प्रश्नो के उत्तर

27
2014
Apr
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, या जन्मात मी जे दु:ख भोगतो आहे ते जर मागच्या 
जन्मातल्या कर्मामुळे असेल तर, त्यामुळे मला जास्तच वाईट वाटते. त्याला 
कसे तोंड देऊ ? 
श्री श्री: तुमचं डोकं मागच्या बाजूला वळवून ठेऊ नका. पुढे बघा आणि जात 
राहा. तुम्ही मागे बघत बघत पुढे जायला बघताय. त्यामुळेच तुम्हाला वाईट 
वाटतय. सोडून द्या. भूतकाळाबद्दल चिकित्सा करून काय होणार आहे ? त्याच्यात 
काही अर्थ नाही. जीवनात सर्वांनाच चांगल्या, वाईट काळातून जावं लागतं. 
धीराने पुढे जात राहा. या मार्गावर केवढे तरी ज्ञान आणि आनंद आहे. असं 
सगळ असूनही तुम्हाला जर दु:खी वाटत असेल तर मग ज्ञानाचा काय उपयोग ? 
गाढ श्रद्धा ठेवा की तुमच्या बाबतीत सगळे चांगलेच होणार आहे. आत्ता काही 
अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तरी काय झाले ? धीराने आणि 
हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जा. स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवा. तुम्हाला माहित 
आहे कां की आज जे कंपन्यांचे मालक किंवा मोठ्या कंपन्यांचे मुख्य आपल्याला 
दिसतात ते कोणे एके काळी खूप अडचणीत होते ? त्यांना नोकरी मिळण्याची 
ही मुश्कील होती. काहींना तर सरकारी नोकरीही मिळत नव्हती. पण ते हिंमत 
हरले नाहीत. त्यांनी अगदी छोट्या दुकानात आपला व्यवसाय सुरु केला. आणि 
हळू हळू आपले व्यवसायातील साम्राज्य स्थापन केले. इतिहासात तुम्हाला असे 
बरेच आदर्श दिसतील. तर, नुसते आळशीपणाने बसून सारखी काळजी करत राहू 
नका. किंवा असे समजू नका की देव तुम्हाला खूप आशिर्वाद पाठवेल आणि अचानक 
सगळे ठीक होईल. असा अगदी एक दिवशी घालवू नका.   
आपण सहसा काय करतो ? आपण सकाळी उठतो आणि पेपर वाचू लागतो. 
अशाप्रकारे आपण मौल्यवान असा एक दीड तास वाया घालवतो. मग आपण 
टी.व्ही. बघण्यात दोन ते तीन तास घालवतो. समजा तुम्हाला एखाद 
मासिक दिसलं तर तुम्ही पानं उलटत रहाता, मग ती माहिती वाचण्यासारखी 
नसली तरी. आजकाल आपण इंटरनेटवर सर्फिंग करण्याठी बराच वेळ घालवतो. 
जर घरी पाहुणे आले तर त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यात वेळ घालवतो. 
आपला काही वेळ खाण्या पिण्यात जातो. आणि मग शेवटी आपण थकून 
रात्री झोपी जातो. असा दिवस घालवणे ही शहाणपणाची गोष्ट नाही. 
सकाळी उठा, साधना करा, ध्यान करा. त्यानंतर तुमच्या रोजची 
दिनचर्या सुरु करा. रोज काय करायचे, कुठे जायचे, काय विकत घ्यायचे 
ते लिहून ठेवात.दिवसाचा सगळा कार्यक्रम ठरवा आणि त्या दिवशी कुणा 
कुणाला भेटायचे ते लिहून ठेवा.एकदा लिहून झाले की उठा 
आणि कामाला लागा. यादीतली कामे झाले की त्यावर खूण करा. 
जी कामे ठरवली असतील ती पूर्ण झाली की संध्याकाळी जरा शांत बसून 
विश्राम करा. संगीत ऐका, फिरायला जा. रोज संध्याकाळी स्वत:बरोबर 
थोडा वेळ घालवा. संध्याकाळी पुन्हा एकदा १५- २० मिनिटे ध्यान करा. 
तुम्हाला किती छान वाटेल. तुम्हाला शक्तिवान आणि उत्साही 
वाटेल. आळशी आणि मरगळलेले नाही.  

