20
2012
Dec
|
बंगलोर, भारत.
|
प्रश्न: जेंव्हा मी या मानवी जगाकडे बघतो, तेंव्हा असे लक्षात येते कि हि हे जग माझी किंवा लोकांची काळजी घेत नाही. त्यांच्यात चांगुलपणा आहे पण त्यापेक्षा त्यांच्यातील सशक्तपणाचा अभाव, लालसा आणि असुरक्षितता हे त्या चांगुलपणावर मत करतांना दिसून येतात. ज्यापद्धतीने लोक या पृथ्वीचे हाल करीत आहेत, एकमेकांशी असलेले संबंध बघता कोणीही याच्याशी सहमत होईल. जेंव्हा तुम्ही म्हणता हे सर्व प्रेमातून तयार झाले आहे तेंव्हा मी सहजच त्याच्याशी सहमत होतो पण काहीवेळा जगात जे काही चालले आहे त्याबद्धल सहानभूती दाखवणे अवघड होते. या सर्वातून एक घृणा उत्पन्न होते आणि मग कोणी अतिरेकी होतो, किंवा मग कोणी दुसऱ्याला मारायला धावतो, किंवा कोणा निष्पाप मुलीवर बलात्कार होतो. मी या जगाविषयी काळजी कशी बाळगावी? श्री श्री : कोणत्याही प्रश्नाचे एकाच योग्य उत्तर असू शकते. त्याची दोन योग्य उत्तरे असू शकत नाहीत. आणि हा जर प्रश्न असेल तर या प्रश्नाचे तुम्ही उत्तर शोधत राहावे असे मला वाटते. पण जर प्रश्न विचारायचे सोडून तुम्ही जर या मार्गावर चालायचे ठरविले तर प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन उत्तर सापडेल. आता तुम्ही त्याचे सामान्यीकरण करू नका! या जगात लोक प्रेमळ किंवा दयाळू नाहीत असे समजणे चुकीचे होईल. प्रत्येक जण हा स्वार्थी आहे असे समजणे चुकीचे होईल. अनेक लोक निस्वार्थीपणे या समाजाची सेवा करीत आहेत. तुम्ही सर्वांना भ्रष्टाचारी असे म्हणणे योग्य नाही. मी तुम्हाला आमच्या गुजरात मधील एक शिक्षक जे पूर्वी एक मोठे अधिकारी होते त्यांच्या विषयी सांगू इच्छितो. ते अधिकारी असतांना त्यांना एक कारखानदाराने सुमारे ५१ कोटी रुपये एका सहीसाठी देऊ केले होते. ते कारखानदार जी जमीन वापरीत होते ती त्यांच्या नावावर करण्यासाठी फक्त एका सहीची गरज होती. त्यांनी तसे केले असते तर त्यांना ते उचितपणे समजावून सांगता असले असते “ काही नाही हि तर प्रक्रिया आहे” किंवा त्यांनी असे पण म्हटले असते कि “ मी हे ५१ कोटी गरिबांना वाटून टाकणार आहे”. अशी अनेक स्पष्टीकरणे मनात येतील पण ते ठामपणे म्हणाले कि नाही मी ते घेणार नाही. ५१ कोटी काही थोडी रक्कम नव्हे, त्यांनी जरी तीन आयुष्यभर सरकारी नोकरी केली तरी ते शक्य नव्हते. पण त्यांनी ठामपणे त्याला नकार दिला. अशी अनेक लोक आज आपल्यात आहेत. जो पर्यंत लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळणार नाहीत तो पर्यंत ते संवेदनशील किंवा त्यांच्यात उच्च दर्जाची संवेदनशीलता येणार नाही. एखादी व्यक्ती संवेदनशील होणे किंवा तिच्यात संवेदनशीलता येणे या दोन्ही साठी ध्यान आणि ज्ञान याची गरज असते. मी ज्याप्रमाणे म्हणालो कि जग हे वाईट लोकांमुळे वाईट नाहीये तर ते सज्जन लोकांच्या मौनामुळे वाईट आहे. मी तुम्हाला असे सांगू इच्छितो कि दुसऱ्याला जोखू नका, कारण तो कसा आहे ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही स्वतःला तरी पूर्ण ओळखिले आहे काय? तुम्ही केंव्हा दयाळू होता आणि केंव्हा कठोर होता हे तुम्ही पण सांगू शकत नाही. काहीवेळा लोकांशी तुम्ही कठोर वागता आणि तुम्ही त्या कठोर वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता कि त्यांची तशीच लायकी आहे. तुम्हाला तसे वाटते कि नाही? आणि काही वेळा तुम्ही दयाळू होता आणि त्याचे पण तुम्ही समर्थन करता, होय कि नाही? