ध्यानाच्या पाच पायऱ्या

01
2013
Jan
बर्लिन, जर्मनी


 
तुम्हा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नववर्षाचे स्वागत ध्यान करीत करणे हे फारच छान आहे.

ध्यान म्हणजे काय? ध्यान अशी अवस्था आहे ज्याच्यामधून सर्व निर्माण झाले आहे, आणि ज्याच्यामध्ये सगळे लय पावते. ही ती आंतरिक शांतता आहे जिथे तुम्हाला आनंद, हर्ष,उल्हास, स्थिरचित्तता इ. ची अनुभूती होते.

ज्ञानाचे तीन प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का.

एक ज्ञान आहे ज्ञानेंद्रियद्वारा मिळणारे . आपली पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला ज्ञान देतात. डोळ्यांने पहिल्याने आपल्याला ज्ञान मिळते, श्रवण केल्याने ज्ञान प्राप्त होते, स्पर्श केल्याने, वास घेतल्याने आणि चव घेतल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होते.

तर अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांच्या संवेदनेमुळे आपल्याला ज्ञान मिळते. ज्ञानाची ही एक पातळी आहे.

ज्ञानाची दुसरी पातळी म्हणजे बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान होय.

बुद्धीद्वारे मिळणारे ज्ञान हे ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मोठे आहे. आपल्याला सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो परंतु बुद्धीमुळे आपल्याला हे कळते की सूर्य ना उगवतो ना मावळतो.

पाण्यामध्ये तुम्ही तुमचे पेन धरा, तुम्हाला ते वाकलेले दिसेल. परंतु बुद्धीमुळे आपल्याला हे माहिती आहे की ते पेन वाकलेले नसून तो केवळ एक दृष्टीभ्रम आहे.

म्हणून बुद्धीचे ज्ञान हे उच्च आहे.

नंतर आहे तिसऱ्या पातळीवरचे ज्ञान, अन्तःप्रेरणेचे ज्ञान, जे अजून श्रेष्ठ आहे. तुम्हाला अगदी आतून काहीतरी जाणवते.

गहन मौनातून काहीतरी येते, सृजनता निर्माण होते अगर काही शोध लागतात. हे सर्व चेतनेच्या त्या पातळीतून येते जे आहे तिसऱ्या पातळीवरील ज्ञान.

ध्यानामुळे तिसऱ्या पातळीवरील ज्ञानाकरिता दार उघडले जाते. आणि तिसऱ्या पातळीवरील आनंदाकरिता दार उघडणे हे ध्यानामुळेच शक्य होते.

आनंदाच्या तीन पातळ्या आहेत.

जेव्हा आपली ज्ञानेंद्रिये इंद्रिय अनुभवात गुंतुतात, म्हणजे डोळे दृश्य बघण्यात गर्क होतात, कान श्रवण करण्यात गुंगून जातात, आपल्याला बघण्यात, ऐकण्यात, चव चाखण्यात किंवा स्पर्श यातून सुख मिळते. या इंद्रियांद्वारे आपल्याला आनंदाची अनुभूती होते, परंतु या इंद्रीयांपासून सुख मिळण्याची क्षमता फारच थोडी आहे.

असे बघा, तुम्ही पहिली पुरणपोळी खाल्ली तर ती अतिशय चविष्ट लागते. दुसरी ठीक लागते. तिसरी पुरणपोळी खाताना तर ती जास्त झाली असे वाटू लागते आणि चौथी पुरणपोळी तर फारच यातनामय वाटते.

हे असे का? त्या सगळ्या पुरणपोळ्या एकाच व्यक्तीने बनवलेल्या असल्या तरीसुद्धा त्या आवडण्याची क्षमता कमी कमी होत जाते.

ज्ञानेन्द्रीयांबाबतसुद्धा हेच घडते. दृष्टी, स्पर्श, वास, चव, श्रवण; या सर्वांमधून प्राप्त होणारे सुख हे अल्पायुषी असते. असे आहे की नाही?

