मन - मित्र की शत्रू

26
2012
Dec
बँड अँनटोगँस्ट, जर्मनी


प्रश्न: मला सतावणाऱ्या मनावर विजय कसा मिळवायचा?

श्री श्री : हा तर त्याचा स्वभावच आहे.

तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मनापेक्षा मोठे आहात? जागे व्हा. मनाला राहू द्या.

प्रश्न : गुरुदेव, मी माझी आत्मसखीला (माझ्या आत्मसख्याला) कसे ओळखू??

श्री श्री :सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या आत्म्याला ओळखा आणि नंतर मग आत्मसखीला. तुम्हाला तुम्हा स्वतःची ओळख नाही, तुम्ही कोण आहात ते माहिती नाही. तुम्हाला स्वतःबद्दल काहीसुद्धा माहिती नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला जाणत नाही; तुमच्या या मनामुळेच तुम्हाला वेड लागायची पाळी येते. या क्षणी मनाला हे पाहिजे तर पुढच्या क्षणी दुसरे काहीतरी त्याला हवे असते. मनाचा मनोदय तर सतत बदलत असतो, आणि यातच ते अडकून बसते.

म्हणूनच 'तुमच्या बंधनाला आणि तुमच्या मुक्ततेला तुमचे स्वतःचे मन कारणीभूत आहे' , आणि दुसरे काही नाही असे भगवद्गीतेत म्हटले आहे.

जर ते मित्राप्रमाणे वागत असेल तर ते शत्रूप्रमाणेसुद्धा वागेल असे आहे तुमचे स्वतःचे मन.

जर साधनेने ( अध्यात्मिक सरावाने) तुमच्या मनाला नीट वळण लावले तर ते तुमचे मित्र बनते आणि ते तुमची मदत करते. नाहीतर मग तुमचे स्वतःचे मन एका शत्रूप्रमाणे वागते. हे खरे आहे की नाही? हे किती खरे आहे!

मी इथे येण्याअगोदर गेल्या आठवड्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आश्रमाच्या समोर आश्रमाची पाटी लावलेली आहे. एका राजकारणी पक्षाच्या लोकांनी त्यांच्या पक्षाची भित्तीपत्रके आश्रमाच्या पाटीवर लावली,उगीचच द्वाडपणा करायला.

त्यांच्या पक्ष नेत्याचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी एकदम मोठे भित्तीपत्रक लावले. मग आपल्या सुरक्षा कर्मचारी आणि बाकीचे यांनी ते साहजिकपणे काढून टाकले कारण आश्रमात येणाऱ्याना आश्रमाची पाटी दिसत नव्हती आणि त्यामुळे त्यांना कुठे जावे ते कळत नव्हते.

आता, स्थानिक पक्ष नेता होता तो चिडला आणि तो आरडाओरडा करायला लागला आणि 'मी मोठ्या जमावाला घेऊन येतो आणि आम्ही इथे निदर्शने करणार. आणि त्या पुढे आम्ही उपोषणाला बसणार', अश्या धमक्या तो आपल्या शिक्षकांना देऊ लागला आणि अतिशय क्रुद्ध शब्दांची देवाण घेवाण झाली. आणि आपल्या सुरक्षा कर्मचार्यानेदेखील सांगितले, ' ठीक आहे, तुम्ही या. बघू या. आम्हीसुद्धा ताकदवान आहोत.'

मग शहरात दुसऱ्या कार्यक्रमाला जाताना वाटेत माझ्या सहाय्यकाने मला ही गोष्ट सांगितली.

मी त्याला सांगितले,'या स्थानिक नेत्याला बोलवा आणि त्याच्याबरोबर बोलणी करा.'

माझ्या सहाय्यकाने त्याला बोलावणे धाडले ,' गुरुदेवांचे आत्ताच आगमन झालेले आहे, त्यांना ज्या तुमच्या नेत्याचा वाढदिवस होता त्याला टोपलीभर फळे, हार आणि शाल देऊ करायचे आहे आणि गुरुदेवांचे शुभाशीर्वाद त्यांना आपण द्यावेत', आणि त्याने ते मान्य केले. नंतर त्याने विचारले,'आमची भित्तीपत्रके त्यांनी का काढून टाकलीत?'

