अपराधीपणाला थारा नाही

13
2014
Nov
बंगलोर, भारत.

प्रश्न: गुरुदेव, मागची अनेक वर्ष मी शिक्षक आहे. मी जेंव्हा स्वतः कडे आणि 
बाकीच्या शिक्षकांकडे बघतो तेंव्हा असे लक्षात येते कि आम्ही मुलभूत प्रशिक्षणातील 
काही अभ्यास स्वतः करत नाही आणि मग जेंव्हा मी मुलभूत प्रशिक्षणचा अभ्यासक्रम 
दुसऱ्यांना शिकवत असतो तेंव्हा मला आपण स्वतः न करता इतरांना शिकवितो 
त्यामुळे अपराधीपणा जाणवतो. काय करावे?

श्री श्री : तुम्हाला अपराधी वाटते आहे हे चांगले आहे. हे एक सुरक्षा द्वार आहे. 
तुम्ही जर विसराळूपणामुळे तुमच्या प्रशिक्षणाचा सराव करीत नाही तर तो एक खरा 
प्रश्नच आहे. जेंव्हा तुम्हाला तुमच्यातील कमीपणाबद्धल जाणीव होते तेंव्हा तुम्ही 
सुरक्षित असता.

तुम्ही धोकेबाज आहात असा विचार करू नका. तुम्ही या मार्गावरील एक वाटसरू 
असून तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन करीत आहात. यामुळे 
तुमच्यात विनम्रता येऊन ज्ञान हे अमूल्य आहे असे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही 
जरी १००% अनुसरण करत नसाल पण यामुळे तुमचे आयुष्य बदलले आहे हे तुम्ही 
नाकारू शकत नाही आणि तुम्ही सुमारे ८०% अनुसरण करीत आहात. म्हणून तुम्ही 
जरी प्रशिक्षणातील सर्व मुद्दे किंवा ज्ञान १००% अनुसरीत नसाल तरी तुम्ही जे ८०% 
अनुसरीत आहात त्याकडे लक्ष द्या. असे पण अनेक लोक आहेत कि ज्यांना काहीच 
समजले नाही, किंवा त्यांनी अजून या मार्गावर प्रवास सुरु केला नाही. त्यांना तुमची 
खरोखरच मदत होऊ शकते.

तुम्ही स्वतःला पाखंडी समजायची गरज नाहीये कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवत 
असता तेंव्हा तुम्ही पण ते शिकत असता. दुसऱ्याला शिकवताना तुम्ही स्वतः शिकून 
ज्ञान घासून पक्के करीत असता. नुसते बसून स्वतःला आणि दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा 
तुम्ही परत शिकवायला सुरवात करणे बरे. नाहीतर तुम्ही नुसते बसून स्वतःला दोष 
देत बसाल , ‘ मी कमकुवत आहे, मी ज्ञानाचे अनुसरण करू शकत नाही, मी 
वाईट आहे’ आणि मग स्वतःला अपराधी ठरवून दोषी समजू लागाल. अध्यात्मिक 
मार्गावर असताना घडू शकणारी हि सर्वात वाईट गोष्ट आहे. म्हणून अध्यात्मिक 
मार्गावर असताना तुम्हाला नेहमी गुरूची गरज असते. तुम्ही तुमचा कमकुवतपणा 
गुरूजवळ सोडून तुमच्या शक्तीनुसार या मार्गावर जेवढे जाता येईल तेवढे चालत 
राहायचे असते. तेंव्हा तुम्ही स्वतःच्या बाबतीत एवढे कठोर होऊ नका आणि त्याच 
वेळी असे लक्षात घ्या कि जरी तुम्ही सर्व ज्ञान आचरणात आणू शकत नाही पण ते 
सर्व ज्ञान आचरणात आणण्याचा तुमचा इरादा आहे हे चांगले आहे.

तुम्ही या मार्गावर चालत रहा. या मार्गावर भरकटून स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला 
तसे वाटत असेल तर या पुढील प्रगत अभ्यासक्रम किंवा आशीर्वाद अभ्यासक्रम करा, 
त्याने ते सर्व धुतले जाईल कारण , हे आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि जो 
पर्यंत तुम्ही परिपूर्ण होत नाही तो पर्यंत चालत रहा. आणि हळूहळू स्थिरपणे तुम्हाला 
ते निश्चित साध्य होईल.

मागे वळून पहा आणि विश्लेषण करा. समजा तुम्ही आयुष्यात कोणताही मुद्दा 
अभ्यासला नसता तर आजे तुम्ही कोठे असता? ते तसे झाले असते तर ते खूप 
भयानक झाले असते हे लक्षात घेऊन पुढे चालत राहा. तुमच्यातला जो कमीपणा 
आहे तो माझ्यापाशी सोडा.

प्रश्न: गुरुदेव, अनेक गुरु आणि संत यांनी भारताच्या पुनर्निर्माणाचे गरजेविषयी 
सांगितले आहे. असे वाटते कि या नवीन सरकारबरोबरच ती वेळ पण आली आहे. 
हे पुनर्निर्माण कोणत्या स्वरुपात व्हावे?

