06
2013
Feb
|
बंगलोर, भारत
|
प्रश्न: कृपा करून काही खाण्याच्या आधी देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याचे महत्व आम्हाला सांगा. कृपा करून नैवेद्य दाखवण्याची खात्रीलायक पद्धतसुद्धा आम्हाला सांगा. कोणत्या मंत्राची आवश्यकता असते काय?
श्री श्री : भारतात वैश्व देव नावाची परंपरा आहे. जेव्हा घरातील महिला अन्न शिजवते तेव्हा सर्वात प्रथम ती एक घासभर भात किंवा डाळ घेते आणि बाहेर अंगणात ठेवते पक्षी, मुंग्या आणि पशु यांच्या करिता. वातावरणाचा बहुमान करणे हे या मागचे महत्व आहे. आणि अनेक लोक जेवताना ताटाच्या बाहेर अन्नाचे काही कण ठेवतात आणि नंतर ते पशु-पक्षी यांना देऊ करतात. पक्षी हे विश्वाचा एक अविभाज्य घटक आहेत. म्हणून आपल्याला पक्षांची निगा राखली पाहिजे; आपल्याला मुंग्यांची काळजी घेतली पाहिजे;आपल्याला प्रत्येक प्राणीमात्राची निगा राखली पाहिजे. या विश्वातील एक जरी जीव कमी झाला तर हे विश्व टिकून राहू शकणार नाही. जे अन्न मिळाले त्याचा तुम्ही भेट म्हणून; आशीर्वाद म्हणून स्वीकार करा हाच प्रसादाचा अर्थ आहे. प्रसाद म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद होय. अन्न हे आशीर्वाद आहे, जीवन हे एक आशीर्वाद आहे, समय हा आशीर्वाद आहे, आपले श्वसन हा एक आशीर्वाद आहे. या सगळ्या भेट मिळालेल्या आहेत. प्रश्न : भारतीय पुराण कथांनी प्रत्येक शक्तीला मूर्त रूप का दिले आहे? सर्व पुराण कथा खऱ्या आहेत का? जर ऋषी मुनी हे साक्षात्कारी होते तर ते आपले नियंत्रण हरवून शाप कसे काय देऊ शकत होते? श्री श्री : संपूर्ण हे नाम आणि रूप यांनी युक्त आहे. ज्याक्षणी तुम्ही नाम देऊ करता त्याक्षणी त्या नामासोबत रूप हे सुद्धा येतेच.आणि यातील अनेक रूपे ही तरल पातळीवर ओळखल्या गेली होती. म्हणून ते तरल परिमंडळात अजूनसुद्धा आहेत. आता, ऋषी (साक्षात्कारी पुरुष) क्रोधीत होऊन शाप का देत होते, ते मला माहित नाही. सामान्यतः प्रत्येक ऋषी असे करीत नसे. थोडेफारच असे होते जे असे करायचे. परंतु दरवेळेस जेव्हा जेव्हा त्यांनी शाप दिला त्या प्रत्येक वेळेस त्यांच्या शापातून काही तरी महान घडले. म्हणूनच असे म्हणतात की साक्षात्कारी मनुष्याच्या क्रोधामुळेसुद्धा समाजाचे नेहमी भलेच झाले आहे आणि अज्ञानी मनुष्याच्या प्रेमामुळेसुद्धा नुकसान होते. एका ज्ञानी माणसाचा क्रोधसुद्धा फायदेशीर असतो. तो कोणाचे नुकसान करू शकत नाही,तो समजाचे भलेच करतो. म्हणून जेव्हा जेव्हा ऋषींनी प्रत्येक वेळा शाप दिला तेव्हा तेव्हा तो मनुष्यजातीकरिता एक मोठे वरदानच ठरला. प्रश्न : मला वाटते की स्वातंत्र्य हे अतिशय सापेक्ष आहे. कित्येकवेळेस माझे स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला परस्परविरोधी आहे. 