महान भारताकरिता कार्यकर्ता

05
2012
Dec
नवी दिल्ली
मी दीप प्रज्वलित करीत होतो परंतु त्याला किंचित वेळ लागत होता. मी म्हणालो,'दिव्यातील तेलाला अग्नी लागण्यास अवधी लागतो पण एकदा का त्याने पेट घेतला की ते जळतच राहते.'

हेच आपल्या देशातील लोकांच्याबाबतीतसुद्धा लागू पडते. सुरुवातीला त्यांची गती मंद असते पण एकदा का ते चालू पडले की मग ते थांबतच नाहीत.

तुम्हाला माहिती आहे की जिथे आपुलकी संपते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो.

कोणीही त्यांचा परिवार किंवा मित्र अथवा ज्या लोकांना तो आपला मानतो यांच्या आवाक्यात तो भ्रष्ट नसतो.

जेव्हा आपुलकीची भावना संपुष्टात येते, त्या सीमारेषेपासून भ्रष्टाचार सुरु होतो.

दि आर्ट ऑफ लिविंग मध्ये कार्यकर्ते, शिक्षक आणि इतर हेच तर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते म्हणजे आपुलकीच्या भावनेचा विस्तार करणे- सकल विश्वच आपले आहे.

प्रत्येक समाज, प्रत्येक श्रद्धा, सर्व वयोमानातील माणसे, शहरी किंवा ग्रामीण- हे सगळे आपलाच भाग आहेत आणि हे सगळे आपले आहेत.

समस्त मानवजात एक परिवार असल्याची, सगळे आपलेच असल्याची भावना नीतीपूर्ण आणि न्यायप्रिय समाजाच्या निर्माणा करिता फार जरुरी आहे.

हे जरी कल्पनेच्या नंदनवनासारखे भासत असले तरीसुद्धा आपण हे स्वप्न सोडून देता कामा नये. आपण असा समज निर्माण करण्याचे स्वप्न पाहायला पाहिजे आणि ते सत्यात आणण्यासाठी झटायला पाहिजे.

योग्य दिशेकडे उचलेले एक छोटे पाऊल आपल्याला लांबचा पल्ला गाठायला मदत करेल आणि आपण असे घडताना बघितले आहे.

अपराध आणि भ्रष्टाचार यावर स्वार असलेला समाज जगण्याकरिता कोणासाठीही सुरक्षित नसतो. लोक असुरक्षित असतील, अशी भीती आणि अन्यायकारक प्रथांचा भडीमार असा आपला देश असता कामा नये.

इथे लोकांना नेहमीच निर्भय वाटले आहे. प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती, प्रत्येक भाषेला इथे या जमिनीवर आश्रय मिळालेला आहे. परंतु लोक आज निरनिराळ्या भीतीनी ग्रासलेले आहेत असे वेगळेच चित्र आज दिसत आहे. महिला आणि मुले यांच्याबरोबर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना सुरक्षित आणि निर्धास्त बनवणे यादिशेने आपल्याला पाऊल उचलणे जरुरी झाले आहे.

काल मी ७५६ गुन्हेगारांना संबोधित केले. त्यांना हुल्लडबाज, गुंडे, डाकू असे म्हंटले जाते. 

आम्ही त्यांना 'कर्णधर' असे निराळे नाव दिले. नवीन प्रकाशाची मशाल, असा 'कर्णधर'  चा अर्थ आहे.

(दि आर्ट ऑफ लिविंग चे YLTP शिबीरामध्ये उपस्थित राहिल्यानंतर) जेव्हा आम्ही हे ऐकले की केवळ एका आठवड्यात त्यांचे जीवन कसे बदलले तेव्हा आमच्या आशेचे पाखरू आभाळात पोचले.

जे झोपडपट्टीत छोटे मोठे गुन्हे करतात जर त्यांचे मन आणि हृदय परिवर्तन होत असेल तर आपल्याला खूप आशा आहे. याने केवळ आशाच नाही तर आपल्यावर भरपूर जबाबदारी येते.

जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण काही करू शकतो तर आपण ते केले पाहिजे. आपण स्वथ बसता कामा नये.

