हि तुमच्या आयुष्यातील शेवटची कृती असेल काय?

24
2013
Jan
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, असे म्हणतात कि आयुष्याच्या शेवटच्या घटकेला नारायणाचे ( भगवान विष्णू) नामस्मरण केल्याने मुक्ती लाभते. हे खरे आहे काय कि आयुष्याच्या शेवटच्या घटिका हि पुढील मार्गक्रमणासाठी सर्वात महत्वाची असते?

श्री श्री : होय, हे खरे आहे. मृत्यूच्या वेळी मन हे शरीरापासून वेगळे होते.म्हणून त्यावेळी मनात असणाऱ्या गोष्टी हे पुढील जन्माचे कारण होतात. हे शास्त्रीय सत्य आहे.

हे तुम्ही स्वतः पण अनुभवू शकता. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर असे लक्षात येईल कि रात्री झोपताना मनात असलेला शेवटचा विचार हाच सकाळी उठल्यावर मनात येणारा पहिला विचार असतो.

हल्ली मनात इतके विचार चालू असतात कि मृत्यूच्यावेळी देवाचे नामस्मरण करणे तुमच्या लक्षात राहणे अवघड आहे. म्हणून पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे कि सतत देवाचे नामस्मरण करीत रहा. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करा, आंघोळ करताना, अगदी जेवणाच्या आधी सुद्धा देवाचे स्मरण करून जेवणासाठी अन्न दिल्याबद्धल त्याचे आभार माना.

कोणतीही नवीन गोष्ट सुरु करण्याआधी ती शुभप्रद होण्यासाठी देवाचे स्मरण करा.

आपले पूर्वज हे खूप बुद्धिमान होते म्हणून त्यांनी हि प्रथा सुरु केली.

म्हणून कोणी नवीन दुकान सुरु करताना आधी देवाचे नाव घेतो आणि मग ते दुकान सुरु करतात.जेंव्हा कोणी काही नवीन गोष्ट विकत घेतो तेंव्हा देवाचे स्मरण करून त्याचा वापर सुरु करतात.

आपण या सर्व गोष्टी करीत असतो, होय कि नाही? आजपण आपण या सर्व गोष्टी करीत असतो.

जेंव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेंव्हा तुम्ही देवाचे स्मरण करून परीक्षेतील प्रश्न सोपे असण्याची आणि तुम्हाला सहजतेने त्याची उत्तरे लिहिता यावीत अशी प्रार्थना करता.

सर्वजण प्रार्थना करतात, मग ती लहान मुले असोत, प्रौढ असोत किंवा वयस्कर लोक असोत. पण ते तसे भीतीपोटी करतात. मी तर असे म्हणेन कि ती प्रार्थना भीतीपोटी न करता प्रेमापोटी किंवा खूप खोलवर असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेपोटी असावी.

तुमची प्रार्थना जेंव्हा प्रेम आणि श्रद्धेपोटी असते तेंव्हाच ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते.

कोणतेही नवीन काम सुरु करण्याच्या आधी देवाचे नाव घेणे हे एवढे अवघड आहे काय? तुम्ही भजन करून तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही पद्धतीने देवाचे नाव घेऊ शकता. तुम्ही नारायण म्हणू शकता, जय गुरुदेव किनवा अगदी ओम् नमः शिवाय पण म्हणू शकता. तुम्हाला आवडते ते नाव घेऊ शकता. नाहीतरी तुम्ही आंघोळ करताना किंवा अगदी जेवताना सुद्धा तुम्हाला हवी ती गाणी म्हणत असताच कि “डफलीवाले डफली बजा”. आता डफलीवाला डफली नाहीतर अजून काय वाजवणार ? हे काय गाणे झाले?

हल्ली मला वेळ मिळत नसल्यामुळे मला हल्लीची गाणी काही फारशी माहित नाहीत. पण मला खात्री आहे कि हल्लीच्या काळी पण अशी अर्थहीन गाणी तयार झाली असतील.

“कोलावेरी डे” असे शब्द असलेले एक गाणे हल्ली फार प्रसिद्ध झाले आहे.अनेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीये. तमिळ भाषेत “कोलावेरी डे “ चा अर्थ असा आहे “मला कोणालातरी मारून टाकावे असे वाटत आहे”.

