तुम्ही तुमचे जग घडवता.

13
2014
Nov
बंगळूरू, भारत.

हे सर्व जग कंपनांपासून बनले आहे आणि ही सर्व कंपने सात्विक ( सकारात्मक 
आणि उत्थापित करणारी) असावीत हे बघणे हे आपले काम आहे.

जेंव्हा एखादा डॉक्टर चांगला असून सर्वांवर उपचार करून त्यांना तो बरे करणारा 
असेल तर आपण म्हणतो कि तो एक चांगला चिकित्सक स्पर्श असलेला आहे. 
असे पहा कि सर्व डॉक्टर सारखेच असतात पण काहीजण त्यांच्या रोग्यांचा 
इतरांपेक्षा चांगला इलाज करतात. त्यांच्या हाताला चिकित्सक स्पर्श आहे असे 
म्हटले जाते. आपण आपल्या चेतनेमध्ये ज्याची बीजे पेरतो, त्याचीच कंपने 
आपल्या सभोवती तयार होतात. म्हणून आपण नियमितपणे योग आणि प्राणायाम 
केला पाहिजे. म्हणून तुमच्या मनाचा आणि आयुष्याचा स्तर उंचावण्याची हि 
एक अदभूत संधी आहे.

आम्ही आश्रमात प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी देवीची एक छोटी पूजा करीत असतो. 
उद्या तुमच्यापैकी ज्या कोणाला हि पूजा बघायची इच्छा असेल ते तसे करू 
शकतात. सर्वप्रथम आम्ही वेळेवर पाउस पडावा म्हणून देवाची प्रार्थना करणार 
आहोत, ज्यामुळे शेतात जे काही पेरले असेल ते उगवून भरपूर धान्य उत्पादन 
होऊन आपल्या देशात कोणीही उपाशी राहणार नाही.

पूजेनंतर इतर सत्र व कार्यक्रम होतील. कोणतीही नवी गोष्ट सुरु करण्यापूर्वी 
देवाची प्रार्थना करावी असे आम्हाला शिकविले आहे. हि भारतातील एक अनोखी 
परंपरा असून ती जगातील इतर कोठल्याही देशात सापडत नाही.

जेंव्हा आपण प्रार्थना करतो, तेंव्हा आपण या गोष्टीची आठवण ठेवायला पाहिजे 
कि आपण जेंव्हा या जगात प्रवेश केला तेंव्हा आपण आपले पालक आणि कुटुंबीय 
यांच्यावर आपल्या गरजांसाठी अवलंबून होतो. जेंव्हा आपण म्हातारे होतो तेंव्हा 
पण आपण आपली मुले आणि कुटुंबीय यांच्यावर कोणत्या तरी कारणांनी अवलंबून 
असतो. अश्या तऱ्हेने लहानपणी आणि म्हातारपणी आपण दुसऱ्यावर अवलंबून 
असतो.आणि आयुष्याच्या या दोन अवस्थामध्ये पण आपण अनेक गोष्टींवर अवलंबून 
असतो, उदाहरणार्थ पाऊस, समाज इत्यादी. अशातऱ्हेने आपण आयुष्यभर 
कोणत्यातरी गोष्टीवर किंवा व्यक्तीवर अवलंबून असतो. परंतु जेंव्हा आपल्याला 
आठवते कि आपले हे कोणावरतरी अवलंबून असणे हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व 
गरजांसाठी देवावर अवलंबून असणे आहे, तेंव्हा असे देवावर अवलंबून असणे हा 
आपला कमकुवतपणा नसून ती एक मोठी आंतरिक शक्ती आहे. असे असेल तर 
मग आपण लाचारीचे क्षणसुद्धा या शक्तीच्या जोरावर पार करू शकतो. हेच देव 
पूजेचे रहस्य आहे. 

