05
2013
Jan
|
बंगलोर, भारत
|
प्रश्न : काही लोक म्हणतात की, ‘थोडीशी वाईन घेतली तर काही हरकत नाही’. महादेव सुद्धा सोमरस घेत होते.” या वक्तव्यावर काय म्हणावे ? श्री श्री : लोकांना जे करायचं ते करतात आणि मग स्वत:चं समर्थन करण्यासाठी ते धर्माच्या किंवा देवाच्या नावावर घालतात. दुसऱ्यांचं सोडा, फक्त तुमच्या आयुष्याचं बघा. महादेवांनी जर सोमरस घेतला असेल तर त्यांनाही त्रास झालाच असेल. दिल्लीत त्या पाच लोकांनी निर्भयाबरोबर काय केलं बघा. ते सगळे दारूच्या नशेत होते. आणि जेव्हा कुणी दारूच्या नशेत असते तेव्हा त्यांच्या कृतीला तुम्ही त्यांना जाबाबदारही धरू शकत नाही. समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी अर्ध्या गुन्ह्यांना नशाच कारणीभूत असते. त्यामुळे फक्त त्या पाच लोकांना तुरुंगात टाकू नका तर मादक पेये बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या लोकांनाही जबाबदार धरा. हे जवळ जवळ सगळ्या गावांमध्ये होत असते. पुरुष रात्री दारू पिऊन घरी येतात आणि बायकांना मारतात. आणि दुसऱ्या दिवशी माफी मागतात कारण त्यांना माहित असते की रात्री ते, ‘ते स्वत:’ नव्हतेच. दारू हेच समाजातील गुन्ह्यांचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्ही दारू थांबवली तर देशातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. तुम्हाला ठाम निश्चय करायला हवा की, “ मी दारूला स्पर्श करणार नाडी.” तुम्ही जर म्हणालात की “मी फक्त लोकांमध्ये असताना पितो” किंवा “ मी फक्त एक पेग घेईन” ही सगळी विधानं म्हणजे फक्त समर्थन आहे. तुम्ही जेव्हा दारूसाठी दार उघडता तेव्हा ती कधीही येऊन तुम्हाला वाहून नेऊ शकते. नुसते दारच नाही तर पुढचे मुख्य फाटकही बंद करून घ्या म्हणजे ती तुमच्या दारापर्यंतही पोहोचणार नाही. तुम्ही स्वत:वरच बंधन घालून घेतले पाहिजे की, “ मी यापैकी कोणतेही मादक पेय पिणार नाही.” त्याने तुम्हाला प्रचंड मोठे बळ मिळते, माहितीये कां ? पण ज्या क्षणी तुम्ही जरासे ढिले पडाल की, “ मी फक्त एकदाच घेतो.” मग तुम्ही त्यात नक्की अडकलात म्हणून समजा. आयुष्यात तुम्ही कधी नाराज होता तर कधी बेचैन होता. उगीचच अस्वस्थपणा येऊ शकतो. इथे असलेल्यांपैकी किती जणांना असा अनुभाव आला आहे ? . सगळं चांगल चाललं आहे पण उगीचच अस्वस्थ वाटते. अस्वस्थ कां वाटते ते समजत नाही. शरीरामध्ये अस्वस्थ वाटायला लागते आणि मग दारू प्यावीशी वाटायला लागते. आणि मग सुरुच होते. म्हणूनच मी म्हणतो तिला मुख्य फाटकाच्या बाहेरच ठेवा. गुन्हेगारी संपण्यासाठी दारूशी युद्ध करण्याची गरज आहे. प्रश्न : जेव्हा मी आश्रमात असतो तेव्हा मला बाहेरच्या भौतिक जगात परत जावेसेच वाटत नाही. कधी कधी कुटुंबाची जबाबदारी हा एक अडथळा होतो. यावर काय करावे ? श्री श्री : तुम्हाला चार्जर लावून तुमचा मोबाईल फोन चार्ज करावा कागतो. पण तुम्ही सतत तुमचा मोबाईल चार्जरवरच ठेवत नांही, नाहीतर तुम्ही तो वापरणार कसा ?!! त्याचप्रमाणे तुमचे चार्जिंग जेव्हा कमी झाले असेल तेव्हा तुम्हाला परत इथे येऊन स्वत:ला चार्ज करुन घ्यावे लागेल. माझ्यासाठी सगळं जगच एक आश्रम आहे. मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत रहातो. