ठीक आहे! तुम्ही ते केले नाहीत.

18
2013
Jul
माँट्रियल, कॅनडा.
प्रश्न : मी कर्तेपणाच्या भावनेपासून सुटकारा कसा मिळवू?

श्री श्री : केवळ कर्म करीत राहा, त्याच्याबाबत चिंता करू नका.

मला वाटते की तुमच्याकडे बसून ‘मी कर्ता आहे किंवा नाही’ असा विचार करत बसायला बराच मोकळा वेळ आहे असे दिसते. जी तुम्ही करायला पाहिजे आहे अशीच कर्मे करा.

प्रत्येक कियेचा मोबदला असतो; आनंददायी, अप्रिय किंवा मिश्र. मोबदल्याचे हे केवळ तीन प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही कृती करता, तेव्हा तुम्ही काही सकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही नकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही सकारात्मक आणि नकारात्मक मोबदला कमावता. या सर्व मोबादाल्यांचा परिणाम केवळ काही काळापुरता टिकतो. म्हणून तर ज्ञानी याबद्दल चिंता करीत नाहीत.

प्रत्येक क्रियेमध्ये काहीतरी असे आहे जे सकारात्मक आहे आणि काहीतरी असे आहे जे नकारात्मक आहे. एखादी कृती १००% परिपूर्ण असू शकत नाही. एखाद्या कृतीमधून विकसित होणाऱ्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आणि कृतीच्या परिणामांची काळजी करू नका, केवळ पुढे चालत राहा. 

जर तुम्ही चुकीची कृती केली असेल, त्यामुळे तुम्ही धडा शिकला असाल तर पुढच्या वेळी ती चूक पुन्हा करू नका. जर तुम्ही योग्य कृती केली असेल तर त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक तश्याच योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते.

जर तुम्हाला असे दिसून आले की तुम्ही केलेल्या कृतीमध्ये तुम्ही अजून काही सुधारणा आणू शकता तर तुम्ही नेहमीच त्याबाबतीत सुधारणा करू शकता.

केवळ पुढे जात राहा, ‘मी कर्ता आहे’ किंवा ‘मी कर्ता नाही’ असे म्हणू नका. खरे तर एका बाबतीत तर कोणीही कर्ता नाही आणि दुसऱ्या बाबतीत पाहाल तर, होय, तुम्हीच तर कर्ता आहात, कारण तुमच्या आत द्वंद आहे. 

उपनिषदामध्ये अतिशय सुंदर कथा आहे ती अशी, ‘ज्या विश्ववृक्षावर, दोन पक्षी बसलेले आहेत, एक आहे जो फळ चाखतो आहे, दुसरा केवळ बघतो आहे, एका साक्षीदाराप्रमाणे’. तर, तुमच्यातील एक भाग आहे जो काहीही करीत नाही, तो बराच मोठा आहे. आणि तुमच्यातील एक भाग आहे जो सर्व खी करतो आहे. हे दोन्ही तुमच्या आत उपस्थित आहेत. 

आता तुम्ही “कसे?” हा प्रश्न विचाराल.

एका पातळीवर तुम्हाला आढळेल की तुमच्यात परिवर्तन येत आहे. तुमचे विचार बदलत आहेत, तुमच्या भावना बदलत आहेत, तुमच्या शरीरात बदल घडून येत आहे. तरीसुद्धा एका निराळ्या गहन पातळीवर तुमच्यामध्ये असे काहीतरी आहे जे अजिबात बदलत नाही; ते तसेच्या तसे आहे. तर हे किंवा ते असे नाही; तर हे दोन्ही एकत्र एकाचवेळी कार्यरत असतात.

जेव्हा अपराधीपणाची भावना तुम्हाला आतून खात असते किंवा गर्व तुमच्या डोक्याचा ताबा घेतो तेव्हा तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही कर्ता नाही.  तुम्हाला समजते आहे का?

