तुमच्यावर माया केली जात आहे!

22
2012
Oct
बंगलोर, भारत
तर , देवाचा संदेश असा आहे की- तुम्ही देवाचे अतिशय लाडके आहात. तुम्हाला केवळ हे ओळखणे जरुरी आहे की तुमच्यावर माया केली जात आहे.

देव तुमच्यावर किती माया करतो याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. त्याचे इतके प्रचंड प्रेम आहे. ज्याप्रमाणे लहान बालकाने काहीही जरी केले तरी आई त्याच्यावर वात्सल्याचा वर्षाव करतच राहते त्याप्रमाणे ते छोटे बाळ पसारा मांडून ठेवेल पण आईची काहीच हरकत नसते. ती हासऱ्या चेहऱ्याने सगळा पसारा आवरते आणि पुन्हा मुलावर ममता करणे सुरु ठेवते. त्याचप्रमाणे तुम्ही देवाचे सर्वात लाडके आहात. हे आपण आपल्या मनात कायम ठेवले पाहिजे. तुम्हाला हेच तर सांगण्याकरिता मी इथे आलेलो आहे, आणि बाकी काही नाही!

तुम्ही हे समजलात की माझे काम फत्ते!

'मी देवाचा एकदम लाडका आहे' आणि 'देव इथे या क्षणी आहे',केवळ या दोन गोष्टी लक्षात ठेवण्याची आवशकता आहे.

आपल्यामधील मी विरघळून जाऊन जेव्हा केवळ एक उर्जा उरते तेव्हा हर्ष फुलून येतो. नाही तर मग तुम्ही विचार करीत राहता,'मला साक्षात्कार व्हायला पाहिजे', किंवा 'मला याचा अनुभव यायला पाहिजे'. आणि यातला हा जो मी आहे तो तुम्हाला दुःखीकष्टी बनवतो.

आणि या मी मध्ये जेव्हा शंका उपस्थित होते तेव्हा ती सर्वात वाईट परिस्थिती असते.

भगवद गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात,'जेव्हा एखाद्या माणसाच्या हृदयात शंकेने प्रवेश केला तेव्हा तो संपला आणि त्याची अवस्था सर्वात वाईट होऊन बसते'.

म्हणून हे तुम्ही नक्की ओळखून घ्या की तुम्ही देवाचे सर्वात लाडके आहात आणि देव तुमच्यावर अतिशय माया करतो. बस्स. हे मोहोरबंद करा! याबाबत काहीही शंकाकुशंका किंवा स्वतःवर अविश्वास नको.

माझ्यावर माया आहे किंवा नाही असे वादविवाद नको. तुम्ही सवाल विचारता कामा नये.

प्रथम देव तुम्हाला सांगतो,'तुम्ही माझे अतिशय लाडके आहात', आणि मग भक्त म्हणतो,'होय,मीसुद्धा तुझ्यावर प्रेम करतो!' म्हणून तर पहिले देव तुम्हाला काय सांगतो आहे त्याचे शब्द ऐका, की तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुम्हाला कधीही बुडू देणार नाही- ही पहिली गोष्ट.

दुसरे म्हणजे अशी श्रद्धा की मला कधीही बुडू दिले जाणार नाही. माझ्या नाकापर्यंत पाणी येईल परंतु नाक कधीही पाण्यात बुडणार नाही.

आणि तिसरी गोष्ट अशी की आपण आपले मन नेहमी प्रसन्न आणि समाधानी ठेवावे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायला लागू दे पण आपण नेहमी प्रसन्नचित राहावे.

एका असमाधानी आणि चिडचिड करणाऱ्या मनाला या ग्रहावरील सगळी सुखे समोर उभी केली तरी ते मन कायम कटकटच करीत राहील.

या विश्वामधील कोणतीही वस्तू तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. ते तुमचे तुम्हाला स्वतः आणावे लागते. आणि हे असे कधी घडते? हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही सोडून देता आणि समजून घेता. पवित्रता, निर्मलता, आणि समाधान हा सुखाचा कानमंत्र आहे. 

बायबलमध्ये सुद्धा एक म्हण आहे,ती अशी, 'ज्यांच्याकडे आहे त्यांना अजून दिले जाईल, ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे जे काही थोडेफार आहे तेदेखील परत घेतले जाईल'.

हे एकदम खरे आहे. मनामध्ये जर समाधान नसेल आणि तुम्ही सतत कटकट करीत तक्रारीचा सूर लावून बसाल तर याबाबत जागरूक व्हा आणि या मनःस्थितीतून त्वरित बाहेर पडा. याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या, हे फार महत्वाचे आहे.

समाधान आणि प्रसन्नचित! प्रत्येक गोष्ट आनंदाने करा. चालणे,बोलणे,बसणे आनंदाने करा;जर तुम्हाला कोणची तक्रार करायची असेल तर ती देखील आनंदाने करा.

मला वाटते की आपण इथे आश्रमात असे वरचेवर करतो! (श्री श्री हसतात)

तुम्हाला माहिती आहे, परवा खरेदी विभागातील व्यक्तीने मला मध्य रात्री बोलावले आणि सांगितले, 'गुरुदेव, उद्याकरिता आपल्याला थोड्याफार वस्तू खरेदी करणे जरुरी आहे.'

मी म्हणालो, 'काय?'

आणि यावर तो उत्तरला, '३००० किलो साखर आणि २००० किलो मुगाची डाळ यांची पक्वान्न बनवण्यासाठी आपल्याला गरज आहे.'

आणि मी म्हणालो, 'काय?(आश्चर्यचकित होऊन), तुम्ही तर थोड्याफार वस्तू म्हणाला होतात.'

