08
2013
Mar
|
बंगलोर, भारत.
|
प्रश्न : जर कुणी गुरुच्या सोबत असेल आणि या मार्गावर असेल, तरी सुद्धा धार्मिक विधींमध्ये सहभागी होणं किंवा धार्मिक विधी करणं हे सगळं करायलाच पाहिजे कां ? श्री श्री : जर गुरुतत्वावर तुमची आढळ श्रद्धा असेल तर दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की काही धार्मिक विधी करायला हवे तर तेही ठीकच आहे. तसेच गुरुतत्वावरील श्रद्धेविना काहीही केले तरी त्याचा काही फायदा होत नाही. गुरुच्या अस्तित्वाशिवाय कोणतीही तंत्र किंवा मंत्र साधना उपयोगाची नाही आणि जर तुम्ही पूर्णपणे गुरूला शरण गेलेले असाल तर या सर्व गोष्टींची फार कमी गरज भासते. पण तुम्हाला तसे करायचे असेल तरी काही हरकत नाही. त्यासाठी हे सगळे पूजाविधी, कर्मकांड अचूक पद्धतीने (धर्म शास्त्रात सांगितल्यानुसार) करणारी व्यक्ती शोधायला हवी. आणि कधी तरी तुम्हीही काही कर्मकांड, धार्मिक विधी (धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार) करायला हरकत नाही. वर्षातून एक दोन वेळा ठीक आहे. त्याचा अतिरेक करू नका. घरातल्या देवाजवळ अधून मधून दिवा लावा आणि कधी तरी स्वस्थ ध्यानस्थ बसा. ध्यान करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जर प्रेम, ध्यान आणि समर्पण भावना असेल तर बाकी सगळे पाठोपाठ येतेच. कधी तरी दारावर (शुभ संकेत देणारे आणि वाईट प्रवृत्तींना बाहेरच ठेवणारे) तोरण लावून सजवा. हा तोरणाचा अर्थ आहे. आणि जर दारेच नसतील तर तोरण लावण्यात काय अर्थ आहे ? प्रश्न : गुरुदेव, या सृष्टीमागचा तसेच माया आणि जन्म मृत्यू चक्राचा हेतू काय आहे ? श्री श्री : तुम्ही क्रिकेट खेळता कां ? आता मला सांगा,तुम्ही ते कां खेळता? एक बॅट हातात घेऊन खेळपट्टीवर इकडून तिकडे धावणं किती निरर्थक आहे ! त्यात तासंतास वाया कशाला घालवायचे ? करू करून तुम्ही काय करता, तर मैदानाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे बॉल फेकत असता. हे करून काय मिळते ? (उत्तर : गुरुजी, ते मनोरंजनाचं एक साधन आहे.) होय, जसे तुम्ही बॅट आणि बॉल घेउन तुमच्या मनोरंजनासाठी खेळता तसेच ही संपूर्ण सृष्टीसुद्धा देवाचे मनोरंजन आहे. म्हणूनच तर या संपूर्ण सृष्टीला आणि या सगळ्याला देवाची ‘लीला’ म्हणतात. प्रश्न : गुरुदेव, ही लीला किती काळ चालणार ? श्री श्री : आता हे सांगणे कठीण आहे. कुणालाच नक्की माहित नाही की हे सगळे कधी सुरु झाले ? त्याचप्रमाणे हेही कुणालाच माही नाही की हे कधी संपणार. तुम्हीसुद्धा या लीलेचा भाग आहात त्यामुळे तुम्हीही याची मजा घ्या. जेव्हा आपण एखाद्या समस्येत अडकलेले असतो तेव्हाच आपल्या मनात प्रश्न येतो की ‘हे कधी संपणार ?’ पण जेव्हा आपण मजा करत असतो किंवा आनंद उपभोगत असतो तेव्हा आपण कधी विचारत नाही की, ‘ही मजा कधी संपणार ?’ असं करतो कां आपण ? नाही. जेव्हा जीवनाचे ओझे वाटू लागते, बंधन वाटू लागते तेव्हाच आपण आपल्याशीच विचार करतो की,’ यापासून मला मुक्ती कधी मिळेल ?’ असे समजू नका की तुम्ही भविष्यात कधी तरी मुक्त व्हाल. तुम्ही या क्षणालाच मुक्त आहात.हे धरून चाला आणि पुढे जात रहा. हा सगळा एक खेळ आहे आणि घटना होतच रहातात. मनात अनेक विचार येतात आणि जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या मनात कसले कसले विचार येतात. तुमच्या मनात येणार्या काही विचारांनी तुम्ही अस्वस्थ होता. पण तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की विचार येतात आणि जातात.