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि घरची कामे याकडे बघितलेच पाहिजे. तुम्हाला ते सगळे करायलाच हवे; ते करणे आवश्यक आहे. जबाबदाऱ्यांपासून पळणे म्हणजे आध्यात्म नव्हे, उलट जास्त जबाबदारी घेणे होय. पहिले म्हणजे तुमचे कुटुंब, मित्रमंडळी,भोवतालचा परिसर; त्यानंतर देशाची जबाबदारी ; आणि मग संपूर्ण जगाची जबाबदारी. अशी आपली जबाबदारी वाढत जायला हवी. प्रश्न: माझ्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना मी कसे काय स्वीकारावे ? श्री श्री : जर ते तुमच्या विरुद्ध वाईट गोष्टी करत असतील तर तुम्ही काय करू शकता ? जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला नाही तर तुमच्याकडे दुसरा काय पर्याय आहे ? जर तुम्ही त्यांचा स्विकार केला नाही तर तुम्ही अस्वस्थ व्हाल, हो की नाही ? तुमचे मन बेचैन होईल आणि अशा अवस्थेत तुम्ही जो निर्णय घ्याल त्याबद्दल तुम्ही खुश असाल कां ? नक्कीच नाही ! तर स्वत:साठीच लोक आणि परिस्थिती हे जसे असतील तसा त्यांचा स्विकार करा. म्हणजे तुमचे मन शांत राहिल. मग तुम्ही तुम्हाला जे करायचे असेल ते करा. प्रश्न : एका शिक्षकाकडून मी ऐकले की १०० % जीवन जगण्यासाठी तुमच्या मनाची स्पष्टता पाहिजे. मनातला गोंधळ कसा घालवायचा ? श्री श्री : तुम्ही अजूनही गोंधळलेले आहात कां ? प्रत्येक गोंधळ म्हणजे विकासाकडे जाणारी एक पायरी असते. गोंधळ म्हणजे काय ? कुठलीतरी जुनी संकल्पना मोडून पडणे. जुन्या कल्पना नाहीशा झाल्या आणि नव्या निर्माण होऊ लागल्या. नवीन कल्पना अजून केंलेली नाही आणि जुनी नाहीशी झालेली आहे; हाच गोंधळ आहे आणि हे चांगली संक्रमण स्थिती आहे, त्यातच रहा. मी तुम्हाला सांगतो, ही स्थिती जास्त काळ टिकणार नाही. प्रश्न : नातेसंबंध म्हणजे खरेच काय असते ? एकदा दुधाने तोंड पोळले आहे त्यामुळे मी ताकही फुंकून पीत आहे. ही भीती कशी घालवू ? श्री श्री : तुम्ही हा प्रश्न विचारताय म्हणजे तुमची भीती आधीच गेलेली आहे. जर गेलेली नसती तर तुम्ही हा प्रश्न विचारलाही नसता. तुम्ही फक्त म्हणाला असतात, “ नातेसंबंध, मला त्यात पडायचेच नाही.” आणि तुम्ही पळून गेला असतात. तुमच्यात आता तितकीशी भीती राहिलेली नाही , अगदीच थोडीशी आहे, आणि मन त्यादिशेने जाऊ लागले आहे, तुम्हाला फक्त त्यावर माझ्याकडून खात्रीचा शिक्का हवा आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीत धोका असतो. तुमच्या मनातच अनिश्चिती असते.तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनावरही भरवसा ठेवू शकत नाही. दुसऱ्या कुणावर भरवसा ठेवणे तर दूरची गोष्ट. तुम्ही तुमच्या मनावर भरवसा ठेवू शकता कां ? मी बऱ्याच लोकांना खरेदीला गेलेले असताना बघितले आहे. ते विचारतात, “ मी हे परत करू शकेन कां किंवा बदलून घेऊ शकेन कां ?” लोक काहीतरी विकत घेऊन घरी येतात आणि मग त्यांना ते आवडत नाही. म्हणून ते परत जातात आणि म्हणतात की त्यांना ते बदलून हवे आहे. विशेषत: बायका, त्या एखादी साडी खरेदी करतात आणि घरी येऊन ती साडी उघडून बघतात तेव्हा त्यांना ती आवडत नाही आणि मग त्यांना ती बदलून हवी असते. एक बाई माझ्याकडे येऊन म्हणायच्या, ‘गुरुजी मला आशिर्वाद द्या की मी चांगल्याच गोष्टी विकत आणीन. मी दरवेळी शॉपिंग करून घरी आले की मला पुन्हा परत जावे लागते.’ मन हे असंच चंचल असतं. जेव्हा तुमचं मन चंचल असतं तेव्हा दुसऱ्याचंही चंचल असू शकतं, हो नां ? निरनिराळे लोक असतात, निरनिराळ्या भावना, वागणुकीचे निरनिराळे प्रकार असतात आणि आपल्याला त्यांच्या बरोबरच पुढे जायचे आहे. आपल्याला दुसरा मार्ग नाही. स्विकार करा आणि पुढे जा. कोणाबरोबरही कोणत्याही व्यवहारात तरुण अथवा म्हातारे, कुणाबरोबरही वावरताना, जीवनात तडजोड ही असतेच. प्रश्न : जगातील सगळे प्रश्न प्रेमानेच सुरु होतात आणि संपतात, असे कां? श्री श्री : अन्यथा जीवन किती कंटाळवाणे झाले असते. कल्पना करा, जर काही समस्या नसत्या, की त्रास नसते, आयुष्य किती सपक झाले असते, हो की नाही ? तुम्ही याच्या बद्दल अचंबा करत रहा. हे एक आश्चर्य आहे, प्रश्न नाही. प्रश्न : भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग राजकीय पवित्रा कां घेत नाही. श्री श्री :ज्या कुणाला असा पवित्रा घ्यायचा असेल त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग पाठिंबाच देईल. राजकारण हे आर्ट ऑफ लिव्हिंग साठी खूपच लहान असे क्षेत्र आहे. आम्ही सीमा पार केलेल्या असल्यामुळे आर्ट ऑफ लीव्हिंगने देशातील राजकारणात अडकून पडावे असे मला वाटत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग कितीतरी देशात कार्यरत आहे; ‘लोकांना योग्य मार्गावर रहाण्यासाठी प्रोत्साहन देणारे’, असे त्याचे स्वरूपच कायम राहील. मात्र ज्यांना राजकारणात जायचे असेल, विशेषत: युवक, तुम्हाला माझा पाठिंबा असेल. बाहेर पडा आणि करून दाखवा. प्रश्न : गुरुदेव, कृपया मिथ्याचाराबद्दल सांगाल कां ? त्यातून बाहेर कसे पडायचे ? श्री श्री : जेव्हा कुणी एखादी गोष्ट करण्याचा मनात विचार करत रहातो पण त्यावर कृती करत नाही तेव्हा त्याला मिथ्याचार म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही जेवणाबद्दल विचार करता पण जेवण करत नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि केले दुसरेच काही तरी तर त्यालाही मिथ्याचार म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही कुणाला तरी सांगितले की ,“ मी संध्याकाळी सहा वाजता येतो.” आणि तुम्ही मनात मात्र ठरवले आहे की तुम्ही जाणार नाही तर हा मिथ्याचार झाला. स्वत:शीच खोटे बोलणे किंवा स्वत:ला फसवणे म्हणजे मिथ्याचार. प्रश्न :वाईटाची अपेक्षा करण्याने मी जास्त वास्तववादी होतो आणि अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीशीही सामना करू शकतो. हे चूक आहे कां ? श्री श्री : एकेकाळी ‘वाईटाची अपेक्षा करणे’ हे फॅशनेबल समजले जायचे पण आज, बुद्धिवादी लोकांमध्ये या प्रवृत्तीने इतकी मर्यादा गाठली आहे की ती आता उपयोगाची ठरत नाही, नवनिर्मिती होत नाही. त्याने स्वत:चे किंवा समाजाचे काहीही भले होत नाही. ‘वाईटाची अपेक्षा करणे’ हे ताटातील एका कोपऱ्यात असलेल्या लोणच्यासारखे आहे. पण सगळे ताटच जर लोणच्याने भरून गेले आणि पोळीचा एक छोटासा तुकडाच कुठेतरी कोपऱ्यात असला तर काय होईल याची कल्पना करा. तुम्ही भूकेलेच रहाल आणि आज असेच झाले आहे. ‘वाईटाची अपेक्षा करणे’ गरजेचे आहे पण अगदी अल्प प्रमाणात. त्याने तुमच्यात वास्तवता यायला हवी हे खरे पण त्यामुळे तुमची कल्पनाशक्ती, तुमची परिवर्तनाची उर्मी हिरावली जाता कामा नये आणि