07
2013
Jun
|
बंगलोर, भारत
|
प्रश्न : गुरुदेव, स्वधर्म म्हणजे काय आणि मला कसे कळेल की माझा स्वधर्म काय आहे ते? श्री श्री : स्वधर्म म्हणजे ती कृती जी तुमच्या प्रकृतीबरोबर सुसंगत आहे. तुमची कौशल्ये आणि तुमची गुणवत्ता, तुमचा स्वतःचा स्वभाव यांच्या अन्वये कृती करणे होय आणि ते ज्या करिता तुम्ही जबाबदार (कर्म) आहात. अशी कोणतीही कृती ज्यामुळे तुम्हाला भय अथवा अस्वस्थता वाटत नाही ती कृती स्वधर्म आहे. ती कृती जी करण्यासाठी तुम्ही भाग आहात असे वाटते आणि ती नाही केली तर तुम्हाला अस्वस्थ वाटते ती कृती स्वधर्म आहे. आता यातून गैरसमज करून घेऊ नका आणि असे म्हणू नका, ‘मी जर मद्यप्राशन नाही केले तर मला अस्वस्थ वाटते’. नाही! बिलकुल नाही. दरवेळी जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते ते नेहमी स्वधर्मामुळेच वाटते असे नाही. परंतु त्याचवेळेस तुम्ही जर तुमचा स्वधर्म पाळला नाही तर तुम्हाला नेहमीच अस्वस्थ वाटेल. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये, ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः’(३.३५) असे म्हटलेले आहे. जेव्हा आपण काहीतरी खरेपणाने करीत नाही, केवळ दुसऱ्या माणसाच्या दिखाव्यासाठी करतो तेव्हा आपल्याला भय वाटते कारण अशी कृती अस्सल नसते, ती हृदयापासून आलेली नसते. परंतु जेव्हा आपण काहीतरी करतो जे अस्सल असते आणि हृदयापासून असते तेव्हा कोणतेही भय नसते. जेव्हा कोणीतरी खोटे बोलते तेव्हा त्यांना नक्कीच आतून कुठेतरी भीती वाटत असते. पण जेव्हा कोणी खरे बोलत असते तेव्हा त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. खरे पाहता सत्य बोलणे आणि त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहण्याने तुम्हाला अतिशय शक्ती मिळते, हो न? हाच तर स्वधर्म आहे. आपल्याला जीवनात जे नैसर्गिकपणे प्राप्त झाले आहे त्याच्या मागे आपण गेलो तर ते आपल्या जीवनात भरभराट आणि उत्कर्ष घेऊन येते. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार जायला लागतो तेव्हा आपण आतून परिपक्व होऊ लागतो. आपल्याला उत्थित करणारी प्रत्येक कृती ही आपला स्वधर्म आहे. आपले मन, बुद्धी, स्मृती आणि अंतरात्मा यांना एकत्रितपणे एकोप्याने बांधून ठेवतो तो धर्म होय. वृद्धी तेव्हाच होते जेव्हा आपण आपला स्वधर्म पाळतो. प्रश्न : गुरुदेव, भगवद्गीतेत तुम्ही म्हटले आहे की देव सगळीकडे आहे, परंतु याचा प्रात्यक्षिक अनुभव आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात कसा काय येऊ शकतो? श्री श्री : हे पहा, ज्ञानाचे हे दोन पैलू आहेत. एक आहे बोध- म्हणजे ज्ञान स्वयंच होय, आणि दुसरे आहे व्यवहार – म्हणजे ज्ञानाचे आचरण करणे आणि ते प्रात्यक्षिकपणे अनुभवणे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात दरवाजे, टेबल आणि खुर्च्या आहेत जे लाकडापासून बनलेले आहेत. पण खुर्चीच्या जागी तुम्ही टेबल वापरू शकत नाही, ना तुम्ही खुर्चीच्या जागी दरवाजा वापरू शकता, हो ना? जरी पलंग, दरवाजा आणि टेबल हे सर्व एकाच पदार्थापासून (लाकडापासून) बनलेले आहेत, तरीसुद्धा तुम्ही एकाच्या जागी दुसरे वापरू शकत नाही, कारण प्रत्यक्ष ते एकमेकांपेक्षा निराळे आहेत आणि त्यांचे उपयोगसुद्धा वेगळे आहेत. त्याचप्रमाणे, एकाच देव आहे जो तरुण आणि वयस्क अशा दोन्हीमध्ये आहे. परंतु जर तुम्ही म्हणाल की ते सर्व एकच (एकच देव असलेले) आहेत आणि