तुम्ही हिंदीमधील एक म्हण ऐकली असेल “ निर्बल के बल राम “ (कमजोर 
माणसासाठी देव ही शक्ती असते). म्हणून हे लक्षात घ्या कि तुम्ही कमजोर 
आहात आणि मग असे लक्षात घ्या कि देव ही कमजोर माणसाची शक्ती आहे. 
जेंव्हा तुमची अशी दृढ श्रद्धा असते, तेंव्हा तुम्ही कमजोर आणि लाचार राहू शकता 
काय ? नाही, हे ज्ञान मिळाल्यावर तुम्हाला अपरिमित शक्तीची जाणीव होते 
आणि मग तुम्ही आत्मनिर्भर आणि स्वतंत्र होता. आपल्या शेतकऱ्यांना असे स्वतंत्र 
आणि आत्मनिर्भर होण्याची खूप गरज आहे.   

आज आर्ट ऑफ लिविंगचा संस्थापना दिवस आहे. खरे पाहता या ज्ञानाची कोठेही 
सुरवात नाही कारण ते कालातीत आणि प्रारंभातीत आहे. पण आम्ही औपचारिकरित्या 
आजच्या दिवशी आर्ट ऑफ लिविंग फौन्डेशन आणि वेद विज्ञान महा विद्यापीठ 
याची स्थापना केली आणि १३ नोव्हेंबर १९८१ रोजी यांची नोंदणी झाली. आज 
आम्ही सेवेची ३३ वर्षे पूर्ण केली. आमचे सुरवातीचे एक विश्वस्त न्यायाधीश 
व्ही.आर. कृष्णय्या होते. आज ते शंभर वर्षांचे झाले. त्यांचा १०० वा वाढदिवस 
आहे. हे भारतातील एक नावाजलेले कायदे पंडित आणि न्यायाधीश आहेत. त्याकाळी 
ते स्वतःला नास्तिक समजायचे. पण मला भेटल्यानंतर आमची अध्यात्मावर अनेकदा 
चर्चा होत असे आणि हळूहळू त्यांना त्यात रस वाटू लागला.

त्याकाळी सुदर्शन क्रिया नसल्यामुळे माझ्या मार्गदर्शित ध्यानाला ते उपस्थित असायचे 
आणि मी तेंव्हा फक्त ध्यान करवून घ्यायचो. त्यांनी माझ्याबरोबर बराच काळ व्यतीत 
केला. त्यानंतर त्यांना अध्यात्माविषयी काही अदभूत आहे असे वाटू लागले आणि 
मग तेंव्हापासून एक भक्त आणि विश्वासू म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. ते एक 
मोठ्या उमद्या मनाचे गृहस्थ आहेत.

तुम्हाला माहित आहे कि एखादा माणूस नास्तिक किंवा देवावर, अध्यात्मावर विश्वास 
ठेवणारा असला तरी जोपर्यंत तो आपले बोलणे आणि कृती याच्याविषयी दृढ आणि खरा 
राहतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. आणि मग जसा जसा काळ पुढे जातो, 
हळूहळू आणि निश्चितपणे त्यांना अध्यात्माविषयी गोडी वाटायला लागेत आणि ते 
एक सच्चे भक्त होतात. हे आपण अनेक वेळा पाहिले आहे.

कोणीतरी कधीतरी असे म्हणेल कि ‘मी नास्तिक आहे’, पण त्यांचे असे म्हणणे 
अनेक वेळा अगदी वरवरचे असते. त्यांना मनात खोलवर अशी जाणीव असते कि 
त्यांच्या मर्यादित ज्ञानाच्या पलीकडे पण खरेच काहीतरी आहे. अशा लोकांना हळूहळू 
आणि निश्चितपणे अध्यात्माचे महत्व समजायला लागते. खरे पाहता त्यावेळी संस्था 
सुरु करायला मी फारसा उत्सुक नव्हतो. काही लोकांनी मला संस्था सुरु करायला 
स्फूर्ती आणि समर्थन दिले, त्यात प्रामुख्याने पिताजी ( गुरुदेवांच्या वडिलांचे प्रेमाने 
घेतलेले नाव) , न्यायाधीश कृष्णय्या, न्यायाधीश भगवती, श्रीयुत लक्ष्मण राव जे 
त्यावेळी बंगलोरचे महापौर होते, आणि श्रीयुत नरसिंह राव जे त्यावेळी कर्नाटका 
राज्याचे प्रधान सचिव होते. हे पांच लोक मला असे म्हणाले कि “ नाही, तुम्ही 
हि संस्था सुरु केलीच पाहिजे”. ३३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी संस्थेची नोंदणी झाली. 

