ज्ञानामध्ये असणे हीच खरी भक्ती आहे

12
2013
May
बंगलोर, भारत.

(आर्ट ऑफ लिविंगच्या बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय कँम्पस इथे नवीनच बांधलेल्या गुरु पादुका वनम येथे हजारोंच्या वर ग्राम देवता एकत्रित झालेल्या होत्या. मधोमध पाणी असलेले अंडाकृती बदामी प्रेक्षागृह जे सुंदर सजवलेल्या देवी देवतांनी खचाखच भरून गेलेले होते. हे दृश्य अतिशय स्वर्गीय होते खास करून जेव्हा या सर्व देवांची एकाच वेळेस आरती केली तेव्हा. नगारे, चिपळ्या, शंख आणि वाजणाऱ्या घंटा याने वातावरणाला उत्सवाचे स्वरूप आले होते. या घटनेचे महत्व स्पष्ट करणारे श्री श्री यांचे भाषण खालीलप्रमाणे ) 

दोन प्रकारच्या शक्ती ( उर्जा ) जगाचे रक्षण करीत आहेत. एक आहे दैवी शक्ती ( देवांची उर्जा ) आणि दुसरी आहे असुरी शक्ती ( असुरांची उर्जा ). सकारत्मक घटक आणि नकरात्मक घटक यांच्यातील संघर्ष चालूच राहतो. जेव्हा सकारात्मक घटकांचा विजय होतो तेव्हा जगात समाधान, आराम आणि आनंद नांदते. जेव्हा नकारत्मक घटकांचा विजय होतो तेव्हा समस्या आणि हिंसाचार निर्माण होतो. शेवटी, नेहमी विजय हा सकारत्मक घटकांचाच होतो, परंतु नकारात्मक घटक हे अधून मधून आपले डोके वर काढीत असतात.

आज, १००८ गावांमधून निरनिराळ्या ग्राम देवतांचे इथे आगमन झाले आहे. काही गावांचे मुख्य सांगत होते की त्यांच्या ग्राम देवता या गेल्या ६० ते ६५ वर्षांहून अधिक काळापासून आपापल्या गावांमधून हललेल्या नाहीत. ही पहिली वेळ आहे जेव्हा ह्या ग्राम देवता त्यांचे गाव सोडून इथे आलेल्या आहेत.

तर निरनिराळ्या गावांमधून लोकांनी त्यांची पूजनीय ग्राम देवता इथे आणलेल्या आहेत. 

प्रत्येक गावामध्ये आपल्या पूर्वजांनी ग्राम देवतेला आवाहन केले.

एखाद्या मूर्तीला तुम्ही देवता  म्हणून कधी मान देता? जेव्हा एक सिद्ध ( अध्यात्मिकरित्या परिपूर्ण अथवा साक्षात्कारी ) पुरुष मंत्रांचे उच्चारण करून मूर्तीमध्ये दैवी प्राण शक्तीचे ( जीव शक्तीचे ) आवाहन करतो तेव्हा ती मूर्ती देवता बनते.

एका जागेचे अथवा भूभागाचे ( क्षेत्राचे ) रक्षण करणारे देवता आहेत म्हणून त्यांना क्षेत्र पाल असे म्हणतात. समस्त लोकांना त्या देवतेबद्दल अतिशय आदर आणि श्रद्धा असते, आणि स्वतःच्या भल्याकरिता ते तिची पूजा करतात.

संस्कृतमध्ये ‘ निलीम्पा-परिषद ‘ ( याचा अर्थ देवांची परिषद ) असा शब्द आहे.

ज्याप्रमाणे आपल्याकडे संसद आणि राज्य विधान सभा आहेत त्याप्रमाणेच देवांची स्वतःची परिषद आहे.

तर आज उत्सव साजरा करण्याकरिता इथे देवतांची( गंधर्वांची ) परिषद जमलेली आहे. आपण सर्व ठिकाणहून देवतांना इथे आणलेले आहे.

वडीलधार्यांनी, ‘ स्थान प्रधानम न तू बल प्रधानम ‘, असे म्हंटलेले आहे.

देव हे मंदिराच्या खांबामध्येसुद्धा असतात परंतु आपण केवळ गर्भ गृहामधील देवाचीच पूजा करतो. केवळ शक्ती असून उपयोग नाही तर त्याचबरोबर स्थान असणे जरुरी आहे. आपण देवतेला एक स्थान देतो. ग्राम देवता  जर समाधानी असतील तरच प्रगती होऊ शकते.