श्री श्री : काही वर्षांपूर्वी हे पुनर्निर्माण सुरु झाले आहे. लोक आता जागे झाले 
आहेत आणि त्याला आवश्यक असलेल्या उत्साहाने आणि वेगाने ते चालू राहिले 
पाहिजे. त्यासाठी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी खूप सावध, जागृत राहून या 
पुनर्निर्माण प्रक्रियेला पाठींबा द्यायला पाहिजे. माझी खात्री आहे कि ते तसे करतील. 
त्यातील बरेचजण तसे करतील.

प्रश्न: गुरुदेव, प्रेम कसे अबाधित राहू शकते? मला कधी प्रेमाची अनुभूती होते तर 
कधी अजिबातच होत नाही ?

श्री श्री : होय, प्रेम ही एक भेट आहे, म्हणून जेंव्हा त्याची अनुभूती होते तेंव्हा 
कृतज्ञ होता आणि जेंव्हा त्याची अनुभूती होत नाही तेंव्हा त्याची आस लागून 
तुमच्याकडून एखादी प्रार्थना म्हटली जाईल, एखादी कविता केली जाईल. फक्त 
प्रेमातूनच कविता निर्माण होते असे नाही तर जेंव्हा त्याची आस लागलेली असते 
तेंव्हा कविता निर्माण होते, प्रार्थना निर्माण होतात आणि अनेक चमत्कार पण घडू 
शकतात तेंव्हा त्याचा आस्वाद घ्या.

प्रश्न: गुरुदेव, येझदीना एवढा त्रास का सहन करावा लागत आहे? ते त्या काळात 
हिटलरच्या छळ छावण्यांचे सुरक्षा-रक्षक  म्हणून त्यांना आत्ता हे सहन करायला 
लागत आहे? कोणी काही केलेले नसताना त्यांना ही पिडा का सहन करायला लागत 
आहे?

श्री श्री : खरे पाहता या प्रश्नाला काही उत्तर नाही कारण ते आपल्या समजुतीच्या 
पलीकडे असलेल्या कोणत्यातरी गोष्टीशी निगडीत आहे. नुसते बसून ते का त्रासात 
आहेत असा विचार करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ते असा 
त्रास का सहन करीत आहेत याचे उत्तर शोधण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू 
शकतो याचा विचार करूयात. 

कुर्दिस्तानमध्ये त्यांनी अन्नधान्य आणि इतर सामुग्री सुमारे ११० टन जमा केली आहे. 
सिंजर पर्वताच्या परिसरात अडकलेल्या लोकांसाठी आम्ही हे विमानाने पोहोचवायची 
व्यवस्था करीत आहोत. तेथे सुमारे ९५०० लोक अडकलेले आहेत. आमची 
आर्ट ऑफ लिविंग ही व्यवस्था करीत आहे. ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा असेल 
त्यांनी संपर्क करावा. आपण त्यांना कशी मदत करू शकतो ते पाहूयात. त्यांच्या या 
त्रासाबद्धल लोकांमध्ये जागरूकता करायची गरज आहे. 
 
मध्य-युगात पारशी लोकांची अशीच अवस्था झाली होती. त्यांना इराण मधून 
हुसकावून लावण्यात आले. ते छोट्या होड्यांमधून गुजरातच्या किनाऱ्यावर उतरले 
तेंव्हा तेथील राजाने त्यांना आश्रय दिला. भारतातील लोक दयाळू होते, त्यांनी 
पारशी लोकांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करायला आणि त्यांच्या परंपरा पाळायला 
परवानगी दिली. भारताची एक जुनी परंपरा अशी आहे कि ज्यांच्या अस्तित्वाला धोका 
आहे त्यांचे संरक्षण करणे.त्याचप्रमाणे भारतात आलेल्या ज्यू लोकांना पण संरक्षण 
दिले गेले.

आज येझदी लोक संकटात आहेत आणि म्हणून आर्ट ऑफ लिविंग त्यांना स्वतःच्या 
हक्कांचे संरक्षण करायला मदत करून या परिस्थितीतून आणि संकटातून बाहेर 
पडायला मदत करीत आहे.
प्रश्न: गुरुदेव, गुरु बरोबरचे नाते हे चिरकालीन, अनेक जन्म टिकणारे असते काय? 
अनेक जन्मांमध्ये आपण एकाच गुरूबरोबर असतो काय?

श्री श्री : तुमचा प्रवास एकाच आयुष्यात संपवावा असे तुम्हाला का वाटत नाही? 
तुम्ही तो पुढे का ढकलीत आहात? मला कोंडीत पकडण्यासाठी तुम्ही असा अवघड 
प्रश्न विचारीत आहात. तुमचे काम तुम्ही या जन्मातच व्यवस्थित करा आणि 
‘पुढच्या जन्मात पण मला संधी मिळेल’ असा विचार करून ते पुढे ढकलू नका. 
पुढच्या जन्मात तुम्ही कोण असाल काय माहित, कदाचित गोठ्यातील एक गाय असाल. 
म्हणून पुढच्या जन्मापर्यंत ते पुढे ढकलू नका. मी अधून मधून असू शकतो. कदाचित 
तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील.

