23
2013
May
|
उलान बाटोर, मंगोलिया
|
ध्यान करण्याने, वाटणारही नाही इतके आरोग्य सुधारू शकते वैश्विक कुटुंब निर्माण करणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वप्न आहे. संपूर्ण जग एक कुटुंब म्हणून जोडले जायला हवे. मंगोलियात हे मला मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मंगोलियाची आर्थिक परिस्थिती बरीच चांगली झाली आहे आणि त्याचा खूपच वेगाने विकास होत आहे. या आर्थिक विकासाबरोबरच मानवी मूल्ये टिकून रहातील याची काळजी घ्यायला हवी. मंगोलियाची आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे आणि या देशात ती तशीच टिकून राहावी याची आपण काळजी घ्यायला हवी. आधुनिक काळातील मानसिक ताण तणाव आणि हिंसा हे आता बास झाले. जगाच्या या भागात आपण ते वाढू देता कामा नये. समाज जसजसा सामर्थ्यवान बनतो आणि आर्हिक दृष्ट्या समृद्ध होतो तसतसे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागते. अमेरिकेत काय होते आहे बघताय नां ? जगातील सर्वात विकसित देशात हिंसेच्या कितीतरी घटना झाल्या आहेत. मागच्या एका वर्षात अमेरिकेत एक कोटी हिंसेच्या घटना नोंदविल्या गेल्या. आर्ट ऑफ लीव्हिंगने जगभरात अहिंसा चळवळ सुरु केली आहे आणि विशेषत: अमेरिकेत. अहिंसा आणि करुणा जास्तीत जास्त प्रमाणात आपण समाजात रुजवली पाहिजे, मंगोलियात सुद्धा. जेव्हा आपल्याला खूप जास्ती गोष्टी करायच्या असतात, वेळ कमी असतो आणि शक्ती नसते तेव्हा मानसिक ताण येणे साहजिक आहे. आजच्या जगात आपण आपल्या गरजा तर कमी करू शकत नाही, त्यामुळे मग आपल्याला आपली शक्तीच वाढवायला हवी. जेव्हा आपण आपल्या सवयी बदलतो, जेव्हा आपण योग्य आणि सकस आहार घेतो,चांगली विश्रांती घेतो, आणि सकारात्मक विचार करतो तेव्हा आपली शक्ती वाढते. जर तुम्ही एका जागी बसून अर्धा तास किंवा अगदी दहा मिनिटं जरी नकारात्मक विचार केलात तरी संपूर्ण दिवस थकवा जाणवलाच म्हणून समजा. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला म्हणजे, नाकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे जाणे. कुरकुर करणाऱ्या मनाच्या अवस्थेकडून करुणामय मनाच्या अवस्थेकडे, तणावग्रस्त चेहऱ्याकडून हसऱ्या चेहऱ्याकडे, तणावाकडून प्रसन्नतेकडे जाणे. तुमच्या श्वासाकडे लक्ष देऊन आणि ध्यान करून हे मिळवणे शक्य आहे. आज शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की सुदर्शनक्रिया आणि ध्यान यांच्यामुळे कुणाला वाटणारही नाही इतके आरोग्य सुधारू शकते. नॉर्वे इथल्या ऑस्लो विद्यापीठातल्या एका शास्त्रज्ञाने नुकतेच एक संशोधन केले. त्यांना असे दिसून आले की अगदी दोन दिवस जरी कुणी या तंत्रानुसार साधना केली तरीही त्याचा डी.एन.ए. वर, माणसाच्या गुणसुत्रांवर परिणाम होतो. त्यांनी सांगितले की आपल्या शरीर सस्थेतील जवळ जवळ ३०० गुणसूत्रे कॅन्सर वगैरे सारख्या रोगांना कारणीभूत असतात. जेव्हा कुणी ध्यान करते तेव्हा ही गुणसूत्रे दाबली जातात. अर्थात जगभरातील करोडो लोकांचा हा रोजच्या जीवनातला अनुभव आहे, ज्यांनी कळवले आहे की त्यांना शारीरिक,मानसिक, भावनिक, आणि अध्यात्मिक दृष्ट्या किती फायदा झाला.