कर्मांचे मोजमाप

09
2014
Sep
बंगलोर आश्रम
प्रश्न : गुरुदेव, कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये हे कसे कळेल? 
श्री श्री: तुम्ही तुमच्या मनाला, अंतरमनाला विचारा. दुसऱ्यांनी तुमच्या 
बाबतीत जे करू नये असे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दुसऱ्यांच्या 
बाबतीत करू नका. हाच निकष आहे. 
आपण अशाच गोष्टी कराव्या ज्या करताना तात्पुरता त्रास होणार 
असला तरी, दूरगामी फायदा मिळेल. अशा गोष्टी करू नयेत ज्याच्या 
पासून तात्पुरता आनंद मिळेल पण दूरगामी परिणाम दु:खकारक असतील. 
कर्माचा हाच निकष आहे. 

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा दुसरे एखादे आध्यात्मिक गुरु येऊन अनादराने 
वागतात किंवा अपमानकारक गोष्ट करतात तेव्हा तुम्हाला काय वाटते ? 
श्री श्री : करुणा आणि अचंबा. आधी अचंबा वाटतो की एखादी ज्ञानी 
व्यक्ती असे कसे वागू शकते. असे बघा की, एखादा दागिन्यांच्या 
दुकानाचा मालक अगदी क्षुल्लक किमतीची भाजी किंवा एखादा किलो 
केळी किंवा सफरचंद चोरणार नाही. जर असे कुणी केले तर तुम्ही केवळ 
आश्चर्य करू शकता आणि दुसऱ्या बाजूला करुणाही वाटेल. कुठेतरी खोलवर 
रुजलेले अज्ञान असेल आणि तुम्ही त्या अज्ञानाबद्दल फक्त करुणा दाखवू 
शकता. त्यांच्यावर रागावण्यात काही अर्थ नाही. त्याने कुणाचाच फायदा 
होणार नाही. हा माणूस, जो चढत होता तो घसरला. हाव आणि घृणा 
यांच्या ते आहारी गेले आहेत. आणि जर ते खरे असतील तर ते स्वत:लाच 
शिक्षा करून घेतील. त्यालाच प्रायश्चित्त म्हणतात. जेव्हा कुणाच्या हातून 
चूक होते तेव्हा आणि ती त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांनी स्वत:लाच शिक्षा 
करून घ्यावी, दुसऱ्यांनी शिक्षा करण्याची वाट पाहू नये. आणि जर त्यांनी 
यापैकी काही केले नाही तर त्यांना आध्यातिक गुरु मानू नये. ते अध्यात्मिक 
ज्ञानाचा स्वत:च्या स्वार्थीपणासाठी वापरत आहेत.  
 
प्रश्न : मला आध्यात्मिक साधना आणि वातावरण आवडते. आध्यात्मिक 
दृष्ट्या विकसित झालेले लोक आणि त्यांचे कार्य यात राहिल्याने मला 
संतुलित आणि समाधानी वाटते. आध्यात्मिक साधनेतच व्यासाय करणे 
शक्य आहे कां ? जर तसे असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल ? 

श्री श्री : असे बघा, आध्यात्मिक साधनेचा व्यवसाय करता येणार नाही 
पण आर्ट ऑफ लिव्हिंगने बऱ्याच संधी उपलब्ध केल्या आहेत. आपल्या बऱ्याच 
शाळा, संस्था, विद्यापीठे आणि नोकऱ्या उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. 
तुम्ही तुमचे नाव नोंदवा कारण देशाला सक्षम लोकांची गरज आहे आणि 
आध्यात्मिक कल असलेल्या लोकांचे सर्वत्र स्वागतच असते. तर संधी भरपूर आहेत.     

प्रश्न : लोकांनी विचारलेल्या कोणत्या प्रकारच्या प्रश्नांनी तुम्हाला अस्वस्थ 
वाटते ? 

