दैवी नृत्य

28
2012
Dec
 
प्रश्न: प्रिय गुरुदेव, कृपा करून तुम्ही आम्हाला गुरूंच्या वंशपरंपरेविषयी आणखी माहिती देऊ शकाल काय?

श्री श्री: खरे पाहता आपल्याला त्याची नक्की तारीख माहिती नाही कारण गुरु परंपरेचा उदय कैक हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे.

योगाचे ज्ञान, ध्यान, आणि सकल विश्व हे एकाच ऊर्जेपासून निर्मित झाले आहे हे ज्ञान हे गुरुपरंपरेद्वाराच प्राप्त झालेले आहे.

नेहमी पाहता असे दिसते की जेव्हा तुम्ही कशाची निर्मिती करता तेव्हा निर्माता हा निर्मित वस्तूपासून वेगळा असतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर मेणबत्ती बनवली तर तुम्ही विचार कराल- ही मेणबत्ती माझ्यापासून वेगळी आहे, आणि ती तुम्ही तुमच्यापासून विभक्त आणि लांब ठेवालं. तुमचा हाच विचार असेल, ' ती माझी निर्मिती आहे परंतु ती म्हणजे मी नव्हे.'

आणि असाच विचार नेहमी लोक करतात, सृष्टीकर्ता आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही जर असे म्हणत असाल की परमेश्वर सर्वव्यापी आहे, म्हणजेच तो सगळीकडे आहे, तर याचा अर्थ असा झाला की तो या समस्त सृष्टीमध्येसुद्धा व्यापलेला आहे.

जर एखादी गोष्ट सर्वव्यापी आहे तर मग ती गोष्ट नसलेली अशी कोणतीही जागा असणे शक्य आहे का? हो की नाही?!

जर मी सर्वशक्तिमान आहे तर मग माझ्यापेक्षा जास्त ताकदवान असे काही असू शकते का? असणे शक्यच नाही.

म्हणून सृष्टीकर्ता आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. तो केवळ एकच आहे.

आता सृष्टीकर्ता आणि सृष्टी हे एकच आहेत हे आपल्याला कसे काय समजणार?

नृत्य आणि नृत्यकर्ता या उदाहरणावरून. तुम्ही नृत्याला नृत्यकर्त्यापासून वेगळे करू शकता का? नाही! हे तर अशक्य आहे.

जर आपल्याला नृत्य पाहायचे असे तर आपण नृत्यकर्त्यामार्फतच पाहू शकतो.

एक चित्रकार आणि त्याचे चित्र हे दोन्ही भिन्न आहेत. एक चित्रकार चित्र रंगवतो आणि त्यापासून तो दूर होतो आणि तरीसुद्धा ते चित्र तिथेच असते. परंतु एक नृत्यकर्ता त्याच्या नृत्यापासून दूर होऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे सृष्टीकर्ता आणि सृष्टी हे नृत्य आणि नृत्यकर्ता यांच्यासारखे आहेत.

ती उर्जा जिला आपण देव, किंवा प्रेम, किंवा प्रकाश म्हणतो ती या समस्त सृष्टीमध्ये व्यापलेली आहे आणि या विश्वाच्या प्रत्येक अणु रेणूमध्ये ती आहे.

प्राचीन ज्ञानाचे हे सार आहे, आणि आधुनिक विज्ञान आणि स्थितीगतिशास्त्रसुद्धा याचाच खुलासा करत आहे.

संपूर्ण जग हे एक क्षेत्र; एक उर्जा यापासून बनलेले आहे.

यामुळे ईश्वरशास्त्रवेत्त्यांच्या अनेक कोड्यांचा उलगडा झाला आहे.

प्रश्न : कमतरतेच्या विचारांना आम्ही मुबलकतेच्या विचारात कसे काय परिवर्तीत करू शकतो?

श्री श्री : असा बदल करण्याचा तुमचा मनोदय आहे याचाच अर्थ असा की तुम्ही त्या दिशेने पुढे वाटचाल करू लागला आहात.

तुम्हाला कशा कशाची आवश्यकता आहे ते पहा आणि तुम्ही बघाल की ती प्रत्येक गरज पुरवल्या जाते आहे. तुम्हाला ज्याची कशाची गरज आहे ते तुम्हाला नेहमीच मिळेल. पण हे दुसऱ्या टोकाला नेऊ नका आणि असे म्हणू नका,'मला आता काहीही करण्याची जरुरत नाही आणि प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत येणारच' ,हे बरोबर नाही.

तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तुम्हाला धीर धरावा लागेल. या दोन गुणांमुळे तुमच्याकडे संपत्ती येते.

'उद्योगीनां पुरुषसिंहं उपायति लक्ष्मी' अशी संस्कृतमध्ये एक म्हण आहे.