त्यात काही अर्थ नसतो. आपल्या विचारांपेक्षा आपण जास्त श्रेष्ठ आहोत. हे लक्षात घ्या आणि निवांत राहा. प्रश्न : गुरुदेव, मुस्लीम लोक देवाला ‘अल्ला’ म्हणतात तर हिंदू लोक ‘ भगवान म्हणतात. असे कां ? श्री श्री : हे बघा, निरनिराळे लोक, निरनिराळ्या भाषांमध्ये एकाच देवाला अनेक नावे देतात. निरनिराळ्या धर्मात त्याचा निराळा अर्थ लावतात. हे तुम्हाला कळले कां ? देव एकच आहे आपण नेहमी हेच म्हणतो. अशी म्हण आहे की, ‘एकम् विप्र बहुदा वदन्ति’ म्हणजे, जे एकाच आहे त्याला विद्वान लोक अनेक नावांनी संबोधतात. आपल्याकडे नेहमी असेच समजले जाते. त्यामुळेच भारतात कोणत्याही वंशाचे लोक आले तरी त्यांचे स्वागतच केले गेले आणि आपल्याला माहित होते की, कोणतेही नाव असले तरी तो देव एकच आहे. आपण लोकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. आपण असे कधी म्हटले नाही की आमचा देवच तेवढा खरा आहे आणि दुसरे ज्याला पूजतात तो खोटा आहे. जे लोक असे असे म्हणतात आणि इतर लोकांना त्यांच्या धर्मात धर्मांतर करून घेतात ते चुकीची गोष्ट करत आहेत. ‘केवळ माझा देवच खरा देव आहे, बाकीचे सगळे देव खोटे आहेत, त्यामुळे तुमच्या घरातील त्यांच्या तसबिरी काढून टाका’, असे सांगून हे लोक इतरांची दिशाभूल करतात. हे अगदी चुकीचे आहे. प्रश्न : गुरुदेव, जेव्हा तुम्ही माझ्या समोर असता तेव्हा तुम्ही स्वप्नवत भासमान वाटता. आणि जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसता तेव्हा देखील सगळे स्वप्नवत वाटते. असे कां ? श्री श्री : हे सगळे स्वप्न वाटते आहे, हे तुम्हाला कळते आहे हे चांगले आहे. तुम्ही आता जागे होऊन वास्तवात यायला हवे. प्रश्न : गुरुदेव, महाशिवरात्रीच्या वेळी संकल्प सोडण्याचे काय महत्व आहे ? श्री श्री : संकल्प म्हणजे, आपली चेतना विश्वाकडे, असीमतेकडे नेणे. आणि मग मन वर्तमान क्षणात आणून तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करणे. हाच संकल्प आहे. संकल्प घेताना तुम्ही काहीतरी देता आणि कशाची तरी प्रार्थना करता. सर्व यज्ञ आणि पूजा यांची सुरवात संकल्प सोडूनच होते. जो कोणतीही सेवा करतो तो साहजिकच त्याचा भाग बनतो. जेव्हा यज्ञासाठी एखादा कोणतीही सेवा करतो तेव्हा तो यज्ञाचा भागच बनतो. ते जरी स्वयंपाकघरात सेवा करत असले किंवा भक्तांची काळजी घेत असले तरी तेही यज्ञाचा भाग बनतात. पण दुसऱ्या कुणासाठी; मित्र किंवा कुटुंबीय यांच्या साठी तुमच्या मनात काही इच्छा असेल आणि यज्ञाचे श्रेय त्यांना मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प सोडवा. जेव्हा तुम्ही संकल्प सोडता तेव्हा तुम्ही तुमचे नाव घेता आणि मनातल्या मनात तुमची इच्छा किंवा ती व्यक्ती आठवता आणि मग पुजारी तुमच्यासाठी काही विधी करतात. असेही करता येणे शक्य असते. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. असे करण्याने कुणाला काही विशेष लाभ होईल असे नाही. पण काही विशेष संकल्प करायचा असेल तर तशीही सोय केलेली आहे. प्रश्न : गुरुदेव, मन, बुद्धी आणि स्मृती यावर काही संस्कार शिल्लक राहू नयेत म्हणून रोज करण्याचे काही तंत्र आहे कां ? श्री श्री : निवांत व्हा आणि स्वाभाविक रहा. जर तुम्ही म्हणालात की माझ्या मनावर याचा संस्कार रहायला नको तर तो संस्कार आणखीनच दृढ होईल. जर तो असेल, तर असेल आणि नसेल तर नसेल. निवांत राहा. तुम्हाला असे दिसून येईल की जे बरोबर असेल तेच टिकून राहिल. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'