श्री श्री : आतापर्यंत कुणी अस्वस्थ करणारे प्रश्न विचारल्याचे मला आठवत 
नाही. मला कुणाबारोबरच काही झाले तरी अस्वस्थ वाटत नाही. आतापर्यंत 
तरी नाही, भविष्यातले मला माहित नाही.  
प्रश्न : गुरुदेव, क्लेश किंवा भायाने ग्रासलेल्या लोकांना तुम्ही कसे 
समजावता ? तुमच्या आयुष्यात आलेले तणावाचे आणि चिंतेचे सर्वात 
मोठे क्षण कोणते होते ? 
श्री श्री : चिंतेचा तर मला अनुभव नाही पण तणावाचे बरेच क्षण होते. 
आम्ही सुनामी मध्ये अडकलो होतो आणि आम्ही सतत ४८ तास प्रवास 
करत होतो. ते दिवस खूपच तणावपूर्ण होते. जेव्हा मी इराक मध्ये होतो 
आणि मागे पुढे सगळीकडे बॉम्ब फुटत होते. मी धोक्याच्या ठिकाणी होतो. 
अर्थातच मला काळजी नव्हती पण माझ्या भोवतालच्या लोकांना मी 
काळजीत टाकले. मला माहित होते की आमचे सगळे व्यवस्थित होणार 
आहे. सरकारनेही धोक्याच्या ठिकाणी न जाण्याबद्दल सांगितले पण मी 
तिथल्या आदिवासी लोकांना भेटण्याच्या बाबतीत आग्रही होतो. त्यांनी 
आम्हाला १२ वाहने आणि माझ्या सुरक्षेसाठी २ टँकर्स दिले. त्यामुळे जे 
अंतर अर्ध्या तासात पार करू शकलो असतो ते पार करायला आम्हाला 
दोन तास लागले. तर, या युद्धजन्य भागात प्रवास करणे हा माझ्यासाठी 
काळजीचा भाग नव्हता, उलट थरारक अनुभव होता. 
खूप वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये संघर्ष चालू असताना मी तिथे बऱ्याच ठिकाणी 
प्रवास केला. मी श्रीलंकेतही गेलो होतो पण 
तिथला माझा अनुभव निराशाजनक होता. मी श्रीलंकेला गेलो कारण 
मला तिथे शांतता प्रस्थापित करायची होती. मी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी 
बोललो आणि मला प्रभाकरनशी ही बोलायचे होते. मला त्याला हे 
सांगायचे होते की, युद्धाचा मार्ग न स्वीकारता चर्चेला तयार हो. तो 
मला भेटला नाही हे जरासे निराशाजनक होते. मी एक दिवस किलिनोच्चीला 
राहिलो होतो. मला हे दिसत होते की जर या माणसाचे गर्व हर्ण केले नाही 
तर ऐंशी हजार लोक मारले जातील. जर तो चर्चेसाठी आला असता तर 
श्रीलंका मधील युद्ध टाळता आले असते. अर्थात त्याच्या हाताखालचे लोकही 
उतावळे झाले होते. ते म्हणाले, “ गुरुदेव, कृपा करून आमच्या नेत्याला 
भेटा.” ते त्याला थलाइवार (नेता) म्हणायचे. “ जर तुम्ही त्यांना 
भेटलात तर त्यांचे मत परिवर्तन होईल.” पण त्या माणसाने भेटायला 
नकार दिला. तो अध्यात्मिक गुरूंना भेटणार नाही, असे त्याने सांगितले.   
तसेच, जेव्हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया मध्ये संघर्ष सुरु होता, 
तिथ्लीआ नवीन राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. 
ते विशीतले एक तरुण राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना माफियांनी घेरलेले होते. 
आम्हाला असे सांगण्यात आले की ते आम्हाला राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचू 
देणार नाहीत. त्यामुळे त्यावेळी हे अगदी होता होता फिस्कटले. अशा 
गोष्टी होतात पण त्या गोष्टींमुळे मी अस्वस्थ होत नाही.  

प्रश्न : गुरुदेव, मी ३० वर्षांचा आहे आणि मला माझ्या आयुष्याकडून 
काय हवे आहे ते खरोखरच मला अजूनही माहित नाही. मला एखादी 
गोष्ट आवडीने करावीशी वाटते, असे म्हणता येत नाही पण जेव्हा दुसरे 
कुणीतरि एखादी गोष्ट मनापासून करताना दिसले की मला पोकळी जाणवते. 
मला माझ्या जीवनात काय हवे आहे हे मला कसे कळेल ? 

