पुरातन ज्ञान

30
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, आम्ही उद्यापासून वेदिक ज्ञानाबद्दलची सत्रे सुरु करत आहोत. उपनयन (मुंज) पासून त्याची सुरुवात होईल. युरोपातून सुमारे १०० लोक आले आहेत. हे वेदिक ज्ञान आपल्या रोजच्या जीवनात कसे वापरावे याबद्दल कृपया आम्हाला मार्गदर्शन कराल का?

श्री श्री: असे बघा वेदिक ज्ञान इथे अनादी काळापासून आहे. ह्या ज्ञानाचा कधी उगम झाला याची नेमकी वेळ नाही. हे कोणी एका माणसाने सुरु केले नाही. जेंव्हा लोक गहन ध्यानात गेले तेंव्हा त्यांना हे उमगले. अनेक ऋषींनी जेंव्हा ध्यान केले तेंव्हा त्या गहन मौनात त्यांना काही ऐकू आले. त्यांनी जे ऐकले त्याचे ते कथन करत गेले आणि कोणालातरी ते लिहून घ्यायला सांगितले. त्यानंतर त्याचा एकाकडून दुसर्याकडे तोंडी प्रसार झाला. याचप्रमाणे पाठांतराच्या माध्यमातून इतर सर्व शाखा, जसे आयुर्वेद पसरवले गेले.

आयुर्वेदाचा उगम कसा झाला याची तुम्हाला कल्पना आहे का?

मध्य भारतात निमिषारण्य नावाचे अरण्य होते. त्या जंगलात ८४००० साधू आणि साधक जमले. त्यांनी विचार केला की ‘समाजाच्या कल्याणासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे’ त्यांचे हेच उदिष्ट होते. त्यांनी ठरवले की आपण ध्यान करून आयुर्वेद; जीवनशास्त्र समजावून घेऊ. पण जर सगळेच ध्यानात गेले तर मग ते ज्ञान लिहून कोणी काढायचे? त्यामुळे त्यांनी एका ऋषिवर ही जबाबदारी टाकली. ते ऋषी म्हणाले ‘मी जागा राहतो, आणि सगळे लिहून काढतो. तुम्ही सगळे ध्यानात जा आणि जे जे येईल ते सांगत रहा’. ८४००० ऋषी ध्यानात गेले आणि एका, भारद्वाज ऋषींनी सगळे ताडाच्या पानांवर लिहून काढले. अश्याप्रकारे एका चेतनेतून संपूर्ण आयुर्वेद जन्माला आला आहे. त्यामुळेच काळाच्या कसोटीवर तो टिकून आहे.

प्रत्येक अवयवासाठी जी जडीबुटी सांगितली आहे त्याचे कोणी खंडन करू शकत नाही. आजही ते सत्याची साक्ष आहे.

याचप्रमाणे संगीत सुद्धा असेच उगम पावले आहे. संगीतात सात सूर आहेत ‘सा रे ग म प ध नी’ हे सात सूर सात प्राण्यांशी जोडलेली आहेत. जसे शरीराने मोठ्ठा असलेला हत्ती, ‘नी’ असे म्हणतो. जेंव्हा जेंव्हा हत्ती आवाज काढतो तेंव्हा त्यात ‘नी’ किंवा निषाद (संगीतातील एक प्रकार) असतो. याचप्रमाणे बुलबुल ‘पा’ असा आवाज काढतो. बुलबुल पाचव्या आवर्तात, ‘पा’ गातात. ‘रे’ ऋषभ (रेडा किंवा म्हैस) याचाशी निगडीत आहे. वेगवेगळी जनावरे जेंव्हा आवाज काढतात तेंव्हा ‘सा रे ग म प ध नी’ तयार होते. फक्त मनुष्य या सगळ्याचा सूरमिलाप करू शकतो. ‘गंधर्व वेद’ हे संगीताबद्दलचे एक विलक्षण शास्त्र आहे. संगीतकारांनी हे शिकले पाहिजे. हे खूप मनोरंजक आहे.

