अन्यायाविरुद्ध लढा देणे हे तुमचे कर्तव्यच आहे

19
2012
Dec
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला रणभूमीवरच शंकानिरसन करण्यास का सांगितले जेव्हा की युद्ध सुरु होण्याआधी त्याला श्रीकृष्णाबरोबर भरपूर वेळ मिळाला होता?

श्री श्री : हे बघा,अर्जुनाने कोणतीही शंका विचारली नाही, त्याने तर केवळ ,"मला युद्ध करावयाचे नाही", इतकेच म्हटले बस्स.

ते तर भगवान श्रीकृष्ण होते ज्यांनी प्रथम प्रश्न केला. ते म्हणाले,'अर्जुना, तू दुःखीकष्टी आहेस, ज्यासाठी तू रडायला नाही पाहिजे अशा गोष्टींसाठी अश्रू ढळतो आहेस, आणि तुझे बोलणे तर एका पंडिताला शोभेल असे आहे'. भगवान कृष्ण म्हणाले, ' अशोच्यानन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासूनगतासुंश्च नानुशोचन्ति पंडिताः ' , (भगवद गीता अध्याय २,श्लोक ११ )

अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने भगवद गीतेचा आरंभ केला आहे.

ते म्हणतात, ' ज्या गोष्टीचा तू अजिबात शोक करता कामा नये अशा गोष्टीसाठी तू शोक करीत बसलेला आहेस.' असे पहा, जर तुम्ही लष्करामधील जवान आहात किंवा तुम्ही पोलीसदलात आहात तर तुम्ही तुमचे कर्तव्य हे केलेच पाहिजे.

आज दिल्लीमध्ये भव्य मेळावा आहे.

काल आर्ट ऑफ लिविंगच्या (Volunteer for A Better India ) हजारो कार्यकर्त्यांनी इंडिया गेट इथे मेणबत्तीच्या प्रकाशात मोठी पदयात्रा काढली आणि आज अनेक लोक त्यात सहभागी होत आहेत.

जे एन यु ( जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय) सहभागी झाले, आयआयटी ( इंडियन इनस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) सहभागी झाले, दिल्ली विश्वविद्यालय सहभागी झाले. या सर्वाना केवळ कोणीतरी पहिले पाऊल पुढे करून पाहिजे होते. काल सकाळी,दिल्लीच्या शिक्षकांनी मला विचारले,'गुरुदेव,आम्हाला मेणबत्तीच्या प्रकाशातील प्रार्थनेची पदयात्रा काढायची आहे.' तिथे घोषणांची नारेबाजी नव्हती,कोणाला दुषणे देणे नव्हते, कोणावर ओरडाआरडा नव्हता, तर सगळे तिथे केवळ शांतपणे गेले आणि बसले. त्यांनी काहीवेळ ध्यान केले, मेणबत्त्या पेटवल्या आणि महिला सुरक्षित असायला पाहिजे ही जागरूकता केवळ निर्माण केली.

ऐक काळ असा होता की या देशात महिला इतक्या सुरक्षित होत्या,परंतु आता चित्र बदलून ही काही निराळीच जागा बनत चालली आहे.

म्हणूनच आर्ट ऑफ लिविंगच्या आपल्या कार्यकर्त्यांनी आणि शिक्षकांनी मेणबत्तीच्या प्रकाशात पदयात्रा आणि प्रार्थना करण्याचा हा निर्णय काल दुपारीच घेतला, आणि ६ वाजेपर्यंत सगळ्या भागातून लोक पोहोचलेसुद्धा.

ज्यांना आंतरिक शांततेची किंवा आंतरिक विश्वाची किंचीतशी झलक मिळाली आहे अशा लोकांमध्ये आणि ज्या लोकांना आपल्या भावना समजत नाही किंवा ज्यांना मनःशांती मिळालेली नाही, यामध्ये मला फार मोठा फरक जाणवतो. जेव्हा असे लोक एखादे काम घेतात तेव्हा ते क्षोभित, आक्रमक होतात आणि सगळे विस्कळीत करतात.

मी काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे की जर एका पोलिसाने म्हटले, ' मला कायदा आणि सुवावस्था याची जबाबदारी घ्यायची नाही ' , तर काय होईल?

तर अर्जुन हा असाच होता. तो एक योद्धा होता आणि अन्यायाविरुद्ध लोकांचे संरक्षण करणे हे त्याचे काम होते, आणि तो म्हणत होता ,'मला अन्यायाविरुद्ध कोणचेही संरक्षण करायचे नाही.'

म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' तू ज्ञानी माणसाप्रमाणे बोलतो आहेस परंतु नागरिकांचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीपासून तू पळ काढीत आहेस.'

हे तर त्याप्रमाणेच झाले ज्याप्रमाणे दिल्ली पोलीस म्हणालेत, 'हे माझे काम नाही' किंवा राजकारणी म्हणतात ,'हे पाहणे काही आमचा व्यवसाय नाही.'

एक प्रकारे मी त्यांच्याबरोबर सहमत आहे, कारण जोपर्यंत मानवतावादी मुल्ये लोकांमध्ये जोपासल्या जात नाहीत तोपर्यंत केवळ काही थोड्या पोलिसांकडून काय होणार ? पण तरीसुद्धा!

तुम्हाला माहिती आहे, कित्येक वेळा पोलीसदलाचे मनोधैर्य हरण होते. हे असे का तुम्हाला माहिती आहे?

पोलीस आपला जीव धोक्यात घालून अपराध्याचा पाठलाग करतात आणि त्याला कैद करून घेऊन येतात आणि राजकारणी लोकांचा एक फोन येतो की , 'नाही, या व्यक्ती विरुद्द कोणतीही तक्रार नोंदवू नका, त्याला सोडून द्या' , आणि पोलिसांना त्याला सोडून द्यावेच लागते.

जेव्हा तुम्ही एका माणसाला अशाप्रकारे सोडून देता तेव्हा तो माणूस तुमच्या मागे लागतो, आणि अशा प्रकारे मनोधैर्यहरण होते. हा तर अधर्म आहे ( ते जे कायद्याला धरून नाही ). 

आरक्षणावरील बिल हे देखील एकप्रकारचा अधर्म आहे.

मी तर म्हणेन की कोणालाही आरक्षण मिळणे हे चुकीचे आहे.

नोकरी मिळण्यात आरक्षण असेल तर ते ठीक आहे परंतु बढतीमध्ये आरक्षण असणे हे बरोबर नाही. हे पहा एक व्यवस्थापक आहे आणि त्याच्या हाताखाली क्लार्क आहे. आता केवळ तो क्लार्क कुठल्या एका ठराविक जातीचा आहे म्हणून तीन वर्षानंतर जर तो वरच्या पदावर गेला तर व्यवस्थापकाच्या मनोधैर्याचे काय होईल.

या देशाचे संपूर्ण प्रशासनाचे अधःपतन होईल. जर कनिष्ट पातळीच्या लोकांना वरीष्टांचे वरिष्ठ केले तर प्रशासनाचा संपूर्ण ऱ्हास होईल.

असा विचार करून बघा की तुम्ही पर्यवेक्षक आहात आणि थोड्या वर्षानंतर तुमच्यापेक्षा कनिष्ठ असलेला माणूस तुमचा वरिष्ठ होईल आणि त्याने जे काही केले त्याबद्दल तुम्ही त्याला जबाबदार धरू शकाल का? सर्वात प्रथम तर नाही! आणि दुसरे म्हणजे समजा की तुम्ही तुमचा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहात आणि उद्या तुमचा कनिष्ठ असलेला तुमचा वरिष्ठ झाला आणि त्याने तुमच्यावर सूड उगवला तर हे सर्व किती अपमानास्पद होईल.

जेव्हा हाताखालचा कनिष्ठ कोणत्याही विभागाचा वरिष्ठ होतो तेव्हा तर लोकांना हे तसेच फार अपमानास्पद असते. यामुळे विभागीय रचनाच संपुष्टात येईल.

ही तर देशासाठी अतिशय दयनीय स्तिथी आहे.

सकाळपासून मी अनेक लोकांना बोलावले आणि मी त्यांना सांगितले की हे अर्थशून्य आहे. राज्यसभा तर या देशातील बुद्धिमान लोकांचे सभागृह आहे. या देशाच्या बुद्धीमान लोकांच्या सभागृहाने असा कसा हा कायदा बनवला? हा धोकादायक आहे. भविष्यकाळात लोक त्यांना याकरिता माफ करणार नाहीत.

हे जातीविषयी नाहीये. तुमचे कनिष्ठ असलेल्या एका गटातील लोकांना बढती देण्यात येऊन त्यांना तुमचे वरिष्ठ केले जाते केवळ या कारणाकरिता की ते एका विशिष्ठ जातीचे आहेत,हे असे करणे योग्य नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने याआधीच हा कायदा दोनदा काढून टाकला आहे, आणि तरीसुद्धा ही माणसे असा कायदा बनवीत आहेत. हे तर संपूर्णपणे अस्वीकार्य आहे.

जर कायद्याचे न्यायालय सांगत आहे की हा अन्याय आहे आणि ही सबंध प्रक्रिया आम्ही वर्ज्य करू पाहत आहोत, तर असे करणे बरोबर नाही. आणि आपण लोकांनी डोळे बंद करून स्वस्थ बसता कामा नये.