माझ्या सहाय्यकाने अजाणतेपणा आव आणत विचारले,'अरे,तुम्हाला काही त्रास झाला का?! तुम्ही मला सांगितले का नाही? तुम्ही मला कळवायचे होते. गुरुदेवांचे नुकतेच आगमन झाले आहे, ते दौऱ्यावर गेले होते. त्यांना जसे कळले की वाढदिवस साजरा झाला तसे त्यांनी त्यांचे आशीर्वाद पाठवले. म्हणून तुम्ही जा आणि या भेटवस्तू तुमच्या नेत्याला द्या आणि त्याला आशीर्वाद द्या.' अशा प्रकारे गंभीर प्रसंगाची हवा निघून गेली आणि त्याला बलवान झाल्यासारखे वाटले. आता तो त्याच्या नेत्या समोर हार आणि माझ्याकडून आशीर्वाद घेऊन हजर राहू शकतो, आणि आता त्याला त्याच्या पक्षाच्या मोठ्या माणसाबरोबर थेट व्यवहार करू शकणार होता.

जो काही मोठा तमाशा तो निर्माण करणार होता तो केवळ एका फोनमुळे संपला. तो आता त्याच्या पक्षाच्या साहेबांकडे गर्वाने जाऊ शकला आणि म्हणाला,' गुरुदेवांनी माझ्याकडे तुमच्याकरिता हार दिला आहे.'

आता त्याला शक्तिवान झाल्यासारखे वाटले आणि आपल्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बघा, जर तुम्हाला समस्या कशी सोडवायची हे माहिती असेल तर मग काम सोप्पे आहे. यासाठी केवळ एक फोन करण्याचा खर्च करावा लागला. पण ही युक्ती सगळीकडे नाही चालत. वेगवेगळ्या जागी तुम्हाला निराळेपणाने काम करावे लागते. काहीवेळेस तुम्हाला कणखर कारवाई करावी लागते,खंबीर राहून 'नाही ' म्हणावे लागते. काहीवेळेस तुम्हाला मुत्सद्दीपणे आणि चतुराईने कार्यभाग साधावा लागतो.

द्वाडपणा करणारे लोग हे नेहेमी असणारच, त्यांना आणि अशा प्रसंगांना हाताळण्याचे कौशल्य तुमच्याकडे असणे जरुरी आहे.

कोणत्याही प्रसंगाला हाताळण्याचे चार मार्ग आहेत असे प्राचीन काळातील लोकानी सांगितले आहे. ते म्हणजे- साम, दान, भेद आणि दंड.

१. साम म्हणजे बोलणी करणे, मन वळवायचा प्रयत्न करणे, चर्चा करणे आणि संवाद साधणे.

२. दान म्हणजे माफ करणे. 'हरकत नाही,सगळ्यांच्या हातून चुका होतात' , आणि तुम्ही समोरच्याला एक संधी देता.

३. भेद म्हणजे अलिप्त राहणे. थोडे कणखर होणे आणि आपला मुद्दा पटवणे.

४. दंड म्हणजे काठी उगारणे, हा शेवटचा उपाय आहे.

नेहमी आपण शेवटचे दोन उपाय सुरवातीलाच वापरतो. आपण शांतीच्या मार्गाने जात नाही.

आपण सर्वात आधी शांतीच्या मार्गाने जायला पाहिजे, आणि नंतर संधी देऊ केली पाहिजे, आणि मग भेदभाव करून, शेवटी जर कशाचाही उपयोग होत नसेल तेव्हा दंड म्हणजे हातात काठी घ्यावी. याला म्हणतात कोणत्याही प्रसंगाला कौशल्याने हाताळायचे चार मार्ग.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही म्हणता की आपल्या वागण्याचे लोकांकडे आपण समर्थन करू नये. परंतु आपल्या मनामध्ये जर काही असेल जे आपल्या काळजाला घर करीत असेल आणि अशा वेळी कोणाबरोबर बोलण्याची गरज भासत असेल तर काय करावे?