असे म्हणतात ७२ प्रमुख धून, राग आहेत, आणि त्या ७२ धुनीच्या अनेक उपधून आहेत. ‘खरार प्रिया’ नावाच्या रागाच्या २००० उपधून आहेत. संगीत, धून, सुरावट कसे जन्मले हे गंधर्व वेदात सांगितले आहे.

याच प्रमाणे ‘स्थापत्य वेद’ (वास्तुशास्त्र आणि दिशांशी संबंधित ज्ञान) घर कसे बनवावे, त्याची दिशा कशी असावी, त्याचे परिणाम याबद्दल सांगते. पण यातील बरेचसे ज्ञान, शास्त्र लुप्त होत आहे. मध्यमयुगीन काळात हे ग्रंथ, लेख जाळून टाकण्यात आले. ह्या ज्ञानाची कदर केली नाही, आणि बरेचसे लुप्त झाले.

प्रश्न: गुरुदेव आम्हीही हे ध्यान करून समजू शकतो का?

श्री श्री: होय आपण सुद्धा हे समजू शकतो. पण असे म्हटले जाते की कलीयुगात (विश्वाच्या पूर्ण चक्रातील शेवटचे युग) या गोष्टीला मर्यादा आहेत. कलीयुगात ‘तमो गुण’ जास्त प्रभावी आहे, म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी ध्यान केले पाहिजे जेणेकरून नवनवीन गोष्टी शोधल्या जातील.

जेंव्हा वातावरणात खूप तमस असतो तेंव्हा त्याला दूर करणे गरजेचे असते. त्यामुळे इथे हे सगळे यज्ञ तुम्हाला दिसत आहेत. भारतात इतर ठिकाणी क़्वचित हे यज्ञ इतक्या शास्त्रशुद्ध पणें आणि साग्रसंगीतपणे केलेले तुम्हाला दिसतील.

प्रश्न: गुरुदेव, ‘राम नाम सत्य है’ हा जप माणूस मेल्यानंतर का केला जातो?

श्री श्री: कारण कोणीतरी मेल्यानंतर तरी लोकांनी हे लक्षात ठेवावे म्हणून. बरेचदा लोक दूरचे कोणीतरी गेले कि हा जप करतात. आपल्या जवळचे कोणीतरी गेले कि आपल्याला या जपाची आठवण होत नाही.

कमीतकमी दूरचे का होईना कोणीतरी गेल्यावर माणसाला समजते कि देवाचे नामस्मरण हेच एक सत्य आहे, बाकी सर्व क्षणभंगुर आहे. लोकांना याची जाणीव करून देण्यासाठी ही प्रथा सुरु झाली. ही प्रथा फक्त उत्तर भारतात दिसून येईल, दक्षिण भारतात कोणीतरी गेल्यानंतर मौन पाळतात.

प्रश्न: गुरुदेव, बरेचदा मन आपल्या अंतरंगाचा आवाज दडपते. आपले अंतर्ज्ञान विकसित करण्यासाठी काय करावे?

श्री श्री: आपण ३ प्रकारचे ज्ञान मिळवतो. पहिल्या प्रकारचे ज्ञान म्हणजे ‘इंद्रियजन्य ज्ञान’. हे ज्ञान आपल्याला ५ इंद्रियांद्वारे मिळते. डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, नाकाने वास घेणे, जीभेनी चव घेणे आणि स्पर्श. हे मुलभूत ज्ञान आहे.

या पेक्षा वरचे म्हणजे जे बुद्धीद्वारे मिळवले जाते, ‘बुद्धी जन्य ज्ञान’– बौद्धिक ज्ञान.

याही वरचे म्हणजे जे ‘आतून’ येते ते ज्ञान, विनाप्रयत्न येणारे अंतर्ज्ञान, जे आपल्या ५ इंद्रियाशिवाय येऊ शकते. हे ज्ञान आपल्या आतून उमलते.

हे झाले ज्ञानाचे ३ स्तर.