श्री श्री :‘मला जीवनात काय हवे’ हे तुम्ही बदलून, ‘ भोवतालच्या 
लोकांना काय हवे’ असा विचार करायला हवा. देशाला काय हवे. 
‘मला काय हवे’ हे ‘माझ्याकडून काय हवे आहे’ हा बदल जर तुम्ही 
केलात तर तुम्हाला समाधान मिळेल. जेव्हा तुम्ही असा विचार करता 
की, “ मी देशाच्या भल्यासाठी काय करू शकतो” तेव्हा, तेव्हा तुम्हाला 
पोकळी जाणवणार नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक प्रकल्प आहेत. 
एखाद्या स्वयंसेवकाला गाठा, तो तुम्हाला त्यांच्या सोबत घेऊन 
जाईल. जेव्हा तुम्ही एखाद्या सामाजिक प्रकल्पात सक्रीय सहभागी 
होता, तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. तसा आनंद तुम्हाला 
आणखी कुठेही मिळणार नाही. 
प्रश्न : गुरुदेव, तणाव आणि चिंता यांना कसे हाताळायचे ? 
श्री श्री : आत्ता हसत आहात तसेच हसत रहा. तणाव आणि चिंता 
यांना पक्डून्न ठेऊ नका. जर तुम्ही या गोष्टी धरून ठेवल्या नाहीत 
तर त्यांना हाताळण्याचा प्रश्नच येत नाही. 
गुरु आणि आश्रम कशासाठी आहे ? सगळ्या चिंता टाकून द्या, 
प्रार्थना करा, श्रद्धा ठेवा आणि पुढे जा. तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याची 
फळे तुम्हाला मिळतीलच. तुम्हाला माहिती आहे कां ? बंगलोर मधल्या 
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, जर ते रविवारी आश्रमात आले 
आणि तिथलं प्रसादाच अन्न खाल्लं तर त्यांचे पोटाचे आणि इतर आजार 
बरे होतात. त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्या श्रद्धेमुळेच त्यांना इच्छित फळ 
मिळते. इथे राहणाऱ्यांना कदाचित पोदात दुखत असेल आणि त्यावर 
औषध घायावे लागत असेल पण बाहेरून जे लोक रविवारी या श्रद्धेने ते 
पूर्णपणे बरे होतात. हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे.  

देवाच्या जवळ असणे !

02
2014
Oct
बंगळूरू, भारत
 

नवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्टीय केंद्र, बंगळूरू येथे झालेल्या 
ऋषी होमाच्यावेळी श्री श्री नी केलेला वार्तालाप:
आताच वैदिक पंडितांनी सामवेदातील सुंदर ऋचा गायल्या. हा संसार 
(भौतिक जग किंवा भ्रामक जग) म्हणजे मनाचा खेळ आहे. आपण 
जे जग समजतो तसे ते बाहेर नसते. आपल्या मनामुळे या निर्मितीबाबत 
अशी आपली धारणा आणि समजूत झाली आहे. हा भवसागर पार करायचा 
असेल तर आपण एक पूल वापरू शकतो. आपल्याला हा संसार पार करून 
जायला मदत करणारा हा कोणता पूल आहे ? या पुलाच्या दोन बाजूंना 
आहे तरी काय ?
त्याच्या एका बाजूला अडाणा (लालच, स्पष्टतेचा अभाव). अडाणा म्हणजे 
सततची लालसा, ‘ मला हे पाहिजे, मला ते पाहिजे’. आपल्याला कोणतीही 
गोष्ट दुसऱ्याला द्यायला आणि त्यांच्याबरोबर वाटून घ्यायला आवडत नाही. 
म्हणून या ऋचेत असे म्हटले आहे कि, तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते 
दुसऱ्याबरोबर वाटून घेऊन तसेच उदारपणे दान-धर्म करून हे अडाणाचे 
लक्षण सोडून देणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यात असे म्हटले आहे कि, तुम्ही जास्त शांत होऊन तुमचा 
राग सोडून दिला पाहिजे.

