जगाला प्रकाश दाखवा

14
2013
Mar
बंगलोर, भारत
सत्संगमध्ये बसून अंतर्मुख होणे महत्वाचे आहे.

(प्रेक्षक :जाऊ नका)

असे म्हणू नका. कितीतरी कार्यक्रम ठरलेले आहेत आणि लोक माझी वाट बघताहेत. मला कुणाला नाराज करायला आवडत नाही. आजही मी म्हटलं, की मी काही वेळ तरी सत्संगमध्ये येतो, मी इतक्या सगळ्या लोकांना नाराज नाही करणार.

म्हणूनच मी माझी फ्लाईटदेखील थोडी उशिरा केली.म्हणजे मला दहा मिनिटं तरी तुमच्याबरोबर राहता येईल.

साधना सेवा आणि सत्संग करत रहा आणि आपण जगात लोकांना ज्ञानाचा प्रकाश जास्तीत जास्त कसा देऊ शकू याचा विचार करा. बघा, असेही आपण आणखी ४०,५० वर्षेच या जगात रहाणार आहोत. त्यामुळे जीवानाला काहीतरी दिशा असायला हवी. ‘आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे’, याचा विचार करायला हवा.

खाणे,झोपणे, विचार करणे, वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे याच्याशिवाय आणखी जास्त काहीतरी करायला हवे. आणि हे ‘आणखी जास्त काहीतरी’ म्हणजे आपण काय करू शकू ? लोकाना ज्ञान देऊ शकू, लोकांना आनंदी करू शकू. आणि त्यांना जास्त आनंदी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना ज्ञानमार्गावर आणणे.

जर कुणी दु:खी असेल तर त्याचा अर्थ त्यांनी ज्ञान घेतले नाही किंवा स्वीकारलेले नाही, त्यांनी ज्ञान पचवलेले नाही आणि त्यामुळे ते दु:खी आहेत.

मग तुम्ही म्हणाल की, ‘ गुरुदेव, काही लोकांकडे पाणी नाही, अन्न नाही आणि ते त्रास त्रासात आहेत म्हणून दु:खी आहेत, तर ते आनंदी कसे होतील ? ‘

तर ही वेगळी गोष्ट आहे, वेगळी बाब आहे. होय, त्रास सहन करावा लागणे वेगळी गोष्ट आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो, दुष्काळ किंवा पूर यामुळे त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही सेवा करायला हवी. आणि तेही ज्ञानात राहून सेवा केलेली जास्त चांगली. जीवनात संकटे येतात पण त्यां संकटांवर मात करण्यासाठी बळ असायला हवे आणि हे बळ केवळ आध्यात्मिक ज्ञानातून येते.

बघा, दक्षिण अमेरिकेत एखादे फुलपाखरू फडफडले तर त्याचा परिणाम चीनमधल्या ढगांवर होऊ शकतो.याचा अर्थ संपूर्ण सृष्टीचे जाळे विणलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर छोटीशी पूजा मनोभावे केलीत तर त्यामुळे वातावरणात काही सुंदर आणि सकारात्मक तरंग निर्माण होतात आणि त्याचा अंतराळावर नक्कीच परिणाम होतो.

गुरुपूजेमुळे चांगला परिणाम होतो असे कुणाकुणाला दिसून आले आहे ? गुरुपूजेचे मंत्र नुसते म्हटल्यानेही फरक पडतो. नुकतेच कुणीतरी मला लिहून कळवले होते की कुणीतरी दवाखान्यात होते आणि गुरुपूजा मंत्र म्हटल्याने त्यांना बरे वाटले. एक मुलगा सतत रडत होता, गुरुपूजेचे मंत्र म्हटल्याने तो मुलगा शांत झाला.

तर बरे होण्याचे असे बरेच अनुभव आहेत आणि यात काहीच आश्चर्य नाही.हे असेच व्हायला हवे आणि ते होते. हे अगदी साहजिक आहे. जर असे झाले नाही तरच ती आश्चर्याची गोष्ट असेल.

तर जीवनाला काहीतरी दिशा असायला हवी. आणि ती दिशा म्हणजे ‘आपण हे प्राचीन ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोहोचवू शकू ?’ हे प्राचीन ज्ञान असेही पुढे चालत राहिले आहे. आपण आपल्या आयुष्यात हा कसा पुढे नेणार आहोत, जेणे करून हा अनंत काळापासून असलेला ओघ अनंत काळापर्यंत चालू कसा राहील याचा विचार करायला हवा. आपली शक्ती या दिशेने वापरायला हवी.