04
2012
Oct
|
बंगलोर, भारत
|
प्रश्न: प्रिय गुरुजी, कृपया बंधनाबद्दल काही सांगू शकाल कां ? आत्म्याला बंधनात अडकल्यासारखे कां वाटते आणि बंधनाची कारणे काय ?
श्री श्री : अज्ञान हे बंधनाचे कारण आहे. आणि अज्ञान कां असते तर त्याला उत्तर नाही. देवाने प्रथम अज्ञान निर्माण केले आणि मग त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग निर्माण केले. असे कां ? म्हणूनच त्याला ‘लीला’ असे म्हटले जाते. हे म्हणजे असे विचारण्यासारखे झाले की , ‘आपल्याला फुटबॉलची मॅच खेळायलाच हवी असे कां ? एका बाजूला काही प्रशिक्षक आणि काही खेळाडू आणि काही दुसऱ्या बाजूला असे मैदानाचे दोन भाग कां असतात ? खेळाडू एक बॉल पायाने इकडून तिकडे कां ढकलत असतात ? त्यांचा आपापला बॉल कां नसतो की ज्याच्या बरोबर ते ते आपापल्या भागातच राहतील ? असे झाले तर मग तो खेळच रहाणार नाही नां ? तर अज्ञानामुळेच खेळ असतो, क्रिडा असते. त्यामुळेच या संपूर्ण सृष्टीला ‘परमपुरुषाचा खेळ’ असे म्हटले आहे. प्रश्न : गुरुदेव, असे म्हटले आहे की साधकाने समजण्याला अनुभूती मानण्याची आणि अनुभूतीला मुक्ती मानण्याची गल्लत करू नये. कृपया समजावून सांगाल कां ? श्री श्री : असे कोण म्हणते ? दुसऱ्या कुणाच्या वक्तव्यावर टिपणी करण्याची मला सवय नाही. समजणे हे बुद्धीचे काम आहे. अनुभव हा त्याहून सूक्ष्म आहे. आणि अनुभूतीच्या पलीकडे मुक्ती आहे.....जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही अनुभव नाही आहात तर अनुभव घेणारे आहात. त्यामुळेच भगवद्गीतेत म्हटले आहे , नास्ती बुद्धीरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना , नचाभावयत: शांती: अशांतस्य कुत: सुखम् (भगवद्गीता , अध्याय २ , श्लोक ६६ ) जर तुमचे स्वत:चे चित्त तुमच्या आत्म्याशी स्थिर झालेले नसेल तर ना तुमच्या बुद्धीला धार येईल नां तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि स्पष्टता येईल. प्रश्न : गुरुदेव, जर तुम्ही गुरूबरोबर थेट जोडलेले असाल तर देवळात जाण्याची गरज आहे कां ? श्री श्री : देवदर्शनासाठी देवळात जाणे ही जास्त करून सांस्कृतिक आणि सामाजिक घटना आहे. अर्थात त्याला आध्यात्मिक बाजूही आहेच. पण ती आवश्यक गोष्ट नाही. तुम्ही घरीच बसून जिथे आहात तिथे देऊळ वाटून घेऊ शकता. संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आणि आपल्या मुलांवर आणि लहानांवर पावित्र्याची भावना निर्माण करण्यासाठी तीर्थयात्रा करणे, अधून मधून देवळात जाणे चांगले . पण फक्त तिथेच देव भेटतो म्हणून नव्हे तर परंपरा जपण्यासाठी जावे. त्यासाठीच आपल्याकडे सण साजरे केले जातात, तीर्थ यात्रा केल्या जातात. जेणेकरून लोक एकत्र यावे. तर हे मुख्यत्वे सामाजिक कारणासाठी आहे. तुम्ही घरातच ध्यान करू शकता आणि भजने म्हणू शकता पण जेव्हा तुम्ही इथे आश्रमात येता आणि आपण एकत्र ध्यान करतो, एकत्र भजने म्हणतो तेव्हा सामुदायिक चेतना उंचावली जाते. तुमची सामुदायिक उर्जा उंचावली जाते आणि त्यात वेगळीच मजा आहे. तसेच जर कुणी विचारले की , “ आम्ही घरीच ध्यान करू शकत नाही कां ?” मी म्हणतो, हो, नक्कीच करू शकता. तुम्ही घरी बसून तर ध्यान करायलाच हवे आणि कधी कधी तुम्ही इथेसुद्धा यायला