आता तुम्हाला कोणाला तरी मारून टाकावे असे वाटते आहे हे काही चांगले गाणे आहे काय? म्हणून मी म्हणतो कि तुम्ही नाम स्मरण करा. ओम् नमः शिवाय किंवा ओंकार चा जप करा. ज्या मुळे तुमची भक्ती जागृत होईल असा कोणताही जप करा.

आता मी कोणत्याही गाण्याला कमी लेखत नाहीये. आता तुम्हाला जर कोलावेरी डे म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. पण अशी आकर्षक धून जर सारखी तुमच्या मनात घोळत राहिली तर त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो.

एका अर्थाने हे बरे आहे कि अनेक लोकांना या गाण्याचा अर्थ समजत नाही. त्यांना जर तो समजत असेल आणि त्यांनी जर अर्थ लक्षात घेऊन ते म्हटले तर फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते गाणे एक दुसऱ्या भाषेतील आहे, ते तमिळमध्ये आहे.

तुम्हाला जेंव्हा भजनाचा अर्थ माहित असतो आणि जेंव्हा तुम्ही ते कृतज्ञता आणि भक्तीने म्हणता तेंव्हा त्याचा तुमच्या आयुष्यावर फार खोलवर परिणाम होतो.

प्रत्येक शब्दाची स्वतःची काही कंपने असतात आणि जेंव्हा आपण चांगले शब्द उच्चारतो तेंव्हा त्यातून निघणाऱ्या कंपनामध्ये तुमचे मन आणि आयुष्य शुद्ध करण्याची शक्ती असते.

जप करून आणि सकारात्मक बोलण्याने मन आणि शरीर दोन्ही सक्रीय होतात. म्हणून नेहमी नाम स्मरण करावे असे म्हणतात.

दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी नाम स्मरण करावे. मी या आधी म्हटल्याप्रमाणे दिवसातले प्रथम जेवण घेण्याआधी देवाचे नाव घेऊन स्मरण करावे.

जेवण सुरु करण्याच्या अगोदर “अन्नदाता सुखी भव” हा मंत्र म्हणावा. याचा अर्थ असा कि आम्हाला जो हे अन्न देतो तो सुखी आणि आनंदी व्हावा. हा आशीर्वाद अगदी मनापासून द्या.

हा मंत्र म्हटल्याने घरातील स्त्री जी तुम्हाला अन्न शिजवून वाढते ती सुखी आणि आनंदी व्हावी. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत जो धान्य पोहोचवितो तो व्यापारी आणि शेवटी जो ते धान्य पिकवितो तो शेतकरी या सर्वांना तो आशीर्वाद पोहोचतो. हा मंत्र म्हणून तुम्ही त्याला पण आशीर्वाद देत असता. हि एक इतकी चांगली गोष्ट आहे!

त्याच प्रमाणे सकाळी उठल्यानंतर “ओम् नमो नारायणाय” किंवा “ओम् नमः शिवाय” म्हणा.

जेंव्हा काही वाईट गोष्ट होईल तेंव्हा “हे राम” म्हणा.

जेंव्हा कोणी मरण पावेल तेंव्हा “राम नाम सत्य आहे” असे म्हणा.

देवाचे नाव लक्षात ठेवण्यामध्ये काय परिश्रम आहेत? काहीच परिश्रम नाही.

तुम्ही जेंव्हा मोटारीत बसता तेंव्हा “ओम् नमो नारायणाय” असे म्हणा आणि मग मोटारीत बसा. त्याच प्रमाणे मोटारीतून खाली उतरताना नाम स्मरण करा आणि मग खाली उतरा.

अशापद्धतीने तुम्हाला नाम स्मरणाची सवय लागेल, होय कि नाही? म्हणून तुमच्या शेवटच्या क्षणाला , मृत्यूच्या वेळेस,प्राण शरीर सोडून जाताना मग सहजच तुम्ही नाम स्मरण करू लागाल आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

प्रश्न: गुरुदेव, मी आता पर्यंत किती आध्यात्मिक प्रगती केली आहे हे मी जाणून घेऊ इच्छितो. मी हल्ली तुमच्या गाडीच्या मागे पळणे सोडून दिले आहे. त्याचा अर्थ असा कि माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे कि माझी तुमच्यावरील श्रद्धा कमी झाली आहे?