बेहतर (सरस) भारताकरिता कार्यकर्ता हा एक सुंदर उपक्रम आहे. मला खात्री आहे की इथे हजर असलेले तुम्ही प्रत्येक गुणित होऊन हजारो कार्यकर्त्यांचे गट बनाल आणि गुन्हे रहित, भ्रष्टाचार रहित आणि न्याय्य भारत निर्माण करण्याचा संदेश घेऊन जाल.

काय म्हणता तुम्ही?! ( सर्व श्रोते 'हो' म्हणतात ).

१ मार्च २००९ ला, मला आठवते आहे की ते तुम्ही कार्यकर्ते आणि Yes + चे विद्यार्थीच होतात ज्यांनी India Against Terrorism (आतंकवादाविरुद्ध भारत ) याची सर्व प्रथम सुरुवात केली, कारण २००८ या साली भारताने १२ महिन्यात १३ अतिरेकी हल्ले पाहिले, आणि या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला.

हे फार दुःखद आहे. या अशा घटना आपल्याला पाहाव्या लागल्या हे फारच दुःखद आहे. आणि ते तुम्हीच होतात, या इथले दिल्लीचे युवक, जे या विरुद्ध उभे राहिले आणि या चळवळीची सुरुवात केली आणि किरण बेदी,केजरीवाल आणि इतरांना आमंत्रित केले. हीच ती चळवळ होती जिने India Against Terrorism (आतंकवादाविरुद्ध भारत ) या २०१० च्या चळवळीचे बी पेरले. म्हणून तर कार्यकर्ते खूप काही करू शकतात आणि तुम्हीच खरे प्रेरणा स्थान आहात.

जर भारताचे तरुण पुढे आले आणि त्यांनी स्त्री भ्रूणहत्या, मादक द्रव्य व्यसन मुक्ती, मद्यपान व्यसन मुक्ती, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कृती हे आणि असे मुद्दे उचलून धरले तर तुम्ही संपूर्ण चित्र पालटू शकता.

स्वतःच्या ताकदीला कमी लेखू नका. मी तर म्हणतो की तुम्ही चमत्कार घडवू शकता. तुम्ही परिस्थिती १८० अंशाच्या कोनात बदलू शकता.या देशाच्या तरुण पिढी आणि तरुणांनो, शक्ती ही तुमच्याचकडे आहे.

जेव्हा मी तरुण म्हणतो तेव्हा इथे असलेले अनेक वयस्क तरुणसुद्धा यात सामील आहेत ( हंशा ).

यापैकी एका तरुणाने लग्नाचा ५६ वा वाढदिवस नुकताच काल साजरा केला.हे जोडप, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षात आहे परंतु त्यांच्यातील उत्साह आणि जोम इतका सळसळता आहे की विश्वास बसणार नाही. ही आंतरिक उर्जा आहे.

सचोटी आणि अंतःप्रेरणा तेव्हाच येऊ शकते जेव्हा आंतरिक उर्जा उपस्थित असते.

आंतरिक उर्जा म्हणजे जीवनाला एका मोठ्या दुष्टीकोनांतून प्रेम आणि मायेने बघायचे. या ग्रहावर आपण थोडा काळ व्यतीत करणार आहोत या वृत्तीने जीवनाकडे बघायचे आणि त्यानुसार गोष्टींना प्राधान्य द्यायचे.

मी आता एक उदाहरण देतो. दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिक्षकांपैकी एक गुजरातमध्ये आय ए एस अधिकारी आहे. आता या सदगृहस्थाला एका कागदावर सही करण्याकरिता ५१ करोडचा प्रस्ताव दिल्या गेला होता. ५१ करोड! एक अधिकारी त्याच्या आयुष्यात ५१ करोड मिळवायचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. एका आयुष्याचे विसरा. त्याने तीन जन्म जरी काम केले तरी तो ५१ करोड नाही कमवू शकत.

मी कोणत्याही अधिकाऱ्याला ५१ करोड म्हणजेच १० मिलियन डॉलर कमावलेले पाहिलेले नाही.

तर या गृहस्थाला ५१ करोडचा प्रस्ताव ठेवला गेला आणि तो म्हणाला, 'नाही. मी सही करणार नाही.' आणि त्यांने जरी सही केली असती तरी कोणाच्या लक्षातदेखील आले नसते. ते पैसे घेण्याकरिता त्याला अनेक प्रकारे सफाई देता आली असती. तो असे म्हणू शकला असता , ' अरे ,मी हे पैसे घेतो आणि गरीबांना दान देऊन टाकतो, किंवा मी समाजाच्या भल्याकरिता काही तरी काम करतो.'