हवे. देवळांच्या बाबतीतही तसेच आहे. प्रश्न : गुरुदेव, कृपया ध्वनी लहरींबद्दल आणि त्यां विचारांच्या माध्यमातून कसे काम करतात याबद्दल सांगा. म्हणजे आपण ध्यानात मंत्र कसा घेतो याबद्दल. श्री श्री : ते घडते. एवढेच. कसे घडते आपल्याला माहित नाही. बघा, आजकाल बऱ्याच गोष्टींना ‘सेन्सर’ बसवलेले असतात. आणि तुम्ही त्यां वस्तुला हात लावला की दिवा लागतो. तुमच्या नुसत्या स्पर्शाने कुलूप उघडू शकते. तुमचा फोनही केवळ तुमच्या बोटांच्या स्पर्शाने चालतो. तुमचा लॅप् टॉप आणि आय पॅड सुद्धा असाच चालतो. हे सगळे केवळ स्पर्शाने चालते. हो की नाही ? तर आपली पाचही ज्ञानेंद्रिये- स्पर्श, गंध, चव, दृष्टी, आणि श्रवण हे सर्व दुसरे काही नाही तर इलेक्ट्रॉनिक लहरी आहेत. विज्ञान याचे जास्त चांगले स्पष्टीकरण देऊ शकेल. प्रश्न : प्रिय गुरुदेव, मला हे कळते की तुमच्या भक्तांच्या सागरातला मी केवळ एक कण आहे . तरीही मला दृढ विश्वास आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि तुम्हाला माझ्या गरजांची जाणीव आहे. मी तुमच्यासाठी खास आहे असे मला वाटणे हा माझा अहंकार आहे कां ? श्री श्री : नाही. हे अगदी योग्यच आहे. तुम्हाला खास वाटायलाच हवे. म्हणूनच म्हटले आहे, अनुपमा ( ज्याला कोणतीही उपमा नाही ), अद्वितीय ( असा दुसरा कोणी नाही ), अप्रमेय ( कुणाशीही तुलना होऊ शकत नाही असा ). ही सर्व आत्म्याची लक्षणे आहेत. आत्म्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तर तुम्हाला स्वत:बद्दलची खास भावना असू द्या. काहीच प्रश्न नाही. पण कुठल्याही मागण्या करू नका. हे तुमच्यातच तुमच्या भावनांच्या मर्यादेपर्यंत आहे तोवर तुम्हीही सुरक्षित आणि बाकीचे सगळेही सुरक्षित आहेत. पण जर तुम्ही म्हणाल की, “मी खास आहे त्यामुळे तुम्ही मला हे अमुक तमुक द्याच.” तर मग ते अवघड होऊन बसेल. पण तुम्ही स्वत:ला खास मानावे हेच मला हवे आहे. प्रश्न : गुरुदेव, कधी कधी आम्हला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आपल्याला मुक्ती कशाने मिळेल ? तर देवाने आपल्यात ही भीती कां निर्माण केली आहे ? भीतीची काही गरज नाही. श्री श्री : भीती म्हणजे फक्त उलटे झालेले प्रेम. त्यामुळे जिथे प्रेम असते तिथे थोडीशी भीती ही आलीच. ज्ञान, वैराग्य, विवेक ह्या तीन गोष्टींमुळे भीतीचे रुपांतर पुन्हा प्रेमात होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा प्रेम आसक्ती मध्ये रुपांतरीत होते तेव्हा भीती डोके वर काढते. त्यामुळे वैराग्य आणि विवेक यांच्यामुळे प्रेम त्याच्या शुद्ध स्वरुपात ठेवा. प्रश्न : प्रिय गुरुजी, आध्यात्माचा मार्ग इतका कठीण आणि मेहनतीचा कां आहे ? कधी कधी मला वाटते मी जेव्हा अज्ञानी होतो तेव्हा माझे आयुष्य जास्त सोपे होते. श्री श्री : आध्यात्म अवघड आहे ? (श्री श्री हसतात ) असे कोण म्हणते ? जर ते अवघड असेल तर तुम्ही आत्ता हसतमुख कसे असता ? पूर्वी तुम्ही संवेदनशील नव्हतात , आता तुम्ही संवेदनशील झाला आहात इतकेच ! जेव्हा तुम्ही गेंड्याच्या कातडीसारखे असता तेव्हा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुमचे आयुष्य असेच चाललेले असते. पण जेव्हा तुम्ही संवेदनशील बनता...... जेव्हा कापड निर्मळ आणि शुभ्र