'संपूर्ण स्वातंत्र्य' असे काही अस्तित्वात आहे का? का तसे असणे म्हणजे निव्वळ अराजकता होय? श्री श्री : बंधन आणि स्वतंत्रता हे केवळ मनात असते, आणि जेव्हा तुमचा दृष्टीकोन संकुचित असतो तेव्हा तुम्हाल अनेक प्रकारची बंधने जाणवू लागतात. जस जसा तुमचा दृष्टीकोन रुंदावत जाऊ लागतो, तुमच्या लक्षात येऊ लागते की केवळ स्वतंत्रताच आहे. प्रश्न : बंधने आणि गुंतागुंत यांच्यापासून दूर राहण्याचा सर्वात सोप्पा मार्ग कोणता? श्री श्री : केंद्रित व्हा. हे लक्षात ठेवा की हे केवळ एक स्वप्न आहे आणि सगळे काही नष्ट होणार आहे. सगळे नाश पावणार आहेत, आणि एक दिवशी सगळे काही संपणार आहे. मागे वळून भूतकाळाकडे पहा आणि बघा,तुम्ही या ग्रहावर गेली ३० ते ५० वर्षे घालवली आहेत, त्या सगळ्या घटनांना काय झाले? सगळे गेले आहे, हो ना! चला जागे व्हा! प्रश्न : गुरुदेव, निवडीकडून सुरु करून निवडीच्या पलीकडे कसे जावे? श्री श्री : चांगले आणि वाईट यात निवड होऊ शकत नाही. निवड ही नेहमी वाईट आणि अति वाईट; किंवा चांगले आणि अतिशय चांगले यातच होऊ शकते. जर तुम्ही हे लक्षात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की निवड करायला काही नाही. प्रश्न : कित्येक वेळा माझे तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे मला त्रास होतो जेव्हा माझी तुमच्याबरोबर भेट होत नाही. माझे मन म्हणते की तुम्ही सर्वव्यापी आहात, परंतु माझ्या हृदयाला हे पटत नाही. मी काय करू? श्री श्री : निश्चिंत राहा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. या जगात भरपूर सेवेची आवश्यकता आहे, तर मग चला कामाला लागा. अभिलाषेचे रुपांतर सृजनात करा.अभिलाषा तुमच्यातील सृजनता आणि जोश यांना अभिव्यक्त करण्याचे एक अभिकर्ता अथवा एक उत्प्रेरक बनू शकते. तर त्याचा असा उपयोग करा. प्रश्न : गुरुदेव, तुम्ही मला ओळखता का आणि मी काय करतो आहे हे तुम्हाला माहिती असते का असे मला कुतूहल वाटते? श्री श्री : तुम्हाला काय वाटते? तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट मला माहित का असावी? मला माहित असण्याची काही गरज नाही. प्रश्न : प्रशासनाची योग्य पद्धत कोणती? अध्यात्मिक पद्धतीच्या प्रशासनासाठी ही वेळ योग्य आहे, हो ना? श्री श्री : होय, भांडवलवाद, साम्यवाद, धर्मनिरपेक्षतावाद, हे सर्व वाद एकदम बेकार आहेत, खरे पाहता हे सर्व मनावतावादाशिवाय निष्फळ आहेत. मानवतेचे आवाहन कसे करता येईल? तर अध्यात्माद्वारा. प्रश्न : गुरदेव, आपल्या शरीरात हृदय हे डावीकडे असते. याला काही अध्यात्मिक कारण आहे का? श्री श्री : खरे तर अश्या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत. नाकपुडीला दोन छिद्रे का आहेत. एकाच जागी दोन डोळे का जेव्हा की एक डोळा पुढे आणि एक मागे ठेवता आला असता. आता हृदय डाव्या बाजूला का आहे यावर कोण काय बोलणार. कुठेतरी काहीतरी असणे जरुरी होते. मला तर वाटते की तुम्हाला विचारायला काही चांगला प्रश्न नव्हता. मला वाटते की तुम्हाला जीवनात अनेक गोष्टींचे कुतूहल वाटते.आपण करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. जगाला तुमच्याकडून अधिक लक्ष आणि जास्तीजास्त सेवा आवश्यक आहे. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'