लहान मुलांसारखे आनंदी राहणे

रविवार, १२ ऑक्टोबर २०१४,                                                                     क़ुएबेक, कॅनडा.


एक अशी गोष्ट आहे कि प्रत्येकजण त्याच्या शोधात असतो आणि ती म्हणजे आनंद. असे नाही कि लोकांना आनंद सापडत नाही, त्यांना आनंद सापडतो पण तो फार काळ टिकत नाही. तो खुपदा क्षणिक, तर कधी काही तासांपुरता, तर कधी एक , दोन दिवसांपुरता मर्यादित असतो. पण स्वाभाविक मनोवृत्ती अशी असते कि आपण असा चिरकाल टिकणारा आनंद शोधत असतो, कि जो कधीही संपणार नाही .

मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो.एक सद्गृहस्थ आपल्या घरासमोर हरविलेल्या किल्ल्या शोधत असतात. ते त्या रस्त्यावरील दिव्याखाली त्या शोधत होते.मग तेथे आणखी काही लोक जमा झाले आणि ते त्यांना किल्ल्या शोधायला मदत करू लागले. शोधताना एका माणसाने या सद्गृहस्थांना विचारले कि , “ तुमच्या किल्ल्या कोठे हरविल्या आहेत ?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले कि “ त्या घरात हरविल्या आहेत.” “ मग तुम्ही त्या रस्त्यावर का शोधत आहात?”

असेच काहीसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत या जगात होत असते. आपल्या अंतरात अमीप आनंद भरून राहिला आहे तर आपण तो बाहेर शोधात असतो. आता जरा असे आठवून पहा कि आपण आपल्या लहानपणी काय करायचो ? आपण खूप ओरडण्यात, खेळण्यात आनंद मिळवायचो. प्रत्येक मुल हे जणू एक आनंदाचा ठेवा असते , पण आपण जसे मोठे होतो तेंव्हा हा आनंदाचा ठेवा मात्र कोठेतरी हरवून बसतो. एक लहान मुल दिवसातून सुमारे ४०० वेळा हसते. पण जेंव्हा हे मुल किशोर अवस्थेत प्रवेश करते तेंव्हा ते दिवसाला फक्त १७ वेळा हसते आणि ते जेंव्हा प्रौढ होते तेंव्हा ते क्वचितच हसते आणि तेसुद्धा दुसरा कोणी हसला तरच ते हसून प्रतिसाद देते. आता प्रश्न असा आहे कि आपण हे कसे बदलू शकतो? आपल्यापाशी जन्मता जी निरागसता होती ती कशी टिकवून ठेवता येईल ? आपण परत कसे हसू शकू? हे शोधणे आवश्यक आहे.

जर तुम्ही काळजीपूर्वक या प्रश्नाकडे पहिले तर असे लक्षात येईल कि अशा तीन गोष्टी आहेत कि ज्या आपल्याला लहान मुलासारखे आनंदी असण्यापासून रोखतात.
1. पूर्वधारणा
2. असुरक्षितता
3. तणाव

या तीन शिवाय कोणती चौथी गोष्ट असेल असे मला वाटत नाही. तुम्हाला जर ती सापडली तर मला सांगा. आता आपण या तीन गोष्टींपासून सुटका करून घ्यायला पाहिजे.

योग्य श्वसनाच्या पद्धती वापरून आपण तणावापासून दूर राहू शकतो. श्वसनाच्या अशा अनेक पद्धती आहेत कि ज्यापासून आपल्याला आराम मिळून आपण बरीचशी उर्जा परत मिळवू शकतो. तणाव म्हणजे काय असे जर तुम्ही मला विचारलेत तर तणाव काय असतो हे मला माहित नाही , पण मी अनेक लोकांना तणावाखाली असताना बघितले आहे. जेंव्हा मी त्याचे विश्लेषण करतो तेंव्हा असे पाहतो कि मनुष्य तणावाबद्धल उर्जा आणि वेळ यांच्याअभावामुळे फार काही करू शकत नाही.

यासाठी तुम्हाला तुमच्या गरजा कमी करायला पाहिजेत किंवा तुमची उर्जा वाढवायला पाहिजे. आता या दोन्हीमध्ये तुमच्या गरजा कमी करणे हे फारसे व्यवहार्य नाही तर तुमची उर्जा वाढविणे हे आवश्यक आहे. म्हणून श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, ध्यान, योग हे सर्व १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत तुमची उर्जा वाढवायला मदत करतात. तुम्ही जर ध्यान करताना जागरूकपणे आराम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ६ ते ८ तासांच्या झोपेएवढी उर्जा मिळते.

तुम्हाला झोपेमुळे जी विश्रांती मिळते ती सुस्त विश्रांती असते. दुसऱ्याप्रकारची विश्रांती म्हणजे जागृत विश्रांती होय. या विश्रांतीत तुमच्या उर्जेत चंगली वाढ होते. यालाच ध्यान असे म्हणतात. ध्यान म्हणजे नुसते बसून कोणत्यातरी गोष्टीचा विचार करणे नव्हे. हि क्रिया म्हणजे विचारांच्या मुळाशी जाणे होय. म्हणून तणाव कमी करून नाहीसा करणे हि पहिली पायरी होय.

