मूर्तीच्याद्वारा अमूर्ताचा अनुभव

19
2012
Sep
बंगलोर
परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडून

गणेश चतुर्थी हा तो दिवस आहे ज्यादिवशी भगवान गणपती हे भक्तांकारिता या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले.गणेश, (हत्तीचे मस्तक असलेला) शंकर आणि पार्वती यांचा पुत्र असून त्याचे बुद्धीचा, रिद्धीसिद्धीचा आणि ऐश्वर्याची परमोच्च देवता म्हणून पूजन केले जाते. हा उत्सव गणपतीचा जन्म दिवस म्हणून जरी साजरा केला जात असेल तरी या उत्सवाला अतिशय गहन अर्थ आहे.

आदि शंकराचार्यांनी गणपतीचे सार फार सुंदरपणे समजावले आहे.

गणपतीचे गजानन(गजाचे शीर्ष असलेला) म्हणून जरी पूजन होत असले तरी, हे स्वरूप केवळ परब्रह्म रूप प्रकट करण्याकरिता आहे.

भगवान गणपतीचे वर्णन ‘अजम निरविकल्पम निराकारमेकम’ असे करतात. याचा अर्थ असा की भगवान गणपती हा कधीही न जन्मणारा आहे. तो अजम (न जन्मलेला) आहे, तो निराकार(आकार रहित)आहे आणि तो निर्विकल्प (गुणरहित) आहे. भगवान गणेश हे सर्वव्यापी चेतनेचे प्रतिक आहेत.ज्या उर्जेतून सगळे आविष्कृत झाले,या विश्वाच्या निर्मितेचे कारण असलेली आणि ती उर्जा ज्यामध्ये हे संपूर्ण जग विरघळून जाणार आहे तीच उर्जा भगवान गणेश आहेत.

भगवान गणेश हे आपल्या बाहेर कुठेतरी नसून ते तर आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत. परंतु हे अतिशय तरल ज्ञान आहे. सगळ्यांना हे मुर्तापलीकडचे अमूर्त इंद्रियगोचर होत नाही.आपल्या प्राचीन ॠषी-मुनींना हे माहित होते; म्हणून त्यांनी सर्व पातळीवरील लोकांना समजेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल असे मूर्त रूप निर्माण केले.

ज्यांना अमूर्ताची अनुभूती होत नाही ते बराच काळ केलेल्या मूर्ताच्या अनुभवाद्वारे अमूर्त ब्रह्मापर्यंत पोचू शकतात.

तर वास्तविक पाहता गणपती हा निराकार आहे; तरीसुद्धा तो एक आकार आहे ज्याला आदि शंकर यांनी प्रार्थना केलीआणि तो आकार गणपतीच्या निराकारतेचा संदेश घेऊन येतो.

अशा प्रकारे आकार हा एक आरंभबिंदू आहे आणि यथावकाश अमूर्त चेतना आविष्कृत होते.

गणपतीच्या मूर्त स्वरूपाचे वारंवार पूजन करून अमूर्त परमात्म्यापर्यंत पोचण्याच्या अलौकिक कलेची खुण आहे गणेश चतुर्थी. गणपतीची प्रशंसा करणारे गणेश स्तोत्रामध्येदेखील हेच सांगितले आहे.

आपल्या बोधावास्थेतील गणपतीला आपण प्रार्थना करतो की बाहेरच्या मूर्तीमध्ये थोडा वेळ स्थित हो म्हणजे मग आम्ही त्याच्या सोबत थोडावेळ खेळू शकू. आणि मग पूजा झाल्यावर आपण पुन्हा त्याला प्रार्थना करतो की त्याने ज्या ठिकाणहून तो आला ,म्हणजे आपल्या बोधावस्थेत,पुन्हा परतावे. जोपर्यंत तो मूर्तीमध्ये स्थित असतो तेव्हा देवाने आपल्याला जे काही दिले ते आपण त्याला मूर्तीच्या पुजेद्वारा अर्पण करतो.

थोडे दिवस गणपतीचे पूजन केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा याच गोष्टीचे पुष्टीकरण करते की देव मूर्तीमध्ये नसून तो आपल्या आतच आहे. त्या सर्वव्यापी परमेश्वराला मुर्तस्वरुपामध्ये अनुभवणेआणि त्या मूर्तस्वरूपातून आनंद प्राप्ती करणे हेच गणेशोत्सवाचे सार आहे.

अशा प्रकारे आयोजित उत्सव आणि पूजनाने उत्साहाची आणि भक्तीची एक लाट निर्माण होते.

आपल्यामधील प्रत्येक चांगल्या गुणांचा देव हा गणपती आहे. म्हणून जेव्हा आपण त्याला पुजतो तेव्हा आपल्यातील सगळे चांगले गुण हे अजून फुलतात. गणपती हा ज्ञान आणि बुद्धीचा देखील देव आहे.ज्ञानाचा उदय तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वयंबद्दल जागरूक होतो. जिथे कुठे आळस असतो तिथे ज्ञान आणि बुद्धी नसते, चैतन्य नसते. आणि जीवनात प्रगती नसते. म्हणून चेतना शक्ती जागी असायला हवी आणि चेतनेचे आदिदैवत आहे गणपती. म्हणूनच तर कोणत्याही पूजेच्या आधी गणेशपूजन करतात ते चेतनेला जागृत करण्यासाठीच.

म्हणून मूर्तीची स्थापना करा, त्याची अमर्याद प्रेमाने पूजा करा, ध्यान करा आणि गणपतीला आतून अनुभवा.

आपल्या आत झाकलेल्या गणेश तत्वाला जागृत करणे हेच गणेशोत्सवाचे प्रतीकात्मक सार आहे.!

तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !