनने पुराणातील गोष्टींची निरनिराळी चित्रे रेखाटली आहेत. ते सत्य मानायची गरज नाही.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, जर कुणाला वाटत असेल की स्वत:चा इष्टदेव सर्वश्रेष्ठ आहे तर त्याने मूलतत्ववाद / दुराग्रह येणार नाही कां ?

श्री श्री : हे बघा, जगत्ल्या कोणत्याही आईला तुम्ही विचारले तर ती म्हणेल की तिचा मुलगा सर्वात चांगला आहे. जगात आणखी कितीतरी मुले असतील पण तिच्यासाठी तिचा मुलगा सर्वात चांगला आहे. मूलतत्ववाद म्हणजे दुसरे चूक किंवा तुमच्यापेक्षा कमी आहेत असे दर्शवणे. तरीही, माझ्यासाठी माझा देव सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचा देव तुच्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल असे वाटणे म्हणजे मूलतत्ववाद आही.

मुलांच्या संगोपनाची कला

03
2013
Jan
बर्लिन, जर्मनी.प्रश्न: या काही वेळा कठीण असणाऱ्या जगात आपली मुले हसत खेळत मोठी होणे खुपच चांगले असते. अशी हि मुले जेंव्हा ध्यान करण्याएवढी मोठी नसतात, तेंव्हा त्यांना आपण प्रेमाशिवाय अजून काय देऊ शकतो?

श्री श्री : त्यांच्याबरोबर नेहमी खेळत रहा. त्यांना नेहमी शिकवत बसून , शिकविणे सुरु करु नका. खरेतर त्यांचा आदर करून त्यांच्यापासून काही शिका. त्यांच्या बरोबर वागताना नेहमी गंभीर राहू नका.

मला माझे लहानपण आठवते आहे, जेंव्हा रोज संध्याकाळी आमचे वडील बाहेरून घरात यायचे तेंव्हा ते आम्हाला टाळ्या वाजवून हसवायचे.माझी आई काहीशी कडक शिस्तीची होती, पण आमचे वडील मात्र आम्हाला नेहमी रात्रीच्या जेवणाच्या आधी टाळ्या वाजवून हसवायचे. प्रत्येकजण जेवायच्याआधी खूप हसायचा.

म्हणून त्यांना नेहमी उपदेश न करता, त्यांच्याबरोबरचे क्षण साजरे करा, त्यांच्या बरोबर खेळा, त्यांच्या बरोबर गाणी म्हणा. असे करणे चांगले असते.

तुम्ही जर नेहमी छडी घेऊन त्यांच्या मागे लागलात आणि म्हणू लागलात कि “ हे करू नकोस, ते करू नकोस” तर ते चांगले नाही.

लहान मुलांबरोबर तुम्ही नेहमी खेळले पाहिजे, कधी कधी त्यांना गोष्टी सांगायला पाहिजेत. आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा अनेक छान छान गोष्टी ऐकल्या आहेत. आम्ही रोज एक गोष्ट ऐकायचो. मुलांमध्ये काही गुण वाढीला लागण्यासाठी गोष्टी चांगल्या असतात.तुम्ही जर त्यांना काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या तर ते सारखे दूरदर्शन समोर ठाण मांडून बसणार नाहीत.

लहान मुलांसाठी पंचतंत्र सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आमचे एक साधक पंचतंत्र वर कार्टून तयार करीत आहेत. ते लवकरच उपलब्ध होईल.

म्हणून पालकांनी मुलांबरोबर बसून त्यांना नैतिक मूल्ये असलेल्या गोष्टी सांगायला पाहिजेत. काही नैतिक मूल्ये असलेली गोष्ट नेहमी चांगली असते. अशा तऱ्हेने जर तुम्ही त्यांच्याबरोबर एखादा अर्धा तास घालविला तर तो त्यांच्यासाठी अधिक गुणवत्ता पूर्ण आणि चांगला असेल.

त्यांच्या बरोबर पाच सहा तास बसून त्यांच्यावर दबाव टाकू नका. ४५ मिनिटे ते एक तास असा गुणवत्तापूर्ण वेळ हा चांगला आणि त्यांच्यासाठी मनोरंजक असा असावा. तुमच्याबरोबर असा वेळ मिळावा म्हणून त्यांच्यात गोष्टी ऐकण्याची उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे.

मला आठवते आहे कि आमचे एक खूप लट्ठ, गोरे आणि गोल चेहऱ्याचे काका होते. प्रत्येक रविवारी ते आमच्याकडे येऊन आम्हाला गोष्टी सांगायचे. आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर बसून गोष्टी ऐकायचो आणि मग ते गोष्टीच्या शेवटाला नेहमी काही गुपित असायचे आणि मग आम्ही ते शोधण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट बघायचो.

आपल्यामध्ये आशी काही व्यक्तिमत्वे आहेत. आणि नसतील तर तुमचे मूल हे दुसऱ्या मुलांना गोष्टी सांगू शकते. त्यामुळे त्यांच्या पालकांना आनंद होईल. त्यांना त्यांच्या मुलाकडे बघायला कोणी तरी मिळेल आणि ती तुमची सेवा होईल.

म्हणून त्याला मानवी स्पर्शाची गरज असते.

हल्लीची मुले उठल्यापासून दूरचित्रवाणी समोर बसून , त्यावर चाललेल्या गोष्टींमध्ये भाग न घेता त्याचे केवळ साक्षीदार असतात, होय कि नाही?.

ते दूरचित्रवाणी समोर बसून त्याची केंद्रे बदलत राहतात. त्यांची आई त्यांना नाश्ता करायला बोलावते पण ते उठत नाहीत. मग काही वेळा त्यांची आई त्यांना दूरचित्रवाणी समोर नाश्ता आणून देते. हि संस्कृती बरोबर नव्हे.तुम्हाला काय वाटते? तुमच्यातील किती लोक माझ्याशी सहमत आहेत?

मुलांना दूरचित्रवाणी समोर एकतासपेक्षा जास्त वेळ बसू देऊ नये.हा वेळ जर मर्यादित केला नाही तर त्यांच्यात कमतरतेची लक्षणे दिलू लागतील. मेंदूवर त्या प्रतिमांचा सारखा मारा केल्यामुळे मग इतर काही गोष्टी त्यांना समजत नाहीत आणि मग ते मंद होतात. त्यांना मग काही समजत नाही.

आमच्या लहानपणी दूरचित्रवाणी नव्हती . या बद्धल आम्ही देवाचे आभारी आहोत.

तुमच्यापैकी किती लोकांच्या लहानपणी दूरचित्रवाणी नव्हता? दूरचित्रवाणी शिवाय आम्ही मोठे झाले.

खूप वेळ दूरचित्रवाणी बघणारी मुले हुशार असतात असे नाही. दिवसात दोन तास ही मर्यादा घातली पाहिजे.

प्रौढांसाठी पण दिवसात एक किंवा दोन तास पुरेसे असावेत. त्यांच्यासाठी पण हे फार होते. तुम्हाला हे माहित आहे कि दूरचित्रवाणीच्या अतिरेकामुळे आपल्या मेंदूच्या नसांवर फार ताण पडतो.

काही वेळा लोक मला “ गुरुदेव हा कार्यक्रम खूप छान आहे”, असे म्हणून दूरचित्रवाणी बघायला भाग पाडतात.

मी अर्धा किंवा एक तासापेक्षा जास्त वेळ ते पाहू शकत नाही. त्यानेपण मनावर खूप ताण पडतो.

मला आश्चर्य वाटते कि लोक आठवड्यात दोन किंवा तीन चित्रपट कसे बघू शकतात. मी तुम्हाला सांगतो कि त्याने आपला मेंदू खूप रिकामा होतो.

चित्रपट गृहाच्या बाहेर येणाऱ्या लोकांकडे पहा, ते खूप उत्साही आणि आनंदी दिसतात का? ते चित्रपट गृहात जाताना आणि बाहेर येतानाचा फरक लक्षात घ्या. चित्रपट कितीही चांगला असु देत पण ते मात्र अनुत्साही, थकलेले आणि आळसावलेले दिसतात, होय कि नाही?

हा फरक तुमच्या लक्षात आला नसेल तर चित्रपटगृहाच्या बाहेर उभे रहा आणि निरीक्षण करा. लोक आत जाताना कसे होते आणि चित्रपट संपल्यावर बाहेर येताना कसे दिसतात हे पहा. तुम्हाला त्यातील फरक लक्षात येईल.

अगदी तुमच्यात पण होणारा हा बदल, तुमच्यापैकी किती लोकांच्या लक्षात आले आहे? कोणत्याही करमणुकीत तुमचा उत्साह वाढायला पाहिजे पण चित्रपटाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही.

समजा तुम्ही कोणत्याही समोर होणाऱ्या कार्यक्रमाला गेलात तर एवढे अनुत्साही वाटत नाही. अशा कार्यक्रमानंतर काहीसे दमल्यासारखे वाटते पण चित्रपटासारखे नाही. हे तुमच्या लक्षात आले आहे काय?

आणि जेंव्हा तुम्ही सत्संगाला येता, तेंव्हा बरोबर त्याच्या उलट होते. जेंव्हा तुम्ही येता तेंव्हा तुम्हाला काहीसे वेगळे वाटते पण जेंव्हा तुम्ही बाहेर पडता तुमचा उत्साह वाढलेला असतो.

प्रश्न: लहान मुलांना भीतीदायक कथा सांगाव्यात काय? कारण जर्मन भाषेत अशा काही भीतीदायक कथा आहेत आणि लोक म्हणतात कि त्या मुलांना सांगू नयेत.