आणि शेवटी त्यात असे म्हटले आहे कि, तुम्ही तुमच्या शंका आणि 
चुकीच्या समजुती सोडण्यासाठी तुमची श्रद्धा दृढ करण्याची आणि देवाची 
भक्ती करण्याची गरज असते. जेंव्हा तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ होता तेंव्हा 
तुमच्या सर्व शंका आणि नकारात्मकता आपोआपगळून पडतात. त्याचप्रमाणे, 
जेंव्हा तुम्ही सत्याची कास धरून, तुम्ही पक्के सत्यनिष्ठ होता तेंव्हा 
आपोआपच सर्व खोटेपणा आणि नकारात्मकता नाहीसे होतात.

तर हा भवसागर पार करून जायच्या पुलाच्या बाजूला असे सर्व गुण 
असतात.

या ऋचेच्या पुढच्या ओळीत असे म्हटले आहे कि हा क्लेशदायक 
भवसागर पार करणे अवघड आहे पण जर तुम्ही सततच्या सरावाने 
हे महान गुण अंगी बाणले पाहिजेत.

सततच्या सरावाने तुम्हाला काय मिळेल ? तुम्ही दृढ होऊन परमात्म्याशी 
स्थिर होता आणि हा भवसागर पार करून अमरत्वाच्या अमृताचे सेवन 
कराल (आत्म-तत्वाशी समरूप व्हाल). मग तुम्ही एखाद्या प्रज्वलित 
दिपासारखे व्हाल.
पुढच्या ऋचेत असे म्हटले आहे कि , ‘ तुम्ही मुळात परमात्म्याचा 
एक भाग आहात. म्हणून तुम्ही तुमच्या स्त्रोताशी एकरूप व्हा आणि 
मग तुमच्या मनाचे विघटन होऊन तुम्ही सर्वांबरोबर समरूप होऊन 
पूर्वीसारखे परमात्म्याचा एक भाग होऊन व्हा.

नाहीतर असे होते कि तुम्ही एक विचार करता, दुसरा कोणी काही 
वेगळाच विचार करतो आणि मग तुमच्यात एकवाक्यता होत नाही. 
इथूनच खरा प्रश्न सुरु होतो. हि ऋगवेदातील शेवटची ऋचा आहे आणि 
भारतीय घटनेचा शेवट पण हाच आहे. हि ऋचा आपल्या सर्वांचे विचार 
आणि मन वैश्विक मनाशी एकरूप करणारी प्रार्थना आहे. प्रत्येक स्तरावर 
धैर्य असु देत कारण प्रत्येक जण हा सारखा असून परमात्म्याचाच एक 
भाग आहे. अशा रीतीने आपल्या सर्वांचे मने कोणत्याही संघर्ष किंवा 
मतभेदाशिवाय एकत्र काम करू देत. या ऋचा खरोखरच खूप सुंदर आहेत.


 


शाश्वत इच्छा

05
2014
Sep
बंगलोर आश्रम
 
प्रश्न: गुरुदेव, गेल्या पंधरा वर्षापासून मी तुमचा साधक आहे, 
आणि माझे आयुष्य अतिशय सुंदर झाले आहे. पण अनेक वेळा 
माझ्या मनात एक प्रश्न येतो कि हे साधना, सेवा, सत्संग, सिद्धी 
आणि मोक्ष केल्याने मला काय मिळेल? ह्याच्या पुढे काय?