जर ग्राम देवता समाधानी पाहिजे असतील तर लोकांमध्ये एकजूट असायला हवी. सगळे चांगले असले पाहिजे आणि समृद्धी नांदली पाहिजे. जर लोकांच्या मनामध्ये उदासी आणि तिरस्कार असेल तर ग्राम देवतेला  अतिशय दुःख होते.

ग्राम देवतेला  आनंदी करण्याकरिता आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. गावातील प्रत्येकाने भूतकाळ विसरून देवाने जे सर्व काही दिले आहे त्याबद्दल आभार मानाण्याकरिता एकत्र आले पाहिजे.

आपण जाती, जमाती आणि धर्म यांच्यातील फरक बाजूला ठेवून आजचा दिवस साजरा केला पाहिजे आणि आपली काळजी घेणाऱ्या एका देवाचे आपल्यावर राज्य चालते याची आपण आपल्यालाच आठवण करून द्यायला पाहिजे.

प्रत्येक गावामध्ये ग्राम देवतेचे  हेच महत्व आहे.

जेव्हा एक व्यक्तीमध्ये हा विश्वास येतो की त्याने देवासमोर शरणागती स्वीकारली आहे तेव्हा तो त्याची प्रत्येक कर्तव्ये ही ,मालकाप्रमाणे न करता, सेवकाप्रमाणे इमानदारी आणि कृतज्ञतेने करतो. ( म्हणजेच अहंकाराशिवाय आणि कर्त्याची भूमिका न स्वीकारता ). 

समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात : एक प्रकारचे लोक म्हणतात ,’ मी कोणीही नाहीये. मी केवळ देवाचा दास आहे’. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात जे विचार करतात, ‘ मी सर्व काही आहे.’

गावात किंवा शहरात जर कोणती समस्या असेल तर ती केवळ अहंकारामुळे आहे. अहंकार कोणत्याही चांगल्या कामावर पाणी फिरवते. त्या अहंकाराला नरम करण्यासाठी म्हणून समस्त निष्ठा देवाच्या मूर्तीमध्ये ठेवणे गरजेचे ठरते.

इथे, अहंकार म्हणजे दूर-अहंकार ( वाईट आणि चुकीच्या दिशेने नेणारा अहंकार )असे मला म्हणायचे आहे. ग्राम देवतेची प्रस्थापना केली जाते म्हणजे लोकांमध्ये अहंकार किंवा असुरी प्रवृत्ती ( राक्षसी प्रवृत्ती ) राहणार नाही. जेव्हा लोक देवतेला मान देतात आणि तिची पूर्ण श्रद्धेने पूजा करतात तेव्हा ते खरे बोलतात आणि सत्याच्या मार्गावर चालतात.

तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळी कायद्याची न्यायालये नव्हती आणि लोकांना ग्राम देवते  समक्ष उभे केले जायचे? लोकांचे आपापसात जे काही भांडण असेल ते देवतेच्या समोर सोडवल्या जायचे. तर तंटे सोडवण्यात, गुन्हाल्या माफी देण्यास आणि परिसरात सगळे कायद्याचे पालन करतात याची खात्री करण्यास ग्राम देवता एका न्यायाधीशाचे काम करायची.

परिसराचा कारभार ग्राम देवतेच्या  नावाने चालवल्या जायचा.

आजसुद्धा जेव्हा कधी कोणी व्यक्ती कार्यालयाचे कामकाज हाती घेताना देवाच्या नावाने शपथ घेऊनच सुरुवात करतो. जेव्हा कोणी मंत्री बनतात तेव्हा ते देवाच्या नावाने शपथ घेऊन नंतरच मंत्रिपद हाती घेतात. हे करण्यामागे देवाची उपस्थिती आठवणे आणि ती मान्य करणे हा हेतू असतो. लोकांना देवाच्या उपस्थितीची आठवण करून देण्यास आणि त्याच्या उपस्थितीचा त्यांना अनुभव येण्याकरिता म्हणून ग्राम देवतांची  प्रतिष्ठापना केल्या गेली होय.

याचा अर्थ असा नाही की देवाची उपस्थिती केवळ एक मूर्तीमध्येच मर्यादित होती. हे केवळ लोकांना ते करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आणि त्यांना मिळवायच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीत देवाच्या उपस्थितीची जाणीव करून देण्याकरिता होते.