तुमचा उत्साह नष्ट होता काम नये. त्याने तुमची सकारात्मकता, तुमची आकांक्षा, तुमचा आशावाद झाकाळून जाता कामा नये. असे असेल तर मग काही हरकत नाही. थोड्याशा वाईटाची अपेक्षा ठेवा. वेदामध्येही काहीशी उपेक्षा दिसेल. असे म्हटले आहे की, “ सृष्टीची सुरवात कुणाला माहित. देवाला माहित किंवा कदाचित त्यालाही माहित नाही.” असे वेदात म्हटले आहे. कुत्सितपणा आणि उपेक्षा ठीक आहे. फक्त लोणच्याचे उदाहरण लक्षात ठेवा. त्याला भात,डाळ किंवा पोळीची जागा घेता येणार नाही पण कोपऱ्यात कुठेतरी थोडेसे ठीक आहे. प्रश्न : गुरुदेव, जेव्हा माझ्या हे लक्षात येते की या जगातील माझे अस्तित्व अगदी क्षुल्लक आहे तेव्हा मी आळशी बनतो. मी एकाच वेळी उत्साही आणि विस्तारलेला कसा असू शकतो ? श्री श्री : मोठी स्वप्ने बघा. तुमचे संकल्प पक्के ठेवा आणि कोणत्याही अडचणींचा विचार न करता पुढे जात रहा. इतकेच. प्रश्न : तुम्ही म्हणाला होतात की २०१२ हे परिवर्तनाचे वर्ष आहे पण काहीच बदलले नाहिये. तोच भ्रष्टाचार , तेच गुन्हे होत आहेत. श्री श्री : थांबा ! तुम्हाला काय म्हणायचे आहे ? लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिले. २०१२ च्या शेवटच्या महिन्यात काय झाले बघा. संपूर्ण देश जागा झाला. लोक जागे होऊ लागलेत. पूर्वी महिलांवरचा हिंसाचार सहन केला जायचा. आम्ही जरी महिला सबलीकरणाचे कार्यक्रम करत असलो, महिला परिषदा भरवून त्यात महिलांच्या प्रश्नाबद्दल आणि स्त्रीभृणहत्येबद्दल चर्चा करत असलो, तरी आज एका घटनेमुळे अचानक सगळा देश खडबडून जागा झाला आहे. अशी ही एकाच घटना नाहिये. अशा २०,००० घटना झालेल्या आहेत. फक्त दिल्लीत त्यावेळी अशा ८०० घटना झाल्या होत्या. ह्याला म्हणतात जागे होणे. लोक जागे होताहेत हेच परिवर्तन. हो की नाही ? त्यातही भारतीय वर्ष मार्चमध्ये सुरु होते हे लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्या महिन्यांची नावं माहिती आहेत कां ? इंग्लिश महिने इंग्लिशमध्ये नाहीयेत, ते संस्कृतमध्ये आहेत. तुमच्यापैकी किती जणांना हे माहित नव्हतं ? (बरेच जण हात वर करतात.) डिसेंबर म्हणजे काय माहित आहे ? दस म्हणजे दहा आणि अंबर म्हणजे आकाश, त्यामुळे दश अंबर म्हणजे दहावे आकाश. नोव्हेंबर म्हणजे नववे आकाश, ऑक्टोबर म्हणजे आठवा महिना. सप्त म्हणजे सात, अंबर म्हणजे आकाश. मग सप्तअंबर झाला सप्टेंबर. ऑगस्ट म्हणजे षष्ठ म्हणजेच सहावा, म्हणून ऑगस्ट हा सहावा महिना. जानेवारी हा ११वा महिना, फेब्रुवारी हा १२ व महिना. मार्च म्हणजे पुढे जाणे.म्हणजे जेव्हा नवीन वर्ष सुरु होते. त्याच वेळी, मार्च महिन्याच्या शेवटी, सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. अजूनही अफगाणिस्थान, इराण वगैरे देशात २१ मार्च हा नवीन वर्षाची सुरवात म्हणून साजरा केला जातो कारण तीच वैदिक परंपरा होती. मार्च म्हणजे नूतन. फेब म्हणजे सर्वात शेवटचा. आपण सर्वात टोकाचा म्हणतो नां ? तेच फेब्रुवारी. तर ही सगळी महिन्यांची नावे संस्कृत आहेत. तुम्ही जर एखाद्या इंग्लिशच्या प्राध्यापकाला विचारलं की सप्टेंबर किंवा नोव्हेंबरचा अर्थ काय तर त्यांना काहीच माहित नसेल. मी याचा विचार केला आणि माझ्या लक्षात आले की संस्कृतशी किती जवळचे नाते आहे. आणि हे किती जुळते आहे. आज