श्री श्री: हे पहा, एक साधे सूत्र लक्षात ठेवा. जो व्यक्ती आनंद 
आणि सुखसोयी साठी अस्वस्थ होत नाही त्याला मोक्ष प्राप्त होते. 
आणि ज्या व्यक्तिला मोक्ष प्राप्तीसाठी ची इच्छा नाही त्याला ईश्वरीय 
प्रेम प्राप्त होते. आणि एकदा जर का हे प्रेम तुम्हाला प्राप्त झाले 
तर समजा कि तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. 
हे ईश्वरीय प्रेम मिळाल्यावर बाकीचे काही प्राप्त करायचे रहात नाही. 
ह्या नंतर तुम्ही हे ईश्वरीय प्रेम आनंदा मध्ये सर्वांना एकत्र करा 
आणि हे प्रेम विस्तारीत जावा.
तुम्हाला काय हवे आहे? तुमच्या इच्छा आणि गरजांना अंत नाही. 
श्रीमंत होण्याच्या इच्छेला अंत नाही. तुम्ही श्रीमंत झाल्यानंतर 
तुम्ही दोन चारचाकी गाड्या घेताल, काही दिवसानंतर तुम्हाला चार 
चारचाकी गाड्या, चार बंगले घेण्याची इच्छा होईल. तुम्हाला तुमचा 
व्यवसाय जास्तीत जास्त वाढविण्याची इच्छा होईल. या गोष्टींना काही 
अंत आहे का? एखादा व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी जास्तीत जास्त पैसे 
कमवण्यासाठी सारखे काम करत रहातो आणि शेवटी आजारी पडून 
मृत्यूला ओढवून घेतो. त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याची मुले त्या 
संपत्ती साठी भांडत रहातात. हि काही चांगली गोष्ट नाही. 
तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा आणि संपत्ती मिळवा, पण हे जर 
तुमच्या आयुष्याचे ध्येय असेल तर हे जगणे अर्थहीन होऊन जाते.     

प्रश्न: गुरुदेव, जेव्हा आपण आपल्या विवेक दृष्टी ने या सृष्टी कडे 
पाहिले तर जाणवते कि सर्व काही बदलत आहे. मग आपण आपले 
वचन बदलू शकतो का?

श्री श्री:  हो, हे असे केव्हा घडेल? जेव्हा तुमची विवेक बुद्धी जागृत 
होऊन तुम्हाला जाणवेल कि तुम्ही जे काही वचन घेतले आहे ते 
चुकीचे किंवा अज्ञानात घेतले आहे. ज्या वचना पासून कुणाचे कल्याण 
होत नाही अथवा त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत, असे वचन तुम्ही 
बदलू शकता. आणि तुम्हाला हे वचन बदलण्यास काही हक्क नाही. 
या साठीच तुम्ही तुमच्या गुरु कडे किंवा एखाद्या हुशार व्यक्ती कडे गेले 
पाहिजे आणि तुम्ही तुमची समस्या त्यांना सांगितली पाहिजे. त्यांना 
सांगा, ‘मी अज्ञानात हे वचन घेतले. ते चुकीचे आणि निरुपयोगी आहे असे 
मला आत्ता वाटते. या गोष्टीवर मी कशी मात करू या साठी मला 
तुमची मदत आणि तुमचे मत हवे आहे’.
एक गुरु किंवा हुशार व्यक्ती हे समजू शकतो आणि या गोष्टीवर कशी 
मात करावी याचे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. ते तुम्ही केलेल्या वचनाचे 
परीक्षण करून ते वचन बरोबर आहे कि चुकीचे हे निश्चित करू शकतात, 
का तुम्ही केलेल्या वचनांपासून तुम्ही दूर जाऊ पहात आहात आणि स्वत:ला 
आराम देऊ इच्छिता.
उदाहरणार्थ, तुमचे लग्न झाले आणि तुम्हाला मुले बाळे झाल्यावर अचानक 
तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या नको वाटू लागतात आणि तुम्ही तुमच्या 
जबाबदाऱ्यापासून पळ काढून तुम्ही संन्यासी बनू पहाता. तुम्ही जेव्हा 
तुमच्या गुरु कडे किंवा एखाद्या हुशार व्यक्ती कडे गेलात आणि त्यांना 
सांगितले कि तुम्ही असे करू इच्छिता तर ते ताबडतोब नकार देतील आणि 
तुम्हाला असे करू नका म्हणून सांगतील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार 
पाडाव्यात असे ते तुम्हाला सांगतील, मुला बाळांना मोठे करावे आणि मग
संन्यास घ्या. तुम्ही जर कर्तव्ये आणि जबाबदारी च्या नावाखाली वचन 
पुर्ती करू शकत नाही तर ते बरोबर नाही. पण जर तुमच्या वचना मुळे 
तुमचे किंवा इतर कुणाचे कल्याण होत नसेल तर तुम्ही तुमचे गुरु किंवा 
आप्त जणांकडे सल्लामसलत करून तुम्ही तुमचे वचन तोडा.