श्री श्री : खरेतर ते तुम्हीच सांगू शकता.

एकदा का तुम्ही या मार्गावर चालायला सुरवात केली तर तुमची प्रगती निश्चित आहे. तुम्ही नेहमी पुढेच जात राहणार.

तुम्ही माझ्या गाडीच्या मागे पळता कि नाही यावर तुमची प्रगती मोजू नका.तसे कधीही करू नका. तुम्ही किती केंद्रित झाला हे मोजणे जरुरीचे आहे. तुम्ही जेवढे जास्ती केंद्रित व्हाल तेवढी जास्त प्रगती होय.

तुम्ही जेथे असाल तेथे असून स्तःब्ध व्हा. तुमचे मन आत्म-केंद्रित करा.

तुमच्यात भक्तीची कमतरता नाही हे ध्यानात घ्या. तुम्ही पुरेशी भक्ती करीत नाही असा विचारसुद्धा मनात आणू नका. काही वेळा भक्ती हि लपली जाते पण काही वेळाने ती परत वरती येते.

भावना ह्या नेहमी एकसारख्या नसतात. तुमच्यातील जोश हा पण कायम एकसारखा नसतो. त्यात नेहमी चढ उतार होत असतात.

भावना ह्या दगडासारख्या नसून त्या पाण्याप्रमाणे असतात.पाण्यावर जश्या लाटा उठतात तशाच भावना असतात. त्या वरती उठतात आणि मग शांत होतात काहीवेळाने परत वरती उठतात. हे अगदी नैसर्गिक आहे.म्हणून प्रेम आणि लालसा हे नेहमी बरोबर असतात. काहीवेळा तुम्ही तीव्र स्वरुपाची लालसा अनुभवता तर काही वेळा अमर्यादित प्रेम अनुभवता आणि मग परत लालसा अनुभवाला येते आणि मग अमर्यादित प्रेम. हे असे सारखे होत राहते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, तुम्ही मागे तीन प्रकारच्या भक्ताबद्धल बोलला होतात. मग गुरूंमध्येपण अनेक प्रकार असतात काय?

श्री श्री : होय, निश्चितच!

इतिहासात अशी अनेक प्रकारचे गुरू सापडतात. खरे पाहता त्यातील प्रत्येकजण अद्वितीय आणि वेगळा असे ते होते. काही लोकांकडे राजसिक गुण जास्त होते तर कोणाकडे तामसिक तर काहीजण सात्विक होते.

काही दिवसांपूर्वी मी सुमारे ८० च्या दशकात घडलेल्या एका गोष्टीबद्धल असे सांगत होतो कि मी सुमारे २३ किंवा २४ वर्षांचा असताना दिल्ली शहराबाहेरील एक संतांकडे गेलो होतो. ते संत मला असे म्हणले होते कि ‘ सोने जर २४ कॅरट असेल तर तुम्ही त्यापासून दागिने बनवू शकत नाही. मग त्यापासून दागिने बनवायचे असतील तर त्यात तांबे किंवा तत्सम धातूचे मिश्रण करावे लागते.’

पुढे ते असे म्हणाले कि “ तुमच्यात पण असे काही मिश्रण करावे लागेल. तुम्ही सोन्यासारखे २४ कॅरट असता कामा नये, नाहीतर तुम्ही कोणाच्या कामाचे नाही”.

मी त्यांना असे म्हणालो कि “ नाही बाबा, मला २४ कॅरट असे देत. जे काही व्हायचे असेल ते होईल” ते म्हणाले “ तुम्ही फार लवकर प्रसिद्ध होऊ शकता. तुम्ही तंत्रा बद्धल काही शिक्षण का घेत नाही. आत्म्याबद्धल काही शिका, त्यामुळे तुम्ही काही आत्म्यांवर ताबा मिळवून काही जादू करून दाखवू शकाल.” मी त्यांना म्हणालो कि “ मला त्या कशाची गरज वाटत नाही.” मला माहित आहे कि ते या मार्गावरील प्रगतीसाठी उपयोगाचे नाही.