जेव्हा तुम्ही काहीतरी खूप चांगले काम करता आणि म्हणता, ‘अरे मी केले, मी केले’, तेव्हा तेसुद्धा तुम्हाला उदास करते. काहीतरी चांगले केल्यानेसुद्धा तुम्ही उदास होता कारण तुम्ही इतके काही करता आणि मग म्हणता की कोणालाही तुमची किमत नाही, कोणीही तुमचे ऐकत नाही.

तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक झाले नाही म्हणून तुम्ही दुःखी होता, आणि जर तुम्ही काही चूक केली, तर तेसुद्धा तुमच्या मनाला खाते आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. जेव्हा अश्या गोष्टी घडतात तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कर्ते नाही आहात. तेव्हा साक्षीदार व्हा.

या ग्रहावर सर्वात मोठे गुन्हे करणारे लोक कुठेतरी आत गहन विचार करतात, ‘अरे, मी हे केले नाही, असे कसे घडले.’

त्यांना आश्चर्यचकित आणि धक्कादायक वाटते, आणि ते विचार करतात की ते कर्ते नाहीत, हे असेच घडले. या ग्रहावरील सर्वात मोठ्या अपराध्यांबरोबर जर तुम्ही बोललात, तर तुम्हाला दिसून येईल की अपराधाच्या ठिकाणी ते कसे पोचले हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्याचप्रमाणे, ज्या कोणाच्या हातून सर्वोत्कृष्ट कार्य झाले त्यांनासुद्धा असेच वाटते की ते आपोआप घडले; ती नकर्त्याची भावना ही अनुभवण्यासारखी आहे. 

जेव्हा तुम्हाला गोष्टी करणे भाग आहे, तेव्हा ‘अरे, मी तर कर्ता नाही’ असे म्हणू नका. त्या साच्यामध्ये जाऊ नका. जर तुम्हाला काही कार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजे आहे तर मग केवळ तिथेच लक्ष केंद्रित करा. मी कर्ता नाही, हा एक अनुभव आहे, कधीकधी त्याचा तुमच्या आत उदय होतो. जेव्हा तुम्ही अपराधीपणाच्या भावनेच्या किंवा गर्विष्ठपणाच्या गर्तातेत सापडता तेव्हा हा अनुभव तुमच्यासाठी एक कोपरखळी असतो.

प्रश्न : तुम्ही म्हणता की जेव्हा कधी आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही आमच्या भयांचा सामना केला पाहिजे. माझा प्रश्न आहे की या भयांचा सामना करण्यासाठी मला धैर्य कोठून मिळेल?

श्री श्री : हे लक्षात घ्या की तुम्ही एकटे नाही, आणि अशी एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला खूप प्रेम करते, आणि तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला आठवते की तुमच्यावर अतोनात प्रेम केल्या जात आहे तेव्हा भीती नाहीशी होते. तुमचे सगळे त्रास सुरु होतात कारण तुमच्यावर खूप प्रेम केल्या जात आहे यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही.  तिथूनच सगळ्या अडचणी सुरु होतात, आणि तुम्ही अश्या तऱ्हेने वागू लागता की त्यामुळे सगळे लांब ढकलल्या जातात. तुम्ही स्वतःकरिता दुःख निर्माण करता, कारण तुम्ही स्वतःवर शंका घेता; मी चांगला आहे ना? माझ्यावर प्रेम केल्या जात आहे ना? देव माझ्यावर प्रेम करतो की नाही? लोकांचे माझ्यावर प्रेम आहे की नाही? अश्या प्रकारच्या शंका.

तुम्ही एक विदुषक जरी असलात तरीसुद्धा तुम्ही आवडते आहात आणि तुमच्यावर प्रेम केले जात आहे हे केवळ गृहीत धरून चला. तुम्ही एक जोकर जरी असलात तरीसुद्धा तुमच्यावर प्रेम केले जात आहे आणि तुमची काळजी घेतल्या जात आहे. तुम्ही जसे कसे आहात तसे लोकांना तुम्ही आवडता. केवळ पुढे जात राहा, बसून राहू नका आणि अधिक काळ स्वतःची काळजी करण्यात, स्वतःला तपासण्यात, आणि परीक्षण करण्यात घालवू नका. केवळ एखादी जबाबदारी घ्या आणि तुम्हाला जे करणे जरुरी आहे ते करा, आणि निःपक्षपातीपणे खोल विश्रांती घ्या.

