आयुष्य आणि त्याची आव्हाने

07
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न: भौतिक आणि अध्यात्मिक आयुष्याची सांगड कशी घालावी?

श्री श्री: तुम्हाला सायकल चालवायला येते का? तुम्ही तोल कसा सांभाळता? तुमच्या आयुष्यात असाच समतोल साधा. दोन्ही बरोबर असू द्या.

जर अध्यात्माकडे जास्तच कल असेल तर मी सांगेन कि तुम्ही घरच्या जबाबदार्यांकडे लक्ष द्या. जर तुम्ही भौतिक गोष्टीत अडकून तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर मी सांगेन कि या दलदलीत फसू नका आणि अध्यात्म मार्गावर चला.

तुम्ही जेंव्हा टी.व्ही. पाहता तेंव्हा असे म्हणू शकता का “मी आधी पाहीन आणि मग ऐकेन?”

काही लोक म्हणतात “मी माझ्या सर्व संसारिक गोष्टी संपवतो आणि मग अध्यात्मिक मार्गावर येतो” मी सांगतो असे कधीही होत नाही. दोन्ही बरोबरीने झाले पाहिजे. आयुष्यात दोन्हीची गरज आहे. आपल्याला मनशांती, प्रेम आणि आनंद हवा असतो, त्याच बरोबर आयुष्यात जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात.

प्रश्न: गुरुजी नुकत्याच शोध लागलेल्या देव कणावर थोडा प्रकाश टाकाल का?

श्री श्री: देव कणाचा शोध लावलेले शास्त्रज्ञ हेच सांगत आहेत की संपूर्ण विश्व एकाच पदार्थाने बनले आहे, एकच गोष्ट, आणि तीच गोष्ट मग अनेक होते.

वेदांतात सुद्धा हेच सांगितले आहे. पूर्वीच्या काळी ते हेच सांगत असत की संपूर्ण विश्व एकाच चेतनेपासून बनले आहे. ही एक चेतनाच सर्वव्यापी होते.

जसे आपण एकाच गव्हापासून चपाती, सामोसा, हलवा बनवतो हे तसेच आहे. हे विश्व इतके वैविध्यपूर्ण आहे पण एकाच कंपनापासून, एकाच चेतनेपासून बनले आहे, यालाच ते देवकण असे म्हणतात.

या एकाच गोष्टीपासून विश्वाची विविध अंगे बनली आहेत.

प्रश्न: जेंव्हा मन शंकांनी भरलेले असते, तणावाखाली असते त्यावेळी मला वाटणारी भीती खरी नाही हे मनाला कसे समजावू?

श्री श्री: जेंव्हा मन तणावाखाली असेल, शंकांनी भरलेले असेल त्याचा अर्थ प्राणशक्तीची पातळी खाली आली आहे. जेंव्हा प्राणशक्तीची पातळी खाली असेल तेंव्हा शंका येतात, आपण उदास होतो. यावर उपाय म्हणजे प्राणायाम, योग्य आहार, व्यायाम. संगीत आणि उपवास याद्वारे प्राणशक्तीची पातळी वाढवणे.

काही दिवस फलाहार करा. आपण भूक नसेल तरीही जेवण पोटात भरत असतो.

प्रश्न: विशालाक्षी मंडप खूप सुंदर आहे. मला त्याच्याकडे बघून खूप छान वाटते. तुम्ही त्याबद्दल काही सांगाल का? ही इमारत वास्तूशास्त्र नुसार आहे का?

श्री श्री: विशालाक्षी मंडप कसा दिसावा याचा मी फक्त आराखडा काढला. या इमारतीसाठी कोणी मोठा वास्तुविशारद नाही. जेंव्हा वास्तू तज्ञांनी हे पहिले तेंव्हा ते म्हणाले की याची रचना उत्तम आहे आणि वास्तूशास्त्रा नुसार आहे.

प्रश्न: पूर्वीच्याकाळी साधू जनावराची चमडी ध्यानाला बसण्यासाठी वापरत. पण सुदर्शन क्रियेला बसण्यापूर्वी अंगावरच्या सर्व चामड्याच्या वस्तू काढायला सांगतात, असे का?

श्री श्री: पूर्वीच्या काळी ते हरणाचे चामडे वापरत. ज्या हरणाला नैसर्गिक मृत्यू आला आहे अश्याच हरणाचे चामडे ते वापरत. पूर्वी चांगली बैठक नसे म्हणून ते हरणाचे चामडे वापरत. मेलेल्या जनावराचे चामडे न वापरण्याची अजूनही कारणे आहेत, तुम्हाला ती शिक्षक प्रशिक्षण वर्गात कळतील.

प्रश्न: माझ्या २४ वर्षाच्या मुलाने नैराश्यातून तीन महिन्यापूर्वी आत्महत्या केली. मी त्याला समजून घेऊ शकले नाही आणि त्याला वाचवू शकले नाही या विचाराने मला ग्रासले आहे.

श्री श्री: कर्नाटकात आणि आपल्या देशात असे अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. त्याचे आयुष्य इतकेच होते. त्याबद्दल विचार करून तुमचे स्वास्थ्य बिघडवू नका.

तरुणांना या मार्गावर घेऊन येण्यासाठी काम करा. येथे गाणे आहे, ज्ञान आणि ध्यान आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणा.

प्रश्न: माझ्या नवऱ्याच्या फुफुसाला गाठ आहे. डॉक्टर्स म्हणतात की ती कर्करोगाची आहे.

श्री श्री: त्यांना प्राणायाम करू द्या. शिवाय शक्ती ड्रोप वापरू देत, त्याने प्रतिकारशक्ती वाढते. काल एका कर्करोग तज्ञाने सांगितले कि त्यांनी ३-४ रुग्णांवर प्रयोग केले आणि शक्ती ड्रोप वापरल्याने त्यांचे कॅन्सर पेशी ४८ तासात ४०% ते कमी झाल्या.

याचे ते पुढे संशोधन करणार आहेत. आपण आताच काही बोलणे योग्य नाही पण हे संशोधन करायला ते खूप उत्सुक आहेत. बऱ्याच लोकांना याचा फायदा झाला आहे, तुम्ही सगळ्यांनी ते वापरा.

प्रश्न: गुरुजी, तुमच्या मते विद्यार्थीच्या अभ्यासा व्यतिरिक्त काय प्राथमिकता आहेत?

श्री श्री: पहिली प्राथमिकता अभ्यास, चांगला अभ्यास. दुसरी, तुमचे स्वतःसाठी एक उद्दिष्ट ठेवा, देशासाठी एक उद्दिष्ट ठेवा.

प्रश्न: हे जग सोडून गेलेल्या आत्म्याबद्दल काही बोलाल का?

श्री श्री: प्रथम जे जिवंत आहेत त्यांच्याशी सूर जमवा! हेच एक मोठे काम आहे! भारतात इतक्या भाषा आहेत कि संवाद कठीण आहे. होय गेलेल्या आत्म्यांशी जोडण्याचे मार्ग आहेत. ध्यान करा आणि ते मार्ग आपोआप समोर येतील.