म्हणून असेपण काही लोक असतात कि जे काही चमत्कार करून दाखवतात पण ते फार काळ टिकत नाहीत. त्याचे मग असे होते कि ज्या आत्म्यांकडून तुम्ही कामे करून घेत असता ते तुमची पिळवणूक करायला लागतात. या सर्व गोष्टी फार अल्पकाळ टिकतात आणि त्या काही आयुष्यभर पुरत नाहीत.

आणि म्हणून शुद्ध सात्विक ज्ञान, सर्वसमावेशक ज्ञान हे चांगले असते आणि ते सर्वकाळ टिकणारे असते. त्यात तमो गुण किंवा रजो गुण नसतात. त्यांचा परिणाम हा कायमचा असतो आणि तुम्हाला ते शिखरावर घेऊन जायला मदत करते, अगदी सर्वोच्च शिखरावर.

ते संत काही वाईट संत नव्हते तर ते एक चांगले संत होते. ते एक चांगला माणूस होते. त्यासुमारास त्यांचे वय ७० च्या आसपास असावे आणि त्यांनी मला तशी सूचना केली होती. पण मी जेंव्हा नाही म्हणालो तेंव्हा त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर करून म्हणाले कि “हे चांगले आहे”.

कदाचित मी कोणत्या मोहाला बळी पडतोय कि काय याची ते परीक्षा घेत असावेत.

प्रश्न: जेंव्हा आपण कोणालाही पहिल्यांदा भेटतो तेंव्हा साहजिकपणे त्या व्यक्ती बद्धल काही मत आणि निर्णय तयार होतात. काही कारण नसताना काही लोक पहिल्या भेटीपासून आवडायला लागतात तर काही लोक आवडेनासे होतात. गुरुदेव, हे असे का होते?

श्री श्री : हे सर्व असेच असते. हे सर्व जग कंपनांवर चालते आणि आपण पण कंपनांवर चालतो. काही लोकांची कंपने हि सुखदाई असतात आणि तुम्ही त्यांना सहजपणे प्रतिसाद देता. बाकीच्या लोकांची कंपने हि प्रतिकारक असतात.

जेंव्हा तुम्ही केंद्रित असता , तेंव्हा तुम्हाला असे कोणीही भेटणार नाही कि ज्यांच्याबद्धल तुम्ही प्रतिकारक कंपने जाणवू शकाल आणि मग तुम्हाला तुमच्या केंद्रापासून कोणीही हलवू शकणार नाही. हि खरी इच्छित अवस्था होय कि ज्यात लालसा नसते कि घृणा नसते, प्रतिकर्षण नसते कि मजबुरी नसते किंवा आकर्षण पण नसते. अशावेळी सर्व गोष्टी ह्या चित्ताकर्षक असतात. अशा वेळी सर्वजण आणि सर्व गोष्टी याचे तुमच्याशी सामंजस्य असते. तोच खरा अंतरीचा आनंद जो तुम्हाला व्यापून राहतो.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही म्हणालात कि झोपेबद्धलचे ज्ञान हे मुक्ती देते. याचा अर्थ काय?

श्री श्री : झोप आणि स्वप्ने याबद्धलचे ज्ञान तुम्ही एकप्रकारच्या समाधीचा अनुभव देऊ शकते. योग सूत्र मध्ये ऋषी पतंजली यांनी सांगितलेली हि एक पद्धत आहे. या सूत्रात महर्षी असे म्हणतात कि “स्वप्ननिद्राज्ञानलम्बनाम वा”. वेगवगळ्या प्रकारच्या समाधीचे वर्णन करताना ते या समाधी अवस्थेबद्धल सांगतात.

झोप मनावर ताबा कशी मिळविते याचे जर तुम्हाला ज्ञान असेल तर, जागेपणा आणि झोप या दोन्हीच्या मध्ये पूर्ण शांततेचा एक क्षण असतो. मी शांततेचा क्षण असे म्हणतोय कारण कि शांतता हि एक सक्रीय आणि जिवंत गोष्ट आहे. त्यांना असे म्हणायचे आहे.