त्यांची तब्येत सुधारली, लोकांबारोबरचे नातेसंबंध सुधारले आणि बरेच काही. त्यामुळे आपण आपली मुळे खोलवर रुजवायला हवी आणि आपली दृष्टी जास्त व्यापक करायला हवी. आणि जो काही थोडा काळ आपण या पृथ्वीवर राहणार आहोत त्या काळात आपण जास्त हसून आनंद पसरवायला हवा. तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा म्हटले होते की या देशाची GDP (एकून अंतर्गत उत्पादन) नक्की वर जाईल. आणि मला ऐकून आनंद झाला की ते खरोखरच वर गेले आहे. संयुक्त राष्ट्रांकडून आजकाल आणखी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे GDH (एकूण अंतर्गत आनंद). मंगोलियात तोही वर जायला हवा. या देशात सुशिक्षित लोकांची संख्या मोठी असल्यामुळे आध्यात्मिक मूल्ये शिकवणे सोपे आहे. आज भूतान हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. मला वाटतं याबाबतीत मंगोलियाने भूतानशी स्पर्धा करावी. तो नक्की अशी स्पर्धा करू शकेल आणि GDH च्या उच्च स्तरावर पोहोचू शकेल. आपण हेच आपले ध्येय ठरवूया. आज इथे असलेल्या सर्वांनी एक जबाबदारी स्वीकारली तर मला आवडेल; आपल्याला हे बघायचे आहे की या देशातील तुरुंग आणि दवाखाने ओस पडले आहेत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने कामाला लागुया. हे साध्य करण्यासाठी आपल्याला काही समाजकार्य करावे लागेल. तुम्ही ध्येयवादी असलेले मला आवडेल पण लोभी नको. जेव्हा लोक लोभी होतात तेव्हा भ्रष्टाचार वाढतो. जिथे आपलेपणा संपतो तेथे भ्रष्टाचार सुरु होतो. कोणताही कायदा भ्रष्टाचार थांबवू शकत नाही. भ्रष्टाचार कशाने थांबणार असेल तर तो अध्यात्माने. जेव्हा लोकांच्या मनात आपलेपणाची भावना असेल तेव्हा भ्रष्टाचार संपलेला असेल. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांचा खरा अपराधी कोण असेल तर तो म्हणजे मादक द्रव्यांचे आणि दारूचे व्यसन. आपण हे बघितले पाहिजे की आपले युवक सिगारेट, दारू यांच्या व्यसनी लागत नाहीत कारण त्यामुळे माणसाचे आयुष्य बरबाद होते. लोक जेव्हा मादक द्रव्यांच्या आहारी जातात तेव्हा ते काय करतात याचे त्यांना भान रहात नाही त्यामुळेच ते गुन्हे करतात. त्यामुळे माता, भगिनी म्हणून, एक सूज्ञ व्यक्ती म्हणून तुम्ही आपल्या युवा पिढीला अशाप्रकारच्या, स्वास्थ्य, संपत्ती आणि मन यांना घातक असलेल्या कुठल्याही मादक द्रव्यांचे व्यसन लागण्यापासून दूर ठेवायला हवे. प्रदूषण हे आणखी एक क्षेत्र आहे ज्याकडे लक्ष द्यायला हवे. जगातील वेगवेगळ्या भागात प्रदूषण वाढत चालले आहे. मंगोलिया अजूनही खूप शुद्ध आहे. इथली जमीन, पाणी, इथले सगळे अजून शुद्ध आहे. वातावरण सुस्थितीत ठेवले आहे. ही जमीन, पृथ्वीवरचा परिस्थितीक स्वर्ग म्हणून सांभाळूया. अन्न पिकवण्यासाठी इथे धोकादायक अशी रसायने वापरली जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. कीटकनाशके नाही, रासायनिक खाते नाही तर आपण सेंद्रीय खते वापरून नैसर्गिकरीत्या शेती करुया. मंगोलियाला याबद्दलची माहिती, तंत्र शिकविण्यासाठी ज्या कशाची गरज असेल ते सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग कडून केले जाईल. भारतात आणि जगातल्या इतर देशात आम्ही सेंद्रीय शेती करत आहोत. यावर आम्ही बरेच संशोधन केले आहे आणि ते मंगोलियामधील शेतकऱ्यांना सांगायला आम्हाला आवडेल. भारतामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या २०० हून अधिक शिक्षण संस्था आहेत. आपले एक विद्यापीठ आहे आणि व्यवसाय प्रशासन उच्च पदवी (MBA) शिकवणारी दोन महाविद्यालये आहेत. मी आमच्या उपकुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी मंगोलियातून भारतात शिकायला