श्री श्री : थोड्या प्रमाणात सांगायला हरकत नसावी.

समजा लहानपणी तुम्ही त्यांना तश्या कथा सांगितल्या नाही आणि त्यांनी त्या मोठेपणी ऐकल्यात तर त्यांना अजूनच भीती वाटेल. त्यामुळे ते आणखी कमजोर होतील.

पण त्याचवेळी तुम्ही त्यांना फक्त अशाच गोष्टी सांगत बसलात तर त्यांच्यावर भीतीचा पगडा बसू शकतो. अशा दोन्हीचा अतिरेक वाईट आहे. काही प्रमाण भीतीदायक गोष्टी असाव्यात पण त्यांचा अतिरेक टाळायला पाहिजे, विशेष करून दृकश्राव्य खेळांचा.

मला असे वाटते कि दृक श्राव्य खेळ हे हिंसक असू नयेत. लहान मुले त्या दृक श्राव्य पडद्यावर बंदुकीतून गोळ्या मारतात आणि मग खऱ्या जगात पण ते बंदुका हातात घेऊन तेच करतात , त्यांना वास्तविक जग आणि काल्पनिक जग यातला फरक कळत नाही. हा एक प्रश्नच आहे. म्हणून मुले हिंसक दृक श्राव्य खेळ खेळू नयेत असे मला प्राध्यान्यपणे वाटते.

प्रश्न: सर्व नाती हि पूर्व कर्मांवर आधारित असतात काय?

श्री श्री : होय.

तुम्हाला माहित आहे काय कि जेंव्हा एखादा आत्मा या जगात येऊ इच्छितो, तेंव्हा तो एक स्त्री आणि एक पुरुष निवडून त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण करतो. मग ते दोघे एकमेकांजवळ येतात आणि प्रथम अपत्य जन्माला येताच अचानक त्यांचे एकमेकांवरील प्रेम आटून जाते.

तुमच्यातील किती लोकांनी अशी गोष्ट घडताना बघितली आहे?

जन्माला आल्यावर त्या आत्म्याचे काम झाले मग त्या पालकांची चिंता तो का करेल. म्हणून मग अचानक पणे त्या मुलाच्या जन्मानंतर त्या जोडप्यातील आकर्षण कमी होते.

असे नेहमी घडते असा विचार करू नका. काही बाबतीत असे होते. काही वेळा तर ते तिसऱ्या किंवा पाचव्या अपत्याच्या जन्मानंतर होते. अचानक पणे ते एकमेकांबरोबर राहू शकत नाहीसे होतात कारण त्यांची व्यक्तिमत्वे हि कृत्रिमपणे त्या आत्म्याने या जगात प्रवेश मिळविण्यासाठी जवळ आणलेली असतात.

म्हणून असे घडते, नेहमीच नव्हे तर साधारण पणे ३०% जोडप्यांमध्ये त्यांचे एकमेकांबरोबर न जमल्यामुळे त्यांचा शेवट मग घटस्फोटात होतो. त्यांच्या कोणत्याच गोष्टी एकमेकांना पूरक नसतात.

अचानक त्यांना साक्षात्कार होतो कि “ अरे, आम्हाला तर वाटले होते कि आम्ही जन्म-जन्मांतरीचे जोडीदार आहोत आणि अचानक हे काय झाले? मी तर पूर्ण पणे वेगळा आहे आणि आमचे कधीच एकमेकांशी पटणार नाही.”

मग अशा गोष्टी घडतात.

आयुष्यात नेहमी असेच घडत असते, मित्रांचे शत्रू होतात अन् शत्रूचे मित्र होतात.

तुम्ही ज्यांच्यासाठी काहीही चांगले केलेले नाही असे लोक तुमच्या भल्यासाठी काम करू लागतात. म्हणून मित्र किंवा शत्रू यांनी काहीही फरक पडत नाही. तुमचे आयुष्य कर्माच्या वेगळ्याच नियमांप्रमाणे घडत असते. म्हणून तुमचे मित्र आणि शत्रू हे एकाच तराजूत तोलत रहा, कारण दहा वर्षांची मैत्री पण शत्रुत्वात बदलू शकते आणि एखादा शत्रू पण तुमचा चांगला मित्र बनू शकतो. ते सर्व तुम्ही आणि तुमचे कर्म यावर अवलंबून असते.

प्रश्न: प्रियजनांच्या मृत्यूचा आघात कसा सहन करण्याचा चांगले मार्ग कोणता?

श्री श्री : काळ हा आपल्या मार्गाने जात असतो. त्याचा स्वीकार करायचा किंवा इतर काही करायचा प्रयत्न करू नका. त्याची जर टोचणी लागून राहिली तर राहुदेत, काही दिवसांनी ती कमी होईल.

काळ हे मोठे रामबाण औषध आहे. जसा जसा काळ पुढे जाईल तसे तो तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. त्यासाठी काही वेगळे करायची गरज नाहीये, काळाबरोबर या जखमा भरून येतील.

किंवा असे पहा कि प्रत्येकजण हा केंव्हा ना केंव्हा तरी जाणारच आहे. ते जरा लवकर गेले तुम्ही थोडे उशिरा जाणार आहात. हे एवढेच आहे.

जे लोक पुढे गेलेत त्यांना सांगा कि “ काही वर्षांनी मी तुम्हाला तेथे भेटेन”.

सध्यापुरता त्यांचा निरोप घ्या. तुम्ही त्यांना पुढे दुसऱ्या ठिकाणी भेटणार आहात.

प्रश्न: मला कुटुंब नाहीये,अशावेळी कमी एकटे वाटण्यासाठी मी काय करावे?

श्री श्री : अरे, मी तुम्हाला एवढे मोठे कुटुंब दिले आहे, खरे कुटुंब जे तुमची खरोखरच काळजी घेत आहे.

तुम्हाला कुटुंब नाहीये असा विचार कधी करू नका, मी तुमचे कुटुंब आहे. म्हणून तर प्रत्येक वर्षी ख्रिस्तमस आणि नवीन वर्षं सुरु झाल्यावर मी येथे येतो. नाहीतर मी येथे कशाला येऊ?!

प्रश्न: तुम्हाला आनंदी करायचा सर्वात चांगला मार्ग कोणता?

श्री श्री : स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी बनविणे हाच!

तुम्ही मला आनंदी बनविण्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज नाही कारण मी तसाच आनंदी आहे. पण जर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी व्हायला मदत केलीत तर मला अधिक आनंद होईल. त्यांना फक्त काही भेटवस्तू किंवा त्यांच्यासाठी जंगी जेवण देऊन नव्हे तर त्यांचे ज्ञान वाढून त्यांना परिपूर्ण बनवून होय.

तुम्ही जर हे ज्ञान लोकांच्या निदर्शनास आणून दिले तर ती सर्वात चांगली गोष्ट असेल.

लोक असे म्हणतात कि अष्टावक्र गीता ऐकल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. तुमच्यापैकी किती लोकांना हा अनुभव आहे? ( अनेक हात वरती करतात)

जेंव्हा तुम्ही अष्टावक्र गीता ऐकता तेंव्हा तुमचा आयुष्याबद्धलचा दृष्टीकोन बदलून जातो.

पाषाणाला पण पाझर फुटतो

02
2013
Jan
बर्लिन, जर्मनी


प्रश्न: बऱ्याच गोष्टी वाचल्या नंतर मला कळले आहे कि तुम्ही सर्वव्यापी आहात आणि तुम्हाला सर्व काही माहित असते. ह्या गोष्टी मुळे मी काहीवेळा भयभीत होतो, कारण मी केलेल्या चुका तुम्हाला माहीत असतात. चुकाबद्द्ल तुमचे काय मत आहे? मी वारंवार चुका करतो हे पाहून तुम्हाला राग येतो का?

श्री श्री: बिलकुल नाही.

तुम्हाला माहीत असेल भक्त हा गुरु पेक्षा सामर्थ्यवान असतो? हे तुम्हाला माहीत आहे का? पण हे असचं आहे. तुम्ही आतापर्यंत गुरूच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण माझ्याकडे भक्तांच्या खूप गोष्टी आहेत. त्यातील मी तुम्हाला एक सांगतो.

नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात मी महाराष्ट्राच्या काही दुर्गम खेड्यात गेलो होतो. दुर्गम खेडे आणि जिल्हे जिथे मी आतापर्यंत कधीच गेलो नव्हतो. तिथे बरेच भक्त मला भेटायला आले होते.

एका खेडे गावात जाताना मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले, “तीन भक्तांचे मोबाईल हरविले आहेत आणि ते फार गरीब आहेत तर माझ्या बैग मध्ये तीन नवीन मोबाईल ठेवा”.

मला वाटले कि तीन भक्तांचे मोबाईल हरविले आहेत म्हणून मी माझ्या बरोबर तीनच मोबाईल घेतले.

मग मी स्वयंसेवक मेळाव्यात पोहचलो आणि कार्यक्रमानतंर म्हणालो, “तुमच्या पैकी काही जणांचे मोबाईल हरविले आहेत. मला माहीत आहे. ज्यांचे मोबाईल हरविले आहेत त्यांनी कृपया उभे रहावे’. आणि फक्त तीनच भक्त उभे राहिले.

त्या पैकी एक स्त्री होती. मी तिला म्हणालो, “ गेल्या गुरुवारी तू माझ्या प्रतिमे समोर रडत होतीस. काय करावे तुला कळत नव्हते, कारण तुझा महागडा मोबाईल हरविला होता, घरचे काय म्हणतील या कारणाने तू घाबरली होतीस, कारण त्या मोबाईलची किंमत दोन तीन महिन्याची कमाई इतकी होती. हा घे तुझ्या साठी नवीन मोबाईल.