यानंतर आनंदाची दुसरी पातळी आहे जेव्हा तुम्ही सृजनात्मक काही करता; जेव्हा तुम्हाला काहीतरी छान शोध लागतो, किंवा जेव्हा तुम्ही कविता लिहिता, किंवा जेव्हा तुम्ही काही नवीन पाककृती बनवता.

सृजनशीलतेमधून एक प्रकारचा आनंद निर्माण होतो.

जेव्हा तुम्हाला मुल होते, मग ते तुमचे पहिले मुल असो वा तिसरे, त्या बाळाच्या येण्याने एक प्रकारचा हर्ष होतो; एक आनंद मिळतो.

आता वळू या तिसऱ्या आनंदाकडे. कधीही कमी न होणारा आनंद, आणि जो इंद्रीयांपासून उत्पन्न होत नाही, सृजनशीलतेपासून निर्माण होत नाही, तर तो निर्माण होतो काहीतरी गहन आणि गुढतेपासून. त्याचप्रमाणे,शांतता, ज्ञान आणि आनंद, या गोष्टीसुद्धा एका निराळ्या पातळीवरून येतात. आणि त्या जिथून येतात त्याचे स्रोत्र आहे ध्यान होय.

ध्यानाकरिता तीन महत्वाचे नियम लक्षात ठेवा.

ते तीन नियम असे, पुढचे दहा मिनिटे जेव्हा ध्यानाकरिता बसणार आहे तेव्हा मला काहीही नको,  मला काहीही करायचे नाही आणि मी काही नाही आहे.

जर आपण हे तीन नियम पाळण्यात यशस्वी झालो तर आपले ध्यान खोल होईल.

सुरवातीला ध्यान म्हणजे केवळ विश्राम करणे असते.

ध्यानाची दुसरी पायरी म्हणजे ध्यानामुळे तुम्हाला उर्जा प्राप्त होते; तुम्हाला अधिक उत्साही वाटते.

तिसऱ्या पायरीवर ध्यान तुमच्यातील सृजनशीलतेला अभिव्यक्ती प्राप्त करून देते.

चौथ्या पायरीवर ध्यानामुळे उत्साह,उमेद आणि आनंद वृद्धिगत होतो.

ध्यानाची पाचवी पायरी अवर्णनीय आहे, तुम्ही त्याचे वर्णन करूच शकत नाही. ही ती एकात्मता असते, तुमची संपूर्ण विश्वाबरोबर. ही आहे ध्यानाची पाचवी पायरी, आणि तिथे पोचेपर्यंत अजिबात थांबू नका.

मी नेहमी याची तुलना स्पेन किंवा इटली येथील समुद्र किनारी जाणाऱ्या लोकांबरोबर करतो. काही लोक केवळ फेरफटका मारायला जातात आणि ते तेवढ्याने खुश असतात. बाकीचे काही लोक जातात आणि मस्तपैकी पोहून येतात आणि ताजेतवाने होतात, आणि ते त्यात आनंदी असतात. काही लोक असे असतात की जे मासेमारीकरिता जातात, आणि काहीजण प्राणवायूचे नळकांडे लावून खोल सूर मारतात आणि समुद्रातील सुंदर प्राणी बघतात, आणि ते त्यात आनंदी असतात. आणि असेसुद्धा काही लोक आहेत जे जातात आणि समुद्रातील खजिना काढतात; ते खोलवर जातात.

तर ज्ञान तुमच्यासमोर हे सर्व पर्याय ठेवते.

केवळ काहीश्या विश्रामात,थोड्याश्या आनंदात,थोड्याफार उत्साहात किंवा काही इच्छांच्या पूर्ती होण्याने थांबू नका.

तुम्हाला माहिती आहे की ध्यान केल्यामुळे मौज करण्याची तुमची क्षमता वाढते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची क्षमतासुद्धा ध्यानामुळे वाढते. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःकरिता काहीही नको असते तेव्हा तुम्ही इतरांच्यासुद्धा इच्छा पूर्ण करू शकता.

हे खरोखरच फार छान आहे. म्हणून असे होईपर्यंत थांबू नका, ध्यान करीत राहा.