बुद्धीद्वारे मिळालेले ज्ञान इंद्रियांद्वारे मिळालेल्या ज्ञानपेक्षा वरचे आहे, आणि त्याही पेक्षा वरचे आहे अंतर्ज्ञान. आपण जसजसे मोठे होतो तसतसे ज्ञान अधिक तरल आणि शुद्ध होते कारण मन सुद्धा परिपक्व आणि तरल होते. मन तीव्र इच्छा आणि घृणा यापासून मुक्त होते. यामुळे आपल्याला हे तरल ज्ञान, अंतर्ज्ञान प्राप्त होते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, तुम्ही तुमच्या भक्तांना कोणत्या निकषावर पुरस्कृत करता. कारण मला वाटते कि मी मला जे मिळाले आहे त्याच्या १०% सुद्धा मी याला पात्र नाही. तुमच्याकडून मोजणीत काही चूकभूल झाली आहे का?

श्री श्री: मी काही मोजणी करत नाही, कशाला तसदी घ्यायची? मी आरामात असतो. तुम्ही सुद्धा निवांत राहा.

आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मिळाले आहे याची जाणीव असणे चांगले आहे. त्यामुळे आपण अधिक नम्र होतो. सतत काहीतरी मागणे आपल्या डोक्यातून निघून जाते, सतत काहीतरी मागण्यामुळे प्रेम नष्ट होते. जेंव्हा आपल्याला जाणीव असते की आपल्याला आयुष्यात खूप काही मिळाले आहे तेंव्हा आपण प्रेम करतो. आपण कृतज्ञ असतो तेंव्हा आपल्याला अधिक मिळते. आपण जितके अधिक कृतज्ञ तितके अधिक आपल्याला मिळते. आपण जर असे म्हणू लागलो ‘ओह मी इतके केले पण मला फक्त एवढेच मिळाले, मला अधिक हवे ’तर मग तक्रारी, राग, चिडचिड आणि नैराश्य येईल.

आयुष्यात आपली धारणा ‘ओह, मला माझ्या योग्यतेपेक्षा जास्त मिळाले आहे’ अशी असावी.

याचा अर्थ तुम्ही काम करू नये असा नाही. तुम्ही काम केले पाहिजे. काम करत असताना तुमची धारणा ‘माझी कामाची क्षमता मला वाटते त्या पेक्षा अजून खूप आहे’ अशी असावी.पण ज्यावेळी काहीतरी मिळायची वेळ येईल तेंव्हा ती आपल्याला खूप काही मिळाले अशी असावी. हीच गोष्ट तुम्हाला उंचीवर, विशेषतः अध्यात्मिक उंचीवर घेऊन जाईल. हा आपला नियम असावा.

मानवी हक्काच्या बाबतीत मात्र मी म्हणेन हा नियम लागू नसावा. जर तिथे तुमच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही हक्काने त्याची मागणी करावी. पण तुमच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी जाण ठेवा ‘मला माझ्या योग्यतेपेक्षा बरेच मिळाले आहे’ याचा अर्थ एवढाच आहे की तुमचा देवावर आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे.

प्रश्न: गुरुदेव. आर्ट ऑफ लिविंग आता खूप लोकप्रिय झाले आहे, तरीही आमच्या पालकांना समजावताना बर्याच अडचणी येतात. तुमच्या वेळी तुम्ही तुमच्या पालकांची परवानगी कशी मिळवलीत?

श्री श्री: होय मलाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तुम्हाला माहित आहे मला दाढी का ठेवावी लागली? नाही माहित? दिल्ली मध्ये मी जेंव्हा शिकवायला सुरुवात केली तेंव्हा बरेच प्राध्यापक तिथे येत, कारण त्यांनी ऐकले होते कि मी ध्यान शिकवतो. ते जेंव्हा जागेवर येत तेंव्हा विचारत असत ‘गुरुदेव कुठे आहेत?’ मी त्यांना सांगत असे ‘मी गुरुदेव आहे’ मी १९ वर्षांचा लहान मुलगा दिसत असे त्यामुळे ते मला गांभीर्याने घेत नसत. मी बोलत असताना ते इकडे तिकडे बघत आणि विचार करत असत ‘ओह, हा छोटा मुलगा काहीतरी बोलत आहे’. ते मला गांभीर्याने घेत नसत आणि माझ्याकडे लक्ष देत नसत. काही लोक म्हणत ‘ओह तुम्ही गुरुदेव आहात?’ असे म्हणून ते तिथून पळून जात.