लहान मुलांच्या पाया पडू लागलात आणि वयस्कर लोकांना आशीर्वाद देऊ लागलात तर त्यांना वाटेल की तुम्हाला वेड लागलेले आहे. त्यांना वाटेल की तुमचे काही खरे नाही. तर तुमची वागण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न आहे. तुम्ही सर्वांबरोबर एकाच पद्धतीने वागू शकत नाही. परंतु तुम्हाला संभावना – म्हणजे सर्वांमध्ये आणि सभोवतीच्या सर्व गोष्टींमध्ये देवाला पाहणे- असायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे अद्वैताचे ज्ञान ( भारतीय तत्वज्ञानाची शाखा जी अद्वैताला महत्व देते) समजते आणि तुम्ही ते तुमच्या हृदयात ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंमध्ये पक्के स्थापित होता. केवळ तेव्हा तुम्ही या निष्कर्षावर येत की अखेरीस एकच आत्मा (चैतन्य) आहे जे सर्वांमध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये आहे, तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्याच्या प्रकृतीनुसार वागणूक द्यायला पाहिजे.( म्हणजे हुशारीने फरक करा आणि तरीसुद्धा अव्यक्त असलेल्या एकत्वला आपल्या सभोवतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहणे ). प्रश्न : गुरुदेव, मी माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी काहीही जरी केले जरी तो कधीच खुश होत नाही. तो माझ्यामध्ये दोषच शोधत राहतो. मी काय करू? श्री श्री : जर तुम्हाला माहिती आहे की ही त्यांची सवय आहे तर मग तुम्ही का विचलित होता? त्यांचा स्वीकार करा आणि पुढे चला. स्वतःला आनंदी ठेवा. जर तुम्ही त्यांच्या वागण्याने विचलित होण्याचे बंद केले तर त्यांचामध्ये बदल घडून येणे सुरु होईल. प्रत्येक माणसामध्ये कोणता ना कोणता नकारात्मक गुण हा असतोच. आणि हे नकारात्मक गुण तुमच्या कळा दाबण्यासाठीसुद्धा असतात, ज्यामुळे मग तुम्ही शक्तिशाली व्हाल. एकदा का तुम्ही शक्तिशाली झालात की मग तेसुद्धा बदलू लागतील. जीवनात सर्व काही बदलते, आणि काही गोष्टी अश्या असतात की ज्या बदलत नाहीत. आपण या दोन्ही गोष्टी स्वीकारायला पाहिजे. प्रश्न : गुरुदेव, भारतामध्ये गोहत्या होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. असा कोणता कडक कायदा संसदेमध्ये पास करता येईल का ज्याद्वारे याच्यावर बंदी घालता येईल? श्री श्री : भारतात गायींची संख्या स्वातंत्र्यपूर्व असलेलेच्या आता केवळ २०%च आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या देशातील पशु संपत्ती फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि आता आजच्या घडीला तर आधीच्या मानाने एकदमच कमी झालेली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये दुधाचा तुटवडा भासत आहे. उत्तर भारतातील काही बाजारात विकले जाणारी मिठाई खाण्यासाठी सुरक्षित नाही असे तुम्ही ऐकले असेलच. ते मिठाई बनवताना युरिया आणि अजून काही रसायने वापरतात. काही ठिकाणी तर फार मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. खवा ( मिठाईला घट्टपणा आणि घनदाट बनवण्यासाठी दुधापासून बनवलेला पदार्थ) बनवताना लोक त्यात रसायने घालतात आणि असा खवा नंतर मिठाई बनवण्यासाठी वापरला जातो. याच्यामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झालेला आहे, आणि अनेक लोक अजूनपण सोसत आहेत. लोक भेसळ करायचे तेव्हाच सुरु करतात जेव्हा आवश्यक पदार्थांचा तुटवडा असतो. जर तुटवडा नसेल तर मग भेसळसुद्धा होणार नाही. मग