फक्त बुद्धिमान व्यक्तीच ध्यान करतात

21
2012
Dec
बंगलोर, भारत
प्रश्न : प्रिय गुरुजी, असे म्हणतात की नेहमी आनंदी राहणे ही भक्ती असण्याचे चिन्ह आहे. मग सहसा भक्त जेव्हा वेदना, दु:ख किंवा विरह यामुळे व्याकुळ होऊन रडू लागतो तेव्हाच देव प्रतिसाद कां देतो ? मी गोंधळून गेलो आहे. माझ्या रडण्याविनाही देव माझ्याकडे लक्ष देईल कां ? एखाद्या आनंदी भाक्ताकडेही देव तेवढेच लक्ष देईल कां ?

श्री श्री : अगदी नक्की ! देवाला, रडक्या भक्ताकडे लक्ष देणे अटळ असते आणि आनंदी भक्ताकडे लक्ष देणे हे आनंदाचे काम असते.

प्रश्न : गुरुदेव, एका वाईट घटनेने सगळा देश हादरून जातो पण चांगल्या गोष्टी मात्र एखादा तरंगही न उठता दुर्लक्षितच रहातात. असे कां ?

श्री श्री : लोकांचा क्षोभ होण्यासाठी काहीतरी वाईट घटना घडावी लागते. क्षोभाने चळवळ करायला लोक अगदी सहज तयार असतात. याचे कारण म्हणजे मनात तणाव आधीपासून असतोच त्याला बाहेर पडायला वाट हवी असते. त्यामुळे चळवळ करणे ही सोपी गोष्ट होऊन जाते. जर चळवळीसाठी लोकांना बोलावले तर सगळे सहभागी होतील पण ध्यानासाठी फक्त बुद्धीमानीच सहभागी होतील.

पण मला वाटते, काळ बदलत चाललाय. आपण जिथे जाऊ तिथे आपल्याकडे चळवळीपेक्षा ध्यानाला जास्त गर्दी होते.

म्हणूनच मी म्हटले की समाजात सकारात्मक बदल होत आहेत. प्रसारमाध्यमालाच चळवळ सर्वात जास्त आवडते. बघा आपण हजारो लोक इथे बसलो आहोत. आणि टाऊन हॉलमध्ये घोषणा देऊन चळवळ करणारे याच्या एक चतुर्थांशही लोक नसतील. पण तिथे जेमतेम पाचशे लोकच असे तरी प्रसारमाध्यमांना त्या घटनेतच जास्त रुची असते. प्रसारमाध्यमे नकारात्मक बातम्या जास्त चांगल्याप्रकारे आणि जोशात प्रसिद्ध करतात.

प्रश्न : गुरुदेव, एक तरुण म्हणून, तुमच्या भोवती असलेली शांतता आणि स्थिरचित्तता याकडे मी ओढला जातो आणि जग नेमके याच्या उलट आहे असे दिसते. मी जर जगापासून अलग होऊन सन्यास घेतला तर मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळून जातो आहे असा अर्थ होईल कां ?

श्री श्री : सन्यास घेणे म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे नव्हे तर जास्त जबाबदारी घेणे. हे संपर्ण जगाची जबाबदारी घेण्यासारखे आहे. सन्यासाचा हा अर्थ आहे. आताच मी आपल्या आश्रमवासिंना सांगत होतो की आपण इथे एका रेझॉर्ट मध्ये राहत आहोत. आपण गावात जायला हवे, जिथे काही तरी कृती घडतेयं. मला सगळे युवक आणि गुण इथे आश्रमात अडकवून ठेवायचे नाहीयेत. मला, तुम्ही सगळ्यांनी तिकडे बाहेर, समाजात काही तरी कार्य करत रहायला हवे आहे.

जिथे शांततेची गरज आहे तिथे आपणच जाऊन शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की, “अरे वा, इथे किती शांत वाटते आहे. मी इथेच राहतो.” अर्थात इथे येणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल अधून मधून चार्ज करावाच लागतो. पण तो सारखाच चार्जिंग वर ठेऊन चालत नाही. नाही तर तुम्ही तो वापरणार कसा ? मग तो ‘मोबाईल’ ( सगळीकडे नेता येणारा) राहणार नाही. तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करता आणि मग चार्जर मधून तो बाहेर काढता. तो सतत चार्जरवर अडकवून ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला तिकडे काम करायला हवे, आणि तुम्हाला इकडेही यायला हवे ; दोन्हीही !