मी हे करत असताना त्या घोळक्यातून एक तरुण माझ्यापशी आला आणि त्याने त्याचा अनुभव सांगितला. तो अडव्हान्स कोर्स करीत होता आणि त्याची बायको घरी होती, त्याला तिच्याशी काही बोलायचे होते. पण त्याचा मोबाईल चार्ज नव्हता आणि तो चार्जर घरी विसरून आला होता. म्हणून त्याने मोबाईल माझ्या फोटो समोर ठेवला आणि म्हणाला. “ गुरुदेव माझा फोन चार्ज करून द्या.”

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला आणि पाहिले तर त्याचा मोबाईल फुल चार्ज झाला होता.

त्याने त्याचा फोन मला दाखविला आणि म्हणाला, ” गेल्या दीड वर्षापासून मी चार्जर फेकून दिला आहे आणि आता मी हा मोबाईल तुमच्या प्रतिमे समोर ठेवतो आणि तो चार्ज होतो.”

त्याने मोबाईलचा चार्जर चक्क फेकून दिला!

मी म्हणालो, “ हे खुपच आश्चर्यजनक आहे. मला देखील माझा फोने चार्ज करण्यासाठी चार्जर लागतो पण माझे भक्त माझ्या प्रतिमे समोर मोबाईल ठेवून तो चार्ज करतात.”

पहा किती सामर्थ्यवान भक्त असू शकतात.

मी हे का म्हणत आहे कारण, आपल्या भावना, श्रद्धा, आणि प्रेम या मुळेच या गोष्टी घडून येतात.

मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. हि १० वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेस दक्षिण आफ्रिका मध्ये एका कडे पाहुणा म्हणून रहात होतो. जोहान्सबर्ग ला जाण्यापूर्वी आम्ही आमच्या सामानाची बांधाबांध करत होतो, आणि अचानक मी एक दुसऱ्या खोलीत गेलो जिथे काही भक्त रहात होते आणि त्या खोलीत गेल्यानंतर मी इकडे तिकडे पाहू लागलो. सहसा मी कुणाच्या खोलीत जात नाही. सर्वाना आश्चर्य वाटले आणि गोंधळून गेले आणि विचार करत होते कि गुरुदेव आपल्या खोलीत का आले? कल्पना करा, मी अचानक तुमच्या खोलीत आलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सर्व जण विचार करू लागले कि, “गुरुदेव इकडे का आले आणि ते इतके अस्वस्थ का आहेत. ते काय शोधत आहेत?”

आणि मला एक चहाचे पाकीट दिसले आणि मी त्यांना विचारले कि, “हे कुणाचे आहे?”

ते म्हणाले, “आम्हाला माहीत नाही ते कुणाचे आहे.”

मी कधीच चहा घेत नाही, पण मी ते पाकीट घेतले आणि माझ्या सुटकेस मध्ये ठेवून टाकले. आणि मी निश्वास सोडला.

ते चहाचे पाकीट मिळे पर्यंत मी खूप अस्वस्थ होतो. सर्वाना ते विचित्र वाटले, गुरुदेव चहाचे पाकीट कसे काय चोरतील, आणि ते सुद्धा आपले नाही हे माहीत असताना.

जेव्हा आम्ही जोहान्सबर्ग हून डर्बनला उतरलो, एक वयस्कर गृहस्थ मला विमान तळावर भेटले आणि म्हणाले, “ गुरुदेव, मी तुम्हाला पाठविलेले चहाचे पाकीट मिळाले का? तो एक विशेष चहा आहे. मी स्वत: जाऊन तुमच्या साठी घेतला आणि मला तो तुम्हाला द्यायचा होता पण काही कारणास्तव मी येवू शकलो नाही म्हणून दुसऱ्याबरोबर पाठविला होता.

ते चहाचे पाकीट कुणीतरी दिले होते म्हणून त्यांनी दुसऱ्या खोलीत ठेवले कारण त्यांना माहीत होते कि मी चहा घेत नाही, आणि त्यांनी मला सांगितले देखील नाही. हि अशी घटना होती.

मग मी त्या गृहस्थाला म्हणालो, “हो, मला पाकीट मिळाले.”

याचा अर्थ म्हणजे ज्यावेळेस तुमच्या भावना तीव्र होतात त्यावेळेस मग मी फक्त बाहुला होवून जातो. म्हणून मला ते चहाचे पाकीट शोधावे लागले.

मला चहाचे पाकीट कसे चोरावे लागले याची हि गोष्ट, तसे पाहता ती चोरी नव्हती. ते पाकीट माझेच होते पण त्या क्षणी असे वाटत होते कि मी एखादी गोष्ट चोरली जी माझ्यासाठी नव्हती.

अशा प्रकारच्या खूप घटना आहेत.

एकदा मी दिल्ली मध्ये एका मोठ्या हॉल मध्ये होतो. त्या हॉल मध्ये खुपच गर्दी होती. कार्यक्रमा नंतर सर्वानी माझ्या दर्शना साठी रांग लावली होती.

जे लोक माझे संरक्षण करत होते ते म्हणाले, “ अरे! इथे फार गर्दी आहे त्यामुळे गुरुदेव ना वेळ लागेल आणि गुरुदेवना विमान तळावर पोचावयास उशीर होईल.”

त्यांनी सर्वाना फसवून मला तळ मजल्या तून थेट गाडी पशी नेले आणि आम्ही तिथून निघून गेलो. तुम्हाला माहीत आहे, तिथे हजारो लोक होती, आणि मी तिथे नाही हे पाहून ते सगळे निराश झाले आणि मी अस्वस्थ झालो.

त्या सर्व लोकांना राग आला होता आणि सर्व निराश झाले होते. त्या दिवशी दिवसभर माझे डोके दुखत होते आणि मी अस्वस्थ होतो. ज्या लोकांनी मला गाडीत बसवून थेट विमानतळावर आणले, मी त्यांना विचारले, “तुम्ही हे असे का केले? मला कुणालाही निराश करावयाचे नाही. मी आज पर्यंत कुणालाही निराश केले नाही.”

मी हे का म्हणत आहे कारण ज्यावेळेस तुमच्या भावना तीव्र असतात, प्रेम तीव्र असते अशा वेळेस दगडाला सुध्दा पाझर फुटतो. कळले का?

तुम्ही जर रोज ध्यान करत असाल तर तुम्हाला खूप सावधानता बाळगावी लागेल. तुम्ही कुणालाही कधीही शाप देवू नका. अपशब्द बोलू नका. तुमच्या तोंडून कधीही वाईट येवू देवू नका.

तुम्हाला माहीत आहे, मी गेल्या ५६ वर्षात कधीही वाईट चिंतले नाही. मी एकही वाईट अपशब्द बोललो नाही. आणि मला त्याचा गर्व आहे; तो असाच येत नाही.

मी सर्वात वाईट काय बोललो असेल तर, “तुम्ही मुर्ख आहात.”

तुम्ही आता पर्यंत मला शपथ घेताना, कुणाबद्दल, कुठेही वाईट अपशब्द बोलताना ऐकले नसेल, माझ्याविषयी सुद्धा.

तुम्ही जर रोज ध्यान करत असाल तर तुम्ही तुमची वाणी अपशब्दापासून दूर ठेवली पाहिजे. कारण तुमच्या शब्दामध्ये उर्जा आहे. तुम्ही रोज ध्यान केल्याने तुमच्या मध्ये आशिर्वाद किंवा शाप देण्याची क्षमता येते.

सुरुवातीला शाप देण्याची क्षमता येते आणि नंतर आशिर्वाद देण्याची. त्यासाठी सांगतो, ध्यान करणारांनी कुणाबद्दल हि वाईट चिंतू नये आणि तुमच्याकडून कुणालाही अपशब्द बोलू नये, सकारात्मक रहा.

मी असे म्हणत नाही कि तुम्हाला कधीही राग येणार नाही. राग, क्रोध हे जीवनाचा एक भाग आहे. तरी पण ज्यावेळेस तुम्हाला राग येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आयुष्यात क्रोध हा कधी कधी आला पाहिजे, तो आवश्यक आहे, पण त्या क्षणी तुमच्या तोंडून वाईट अश्लील शब्द येवू देवू नका.

का?

कारण तुम्ही तुमची खूप सारी सकारात्मक उर्जा वाईट अपशब्द बोलून वाया घालविता.

कल्पना करा, तुम्ही एक महिन्याची ध्यान केल्याची मेहनत काही अपशब्द बोलून वाया घालविता. आर्थिक दृष्ट्या बरोबर आहे का? हे असे म्हणजे १० रु. च्या पेया साठी हजारो रुपये घालविण्या सारखे आहे.

तुम्ही तुमच्या मध्ये असलेल्या शक्ती, उर्जा आणि निश्चय यांना कमी लेखू नका.

तुम्ही ध्यान केल्याने तुमच्या मध्ये खूप सामर्थ्य येते. याच कारणासाठी प्राचीन काळी सर्व ऋषी आपल्या शिष्यांना हे शिकवत नसत, कारण त्यांना माहीत होते हे जर त्यांना शिकविले तर ते खूप सामर्थ्यवान होतील आणि ते काही नियम पाळणार नाहीत, आणि मोठी समस्या निर्माण होईल. म्हणून ते हे सर्वाना शिकवीत नसत. प्रथम ते त्यांची परीक्षा घेत आणि ते जर त्यामध्ये उत्तीर्ण झाले तरच त्यांना ध्यान शिकवीत.