तर भेसळ करणे महाग पडेल. (महाग रसायने आणि कृत्रिम पदार्थ करून भेसळ करणे महाग पडेल.) आपल्या देशातील पशु संपत्ती वाढवण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे, आणि पशु संख्येमध्ये गायींची संख्या वाढवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. इतक्यातच माझ्या वाचण्यात एक संशोधन आले ज्यामध्ये त्यांनी भारतीय गायींचे दुध आणि युरोपातून आणलेल्या गायींचे दुध यातील फरक सांगितला आहे. परदेशातील गायींच्या दुधात सापडणारे प्रथिने आहे त्याला अ१ म्हणतात. अ१ प्रथिनांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार इ.इ. होते. अ१ प्रथिनामुळे अनेक आजार होतात. दुसऱ्या बाजूला एक दुसऱ्या प्रकारचे प्रथिने आहे ज्याला अ२ म्हणतात. अ२ प्रथिने हे मातेच्या दुधात सापडतात आणि (भारतीय) गायींच्या आणि शेळीच्या दुधातसुद्धा सापडतात. म्हणून मातेचे दुध, शेळीचे दुध आणि भारतीय गायीचे दुध हे सर्व समान (त्यातील घटक समान आहेत) आहेत. हे कसे ते तुम्हाला माहिती आहे? भारतामध्ये अनेक वर्षांपासून गायीला मातेप्रमाणे मान आणि आदर दिल्या गेला आहे. तर हा विचार किंवा ही जाणीव जी आपल्या परंपरेमध्ये आहे त्यामुळे गायीचे डीनए बदलले असून आता तिच्या दुधात अ२ हे प्रथिने अ१ या प्रथिनाच्या जागी बनू लागले आहे. भारतीय गायींचे दुध हे इतके महत्वाचे आणि उपयुक्त आहे की ते कर्करोगाच्या इलाजावरील औषधांमध्येसुद्धा वापरले जाते. म्हणून गोहत्या ही कोणत्याही परिस्थितीत बंद झालीच पाहिजे. याच्या विरोधात कडक कायदा पास झालाच पाहिजे, परंतु अधिक महत्वाचे आहे की लोकांना या सत्याच्या बाबतीत अधिकधिक जागरूक केले पाहिजे. प्रश्न : गुरुदेव, काल तुम्ही म्हणालात की देव सगळ्यांची काळजी घेतो, तर मग सगळीकडे गरिबी का आहे, पूर का येतो? श्री श्री : कोणतीही समस्या नसलेले जग अशी कल्पना करून पहा. तुम्ही सिनेमा पाहायला जाता आणि त्या सिनेमामध्ये कोणतीही समस्या नाही आणि कोणताही तणाव नाही. एक माणूस उठतो, जेवतो, कामाला जातो, घरी येतो आणि झोपी जातो, आणि दररोज तीच ती गोष्ट करतो. असा सिनेमा बघायला तुम्ही जाल का? असा सिनेमा बघायला तुम्हाला मजा तरी येईल का? तुम्हाल सिनेमा बघायला कधी मजा येईल? जेव्हा त्यात खलनायक, किंवा काही तणाव, किंवा काही समस्या असतील तर. मग तुम्ही बाहेर येऊन म्हणाल, ‘हा फारच चांगला सिनेमा होता.’ त्याचप्रमाणे, देवाकरिता हे जग म्हणजे एक सिनेमाच आहे . तसेच पुरामध्ये कोणीही मृत्यू पावत नाही. ते सगळे दुसरे शरीर धारण करून पुन्हा येतात. आपल्यालासुद्धा करायला काहीतरी पाहिजे. जरा कल्पना करून पहा, जर या जगामध्ये काहीच समस्या नसतील, सगळेजण निरोगी आणि आनंदी असतील तर मग अनुकंपेकरिता जागा उरणार नाही. तुम्हाला कोणाच्या प्रती अनुकंपा वाटेल? अनुकंपा आणि इतर सर्व मुल्ये नाहीशी होऊन जातील. तर या जगामधील आपले उद्दिष्ट आपल्या लक्षात येण्याकरिता या जगामध्ये समस्या आहेत. प्रश्न : मी माझ्या आकर्षणांवर कसा विजय मिळवू? मला कोणीही फार लवकर आवडू लागते आणि त्याचा मला त्रास होतो. श्री श्री : मला वाटते की तुमच्याकडे फार जास्त मोकळा वेळ आहे. तुम्हाला व्यस्त राहायला पाहिजे. हे फार लहान वय आहे आकर्षित होण्यासाठी. तुम्ही अजून फुलाप्रमाणे फुललासुद्धा नाही आहात, तुम्ही अजून एक कळीच आहात. तुमचा कोणी चुराडा करू देऊ नका. त्याच्यासाठी अजून बराच अवधी आहे. आता सध्या तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सगळ्यांना मोहून टाका परंतु अडकून पडू नका, पुढे जात राहा, हे ते सूत्र आहे. प्रश्न : गुरुदेव, एकदा मी एका योग्याची आत्मकथा या पुस्तकात असे वाचले की हिमालयात असे योगी आहेत जे एका जागेहून दुसऱ्या जागी खास तंत्राचा वापर करून प्रवास करतात. हे खरे आहे का? जर हो तर आम्हाला असा अनुभव येऊ शकतो का? श्री श्री : नाही, असे काहीही नाहीये. तुम्ही हिमालयात जाऊन सगळीकडे शोधले तरीसुद्धा तुम्हाला असे काही सापडणार नाही. प्रश्न : आम्ही तुम्हाला काही जलदगती प्रश्न विचारू शकतो काय? श्री श्री : होय, जरूर. तुम्ही कोण आहात? स्वतःला विचारण्यास चांगला प्रश्न. गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात? ते एक गुपित आहे, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. देव कोण आणि काय आहे? कोण आणि काय देव नाही आहे. आम्ही देवाला कसे जाणवावे? केवळ शांत राहा. त्याच्याबद्दल काळजी करू नका, त्याला तुमची काळजी घेऊन द्या. जग हिंसाचार-मुक्त आणि तणाव-रहित कसे काय होऊ शकेल? दि आर्ट ऑफ लिविंग चा प्रसार करा. पृथ्वीचे भविष्य काय आहे? तुमच्यासारख्या लोकांबरोबर फारच उज्जवल. धर्म काय आहे? तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाणारा धर्म असतो. सत्य काय आहे? ते जे ज्याची व्याख्या करता येत नाही आणि त्याला टाळता येत नाही. सकारात्मक काय आणि नकारात्मक काय? तुम्हाला जे उन्नत करते ते सकारात्मक आणि जे तुमचा ऱ्हास करते ते नकारात्मक. गुरु कोण आहे? प्रश्नाचे उत्तर देणारा. मन काय आहे? ते जे प्रश्न करते. अभ्यास करताना जेव्हा तुम्हाला तणाव वाटेल तेव्हा केवळ शिथिल व्हा. आणि सर्व विद्यार्थ्यांनी गाजर खाल्ले पाहिजे. खास करून त्यांनी ज्यांनी चष्मा लावलेला आहे, तुम्हाला अ जीवनसत्वाची गरज आहे आणि ते गाजरातून मिळते. व्यवस्थित अन्न फार जरुरी आहे. जर तुम्ही व्यवस्थित जेवलात तर तुम्ही आजारी पडणार नाही. आपण आजारी पडतो कारण आपण नीट जेवत नाही. अनेक वेळा आपल्याला चवदार अन्न खायचे असते, आणि शरीरासाठी चांगले असलेले अन्न नको असते. आपण शरीरासाठी चांगले असलेले अन्न जेवले पाहिजे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कडूनिंबाची गोळी घ्या. ती पोट आणि चेतासंस्थेकरिता फार चांगली असते. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधींच्या आश्रमात दररोज ते कडूनिंबाची चटणी ठेवायचे, कारण ती मन, शरीर आणि पोट यांच्यासाठी फार चांगली असते. त्याने शरीराची प्रतिकारशक्तीसिद्ध वाढते. त्रिफळा सुद्धा शरीरासाठी फार चांगली आहे. त्रिफळामुळे शरीराचे सर्व असंतुलन ठीक होऊन जाते. म्हणून आपण ही आयुर्वेदिक औषधे घेतली पाहिजे, ती शरीरासाठी चांगली असतात. आणि आपण काही मंत्रोच्चार केले पाहिजे. आज,मी एका लेखामध्ये वाचले की ॐ हा केवळ मंत्र नसून ते एक औषधसुद्धा आहे. म्हणून आपण रोज ॐ चे उच्चारण रोज केले पाहिजे, निदान तीनदा तरी. ॐ नमो नारायणा किंवा ॐ नमः शिवाय याचे रोज उच्चारण करा. यांना महा मंत्र म्हणतात. आपण मंत्रोच्चारण रोज केले पाहिजे. तर चांगले अन्न जेवा, औषधे वापरा, मंत्रोच्चार करा आणि सुहास्य राहा. सर्वांच्या आयुष्यात समस्या आहेत. त्या येतात आणि जातात. कोणतीही समस्या कायमची राहत नाही. तर मला कशाची गरज आहे ते मला मिळणारच अशी श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'