अपरिपूर्णतेत परिपूर्णता बघणे

13
2013
May
बंगलोर, भारत

आज आपण “कुमुदवती नदीच्या” पुनरुथानच्या प्रकल्पचा अहवाल सादर करत आहोत. “समृद्ध भारतासाठी स्वयंसेवक”  या योजनेत स्वयंसेवकांनी कोरड्या पडलेल्या नदीचे पुनरुजीवन करून उत्तम काम केले आहे. ही नदी बंगलोर शहरासाठी पाण्याचा स्त्रोत होती. या नदीच्या पुनरुजीवानाचे काम पूर्ण झाल्यानंतर बंगलोर शहराचा ६०% टक्के पाणी प्रश्न सुटेल. याशिवाय ३०० गावांचा यापासून फायदा होईल.

जवळपास २० तलाव पुनरुजीवीत करण्यात आले आहेत, आणि हे सर्व काम स्वयंसेवक करत आहेत. ज्या स्वयंसेवकांनी गेले ३ महिने अत्यंत मनापासून, आठवड्यात ७-८ तास या साठी काम केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

बदल घडवण्यासाठी आपल्याला अश्याच ध्येयाची गरज आहे. जीवनात सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आपल्याला अश्याच ध्येयाची गरज आहे.

आज आपण “श्री श्री ओर्गनिक“ ची सुद्धा सुरुवात करत आहोत, जेणे करून ज्या शेतकर्यांना त्यांच्या सेंद्रीय उत्पादनांना भाव मिळत नाही त्यांना काळजी करावी लागू नये. त्यांनी फक्त आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, त्यांना मदत मिळेल. आपण त्यांना रसायनमुक्त शेती कशी करावी हे शिकवू, आणि त्यांचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला मदत करू.

त्यानंतर “घर तिथे वीज”  उपक्रम, जो आपल्या श्री श्री ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत येतो. यात स्वयंसेवकांनी ज्या घरात वीज नाही तिथे वीज आणली. काही महिन्यात ४००० घरात वीज आली आहे, ही एक मोठीच उपलब्धी आहे. ४००० घरात जिथे वीज नव्हती तिथे आज सौर वीज आहे, नैसर्गिक वीज. यातील कित्येक घरे अशी आहेत जिथे अजून रस्ते सुद्धा नाहीत, पण वीज आहे.

आज सकाळी उठल्यानंतर माझ्या मनात विचार आला, एखाद्या सत्पुरुषात, चांगल्या लोकांत देवत्व पाहणे यात काही अवघड नाही, पण मूर्ख, वाईट लोकांमध्ये देवत्व पाहणे हे मोठे अवघड आहे. मूर्ख, वाईट लोकांमध्ये देवत्व पाहणे कठीण आहे. याच लोकांचा तुमच्या मनाला त्रास होतो. जेंव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेंव्हा तुम्हाला कशाचा त्रास होतो? याच वाईट आणि मूर्ख लोकांचा, बरोबर?

असे बघा की ते सुद्धा त्याच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्याने तुमचे मन एका चेतनेच्या वेगळ्या स्तरावर जाईल. तुमच्या चेतनेचा स्तर वाढला हि तुम्हाला ते अद्वैत दिसून येईल, ते एकच देवत्व सगळीकडे आणि सगळ्यात आहे. यामुळे ध्यान चांगले लागायला मदत होईल.

याउलट आपण काय करतो? जेंव्हा आपल्याला कृती करायची असते तेंव्हा आपण म्हणतो “हे जरी ठीक नसेल तरी काय ही सगळी देवाची करणी आहे” जेंव्हा आपण असा विचार करतो तेंव्हा आपण आपले ध्येय, उत्साह गमावून बसतो. ही चुकीची धारणा आहे.

जेंव्हा तुम्हाला अंतर्मुख व्हायचे असेल (ध्यान करायचे असेल) तेंव्हाच तुम्हाला अशी धारणा ठेवावी लागेल कि “सगळे ठीक आहे”. जेंव्हा तुम्हाला कृती करायची असेल तेंव्हा तुमची बुद्धी वापरा, तुमचे कौशल्य वापरा. ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे तिकडे लक्ष्य द्या. चुकीचे काय बरोबर काय हे जाणून चांगले काम करा.

आपण जर यातला फरक जाणून घेतला तर आपली आंतरिक शक्ती वाढून जीवन फुलेल.