प्रश्न: आपण सर्व जण जर एकाच चेतनेचे भाग आहोत, तर त्या एकाच 
चेतनेचे गुण विविध आत्म्यांमध्ये वेगवेगळे कसे असू शकतात?


श्री श्री: ते वेगवेगळे असू शकतात. तुम्ही चपाती, समोसा किंवा 
पराठा बनविण्यासाठी एकाच प्रकारचे पीठ वापरता. एकाच प्रकारचे 
पीठ या तिन्ही प्रकारामध्ये वापरले जाते, पण तरी पण ते एकमेकांपासून 
वेगळे आहेत. तर विचार करा, पीठासारख्या छोट्या गोष्टींमध्ये अनेकता 
असू शकते तर व्यक्तींमध्ये अनेकता असणे हि आश्चर्यकारक गोष्ट नाही. 
या अनंत चेतने मध्ये अनेकता आहे.
जर तुम्ही हिरा आणि दगडी कोळसा पाहिला तर तो एकच प्रकार आहे, 
तरी पण ते दोन्ही वेगळे आहेत. रचनात्मक आणि रसायनिक दृष्ट्या त्या
दोन्ही मध्ये काही फरक नाही. पण तरीही असे काही आहे ज्या मुळे ते
वेगळे दिसतात. त्याच प्रमाणे एका विशिष्ठ पातळीवर चेतना एकच आहे, 
आणि दुसऱ्या पातळीवर तीच चेतना वेगळी आहे. ही चेतना व्यक्ती व्यक्ती, 
जागोजागी आणि वेगवेगळ्या संघटने मध्ये वेगळी असते.

प्रश्न: गुरुदेव, आनंदाचे उगमस्थान कुठे आहे?

श्री श्री: मला जर विचारले तर मी म्हणेन कि ते सगळीकडे आहे. आणि 
या पुढे मी जाऊन म्हणेन की, आनंद हा तुमच्या मध्येच आहे.

प्रश्न: गुरुदेव, मला वाटते कि मला परिपूर्ण गुरु भेटले आहेत. पण 
तुम्हाला एक परिपूर्ण शिष्य मिळाला आहे असे वाटते का?