पण मी विचार केला कि हे ज्ञान आपण सर्वाना देवू. ते जरुरी आहे.

तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाल ज्ञान मिळेल. पण तुम्हाल जर ज्ञान मिळत नसेल तर तुम्हाला चांगले होता येणार नाही.

म्हणून मी दुसरा मार्ग निवडला.

ध्यानाच्या पाच पायऱ्या

01
2013
Jan
बर्लिन, जर्मनी


 
तुम्हा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नववर्षाचे स्वागत ध्यान करीत करणे हे फारच छान आहे.

ध्यान म्हणजे काय? ध्यान अशी अवस्था आहे ज्याच्यामधून सर्व निर्माण झाले आहे, आणि ज्याच्यामध्ये सगळे लय पावते. ही ती आंतरिक शांतता आहे जिथे तुम्हाला आनंद, हर्ष,उल्हास, स्थिरचित्तता इ. ची अनुभूती होते.

ज्ञानाचे तीन प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का.

एक ज्ञान आहे ज्ञानेंद्रियद्वारा मिळणारे . आपली पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला ज्ञान देतात. डोळ्यांने पहिल्याने आपल्याला ज्ञान मिळते, श्रवण केल्याने ज्ञान प्राप्त होते, स्पर्श केल्याने, वास घेतल्याने आणि चव घेतल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होते.

तर अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांच्या संवेदनेमुळे आपल्याला ज्ञान मिळते. ज्ञानाची ही एक पातळी आहे.

ज्ञानाची दुसरी पातळी म्हणजे बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान होय.

बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान हे ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मोठे आहे. आपल्याला सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो परंतु बुद्धीमुळे आपल्याला हे कळते की सूर्य ना उगवतो ना मावळतो.

पाण्यामध्ये तुम्ही तुमचे पेन धरा, तुम्हाला ते वाकलेले दिसेल. परंतु बुद्धीमुळे आपल्याला हे माहिती आहे की ते पेन वाकलेले नसून तो केवळ एक दृष्टीभ्रम आहे.

म्हणून बुद्धीचे ज्ञान हे उच्च आहे.

नंतर आहे तिसऱ्या पातळीवरचे ज्ञान, अन्तःप्रेरणेचे ज्ञान, जे अजून श्रेष्ठ आहे. तुम्हाला अगदी आतून काहीतरी जाणवते.

गहन मौनातून काहीतरी येते, सृजनता निर्माण होते अगर काही शोध लागतात. हे सर्व चेतनेच्या त्या पातळीतून येते जे आहे तिसऱ्या पातळीवरील ज्ञान.

ध्यानामुळे तिसऱ्या पातळीवरील ज्ञानाकरिता दार उघडले जाते. आणि तिसऱ्या पातळीवरील आनंदाकरिता दार उघडणे हे ध्यानामुळेच शक्य होते.

आनंदाच्या तीन पातळ्या आहेत.

जेव्हा आपली ज्ञानेंद्रिये इंद्रिय अनुभवात गुंतुतात, म्हणजे डोळे दृश्य बघण्यात गर्क होतात, कान श्रवण करण्यात गुंगून जातात, आपल्याला बघण्यात, ऐकण्यात, चव चाखण्यात किंवा स्पर्श यातून सुख मिळते. या इंद्रियांद्वारे आपल्याला आनंदाची अनुभूती होते, परंतु या इंद्रीयांपासून सुख मिळण्याची क्षमता फारच थोडी आहे.

असे बघा, तुम्ही पहिली पुरणपोळी खाल्ली तर ती अतिशय चविष्ट लागते. दुसरी ठीक लागते. तिसरी पुरणपोळी खाताना तर ती जास्त झाली असे वाटू लागते आणि चौथी पुरणपोळी तर फारच यातनामय वाटते.

हे असे का? त्या सगळ्या पुरणपोळ्या एकाच व्यक्तीने बनवलेल्या असल्या तरीसुद्धा त्या आवडण्याची क्षमता कमी कमी होत जाते.

ज्ञानेन्द्रीयांबाबतसुद्धा हेच घडते. दृष्टी, स्पर्श, वास, चव, श्रवण; या सर्वांमधून प्राप्त होणारे सुख हे अल्पायुषी असते. असे आहे की नाही?

यानंतर आनंदाची दुसरी पातळी आहे जेव्हा तुम्ही सृजनात्मक काही करता; जेव्हा तुम्हाला काहीतरी छान शोध लागतो, किंवा जेव्हा तुम्ही कविता लिहिता, किंवा जेव्हा तुम्ही काही नवीन पाककृती बनवता.

सृजनशीलतेमधून एक प्रकारचा आनंद निर्माण होतो.

जेव्हा तुम्हाला मुल होते, मग ते तुमचे पहिले मुल असो वा तिसरे, त्या बाळाच्या येण्याने एक प्रकारचा हर्ष होतो; एक आनंद मिळतो.

आता वळू या तिसऱ्या आनंदाकडे. कधीही कमी न होणारा आनंद, आणि जो इंद्रीयांपासून उत्पन्न होत नाही, सृजनशीलतेपासून निर्माण होत नाही, तर तो निर्माण होतो काहीतरी गहन आणि गुढतेपासून. त्याचप्रमाणे,शांतता, ज्ञान आणि आनंद, या गोष्टीसुद्धा एका निराळ्या पातळीवरून येतात. आणि त्या जिथून येतात त्याचे स्रोत्र आहे ध्यान होय.

ध्यानाकरिता तीन महत्वाचे नियम लक्षात ठेवा.

ते तीन नियम असे, पुढचे दहा मिनिटे जेव्हा ध्यानाकरिता बसणार आहे तेव्हा मला काहीही नको,  मला काहीही करायचे नाही आणि मी काही नाही आहे.

जर आपण हे तीन नियम पाळण्यात यशस्वी झालो तर आपले ध्यान खोल होईल.

सुरवातीला ध्यान म्हणजे केवळ विश्राम करणे असते.

ध्यानाची दुसरी पायरी म्हणजे ध्यानामुळे तुम्हाला उर्जा प्राप्त होते; तुम्हाला अधिक उत्साही वाटते.

तिसऱ्या पायरीवर ध्यान तुमच्यातील सृजनशीलतेला अभिव्यक्ती प्राप्त करून देते.

चौथ्या पायरीवर ध्यानामुळे उत्साह,उमेद आणि आनंद वृद्धिगत होतो.

ध्यानाची पाचवी पायरी अवर्णनीय आहे, तुम्ही त्याचे वर्णन करूच शकत नाही. ही ती एकात्मता असते, तुमची संपूर्ण विश्वाबरोबर. ही आहे ध्यानाची पाचवी पायरी, आणि तिथे पोचेपर्यंत अजिबात थांबू नका.

मी नेहमी याची तुलना स्पेन किंवा इटली येथील समुद्र किनारी जाणाऱ्या लोकांबरोबर करतो. काही लोक केवळ फेरफटका मारायला जातात आणि ते तेवढ्याने खुश असतात. बाकीचे काही लोक जातात आणि मस्तपैकी पोहून येतात आणि ताजेतवाने होतात, आणि ते त्यात आनंदी असतात. काही लोक असे असतात की जे मासेमारीकरिता जातात, आणि काहीजण प्राणवायूचे नळकांडे लावून खोल सूर मारतात आणि समुद्रातील सुंदर प्राणी बघतात, आणि ते त्यात आनंदी असतात. आणि असेसुद्धा काही लोक आहेत जे जातात आणि समुद्रातील खजिना काढतात; ते खोलवर जातात.

तर ज्ञान तुमच्यासमोर हे सर्व पर्याय ठेवते.

केवळ काहीश्या विश्रामात,थोड्याश्या आनंदात,थोड्याफार उत्साहात किंवा काही इच्छांच्या पूर्ती होण्याने थांबू नका.

तुम्हाला माहिती आहे की ध्यान केल्यामुळे मौज करण्याची तुमची क्षमता वाढते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची क्षमतासुद्धा ध्यानामुळे वाढते. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःकरिता काहीही नको असते तेव्हा तुम्ही इतरांच्यासुद्धा इच्छा पूर्ण करू शकता.

हे खरोखरच फार छान आहे. म्हणून असे होईपर्यंत थांबू नका, ध्यान करीत राहा.

दैवी नृत्य

28
2012
Dec
 
प्रश्न: प्रिय गुरुदेव, कृपा करून तुम्ही आम्हाला गुरूंच्या वंशपरंपरेविषयी आणखी माहिती देऊ शकाल काय?

श्री श्री: खरे पाहता आपल्याला त्याची नक्की तारीख माहिती नाही कारण गुरु परंपरेचा उदय कैक हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे.

योगाचे ज्ञान, ध्यान, आणि सकल विश्व हे एकाच ऊर्जेपासून निर्मित झाले आहे हे ज्ञान हे गुरुपरंपरेद्वाराच प्राप्त झालेले आहे.

नेहमी पाहता असे दिसते की जेव्हा तुम्ही कशाची निर्मिती करता तेव्हा निर्माता हा निर्मित वस्तूपासून वेगळा असतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर मेणबत्ती बनवली तर तुम्ही विचार कराल- ही मेणबत्ती माझ्यापासून वेगळी आहे, आणि ती तुम्ही तुमच्यापासून विभक्त आणि लांब ठेवालं. तुमचा हाच विचार असेल, ' ती माझी निर्मिती आहे परंतु ती म्हणजे मी नव्हे.'