प्रश्न : गुरुदेव, विवाह सोहोळ्याचे महत्व काय ? जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करत असतील आणि एकमेकांचा आदर करत असतील तर ते नुसते एकत्र रहाण्याचा निर्णय घेऊ शकतात कां ?

श्री श्री : विवाह सोहळा ही एक बांधिलकी आहे. तुम्ही बांधिलकीने एकत्र राहता. जेव्हा बांधिलकी असते तेव्हाच तुमचा एकमेकावर पूर्ण विश्वास असतो. तुमच्या आयुष्यातील एक बाजू पक्की झाली. तोच विवाह आहे.

नाही तर मन जोडीदाराला शोधत राहते. विवाहामुळे जोडीदाराला शोधत रहाण्याची बाब थांबते. , ‘चला, मला माझा जोडीदार मिळाला, मी स्थिर झालो.’ मग तुम्ही दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. बांधिलकी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते.

प्रश्न : गुरुदेव, आयुष्यात ज्यांचे चांगले जमत नाही ते एकत्र अडकतात आणि ज्यांचे चांगले जमते त्यांची जोडी होत नाही. हा देवाची योजना आहे कां ? तो ते मुद्दाम करतोय कां ?

श्री श्री : तुम्ही लग्नाबद्दल म्हणताय कां ? हे बघा, जेव्हा तुमचे चांगले जमत नाही तेव्हा तुम्ही, तुमचे खूप चांगले जमत होते ते दिवस विसरता. मग जेव्हा तुमचे जमत नाही तेव्हा तुम्हाला वाटते की, ‘आपले सुरवातीपासूनच जमले नाही.’

लग्नाला ४० वर्षे झालेले एक अमेरिकन जोडपे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांना घटस्फोट हवा आहे. त्या बाई म्हणाल्या, “गुरुदेव, तुम्हाला महिती आहे कां, आमच्या लग्नाला ४० वर्षे झाली पण आमचे एक दिवसही पटले नाही !“

मी म्हणालो, तुम्ही चाळीस वर्षे एकत्र राहिलात आणि एक दिवशी तुमचे जमले नाही, असे कसे होईल ? ते आताच ६० आणि ७० वर्षांचे आहेत.त्यांचे गेली चाळीस वर्षे पटले नाही आणि अजूनही ते एकत्र रहताहेत. अमेरिकन समाजात सहसा असे होत नाही. जर दोन लोकांचे जमले नाही, तर मग झालेच, ते अजिबात एकत्र राहत नाहीत. अचानक तुमच्या मनात येते की, पूर्वीसुद्धा आपले कधीच पटले नाही. जग असेच आहे. ज्या लोकांच्या बरोबर चांगले जमेल असे वाटते त्यांच्या बरोबर चांगले जमेलच याची काही खात्री नाही. दुसऱ्यांची हिरवळ नेहमीच जास्त हिरवी वाटते.

प्रश्न : गुरुदेव, अष्ट गणपती बद्दल कृपया सांगाल कां ?

श्री श्री : आठ हा आकडा आठ प्रकारच्या प्रकृतींशी संबंधित आहे. अष्ट प्रकृती. असत प्रकृती काय आहेत ? पृथ्वी,आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. हे सगळे आपल्यात असते. कोणा एका महात्म्याने म्हटले, ‘ या प्रत्येक प्रकृतीसाठी एक गणपती असावा’ इतकेच.

या सगळ्यात पडू नका. बारा ज्योतिर्लिंगे कां, अष्ट गणपती कां ? प्राचीन काळी समाजाला एकत्र आणण्याचे काही मार्ग होते. प्राचीन काळी लोकांना सगळ्या समाजाला एकत्र आणायचे होते कारण या देशात, दर ६०० किलोमीटरवर भाषा आणि संस्कृती बदलते. दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम यांच्यात काहीच सारखेपणा नाहिये. तर मग देशाला एकत्र कसे आणायचे ? मग त्यांनी सांगितले की, ‘बारा ज्योतिर्लिंगांना जा. काशीला जा, रामेश्वरला आज, त्र्यंबकेश्वरला जा’ वगैरे. अशाप्रकारे त्यांनी एकप्रकारची आध्यात्मिक यात्रा करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रोत्साहन दिले, इतकेच.