उत्कटता, उदासीनता, आणि अनुकंपा  या तीन गोष्टी असणे महत्वाचे आहे.

जेव्हा तुमच्याकडे उत्कटता असते, तेव्हा काळजी करू नका. जेव्हा तुमच्याकडे उत्कटता नसते तेव्हा तुम्ही बसून काळजी करा. उत्कटतेची कमतरता असते तेव्हा आत्मविश्वासाचा अभाव येतो. उत्कटतेअभावी जीवनातील सगळी मजा निघून जाते आणि तुम्ही निराशेच्या गर्तातेत सापडता. उत्कटता जरुरी आहे; उत्कटतेला जगवा.

नुसतीच उत्कटता नाही तर उदासीनतासुद्धा महत्वाची आहे. लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही उत्कट असले पाहिजे पण मी म्हणेन तुमच्याकडे उदासीनता असायला पाहिजे. उदासीनता म्हणजे निराश अवस्थेत कामे करणे असे समजले जाते. लोक खूप निराश दिसतात आणि विचार करतात की हेच उदासीन असणे होय. हा समज अतिशय चुकीचा आहे.

उदासीनता तुम्हाला केंद्रित करते. ती तुमचे हास्य आणि संयमशीलता कायम ठेवते. ती तुमच्या बुद्धीला समजूतदार आणि भावनांचा समतोल राखते. जेव्हा तुमच्याकडे उदासीनता असेल तेव्हा तुमचे कुणाकडेही कशाबद्दलही तक्रार करणे थांबवते. हे जग जसे आहे तसे आहे, तुम्ही लोकांबद्दल वा प्रसंगांबद्दल तक्रार करणार नाही, आणि तुम्ही स्वतःबद्दल तक्रार करणार नाही. ही उदासीनता आहे.

अनेक वेळा आपण इतरांबद्दल तक्रार करतो, ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त माया करतो त्यांच्याबद्दलसुद्धा तक्रार करतो. आपण समोरच्या व्यक्तीला बचावात्मक बनवतो, किंवा त्यांना स्पष्टीकरण द्यावयास लावतो. ही केवढी मोठी डोकेदुखी आहे!

सुरुवातीला मी यामुळे हलून जायचो. लोक म्हणायचे, ‘तुम्ही माझ्याकडे बघत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्याबरोबर बोलत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्यावर रागावला आहात का?’ , अरे देवा! आजकाल मी अश्या प्रश्नांची उत्तरेच देत नाही. जर तुम्ही तसा विचार करता तर असू दे. हरकत नाही! जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांमुळे मात खाता तेव्हा त्याने तुम्ही शक्तिशाली बनता.

हे सगळे म्हणजे केवळ लक्ष वेधण्याचे प्रकार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या आणि मग ते ठीक असतात. अगदी एखाद्या बालकाप्रमाणे-जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते आदळ-आपट करतात तुमचे लक्ष वेधण्यासाठी. तुमच्या कधी हे लक्षात आले आहे? जेव्हा तुमच्याकडे घरी पाहुणे येतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बोलण्यात गुंग आहात त्याच वेळी मुलांना त्यांचे चित्र तुम्हाला दाखवायचे असते. त्यांनी ते तुम्हाला आधी दहावेळा दाखवून झाले असेल. परंतु तुम्ही काही महत्वाची चर्चा करीत असाल तेव्हा ते येतील आणि व्यत्यय आणतील. तुम्हाला नवल वाटेल की हे बालक इतके शांत होते आणि आता अचानक काय झाले!

आपण त्या अवस्थेतून अजून बाहेर आलेलो नाही, आपल्याला कायम लोकांकडून लक्ष पाहिजे असते. आणि या लक्षाकरिता आपण इतरांकरिता तणाव निर्माण करतो.