याचा अर्थ आहे की ज्याच्याकडे सिंहासारखी हिम्मत आहे आणि जो आपल्या संपूर्ण ताकदीनिशी मेहनत करतो त्याच्याकडे अमाप संपत्ती येते. म्हणून आपल्या संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करा आणि सिंहासारखे असा.तुम्हाला माहिती आहे का की सिंह सर्वात आळशी प्राणी आहे. सावजाची शिकार करून ती सिंहासमोर हजर करणे हे सिंहिणीचे काम असते. सिंह केवळ जातो आणि सावज खातो. सिंहीण सगळे काम करते.

सिंह तर सावजाची शिकार करण्याचे कामसुद्धा करीत नाही. तो आळशी आहे आणि तरीसुद्धा तो जंगलाचा राजा आहे आणि त्याच्याकडे आत्मविश्वास आहे.

तर तुमच्याकडे हे असले पाहिजे - आत्मविश्वास आणि सिंहाचा शाहीपणा.

आणि मग तुम्ही १००% प्रयत्नावर मेहनत घ्या, आणि तेव्हाच तुमच्याकडे संपत्ती चालून येते.

बसून आणि दिवास्वप्ने पहिल्याने, किंवा त्याबद्दल अस्वस्थ राहिल्याने तुमचे काम बनणार नाही.अजिबात अस्वस्थ होऊ नका, एखादे काम हाती घ्या आणि ते पूर्णपणे करा.

नंतर नंतर तुमच्या लक्षात येईल की काम करता करता तुम्हाला संपत्तीसुद्धा मिळते आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, तुम्ही म्हणालात की प्राणाचे निरनिराळे प्रकार आहेत.कृपा करून याबाबत अधिक माहिती सांगू शकाल काय?

श्री श्री : प्राणा ( तरल उर्जा शक्ती )चे दहा प्रकार आहेत. यामध्ये प्राणाचे पाच मुख्य आणि पाच उपमुख्य प्रकार आहेत.आज मी पाच मुख्य प्रकारच्या प्राणाविषयी तुम्हाला सांगणार आहे.

प्रथम मुख्य प्राणाचा प्रकार आहे जो तुमच्या नाभीमध्ये उगम पावून तुमच्या मस्तकापर्यंत वर उठतो आणि त्याला प्राण असे म्हणतात.

नंतर आणि एक प्राण असा आहे जो तुमच्या नाभीमध्ये उगम पावून खालच्या दिशेने जातो आणि त्याला अपान असे म्हणतात.

जेव्हा प्राण उच्च पातळीवर असतो तेव्हा तुम्हाला झोप लागत नाही; तुम्हाला निद्रानाश होतो आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत राहते. तथापि अपान याची पातळी जर खूप वर असेल तर तुम्हाला इतके शक्तीहीन वाटते की तुम्हाला बिछान्यावरुन उठायची हिम्मत होत नाही.

तुम्हाला असा अनुभव आला आहे का? कधी कधी तुम्हाला एकदम जड, स्थूल आणि कंटाळवाणे वाटते. हे सगळे अपान च्या असंतुलनामुळे घडते.

प्राणाचा तिसरा प्रकार आहे समान जो पाचनसंस्थेमध्ये म्हणजेच पोटामध्ये पचनाग्नी म्हणून उपस्थित असतो. हा तो अग्नी किंवा ती आगच असते जिच्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते.

समान हा पचनामध्ये मदत करतो, आणि इतर शारीरिक प्रणालीमध्येसुद्धा मदत करतो. त्याच्यामुळे प्रणालीचे संतुलन होते.

नंतर आहे उदान वायू किंवा उदान प्राण जो कुठेतरी हृदयाच्या आसपास असतो आणि भावनांकारिता जबाबदार असतो.

सुदर्शन क्रिया करताना, लोक हसतात किंवा रडतात, आणि तुम्हाला या भावना गहिवरून आल्यासारख्या वाटतात. याचे कारण आहे उदान वायू . अशा प्रकारे सगळ्या भावनांना हा उदान वायू जबाबदार आहे.

नंतर पाचव्या प्रकारचा प्राण आहे व्यान जो सर्व प्रकारच्या शारीरिक हालचालीकरिता जबाबदार असतो. तो संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे.

सुदर्शन क्रिया करताना तुम्हाला कुठे तरी झिणझिण्या आल्यासारखे वाटते, शरीरभर काही उर्जा पसरल्यासारखे वाटते. तुम्हा सर्वाना याचा अनुभव आला आहे?

सुदर्शन क्रिया करताना काय होते तर या पाच प्राणांचे संतुलन होते आणि म्हणूनच तुम्हाला रडायला येते, किंवा तुम्ही हसता, आणि संपूर्ण शरीरभर तुम्हाला झिणझिण्या आल्यासारखे वाटते. हीच तर सुदर्शन क्रियेची खासियत आहे.

क्रिया केल्यानंतर तुम्हाला सपाटून भूक लागते, हो कि नाही?

तर अशा प्रकारे हे पंचप्राण आपले जीवन चालवतात.