अष्टगणपतींचेही असेच. लोकांनी महाराष्ट्रातल्या निनिराळ्या ठिकाणी जावे ही कल्पना होती. त्यांना लोकांना एकत्र आणायचे होते म्हणून मग त्यांना तीर्थक्षेत्रांच्या भोवती फिरवायचे. त्याकाळी इतर काही कारणाने प्रवास, सुट्टीवर जाणे वगैरे नव्हते. यात्रा हाच प्रवास होता. जेव्हा एखाद्या पवित्र स्थानाचा प्रवास असतो, तेव्हा लोक म्हणतात, ‘मला गेले पाहिजे.’ म्हणून त्यांनी ही सगळी वेगवेगळी देवळे निर्माण केली जेणेकरून लोक दर्शनाच्या निमित्ताने तिथे जातील.

प्रश्न : गुरुदेव, क्रिया झाल्यानंतर बरेच वेळा मी नकळत हसतो आहे असे मला दिसते. मी एकटा असतो तेव्हाही मी हसत असतो. मला कळत नसते की मी हसतो आहे. सगळ्यांना वाटते की माझ्यात काहीतरी गडबड आहे.मी त्यांना काय सांगू ?

श्री श्री : जर सगळ्यांनाच वाटत असेल की तुमच्यात काहीतरी गडबड आहे तर तुम्ही ते गंभीरपणे घेतले पाहिजे. तुम्ही गंभीरपणे बघितलेच पाहिजे. जर सगळेजणच तसे म्हणत असतील तर मग ते ठीक नाहिये. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा विचार करायला हवा. इथे मी असे म्हणणार नाही की ‘ दुसऱ्यांच्या मताचा फुटबॉल बनू नका.’ तुम्हाला काय वाटते ही एक गोष्ट आणि तुम्ही ती कशी व्यक्त करता ही दुसरी गोष्ट. तुम्हाला अगदी शांत आणि आनंदी वाटत असेल पण जेव्हा तुम्ही ते व्यक्त करता तेव्हा तुम्ही हे बघायला हवे की तुम्ही ते कसे व्यक्त करताय आणि कुठे व्यक्त करायला हवे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, तुमच्या काही आवडत्या गोष्टी आहेत कां ? तुमची आवडती व्यक्ती कोण आहे ? तुमचा आवडता राग कोणता आहे आणि तुमचा आवडता खेळ कोणता आहे ?

श्री श्री : मी यापैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण तसे काहीच नाहिये. खूप पूर्वी मी एकदा इंग्लंड मध्ये होतो, आणि एका बाईनी मला विचारले, ‘ गुरुदेव, मी तुमच्यासाठी नाश्त्या ला काय बनवू ?’ मी म्हटले,’ काहीही बनव, तुला जे आवडते ते बनव.’ मग ती म्हणाली, ‘ मी ढोकळा बनवू कां ?’ मी म्हटले, ‘हं, ढोकळा चालेल.’ तिने मला विचारले, ‘ तुम्हाला आवडतो नां ?’ मी म्हटले, ‘ हो’. मग तिने ढोकळा बनवला. आणि मग तिने सगळ्याना बोलावून सांगितले की, ‘गुरुजींना ढोकळा आवडतो. कल्पना करा काय झाले असेल. त्यानंतर पुढचे पंधरा दिवस मी जिथे जाईन तिथे नास्ता, सकाळचे जेवण, रात्रीचे जेवण सगळ्याला फक्त ढोकळे!

प्रश्न : गुरुदेव, तुमच्यासारखी विनोद बुद्धी माझ्यात कशी येईल ?

श्री श्री : तुमच्यात ती आहेच. निवांत रहा. कुणावर छाप पाडण्याचा प्रयास करू नका. तुम्ही आहात तसेच राहा. जे लोक विनोदी व्हायचा प्रयास करतात त्यांचे मला वाईट वाटते. स्वत:ला विनोदवीर म्हणवणारे लोक रोज, लोकांना हसवण्यासाठी नवीन नवीन विनोदांच्या शोधात असतात. आणि ते इतके कृत्रिम हसू असते.

विनोद करणारे ते सगळे विनोदवीर अगदी दयनीय असतात. त्यात काहीच विनोदी नसते. त्यांच्याकडे पाहून रडावेसे वाटते.