१० मिलियन डॉलर ही फार मोठी रक्कम होते, पण या माणसाचा प्रामाणिकपणा पहा. त्याने याला नाही म्हटले. मला या भल्या गृहस्थाचा इतका अभिमान वाटतो.

आता तुम्हाला आंतरिक उर्जा कशामुळे प्राप्त होऊ शकते?

त्याकरिता तुम्हाला संन्यासी असण्याची आवश्यकता नाही, अर्थात संन्याशाकडे ती असते. परंतु एका गृहस्थाश्रमी व्यक्तीला इतके मोठे प्रलोभन टाळणे सोपे नसते, जर त्याच्याकडे आंतरिक उर्जा आणि समाधान नसेल तर.

समाधान, अनुकंपा, प्रामाणिकपणा, अंतःप्रेरणा, ही सगळी मुल्ये तुमच्या आतूनच उमलून येतात. आणि ज्या गोष्टीने ही मुल्ये तुमच्या जीवनात उमलून येतात त्या गोष्टीला मी अध्यात्म  म्हणतो.

हाच अर्थ आहे खऱ्या श्रद्धेचा; स्वतःमधील श्रद्धा आणि आपल्या सभोवतीच्या लोकांच्या चांगुलपणावर श्रद्धा.

सगळेच्या सगळे वाईट आहेत नी मी एकटा समाजाला कसा सुधारू? असा विचार करण्यातच आपला निम्मा वेळ खर्च होतो. जेव्हा तुम्ही सगळेच वाईट आहेत असे पाहता तेव्हा मनातल्या मनात तुम्ही भ्रष्टाचार स्वीकार करता याचे स्वतःचे स्वतःला समर्थन करता. तुम्ही विचार करता, ' ठीक आहे, हीच जीवनाची पद्धत आहे, आपल्याला प्रवाहाबरोबर जाणे भाग आहे.'

या गोष्टी तुमच्या जीवन-मरणाच्या गोष्टी ठरतात.

याविरुद्ध तुम्हाला उभे ठाकायाचे असेल तर तुम्हाला आंतरिक उर्जेची आवश्यकता आहे आणि हेच समग्र तर ध्यानाचे उद्देश्य आहे. ध्यानामुळे तुम्हाला आंतरिक उर्जा मिळते, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सचोटी,प्रामाणिकपणा येतो आणि तुमच्यात अगोदरपासून असलेल्या अंतःप्रेरणेला आविष्कृती मिळते. मला तर वाटते की हे अतिशय महत्वाचे आहे.

तर मी सांगत होतो की जेव्हा मी या अपराधी घटकांसोबत देवाण घेवाण करीत होतो; खरे पाहता त्यांना अपराधी घटक असे संबोधता कामा नये; हे दिशाभूल झालेले तरुण, मला त्या प्रत्येकामध्ये सौंदर्य दिसले. त्यांच्या तणावापासून आणि त्यांच्या गैरसमजापासून सुटका करून घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही येवढेच. त्यांची काळजी आणि तणाव यापासुन त्यांना मुक्तता मिळवण्याची, आणि समाजात पुरेसे प्रेम आहे, आणि या ग्रहावर चांगले लोक आहेत, आणि जेव्हा ते संकटात असतील तर त्यांच्या मदतीला धावणारे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे चांगले लोक शेजारी आहेत हे ओळखण्याची त्यांना संधी दिली गेली नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमची साथ देणारे, तुम्हाला मदत करणारे लोक आहेत. असा समाजाच्या चांगुलपणा विषयीचा विश्वास पुनर्निर्माण होणे जरुरी आहे. जर असे झाले नाही तर समाजामध्ये नितीमुल्ये टिकून राहणार नाहीत. जर मानवतावादी मुल्यांवर विश्वास नसेल, किंवा लोकांना आपापसात आणि समाजांना एकमेकांवर विश्वास नसेल तर समाजात नीतिमूल्ये फुलून येत नाहीत किंवा टिकाव धरू शकत नाहीत. म्हणून स्वतःवर, लोकांच्या चांगुलपणावर आणि त्या कधीही न बघितलेल्या, ज्याच्याबद्दल कधीही ऐकले नाही आणि जो पूर्णपणे अनोळखी आहे अशा तुम्हाला मदत करणाऱ्या मदतीच्या हातावर विश्वास ठेवा. 