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना आणि वागणूक समजत नाही तर तुम्ही दुसऱ्याला कसे जोखू शकता किंवा इतर सर्वांना कसे जोखू शकता? “हे जग निर्दयी, भ्रष्टाचारी आणि वाईट लोकांनी भरलेले आहे” ते सर्व वाईट लोक आहेत असे तुम्हाला का वाटते? नाही! ते तसे नाहीये. तुम्ही तुमचे विधान एकदा परत तपासून बघा. तुम्हाला स्वतः विषयी चांगले वाटत आहे काय? तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला वाटते आहे काय? तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला वाटते, पण जे तुमच्या सहवासात आले आहेत त्यांना तुमच्याविषयी काय वाटते हे विचारा. ते तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटते त्यापेक्षा वेगळे असेल. तुम्ही स्वार्थी आहात असे जर तुम्हाला इतर कोणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? अगदी आतमध्ये तुम्हाला तुम्ही स्वार्थी नाही असे वाटत असले आणि जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वार्थी आहात असे म्हणाले किंवा तुमच्यात इतर काही वाईट प्रवृत्ती आहेत असे म्हणाले तर तुम्ही काय म्हणाल “ हे बघा माझ्यात काही चांगले गुण सुद्धा आहेत” असे तुम्ही त्यांना सांगाल कि नाही? जो चांगला नाही किंवा सहृदय नाही असा माणूस जगात सापडणे कठीण आहे. फक्त असे लक्षात ठेवा कि सहृदयपणापासून वंचित आहे असा कोणीही माणूस या जगात नाही. काहीवेळा हा सहृदयपणा हा तणाव आणि अज्ञान यात दडलेला असतो. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले आहेत, ते आता म्हणत आहेत कि “ मी अविचारी कृत्य केले आहे मला फाशी द्या”. ते काही काळ जागरूकपणा विसरुन गेले होते. त्याबद्धल त्यांना आता खूप पश्चात्ताप होत असणार. किती हा अपराधीपणा आणि पीडा! जेंव्हा तुम्ही तुमचे दृष्टी क्षेत्र विस्तारीत करता तेंव्हा मग अपराध्याबद्धल पण तुमच्या मनात अनुकंपा निर्माण होते. असे पहा कि भूतकाळात तुम्ही काही चुका केल्या असतील. पण जर कोणी त्या सारख्या उगाळत बसले तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला ते आवडणार नाही. तुम्ही म्हणाल कि ते विसरुन जा आणि पुढे चला. असे तुम्ही म्हणाल कि नाही? तुम्ही या सच्चाइला सामोरे जायला पाहिजे! तुम्ही जगाकडे कसे पाहता हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून असते. तुम्हाला सर्व जण जर गुन्हेगार वाटत असतील तर तुमची वागणूक हि सर्वाशी असभ्य आणि अप्रिय अशीच राहील आणि तुम्ही त्याचा एक भाग असाल. म्हणून असे म्हटले आहे कि “यथा दृष्टी तथा सृष्टी”. तुम्ही