श्री श्री: अशा गोष्टींचा विचार करायला गुरु कडे वेळ कुठे असतो? 
एक गुरु नेहमी एका शाश्वत सुखाच्या अवस्थेत असतो ! (प्रेक्षकांमध्ये हशा). 
एक गुरु नेहमी म्हणत असतो, ‘तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही 
माझ्याकडून घ्या’.  हे पहा तुमच्या पुढे एक नदी वहात आहे जी खोल 
आहे. काही जण त्या नदी मध्ये फक्त पाय ओले करतात आणि त्यांना 
काही नको असते. काही जणांना फक्त एक डुबकी मारायची असते. 
काही जणांना त्या खोल नदी मध्ये पोहायचे असते, आणि काही जणांना 
त्या खोल नदीत खोलवर सूर मारून एक घडा भरून पाणी घ्यायचे असते. 
एखाद्या व्यक्तीला जर महासागरात सूर मारून मोती किंवा मीठ 
घ्यायचे असेल तर महासागर त्याला कधीही नकार देत नाही. 
तुम्हाला जर महासागरातून मोती घ्यायचे असतील तर तुम्ही 
खुशाल घेऊ शकता, आणि जर का तुम्हाला मीठ हवे असेल 
तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला समुद्रातून 
मासे हवे असतील तर तुम्ही घेवू शकता, आणि तुम्हाला जर का 
समुद्रातून तेलाचा अर्क काढायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकता. 
म्हणून तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर तुम्ही मुक्ती घेवू शकता ! 
तुम्ही स्वत: बद्दल चिंतन करून या गोष्टीचा विचार करा.
काही २०-२५ वर्षापूर्वी मी ऋषिकेश मध्ये एका मोठ्या साधुसंतांना 
भेटायला गेलो होतो. मी जेव्हा त्यांना भेटलो, मला पहाताच त्यांना 
खूप आनंद झाला आणि त्यांनी माझी स्तुती सुरु केली. मी 
त्यांना म्हटले, ‘महाराज, माझ्यातील दोष मी पाहू शकत नाही. 
कृपया या बद्दल मला सांगा आणि मी ते दोष कसे दुरुस्त करू 
शकेन ते सांगा’. 
ते संत हसले आणि म्हणाले, ‘मी तुला ते का सांगू? जेव्हा 
तुझ्या आयुष्यात दु:ख येईल तेव्हा ते तुला आपोआप कळेल. 
मी फक्त तुझा स्वभाव कसा आहे हे सांगू शकेन. मी फक्त 
तुझे वर्णन करू शकेन;. सुरवातीला त्यांनी माझी खूप स्तुती 
केली. ते म्हणाले, ‘खुद्द देवच माझ्या घरी आला आहे. मी 
खूप भाग्यवान आहे’. मी हे पाहून आश्चर्य चकित झालो आणि मी 
त्यांना माझ्या उणीवा विचारल्या म्हणजे मी त्या दुरुस्त करू शकेन. 
पण ते फक्त म्हणाले, ‘जेव्हा तु आयुष्यात दु:खाला सामोरे जाशील, 
तेव्हा तुझ्या उणीवा तुला आपोआपच कळून येतील’.
हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आणि हे सत्य आहे. 
एक हुशार आणि ज्ञानी व्यक्ती स्वत:च्या तोंडून कुणा बद्दल काही 
वाईट बोलत नाही. ते कुणाला हे म्हणत नाहीत, ‘अरे, तू किती 
गाढव आहेस’, कारण असे होऊ शकते कि तो व्यक्ती कदाचित 
गाढव होईल (किंवा तसे तो वागेल). असे म्हटले आहे की, 
‘ऋषीनाम यथा-चित्तनाम अर्था वाचा-अनु धावते’. याचा अर्थ 
म्हणजे एखादा हुशार किंवा सिद्ध व्यक्ती जे काही बोलतो त्या 
शब्दां मागील अर्थ खूप जवळून पहायला मिळतो 
(म्हणजे ते जे काही बोलतात ते त्वरित प्रत्यक्षात उतरते). 
म्हणून सिद्ध व्यक्ती जेव्हा म्हणतात, ‘तुम्ही खूप चांगले आहात’, 
त्यांच्या ह्या वाणीमुळे आपल्या मध्ये चांगुलपणा खुलतो. पण जर 
का ते तुम्हाला म्हटले कि, ‘तुम्ही गाढव आहात’, तर 
त्यानंतर एखादा साधारण व्यक्ती सुद्धा गाढवा सारखा वागतो. 
हे ज्ञान खूप उच्च आणि परिपक्व पातळीवरचे आहे. या पद्धतीने 
एखादा सिद्ध पुरुष अथवा ब्रम्हज्ञानी तुम्हाला सूचना देतो 
(तुमच्या सद्गुणाची स्तुती करून). या पातळीच्या खाली 
असणारी व्यक्तीला टीका आणि शिक्षेचा आश्रय घ्यावा लागतो. 
आणि कुठेतरी ते पण आवश्यक आहे. आणि जे व्यक्ती हट्टी 
आहेत आणि जे सुधारायला नकार देतात, अशा व्यक्तींना असे 
कठोर नियम आवश्यक असतात.
मी असे म्हणत नाही जे व्यक्ती रागवतात किंवा निंदा करतात 
ते वाईट आहेत, नाही ! ते असे काही कारणास्तव करीत असावेत, 
किंवा तुमच्यावर रागवून किंवा तुमची निंदा करून ते कदाचित तुमचे 
कर्म घालवित असतील. असे हि असेल कि तुम्ही फक्त अशीच भाषा 
समजू शकता, त्यासाठीच ते तुमच्याशी असे वागत असतील. 
उदाहरणार्थ, जे व्यक्ती अहंकारी आणि उद्धट आहेत त्यांना 
सौम्य मृदुल शब्द समजू शकत नाहीत. त्यांना जर कुणी 
उद्धट मूर्ख म्हणून संबोधले कि त्यांच्या ते लक्षात येते. पण 
हि शैली वेगळी आहे, आणि अशी शैली एखाद्या हुशार किंवा 
ब्रह्मज्ञानी व्यक्तीची निश्चितपणे असू शकत नाही.