आणि असाच विचार नेहमी लोक करतात, सृष्टीकर्ता आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही जर असे म्हणत असाल की परमेश्वर सर्वव्यापी आहे, म्हणजेच तो सगळीकडे आहे, तर याचा अर्थ असा झाला की तो या समस्त सृष्टीमध्येसुद्धा व्यापलेला आहे.

जर एखादी गोष्ट सर्वव्यापी आहे तर मग ती गोष्ट नसलेली अशी कोणतीही जागा असणे शक्य आहे का? हो की नाही?!

जर मी सर्वशक्तिमान आहे तर मग माझ्यापेक्षा जास्त ताकदवान असे काही असू शकते का? असणे शक्यच नाही.

म्हणून सृष्टीकर्ता आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. तो केवळ एकच आहे.

आता सृष्टीकर्ता आणि सृष्टी हे एकच आहेत हे आपल्याला कसे काय समजणार?

नृत्य आणि नृत्यकर्ता या उदाहरणावरून. तुम्ही नृत्याला नृत्यकर्त्यापासून वेगळे करू शकता का? नाही! हे तर अशक्य आहे.

जर आपल्याला नृत्य पाहायचे असे तर आपण नृत्यकर्त्यामार्फतच पाहू शकतो.

एक चित्रकार आणि त्याचे चित्र हे दोन्ही भिन्न आहेत. एक चित्रकार चित्र रंगवतो आणि त्यापासून तो दूर होतो आणि तरीसुद्धा ते चित्र तिथेच असते. परंतु एक नृत्यकर्ता त्याच्या नृत्यापासून दूर होऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे सृष्टीकर्ता आणि सृष्टी हे नृत्य आणि नृत्यकर्ता यांच्यासारखे आहेत.

ती उर्जा जिला आपण देव, किंवा प्रेम, किंवा प्रकाश म्हणतो ती या समस्त सृष्टीमध्ये व्यापलेली आहे आणि या विश्वाच्या प्रत्येक अणु रेणूमध्ये ती आहे.

प्राचीन ज्ञानाचे हे सार आहे, आणि आधुनिक विज्ञान आणि स्थितीगतिशास्त्रसुद्धा याचाच खुलासा करत आहे.

संपूर्ण जग हे एक क्षेत्र; एक उर्जा यापासून बनलेले आहे.

यामुळे ईश्वरशास्त्रवेत्त्यांच्या अनेक कोड्यांचा उलगडा झाला आहे.

प्रश्न : कमतरतेच्या विचारांना आम्ही मुबलकतेच्या विचारात कसे काय परिवर्तीत करू शकतो?

श्री श्री : असा बदल करण्याचा तुमचा मनोदय आहे याचाच अर्थ असा की तुम्ही त्या दिशेने पुढे वाटचाल करू लागला आहात.

तुम्हाला कशा कशाची आवश्यकता आहे ते पहा आणि तुम्ही बघाल की ती प्रत्येक गरज पुरवल्या जाते आहे. तुम्हाला ज्याची कशाची गरज आहे ते तुम्हाला नेहमीच मिळेल. पण हे दुसऱ्या टोकाला नेऊ नका आणि असे म्हणू नका,'मला आता काहीही करण्याची जरुरत नाही आणि प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत येणारच' ,हे बरोबर नाही.

तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तुम्हाला धीर धरावा लागेल. या दोन गुणांमुळे तुमच्याकडे संपत्ती येते.

'उद्योगीनां पुरुषसिंहं उपायति लक्ष्मी' अशी संस्कृतमध्ये एक म्हण आहे.

याचा अर्थ आहे की ज्याच्याकडे सिंहासारखी हिम्मत आहे आणि जो आपल्या संपूर्ण ताकदीनिशी मेहनत करतो त्याच्याकडे अमाप संपत्ती येते. म्हणून आपल्या संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करा आणि सिंहासारखे असा.तुम्हाला माहिती आहे का की सिंह सर्वात आळशी प्राणी आहे. सावजाची शिकार करून ती सिंहासमोर हजर करणे हे सिंहिणीचे काम असते. सिंह केवळ जातो आणि सावज खातो. सिंहीण सगळे काम करते.

सिंह तर सावजाची शिकार करण्याचे कामसुद्धा करीत नाही. तो आळशी आहे आणि तरीसुद्धा तो जंगलाचा राजा आहे आणि त्याच्याकडे आत्मविश्वास आहे.

तर तुमच्याकडे हे असले पाहिजे - आत्मविश्वास आणि सिंहाचा शाहीपणा.

आणि मग तुम्ही १००% प्रयत्नावर मेहनत घ्या, आणि तेव्हाच तुमच्याकडे संपत्ती चालून येते.

बसून आणि दिवास्वप्ने पहिल्याने, किंवा त्याबद्दल अस्वस्थ राहिल्याने तुमचे काम बनणार नाही.अजिबात अस्वस्थ होऊ नका, एखादे काम हाती घ्या आणि ते पूर्णपणे करा.

नंतर नंतर तुमच्या लक्षात येईल की काम करता करता तुम्हाला संपत्तीसुद्धा मिळते आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, तुम्ही म्हणालात की प्राणाचे निरनिराळे प्रकार आहेत.कृपा करून याबाबत अधिक माहिती सांगू शकाल काय?

श्री श्री : प्राणा ( तरल उर्जा शक्ती )चे दहा प्रकार आहेत. यामध्ये प्राणाचे पाच मुख्य आणि पाच उपमुख्य प्रकार आहेत.आज मी पाच मुख्य प्रकारच्या प्राणाविषयी तुम्हाला सांगणार आहे.

प्रथम मुख्य प्राणाचा प्रकार आहे जो तुमच्या नाभीमध्ये उगम पावून तुमच्या मस्तकापर्यंत वर उठतो आणि त्याला प्राण असे म्हणतात.

नंतर आणि एक प्राण असा आहे जो तुमच्या नाभीमध्ये उगम पावून खालच्या दिशेने जातो आणि त्याला अपान असे म्हणतात.

जेव्हा प्राण उच्च पातळीवर असतो तेव्हा तुम्हाला झोप लागत नाही; तुम्हाला निद्रानाश होतो आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत राहते. तथापि अपान याची पातळी जर खूप वर असेल तर तुम्हाला इतके शक्तीहीन वाटते की तुम्हाला बिछान्यावरुन उठायची हिम्मत होत नाही.

तुम्हाला असा अनुभव आला आहे का? कधी कधी तुम्हाला एकदम जड, स्थूल आणि कंटाळवाणे वाटते. हे सगळे अपान च्या असंतुलनामुळे घडते.

प्राणाचा तिसरा प्रकार आहे समान जो पाचनसंस्थेमध्ये म्हणजेच पोटामध्ये पचनाग्नी म्हणून उपस्थित असतो. हा तो अग्नी किंवा ती आगच असते जिच्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते.

समान हा पचनामध्ये मदत करतो, आणि इतर शारीरिक प्रणालीमध्येसुद्धा मदत करतो. त्याच्यामुळे प्रणालीचे संतुलन होते.

नंतर आहे उदान वायू किंवा उदान प्राण जो कुठेतरी हृदयाच्या आसपास असतो आणि भावनांकारिता जबाबदार असतो.

सुदर्शन क्रिया करताना, लोक हसतात किंवा रडतात, आणि तुम्हाला या भावना गहिवरून आल्यासारख्या वाटतात. याचे कारण आहे उदान वायू . अशा प्रकारे सगळ्या भावनांना हा उदान वायू जबाबदार आहे.

नंतर पाचव्या प्रकारचा प्राण आहे व्यान जो सर्व प्रकारच्या शारीरिक हालचालीकरिता जबाबदार असतो. तो संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे.

सुदर्शन क्रिया करताना तुम्हाला कुठे तरी झिणझिण्या आल्यासारखे वाटते, शरीरभर काही उर्जा पसरल्यासारखे वाटते. तुम्हा सर्वाना याचा अनुभव आला आहे?

सुदर्शन क्रिया करताना काय होते तर या पाच प्राणांचे संतुलन होते आणि म्हणूनच तुम्हाला रडायला येते, किंवा तुम्ही हसता, आणि संपूर्ण शरीरभर तुम्हाला झिणझिण्या आल्यासारखे वाटते. हीच तर सुदर्शन क्रियेची खासियत आहे.

क्रिया केल्यानंतर तुम्हाला सपाटून भूक लागते, हो कि नाही?

तर अशा प्रकारे हे पंचप्राण आपले जीवन चालवतात.

समान चे असंतुलन असेल तर तुम्हाला पचनाच त्रास होतो, आणि तुम्ही अन्नाचे व्यवस्थित पचन करू शकत नाही, किंवा मग तुम्हाला मळमळ होत असल्याचा अनुभव येतो. हे सगळे होते कारण समान प्राणाचे असंतुलन असल्यामुळे.

उदान प्राण जेव्हा अडकून बसतो तेव्हा तुम्हाला एक भावनिक अडथला जाणवतो ज्याच्यामुळे तुमचे विचार आणि तुमचे मन यावर परिणाम होतो.

जेव्हा संपूर्ण शरीरभर पसरलेला व्यान असंतुलित होतो तेव्हा तुम्हाला सांधेदुखी, किंवा हालचाल करण्यात त्रास होऊ लागतो, आणि एकतर तुम्ही अस्वस्थ आणि अशांत होता, किंवा तुम्हाला काहीसुद्धा करू नये असे वाटू लागते.

अशा अवस्थेत हिंडा फिरायला त्रास होऊ लागतो आणि त्यामुळे शरीराची तगमग होऊ लागते. हे सगळे व्यान च्या असंतुलनामुळे होते.

