बुटांचा निराळा जोड

02
2012
Nov
बंगलोर, भारत


प्रश्न : ‘इंद्रियार्थेषु वैराग्यं अनाहंकार इव च, जन्म-मृत्यू-जरा-व्याधी दु:ख दोषनुदर्शनं’ याचा अर्थ समजावून सांगाल कां ?

श्री श्री : ‘इंद्रियार्थेषु वैराग्यं’, आपण इतक्या गोष्टी बघतो, इतकी सुंदर दृश्ये बघतो, पण आपण किती काळ पर्यंत बघत राहू शकतो ? एका क्षणाला आपले डोळे थकून जातात त्यामुळे आपण ते बंद करतो. तसेच वासाचे आहे. जे लोक अत्तराच्या कारखान्यात काम करतात, त्यांना सुगंधाचाच वीट येतो. कधी कधी तर त्यांचे नाक कामच करेनासे होते. सुगंध मोगऱ्याचा आहे, चमेलीचा आहे की गुलाबाचा हेच त्यांना कळेनासे होते. सतत सुवास घेऊन घेऊन त्यांना इतका वीट येतो की कुठलाही वास नाही अशा ठिकाणी त्यांना जावेसे वाटते. 

चवीचेही तसेच आहे. किती चव घेऊ शकाल ? आणि स्पर्श, किती स्पर्श करू शकाल ? दिवसातले २४ तासं ? जर कुणी एकमेकांना २४ तासं स्पर्श करत राहिले तर दोघांनाही त्याचा वीट येईल. त्यांना म्हणावेसे वाटेल की, “दूर हो, हात लाऊ नको मला !” म्हणजे स्पर्शालाही मर्यादा आहेत.

‘इंद्रियार्थेषु’ म्हणजे दृष्टी, वास, स्पर्श, चव आणि श्रवण या सर्व ज्ञानेद्रीयांपासून मिळणाऱ्या ज्ञानापासून मनाला लांब नेणे. त्याबद्दल वैराग्याची भावना निर्माण होणे.

‘अनाहंकार इव च’ म्हणजे अहंकार रहित व्यक्तिमत्व. ‘मी ’, ‘मला’, ‘माझे’ या सर्वाचा त्याग करून रिक्त होणे. हा ‘मी ’ आपले वजन बरेच वाढवतो. या ना त्या प्रकारे ते चीकटतेच, जसे, ‘माझे घर’, ‘माझा देश’, ‘ माझी भाषा’, ‘माझा धर्म’.

लोक त्यांच्या धर्मासाठी जीव द्यायलाही तयार असतात. कां ? धर्मासाठी नाही तर ‘मी ’ साठी. मी हिंदू आहे, मी बौद्ध आहे, मी क्रिश्चन आहे किंवा मी मुस्लीम आहे या साठी. जेव्हा लोक मी ला चिकटून रहातात तेव्हा त्यांच्याकडून मूळ प्रश्नाबद्दल डोळे झाक केली जाते. या मी ला घालवून टाका आणि मुक्त व्हा. तुमच्यापासून अलग, मनाच्या मुक्त अवस्थेतून सगळ्या गोष्टींकडे बघा. असा मी जो अनाहंकारी आहे.

आपल्याला हे कळले पाहिजे की आपण आपल्याच बुटात अडकलेले आहोत. त्यां बुतातून तुमचे पाय बाहेर काढा आणि दुसरे बूट घालून बघा आणि मग तुम्हाला एक निराळेच जग पहायला मिळेल. भारतात संतांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत.

मी मध्ये अडकून राहू नका. ‘माझाच धर्म श्रेष्ठ’ असे म्हणू नका. जर तुमच्या धर्मात काही त्रुटी असतील तर त्यां लक्षात घ्या. सर्व धर्मांकडे एकत्रितपणे बघा म्हणजे मग तुम्हाला प्रत्येक धर्मातील गुण आणि मर्यादा लक्षात येतील. जर तुम्ही ‘माझा धर्म ’ यातच अडकून राहिलात तर, ना तुम्हाला त्यातल्या उणीवा कळतील ना तुम्ही शांततेने जगू शकाल. त्यात तुमच्या मनाची विशालता किंवा मोठेपणाही दिसणार नाही. जर तुमच्यात मनाची विशालता निर्माण झाली नाही आणि मन संकुचित राहिले तर, तुमच्यात आत्म्याचे ज्ञान उदयास येणार नाही आणि तुम्हाला भक्तीचा अनुभवही येणार नाही की तुमचे व्यक्तिमत्व फुलून येणार नाही.

तुम्ही रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल ऐकले असेल. (१९ व्या शतकातील भारतातील एक महात्मा)त्यांनी निनिराळ्या धर्मांचा अनुभव घेतला. त्यांनी प्रत्येक धर्माचा तीन दिवसांसाठी स्वीकार केला आणि त्या त्या धर्मातील सर्व प्रथा पाळल्या व कर्मकांडे केली. याचा अर्थ प्रत्येकाने असेच करायला पाहिजे असे नाही.