शिक्षणामध्ये आरक्षण, नोकरी मिळवण्यात आरक्षण इथपर्यंत ठीक आहे, परंतु बढतीमध्ये आरक्षण केले तर त्यामुळे प्रशासन व्यवस्था ढासळून जाईल. हा एकदम गंभीर मुद्दा आहे. तुम्हाला नाही का असे वाटत? तुमच्यापैकी किती लोकांना असे वाटते? ( सगळे हात वर करतात )

म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' दुर्योधन इतका हाहाकार करीत आहे आणि तुला डोळे बंद करून केवळ स्वस्थ बसायचे आहे. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. चल उठ.'

आणि जेव्हा तो युद्धाला तयार झाला तेव्हा भगवान कृष्णाने त्याला ज्ञान दिले, 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय', ( भगवद्गीता अध्याय २, श्लोक ४८ )

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ' सर्वप्रथम स्वतःच्या आत जा आणि स्वतःची शुद्धी कर. तिरस्काराबरोबर दोन हात करू नको, तर न्यायाकरिता युद्ध कर,हे युद्ध संयमशीलतेसहित कर.

जर तुम्ही त्वेषाने आणि संतापाने लढा द्याल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात कारण तुम्ही त्वेषात आणि भावनातिरेकाच्या लाटेवर स्वार आहात आणि तुमचे मन आणि बुद्धी नीटपणे कार्यरत नाहीत.

याकरिताच तुमचे मन शांत असणे सर्वात प्रथम गरजेचे आहे. जेव्हा मन शांत आणि धीरगंभीर असते तेव्हा न्याय होईल, योग्य विचार येतील आणि तुमच्या कल्पना जास्त सृजनशील, फलदायी आणि सकारात्मक असतील. जेव्हा तुम्ही संतापलेले असता तेव्हाच नकारात्मक कल्पना येतात. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा शांत आणि सकारात्मक सृजनशील कल्पना तुम्हाला सुचतात. भगवद्गीतेचे हेच सार आहे.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात , 'युध्यस्व विगत-ज्वरः.'

ज्वरः याचा अर्थ तो क्षोभ, तो क्रोध आणि तिरस्कार; याला सर्वात आधी सोडून द्या आणि नंतर लढा द्या.

भगवद्गीता ही वर्तमान स्थितीला किती लागू पडते हे पहा. हे तर उघड आहे.

ज्या कार्यकर्त्यांनी कालचा आणि आजचा दिवस इंडिया गेटला जाऊन आणि जागरुकता निर्माण करण्यात आणि संपूर्ण देशात मोठी लाट निर्माण करण्यात खर्ची घातला त्या सर्वांकरिता मी फार खुश आहे.आपल्या आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यकर्त्यांनी जे काही काल दिल्लीमध्ये केले ते आज संपूर्ण देशात पसरले आहे. सगळीकडे मेणबत्तीच्या प्रकाशात पदयात्रा निघत आहेत आणि लोक पुढे येत आहेत आणि महिलांवरील हिंसाचाराच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. हे अतिशय स्वागतार्ह आहे.

स्वतःच्या शक्तीला कमी लिखू नका असे मी सतत सांगत राहतो. आपल्यात जी शक्ती आहे त्याने परिस्थिती बदलते. इथे असलेली प्रत्येक व्यक्ती ही एक नेता आहे, आणि तुम्ही प्रत्येकजण समाजात मोठा बदल घडवून आणू शकता. जर तुम्ही एकत्र आलात आणि काहीतरी केले तर या देशात बदल घडतील आणि इथले लोक बदलतील. हे असे घडणार हे नक्कीच कारण प्रत्येकामध्ये एक दुर्दम्य प्रबोधन हे.

प्रत्येकाने जबाबदारी घेणे हे फार महत्वाचे आहे. आपण केवळ एका माणसाकडे बोट दाखवू शकत नाही आणि केवळ त्यांनाच जबाबदार धरू शकत नाही. देशाची लोकसंख्या केवढी मोठी आहे,या एका पोलिसाने त्याचे काम केले नाही असे म्हणणे आपल्याला परवडण्यासारखे नाही.

लोकांनी जबाबदारी पत्करणे सुरु केले पाहिजे आणि तसे प्रत्यक्ष घडताना दिसत आहे ही एक फार चांगली बातमी आहे.

प्रश्न : आपली मृत्यूची तिथी ही पूर्वनिर्धारित असते का अथवा ती आपल्या हयातीत ती बदलू शकते?

श्री श्री : होय, ती बदलू शकते.

हे तर एखाद्या महामार्गाप्रमाणे आहे, महामार्गामध्ये तुम्हाला मुख्य रस्ता सोडण्याचे काही निर्गम द्वार येतात, हो कि नाही?! त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्येसुद्धा असे काही निर्गम क्षण येतात. जर तुम्ही एका जागी चुकलात तर मग तुम्हाला पुढच्या निर्गम द्वाराकडे जावे लागते.