म्हणून आज इथे इतक्या गावांमधून जमलेल्या या सर्व देवतांची आराधना करण्याची सुसंधी आपल्याकडे चालून आली आहे.

जेव्हा सर्व देवता एकत्र जमतात तेव्हा तो यज्ञ  होतो. आज इथे प्रचंड मोठा यज्ञ  झालेला आहे. सर्व देवता इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक अणुरेणुमध्ये दैवी शक्ती  ( सकारात्मक उर्जा ) नांदते आहे. ध्यान, सत्संग आणि पूजा याद्वारे अश्या शक्तींचे जागर करणे यालाच यज्ञ म्हणतात.

तर आपण सगळे ज्ञान यज्ञ, ध्यान यज्ञ, जप यज्ञ आणि कीर्तन यज्ञ  करीत आहोत. ही संस्कृती फक्त भारतातच आहे आणि याचे जतन करणे आणि विकसित करणे जरुरी आहे. याला कोमेजून जाऊ देऊ नका. ग्राम देवतेचा उत्सव प्रत्येक गावावामधून साजरा होण्याची आपण खात्री करणे जरुरी आहे.

कायम देवाची आठवण ठेवा, इतरांच्या उपयोगी पडा आणि आनंदी राहा.

‘दैवाधीनां जगत सर्वं’, या जगावर देवाचे शासन आहे.

‘मंत्राधीनां तू दैवतां’, देवता या मंत्राने प्रशासित होतात. ज्यांना मंत्राची परिपूर्णता साधली ते देवाच्या योग्यतेचे होतात. म्हणूनच मंत्र घोष आणि ध्यान यांना इतके महत्व दिल्या गेले आहे. देवतांचे नियमित मंत्रोच्चारण आणि प्रार्थना यांच्यामुळे सुखसोयी आणि धन प्राप्ती होते. जे काही आपल्याला मिळाले ते आपण इतरांबरोबर वाटून घेतले पाहिजे. दैवी शक्तीची आराधना करणे आणि समाज असुरी शक्तींपासून मुक्त होऊ दे अशी प्रार्थना करणे हेच धर्माचे सार आहे.

इतर देशांमध्ये ते म्हणतात , ‘ आम्ही जाऊन नकारात्मक घटकांबरोबर लढा देऊ ‘. भारतात, आपण म्हणतो , ‘ आम्ही दैवी शक्ती ( सकारात्मक घटकां ) चा उपयोग असुरी शक्ती ( नकारात्मक घटकां ) च्या नायनाटाकरिता करू’. सकारात्मक घटक सशक्त आहेत याची आपण खातरजमा करणे जरुरी आहे. आणि ते कसे होईल? उपासना, उत्सव साजरा करणे आणि यज्ञ केल्याने साध्य होईल.

आजचा उत्सव साजरा करणे एक भाग आहे. पण तुम्ही हेसुद्धा लक्षात घ्या की सर्व देवता ( येथे दिव्यत्वाची निरनिराळी रूपे या संदर्भाने ) तुमच्या आतच आहेत. असे म्हणतात की ३३ कोटी देव हे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आहेत. जेव्हा आपण शांत आणि आत्मसमाधानी असतो, जेव्हा मन उल्हासित असते, तोच नैवैद्य  असतो.

जेव्हा मनात ज्ञानच प्रकाश असतो तेव्हा तीच देवाची साधना असते.

जेव्हा तुम्हाला प्रत्येकाबद्दल प्रेमभावना असते तेव्हा तीच देवाला पुष्पांजली असते.

तर देवतांना पुष्पांजली  अर्पित करणे काय असते? सर्वांकरिता प्रेमभावना फुलून येणे हे होय. आरती  काय आहे? जेव्हा हृदयात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान होतो; ;मी शरीर नाहीये, मी शुद्ध चेतना आहे. मी ना जन्मलेलो आहे ना मी मृत्यू पावू शकतो. मी अमर आहे. मी सनातन आहे’, ही जाणीव जेव्हा उदय पावते.

या ज्ञानात असणे हीच दिव्यत्वाची खरीखुरी आरती  आहे.

तर, अशा प्रकारे तुम्ही पूजा करून तुमच्यातील ३३ कोटी देवतांची आराधना करा. हे उच्चकोटीचे ज्ञान आहे हे लक्षात ठेवा.