तुम्ही काही तरी महत्वाचे शिकलात. महिन्यांच्या नावांचे अर्थ. संस्कृतची ही एक गोष्ट छान आहे की कुठलेच नाव बिनअर्थाचे नसते. तुम्हाला माहित आहे कां की पानांना पर्ण म्हणतात पर्ण म्हणजे काय माहित आहे कां ? जो सूर्यप्रकाश आणि आर्द्रता शोषून घेतो त्याला पर्ण म्हणतात. तुम्हाला माहित आहे कां, की येशू नाताळच्या दिवशी जन्मला नव्हता? तुमच्यापैकी किती जणांना हे माहित नव्हतं ? (बरेच हात वर येतात) तुम्ही ती येशू आणि नाताळ बद्दलची डॉक्युमेंटरी फिल्म बघायला हवी. फक्त २०० वर्षांपूर्वी लोकांनी नाताळ आणि येशू यांचा संबंध जोडला. आधी तो फक्त आयन दिन म्हणून साजरा केला जायचा. वेदिक काळापासून जगभर तो सूर्यदेवाचा दिवस म्हणून साजरा केला जायचा. येशूच्या जन्माबद्दलचे वर्णन वाचले तर तुम्हाला दिसेल की ते सगळे वसंत ऋतूचे वर्णन आहे. अति थंडी असलेल्या हिवाळ्यात त्याचा जन्म झाला नव्हता. तसेच त्याची गर्भधारणा मे महिन्यात झाली असेल तर डिसेंबरमध्ये त्याचा जन्म होऊ शकत नाही. शुद्ध अशी गर्भधारणा झाली आणि डिसेंबर हा फक्त सातवा महिना असणार. येशू हे काही कमी दिवसात जन्मलेले बाळ नव्हते. त्याने पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेतले होते. पण लोकांना त्याच्या जन्माचा नक्की दिवस माहित नव्हता. त्यामुळे लोकांनी जरी क्रिस्ती धर्म स्वीकारला तरी चर्च त्यांना नाताळ साजरा करण्यापासून थांबवू शकले नाही. म्हणून त्यांनी त्यात अशी भर घातली की , “हाच येशूचा जन्म दिवस आहे असे समजा आणि आपण तो असा साजरा करुया.” अशाप्रकारे त्यांनी सूर्य देवाच्या जागी येशूला आणले. प्रश्न : गुरुदेव, पृथ्वी, अग्नी आणि इतर देव जेव्हा महादेवाचा मुलगा कार्तिकेय आणि देवी पार्वती यांना तर्कासुरापासून वाचवायला गेले तेव्हा देवी पार्वतीने रागाच्या भरात त्यांना शाप दिला. देवी असूनही तीला राग अनावर झाला हे कसे शक्य आहे ? श्री श्री : पुराणातील गोष्टींचे हे चुकीचे चित्र रेखाटले आहे. टीव्ही वाल्यांना हे नेहमीच जरा जास्त नाट्यपूर्ण करायचे असते.मी देवी पार्वती बघतो तेव्हा भावनांचे अति प्रदर्शन, रडणे, माफी मागणे वगैरे दिसते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यांनी देवांना सामान्य माणसाच्या आणि सामान्य माणसांच्या भावनांच्या स्तरावर आणून ठेवले आहे. निर्माते, दिग्दर्शक यांनाही मालिकेचा भाग लांबवायचा असतो त्यामुळे ते तिखट मीठ घालून प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीपेक्षा जरा जास्त नाट्यपूर्ण करतात. मूळ पुराणात ते असे नसते. देवी पार्वती अशा विविध भावनांमधून जात नाही. लोकांनी लिहिलेल्या दूरदर्शन मालिकेच्या पटकथेतच फक्त देवी तुम्हाला अशी दिसते आणि गणपती असा परत परत माफी मागताना दिसतो. तो स्वत:च देव असताना त्याला दुसऱ्यांची कोणत्याही प्रकारे माफी मागण्याची काय गरज आहे ? हे बघा, जेव्हा तुम्ही कोणतेही पुरण वाचता तेव्हा त्यात आदिदाता हे मुख्य आणि वंदनीय पात्र असते .