जशी कल्पना करता तशी सृष्टी तुम्हाला दिसते. प्रश्न: महाभारतात भिष्मसारखे हुशार लोक संवेदनशील प्रश्नांवर शांत राहून दुर्योधानासारख्या व्यक्तीबरोबर राहून त्याच्या बाजूने कसे लढू शकतात? श्री श्री: मी महाभारताविषयी बोलावे असे तुम्हाला का वाटत आहे? भीष्म या बाबतीत आधीच बोललेले आहेत , त्यांना त्याबद्धल खूप उपकृत झाल्याचे वाटत होते. दुर्योधन हा एक उच्च पदस्थ होता आणि चांगले लोक या उच्च पदस्थ व्यक्तींबरोबर फसतात. हा खरा प्रश्न आहे. चांगले लोक हे वाईट पक्षात आणि वाईट व्यक्ती पक्षाध्यक्ष असलेल्या पक्षात आहेत. आणि काही चांगल्या पक्षाध्यक्ष असलेल्या पक्षात काही वाईट व्यक्ती पण आहेत. हे सर्वत्र होत आहे त्याला तुम्ही काय करणार? प्रत्येक पक्ष हा गुन्हेगार व्यक्तींना निवडणुकीसाठी उभे करीत आहे. तुम्हाला का ते माहित आहे? कारण त्यांच्याकडे एक गठ्ठा मते आहेत. या गुन्हेगारांकडे पैसा आणि बाहुबल असल्याने त्या जोरावर ते उभे राहून निवडून येतात. लोकशाहीत हा सर्व आकड्यांचा खेळ असतो. असे लोक निवडून येतात कारण चांगले लोक घरात बसून राहतात आणि मतदान करीत नाहीत. ते म्हणतात कि कशाला मतदान करायचे, सर्वजण भ्रष्टाचारी असून सर्व पक्ष हे निराशाजनक आहेत. या बाबतीत सर्वत्र उदासीनता दिसून येते आणि ते मतदान करीत नाहीत हे खरे कारण आहे. खरे तर चांगल्यालोकांनी आपले एक गठ्ठा मत तयार करायला पाहिजे मग कोणताच पक्ष गुन्हेगार किंवा भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांना उमेदवार करणार नाही. आणि मग त्यांना सेवाभावी लोक उमेदवार म्हणून उभे करावे लागतील. प्रश्न: गुरुदेव, दिल्लीतील घटनेमुळे लोकांमध्ये खूप राग आहे. त्यासाठी फाशी मागणे योग्य आहे काय? त्याभितीने अशा घटना घडायचे कमी होईल काय? श्री श्री: असे पहा कि आज अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनविल्यानंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. त्याचप्रमाणे अनेक अतिरेकी हे सुद्धा फाशीची शिक्षा सुनविल्यानंतर त्याची वाट बघत तुरुंगात खितपत पडलेले आहेत. कसाबला जरी फाशी दिले असले तरी त्याच्यावर ३१ कोटी रुपये एवढा खर्च केला आणि मग त्याला फाशी दिले. एका अतिरेक्यावर ३१ कोटी रुपये खर्च केला आहे! या ३१ कोटींमध्ये किती खेडी विकसित केली असती? किती रस्ते बनविले असते आणि किती घरात दिवे लागले असते? या साठी फक्त कायदा असून उपयोगाचे नाही तर त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे , त्यासाठी आपण सामाजिक बदल घडवून आणायला पाहिजे आणि त्यातून राज्यकर्त्यांच्या आणि कायदे बनविणाऱ्या लोकांच्या मनात बदल होऊ शकतो. प्रश्न: मी अशा एका व्यक्ती बरोबर नातेसंबंधात आहे कि जी फार मोजून मापून व्यवहार करते. त्याव्यक्तीला असे वाटते कि या नातेसंबंधामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण होईल. असा विचार करणे योग्य आहे काय? श्री श्री : कोणाला तुम्ही त्यांचे तुमच्याबाबतीतचे प्रेम सिद्ध करायला सांगू