उलटे असलेले झाड!

10
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव, गीतेतील १५ व्या अध्यायामध्ये एका उलट्या झाडाचे वर्णन आहे. फांद्या जमिनीमध्ये आणि मुळे आकाशाकडे. याचे महत्व कृपा करून समजवाल का?

श्री श्री : तुमचे उत्त्पतीस्थान हे ईश्वरीय आहे, तुमची चेतना याचे ते प्रतीक आहे. ते तुमचे मूळ आहे. मन आणि त्याचा सगळा फाफट पसारा हे फांद्याप्रमाणे आहे. आणि जीवनातील सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लयी, निरनिराळ्या भावना, इ.इ. या पानांप्रमाणे आहेत. त्या कायम राहत नाहीत,त्या कालांतराने गळून जातात.

म्हणून जर तुम्ही पानांवर लक्ष केंद्रित केले, आणि मुळांना पाणी घालयला विसरलात, तर मग झाड तग धरून राहणार नाही.

म्हणून "अश्वत्थेनं सुविरुढमुलं असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा" (भगवद्गीता गीता, अध्याय १५, श्लोक ३) असे म्हटलेले आहे.

या वेगवेगळ्या भावना,हे जीवनाचे निरनिराळे स्वरूप हे तुम्ही नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते तसे म्हंटले आहे.

नाहीतर आपण वरपांगी रंगात इतके रंगून जातो की आपल्याला मुख्य मुळाचा विसर पडतो. या झाडाला वेळोवेळी छाटणे जरुरी आहे नाहीतर तो अस्ताव्यस्त वाढत जातो. तर ते सर्व छाटून टाका आणि तुमचे मूळ कुठेतरी वर आहे हे माहित करून घ्या.

"सुरमंदिरतरूमुलानिवासहसय्या भूतलामजीनं वासः सर्वपरीग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः" असे आदिशांकाराचार्य यांनी फार सुंदरपणे म्हंटले आहे.

ते म्हणतात,"माझी मूळ जागा ही स्वर्गात आहे,मी इथे थोड्या दिवसांकारीतच आलेलो आहे; केवळ मौजमजा करायला.आज मी केवळ आराम करण्याच्या उद्देशाने आलो आहे, परंतु ही माझी आदिम जागा नाही, ती दुसरीकडे कुठेतरी आहे". माझे घर दुसरीकडे कुठेतरी आहे,मी इथे केवळ भेट देण्याकरिता आलो आहे- हा केवळ विचार तुमच्यामध्ये अंतर निर्माण करते.

हे जग एक प्रतीक्षालय आहे.

तुम्हाला माहिती आहे विमानतळ आणि रेल्वेस्थानक यावर अशी प्रतीक्षालये असतात, आणि प्रतीक्षालयामध्ये तुम्ही काय करता?

तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि खायला बसता. तुम्ही तिथले स्नानगृह आणि बाकीचे वापरता, परंतु तुम्ही तुमचे सामान उघडत नाही आणि सगळीकडे तुमचे कपडे लटकवून ठेवायला सुरुवात करीत नाही. असे तुम्ही प्रतीक्षालयात करीत नाही. तुम्ही तुमचे सामान बांधलेलेच ठेवता.

त्याचप्रमाणे हे जग एक प्रतीक्षालय आहे. याला आपले घर समजायची चूक करू नका.

प्रश्न : माझ्या मुलाला पाच वर्षांपूर्वी द्वीध्रुवीय असल्याचे निदान झाले. तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी प्रत्येक क्षणाला त्याचे दुःख अनुभवते आहे. ह्या आधी मी अतिशय आनंदी महिला होते परंतु आता मी १५० मिलीग्राम निराशा-निवारक गोळ्यांवर आहे. आता, मला तुम्ही खात्रीपूर्वक सांगा की टोकाची निराशा यासारखा आजार किंवा असाध्य दुर्धर व्याधी ग्रस्त करणार नाहीत.

श्री श्री : होय, मी तुमच्या वेदना समजू शकतो.

कित्येक वेळा थोडीशी निराशा येते आणि तेव्हा व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर औषध दिले जाते आणि त्याने अवस्था वाईट होते. मी असे होताना पहिले आहे.

छोटीशी निराशा ही टोकाच्या निराशेमध्ये बदलते आणि मग ते अशा व्यक्तींना 'लीथीयम' सारख्या औषधावर ठेवतात. या मुद्द्यावर संपूर्ण वैद्यक पेशामध्ये इतका प्रचंड गोंधळ आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य इतके महत्वाचे असते.

इथे असलेल्या सगळ्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या मित्रांच्या मुलांना आर्ट एक्ष्सेल (Art Excel) , येस(YES) आणि येस+ (YES+) या कार्यक्रमांमध्ये घालावे. कसेही करून त्यांना प्राणायाम आणि ध्यान करायला लावा.

हे कसे होते ते तुम्हाला माहिती आहे? सर्वात आधी मनामध्ये थोडा तणाव असतो, आणि मग तो मोठा व्हायला लागतो आणि तो मोठा होतच जातो आणि मग तो इतका मोठा होतो की तो मेंदूमधील सर्व महत्वाच्या जोडण्या उडवून टाकतो. अशाप्रकारे सर्व सुरु होते.