त्यानंतर मी थोडा मोठा आणि प्रौढ दिसण्यासाठी दाढी वाढवू लागलो. मी जेंव्हा बंगलोरला परत आलो तेंव्हा मी दाढी वाढवलेली बघून माझ्या आईला आवडले नाही. ती भानूला म्हणत असे ‘त्याला सांग दाढी काढून टाक’ आणि मग भानू तिला सांगे ‘मी नाही सांगणार तूच त्याला सांग’. त्या दोघींचा हा संवाद मी दुसर्या खोलीतून ऐकत असे. ती म्हणत असे ‘त्याला आत्ता काही सांगू नकोस तो बर्याच दिवसांनी घरी आला आहे, त्याला जे करायचे असेल ते करू देत, त्याला नाराज करू नको’ त्या दोघींना मी दाढी ठेवलेली आवडत नसे पण तरीही मी ती ठेवली कारण लोक मला शिक्षक असण्याइतका मोठा समजत नसत. मी तसाही पहिल्यापासून लहान मुलासारखाच आहे!!

मला दाढी ठेवावी लागली आणि एकदा ठेवली ती कायमचीच. तर ही अशी गोष्ट आहे.

प्रश्न: गुरुदेव, आपण १० इंद्रियांवर कसा विजय मिळवावा (इथे प्रश्नकर्ता ५ कर्मेंद्रिय, आणि ५ ज्ञानेंद्रिय या बद्दल बोलत आहे)

श्री श्री: पहिल्यांदा स्वतःला व्यस्त ठेवा. जर तुम्ही निष्क्रिय झालात तर तुमची इंद्रिय तुमच्यावर नियंत्रण करतील. स्वतःला व्यस्त ठेवणे महत्वाचे आहे. आयुष्यात मोठे ध्येय ठेवा त्याने तुम्हाला याचा त्रास होणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे संयम आणि तुम्ही काय खातापिता याकडे लक्ष द्या.

प्रश्न: गुरुदेव, जर कर्माचा ठसा आपल्या मनावर उमटलेला असेल तर तो काढून टाकण्यासाठी ‘मी हे मन नाही आणि मी जो कोणी आहे त्याला कर्म चिकटू शकत नाही’  इतके माहित असणे पुरेसे आहे का? की मला पश्चाताप करून स्वतःला सुधारावे लागेल?

श्री श्री: नाही, हे माहित असणे पुरेसे आहे. तुम्ही क्षमा मागून सुधारणा करू शकता, पण हे माहित असे महत्वाचे आहे.

प्रश्न: भगवत गीतेत कृष्ण अर्जुनाला सांगतो ‘आदित्यात मी विष्णू आहे, वेदात मी सामवेद आहे, देवात मी इंद्र आहे आणि रुद्रात मी शंकर आहे’ . त्याने एकापेक्षा वरचढ असणे का पसंत केले?

श्री श्री: त्याने नेहेमीच ‘मी सर्वोत्कृष्ट आहे’ असे म्हंटले आहे. तो नेहेमीच सर्वोत्कृष्ट आहे. वेदात सामवेद उत्तम मानला जातो कारण तो संगीतमय आहे. संगीत, स्वरमेळ, प्रेम, आणि भक्ती यांची तो जननी आहे. कृष्ण एकाच्या तुलनेत दुसरे पसंत करतो. ही त्याची पसंती आहे. त्याने असे कधीही म्हंटले नाही की बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत किंवा चांगल्या नाहीत. त्याने फक्त म्हंटले‘मी असा आहे’. जसे तुम्ही हॉटेल मध्ये जाता आणि विशिष्ठ गोष्ट मागता आणि म्हणता ‘मला हे आवडते’ याचा अर्थ तुम्हाला इतर गोष्टी आवडत नाहीत असे नाही.