श्री श्री : यासाठी काही नियम नाहीये,काही वेळेस तुम्हाला बोलून मनःशांती प्राप्त होते तर काहीवेळेस बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही.

जागे व्हा आणि बघा हे संपूर्ण विश्व हे स्वप्नवत आहे. सगळे विचार सोडून निघून गेले आहेत, लोकांचे वर्तन नाहीसे होईल. काही लोक चांगले वागतात आणि काही वाईट, परंतु सगळ्यांना मृत्यू प्राप्त होणार आहे, आणि सगळे जग हे संपुष्टात येणार आहे.

या लोकांचा गट निघून जाईल. मग नवीन लोक येतील आणि त्यांचा मृत्यू होईल. नंतर अजून लोकांचा नवा गट येईल, ते आपापसात भांडतील, ते गळे मिळतील, प्रेम करतील, मुके घेतील, सगळे काही करतील, आणि त्यांचा सर्वांचा मृत्यू होईल.

सात अब्ज लोक आज या पृथ्वीतलावर आहेत आणि हे सगळेच्या सगळे सात अब्ज लोक मृत्यू पावणार आहेत. हे काही वर्षांच्या आतच घडेल. आणिक शंभर वर्षांनतर तुम्हाला काय वाटते की हेच लोक इथे असतील? आज इथे असलेला एकही माणूस जिवंत नसणार आहे. आणि दोनशे वर्षानंतर त्यांची नातवंडेसुद्धा नसतील. असे बघा, हे जग नदीसमान आहे, प्रत्येक क्षणी नदीमधील पाणी हे नवीन असते. असे काय आहे ज्याची चिंता तुम्हाला सतावते आहे?

जर काही मागे सोडून जायचे असेल तर ज्ञान सोडून जा ज्यामुळे कोणाला त्याची मदत होईल, ज्याचा कोणाला उपयोग होईल. त्याने काय म्हंटले, तिने काय म्हंटले आणि अमुक तमुक प्रसंगाबद्दल तुमचे काय मत असे हे सोडून जाऊ नका. हे सगळे सोडा, हे सगळे निरर्थक आहे!यांना खिडकीच्या बाहेर फेकून द्या. त्याला काही अर्थ नाही.

आता तुम्हाला जसे वाटते आहे तसे तुम्हाला का वाटले आणि कसे वाटले आणि बाकीच्यांना जसे वाटते आहे तसे का वाटते आहे,असे समर्थन देण्यात तुम्ही तासन तास व्यर्थ घालवता.

तुम्हाला माहिती आहे जसा समय बदलतो तसे मनसुद्धा बदलते.याबाबत एक सुंदर विज्ञान आहे. तुमच्या ग्रहस्थितीवरून तुम्हाला कळेल की मन हे काळाबरोबर जोडलेले आहे.

कधीतरी आपण मन, काळ आणि ग्रह यांच्या धाग्यांविषयी एक अभ्यासक्रम सुरु करूया.

हे पहा, मला ज्योतिषशास्त्र म्हणायचे नाहीये कारण त्याचा गैरवापर झालेला आहे आणि त्यातून चुकीचा अर्थ अनेक वेळा काढून झालेला आहे. आजच्या काळात ते विज्ञान अतिशय दुरावस्थेत आहे.

ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे यात काही शंका नाही परंतु त्याचे नाव इतके खराब झालेले आहे की आता त्यात खरे काय आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकत नाही.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तारकांचे गट बारा आहेत आणि नउ ग्रह आहेत.