सुदर्शन क्रिया केल्यानंतर, तुमच्या लक्षात आले असेल की ही सर्व असंतुलने निघून जातात. असे तुमच्याबरोबर झाले आहे की नाही?

शारीरिक हालचालीमधील आधीची सर्व अस्वस्थता, किंवा त्याचे अभिसरण, किंवा व्यान असंतुलनामुळे होणारे दुखणे, हे सगळेच्या सगळे,सुदर्शन क्रिया केल्यानंतर, नाहीसे होते.

तर प्राणाचे पाच प्रकार आहेत.

प्राणाचे उपमुख्य प्रकारसुद्धा आहेत, परंतु आपण आता त्यावर नंतर कधी चर्चा करू या.

प्रश्न : प्रेम आणि उदासीनता हे जीवन साथीदारामध्ये असणे कितपत अनुरूप आहे?

श्री श्री : भावनावेग आणि उदासीनता या दोहोंची गरज अहि.

नेहमी आपण असा विचार करतो ,'माझ्यामध्ये इतका भावनावेग आहे मग माझ्यात उदासीनता कशी काय असू शकते? आणि जर मी उदासीन आहे तर कोणत्याही गोष्टीकरिता माझ्यात भावुकता कशी काय असू शकेल?'

अशा कल्पना साधारणपणे लोकांच्या मनात असतात. मी तुम्हाला सांगतो हे असे नाहीये. हे म्हणजे असे झाले; श्वास आत घेणे म्हणजे भावावेग आणि श्वास बाहेर सोडणे म्हणजे उदासीनता आणि दोघांच्या मधे अनुकंपा. तुम्हाला या तिघांचीही गरज आहे.

तुम्हाला जीवनात कोणत्यातरी गोष्टीकरिता भावनावेग असणे जरुरी आहे, नाही तर मग तुम्ही निराशेच्या खाईत पडाल. ज्ञानाविषयी, सेवा करण्याविषयी, विचार करण्याविषयी किंवा आणखी कशाकरिता तुमच्या मनात तळमळ असली पाहिजे. जीवनात काही तीव्र इच्छा निश्चितपणे असली पाहिजे. ज्ञान मिळवण्याविषयी तुमच्यात तळमळ असू शकते. तर तळमळ किंवा भावावेग असणे महत्वाचे आहे!

उदासीनता देखील महत्वाची आहे. उदासीनतेच्याशिवाय मौज आनंद असू शकत नाही. तुमच्यात जर उदासीनता नसेल तर तुमची अवस्था अगदी दयनीय होऊन जाईल.

आणि अर्थात अनुकंपासुद्धा जीवनात आवश्यक आहे. तर हे तिन्ही जरुरी आहेत.

प्रश्न : या वेळेस जर आपण मोक्ष प्राप्तीपर्यंत पोचू शकलो नाही तर काय होईल? पुढच्या जन्मी आम्ही तुमच्याबरोबर असू काय?

श्री श्री : होय, नक्कीच. त्याची काळजी करू नका.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, इतक्या अनेक जोडप्यांना मुले का होत नाहीत याचे मला नवल वाटते. पाश्चिमात्य जगात हे काय होते आहे?

श्री श्री : खरे तर हा प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारायला पाहिजे. ते तुम्हाला योग्य ते निदान सांगतील.

आपण याचे साधारीकरण करू शकत नाही. अर्थात मदिरा आणि मादक द्रव्ये हे या कारणांपैकी एक आहे. ते चांगले नाही.

लोक शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून मदिरापान सुरु करतात. हे बरे नाही. हे जग एक अतिशय चांगली जागा होईल जर लोक नशिल्या पदार्थांपासून दूर राहिले तर.

चमत्कार घडायला एक संधी द्या

28
2012
Dec
बद अन्तोगस्त, जर्मनी
 तुम्ही अनेक गुरु कथा ऐकल्या आहेत, हो ना? म्हणून आता मी तुम्हाला एक शिष्य कथा सांगणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी महाराष्ट्राच्या दूरवरच्या प्रदेशाचा दौरा करीत होतो. असे गाव आणि जिल्हे जिथे मी कधीही गेलेलो नव्हतो. मला भेटायला बरीच मंडळी आली होती.

एका गावात मी माझ्या सहाय्यकाला सांगितले, ' तिघाजणांचा भ्रमणध्वनी फोन हरवलेले आहे आणि ते तिघे अतिशय गरीब आहेत. म्हणून माझ्या पिशवीत तीन नवीन फोन ठेवा.'

जेव्हा मी तिथे पोहोचलो तर तिथे २,००० ते २,५०० कार्यकर्ते आणि २००,००० लोकांची मोठी गर्दी उसळली होती.

कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीत मी म्हणालो,' तुमच्यापैकी तिघांचे भ्रमण ध्वनी फोन हरवले. मला ते माहिती आहे. तुमच्यापैकी ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी उभे राहा', आणि केवळ तीनच लोक उभे राहिले.

उभे राहिलेल्यांमध्ये एक महिला होती, आणि मी तिला सांगितले,'बघ, गेल्या गुरुवारी तू माझ्या फोटोसमोर रडत होतीस. तुला कळत नव्हते की काय करावे, परिवारासमोर कोणत्या तोंडाने जावे कारण ज्याची किंमत दोन तीन महिन्याच्या मिळकती इतकी होती असा एकदम महागडा भ्रमण ध्वनी फोन हरवला आहे. हा घे नवीन फोन.'

जेव्हा मी हे करीत होतो तेव्हा घोळक्यातील एक मुलगा पुढे माझ्याकडे आला आणि त्याने त्याची गोष्ट सांगितली. तो अँडव्हान्स शिबीर ( दि आर्ट ऑफ लिविंगचे शिबीर दुसरे ) करीत होता आणि त्याची पत्नी घरी होती, आणि त्याला तिच्याबरोबर बोलायचे होते. त्याच्या भ्रमण ध्वनी फोनची बँटरी विद्युत प्रभारित नव्हती आणि प्रभारित करण्याचे यंत्र तो घरी विसरून आलेला होता. तेव्हा त्याने त्याचा फोन माझ्या फोटोसमोर ठेवला आणि ,'गुरुदेव, माझा फोन प्रभारित होऊ दे', अशी विनंती केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या फोनची बँटरी पूर्णपणे प्रभारित झालेली होती.

त्या मुलाने मला त्याचा फोन दाखवला आणि म्हणाला, ' हे पहा, सुमारे दीड वर्षापूर्वी मी माझा फोन प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले आहे, आणि आता मी माझा फोन केवळ तुमच्या फोटोसमोर ठेवतो आणि तो प्रभारित होऊन जातो.'

त्याने फोन प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले!

मी म्हणालो, ' हे तर काहीतरी नवीनच आहे. मला स्वतःला माझा फोन प्रभारित करण्याकरिता यंत्र लागते, आणि माझा भक्त त्याचा फोन केवळ माझ्या फोटोसमोर ठेवून प्रभारित करतो.'

भक्त किती सामर्थ्यवान असू शकतात ते बघितलात.

मला वाटते की ही फारच रोमांचकारक गोष्ट आहे. तर मी बंगलोरला परतलो होतो आणि जवळजवळ १५० लोक रशिया, पोलंड आणि पूर्ण युरोपभरातूनआलेले होते, आणि त्यांना मी ही गोष्ट सांगितली, ' हे बघा, मी माझा फोन प्रभारित करण्याच्या यंत्राशिवाय प्रभारित करू शकत नाही आणि हा भक्त पहा त्याने त्याचे प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले आणि तो त्याचा फोन दररोज माझ्या फोटोसमोर ठेवून प्रभारित करतो.'

तर तिथे उपस्थित असलेले ते १५० लोकम्हणाले, 'होय, आमच्याबरोबरसुद्धा असे घडते.'

माझे असे सांगण्याने ते अजिबात आश्चर्यचकित झाले नाही.

एक रशियन म्हणाला, 'असे माझ्यासोबतसुद्धा घडले आहे. एके दिवशी, मीसुद्धा माझा फोन ठेवला आणि प्रार्थना केली की तो प्रभारित होऊ दे, आणि खरोखर तो प्रभारित झालेला होता!'

पोलंड आणि युरोपीय राष्ट्रांमधील इतर भक्तांनीसुद्धा असे अनुभव सांगितले.

आणखी एका व्यक्तीने त्यांचा अनुभव कथन केला आणि सांगितले, 'माझ्या गाडीतील पेट्रोल संपले होते आणि गाडीतील इंधन दर्शवणारी शून्यावर आलेली सुई मला सांगत होती की पेट्रोलची टाकी रिकामी आहे. परंतु मी गाडी चालवतच राहिलो, आणि रिकाम्या टाकीने मी गाडी ११७ किलोमीटर चालवली'.

हे कसे शक्य आहे? हे तर उघड उघड निसर्ग नियमांचे उल्लंघन आहे.

माझे तुम्हाला सांगणे आहे की,आपण जीवनात चमत्कार घडायला संधी दिली पाहिजे. कोणाचेही आयुष्य हे चमत्कार रहित नसते. आपण फक्त त्यावर विश्वास ठेवीत नाही.

या जगातील सर्व संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे चमत्कारांवर आधारित आहे. खरे तर चमत्कारांमुळेच त्यांची भरभराट झाली.

बायबलमधील सर्व चमत्कार काढून टाका आणि तुम्हाला वाटेल की बायबलला अस्तित्वातच नाही.