दुसरे म्हणजे पूर्वधारणेचा त्याग करणे होय. या पूर्वधारणेचे अनेक प्रकार असतात. दोन पिढ्यांमध्ये पूर्वधारणा असते. तरुण पिढी हि वयस्कर लोकांबरोबर बसून आपल्या प्रश्नांवर चर्चा करीत नाहीत. याला पिढ्यातील अंतर म्हणतात. तुम्हाला हे साऱ्या जगभर आढळेल. एका विशिष्ट वयोगटातील लोक एकत्र बसून आपली सुख-दुखः एकमेकाना सांगतात. ते आपल्यापेक्षा लहान किंवा मोठ्या माणसांना आपली सुख-दुखः कधीही सांगणार नाहीत.

तसेच वर्ग आणि लिंग यात पण पूर्वधारणा असते. कॅनडाच्या या भागात ती एवढी नसेल पण जगाच्या काही भागात लिंग, धर्म, संस्कृती, भाषा अशा अनेक कारणांनी पूर्वधारणा ठेवली जाते. असे पूर्वधारणेचे अनेक प्रकार असतात. या पूर्वधारणेतून बाहेर पडून सर्व जग के एक कुटुंब आहे असे समजणे हेच खरे शहाणपण होय.

वसुधैव कुटुंबकम हि धारणा असेल तर गुन्हेगारी, युद्ध आणि असे अनेक प्रश्न या जगातून नाहीसे होतील. यात किती लोकांचा बळी जात आहे ते पहा. या जगात सर्वत्र हिंसा दृष्टीस पडत आहे. व्यापक दृष्टीकोन आणि शहाणपणाचा अभाव हे याचे मूळ कारण आहे.

तिसरे म्हणजे असुरक्षितता. आता हि असुरक्षितता कशासाठी? ‘ मला माझे असे कोणीच नाहीये, आता माझी काळजी कोण घेईल?’ मी तुम्हाला सांगतो, कि या पृथ्वीतलावर इतके प्रेम आणि करुणा आहे, तो जगनियंता हा तर मूर्तिमंत प्रेमाचे प्रतिक आहे आणि आपल्याला जेंव्हा जेंव्हा, ज्या ज्या गोष्टीची गरज असते तेंव्हा ती मिळेल याची चोख व्यवस्था त्याच्याकडे आहे. 

तुम्ही जेंव्हा तुमच्या गत आयुष्यात किती वेळा असे असुरक्षित झालात? ती वेळ कशी निभावून गेली आणि आज तुम्ही एक परिपूर्ण व्यक्तिमत्व झाले आहात. आणि जेंव्हा तुम्ही तुमच्या त्या असुरक्षित काळाकडे वळून बघता तेंव्हा असे लक्षात येते कि तुम्हाला तसे वाटणे हा केवळ वेळेचा अपव्यय होता, होय कि नाही? मागील २० वर्षात तुम्ही किती वेळा असुरक्षित काळ घालविला हे मोजा. किती काळ हा तुम्ही उदास अवस्थेत घालविलात ? हा केवळ वेळच अपव्यय नसून त्यामुळे तुमच्या शरीरात विष तयार झाले. या असुरक्षिततेमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.

तुम्ही तीन गोष्टी केल्या पाहिजेत:

१. तुमचा भूतकाळ आठवून पहा आणि असे पहा कि असुरक्षितत वाटणे हा वेळेचा अपव्यय होता. यामुळे    
    तुम्हाला शक्ती मिळेल.
२. असे लक्षात ठेवा कि या जगात चांगले लोक पण आहेत. ते नेहमीच तुमच्या मदतीसाठी येतात.
३. तुम्हाला मार्गदर्शन करणारी आणि मदत करणारी एक शक्ती या जगात आहे.

असे हे शहाणपण समजून घेतले तर ते तुम्हाला असुरक्षिततेपासून मुक्ती देईल.

आता तुम्ही तणाव दूर केलात, असुरक्षितता आणि पूर्वधारणेपासून मुक्ती मिळवलीत कि तुम्ही एक लहान मुलासारखे आनंद उपभोगू शकाल. खरेतर हा आनंद तुमच्याजवळ असतो पण त्यावर या तीन गोष्टींची राख साचलेली असते आणि ती दूर करताच तो तुमच्या दृष्टीला सापडेल.

अशातऱ्हेने ध्यान, योग आणि श्वसनाचे व्यायाम यांनी तणावावर विजय मिळवा. शहाणपणाने पूर्वधारणेपासून मुक्त व्हा आणि आपले गतआयुष्य आठवून आत्मविश्वास आणि श्रद्धेने असुरक्षितता दूर सारा.