होते तेव्हा एखादा छोटासा डाग किंवा ठीपकाही मोठा वाटतो, इतकेच. अध्यात्म तुम्हाला दु:खी कधीच होऊ देणार नाही. असे म्हटले आहे की , हेयं दु:खं अनगात्मम् \ योगाचे हे तत्व आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे की दु:खं येण्याच्या आधीच त्याला थांबवायचे. प्रश्न : माझे प्रिय गुरुदेव, आध्यात्मावारचे लक्ष पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी संसारी जगात अपयश येणे महत्वाचे आहे कां ? श्री श्री : नाही, लक्ष केंद्रित होण्यासाठी अपयश येण्याची गरज नाही. तुमच्या मनात असा संकल्प करू नका. ती गरजेची गोष्ट नाहिये. प्रश्न : गुरुदेव, तुम्ही खूपच उदार आहात. तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात पण मी तुम्हाला ज्या गोष्टी करण्याचा वादा केला होता त्या मी पूर्ण केलेल्या नाहीत. मला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही मला शिक्षा करणार की माझ्या इच्छा पूर्ण करत रहाणार ? श्री श्री : ( हसतात ) ते मी तुम्हाला आत्ता कां उघड करू ? तुम्ही अंदाज करत रहा. आणखी काही इच्छा करण्याच्या आधी तुम्ही केलेले वादे पूर्ण करा. मला तुम्हाला लोभी बनवायचे नाहिये. नाहीतर तुम्ही खूपच लोभी व्हाल. जेव्हा तुम्हाला कळते आहे की इच्छा पूर्ण होताहेत तेव्हा तुम्ही जास्त मोठ्या गोष्टींसाठी इच्छा केल्या पाहिजेत, फक्त स्वत:साठी नाही. राष्ट्र , जग , मानवता यासाठी इच्छा धरा. जर तुमच्या इच्छा काहीतरी मोठे मिळवण्यासाठी असतील, हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतील तर ते जास्त अर्थपूर्ण असेल आणि मग त्यात तुमचीही उन्नती आहे. तुम्ही असा संकल्प केला पाहिजे की, ‘वेदांताचे ज्ञान ह्जारो लोकांपर्यंत पोहोचू दे, योग ह्जारो लोकांपर्यंत पोहोचू दे.’ तुम्ही तुमच्यात अशा इच्छा जोपासायला हव्यात. खरे म्हणजे इच्छा जोपासता येत नाहीत पण ही इच्छांची योग्य दिशा आहे. प्रश्न : प्रिय गुरुदेव, बारा ज्योतीर्लींगे (महादेवाची बारा पवित्र तीर्थस्थाने) कशी आणि कधी अस्तित्वात आली ? कृपया यावर प्रकाश टाकावा. श्री श्री : बघा, प्रत्येक ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले याची वेगळी कहाणी आहे. प्रत्येकाशी निगडीत एक ‘स्थळ पुराण’ आहे. उदाहरणार्थ श्रीरामांनी पूजेसाठी रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. याचा उद्देश हा होता की भारतातील सर्व लोकांना भक्तीच्या एका धाग्यात एकत्र बांधावे. भारतातले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. काशीमध्ये (वाराणसी ) वेगळीच भाषा बोलतात रामेश्वरमध्ये वेगळी भाषा बोलतात. प्राचीनकाळी लोकांना रामेश्वरला जायला सांगितले जायचे आणि तिथून काशीला जाऊन नंतर गंगास्नान करायला सांगितले जायचे. आणि तिथून येताना सोबत आणलेले गंगाजल घेऊन पुन्हा रामेश्वरला जाऊन तिथे ते ज्योतिर्लिंगावर वहायला सांगितले जायचे. आणि त्यानंतर तिथला प्रसाद घेऊन पुन्हा काशी विश्वेश्वराला जायला सांगितले जायचे. पूर्वीच्या काळी असे करायला सांगण्यामागचा हेतू हाच असायचा की ( देशात निराराळ्या ठिकाणी असलेल्या या पवित्र देवस्थानांना भेट देऊन) राष्ट्रीय एकात्मता भाव जागृत व्हावा. तुमच्या या पवित्र पाण्याची