त्याचप्रमाणे जर तुम्ही जगातील कोणतेही धर्मग्रंथ घ्या, ते चमत्कारांनी ओतप्रोत असतील. परंतु आपल्याला वाटते की चमत्कार ही भूतकाळातील गोष्ट आहे आणि वर्तमान काळाची नाही. मी तुम्हाला सांगतो की वर्तमानात आजसुद्धा ते घडू शकतात.

मी एकदा बोस्टन विमानतळावर होतो आणि एका भक्ताने माझ्याकरिता आणि माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर चौघांकरीता अन्न आणले. तुम्हाला माहिती आहे तेव्हा माझ्यासोबत किती माणसे होती? जवळ जवळ ६० ते ७० लोकांचा मोठा घोळका होता आणि चौघांकरीता असलेले अन्न ६० लोकांनी वाटून खाल्ले. सर्वांनी अन्नाचे सेवन केले.

तुम्हाला नवल वाटत असेल- हे कसे काय शक्य आहे?!

याकरितासुद्धा शास्त्रीय स्पष्टीकरण आहे.

हे संपूर्ण जग दुसरे तिसरे काही नसून केवळ कंपन आहे; सगळे काही कंपने आहे. द्रव्य हे इतर काही नसून फक्त कंपने आहे. द्रव्य आणि उर्जा हे सारखेच आहे, ते दोन्ही केवळ कंपने आहे.

पहा, जेव्हा तुम्ही स्वयंचलित काचेच्या दाराजवळ येता तेव्हा ते दार त्वरित उघडते. ही घटना जर १०० ते २०० वर्षांपूर्वी घडली असती तर अशी कल्पना करून पहा. त्या काळच्या लोक चक्रावून गेले असते. त्यांना हे कसे काय घडत आहे याचे आश्चर्य वाटले असते. तुम्ही केवळ जाता आणि दार उघडते.

आज आपल्याला माहिती आहे की हे जैविक ऊर्जेमुळे होते. आपल्या शरीरातून उर्जा बाहेर पडत असते.

तुम्हाला माहिती आहे की अशी कुलुपे आहेत जी केवळ एकाच माणसाकडून उघडली जाऊ शकतात.

तुम्ही जैवसांखिक कुलपांबद्दल ऐकले असालच. जर का तुमची उर्जा त्या कुलुपामध्ये अन्तःस्थापित असेल तर इतर कुणीही ते उघडूच शकणार नाही. ते केवळ तुमच्याच स्पर्शाने उघडू शकते.

याचा अर्थ असा प्रत्येकजण उर्जा उत्सर्जित करीत आहे.

जेव्हा तुम्ही प्रेम आणि भक्तीच्या अवस्थेमध्ये असता तेव्हा तुमची उर्जा इतकी ताकदवान असते, इतकी मोठी असते की तेव्हा तुम्हाला तुमचा फोन प्रभारित करून पाहिजे असेल तर तो सहजपणे प्रभारित होतो.

ही जैवसांखिक कुलपांप्रमाणे तीव्र उर्जा असते. जेव्हा तुम्ही दाराजवळ पोहोचता तेव्हा दार उघडते कारण तुमची उर्जा ही दाराच्या वर असलेल्या छोट्या डब्यात पकडल्या जाते.

याचप्रकारे संपूर्ण विश्व हे केवळ उर्जेने बनलेले आहे. ही सगळी उर्जा आहे. म्हणून चमत्कार घडायला एक संधी द्या.

हे सगळे केव्हा शक्य आहे? हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही रिकामे आणि पोकळ व्हाल.

जेव्हा तुमचे हृद्य आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि शुद्ध असेल, तेव्हा तुमच्यात सकारात्मक उर्जेचा उदय होतो. परंतु तुमचे मन जर नकारात्मकतेने पुरेपूर युक्त असेल, आणि तुम्ही तणावग्रस्त असाल; किंवा जर तुम्ही अमक्या तमक्याबद्दल तक्रारीचा सूर लावीत असाल, आणि कटकट करीत असाल, तर मग चमत्कार घडणे शक्य नाही. जे नियमित काम व्हायचे तेसुद्धा होणार नाही. साध्यासाध्या गोष्टी होत नाहीत कारण उर्जा नकारात्मक आहे आणि खालच्या पातळीवर आहे.

जेव्हा उर्जेची पातळी उंचावते तेव्हा तुम्हाला अशक्य प्राय वाटणाऱ्या घटना घडू लागतात.

एका वैज्ञानिकाच्या दृष्टीकोनातूनसुद्धा, चमत्कार हे खरोखर शक्य आहेत.

काहीही अशक्य नाही. ते कसे काय होते याचे फक्त तंत्र आणि चेतनेच्या कोणत्या अवस्थेत हे सगळे घडते येवढे तुम्हाला माहिती असणे जरुरी आहे.

तुमच्यापैकी कितीजणांना अशा चमत्काराचा अनुभव आलेला आहे? ( अनेकजण त्यांचा हात वर करतात ). बघा! तुम्ही सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या चमत्काराचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून जेव्हा आपल्याला ते खोल नाते जाणवते, जेव्हा आपल्याला प्रेम आणि भक्ती अनुभव येतो तेव्हा हे सगळे विनासायास घडते.

आता जर तुम्ही मला विचारले , ' मी माझी भक्ती कशी काय वाढवू?'

माझे उत्तर असेल, ती वाढवायचा कोणताही मार्ग नाही. ते करण्याचा प्रयत्न करू नका, आराम करा.

खरे तर हीच एक समस्या होऊन बसते.

बरेच लोक मला विचारतात , ' मी शरण कसे जाऊ? मी माझी भक्ती कशी वाढवू? '

माझे उत्तर असेल, ती वाढवायचा कोणताही मार्ग नाही. परंतु तुम्ही जर मला विचारले , ' मी माझ्या नकारात्मकतेपासून सुटका कशी करून घेऊ? ' तर माझे उत्तर असेल , 'होय एक मार्ग आहे.' कसा? फक्त जागे व्हा आणि पहा! नकारात्मकतेला सोडून द्या. विचार करा, ' सोह् म आणि मग काय झाले!' या दोन गोष्टी आहेत.

जेव्हा कधी समस्या किंवा नकारात्मकता समोर उभी ठाकेल सर्वात प्रथम एवढाच विचार करा ,' मग काय झाले? जे आहे ते ठीक आहे.' आणि मग सोह् म(याचा शब्दशः अर्थ आहे ' मी ते आहे', इथे व्यक्तिगत मी दैवी परमात्म्यासोबत स्वतःला अभिन्न मानतो असा संदर्भ आहे)

याप्रकारे तुम्ही नकारात्मकतेपासून स्वतःची सुटका करून घेऊन आपली हिंमत वरच्या पातळीवर ठेवू शकता.

तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कोणाला बरे वाटत नसते तेव्हा ते आपल्या आजूबाजूच्या सर्वाना खाली आणतात. आणि तुम्ही जर त्यांच्याबरोबर बोललात तर तुम्हाला दिसेल की त्यांना केवळ स्वतःबद्दल निराश वाटत असून ते आजूबाजूच्या सर्वाना निराशेच्या खाईत ढकलतात. त्यांचे हेच कार्य असते.

जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही तिला दोष देणे चालू ठेवता आणि दुसऱ्या कोणाला जर ती व्यक्ती आवडली तर तुम्ही त्यांना सांगता, ' बघा ती व्यक्ती चांगली नाहीये ह.'

आणि हो, असेसुद्धा लोक आहेत की जे अशा निराळ्या प्रकारे बोलतात की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या जाळ्यात सापडता. ते म्हणतात, 'पहा बर, मला त्या व्यक्ती विषयी वाईट मत निर्माण करायचे नाही, म्हणून मला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही. तुमची त्यांच्याबद्दलची कल्पना किंवा प्रभाव मला खराब करायचा नाहीये.' परंतु नुकसान तर अगोदरच करून झाले आहे.

तुम्ही पहिले का काय झाले ते? तुमच्या मनात शंकेचे बी आधीच पेरून झाले आहे.

म्हणून उच्च उर्जा नसलेले लोक हे बाकी सर्वाना खाली ओढतात जेव्हा त्यांना ठीक वाटत नसते, आणि मग जेव्हा सगळे उदास दिसू लागतात तेव्हा त्यांना आनंद होतो.

हे ते नकळतपणे करीत असतात. त्यांना हे करीत असल्याची जाणीव नसते, त्यांना ते असे करीत आहे हे माहितसुद्धा नसते.

रामायणा मध्ये एक कथा आहे.

भगवान रामाच्या सैन्यातील माकडांना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पूल बांधायचा होता आणि संपूर्ण सैन्य त्याच्या तयारीमध्ये जुंपले होते. मग त्यांनी काय केले असेल तर ते प्रत्येक दगडावर 'श्री राम' असे लिहायचे आणि मग तो दगड पाण्यात टाकायचे, आणि तो दगड पाण्यावर तरंगायचा. आता, भगवान राम जेव्हा स्वतः आले, तेव्हा हे सगळे लोक दगडावर त्यांचे नाव लिहित आहेत आणि दगड पाण्यात टाकीत आहे हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणून, त्यांनी एक दगड घेतला आणि त्यावर त्यांनी 'श्री राम' असे लिहिले आणि त्यांनी तो दगड पाण्यात टाकला, पण तो दगड बुडाला, तो दगड तरंगला नाही. तेव्हा भक्तांनी त्यांना सांगितले, 'तुम्हाला भक्ती काय ते माहित नाही. आम्ही जे करू शकतो ते तुम्हाला जमणार नाही.'

म्हणून असे म्हटले आहे की भक्त हे एक पायरी वर असतात, आणि त्यांच्यात अमाप शक्ती असते.