मग खरेदी विभागाने होलसेल बाजाराकडे धाव घेतली, मध्यरात्री त्यांनी लोकांना झोपेतून उठवले, आणि सगळ्या जिन्नसा आश्रमात पोच करून घेतल्या.

त्यांना अनेक दुकानदारांना उठवावे लागले, त्यांना त्यांच्या दुकानात घेऊन जाऊन त्यांचे गोदाम उघडवून सर्व वस्तू आणाव्या लागल्या. परंतु ते सगळे आनंदात होते.

विकणारा खुश होता, खरेदी करणारा खुश होता, आचारी खुश होता आणि ज्यांनी ते पदार्थ खाल्ले तेसुद्धा खुश होते.

तुम्हाला माहिती आहे, हा सगळा प्रसंग पुष्कळ तापदायक ठरू शकला असता.

त्या व्यक्तीने मला अगदी शेवटच्या क्षणाला सांगितले. इतक्या शेवटच्या क्षणाला आम्ही कुठे जायचे? या जागी खूप कटकट आणि तक्रारी होऊ शकल्या असत्या, आणि त्यांनी हात हलवत परत येऊन सांगितले असते, 'अरे देवा,आता काहीच करणे शक्य नाही.' पण असे घडले नाही.

असे पहा,जिथे कुठे सत्त्व आणि सकारात्मकता आहे, तिथली आव्हानेसुद्धा गोड असतात. 

म्हणूनच आनंदीपणा आणि समाधान हे अतिशय महत्वाचे आहे.

बघा,जर छोटीशी बाब असेल तर ठीक आहे. तुम्ही जाऊन एखादे दुकान उघडू शकता. पण तुम्हाला एकाच दुकानातून ३००० किलो साखर मिळणे शक्य नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की ज्या आपल्याला कधी कधी अशक्यप्राय वाटतात. असे का तुम्हाला माहिती आहे? याचे कारण म्हणजे आपण आपल्या स्वयंला ओळखत नाही म्हणून.

तुम्हाला माहित आहे हत्तीण इथे (यज्ञशाळेत) आल्यावर का भेदरली? (आश्रमातील हत्ती) इंद्राणी जिला चंडी होमामध्ये सहभागी होण्याकरिता आणले गेले होते,तिच्याकडे इशारा करीत )

ती भेदरली कारण तिने मोठ्या पडद्यावर स्वतःला पहिले आणि तिला वाटले की इथे अजून एक हत्ती उभा आहे. ती स्वतःचीच प्रतिमा आहे ते तिला कळले नाही. म्हणून मग आपल्याला तो मोठा पडदा बंद करावा लागला. त्याचबरोबर तिने आज एक मोठा धडा आपल्याला शिकवला. लोकांबरोबरसुद्धा हेच होत आहे,ते स्वतःला ओळखत नाही. प्रत्येकजण ही तुमचीच एक प्रतिमा आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाहीत, किंवा तुम्ही स्वतःकडे बघायलासुद्धा इतके घाबरता, तेव्हा ज्ञान तुम्हाला ते प्रतिबिंब पाहायला, ओळखायला मदत करते.

स्वतःच्या आत डोकावून पहा, काय आहे तिथे, कशाचा त्रास आहे, काय बोचण आहे?

जर तुम्हाला काही नकारात्मक वृत्ती दिसल्या तर मी तुम्हाला सांगतो की त्याची काळजी करू नका, कारण त्यापासून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकत नाही. त्याची काळजी घ्यायला कोणीतरी आहे. हाच तर संदेश आहे!

दुर्गा सप्तशती मध्ये असे म्हटले आहे, 'या देवी सर्व-भुतेशु भ्रांती-रूपेण संस्तीथा नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः' हे माते,तू सर्व जीवांमध्ये शांती आणि अशांती,ज्ञान आणि भ्रम या रूपांनी उपस्थित आहेस. मी तुझी पूजा करतो आणि तुझ्यासमोर मी नतमस्तक आहे!

तर देव हा अशांततेच्या रूपानेसुद्धा उपस्थित आहे.

या ग्रहावरच्या प्रत्येक जीवाला पहा, ते किती अशांत आहेत. थोड्या वेळासाठी का होईना पण हत्तीणसुद्धा विचलित झाली. ते काय होते? ती चेतना आहे; भ्रमाच्या, ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या रूपामध्ये उपस्थित असलेली ती शुद्ध उर्जा आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीची पूर्णतः पूजा करा. त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन चला. त्यात निवड करण्याचा किंवा त्यांना विभक्त करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना सगळ्यांना घ्या आणि मग तुम्हाला शांती प्राप्त होईल; परम शांती. हेच तर सकल सार आहे. नंतर दुःखांपासून सुटका, शांती प्राप्त, ओसंडून वाहणारे प्रेम आणि उत्साह, भक्ती आणि मानसिक स्वातंत्र्य -हे सर्व त्याच्यासोबत मिळेल.

संपूर्ण विश्व हे एकच चेतना आहे. आज तुम्हाला हे जाणवले नाही का?

हे म्हणजे अनेक शरीरे पण एकच मन.

जरी अनेक अंग असले तरी एकच शरीर, संपूर्ण क्षेत्रामध्ये केवळ एकच जीव.

त्या एकाचा आपण सगळे भाग आहोत-ही समज म्हणजे एक गहन अनुभव आहे.

आता असे विचारू नका,'गुरुजी मला हा अनुभव कधी मिळेल? मला आताच्या आत्ता पाहिजे.' आराम करा! काहीसुद्धा करू नका!

फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही देवाचे लाडके आहात आणि देव हा या क्षणी इथे आहे, तुमच्यामध्ये. आणि आजच्यासाठी इतके बस्स