मी जेव्हा ८-१० वर्षांचा होतो तेव्हा मी देखी चर्चमध्ये गेलो, पद्र्यांचे भाषण ऐकले आणि त्यांच्या प्रथा बघितल्या. मी माशिदीतही गेलो आणि मुस्लीम मौलवींकडून कुराण शिकलो. आमचे चांगले संबंध होते आणि आम्ही ज्ञानावर चर्चाही केल्या. बौद्ध लोकांशीही मी चर्चा केल्या आहेत, त्यांच्या पद्धती शिकलो आहे. आपण सर्व धर्मातील लोकांचे सुख दु:ख, यातना आणि भोग वाटून घेतले पाहिजे.

मी जेव्हा युरोप मध्ये जातो तेव्हा मी युरोपियानांसारखा रहातो. मी मंगोलियाला जातो तेव्हा तो मला स्वत:चाच देश वाटतो. त्याचप्रमाणे मी जेव्हा दक्षिण अमेरिकेत जातो तेव्हा ते मला आपले स्वत:चे असल्यासारखेच वाटते. मला त्यांच्या भाषेचे एकही अक्षर माहित नाही आणि त्यांना माझी भाषा येत नाही, तरीही एकीची भावना असते. तर, ही एकीची भावना ही अहंकार नसण्याची खून आहे. ‘अनाहंकार’. तो अहंकाराच्या अभावातून निर्माण होतो. अहंकार म्हणजे कोंडमाऱ्याची, संकुचीतपणाची भावना असते.

प्रश्न : गुरुदेव, एखाद्या परिस्थितीत मन अडकून रहाते तेव्हा ते पटकन त्यातून बाहेर येत नाही. या साठी काय करावे ?

श्री श्री: ठीक आहे, मन असेच असते. अशा वेळीच ज्ञान महत्वाचे असते. ज्ञान म्हणजे वादळात सुरक्षा जॅकेट धरून ठेवण्यासारखे आहे. म्हणूनच त्याला भावनांचे वादळ असे म्हणतात. प्राचीन लोकांनी भावनांची तुलना महासागराशी केली आहे आणि तुम्हाला हा सागर पोहून पार जायला शिकायला हवे. ज्ञान हे सुरक्षा जॅकेट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पोहून पोहून थकाल तेव्हा सुरक्षा जॅकेट घाला म्हणजे तुम्ही सुरक्षितपणे तीरावर पोहोचाल. 

कल्पना करा, जर ज्ञान तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही एखाद्या संकटात अडकलात तर तुमची काय परिस्थिती होईल ? तुम्ही काय कराल ? जर तुम्ही कधीच ध्यान, प्राणायाम केले नसेल, कधीच ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या नसतील आणि तुम्ही अशा एखाद्या एखाद्या प्रसंगात अडकलात की जिथे तुमचे मन एखाद्या मुलीत किंवा मुलात अडकले तर अशावेळी तुमच्या मनात काय काय झाले असते ? तुम्हाला वेड लागले असते. आभार माना की तुमच्याकडे निदान हे ज्ञान तरी आहे. ज्ञानच तुम्हाला सुरक्षितपणे तरून जायला मदत करेल.

उदाहरणार्थ, जर कुणी तुमचा अपमान केला तर ज्ञानाचा एक मुद्दा तुम्हाला आठवतो, ‘ दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनू नका.’ हे आपोआप होते. कुठूनतरी तुमच्यात एक ज्ञानाचा किरण येतो आणि तुम्हाला वाचवतो आणि त्या प्रसंगातून वर उचलून धरतो. असे होते की नाही ? (प्रेक्षकातील बऱ्याच लोकांनी सहमती दर्शवली.)

बघा किती तरी लोकांना असा अनुभव आला आहे.
 ( एक भक्त : गुरुदेव, तुम्ही फक्त आशिर्वाद द्या)

होय, माझा आशिर्वाद कधी नसतो ? माझा आशीर्वाद नेहमीच असतो. पण तुम्ही जास्त मोठे भांडे घेऊन यायला हवे. तुम्ही एक लहानशी वाटी घेऊन येता आणि म्हणता, ‘मला दोन लिटर द्या.’ तुम्ही तुमचे भांडे मोठे करायला हवे म्हणजे मी दोन लिटरच्या ऐवजी चर लिटर देऊ शकेन. तुम्ही इतके लहान भांडे आणता की ज्यात दोन लिटर तर सोडाच, फक्त दहा मिली लिटर मावेल.

कृपा आणि आशिर्वाद यांची आपापली जागा असते. त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला ते मिळत राहिलच पण आपल्यालाही आपले प्रयत्न करायला हवे. स्वीकारण्याची आपली कुवत आपल्याला वाढवायला हवी.

प्रश्न : एखाद्या लग्न झालेल्या माणसावर निरपेक्ष परम करणे चूक आहे कां ?