प्रश्न: गुरुदेव, भक्ती मध्ये तर्क नाही. पण आपण जेव्हा 
ज्ञान ऐकतो त्यानंतर मन दु:खी आणि अस्वस्थ होते. मग 
मला तुमच्या भक्ती मध्ये झोकावे वाटते. आपण बुद्धीचा 
वापर न करता मोक्ष प्राप्त करू शकतो का?

श्री श्री: हा प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या बुद्धीचा आणि 
तर्क चा वापर केला आहे, हो कि नाही ! तुम्ही हा प्रश्न 
विचारला म्हणजे तुम्ही आगोदर याचा तुमच्या बुद्धीने विचार 
केल्यानंतरच विचारला असणार (प्रेक्षकां मध्ये हशा). तुम्हाला 
कळतय का मी काय म्हणतोय ते? तुम्ही जर एक 
झोपलेल्या व्यक्तीला विचारले की, ‘तुम्ही झोपले आहात का?’ 
आणि तो उत्तर देतो की, ‘हो मी झोपलो आहे’. हे म्हणजे 
तुमच्या प्रश्ना सारखेच आहे. हे पहा बुद्धी आपल्या जागी आहे 
आणि भावना आपल्या जागी. समाधी म्हणजेच या दोन्ही 
मधील परिपूर्ण समतोलाची अवस्था.

(प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला पण तो ऐकू आला नाही)

श्री श्री: तुम्हाला माहीत असेल व्यवस्थापन कोर्सेस मध्ये 
आजकाल युक्तीने आणि अनौपचारिक पद्धतीने शिकविले जाते. 
हि पद्धत सर्वत्र वापरली जात आहे, आणि मी आशा करतो ती 
लवकरच सर्व जगात वापरली जाईल, सर्वांनी जाणले आहे कि 
शिकविण्याची पद्धत बदलली पाहिजे. हळू हळू हे घडत आहे.
मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो, जागतिक 
बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला 
कोर्सेस चा आराखडा करायला सांगितले आहे. आपल्या 
संस्थेच्या सर्व कोर्सेसचे सर्वत्र स्वीकार केला जात आहेत 
आणि त्यांचे स्वागत केले जात आहे. स्टँनफोर्ड विद्यापीठात 
तर आपले कोर्स प्रतिष्ठीत मानले जातात. याचा अर्थ असा 
कि जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला 
असेल तर त्याला त्याच्या साठी मार्क दिले जातात. स्टँनफोर्ड, कोर्नेल 
अशा अनेक विद्यापीठे आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या कोर्सेस चा 
वेगाने स्वीकार करीत आहेत. पण हे अजून छोट्या प्रमाणात 
आहे आणि आपल्याला अजून लांब पल्ला गाठायचा आहे. 
आपल्याकडे पण खूप IIT आणि IIM आहेत तरी पण आपल्या 
देशात आपला संघर्ष चालू आहे. सर्व जगामधील शैक्षणिक 
संस्थानांमध्ये अशीच परिस्थिती आहे. तुम्ही जगातील 
पहिल्या ५० उत्कृष्ट शैक्षणिक संस्थानांची यादी पाहिली तर 
तुम्हाला कळेल कि त्या मध्ये सर्वाधिक चायनीज आहेत. 
आपल्याला अजून खूप लांब पल्ला गाठायचा आहे आणि 
विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे 
जेणे करून त्या विद्यार्थ्यांचे सर्व गुणसंपन्न व्यक्ती मध्ये 
रुपांतर होईल. शिक्षण हे फक्त माहितीपर नसावे, 
पण या शिक्षणाने एक व्यक्ती भावनात्मक आणि 
अध्यात्मिक रित्या विकसित झाला पाहिजे. ते काम 
अजून प्रलंबित आहे, पण आज त्याचे दरवाजे उघडत आहेत.