11
2013
May
|
बंगलोर, भारत
|
नंतर येतात पुढचे दोन श्लोक, ‘बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् I बुद्धीर्बुद्धीमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् II बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् I धर्माविरूद्धो भूतेषु कामोsस्मि भरतर्षभ II’ (७.१० व ७.११) प्रत्येकामध्ये बीज उपस्थित आहे. या जगात येणारा प्रत्येक मनुष्य आपल्या सोबत काहीतरी ( गुण किंवा देणगी) घेऊन येतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे काही उपजत गुण (बीज) असतात जे बदलत नाहीत. अनेक वेळा तुम्ही शिक्षकांना, ‘विद्यार्थ्यामध्ये हा गुण जर केवळ विकसित होऊ शकला तर बरे’ असे म्हणताना ऐकले असेल. तुम्ही त्याच गोष्टीचा केवळ विकास करू शकता ज्याचे बीज तुमच्या आत असते. जर सुरुवातीपासूनच काही नसेल तर मग तुम्ही ते गुण कसे काय विकसित करणार? म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘अनादी काळापासून प्रत्येक जीवामध्ये (जिवंत प्राण्यामध्ये) बीज हजर आहे आणि हे काही नवीन नाहीये. त्याला कोणता आरंभ नाही आणि ते कधी पेरल्या गेले हे कोणालाही माहिती नाही. मीच हे बीज आहे जे सर्व जिवंत प्राण्यांमध्ये (भूतानां) उपस्थित आहे. हे तू जाणून घे कारण प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक जीवजंतू या सर्वांच्या आत एक बीज अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे अनादी काळापासून हे बीज उपस्थित आहे त्याप्रमाणे अनादी काळापासून हे सर्व जीव अस्तित्वात आहेत. तीन गोष्टी आहेत आहेत ज्यांना अनादी (आरंभ रहित) आणि अनंत (शेवट नसलेले) आहेत असे मानतात. एक आहे ईश्वर, दुसरा जीव (इथे वैयक्तिक आत्मा किंवा चैतन्य या अर्थाने). आणि तिसरा आहे प्रकृती (सृष्टी). अनादी काळापासून अपरा-प्रकृती अस्तित्वात आहे. हे ईश्वर आणि जीव यांच्याबाबतीतसुद्धा लागू आहे. तर निर्मिती ही वर्तुळाप्रमाणे (वृत्त); वर्तुळाला न आरंभ असतो आणि न अंत, आणि तरीसुद्धा प्रत्येक बिंदू हा सुरुवात आणि शेवट दोन्हीही असतो. भगवान कृष्ण पुढे अजून समजावतो, ‘हे अर्जुना, जर तुम कोणी बुद्धिमान व्यक्तीला पाहिलेस तर असे समजू नकोस की त्या व्यक्तीने तिचे बुद्धिमत्ता आपणहून कमावली आहे. बुद्धीमंतातील बुद्धीमानता मी आहे.’ भगवानाने ही अतिशय चलाख गोष्ट केली होती. जिथे कुठे मन अडकून पडते किंवा आकर्षित होते तिथे भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला त्या सर्व जागेमधून काढून पुनःपुन्हा त्याच्यावर केंद्रित करण्यास भाग पडतो. बुद्धिमान लोकांचा आपल्यावर फार प्रभाव पडतो. आपण विचार करतो, ‘हा माणूस किती बुद्धिमान आहे. त्याची बुद्धी किती कुशाग्र आहे आणि त्याला किती ज्ञान आहे’. अश्या प्रकारे आपण त्याची स्तुती करू लागतो. मनाला परत आणण्यासाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी तळपती बुद्धीमानता दिसून येईल तेव्हा ती मी आहे हे जाणून घे. तो केवळ माझ्या एकट्याचा अविष्कार आहे.’ असे म्हणून तो मनाला परत आणून त्याच्यावर केंद्रित करतो. याचा अर्थ असा की जेव्हा कधी तुम्ही कुशाग्र बुद्धी पाहता तेव्हा ती कृष्ण आहे आणि ती कृष्णाकडूनच आलेली आहे हे लक्षात घ्या.जेव्हा तुम्ही हे लक्षात घेता तेव्हा तुमचे मन इतरत्र कुठेही भटकू शकत नाही (कारण कुठेही मन गेले तरी त्याला कृष्णाचे रूप गवसेल आणि अशा तऱ्हेने ते केंद्रित राहील). त्याचप्रमाणे तो म्हणतो, ‘सामार्थ्यावानांमध्ये मी तेजस (प्रभा किंवा उज्ज्वालता) आहे. कोणाच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणारा मी तजेला आहे. लालसेचा परिणाम न होणाऱ्या व्यक्तीमधील मी धैर्य आहे.’ द्वेष आणि तिरस्कार यापासून एखाद्याला शक्ती मिळू शकते. असे लोक अतिशय भक्कम दिसतात. परंतु मी ते नाही. अतिरेकी आणि हिंसक लोक द्वेषातून प्रचंड शक्ती कमावताना दिसतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘(नकारात्मकतेतून मिळणारी) ती शक्ती मी नाही.’ अतिरेकी इतके क्षोभित होऊन चालतात. ते दुसऱ्यांना घाबरवतात आणि आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. परंतु अशी शक्ती काम आणि क्रोध रहित नसते. जिथे लालसा असते तिथे तिरस्कारसुद्धा असतो. जे लालसेपोटी शक्ती प्रदर्शन करतात ते मूर्ख आहेत. तसेच, उद्विग्नतेची भावना असणारे लोकासुद्धा कमालीची शक्ती प्रदर्शित करतात. आजकल जगामध्ये हे नेहमीच दिसून येते. उद्विग्नेतेची भावना असणारे लोक स्वतःला अतिशय भक्कम दाखवितात, परंतु अशी शक्ती काहीही उपयोगाची नाही. क्षोभित इच्छांमुळे येणारी शक्ती हे वरकरणी असते, केवळ वरवरची. ही शक्ती आतून पोकळ असते. अशा माणसांच्या मनात खोल भीती दडून असते. आणि आतून भीती असणारे भक्कम कधीच असू शकत नाही. आपल्या स्वतःच्या चैतन्यासोबत जो जोडलेला नसतो तो कधीही भक्कम होऊ शकत नाही. जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या केंद्रस्थानासोबत जोडलेली नाही आणि स्वतःच्या अस्तित्वाविषयी जागरूक नाही, अश्या व्यक्तीने बाहेर कितीही जरी मोठे शक्ती प्रदर्शन तरी आतून ती व्यक्ती भीतीने पोकळ असते. तसेच तिरस्कार आणि राक्षसी वृत्तीने येणारी शक्ती हीसुद्धा आतून पोकळ असते. ‘द्वितीय द्वै भयं भवती’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ दोनचे अस्तित्व (इथे द्वंद्व या अर्थाने; म्हणजे स्वतःसोबत संयुक्त न झालेला हा अर्थ अभिप्रेत आहे) हे भयाचे कारण आहे. जे लोक स्वतःच्या चैतन्याबरोबर संयुक्त झालेले नाहीत (अंतर्मुखी) आणि आतल्या दिशेने स्वयंकडे वळलेले नाहीत, अशा लोकांना कधीच भक्कम म्हणता येणार नाही. आणि जेव्हा एखादा लालसा आणि क्षोभाने युक्त असतो तेव्हा त्यांना आतल्या दिशेने जाऊन स्वयंसोबत संयुक्त होता येत नाही. जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या आत केंद्रित होते तेव्हा प्रचंड शक्ती उदय पावते. अशी शक्ती लालसा आणि क्षोभ यांच्या नकारात्मकतेपासून मुक्त असते आणि त्यांच्या पलीकडे असते. केवळ तीच खरी शक्ती आहे. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो, ‘जिथे कुठे तुम्हाला अशी निव्वळ शक्ती दिसेल तिथे मी आहे हे जाणून घ्या.’ आता तुम्ही विचाराल, ‘भगवान कृष्णाने सांगितले की जेव्हा आपण लालसा आणि क्षोभ यापासून मुक्त असतो तेव्हा महान शक्ती येते. याचा अर्थ असा की सर्व इच्छा वाईट आहेत? इच्छा असणे चुकीचे आहे, किंवा सर्वांचे कल्याण होवो ही इच्छासुद्धा चुकीची आहे? याचा अर्थ असा झाला का की एखाद्याला काहीसुद्धा इच्छा आकांक्षा असू नये?’ नाही, असे नाहीये. भगवान कृष्ण म्हणतो, ‘धर्माच्या विरुद्ध न जाणाऱ्या (कर्तव्याचे सदाचरण) सर्व इच्छा आकांक्षा मी आहे. जे सर्व लोक धर्मानुसार वागतात आणि आपल्या स्वधर्माचे (आपली जबाबदारी असलेल्या आपल्या कर्तव्याचे) पालन करतात, अशा लोकांमध्ये उद्भवणारी इच्छा ही मी आणि केवळ मीच आहे.’ तुम्ही हे अनुभवले असेल: अशा प्रसंगी जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात उठणाऱ्या इच्छेनुसार वागता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमची आणि इतरांची उन्नती झाली आहे. सगळ्यांचा त्याने फायदा झाला आहे. अशा इच्छा या देवाचा अविष्कार असतात. जेव्हा आपण धर्मानुसार वागतो तेव्हा आपल्या हातून कोणतीही चूक घडू शकत नाही. तसेच धर्मासोबत इच्छासुद्धा निर्माण होतात. परंतु अशा इच्छा या स्वभावाने दैवी (दैवी इच्छाशक्तीने प्रेरित) असतात. म्हणूनच ‘तन्मेया मनः शिव-संकल्पमस्तु’ (सर्वांचे कल्याण करणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो) असे वेदांमध्ये म्हटलेले आहे. सर्वांचे भले करणाऱ्या पवित्र इच्छा माझ्या मनात येवो. मला सत्यकडे नेणाऱ्या आणि जे काही मंगल आहे त्या सर्वांकडे घेऊन जाणाऱ्या इच्छा माझ्या मनात येवो. आता, सत्य जाणण्याची इच्छासुद्धा एक इच्छा आहे. जर आपल्याला आयुष्यात प्रगती होऊन पाहिजे असेल तर तीसुद्धा एक इच्छा आहे. सर्वांचे भले होण्याची इच्छासुद्धा पुन्हा एक इच्छा आहे. (सर्वांच्या) अभीष्टचिंतनाशिवाय तुम्ही सण साजरे करूच शकत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात इच्छेशिवाय एक पाऊलसुद्धा उचलू शकत नाही. जीवनात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे इच्छा असतात. आयुष्यात तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कृती मागे कारण असते, आणि ते कारण आहे इच्छा. तर मग कोणत्याप्रकारची इच्छा असायला पाहिजे? अशी इच्छा जी धर्माच्या विरोधात नाही तर धर्माला अनुसरून आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी धर्माला अनुसरून असलेल्या सर्व इच्छा आहे.’ तुम्ही सर्वांनी कधीतरी हे अनुभवले असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वागलात आणि त्याचा निकाल तुम्हाला पाहिजे तसा लागला, आणि अनेक लोकांना तुमच्या या कृतीने दिलासा मिळाला. अशा काही इच्छा आहेत ज्या तुमच्यात निर्माण होतात,जेव्हा तुम्ही त्यानुसार कृती करता तेव्हा त्याने तुम्हाला आणि सभोवतीच्या सर्वाना शांतता आणि आराम मिळतो. अशा इच्छा मनात कोणताही कलह निर्माण करीत नाही आणि त्या धर्माच्या विरुद्ध नसतात. धर्माच्या विरुद्ध असणारी तुमची कोणतीही कृती तुम्हाला मनात टोचण देईल. ती तुम्हाला आतून त्रास देत राहील आणि तुम्हाला वाटेल, ‘अरे, मला वाटते की मी काहीतरी खरोखर चुकीचे केले आहे’. तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला हे सांगेल. परंतु जेव्हा तुमची कृती धर्माला अनुसरून असेल तेव्हा तुम्हाला शांत आणि शिथिल वाटेल. ‘ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्र्च ये I मत्त एवेति तान्विध्दि न त्वहं तेषु ते मयि II’ (७.१२) भगवान कृष्ण म्हणतो, ‘हे अर्जुना, तीन गुण, सत्त्व, राजस आणि तमस हे माझ्यातून निर्माण झालेले आहेत. परंतु ना मी त्यांच्यात आहे आणि ना ते माझ्यात, तरीसुद्धा ते सर्व माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. हे तू जाणून घे.’ हे अतिशय विचित्र वाक्य आहे. भगवान कृष्ण म्हणतो, ‘मी त्रिगुणाने नियंत्रित नाही आणि त्रिगुण माझ्यामध्ये निवाससुद्धा करीत नाही, तरीसुद्धा ते माझ्यापासून अस्तित्वात आले आहेत.’ यामागे मोठे वैज्ञानिक सत्य दडले आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेण्यास खोलवर जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की जेव्हा तुम्ही त्रिगुणांच्या खेळाचे साक्षीदार होता तेव्हा तुम्ही त्या सर्वांपासून विभक्त होता. म्हणून तो म्हणतो, ‘ जरी ते (त्रिगुण) माझ्यापासून वेगळे आहेत, तरी ते माझाच विस्तार आहे.’ मी माझ्या शरीरावर कापड घेतले आहे पण मी ते कापड नाही आणि मी त्या कापडाचा भागसुद्धा नाही. हे समजण्यास हे उदाहरण सर्वात जवळचे आहे. जसे आपण आपल्या अंगावर कपडे घालतो, पण आपण आपले कपडे बनत नाही आणि ना आपण त्या कपड्यांचा भाग बनतो, तरीसुद्धा ते आपल्या मालकीचे असतात. तुम्हाला हे समजले का? भगवान कृष्ण म्हणतो, ‘तो मी आहे ज्याने त्रिगुण (कपडा) निर्माण केला, आणि ते माझ्या मालकीचे आहेत, तरीसुद्धा मी त्यांनी प्रभावित नाही आणि ना ते माझ्यामध्ये निवास करतात आणि मीसुद्धा ते त्रिगुण नाही. म्हणून, हे धनंजय (अर्जुनाचे आणिक एक नाव ज्याचा अर्थ आहे महान संपदेचा जेता), तूसुद्धा त्रिगुणांचा साक्षीदार बन. ते माझ्या दैवी स्वभावाचा एक भाग आहे हे तू समजून घे. ते मी निर्माण केले आहेत आणि तो मीच आहे जो त्यांना कायम ठेवून आहे, आणि तरीसुद्धा मी हे त्रिगुण नाही.’ ज्याप्रमाणे तुमच्या शरीराच्या वेगवेळ्या भागासाठी निरनिराळे कपडे असतात, पायांसाठी चप्पल-बूट असतात, शरीरासाठी आतले आणि बाहेरचे कपडे, फेटा-टोपी डोक्यासाठी, त्याचप्रमाणे सर्व गुणांचे निराळे गुणधर्म असतात. आता जर तुम्ही तुमचा फेटा काढून पायाला घातला, किंवा हातमोजे जर तुम्ही पायात घातले आणि पायमोजे हातात घातले तर त्याने काम बनणार नाही. प्रत्येक कपड्याची स्वतःची ठरलेली जागा आहे आणि त्या जागेव्यतिरिक्त ते इतर कुठेही घालता येत नाही. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘या प्रत्येक त्रिगुणांचे स्वतःचे निरनिराळे गुणधर्म आहेत आणि त्यांची स्वतःची ठरलेली एक विशिष्ट जागा आहे, आणि ते सर्व माझ्यापासून आलेले आहेत, आणि तरीसुद्धा मी ते नाही. म्हणून मला त्यांच्यात शोधायला जाऊ नको,कारण मी त्यांच्या पलीकडे आहे.’ तुम्हाला कळते आहे का की भगवान कृष्ण इथे काय करण्याचा प्रयत्न करीत आहे? अर्जुनाचे मन ज्या ठिकाणी आकर्षित होण्याची शक्यता आहे तिथून तो परत आणतो आहे, आणि अर्जुनाला कृष्णावर लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. म्हणून यामध्ये ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा सहभाग आहे, आणि या संभाषणाचे हेच वैशिष्ट्य आहे. तर हे विशेष ज्ञान वापरून भगवान कृष्ण वारंवार अर्जुनाच्या मनाला ते जिथे कुठे आकर्षित झाले आहे तिथून त्याला परत आणून अर्जुनाला कृष्णाकडे लक्ष केंद्रित करायला लावतो आहे. याचा अर्थ असा की तो मनाला अतंर्मुख करायला लावून चैतन्याकडे ध्यान केंद्रित करायला लावतो आहे. हे काम गुरुचे आहे आणि शिष्याची जबाबदारी आहे. म्हणून जिथे कुठे प्रचंड शक्ती दिसून येते तिथे ती देवाची आहे आणि जो व्यक्ती ती प्रदर्शित करतो आहे त्याची ती नाही हे ओळखा. जिथे कुठे एखाद्याला सौंदर्य दिसून येते, तर ते सौंदर्य त्या व्यक्तीचे असा विचार करू नका तर त्या सौंदर्य मागे देवाचा हात आहे. देवाच्या शिवाय कोणतेही सौंदर्य असू शकत नाही. म्हणून तर, ‘सत्यं शिवं सुन्दरं’ असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की जिथे कुठे भगवान शिव आहेत तिथे तिथे सौंदर्य आणि सत्य आहे. तर असे म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाच्या मनाला सर्व प्रकारच्या आकर्षणांपासून मुक्त करतो आणि त्याला स्वतःकडे ओढून घेतो. कृष्णाचा अर्थ आहे आकर्षण; म्हणजे असा जो सर्वकाही स्वतःकडे आकर्षित करून घेतो. सर्व प्रकारच्या बाह्य आकर्षणांकडे भटकणाची शक्यता असणाऱ्या जागांपासून मनाला मुक्त करणे आणि त्याला केंद्रित करणे- हेच काय ते भगवान कृष्ण आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला कोणी तेज-पुंजाप्रमाणे (चेहऱ्यावरअध्यात्मिक तेज दिसणे) चमकताना दिसेल तेव्हा ते भगवान कृष्णाच्या गहिऱ्या प्रेमात बुडालेले आहेत हे लक्षात घ्या, म्हणूनच ते सर्वांना स्वतःकडे आकर्षित करून घेत आहेत. याचा अर्थ त्रिगुणांमुळे भिन्नता वाटणाऱ्या या जगाकडे धावणाऱ्या मनाला आत ओढून घेणे आणि त्याला आतील चैतन्याकडे माघारी आणणे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पायरी आहे आणि आश्चर्यकारक विज्ञान. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'