अश्यातऱ्हेने ह्या आश्रमाने आपल्या अस्तित्वाची ३३ वर्षे पूर्ण केली. त्या काळात आश्रम 
आज आहे तसा नव्हता. त्या सुरवातीच्या काळात खोल्या आणि रहायच्या वसाहती या 
भुस्सा आणि चिखलापासून शाकारुन बनवलेल्या असायच्या.त्याकाळी सिमेंट वापरून 
केलेले एकही पक्के घर नव्हते तर प्रत्येकाने झोपड्या बनवल्या होत्या. पण आजचा 
बदल पहा. आज प्रत्येकजण सिमेंटने बनविलेले भक्कम घर बनवीत असतो. त्याकाळी, 
पावसाळ्यात त्या भूश्याच्या छपरातून पाणी गळायचे. मला नेहमी साधेपणा आवडतो. 
मी नेहमी लोकांना जुन्याकाळाप्रमाणे नारळाचा काथ्या आणि गवतापासून बनविलेली 
घरे बांधा असे सांगत असे. त्यावेळी माझ्याबरोबर सुमारे १०० ते २०० लोक होते. 
त्यापैकी काही आजपण येथे बसले आहेत. आम्ही विहिरीतून पाणी भरायचो आणि 
जनित्रातून आश्रमाला दिव्यांसाठी वीज पुरवठा होत असे. त्याकाळी फक्त एक किंवा 
दोन तास वीज पुरवठा व्हायचा. त्याकाळी खूप पाऊस असायचा आणि वारे पण
इतके जोरदार असत कि सर्वकाही उडून जात असे. तेंव्हा आम्ही असे ठरविले कि 
आता पक्की घरे बांधायला पाहिजेत. परदेशातून अनेक लोक मला भेटायला येऊ 
लागले. त्यापैकी एक जण मला म्हणाला, “गुरुदेव, हल्ली आश्रमात येणाऱ्या 
भक्तांची संख्या वाढायला लागली आहे. या सर्वांना सामावून घेईल अशा एका 
मोठे सभागृह बांधण्याची गरज आहे. ते फार काळ या झोपड्या आणि तंबूत 
राहू शकणार नाहीत.”

मी त्यांच्याशी सहमती दाखवून त्यांना बांधकाम सुरु करायला सांगितले. मी स्वतः 
या सभागृहाची रचना तयार करून त्यांना सूचना दिल्या. ते ध्यानाचे सभागृह म्हणजे 
आज तुम्ही बसला आहात तो विशालाक्षी मंडप होय.

त्यानंतर १०-१५ वर्षांनी, अधिक आणि अधिक भक्कम घरे बांधायला सुरवात झाली. 
मग मी त्यांना म्हणालो, आपण जर आपल्यासाठी पक्की घरे बांधत आहोत तर 
आपण आजूबाजूच्या खेड्यातील आणि आसपासच्या लोकांना पक्की घरे बांधायला 
मदत केली पाहिजे. माझ्याजवळ त्यावेळी जे भक्त होते त्यांना मी सांगितले कि 
जर येथे (जवळपास) राहणाऱ्या सर्वांना जर पक्की घरे मिळणार असतील तर मी 
ती तशी घरे आश्रमात बांधायला परवानगी देईन. त्या सर्वांनी एकत्र येऊन आश्रमाच्या 
आसपास सर्वांना पक्की घरे मिळतील याची व्यवस्था केली. प्रत्येक घरात एक 
शौचालय आहे. आश्रमाच्या मागील परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी एक वसाहत 
बांधली. त्याआधी ते झोपड्यात राहत होते. त्यामुळे लोकांच्या राहण्याच्या 
परिस्थितीत सुधारणा झाली.