कामवासना, इच्छा-आकांक्षा यांच्या पलीकडे जा

08
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : माझे प्रिय गुरुदेव, कित्येक वेळा माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा आणि माझ्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा या मला स्वाभाविक राहू देत नाही. स्वाभाविक राहण्याकरिता काय करावे?

श्री श्री : केवळ थोड्या वेळा पुरत्या,सतत पूर्णवेळ नाही,हो ना?

जर पूर्ण वेळासाठी हवे तर मी एक उपाय सांगतो. थोड्यावेळासाठी ते ठीक आहे.

जसजसे तुम्ही ज्ञानामध्ये परिपक्व होत जाता,जसजसे तुम्हाला या जगाचा स्वप्नवतपणा दिसू लागतो-सर्व काही एका स्वप्नाप्रमाणे आहे,सगळे निघून जात आहे,सगळ्यांमध्ये परिवर्तन घडून येत आहे,तेव्हा घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला कमीत कमी त्रास होऊ लागतो.

घटनांपासून निर्लेप राहण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्या संपूर्ण घटनेकडे एक क्षणिक स्वप्न म्हणून बघणे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, स्वतःचा शोध घेणे आणि स्वतःची परीक्षा घेणे यात काय फरक आहे? तुम्ही बऱ्याच वेळा सांगता की स्वतःचे परीक्षण बंद करा, याचे कृपया तपशीलवार विवरण कराल?

श्री श्री : तुम्ही मध्य मार्ग स्वीकारा.

थोडे लोक असे आहेत जे आपल्या वागण्याचे सतत समर्थन करीत राहतात, आणि थोडे असे आहेत ज्यांना स्वतःमध्ये कायम दोष दिसत राहतो. या दोहोंमुळे एक प्रकारचे असंतुलन निर्माण होऊ शकते.

तुम्ही मध्य मार्ग स्वीकारा,असा जिथे तुम्ही आपली प्रत्येक कृती पाहून त्यात काही सुधारणा करू शकता का हे पाहून त्याच वेळी पाउल पुढच्या दिशेने उचलू शकता.

तुम्ही भूतकाळाकडे केवळ एवढेच पाहू शकता.(आपल्या बोटांनी "इतकेसे" अशी खुण करतात).

बघा,हे असे आहे,तुमची कार कशी असते तसे, त्यात समोर बघण्याची काच ही भली मोठी असते आणि मागच्या गाड्या बघण्याचा आरसा हा छोटासाच असतो.आता अशी कल्पना करा की पुढचे पाहण्याच्या काचेच्या जागी मागचे पाहण्याचा भला मोठा आरसा आहे आणि पुढे पाहण्यची काच ही एकदम छोटीशी आहे. तुम्ही सध्या त्याच गाडीत आहात. तुमचा मागे बघण्यचा आरसा हा समोरच्या काचेची अर्धी किंवा त्याहून जास्त जागा अडवून बसला आहे आणि म्हणून तुम्ही सतत मागेच बघित आहात.हे बरोबर नाही. तुम्ही मागे केवळ थोडेसे पहा आणि पुढे जात राहा.

हे तर सर्वोत्तम उदाहरण आहे. तुम्ही तुमची कार डोळ्यासमोर ठेवा,त्याची समोर बघण्याची काच आणि मागच्या गाड्या पाहण्याचा आरसा. तुम्ही मागे केवळ थोडेसेच पहा.

प्रश्न : गुरुदेव,मला अलिप्तपणा आणि निःस्वार्थीपणा बौद्धिक पातळीवर समजतो,पण ते सरावात आणणे मला अवघड वाटते. मी काय करू?

श्री श्री : आयुष्य तुम्हाला तो धडा शिकवेल.

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ज्ञानाविरहितपणे अति बांधलेले असता,तेव्हा त्याने तुम्हाला अतीव दुःख मिळते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, आमच्यापैकी थोडे लोक दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये बरेच उशिरा येतात,तर इतर बरेच जण आधीपासून येत आहेत.हा आमच्या पुर्वकर्मांचा परिणाम आहे का? मी तुम्हाला जीवनात आधीच जर भेटलो असतो तर त्याने मी बऱ्याच आघातापासून बचावलो असतो.

श्री श्री : आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो- गाडीमध्ये असणाऱ्या मागचे दृश्य दिसणाऱ्या आरश्यामध्ये फार जास्त निहाळून पाहू नका.

प्रश्न : प्रिय गुरुदेव,एका साधकाचे ध्येय काय असले पाहिजे? किंवा मग साधकाने केवळ आपले काम करावे, आणि निसर्ग नियमानुसार घटनांना घडू द्यावे?

श्री श्री : होय,तेच तर आहे,आपले काम करा! तुम्ही योग्य जागी आहात,फक्त आपले काम करा आणि बघा कसा काय होतंय ते.

प्रश्न : भावना अतिरेक,इच्छा आकांक्षा आणि काम वासना विचारांवर विजय मिळवण्याचा सर्वात सोप्पा मार्ग कोणता?

श्री श्री : स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून ठेवा.

तुमचा भावावेग हा मोठ्ठ्या कारणासाठी कामाला लावा. काही निर्माण करण्याची किंवा काही बनवण्याची तुमच्यात उत्कटता असू द्या.

ज्ञानाचा किंवा धर्माचा प्रसार करण्यात गर्क व्हा. आपण लोकांपर्यंत कसे पोहचू याचा दिवस न् रात्र विचार करा,आणि जीवनात काही चांगले कार्य करा. किंवा मग लेख ,संगीत,गाणी लिहा. 

जेव्हा तुम्ही इतकी व्यस्त असता तेव्हा तुम्ही बघाल की तुम्हाला भावातीरेकाचा त्रास होणार नाही.