प्रश्न: गुरुदेव, प्रेम मिळवणे हे वेदनादायी आहे, प्रेम मिळाले नाही तर ते जास्त 
वेदनादायी आहे आणि प्रेमाचा सांभाळ करणे हे पण वेदनादायी आहे. यातल्या कोणत्या 
वेदनेचा मी स्वीकार करू?

श्री श्री : इच्छा तुमची, आशीर्वाद माझे. तुम्ही जर वेदनेचा स्वीकार करणार असाल 
तर तुमचे स्वागतच आहे, पण मी तुम्हाला सांगतो कि मोठ्या वेदनेचा स्वीकार करा 
कारण छोट्या वेदना काही कामाच्या नाहीत. संपूर्ण मानवतेच्या प्रेमाचा तुम्ही विचार 
करायला पाहिजे. ग्रहांविषयी प्रेम, प्राण्यांविषयी प्रेम , प्राण्यांचे अधिकार (प्राण्यांना 
पण जगण्याचा अधिकार आहे). त्यांचा जीव घ्यायचा आपल्याला कोणताही अधिकार 
नाही. या सगळ्याविषयी तुम्हाला काळजी वाटली पाहिजे.

शेळीच्या डोळ्यात पहा, किंवा अगदी कोंबड्या, गाई, कुत्र्यांच्या सुद्धा. त्यांच्या 
डोळ्यात बघा. या सर्व विश्व-रचनेमध्ये प्रेम भरून राहिले आहे, आणि आपल्या 
पोटाची खळगी भरण्यासाठी लोक त्यांचा बळी कसा घेऊ शकतात? ते आरोग्यदायी 
पण नाही. हे फार दुर्दैवी आहे.

प्रश्न: गुरुदेव, मागच्या पांच वर्षात आश्रम हा एखाद्या किल्ल्यासारखा झाला आहे. 
आजच्यापेक्षा पूर्वी येथे शांतता मिळणे जास्त सोपे होते.
श्री श्री : वर्तमान क्षणात राहून ज्ञान ऐका. पूर्वीच्या काळी कमी लोक असतील. 
आज खूप जास्ती लोक आहेत. जेंव्हा जास्ती लोक असतात, तेंव्हा तुम्हाला तुमचे 
ज्ञान, शहाणपण जास्त लोकांबरोबर वाटता येते, आणि सहनशीलता वाढविता येते. 
३० वर्ष जुन्या गोष्टीबरोबर चिकटून राहणे बरोबर नाही. ३० वर्षापूर्वी तुमचा संवाद 
हा १० लोकांबरोबर होत असे. आज तुम्हाला कदाचित १००० लोकांबरोबर संवाद 
करावा लागेल. वाढत्या काळाबरोबर आपण आपला आवाका वाढवायला पाहिजे आणि 
कोशामध्ये गुरफटून जाता कामा नये.

“वसुधैव कुटुंबकम” असे आपण म्हणतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे असे आपण 
मान्य केले आहे. तुम्ही या संकल्पनेशी जुळवून घ्यायला पाहिजे. कोणाशीही आणि 
सर्वांशी नाळ जुळली पाहिजे. तुमच्यासाठी काय आरामदायी आहे आणि काय आरामदायी 
नाही याचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या आराम कोशातून बाहेर पडून इतरांना 
आरामशीर कसे वाटेल हे बघायला पाहिजे.

हे महत्वाचे आहे.

किती लोक तुमच्याबरोबर कसे सहजपणे वागत आहेत ते पहा. तुम्ही किती 
लोकांच्याबरोबर सहजपणे आनंदी आणि आरामशीर राहू शकता याचा आढावा घ्याल काय? 
तुम्हाला जर लोक आवडत नसतील तर तुमच्या असे लक्षात येईल कि तुम्ही स्वतः 
मित्रता-पूर्ण असण्याची शक्यता नाही.

जसा आपला विस्तार होतो, आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि जगातील 
वेगवेगळ्या भागातील लोकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होतात. काही वेळा आपल्या 
राज्यातील, देशातील किंवा धर्मातील लोकांबरोबर मैत्रीपूर्ण असतो. येथे तुम्हाला 
सर्वांशी मिळून मिसळून राहावे लागते. येथे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत हिंदू, 
ख्रिश्चन, मुस्लीम, शीख. भारतातील प्रत्येक राज्यातील,  पुर्वोतर ते केरळ, 
जम्मू काश्मीर ते तामिळनाडू असे सर्वराज्यातील लोक येथे आले आहेत. जगातल्या 
सर्व भागातील लोक अगदी वेगवेगळे आचार-विचार आणि खाण्याच्या सवयी असलेले 
आहेत. म्हणून तुम्ही त्यांना सहजपणे आपलेसे केले पाहिजे. तुम्हाला स्वतःला पुरेशी 
शांती मिळाली आहे आता तुम्ही दुसऱ्यांना शांती कशी मिळेल हे बघा.