येण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी MBA च्या १० जागा राखून ठेवाव्या. आमच्याकडे अगदी मर्यादित जागा आहेत, या महाविद्यालयात फक्त १८० जागा आहेत. तुमच्या मित्रांना आणि आमच्या महाविद्यालयात शिकण्याची ज्यांना इच्छा असेल अशांना तुम्ही नक्की अर्ज करायला सांगा. आज सकाळी मी मंगोलियाच्या माननीय पंतप्रधानांना भेटलो. त्यांना मी म्हटले की इथे जशी गरज असेल त्यानुसार एखादी शाळा किंवा महाविद्यालय सुरु करण्याची आमची इच्छा आहे. तुमच्यापैकी ज्यांना शाळा सुरु करायची असेल किंवा मंगोलियातील या प्रकल्पात भाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया आपली नावे व नंबर द्यावेत. आपण एक समिती स्थापन करून वेगवेगळ्या भागात एक दोन शाळा सुरु करुया. जिथे पूर्व आणि पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण सगळीकडचे उत्तम ते दिले जाईल. आणि एक जागतिक शैक्षणिक केंद्र निर्माण होईल. जीवन हे एखाद्या वृक्षासारखे आहे. ज्याची मुळे जुनी असतात आणि फांद्या नवीन असतात. अगदी तसेच जीवनात प्राचीन ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञान याची एकत्रितपणे गरज असते. तसेच मला आणखी एक गोष्ट समजली की मंगोलियामध्ये डोक्याला मालिश करण्याचे एक खास तंत्र आहे ज्याने लोकांना बरे वाटते. हे जगात फारसे माहित नाही. हे ज्ञान भारतात, अमेरिकेत आणि जगभर नेले जावे आणि तिथे लोकप्रिय व्हावे असे मला वाटते. जसे आम्ही आयुर्वेद, अॅक्यूपंक्चर आणि अस्थिचिकित्सा पद्धतीचे केले. हे असे करण्याने खूपच चांगले होईल. मानवाला उपयुक्त अशा पारंपारिक मंगोलियन चिकित्सा पद्धती आणि चिकित्सा तंत्रे यांचा प्रसार होऊन ते सगळीकडे पोहोचले पाहिजे. मी अशा डॉक्टर्सना भारतात येण्याचे आमंत्रण देतो. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पारंपारिक चिकित्सा पद्धतींबद्दल काही तरी करायला आम्हाला आवडेल. प्रश्न : आपला आतला प्रवास आणि बाहेरचे घटनांनी भरलेले जग यांचा मेळ कसा घालावा ? श्री श्री : आतला प्रवास आणि बाहेरचे घटनांनी भरलेले जग हे एकमेकाला पूरक आहेत. जर तुम्ही आंतमध्ये आनंदी असाल तर बाहेर जोशपूर्णतेने काम करू शकाल. आणि तुम्ही जितके जास्त जोशपूर्ण असाल तितकी तुमची विश्रांती तुमचे ध्यान जास्त गहिरे असेल. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचा आनंद वाढतो. जे लोक आळशी असतात ते आनंदी होऊ शकत नाहीत. आणि जे लोक जोशपूर्ण असतात तेही आनंदी असतीलच असे नाही. जोशपूर्णते बरोबरच अंतर्गत शांती असणे गरजेचे आहे. म्हणूनच अधून मधून सुट्टी घेउन आपल्यातच खोलवर जाऊन ध्यान कसे करायचे हे शिकायला हवे. प्रश्न : असे वाटते की आपण चिंधीच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे आहोत. कृपया, यावर प्रकाश टाकाल कां ? श्री श्री : होय, हा खूप मोठा आध्यात्मिक प्रश्न आहे. खूप चांगले काम केलेल्या एखाद्याला किंवा अगदी वाईट गुन्हा केलेल्या एखाद्याला तुम्ही विचारले तर ते सांगतील की कसे माहित नाही पण हे त्यांनी केले नाही ते फक्त त्यांच्याकडून करवून घेतले गेले. हा खूप जणांचा अनुभव आहे. तुमच्यात काहीतरी आहे जो तुमच्या आसपास होणाऱ्या घटनांचा साक्षीदार आहे. या विषयाबद्दल तुम्हाला आणखी वाचायचे असेल तर अष्टावक्र गीता किंवा योग वसिष्ठ वाचा. याने तुम्हाला त्यातील खोलवरची माहिती कळेल. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'