24
2012
Oct
|
बंगलोर, भारत
|
हे बघा, काहीही करून तुम्ही तुमचे मन वाचवायला हवे. काय होते की तुम्ही अगदी आनंदी, मजेच्या मनस्थितीत असाल आणि कोणीतरी येऊन तुमच्या कानात काहीतरी सांगते जे तुम्हाला आवडत नाही. ते म्हणतात, ‘ अमक्याने तुमच्याबद्दल असे म्हटले.’ जणूकाही नकळत ते म्हणताहेत की,‘ हे काय, तुम्हाला काहीच वाटत नाही ? हे बरोबर नाही.’ आणि अचानक तुमच्या मनात चक्र फिरू लागते आणि तुम्हाला कसेतरी वाटू लागते. तुमची बेचैनी खूपच वाढू लागते. हे सगळे कसे काय होते ? कुणीतरी काहीतरी नकारात्मकता तुमच्या मनात भरवून जाते. हे नेहमीचेच आहे. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्हाला दिसेल की लोक येऊन तुमच्या मनात काही तरी नकारात्मकता भरवून जातात, ज्याने तुमचे मन, तुमची जिद्द हादरून जाते. असे होऊ देऊ नका. लोकांनी तुमच्या मनात काही तरी नकारात्मक भरवणे हे स्वाभाविक आहे पण जेव्हा तुम्ही स्वत:शी अगदी घट्ट जोडलेले असाल, जेव्हा तुम्हाला ते ज्ञान असेल तेव्हा तुम्ही ते सगळे हसण्यावारी सोडून द्याल. तुम्ही तुमच्या कानाला चाळणी लावाल. तुम्हाला माहिती आहे की हे जग असेच आहे. तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी सुखद असतात आणि काही दु:खद असतात. आपण त्या कशा हाताळतो आणि आपला मार्ग कसा धरून ठेवतो हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. या नऊ दिवसात आपण जी काही साधना केली, जे यज्ञ केले, जो उत्सव साजरा केला त्या सर्वामुळे तुम्हाला तुमच्या उत्साहाच्या आणि उर्जेच्या मूळ स्थितीवर यायला मदत होईल. तर, तुमचे हृदय बळकट आणि मन तरतरीत ठेवा म्हणजे तुमच्या जीवनाची गाडी अगदी सुरळीत चालेल. छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्या आणि मोठ्या गोष्टीचा विचार करा. आपण समाजासाठी, देशासाठी, जगासाठी काय करू शकू याचा विचार करा. जीवनात तुमचे असे खूप मोठे ध्येय असायला हवे. लोक सहसा काहीतरी छोट्या गोष्टीची मागणी करतात. लोक म्हणतात, ‘ गुरुजी एक गाडी पाठवून द्या, आम्हाला टॅक्सी मिळत नाहिये.’ अशा किरकोळ गोष्टी मागत रहातात. हेही ठीक आहे. अशा गोष्टी मागण्यात काही गैर नाही पण काहीतरी मोठा विचार करा. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून लोक म्हणत आले आहेत की, ‘ सुखी बसे संसार सब, दुखी रहे नां कोय.’ (सगळे सुखी असू देत, कोणीही दु:खी नसावे) आपण प्रार्थना करताना हेच म्हणतो, ‘लोका समस्ता सुखीनौ भवंतु ’ ( सर्व लोक सुखी होऊ देत) केवळ हे जगच नाही तर सूक्ष्म जगात रहाणारे आपले पूर्वजही सुखी होवोत. अशी आपण आशा करुया. महत्वाचे हे आहे की तुम्ही समाधानी असायला हवे. तुम्ही अधून मधून स्वत:चे मुल्यमापन करायला हवे. स्वत:ला विचारा जे मी करत आहे त्याचा दुसऱ्यांनां फायदा होतो आहे की नाही ? एखद्या गोष्टीने त्या वेळी जरी थोडा त्रास झाला तरी पुढे जाऊन त्या गोष्टीचा सर्वांना फायदा होणार असेल तर ती गोष्ट करणे अगदी योग्य आहे. हीच परीक्षा आहे. कोणतेही काम करताना तुम्ही स्वत:ला विचारायला हवे की , ‘ मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालतो आहे की व्यापक दृष्टीने विचार करत आहे. ह्याची गरज आहे. तर, तुमची दृष्टी व्यापक करणे गरजेचे आहे. जेव्हा दृष्टीकोन संकुचित असेल तेव्हा आपले निर्णय चुकीचे ठरतात. पण जेव्हा आपला दृष्टीकोन व्यापक असेल, दूरदृष्टी असेल तेव्हा आपल्यातील अंत:प्रेरणा वाढीस लागते. आज ज्याचा दिवस आहे. चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. नव्याने विचार करायला लागण्यासाठी चांगला दिवस आहे. स्वत:ला विचारा की, ‘ आता मला काय करायचे आहे ?’ तुमच्या स्वत:साठी एक ध्येय ठेवा आणि एक ध्येय जगासाठी ठेवा. आणि हे दोन्ही एकच असले तर ते सर्वात चांगले. हे दोन्ही एक नसले तरी ठीक आहे. तुम्ही दोन्ही ध्येये ठेऊ शकता पण हे बघा की ती दोन्ही एकमेकांच्या आड येत नाहीयेत. पहिला दृष्टीकोन समाजासाठी, जगासाठी, लोकांसाठी आणि मग तुमच्या ज्याकाही आकांक्षा, इच्छा असतील त्या साहजिकच पूर्ण होतील. आताही असेच होते आहे नां ? किती जणांचा असा अनुभव आहे की जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळते ? ( श्रोत्यांपैकी बरेच जण हात वर करतात ) साधकाचे असेच आहे. म्हटलेच आहे की, ‘ प्रत्यवायो न विद्यते’ एकदा का तुम्हाला मार्ग सापडला की मग त्यात अडथळे रहात नाहीत. मग तुम्ही जो काही संकल्प कराल तो विनासायास पूर्ण होऊ लागतो. आताच जो अश्विन महिना संपला तो खूपच महत्वाचा महिना आहे. कां ? कारण पंधरा दिवस हे आपल्याला सोडून गेलेल्या पितरांच्या आठवणीसाठी राखून ठेवले आहेत आणि उरलेले पंधरा दिवस देवादिकांची पूजाअर्चा करण्यात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवले जातात. त्यामुळे हा महत्वाचा महिना आहे. आणि पौर्णिमेपर्यंत हे उत्सव चालूच रहातील. पण आपल्यासाठी रोजच उत्सव असतो , हो की नाही ? उत्सव नेहमीच असतो पण हा महिना जरा जास्तच खास आहे. प्रश्न : या जगात महात्मे आणि राक्षस दोन्ही असतात.जे महात्म्यांचे शिष्यत्व स्वीकारतात ते सात्विक होतात. आणि मग राक्षस असतात ते सात्विक लोकांना दडपून टाकायचा प्रयत्न करतात. अशावेळी काय करावे ? श्री श्री : चांगल्या लोकांची एकी असणे गरजेचे आहे. हा समाज काही थोड्या वाईट लोकांमुळे ढासळत चालला आहे असे नाही तर चांगल्या लोकांच्या गप्प रहाण्याने. चांगल्या भावना असलेले लोक इतके गप्प रहातात की मतदान करायलाही जात नाहीत. ते असा विचार करतात की , ‘ आम्हाला काय करायचं, असंही आम्ही काहीच करू शकत नाही. आपण आपले काम करावे आणि आनंदात रहावे.’ अशा उदासीन भावनेने ते गप्प रहातात. हे बरोबर नाही. तुम्हाला काही तरी करायला हवे.निष्क्रियता हा काही चांगला गुण समजला जाऊ नये. एखादा माणूस निष्क्रीय राहिला आणि मग म्हणू लागला की, ‘ मी चांगला माणूस आहे,’ तर तो चांगुलपणा काही उपयोगाचा नाही. तुम्ही जर चांगले असाल आणि करुणा मय असाल तर काही काम करा. हो की नाही ? जे सुधारून ठीक करता येते ते नक्की ठीक करावे, आणि जे तुम्हाला सुधारून ठीक करता येत नसेल, जे तुमच्या क्षमतेच्या बाहेर असेल त्यासाठी प्रार्थना करणे सर्वात उत्तम. त्यामुळेच जीवनात चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. भक्ती,मुक्ती,शक्ती आणि युक्ती. युक्तीने तुम्हाला तुमचे काम करून घेता येते. जीवनात शक्तीचीही गरज असतेच. पण फक्त युक्ती आणि शक्ती असून भागणार नाही.