शंकराला गरज असते असे नाही. शंकर महादेव त्याचे काय करणार ? सृष्टीतले सगळे पाणी त्याचेच तर आहे. पवित्र गंगाजल काशीहून रामेश्वरला नेण्याचे शंकराला काही महत्व नाही. पण हो, देशासाठी ते महत्वाचे आहे. लोक जेव्हा एकत्रपणे देशातल्या विविध ठिकाणी तीर्थाटनासाठी जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या एकमेकातील मित्रत्वाचे धागे अधिक घट्ट होतात. बघा, दक्षिण भारतातले लोक अमरनाथच्या तीर्थयात्रेला जातात. त्यामुळे ही तीर्थयात्रा म्हणजे दक्षिणेतील कन्याकुमारीतील लोकांना उत्तरेतील काश्मीरमधील लोकांशी जोडण्याचे एक साधन बनते. तीर्थयात्रा हा त्यांना जोडणारा दुवा बनतो. आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शुद्ध आणि पवित्र भावनेने करतो तेव्हा आपली संपूर्ण चेतना फुलून यायला सुरवात होते. त्यामुळेच सगळी बारा ज्योतिर्लिंगे कधीच एका जागी किंवा एकाच राज्यात स्थापन केली गेली नाहीत. काही उत्तरेत तर काही दक्षिणेत तर काही पश्चिमेला अशी सगळीकडे पसरलेली आहेत. आणि त्या काळी, या सर्व ठिकाणी प्रवास करणे खूपच कठीण होते. त्या ठिकाणी पोहोचणे खूपच जिकीरीचे होते या तीर्थस्थानांना पोहोचण्यासाठी दाट जंगलातून जावे लागे, धोकादायक दऱ्या, ओसाड गावे किंवा बर्फाच्छादित हिम शिखरे वगैरे पार करावी लागत असत. उदाहरणार्थ केदारनाथ हे तीर्थस्थान हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये खोलवर दडलेले आहे. अशाप्रकारे, देशातील विविध ठिकाणी शिवाची पवित्र स्थाने स्थापन करून साधुसंतांनी त्याकाळी एक एकसंध देश निर्माण केला. असेही म्हटले जाते की, तत्रोपजग्मुर भुवनं पुनण महानुभाव मुनय: स्-शिष्य प्राये तीर्थाभिगमपदेसी: स्वयंही तीर्थानी पुनन्ति संत: श्रीमद भागवतम् ( कांड १ , अध्याय १९, श्लोक ८ ) याचा अर्थ ... जिथे जिथे पवित्र मुनी स्थानस्थ झालेले असतात ते ठिकाण म्हणजे तीर्थस्थानच होऊन जाते. कितीतरी संतांनी या पवित्र स्थानांना भेट दिली आहे, तिथे ध्यान केले आहे आणि तपस्या केली आहे आणि त्यामुळे या स्थानांचे पावित्र्य आणि महात्म्य काळानुसार वाढत गेले आहे. हे सर्व जरी असले तरी आज या सर्व ठिकाणी तुम्हाला अस्वच्छता आणि अनागोंदी कारभार दिसेल. तेथील व्यवस्था नीट ठेवली जात नाही. आजकाल श्रद्धा आणि भक्ती याचा भाव न ठेवता केवढेतरी दूध आणि इतर गोष्टी निष्काळजीपणे आणि वाया जातील अशाप्रकारे इथे वाहिल्या जातात. गडबडीने सर्व विधी आणि सोपस्कार कसेतरी आटोपतात. ही ‘पूजा’ नव्हे. मनापासून, भक्तीभावाने आणि ध्यानस्थ स्थितीत केलेली उपासना म्हणजे खऱ्या अर्थाने ‘पूजा’. तुमच्या स्वार्थी इच्छा किंवां भूक पूर्ण करण्यासाठी किंवा काही तरी करायलाच हवे म्हणून केले तर तुम्ही स्वत:लाच मुर्ख बनवताय. तेव्हा असे करू नये तर पूर्णपणे भक्ती भावाने करावे. जेव्हा शिव रुद्र म्हटले जात असते आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक सुरु असतो तेव्हा आपण डोळे मिटून स्वत:मध्ये लीन होऊन जावे. गहिऱ्या ध्यानात जावे. तर ते अर्थपूर्ण होईल. शिवतत्वाच्या अथांग विशालतेचा अनुभव घ्यावा जे परमानंद चिदाकाश (परम चेतना) बनून सर्वत्र पसरले आहे |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'