असे म्हणतात की तुमचा जन्म झाल्यापासून गुरु जर अष्टम स्थानी गेला तर त्याने तुमच्या मनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे जर शनी अष्टम स्थानी स्तिथ झाला तर तुमच्या मनात भावनिक वादळ निर्माण होते. जेव्हा गुरु अष्टम स्थानी असतो तेव्हा तुम्ही तुमचे सर्व शहाणपण गमावून बसता. परंतु तुमची दयनीय स्तिथी होते हे केवळ अकरा महिन्याकरिताच. केवळ आणि केवळ जर तुम्ही खोल अध्यात्मिक ज्ञानात स्तिथ नसाल किंवा तुम्ही साक्षात्कारी नसाल तर यांने तुमच्या मनावर नक्कीच परिणाम होईल.

परंतु हे जर तुम्हाला माहिती असेल, 'येणारे तीन महिने माझ्या मनाकरिता आणि माझ्या भावनांकरिता कठीण असणार आहेत' ,तर तुम्ही निर्णय अथवा इतर काही या महिन्यामध्ये करणार नाही.

त्याचप्रमाणे दर अडीच दिवसानंतर मनाची मनःस्थिती बदलत असते.

जर तुम्ही दयनीय असाल तर हे अडीच दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. मध्ये हे थांबेल आणि नंतर ही मनःस्थिती पुन्हा परतून येईल.

त्याचप्रमाणे या अखंड विश्वाचासुद्धा मनावर परिणाम होतो.

या सर्वांपासून तुमचे संरक्षण हे सत्संग, ध्यान आणि जप याने होते. या सर्वांमुळे तुम्हाला एक संरक्षक चिलखत प्राप्त होते. समजा तुमच्या दिशेने एक बाण येत आहे आणि जर तुम्ही चिलखत घातलेले नसेल तर तो बाण तुम्हाला लागेल.

म्हणून 'ॐ नमःशिवाय' हे अनेक वेळा गायल्याने आणि जपल्याने तुमच्या सभोवती एक चिलखत निर्माण होते आणि ते तुम्हाला या सगळ्या गोंधळाच्या परिणामापासून रक्षण देते.

आपण बंगलोर आश्रमामध्ये सगळ्या जगाच्या आणि सगळ्या अनुयायींच्या कल्याणाकरिता यज्ञ करतो. दर सहा महिन्यांनी एक छोटा यज्ञ होतो आणि नवरात्रीच्या वेळेस सगळ्या जगाच्या आणि सगळ्या अनुयायींच्या शांती, उन्नती आणि रक्षणाकरिता मोठा यज्ञ करतो.

प्राचीन लोकांचे हेच मार्ग होते. याबद्दल आणखी ज्ञान आणि अभ्यासक्रम आपण भविष्यकाळात सुरु करू या.

प्रश्न : विचार हे कुठून येतात?

श्री श्री : हा विचार तुम्हाला आत्ताच आला? हा विचार कुठून आला? हा तुम्हाला आला, तर मग तुम्ही बसा आणि बघा की हा कुठून आला?

ज्या क्षणी तुम्ही बसता आणि विचाराच्या उत्पात्तीस्थानाविषयी विचार करू लागता तेव्हा मन निर्विकार होऊन जाते. हे विचार कुठून येतात याची खूण आहे.

विचारांचे,कल्पनांचे आणि भावनांचे उगमस्थान- ते आंतरिक अवकाश -तुम्हीच आहात. हे तर असे विचारणे झाले की,'ढग कुठून येतात?'

ढग तर आकाशात केवळ तरंगत असतात. त्याचप्रमाणे आपल्या आंतरिक आकाशामध्ये तीन आकाश आहेत- एक आहे बाह्य अवकाश,दुसरे आहे आंतरिक अवकाश जिथे विचार आणि भावना येतात आणि तिसरे अवकाश हे एक साक्षीदार असते. तिथे काही नसते, तिथे असतो तर केवळ परमानंद.

प्रश्न : काहीही न डळमळणारी श्रद्धा कशी मिळवायची?

श्री श्री : जर श्रद्धा खरी असेल तर तिला डळमळू दे.