नका. तसे झाले तर मग असे विचार सुरु होतात. तुम्ही जर एखाद्याविषयी खूप प्रेम व्यक्त केले तर ते कसे परत करायचे किंवा त्याला कसा प्रतिसाद द्यायचा या बाबतीत ते संभ्रमात पडतात. असे अनेक लोक आहेत कि ज्यांना प्रेम कसे मिळवायचे हे माहित नाही तर प्रेम व्यक्त करणे हि तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो कि तुम्ही या भानगडीत पडू नका. विश्राम करा आणि आनंदी रहा, असे गृहीत धरा कि मी सर्वांवर प्रेम करतो आणि सर्वजण माझ्यावर प्रेम करतात. मग जे काही व्यक्त करायचे आहे ते अगदी सहजपणे घडून येईल. जेंव्हा कोणी असे म्हणतो कि मला बंधनाची भीती वाटते तेंव्हा खरे तर ते बंधनात आधीच अडकलेले असतात. म्हणून लोक म्हणतात ते त्याच्या अंकित मूल्यावर स्वीकारू नका. जे अस्तित्वात आहे त्याच्या पेक्षा काहीतरी दुसरे, लोक सांगत असतात. असे पहा कि जेंव्हा तुम्ही शब्दांच्या पलीकडे जाऊन लोकांना समजावून घेता तेंव्हा नातेसंबंध तयार व्हायला मदत होते. पण जेंव्हा तुम्ही फक्त शब्दात अडकता तेंव्हा ते फार वरवरच्या पातळीवर जाऊन मग नातेसंबंध तयार होणे थोडेसे अवघड होते. म्हणून नातेसंबंध हे शब्दांच्या पलीकडे आणि भावनांच्या पलीकडे गेले तरच टिकून राहू शकतात कारण शब्द आणि भावना हे नेहमी बदलत असतात. नातेसंबंध कोणत्याही प्रकारचे असोत, मग ती साधी मैत्री असो किंवा विवाह असो , भावनांच्या पलीकडे गेले तरच ते टिकू शकतात. जेंव्हा तुम्ही शब्द किंवा विचारांचा कोणताही प्रवाह आणि भावनेचा कोणताही स्तर स्वीकारू शकलात तर तुम्ही एका अशा पातळीवर पोहोचता कि मग ते नातेसंबंध टिकून राहू शकतात. प्रश्न: गुरुदेव, घटस्फोट हा आध्यात्मिक प्रगतीत अडथळा होऊ शकतो काय? लग्नानंतर मी आयुष्यात खूप वैफल्यग्रस्त झालो आहे. श्री श्री : असे पहा कि तुम्ही शतप्रतिशत प्रयत्न करा. त्यातून जर तुमचे लग्न वाचले तर चांगलेच आहे. जर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही आणि तुम्हा दोघांनाही जर अभागी वाटत असेल तर मग अशा अवस्थेत एकत्र राहणे काही बरोबर नाही. मग सामंजस्याने तुम्ही दोघांनी एकमेकांना असे सांगावे कि “ आता आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत, पण आपण एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकतो”. मी आधी जसे सांगितले तसे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून ठरवा कि तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे आहे ते. प्रश्न: असे म्हणतात कि स्वर्गात प्रेम नाही आणि ते प्रेम अनुभवण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलो आहोत.