ज्या पूज्य देवतेच्या जीवनावर आणि शौर्यगाथांवर आधारित गोष्टी त्या पुराणात असतात. उदाहरणार्थ, शिवपुराण बघितले तर शंकर महादेव सर्वात श्रेष्ठ आणि बाकीचे देव आणि इतर सगळे दुय्यम असतात. तसेच तुम्ही जर गणेश पुराण बघितले तर गणेश हा त्या पुराणातील सर्वात श्रेष्ठ असतो. तसेच देवी पुराणात ब्रह्मा, विष्णू, महेश हे, देवीचे त्या पुराणातील महत्व दाखवण्यासाठी देवीच्या चरणाशी असतात. देवी पुराणातील सर्व गोष्टी देवीलाच मुख्य देवाता मानून तिच्याच भोवती घडत असतात आणि बाकीच्या देवता दुय्यम भूमिका घेतात. विष्णू पुराणात तुम्हाला दिसेल की विष्णूशिवाय दुसरा कोणताही देव श्रेष्ठ नाही. आणि बाकी सगळे देव त्याच्यापेक्षा गौण आहेत कारण तो त्या पुराणाचा मुख्य देव आहे. म्हणूनच देवाला इष्ट म्हणजेच श्रेष्ठ असे म्हटले जाते, ज्याच्या भोवती सर्व काही घडत असते. त्यामुळे आपण ज्या देवतेला इष्ट मानतो ती देवता आपल्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि परमपूज्य असते. आदि शंकराचार्यांनी लिहिलेला एक सुंदर श्लोक आहे. ज्यात ते म्हणतात, ‘मननाथा श्री जगन्नाथा, मद्गुरू श्री जगद्गुरू, मदात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्री गुरवे नम:’ याचा अर्थ माझा इष्ट देव हा सर्व सृष्टीचा देव आहे. माझे गुरु हे सर्व सृष्टीचे गुरु आहेत, माझा आत्मा सर्व जीवात आहे. भक्ताच्या मनात आपल्या देवतेबद्दल जेव्हा अशी भावना असते तेव्हा त्याला विशिष्ठ भक्ती असे म्हणतात. ‘माझ्या देवापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही’ अशी जेव्हा भावना येते तेव्हा मन एकाग्र होते. कारण सर्वश्रेष्ठाकडे जाण्याची मनाची प्रवृत्ती असते. जर तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे काही सापडले नाही तर तुमचे मन आणखी जास्त श्रेष्ठ शोधण्यासाठी भटकत राहील. त्यामुळे मनाला एकाग्र करण्यासाठी गहिऱ्या भक्तीमध्ये केंद्रित होण्यासाठी पुराणात या निरनिराळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळेच शिवपुराणात म्हटले आहे की शिवा हाच सर्व श्रेष्ठ बाकी सर्वजण शिवापुढे नतमस्तक होऊन वंदन करतात.हा त्यातला खरा अर्थ आहे. पण दूरदर्शन मालिका बनवणाऱ्या या लोकांना जास्त नाट्यपूर्ण करावे लागते नाहीतर ते कंटाळवाणे होईल म्हणूनच ते त्यात जरा मसाला घालतात. असे कधीच झालेले नाही की दुर्गादेवीने तिचा क्रोध असा जगात कुणावरही काढला. दुर्गेचा क्रोध फक्त महिषासुरावर होता. तोही पूर्णपणे क्रोध नव्ह्ता तर त्यात काहीसे सामंजस्य आणि सुखदपणा होता. देवी दुरगा फक्त हंऽऽऽऽऽऽ असा आवाज करत टाकलेल्या उत्छ्वासाने महिषासुराची (नकारात्मकता आणि निष्क्रियता यांचे प्रतिक) राख करून टाकते. दूरदर्शनने पुराणातील गोष्टींची निरनिराळी चित्रे रेखाटली आहेत. ते सत्य मानायची गरज नाही. प्रश्न : प्रिय गुरुदेव, जर कुणाला वाटत असेल की स्वत:चा इष्टदेव सर्वश्रेष्ठ आहे तर त्याने मूलतत्ववाद / दुराग्रह येणार नाही कां ? श्री श्री : हे बघा, जगत्ल्या कोणत्याही आईला तुम्ही विचारले तर ती म्हणेल की तिचा मुलगा सर्वात चांगला आहे. जगात आणखी कितीतरी मुले असतील पण तिच्यासाठी तिचा मुलगा सर्वात चांगला आहे. मूलतत्ववाद म्हणजे दुसरे चूक किंवा तुमच्यापेक्षा कमी आहेत असे दर्शवणे. तरीही, माझ्यासाठी माझा देव सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचा देव तुच्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल असे वाटणे म्हणजे मूलतत्ववाद आही. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'