याला तुम्ही देवावरचा, निसर्गावरील आणि महाशक्तीवरील विश्वास म्हणू शकता. एका न्यायी, मुक्त आणि आनंदी समाजाकरिता हे फार महत्वाचे आहे.

म्हणून बेहतर (सरस) भारताकरिता कार्यकर्ता  याने समाजातील सर्व वाईट, अभद्र स्वच्छ होऊन जाईल असे नाही, त्याला जास्त महत्वाचे कार्य करायचे आहे आणि ते म्हणजे आनंदाच्या लहरी निर्माण करणे होय. 

आज युनायटेड नेशन्स यांनी जी डी एच (Gross Domestic Happiness) अर्थात स्थूल एत्तदेशीय आनंद या संदर्भात बोलयाचे सुरु केले आहे. आणि पूर्वीसारखे आता जी डी पी (Gross Domestic Product) अर्थात स्थूल एत्तदेशीय उत्पादन याविषयी बोलत नाहीत. 

तुम्हाला माहिती आहे की आपले शेजारील राष्ट्र भूतान याचे जी डी एच सर्वोच्च आहे. त्यांचा अगदी अलीकडेपर्यंत एकदम नियंत्रित समाज होता तरीसुद्धा त्यांनी आपला आनंद टिकवून ठेवला आहे.

आजसुद्धा ग्रामीण भारतात, लोक अधिक आनंदी असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे केवळ एक भांडभर ताक असेल तरीसुद्धा ते तुमच्यासोबत वाटून घेतील. त्यांच्यात किती अनुकंपा आणि एक दुसऱ्यांकरिता तद्भावभाविता आहे. ते तुमच्या पार्श्वभूमीविषयी विचारत नाही किंवा तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमची पात्रता काय आहे, किंवा तुमचे नाव काय आहे असे काहीसुद्धा विचारत नाही. ते सर्वात आधी म्हणतील, 'या आणि एक कप चहा किंवा एक भांड ताक घ्या.' आणि नंतर मग ते विचारपूस करतील की तुम्ही कुठून आलात, तुम्ही काय करता. अशा प्रकारे ते सर्वात प्रथम त्यांचा हात पुढे करतात आणि त्यांचेकडे जे काही आहे ते तुमच्याबरोबर वाटून घेतात आणि बाकी प्रश्नांची सरबत्ती नंतर करतात.

दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरांमध्ये तर आपल्याला आपले शेजारी कोण हेसुद्धा माहिती नसते. अशा सगळ्या अडथळ्यांना, निर्बंधना बेहतर भारताकरिता कार्यकर्ता  तोडेल आणि शेजारी एक होतील आणि विविध समाज एक होतील. विविध समाजांनी एकत्र काम करणे ही तर फार मोठी आनंदाची बाब आहे. केवळ स्त्री भ्रूणहत्या, भ्रष्टाचार मुक्त समाज इतक्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित न राहता ते एक अशी आनंदाची लहर आणतील की ही आनंदाची लाट अतिशय जोमाने बळावणाऱ्या आजार अर्थात निराशा यावर लसीकरण करेल.

या शब्दांनी मी परब्रम्हाकडे प्रार्थना करतो की तो तुम्हाला बेहतर भारताकरिता कार्यकर्ता याचे कार्य पुढे चालू ठेवण्याकरिता भरपूर सामर्थ्य आणि जोश देवो.

दि आर्ट ऑफ लिविंग ही केवळ एक बिन सरकारी संस्था आहे. मला दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये अडकून पडल्यासारखे वाटत नाही. ही तर अनेक संस्थांपैकी एक संस्था आहे आणि मी अनेक संस्थांचा घटक आहे. केवळ दि आर्ट ऑफ लिविंगचा नाही. मला आशा आहे की तुम्हालासुद्धा असेच वाटते. आणि इथे उपस्थित असलेल्या इतर बिन सरकारी संस्थाना माझे हेच सांगणे आहे की आपण सगळे एकाच मानवीय परिवाराचे सदस्य आहोत आणि आपले उद्देश्यसुद्धा एकच आहे आणि ते म्हणजे अधिक आनंद आणि अधिक हास्य या ग्रहावर पसरवणे.

धन्यवाद!