बहुतेक आपण आपला बराचसा मौल्यवान वेळ फालतू गोष्टीत वाया घालवतो. 
आणि मग आपण थकून जातो. आणि मग आपल्याला बसून विश्रांती घ्यावी 
लागते. असे करू नका. 

तर सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत काय काय करायचे त्याची यादी करा. 
बहुतेक वेळा काय होतं, आपले सेक्रेटरी किंवा मदतनीस आपल्याला
दिवसभरातल्या यादी देतात. मी बहुतेक मझ्या उद्याच्या कामांची यादी 
आजच मागून घेतो! (हास्य) 
त्यात मी दिवसभरात कुणाकुणाला भेटायचे आहे, काय काय करायचे आहे त्या 
सगळ्याची यादी असते. नशिबाने ते दुपारी एक तास मला विश्रांतीसाठी देतात. 
पण त्यानंतर मी पुन्हा कामाला लागतो आणि रात्री बारा पर्यंत माझे काम चालू 
असते. मी भारतात असतो तेव्हाचे माझे वेळापत्रक असे असते. मी जेव्हा 
प्रवास करत असतो तेव्हाही अनेक गोष्टींनी दिवसभराचे वेळापत्रक भरगच्च 
असते. मी कोणत्याही राज्यांत गेलो तरी त्या राज्याचे अपेक्स बॉडी मेम्बर्स 
अगदी भरगच्च कार्यक्रम आखतात.आणि मलाही दिवसभर बिझी रहायला 
आवडते.

मला दिवसभरातला प्रत्येक क्षण सर्वांसाठी काहीतरी उपयुक्त गोष्टीत सत्कारणी 
लागायला हवा असतो. 
सहसा माझा दिवस इतका बिझी असतो की मला बातम्या वाचायला किंवा ऐकायला 
दिवसभरात वेळ मिळत नाही. 
मग कधी कधी मी विमानप्रवासात किंवा मोटारने प्रवास करत असताना वर्तमानपत्र 
वाचतो. माझ्याबरोबर काम करणारे काही लोक मला ताज्या बातम्यांबद्दल आणि 
घटनांबद्दल टेक्स्ट मेसेज, एस.एम.एस.पाठवतात. तर अशा प्रकारे वेळ होईल 
तेव्हा मी बातम्या वाचतो. 
 
तुम्ही सगळे मला प्रेमाने इतकी पत्रे पाठवत असता आणि मी ती सगळी वाचतो. 
काही जण इतक्या बारीक अक्षरात पत्र लिहितात की ती वाचणं कठीण असतं. 
(हास्य) मला आश्चर्य वाटतं ते कागद वापरताना इतकी कंजुषी कां करतात. 
काही लोक पत्र मला देण्याच्या आधी त्याच्या इतक्या घड्या घालतात की 
जेणे करुन ते देताना माझ्या हाताला त्यांचा स्पर्श व्हावा. मला हे माहीतच
 नव्हतं. नुकतच कुणीतरी मला सांगितलं. ते म्हणाले की काही लोकांना 
वाटतं की नेहमीच्या आकारातल्या कागदावर पत्र लिहून दिलं तर त्यांना 
गुरुदेवांच्या हाताला हात लावता येणार नाही. पण त्यांनी जर त्या कागदाच्या 
भरपूर घड्या घातल्या तर ते मला देताना त्यांना माझ्या हाताला स्पर्श करता 
येईल.  इतक्या घड्या घातलेलं ते पत्र उघडून वाचणं इतक कठीण असतं ! 
सुदैवाने मला अजून चष्मा लागलेला नाही पण अशी घड्या घातलेली पत्र येत 
राहिली तर मलाही चष्मा वापरावा लागेल. (हास्य)

तर, तुम्ही तुमच्या जीवनातील वेळाचे योग्य नियोजन करायला हवे. रोज 
सकाळी, संध्याकाळपर्यंत संपण्याच्या कामांची यादी करा.  