म्हणून तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर, झोप लागायच्या आधी, किंवा तुम्ही जागे झाल्यावर, तुम्ही काहीसे झोपलेले आणि काहीसे जागृत अशा अवस्थेत, काहीसी शांतता असते, चेतनेचा असा काही गुण असतो कि जो फार सुंदर, सुखदायक, आल्हाददायक असा असतो. या अवस्थेला त्यांनी समाधी असा शब्द वापरला आहे.

प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा लालसा हि खूप तीव्र होते तेंव्हा त्याचा शेवट राग येण्यात किंवा निराशा येण्यात होते. हे कसे हाताळावे?

श्री श्री : जेंव्हा लालसा उत्पन्न होते तेंव्हा ती व्यवस्थितपणे हाताळावी लागते, तेंव्हा खोलवर ध्यानात जायची गरज असते. किंवा मग त्याला रचनात्मक वळण द्यावे, एखादी कविता, लेख लिहा. लेखनाची पण मदत होते. तुम्हाला माहित आहे काय अनेक महान कलाकृती मग ते चित्र असो, संगीत असो, नाटक किंवा साहित्य असो ते खोलवर अशा लालसेतून जन्माला आले आहे.

म्हणून जेंव्हा लालसा उत्पन्न होईल तेंव्हा तिला एक चांगले रचनात्मक वळण द्या किंवा मग व्यवस्थित हाताळून खोलवर ध्यानात जा.

प्रश्न: गुरुदेव, असे म्हणतात कि सत्तेमुळे भ्रष्टाचार वाढतो. सत्ता कशी हाताळावी यावर तुम्ही काही बोलाल काय?

श्री श्री : जेंव्हा तुमचे प्रयोजन चांगले नसते तेंव्हा सत्तेमुळे भ्रष्टाचार वाढतो. जेंव्हा तुमचे प्रयोजन चांगले नसते तेंव्हा तुम्ही गैर मार्गाने सत्ता मिळवायचा प्रयत्न करता.

काही लोक असे म्हणतात कि सत्ता म्हणजे विष आहे. तुम्ही जेंव्हा सत्ता वैयक्तिक कारणासाठी वापरता तेंव्हा असे होऊ शकते. पण जेंव्हा सत्ता हे सेवेसाठी वापरली जाते तेंव्हा ते एक साधन असते. जेंव्हा लोकांची सेवा करायची असे तुमचे उदिष्ट असते तेंव्हा सत्ता हे फक्त एक साधन असते.

प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा सर्व काही सुरळीत चालू असते तेंव्हा कृतज्ञ सोपे असते. पण विपरीत परिस्थितीत पण कृतज्ञ राहून तुमच्यावर कृपा-दृष्टी आहे हे भान कसे ठेवावे?

श्री श्री : भूतकाळातील कठीण काळ पण कसा सुकर झाला ते आठवा. त्या कठीण परिस्थितीतून पण तुम्ही सुखरूपपणे बाहेर पडलात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्यात एक स्थिर स्वरुपाची आस्था निर्माण होईल.

प्रश्न: गुरुदेव, तंत्रज्ञानामुळे सुविधा वाढतात, त्याचप्रमाणे प्रदूषण पण वाढते. तर मग विकासाची कसोटी काय असावी, सुविधा कि प्रदूषण?

श्री श्री : तंत्रज्ञान हे नेहमी वातावरणाच्या विरोधी असायला पाहिजे असे नसते.

आजच्या काळात तंत्रज्ञान हे जास्तीत जास्त वातावरणाशी अनुकूल असे व्हायला लागले आहे. म्हणून मग आपण नवीन तंत्रज्ञान वापरूनसुद्धा वातावरणाची काळजी घेऊ शकतो, पण वातावरण हे महत्वाचे आहे, खुपच महत्वाचे आहे.

प्रश्न: गुरुदेव, नाते संबंधांमध्ये गृहीत धरले जाऊ नये यासाठी काय करावे?