त्याच्या बरोबरच भक्ती आणि मुक्तीही आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे कां की, जेव्हा तुमच्यात आंतून मुक्तीची भावना असते तेव्हा तुमच्यात इतके बळ निर्माण होते की तुम्हाला जे काही काम करायचे असेल ते सहज पूर्ण होऊन जाते. चांगल्या लोकांनी असे कधीही समजू नये की ते दुर्बल आहेत. तुम्ही कुठे दुर्बल आहात ? तुमच्यात केवढेतरी सामर्थ्य आहे. ते तुम्ही ओळखायला हवे. परवा काय झाले आठवते आहे नां ? ती हत्तीण इथे यज्ञशाळेत आली तेव्हा कां घाबरली माहितीये ? ( आश्रमातल्या इंद्रायणी नावाच्या ह्त्तीणीला चंडी होमात भाग घेण्यासाठी आणण्यात आले त्याविषयी ) ती घाबरली कारण तिने टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघितले आणि तिला वाटले की तिथे आणखी एक हत्ती उभा आहे. तिला हे कळले नाही की ते तीचे स्वत:चेच प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपल्याला टीव्हीचा तो पडदा बंद करावा लागला. आपलेही असेच होते. आपण स्वत:चे अस्तित्वाची ओळखच घालवून बसलो आहोत. आपण कोण आहोत तेच आपल्याला माहित नाही. एकदा का हे कळले की मग जीवनात काही दु:खच रहाणार नाही. प्रश्न : गुरुदेव, बारा ज्योतिर्लिंगाचे काय महात्म्य आहे ते कृपया सांगावे. श्री श्री : ज्योती तुमच्यातच आहे. आणि जिथे ज्योती असते तिथे शिव असतो. ज्योतिर्लिंग तुमच्यातच आहे. बारा ज्योतिर्लिंग आपल्या शरिरातच आहेत. आपल्या शरिरात अशी बारा स्थाने आहेत जिथे बारा ज्योतिर्लिंगे स्थित आहेत. प्राचीन काळी केदारनाथ ते रामेश्वर या मधल्या विविध ठिकाणी ज्योतिर्लिंगांची स्थापना केली गेली जेणेकरून लोक तीर्थयात्रेच्या निमित्ताने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास करतील. भारत हा एकत्र देश बनवण्याच्या उद्देशाने आपल्या पूर्वजांनी ही योजना अंमलात आणली. भारताला एकत्र आणण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता. दुसऱ्या कोणता मार्ग होता ज्याने भारताला एकत्र आणता आले असते ? प्रत्येक जागेची वेगळी भाषा आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा काय संबंध ? ते दोन वेगळ्या देशासारखे आहेत, ज्यांची संस्कृती, परंपरा, आहार आणि कपडे सगळेच वेगळे आहे. त्यामुळे लोकांना रामेश्वरला जायला सांगीतले आणि तिथून त्यांना काशीला जाऊन पवित्र गंगेत स्नान करायला सांगितले गेले. त्यानंतर त्यांना सांगितले गेले की त्यांनी गंगाजल घेऊन काशीहून रामेश्वरला जावे आणि ते तिथल्या ज्योतिर्लिंगाला वहावे. त्यांनी ती एक रूढीच बनवली आणि अशाप्रकारे भारताच्या सर्व भागातले लोक एकत्र आले. नाही तर युरोपप्रमाणेच त्याचे चोवीस भाग पडले असते. आपल्या पूर्वजांनी भारतातील वेगवेगळ्या भागांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य साध्य केले आहे. त्यासाठीच असे म्हटले जाते की गंगेचे पाणी आणून ते रामेश्वरला वाहावे. प्रश्न : गुरुदेव, ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असताना बरेचदा असे मनात यते की, ‘ अरे हे मी आधीही ऐकले आहे.’ अशी स्थिती कशी मिळवावी की तुम्ही पुन्हा त्याच ज्ञानाच्या गोष्टी ऐकत असतानाही तितकेच नवल वाटावे. श्री श्री : तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही हे ऐकले आहे तर ते आत्म्यात स्वत:त आधीपासून आहेच . हे चांगले आहे. जाणणे, स्विकार करणे आणि त्याचाच भाग बनून जाणे या तीन स्थिती उत्स्फूर्तपणे होतील. प्रश्न : गुरुदेव, दुर्गा देवीच्या विविध आयुधांचे महत्व कृपया आम्हाला सांगावे. श्री श्री : मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यां काळात बंदुका नव्हत्या. त्याकाळी फक्त त्रिशूल होते. त्याकाळी जर बंदुका असत्या तर कदाचित दुर्गा मातेच्या हातात ए के ४७ असली असती. असे म्हणतात की, देवतांनी एकदा दुर्गा मातेला विचारले, ‘ तुम्ही ही आयुधे कां धरली आहेत ? तुमच्या एका आवाजानेही तुम्ही सर्व दैत्यांची राख करून टाकू शकता.’ मग देवतांनी स्वत:च उत्तर दिले की ,’ देवी तू इतकी दयाळू आहेस की तुला दैत्यांची सुद्धा तुझ्या आयुधांनी शुद्धी करायची आहे. तुला त्यांना मुक्ती मिळवून द्यायची आहे आणि त्यामुळे तू हे करत आहेस.’ यामागचा संदेश असा आहे की प्रत्येक कृतीचे स्वत:चे मोल असते. फक्त संकल्प असून उपयोगाचे नाही. बघा, देवाने आपल्याला हात पाय दिले आहेत जेणेकरून आपण काम करू शकू. आता, देवी मातेला इतके हात कां असतात बरे ? हे दाखवून देण्यासाठी की देव सुद्धा काम करतात आणि ते देखील फक्त एका हाताने नाही तर हजार हातांनी हजार प्रकारांनी. दैत्याचा नाश करण्यासाठी देवीकडे अनेक मार्ग आहेत. वाईटाचे निवारण ती एका फूलानेसुद्धा करू शकते, गांधीगिरी सारखे.त्यासाठीच देवी एका हातात फूल धारण करते, फूलाने गोष्टी घडवून आणण्यासाठी. शंख फुंकून ती ज्ञान देत असते. आणि त्यानेही काम झाले नाही तर ती सुदर्शन चक्र वापरते. तर, तिच्याकडे एकाहून जास्त युक्त्या आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की जगात बदल घडवून आणण्यासाठी एकच युक्ती वापरून चालणार नाही. तुम्हाला अनेक मार्ग शोधावे लागतील. आपल्या नातेसंबंधांचेही तसेच आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीत हटवादीपणा करून चालणार नाही. तुम्ही जर तुमच्या वडिलांबरोबर हटवादीपणा केलात आणि गोष्टी नीट होतील असे धरून चाललात तर तसे होणार नाही. कधी कधी प्रेमाने तर कधी हट्ट करून तर कधी रागावून कामे होतात. मुलांबरोबरही तसेच आहे. मुले वाढवताना आई वडील कशा हर तऱ्हेच्या युक्त्या आणि वागणूक वापरतात. कधी कधी त्यांना प्रेमानेही कामे करून घ्यावी लागतात. तर असे सगळे सांगितले गेले आहे. एखादी समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यासाठीच देवीला इतकी सगळी आयुधे बहाल केली आहेत. प्रश्न : गुरुदेव, कृपया देवी मातेच्या चीन्नमास्ता च्या रूपाचे महत्व सांगा. श्री श्री : देवी मातेने स्वत:चेच छाटलेले मुंडले स्वत:च्याच हातात धरलेले रूप तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटली असेल. या स्वरूपाचा अर्थ काय आहे माहित आहे कां ? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण आपल्या डोक्यात अडकलेले असतो. डोकेच नसेल तर मग काहीच काळज्या नाहीत, प्रश्न नाहीत, भांडणे नाहीत. आणि मग फक्त हृदय काम करू लागते. आणि यांच हृदयातून प्रेमाचे आनंदाचे, खुशीचे आणि साधेपणाचे झरे वाहू लागतात. हे सगळे भेद डोक्यातून निर्माण होतात, हृदयातून नाही. धर्म, जात, समाजात असलेली पत वगैरे सर्व डोक्यातून येते. उर्मटपणा डोक्यात सुरु होतो. चुकीच्या कृती डोक्यात सुरु होतात, हिंसासुद्धा डोक्यात सुरु होते. आता पर्यंत कोणीही हृदयातून हिंसाचारी झालेले नाही हे सर्व डोक्यातून येते. तर चीन्नमास्ता म्हणजे देवीने स्वत:चा शिरच्छेद केला आहे.जेव्हा डोकेच बाजूला केले जाते तेव्हा शुद्ध चेतनेत जे काही शिल्लक रहाते ते म्हणजे हृदय. आणि जेव्हा फक्त हृदय उरते तेव्हा जीवनात प्रेम,करुणा, आणि आनंद फुलू लागते. वाईटाचा नाश होतो. ही चीन्नमास्ताच्या मागची प्रतीकात्मकता आहे. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'