म्हणून उदासीनतेमुळे, तुम्हाला ना लक्षाची उणीव भासते ना तुम्हाला काही तणाव राहतो. तुमच्यात बसून लक्ष मिळवण्याची अभिलाषा उरणार नाही. उदासीनता आवशयक आहे.

आणखी एक गोष्ट खरोखर जास्त फायदेशीर आहे ती म्हणजे अनुकंपा. जेव्हा तुमच्यात अनुकंपा असते तेव्हा ती तुम्हाला प्रेरणा देते, प्रोत्साहन देते. तुमच्याबरोबर वाईट केलेल्या लोकांकरिता जेव्हा तुम्हाला अनुकंपा असते तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल तिरस्कार किंवा कडवटपणा वाटत नाही. अनुकंपा ही उत्कटपणा आणि उदासीनता यांच्यात वंगणाचे काम करते आणि त्यांचे संतुलन राखते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, संपूर्ण आयुष्यभर आपण आपल्या नातेसंबंधातून प्रेमाचा शोध घेत असतो आणि तरी हे प्रेम क्षणिक असते. परम प्रेम किंवा कधीही नष्ट न होणारे प्रेम काय आहे?

श्री श्री : तुम्ही प्रेम या द्रव्यापासून बनलेले आहात. जे तुम्ही इथे आणि तिथे शोधात आहात तेच तुम्ही आहात. अंतराभिमुख व्हा आणि विश्राम करा. जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला इतरांकडून प्रेमाची आवश्यकता नाही आणि त्याचे उगमस्थान तुम्हीच आहात, तेव्हा तुम्ही देण्यास सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणात देऊ लागाल तेव्हा ते मुबलक प्रमाणात परतून तुमच्याकडे येईल.

प्रश्न : जेव्हा मला दुसऱ्यांमध्ये सौंदर्य आणि प्रतिभा दिसते तेव्हा माझे मन एक तर त्यांना खाली दाखवण्यास सुरुवात करते किंवा माझ्या मनाला मत्सर वाटू लागतो. जर मी माझ्यामध्ये पूर्ण आहे तर माझे मन उणीवेच्या गर्तातेत का सापडते?

श्री श्री : कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल की एके दिवशी सगळे मृत्यू पावणार आहेत. हे सगळे सुंदर लोक आहेत, तेसुद्धा मरण पावणार आहेत. भूतकाळात जिवंत होते ते सर्व सुंदर होते, आणि लढाया लढल्या गेल्या आणि ते सर्व मृत्युमुखी पडले. ते सर्व ज्यांच्याबद्दल तुम्हाला मत्सर वाटतो, तेसुद्धा मृत्यू पावणार आहेत. जागे व्हा आणि पहा, हा मत्सर कुठे आहे? सौंदर्य काय आहे? जी वरवरची कातडी आपल्याला सुंदर वाटते ते सौंदर्य नाही.

तुमच्या स्वतःच्या चैतन्याचे स्वरूप ही सुंदरता आहे. जेव्हा तुम्ही आनंदी आणि समाधानी असता, तेव्हा तुमच्या आत उदय पावणारी चेतना किंवा जीवन यांचे गुणधर्म हे सौंदर्य आहे. बाहेर दिसणारी छबी हे सौंदर्य नाही.

प्रश्न : कर्माचे विघटन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

श्री श्री : केवळ कृती करून. काळजी करू नका, कर्म हा भूतकाळ आहे. ज्ञान, जागरूकता, ध्यान आणि चांगली कृती, या गोष्टींमुळे भूतपूर्व कर्म पुसले जातात.

जागरूक असणे आणि भूतकाळ हा भूतकाळ आहे हे जाणणे, जे काही झाले ते काही काहीतरी कारणाने झाले याची जाणीव ठेवणे; या ज्ञानाची जागरुकताच स्वतः गत कर्मांना पुसून टाकते. चांगल्या कृती करा, काहीतरी चांगले करा.