श्री श्री : त्याची फार काळजी करू नका, ते अगदी साहजिक आहे.

लोकांना तुम्ही त्यांचेच आहात असे वाटत असते म्हणून ते तुम्हाला गृहीत धरतात आणि मग ते मग फक्त पाहुण्या लोकांची काळजी घेतात.

जेंव्हा तुम्ही कुटुंबाचा एक भाग असता तेंव्हा तुम्हाला कोणी कशाला विचारायला पाहिजे कि ‘तुम्ही कॉफी घेतलीत का? तुम्ही आता जेवणार आहात काय?’ सर्वसाधारण पणे असे कोणी करीत नाही.

जर कोणी असे प्रश्न विचारायला लागला तरी तुम्हाला शंका येईल.’ माझ्याकडे आज इतके लक्ष का देतायत? नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे.’ तुम्ही मग संदेह घ्यायला लागता.

एकदा एक सद्गृहस्थ मला सांगत होते कि’ गुरुदेव, मी जेंव्हा माझ्या बायकोशी जरा चांगले वागायला लागतो तेंव्हा ती शंका घ्यायला लागते. तिला वाटते कि काहीतरी गडबड आहे आणि मग ती मला विचारते ‘ काय भानगड आहे? तुम्ही काही तरी घोटाळा केलेला दिसतोय. तुम्ही प्रामाणिक दिसत नाहीत!’ मी जेंव्हा सर्वसाधारण वागतो तेंव्हा तिला असे वाटते कि मी तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. गुरुदेव मी काय करावे?’

म्हणून जेंव्हा एखाद्याला शंका घ्यायची असते तेंव्हा ते असेही शंका घेताच असतात.

ते म्हणाले ‘ हे खूप अवघड आहे. मी जेंव्हा अर्धा तास उशिराने घरी पोहोचतो तेंव्हा तर ती चौकशा सुरु करते ‘ तुम्ही कोठे गेला होतात? तुम्ही कार्यालयातून केंव्हा बाहेर पडलात? पुढे काय झाले? ती असे सर्व प्रश्न विचारायला लागते.’

म्हणून मी म्हणतो कि आपण आपल्या मनाला हाताळायला शिकले पाहिजे.

हे सर्व मनाचे खेळ आहेत. तुमचे मन जर चांगल्या पद्धतीने हाताळलेत तर तो तुमचा सर्वात चांगला मित्र बनू शकतो आणि जर वाईट पद्धतीने हाताळलेत तर तो तुमचा सर्वात वाईट शत्रू बनू शकतो.

प्रश्न: गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण जेथे जात तेथे भांडणे आणि मारामाऱ्या सुरु होत. पण तुम्ही जेथे जाता तेथे मतभेद दूर होतात.

श्री श्री : होय, जेंव्हा मी कोणत्याही शहरात येणार आहे अशी बातमी मिळताच तेथे लोकांमध्ये वाढ सुरु होतात. एक जण म्हणतो कि ‘ गुरुदेव माझ्या गाडीतून प्रवास करतील’, तर दुसरा म्हणतो कि ‘ते माझ्या घरी मुक्कामाला येतील.’ तिसरा म्हणतो कि ‘ते माझ्या घरी जेवायला येतील’ आणि मग यावरून भांडणे सुरु होतात.

पण माझ्या भेटीनंतर लोक आनंदी होतात. ते आनंदी होतील याची मी निश्चितच काळजी घेतो.

प्रश्न: गुरुदेव, पती पत्नीच्या सर्व साधारण नात्याला मी अजून वरच्या पातळीवर कसे घेऊन जाऊ शकतो?

श्री श्री : दोघांनी बरोबर चालून आणि एकमेकांचे समर्थन करून.

काही वेळा असे होते कि एक साथीदाराला लग्न संबंधात काही रस वाटेनासा होतो तर दुसऱ्याला त्यात रस असतो. मग त्यातून काही निष्पन्न होत नाहीसे होते. असे होऊ शकते. पण असे असताना सुद्धा दोघांनी नेहमी बरोबर चालले पाहिजे आणि नेहमी एकमेकांना समर्थन दिले पाहिजे.