आपण याची काळजी फार आधीच्या टप्प्यावर घेणे जरुरी आहे. आजार रोखणे हे आजारावरच्या इलाजापेक्षा कधीही चांगले. आणि हे रोखण्याकरिता तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या आतील नकारात्मकता आणि नकारात्मक भावना यांना योग्य पद्धतीने हाताळावयास शिकवायला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुदेव, अष्टलक्ष्मी पैकी विजयलक्ष्मी एक आहे. तुम्ही म्हणालात की आपल्याला विजयलक्ष्मी ची गरज आहे. काहीही जिंकण्याची किंवा कशातही यशस्वी होण्याची ती उर्जा आहे. याबाबत कृपा करून अधिक विवरण कराल का?

श्री श्री : मला वाटते की मी आठ लक्ष्मींबद्दल बरेच बोललो. ज्ञानी लोक कशाचेही जास्त विवरण देत नाहीत.ते सार कळण्याकरिता केवळ काही खुण, संकेत देतात.

असे म्हणतात, 'अल्पाक्षरं असंधीग्धं सर-वत विश्वतो-मुखं.'

अल्पाक्षरं चा अर्थ आहे केवळ थोडे शब्द.

सूत्रे ही अशीच आहेत, त्यात सार आहे आणि ती बहुमितीय आहेत. त्यात अनेक मिती आहेत. आणि ज्ञानी लोकसुद्धा असाच संवाद साधतात,केवळ अल्प शब्दांनी.

जे कमी ज्ञानी आहेत तेच फक्त उगाचच मोठेच्या मोठे लांबलचक स्पष्टीकरण देतात.

तुम्ही वाचता त्या पुस्तकातदेखील हेच असते, पाना मागून पाने लांबण लावणे चालू असते. मी तुम्हाला सांगतो की त्यांना केवळ एकाच ओळ लिहायला पाहिजे. इतकेच बस्स आहे! 

सगळ्या प्राचीन ऋषींनी हेच तर सांगितले आहे.

'हेयं दुःखं अनागतं', एवढेच आणि संपले.

'तदा द्रस्तुः स्वरूपे वास्थानां', झाले!

प्रश्न : गुरुदेव, प्रेमावस्थेत असणे हे साक्षात्कारापेक्षाही महान आहे का?

श्री श्री : वरचे आणि खालचे हे सर्व आधीच विरून जाते.

वरची पातळी आणि खालची पातळी असे काही नसते, ती शिडी कधीच अदृश्य होऊन जाते. अशी कल्पना करा की तुम्ही अंतराळात, विश्वामध्ये आहात. तिथे वर कुठे आणि खाली कुठे? पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? तिथे काहीच नाही. काही वरचे आणि खालचे नाही.

प्रश्न : तुमच्याकडून इतक्या ज्ञानाची प्राप्ती करूनसुद्धा मी ते पूर्णपणे जगू शकत नाही?

श्री श्री : तुम्ही ते ज्ञान थोडेफार जरी जगलात तरीदेखील मी आनंदी होईन. इतके करणेसुद्धा बस्स आहे. तुम्ही इंच इंचांनी पुढे व्हाल.

प्रश्न : गुरुदेव, घरात पिंपळाचे (बोधी वृक्ष) असणे शुभ आहे का?

श्री श्री : होय,ते अतिशय चांगले आणि फारच शुभ आहे. तुमच्या घरासमोर बोधी वृक्ष असणे म्हणजे देव स्वतः तिथे उभा आहे असे झाले.

म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 'झाडांमध्ये, मी अश्वत्थ (पिंपळाचे झाड किंवा बोधी वृक्ष)आहे'.

बोधी वृक्ष इतका महत्वाचा आहे कारण तो दिवसाचे २४ तास केवळ प्राणवायूच देतो. म्हणून हे झाड घरासमोर असणे अतिशय चांगले आहे.

काही लोक असे आहेत जे म्हणतात की घरासमोर चिंचेचे झाड असणे चांगले नाही. त्यामुळे कोणत्याप्रकारच्या लहरी निर्माण होतात, मला ते माहित नाही परंतु असे म्हंटले जाते.

आता जर तुमच्या घरासमोर चिंचेचे झाड असेल तर मी तर म्हणेन की ते तोडायला जाऊ नका, फक्त त्याच्या आजूबाजूला दुसरी झाडे लावा.

प्रश्न : गुरुदेव, भावना कुठून उगम पावतात? त्या शरीर आहेत का मन?

श्री श्री : भावना मनात असतात, परंतु त्यांच्याशी सलग्न संप्रेरक (हार्मोन) किंवा संवेदना शरीरात असतात. म्हणून ते दोहोंचे मिश्रण आहे.

जेव्हा एड्रनलीन ग्रंथी वेगाने काम करीत असते तेव्हा तुम्ही भीती आणि चलबिचल अनुभवता. तशा भावना वेगाने वाढू लागतात.

तर वेगवेगळी संप्रेरके अथवा ग्रंथी आपल्या भावनांवर वेगळे परिणाम करतात. तर हे पण नाही आणि तेसुद्धा नाही,तर सगळे एकत्र.

प्रश्न : गुरुदेव, एका साधकासाठी चांगल्या संगतीचे काय महत्व आहे? आणि अशी चांगली संगत उपलब्ध नसेल तर एखाद्याने काय करावे?

श्री श्री : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सामर्थ्यवान आहात आणि तुम्ही तुमचा प्रभाव तुमच्या संगतीवर पाडू शकता तर त्यांच्यात बदल घडवून आणा. त्यांना तुमच्यासारखे बनवा. परंतु तुमच्यात तेवढी ताकद नसेल तर मग वाईट संगतीपासून दूर राहा. ते करण्याकरिता तुम्ही मोकळे आहात.