खास करून तरुणांनी अतिशय व्यस्त राहायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही व्यस्त राहिलात तर हे सर्व काही तुम्हाला त्रस्त करणार नाही.

आम्ही असेच तर होतो;२० ते २५ वर्षे वयात मी फार कार्यमग्न होतो.सकाळी सहा वाजता उठल्यापासून ते रात्रीचे एक दोन वाजेपर्यंत माझी धावपळ चालूच असायची.

तर,स्वतःला व्यस्त ठेवा,खास करून अशा वयात जेव्हा संप्रेरके(हार्मोन्स) गडबड करीत असतात. तुम्हाला असे दिसून येईल की भावातीरेक,लालसा आणि सगळ्यांवर तरुन तुमची नाव पैलतीरी लागेल.

प्रश्न : गुरुदेव, सामाजिक मद्य प्राशनापासून कोवळ्या तरुणांना कसे परावृत्त करावे?

श्री श्री : त्यांना सांगा की ती एक महाभयंकर वस्तू आहे, मग ते सामाजिक मद्यप्राशन असो वा वैयक्तिक मद्यप्राशन असो त्याने काही फरक नाही पडत. त्याला नाही म्हणा,बस्स,संपले! खरे तर सामाजिक वर्तुळामध्ये "नाही" म्हणायला तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे.

जर तुम्ही ,"मी एक चहाबाज आहे,मी मद्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही", हे गर्वाने सांगाल तर तुम्हाला तुमच्या दोस्तांमध्ये एक प्रकारचा मान मिळेल.

तुम्ही तुमच्या मुल्यांवर भर दिला पाहिजे. एखाद्या घोळक्यात असतानादेखील तुम्ही आत्मनिष्ठ आणि वैयक्तिक पसंती जपली पाहिजे.

आपण कायम हेच तर करतो. आपण मोठ्या सभांमध्ये,सगळीकडे जातो ते आपापल्या वैयक्तिक निवडी जपून.

तुम्हाला माहिती आहे की जगाने याची दाखल घेणे चालू केले आहे. ज्या कुठल्या संस्थेने मला डॉक्टरेट बहाल केली आणि जिथे कुठे मी गेलो, तिथे केवळ माझा मान राखण्याकरिता त्यांनी शाकाहारी जेवण ठेवले आणि कोणत्याही प्रकारचे मद्य नव्हते.

बहुदा विश्व विद्यालयांमधून मदिरा आणि मांसाहारी जेवण दिल्या जाते. परंतु कोरडोबा असू दे अथवा नेथार्लंड असू दे अथवा न्येनरोड विश्व विद्यालय असू दे,जेव्हा त्यांनी मला डॉक्टरेट देऊ केली तेव्हा स्वागत समारंभांमध्ये त्यांनी केवळ शाकाहारी जेवण आणि सरबत हेच वाढले.

यु न ची एच आय व्ही-एड्स वरील सभा या सारख्या मोठ्या जागतिक सभांमध्ये सुद्धा त्यांनी शाकाहारी अन्नाचा वेगळा विभाग ठेवणे सुरु केले आहे. यापूर्वी हे असे नसायचे.

जागतिक आर्थिक व्यासपीठा (दि वर्ल्ड इकोनॉमिक फोरम)वरसुद्धा जर तुम्ही शाकाहारी आहात तर ते त्याचा मान करतात आणि शाकाहारी अन्नाकरिता त्यांनीदेखील वेगळा विभाग ठेवला आहे.

हे असे पूर्वी नव्हते. जवळ जवळ १० ते २० वर्षांआधी हे कल्पनाशक्तीच्या बाहेर होते. १० वर्षांआधी सुद्धा आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये तुम्हाला हे दिसले नसते. परंतु आता हे बदलेले आहे आणि ते तसे झाले ते केवळ आपल्या मदिरा आणि मांसाहार याला स्पर्श न करण्याच्या निर्धारामुळे. आणि जगाने त्याचा मान ठेवला. म्हणूनच तुमचे मित्रसुद्धा याचा मान ठेवतील.

गेल्या १० वर्षात आता विमान कंपन्यांनीसुद्धा हे करणे सुरु केले आहे. आधी असे नसायचे. आता तर विमान प्रवासात बटाटे,गाजर रहित असे जैन जेवणसुद्धा वाढल्या जात आहे. तुम्हाला कसे जेवण पाहिजे याचा तुम्ही विशेष उल्लेख करू शकता.

म्हणून तुम्ही आपल्या वैयक्तिक चांगल्या सवयी चालू ठेवा आणि त्या तशा कायम राहण्यावर भर द्या. नाहीतर मग तुम्ही सामाजिक मदिरा प्राशनाने सुरुवात कराल आणि मग हळू हळू मद्याचा राक्षस हा मोठे वैयक्तिक संकट होऊन बसेल.

प्रश्न : गुरुदेव, जय आणि विजय हे भगवान नारायणाचे सेवक आपापली सेवा करीत होते तरीसुद्धा त्यांना शाप मिळाला.जर कोणी आपली सेवा करीत असेल तर त्यांनासुद्धा शाप मिळण्याचा हक्क आहे का?

श्री श्री : त्या शापांमध्ये समस्त मानवजातीचे अतिउच्च भले दडलेले होते. कोणत्याही संताच्या शापाने कधीही कोणतेही नुकसान वा तोटा झालेला नाही. संताच्या या शापांमुळेच जगाचे इतके भले झाले आहे-भगवान राम आणि भगवान कृष्ण आले आणि पुढचे तर तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच असे म्हटले आहे- मूर्ख माणसाच्या प्रेमानेदेखील समस्या निर्माण होतात, आणि संतांच्या क्रोधानेदेखील आशीर्वादच मिळतात.