मग प्रत्येकाला स्वर्गात का जायचे असते? श्री श्री : कारण त्यांना प्रेम म्हणजे काय तेच माहित नाही. ते फक्त प्रेम या संकल्पनेच्या भोवती फिरत असतात पण प्रेमाचा अनुभव त्यांनी घेतलेला नसतो. जेंव्हा ते या दैवी प्रेमाची अनुभूती घेतील तेंव्हा ते एका विशाल संतोषाचा अनुभव घेतील. नारद भक्तीसूत्रात नारद म्हणतात “ तृप्तो भवती”, दैवी प्रेमाच्या अनुभूतीने तृप्त होऊन जा. प्रश्न: प्रिय गुरुदेव, काल तुम्ही म्हणालात कि समभावाने लढा द्या. हे कसे करावे? श्री श्री : तुम्ही फक्त त्या इराद्याने सुरवात करा म्हणजे ते व्हायला सुरवात होईल. जेंव्हा तुम्ही काही कारणासाठी लढा देत असता, द्वेषभावाने नव्हे, तेंव्हा तुमचे मन आणि मेंदू सजग राहतील. जेंव्हा लोक राग आणि द्वेषाने भांडतात, तेंव्हा त्यांचा मेंदू काम करीत नाही किंवा मग तो चुकीच्या दिशेने काम करीत असतो. प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा कोणी इमानदारीने प्रार्थना करतो, तेंव्हा आतून उत्तरे यायला सुरवात होते. पण मग त्याची कल्पनाशक्ती कोणती आणि खरे उत्तर कोणते हे कसे ओळखावे? श्री श्री : जस जसे तुम्ही यात अधिक वेळ व्यतीत कराल तसे ते तुमच्या लक्षात येईल. प्रश्न: गुरुदेव, मी नुकतीच स्पर्धात्मक एम.टेक. परीक्षा दिली. पण मग मला मनाजोगते महाविद्यालय मिळाले नाही तर काय? त्याने माझे आयुष्य बरबाद होईल.मला चांगले महाविद्यालय नाही मिळाले तरी मी आयुष्यात यशस्वी होईन काय? श्री श्री : खात्रीने! मी तुम्हाला सांगतो कि तुमचे यश हे असे आयुष्याच्या छोट्या घटनांवर अवलंबून नसते. आयुष्याच्या एखाद्या भागात जरी अपयश आले तरी आयुष्य यशस्वी होऊ शकते. प्रश्न: गुरुदेव, मी जरी नवीन विषय शिकण्यात रुची ठेवत असलो तरी माझा उत्साह हा अर्ध्यावरच संपून जातो. परिणामी मला जरी सर्व माहिती असली तरी मी कोठल्याही विषयात तरबेज नाही. मी तुमच्यासारखा सर्व विषयात तरबेज कसा होऊ? श्री श्री : न थांबता सतत प्रयत्न करीत रहा. आयुष्य हा एक प्रयत्न आणि विश्राम यांचा मिलाप आहे. दिवसातील थोडा वेळ का होईना विश्राम घेत चला- विश्राम म्हणजे ध्यान- आणि मग शत प्रतिशत प्रत्यत्न करीत रहा.गहरा आराम आणि गतिशील सक्रियता यांचा हा मिलाप होय. जर तुम्ही आराम केला नाहीत तर तुमची क्रियाशीलता हि गतिशील होणार नाही. तुमच्यात जर वैराग्य नसेल तर तुम्ही आवेशपूर्ण पण होऊ शकत नाही. म्हणजेच आयुष्य हा एक विरुद्ध गोष्टींचा मिलाप आहे वैराग्य आणि आवेशपूर्ण, आराम आणि गतिशील सक्रियता. प्रश्न: चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती, काहीजण पैसा आणि सत्ता यांच्या भोवती फिरतात. मी आता तुमच्या भोवती फिरत आहे. या फेऱ्या घालण्याचे प्रयोजन काय? श्री श्री : आता जर तुम्ही काय करीत आहात हे तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्हीच असे करण्याचे प्रयोजन सांगा. मला असे वाटते कि पृथ्वीला सूर्याबद्धल आणि चंद्राला पृथ्वी विषयी असलेले आकर्षण हे याचा हेतू असावा. प्रश्न: शिष्याने गुरू बरोबर कसे राहावे जेणे करून त्याला गुरुंचे पूर्ण ज्ञान होऊन ते सांगतील ते सर्व त्याच्या लक्षात येईल? श्री श्री : नैसर्गिक सहजतेने राहून. तुम्ही जसे तुमच्या जवळच्या व्यक्ती बरोबर जसे राहता तसेच अगदी नैसर्गिक सहजतेने गुरूबरोबर राहिले पाहिजे. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'