या ग्रहावर प्रेम हे सर्वात शक्तिमान आहे.  कोणामुळे, कोणत्याही प्रसंगामुळे, कोणत्याही कारणामुळे ते नष्ट होऊ देऊ नका.

आपले प्रेम इतके दुर्बल असते आणि आपण त्याला इतके नाजूक बनवून टाकतो की काही लोकांच्या नकारात्मक बोलण्यामुळे, त्यांची नकारात्मकता आपल्या डोक्यात घर करते आणि आपण आपली स्वतःची उच्च उर्जा आपल्या हाताने उध्वस्त करू लागतो.

आता याचा अर्थ असा नाही की आपण आंधळे प्रेम करावे. आपली बुद्धी कुशाग्र असायला पाहिजे आणि आपले तर्क योग्य असले पाहिजे, आणि त्याच वेळी आपल्याला मिळालेली सर्वात सुंदर भेट ज्याला प्रेम म्हणतात त्याला टिकवून ठेवले पाहिजे. एका लहान बालकाला आपण कसे जपतो त्या प्रमाणे याचे आपण रक्षण करणे जरुरी आहे.

तुम्ही लहान मुलाला पडण्यापासून आणि हरवण्यापासून कसे जपता? मुल कोणत्या दिशेने हालचाल करीत आहे, कुठे जात आहे आणि काय करते आहे अशा प्रकारे तुम्ही मुलावर संपूर्ण वेळ लक्ष ठेवून त्याचे रक्षण करता. याच प्रकारे आपण आपल्या आंतरिक खजिन्याचे रक्षण करणे जरुरी आहे. एकदा का ते आपल्याला मिळाले की मग आपण त्याचे रक्षण करायला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.

चमत्कार घडायला एक संधी द्या. हे असे नाही की तुम्ही बसल्याबसल्या असे म्हणत राहाल ,' मला आताच्या आत्ता चमत्कार घडून पाहिजे' , आणि चमत्कार घडेल. हे असे होत नाही.

माझे तुम्हाला हे सांगणे आहे की जेव्हा तुम्ही चमत्कार होण्याचा हट्ट धरून बसता तेव्हा ते तितकेच बालिशपणाचे जितके कोणी तुम्हाला चमत्कार दाखवून तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो.

तुम्हाला चमत्कार दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'मी आता हवेतून वस्तू बाहेर काढीन', असे म्हणणाऱ्या व्यक्तीकडे कधीही जाऊ नका. हे अजिबात योग्य नाही.

चमत्काराच्या मागे धावू नका, परंतु त्याचवेळेस त्यांना घडण्यापासून अडवू नका. जो कोणी केंद्रित आहे, ज्याला कोणाला साक्षात्कार झालेला आहे, ते चमत्कार घडवायचा प्रयत्न करणार नाही. चमत्कार बस्स घडतात; ते जीवनाचा भाग आहे. त्यांना केवळ घडू द्या. कोणालाही प्रभावित करण्याचा किंवा काही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, हे चांगले नाही.

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

त्यामुळे तुमची परिपक्वता आणि तुमच्या चैतन्याचे फुलून येणे दाखवत नाही.

आपल्याला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही. जर कोणी तसे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते तसे नाहीयेत जसे ते स्वतः असल्याचा विचार करीत आहे किंवा त्यांच्याकडून जी अपेक्षा होती तसे ते नाहीयेत.

प्रेम आणि भक्ती यांची शक्ती फार महान आहे. आणि हे सर्व ( सत्संग, सेवा आणि साधना ) ते घडण्यासाठी मदत करतात. सत्संगमध्ये बसा आणि पहा तुमच्यातील उर्जा कशी वृद्धिगत होते ते. प्रेरित करणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील.

तुम्हाला सर्वाना किती प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, आणि तुम्ही त्या लिहून ठेवायला पाहिजे आणि इतरांसोबत त्या वाटून घेतल्या पाहिजेत कारण त्याने त्यांना प्रेरणा मिळेल.

मी असे का म्हणतो आहे कारण जेव्हा तुम्ही इतरांबरोबर काही चांगली घटना होताना ऐकता तेव्हा तुम्हालासुद्धा उन्नत झाल्याचे वाटते.

आजच्या जगात तुम्हाला सतत इतक्या नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात. तुम्हाला चोरी झाल्याचे किंवा बलात्कार झाल्याचे ऐकु येते. कोणीतरी कोणाला तरी फसवल्याचे तुमच्या कानावर येते, आणि अनेक इतर गुन्हे तुमच्या सभोवती घडत आहे ते तुम्हाला कळते.

जेव्हा तुम्ही हे ऐकता तेव्हा तुमचा जीवनातील रस नष्ट होतो. अनेक तरुण लोकांचा जगण्यातील रस संपुष्टात येतो केवळ या नकारात्मक गोष्टी ऐकून.

उन्हाळ्यात मी कँनडा इथे होतो आणि एक जोडपे मला भेटायला आले.

ते म्हणाले,' गुरुदेव, आमच्या १८ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. तो अतिशय बुद्धिमान तरुण होता. त्याने एक चिट्ठी सोडली ज्यात त्याने लिहिले ,' आई आणि बाबा, मला हे जग जगण्याकरिता योग्य वाटत नाही. दररोज इतके गुन्हे घडत आहेत. मला या जगात जगायची इच्छा नाही आणि मी या जगाला कांटाळलो आहे.'

त्याने हे मत कसे बनवले हे तुम्हाला माहिती आहे? केवळ बातम्या बघून.

त्याच्या चिट्ठीत त्या मुलाने पुढे लिहिले,'मी तुम्हाला दुःखी कष्टी करीत आहे त्याबद्दल मला माफ करा परंतु मला आता जिवंत राहण्याची इच्छा नाही.' अशी चिट्ठी लिहून त्याने नंतर आत्महत्या केली.

आपण सगळ्यांनी आपल्या सभोवती असलेल्या प्रत्येकाला सकारात्मक बातमी देण्याचा निश्चय केला पाहिजे कारण हे विश्व प्रेम आणि प्रकाश यानेच चालते.

प्रकाश तुमच्याकरिता कितीतरी भेटी घेऊन येतो आणि अनेक चमत्कार त्याने शक्य होतात.

दररोज मला इंटरनेटद्वारे हजारो पत्रे मिळतात ज्यात जगभरातील लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या अचंभ्याविषयी ते सांगतात.

जर मी ही सर्व पत्रे तुमच्यासमोर काढून ठेवली तर ते चांगले दिसणार नाही, तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी लिहून काढा आणि ते इतरांसोबत वाटून घ्या. ज्यांना अत्यावश्यक आहे अशांसाठी आशेचा किरण आणा.

तुम्हाला गोष्टी बनवून सांगायच्या नाहीयेत. खोट्या गोष्टी निर्माण करणे हे दुसरे टोक गाठणे होईल. हे चांगले नाही. परंतु तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे, निदान ते तरी इतरांच्या आयुष्यात आणा. तुम्ही लोकांना याबाबतीत जागरूक करणे जरुरी आहे.

तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या घटनाबद्दल तुम्ही लिहून काढा.

थोडक्यात लिहा, फार लांबण लावून लिहू नका. कित्येक वेळा लोक इतक्या मोठ्या गोष्टी लिहितात की तुम्हाला ते पूर्णपणे वाचण्याची इच्छा राहत नाही. केवळ पहिला परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला ते बंद करून ठेवून द्यावे असे वाटते. म्हणून,तुमचे अनुभव अवश्य लिहा परंतु ते थोडक्यात आणि सुटसुटीत लिहा.

तुम्ही तुमच्या माहितीत असलेल्या कोणत्याही अस्सल अनुभवाबद्दल लिहू शकता जो तुम्हाला वाटून घेण्याची इच्छा आहे. याने खरोखर प्रेरणा प्राप्त होईल.

तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही कोणतीही अस्सल खरी गोष्ट वाटून घेता तेव्हा त्याचा अतिशय सकारत्मक परिणाम इतरांच्या जीवनावर होतो. अशा प्रकारेच आपण लोकांना प्रकाशाकडे, जीवनाकडे, आणि प्रेमाकडे प्रेरित करणे जरुरी आहे. आधीपेक्षा यागोष्टीची आज फार म्हणजे फार आवशक्यता आहे.

दररोज मला लोकांकडून कितीतरी पत्रे मिळतात.

त्यात काही डॉक्टरांच्या गोष्टी आहेत ज्यांनी आशा सोडली होती आणि ज्यांनी सांगितले की रोगी सहा महिन्यात दगावणार आहे आणि या प्रकाराला अनेक वर्षे होऊन गेल्यानंतर तरीसुद्धा ते रोगी जिवंत आहेत.

अनेक रोगनिवारण झाले आहेत. याची हजारो पत्रे आहेत.

आज आपली मनःस्थिती अशी झाली आहे की आपण या उर्जेच्या क्षेत्रावर अजिबात विश्वास ठेवीत नाही. आता आपण डॉक्टरांनी लिहिलेल्या रासायनिक गोळ्यांवर जास्त विश्वास ठेवतो. तरीसुद्धा आपण कोणतेही टोक गटाने बरोबर नाही. असा विचार करू नका, 'अरे गुरुदेव उर्जेच्या क्षेत्राबद्दल बोलले,म्हणून मी आता कोणत्याही प्रकारचे औषध घेणार नाही. मी सगळी औषधे फेकून देणार.'

नाही! आपण असे वागता कामा नये.

आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण त्याच वेळी मी तुम्हाला काय सांगतो आहे चमत्कारांना घडायला एक संधी द्या.

हेच त्याचे सार आहे.