श्री श्री : ज्याच्यावर कुणीतरी निरपेक्ष प्रेम करत आहे अशा कुणाची तरी समजा तुम्ही पत्नी किंवा पती असाल तर तुम्हाला ते आवडेल ? हे प्रेम नाही ही तर भावनिक गुंतणूक आहे. त्यातून बाहेर या.

तुम्ही जिथे आहात तिथेच तुमच्यात ठाम आणि घट्ट रहा. दुसऱ्या कुणाचे तरी कुटुंब उध्वस्त करायला जाऊ नका. यातून बाहेर रहा.

जगात ७ कोटी लोक आहेत. त्यातले जवळ जवळ अर्धे अविवाहित आहेत. तुम्ही ज्याच्यात गुंतला आहात त्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुम्हाला भेटेल.

जेव्हा तुम्ही भावनिकरीत्या गुंतता तेव्हा तुमच्या डोक्यात दुसरे काहीच येत नाही. तुम्ही एका बुडबुड्यात असता. तुम्ही तुमच्या स्वत:च्याच एका लहानशा विश्वात असता. विचार करता, बसता, बोलता, खाता, झोपता तुम्ही त्याच माणसाचा विचार करत राहता, तुम्हाला वेदाच लागते. हाच क्षण आहे जेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे की एक दिवस तुम्ही मरणार आहात. जेव्हा तुम्हाला मृत्यूची जाणीव होते तेव्हा अचानक हा मोह हा तुम्ही कुणात अडकल्याचा भास नाहीसा होतो. तुम्ही फक्त तुमच्या स्वत:च्या मृत्यूचा विचार करायचा. मृत्यूचे ज्ञान जीवनाला खूप गहिरे मजबूत पाया असलेले बनवते. नाही तर आपण असे जगतो की जणू काही आपण इथे कायमचेच रहाणार आहोत.

प्रश्न : भावनांपासून सुटका कशी करून घ्यायची ?

श्री श्री : प्रत्येक भावानांनाध्ये पक्केपणा असायला हवा. भावनांपासून सुटका करून घ्यायची गरज नाही. भावनांचे वर खाली होतच राहिल पण त्यातून तुम्ही कणखर बनायला हवे.

प्रश्न : गुरुदेव, जर नाकपुड्या, फुफ्फुसे, पोट, सगळे शरिर पोकळ आणि रिकामे आहे तर मग, मन मात्र विचारांनी भरलेले कां असते ? विचारांचा मूळ स्रोत काय आहे ?

श्री श्री : जेव्हा मन विचार करू लागते की ते पोकळ आणि रिकामे आहे तेव्हा ते पोकळ आणि रिकामे व्हायला लागते. तुम्ही तेच करताय.

प्रश्न : गुरुदेव, आज करवा चौथ आहे. ( एक प्राचीन उत्सव, ज्यात स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुआरोग्यासाठी प्रार्थना करतात.)

श्री श्री : होय, आज करवा चौथ आहे. तुम्ही चंद्र पाहिला आहेच. आता जाऊन जेवण करा. जरी तुम्हाला चंद्र दिसला नसला तरी काही हरकत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्यातच चंद्र पाहिला आहे आणि जाऊन जेवण करा.

आपल्या देशात या सगळ्या प्रथा आहेत. जसे भाऊ बीज ( या दिवशी बहिणी त्यांच्या भावांसाठी प्रार्थना करतात. आई त्यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि सुआरोग्या चिंतितात.) आणि करवा चौथ. या उत्सवांनी आपले नातेसंबंध दृढ होतात. नातेसंबंधातील पावित्र्य राखण्यासाठी आपल्या देशात गेली अनेक वर्षे ही खास प्रथा पाळली जात आहे. करवा चौथ च्या दिवशी पत्नी पतीच्या सुखासाठी प्रार्थना आणि उपवास करते. आजकाल ती त्याच्या मनस्वास्थ्यासाठीही प्रार्थना करते.

देवाची प्रार्थना करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण योग्य उपयोग करून घ्यायला हवा. ही अशीच एक संधी आहे. तुम्ही दिवसभर उपवास करता तेव्हा शरीराची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते आणि तुम्ही प्रार्थना करू शकता. ही चांगली परंपरा आहे.

जे कुणी हा उपवास करतील त्यांनी निर्जळी उपवास करू नये. माझा निर्जळी उपावासावर विश्वास नाही. उपवसाबारोबरच थोडे पाणी पिण्याचीही गरज आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्ये (टॉकझिन्स) बाहेर फेकली जातात आणि शुद्धी होते.त्यामुळे उपवास करताना पाणी पिणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर मधुमेह किंवा अशा काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करा.

पतीदेखील आपल्या पत्नीसाठी उपवास करू शकतात. काही पुरुषांनी करवा चौथ करायला सुरवात केलीही आहे. करत रहा, काही हरकत नाही.करायलाच हवे. हे दोन्ही बाजूनी गरजेचे आहे. केवळ एकतर्फी नाही.