समान चे असंतुलन असेल तर तुम्हाला पचनाच त्रास होतो, आणि तुम्ही अन्नाचे व्यवस्थित पचन करू शकत नाही, किंवा मग तुम्हाला मळमळ होत असल्याचा अनुभव येतो. हे सगळे होते कारण समान प्राणाचे असंतुलन असल्यामुळे.

उदान प्राण जेव्हा अडकून बसतो तेव्हा तुम्हाला एक भावनिक अडथला जाणवतो ज्याच्यामुळे तुमचे विचार आणि तुमचे मन यावर परिणाम होतो.

जेव्हा संपूर्ण शरीरभर पसरलेला व्यान असंतुलित होतो तेव्हा तुम्हाला सांधेदुखी, किंवा हालचाल करण्यात त्रास होऊ लागतो, आणि एकतर तुम्ही अस्वस्थ आणि अशांत होता, किंवा तुम्हाला काहीसुद्धा करू नये असे वाटू लागते.

अशा अवस्थेत हिंडा फिरायला त्रास होऊ लागतो आणि त्यामुळे शरीराची तगमग होऊ लागते. हे सगळे व्यान च्या असंतुलनामुळे होते.

सुदर्शन क्रिया केल्यानंतर, तुमच्या लक्षात आले असेल की ही सर्व असंतुलने निघून जातात. असे तुमच्याबरोबर झाले आहे की नाही?

शारीरिक हालचालीमधील आधीची सर्व अस्वस्थता, किंवा त्याचे अभिसरण, किंवा व्यान असंतुलनामुळे होणारे दुखणे, हे सगळेच्या सगळे,सुदर्शन क्रिया केल्यानंतर, नाहीसे होते.

तर प्राणाचे पाच प्रकार आहेत.

प्राणाचे उपमुख्य प्रकारसुद्धा आहेत, परंतु आपण आता त्यावर नंतर कधी चर्चा करू या.

प्रश्न : प्रेम आणि उदासीनता हे जीवन साथीदारामध्ये असणे कितपत अनुरूप आहे?

श्री श्री : भावनावेग आणि उदासीनता या दोहोंची गरज अहि.

नेहमी आपण असा विचार करतो ,'माझ्यामध्ये इतका भावनावेग आहे मग माझ्यात उदासीनता कशी काय असू शकते? आणि जर मी उदासीन आहे तर कोणत्याही गोष्टीकरिता माझ्यात भावुकता कशी काय असू शकेल?'

अशा कल्पना साधारणपणे लोकांच्या मनात असतात. मी तुम्हाला सांगतो हे असे नाहीये. हे म्हणजे असे झाले; श्वास आत घेणे म्हणजे भावावेग आणि श्वास बाहेर सोडणे म्हणजे उदासीनता आणि दोघांच्या मधे अनुकंपा. तुम्हाला या तिघांचीही गरज आहे.

तुम्हाला जीवनात कोणत्यातरी गोष्टीकरिता भावनावेग असणे जरुरी आहे, नाही तर मग तुम्ही निराशेच्या खाईत पडाल. ज्ञानाविषयी, सेवा करण्याविषयी, विचार करण्याविषयी किंवा आणखी कशाकरिता तुमच्या मनात तळमळ असली पाहिजे. जीवनात काही तीव्र इच्छा निश्चितपणे असली पाहिजे. ज्ञान मिळवण्याविषयी तुमच्यात तळमळ असू शकते. तर तळमळ किंवा भावावेग असणे महत्वाचे आहे!

उदासीनता देखील महत्वाची आहे. उदासीनतेच्याशिवाय मौज आनंद असू शकत नाही. तुमच्यात जर उदासीनता नसेल तर तुमची अवस्था अगदी दयनीय होऊन जाईल.

आणि अर्थात अनुकंपासुद्धा जीवनात आवश्यक आहे. तर हे तिन्ही जरुरी आहेत.

प्रश्न : या वेळेस जर आपण मोक्ष प्राप्तीपर्यंत पोचू शकलो नाही तर काय होईल? पुढच्या जन्मी आम्ही तुमच्याबरोबर असू काय?

श्री श्री : होय, नक्कीच. त्याची काळजी करू नका.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, इतक्या अनेक जोडप्यांना मुले का होत नाहीत याचे मला नवल वाटते. पाश्चिमात्य जगात हे काय होते आहे?

श्री श्री : खरे तर हा प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारायला पाहिजे. ते तुम्हाला योग्य ते निदान सांगतील.

आपण याचे साधारीकरण करू शकत नाही. अर्थात मदिरा आणि मादक द्रव्ये हे या कारणांपैकी एक आहे. ते चांगले नाही.

लोक शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून मदिरापान सुरु करतात. हे बरे नाही. हे जग एक अतिशय चांगली जागा होईल जर लोक नशिल्या पदार्थांपासून दूर राहिले तर.