सत्य हे अबाधित असते आणि जर श्रद्धेच्या सोबत सत्य आहे तर तिला डळमळू दे. ती कधीच हरवणार नाही. खरे तर तुम्ही जेवढे जास्तीत जास्त संशय घेता येतील तितके घ्या.

"संशय घेऊ नका" असे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा एखादी वस्तू अस्सल नसते तेव्हा.

जेव्हा खरे सोने असते तेव्हा मी तुम्हाला सांगेन की पाहिजे तेव्हढे घासा. पण जर ती वस्तू केवळ सोन्याच्या पाण्यात बुडवलेली असेल किंवा त्या वस्तूवर केवळ सोन्याचा मुलामा चढवलेला असेल तर तुम्ही म्हणाल,'जास्त घासू नका त्याची चकाकी निघून जाईल.'

खऱ्या सोन्याला कितीही घासले तरीही त्याची चकाकी अजिबात कमी होणार नाही.

उर्जीची कमतरता म्हणजे संशय. जेव्हा तुमच्यामध्ये उच्च कोटीची उर्जा असते तेव्हा संशय कुठे असतो? संशय बळावतो जेव्हा उर्जेची पातळी कमी असते. खरी श्रद्धा तीच आहे जिला शंभरदा जरी हलवले तरी ती ढळत नाही. हीच खरी श्रद्धा आहे आणि ती कायम टिकून राहते.

प्रश्न : तुम्ही म्हणता की आम्ही आश्रमात येतो आणि आमचे पुनर्जनन होते-संपूर्ण जग आश्रम का नाहीये?

श्री श्री : माझ्याकरिता तर संपूर्ण जग हे माझा आश्रमच आहे.

जेव्हा तुम्ही आश्रमात येता किंवा अशा भौतिक जागी पोहोचता जिथे नेहमी सदैव ध्यान साधना होत असते तर तिथे त्या जागी त्याचे तरंग रहातात .

तुमच्या घरचेच पहा,जेवण्याची एक जागा,आराम करण्याची एक जागा आणि कचरा ठेवण्याची एक जागा असे असते. त्याचप्रमाणे या जगाचे सुद्धा तसेच आहे,प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा आहे.

तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या घराला जर आश्रम बनवलेत तर मला ते फारच आवडेल. आणि आश्रम म्हणजे काय? एक अशी जागा जिथे ज्ञान आणि प्रेम वस्ती करून आहे. जिथे कोणीही जरी आले तरी त्याचे स्वागत होते आणि त्यांना ग्रहण करण्याकरिता अन्न दिले जाते म्हणजे ते तिथे येऊन काही काळ विश्रांती घेऊ शकतील.

जर तुम्ही अशी शक्ती निर्माण करू शकलात तर संपूर्ण जग हे एक आश्रमच होऊन जाईल. खरे पाहता जेव्हा तुम्ही जंगलात, वनात निसर्गाच्या सहवासात असता तेव्हा ते सगळे काही आश्रमच असते.

मी तर म्हणतो की जगातला प्रत्येक वृक्ष हा माझ्या परसदारातील आहे, माझ्या आश्रमातील आहे. हे सत्य आहे परंतु काही वेळा तुम्हाला वाटते की या सगळ्याचा काही उपयोग होत नाहीये आणि तुम्हाला अशा एका जागेची आवश्यकता भासू लागते

जिथे जाऊन तुम्ही स्वतःला उर्जित करू शकाल तेव्हा तुम्ही इथे (आश्रमात) येता.

इथे तुम्हाला उर्जा जाणवते हे तर उघड आहे. हे तर असे आहे की तुम्ही तुमच्या घरात कुठेही फिरू शकता परंतु तुम्हाला जर अन्नाचा सुवास पाहिजे असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात जाता.

तुम्ही कुठेही बसून जेवू शकता परंतु स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या खोलीत अन्नाचा सुगंध दरवळत राहतो.

प्रश्न : आत्म्याचे काही लक्ष्य असते का?