काही लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, “ गुरुजी, माझा धंदा नीट 
चालत नाहिये.” आणि त्यामुळे ते दु:खी असतात. मी म्हणतो, जर 
तुमच्या धंदा नीट चालत नसेल तर दुसरा सुरु करा. आज समाजासाठी 
करण्यासारखे बरेच काही आहे. सेवेच्या कार्यासाठी इथे आश्रम एच आर 
मध्ये तुमचे नाव नोंदवा. मी असे ऐकले आहे की इथे बरेच लोक 
आहेत जे म्हणतात की त्यांना काही काम नाहिये. मी त्यांना आश्रम एच 
आर मध्ये नाव नोंदवण्याचा सल्ला देतो. खूप काम करायचे आहे. स्वत:ला 
कामात गुंतवून घ्या. तर, ज्याला खर्च इच्छ असेल त्याला इथे सेवेच्या 
बऱ्याच संधी आहेत आणि करण्यासारखी बरीच कामे आहेत. तुम्हाला जर
धंदा करायचा असेल तर इथे धंद्याच्याही बऱ्याच संधी आहेत. हे आपल् 
आर्ट ऑफ लिव्हिंगच एक मोठ्ठं कुटुंब आहे. इथे तुम्हाला कशाचीच काळजी
करण्याचं कारण नाही. 

काही लोक माझ्याकडे येऊन तक्रार करतात की त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं 
लग्न ठरत नाहिये. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 
‘ आर्ट ऑफ लिव्हिंग मॅट्रिमोनी’ विभाग आहे. त्यांची स्वत:ची वेब 
साईट आहे. या वेबसाईट मध्ये काही बारीसारिक अडचणी आहेत त्या 
एक आठवड्याभरात आमचे कार्यकर्ते सोडवतील. मग तुम्हाला नाव नोंदणी 
करणे आणि तुमच्या आवडीचा जोडीदार निवडणे सोपे होईल. 

तर, यासगळ्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी वेळोवेळी होत रहातील. पण त्यात 
नेमकेपणा / अचूकपणा शोधत बसू नका. या दैनंदिन जीवनातल्या कामांमध्ये 
काहीतरी न्यून असेलच. आपण जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर खोलवर जातो 
आणि ध्यान करतो तेव्हाच या बारीक सारीक समस्या आणि घटनांवर मात 
करू शकतो. तेव्हाच खरा परमानंद अनुभवू शकतो.   

त्यासाठीच आम्ही आपल्या ‘बेसिक कोर्स’ पासून ‘पार्ट १ कोर्स’ आणि आता 
हॅपिनेस प्रोग्रॅम’ असे नाव बदलले आहे. लोकांनी येऊन हा कोर्स करावा आणि 
या स्वत:च या आनंदाची अनुभूती घावी. कोर्स केल्यानंतर त्यांचे सगळे प्रश्न 
सुटतात आणि दु:ख दूर होते. ज्ञानाच्या मदतीने ते त्यांच्या समस्या आणि
दु:ख यातून बाहेर येतात.

काही दिवसांपूर्वी ऋषिकेशमध्ये आपल्या सत्संगासाठी आलेल्या एका संताना मी 
भेटलो. ते मला म्हणाले, “शाळेमध्ये विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाला की पुढच्या
वर्गात जातो. पण ही शाळा विशेष आहे.(ज्ञानाच्या मार्गाला उद्देशून) इथे येणारा 
उत्तीर्ण होत नाही. ते एकदा (या मार्गावर) आले की ते इथेच रहातात कारण 
इथे त्यांना जीवनातला खरा आनंद मिळतो. 
हा ज्ञानाचा मार्ग खूपच रसभरीत आणि आनंदपूर्ण आहे. तो तुम्हाला सत्याच्या 
मार्गावर आणतो. तो तुम्हाला चिरंतन अशा प्रेमाची अनुभूती देतो आणि तुम्हाला 
अशी शांती देतो जी कधी न संपणारी असते. 
या मुळे तुम्ही जीवनात आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता. त्यामुळेच असे 
म्हटले आहे की, “चरैवेती !  चरैवेती !  चरैवेती !  
(उपनिषद : पुढे जात राहा ! पुढे जात राहा !) 

आपल्या वेदातही हेच सांगितले आहे. पुढे जात रहा, कशासाठी अडकून 
राहू नका. स्वज्ञानात दृढ राहून जो आयुष्यात पुढे जात रहातो त्याला 
अंतिम ध्येय साध्य होते. पण जो अधीर होऊन मोह आणि इच्छांच्या 
मागे सैरावैरा धावत सुटतो तो जीवनाचे साध्यच हरवून बसतो.