श्री श्री : होय, आत्म्याचे निश्चितपणे लक्ष्य असते,ते म्हणजे महान आत्मा बनणे. छोट्या मनाचे ध्येय असते मोठ्या मनाबरोबर एकरूप होणे. प्रत्येक लाटेला किनाऱ्यावर पोहचायचे असते आणि सागराबरोबर एक व्हायचे असते, जे ती लाट अगोदरपासून असतेच!

प्रश्न : समय काय आहे?

श्री श्री : दोन घटनांमधील अंतर. आणि जर तुम्ही मला विचाराल की अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजे दोन वस्तूंमधील अवकाश होय.

प्रश्न : उगमाकडे परत कसे जायचे?

श्री श्री : केवळ शांत राहून, आजवर जे काही शिकलात ते मापदंड न वापरता स्वतःला शिथिल सोडल्याने तुम्ही उगमाकडे परतू शकाल.

प्रश्न : आम्हाला कलियुगाबाबत काही सांगा.

श्री श्री : चार युग आहेत; काळाचे चार स्वरूपामध्ये विभाजन केले आहे.

१. सत्य युग, जेव्हा अतिशय सकारात्मकता होती.

२. त्रेता युग, जेव्हा सकारात्मकता किंचित कमी झाली.

३. द्वापार युग, जेव्हा सकारात्मकता अजून खालावली.

४. कलियुग, जेव्हा सकारात्मकता आणखीन खालावत जात आहे.

हेच कलियुगाविषयी म्हंटले जाते. परंतु मी तर म्हणतो की कलियुगा मध्येच सत्ययुग आहे.

ज्यादिवसांमध्ये तुम्ही आनंद अनुभवता तेव्हा जाणून घ्या की तुम्ही सत्ययुगामध्ये आहात. आणि जेव्हा तुम्ही पूर्णतः दयनीय परिस्थितीत असता तेव्हा तुम्ही कलियुगामध्ये असता.

या दृष्टीने पहिले तर कलीयुगामध्येसुद्धा चांगला समय आहे.

प्रश्न : तुम्ही म्हणालात कि सत्य हे परस्परविरोधी आहे. हे समजण्याचा एक सोप्पा मार्ग तुम्ही आम्हाला दाखवाल का?

श्री श्री : दुध हे उत्कृष्ट आहे आणि दुध हे वाईट आहे.

तुम्ही एक कप दुध प्यायलात तर दुध चांगले आहे,पण दोन लिटर प्यायलात तर वाईट. कळले?

बँड अँनटोगँस्ट या जागी पोहोचण्यासाठी जर तुम्ही र्फुडेनस्टडट इथून आलात तर तुम्हाला सरळ जाऊन उजवीकडे वळायचे आहे. पण ओप्पेनाऊ इथून तुम्ही आलात तर तुम्हाला सरळ जाऊन डावीकडे वळावे लागेल. दोन्ही सूचना बरोबर आहेत परंतु त्या परस्परविरोधी आहेत.

सत्य हे वलयाकार असते, ते काही ओळीप्रमाणे सरळ नसते. जर काही वलयाकृती असेल तर तिथे पोहोचण्याचे अनेक मार्ग असतात.

प्रश्न : भारत २००० वर्षांपूर्वी जसा देश होता तसा बनण्याच्या मार्गावर आहे का?

श्री श्री : जर राजकारण्यांनी तसे घडू दिले तर होईल.

इटली,भारत आणि ग्रीस या देशांमध्ये राजकारणी लोक हे एक मोठी समस्या होऊन बसले आहेत. हे राजकारणी लोकच आहेत हे देशाला कर्जबाजारी बनण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत.

प्रत्येक देशाकडे पुरेशी साधनसामग्री आणि योग्य लोक आहेत. जोशपूर्णतासुद्धा आहे, परंतु भ्रष्टाचार हा देशांना आदिम आणि मध्ययुगीन काळाकडे घेऊन जात आहे.