22 April


22 Apr           
 2012       

समाधीच्या एका क्षणात लाखो वर्षांची विश्रांती आहे
ध्यानाची गुपिते – दिवस ३
२२ एप्रिल २०१२

आपण मागचे २ दिवस जे शिकत होतो त्याची थोडक्यात उजळणी करूयात. अनेक प्रकारे ध्यान कसे होऊ शकते. ध्यान ही एक घटना आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा, ध्यान हे विनाप्रयत्न होते. विनाप्रयत्न हा ध्यानाचा सगळ्यात महत्वाचा भाग. ध्यान म्हणजे काहीतरी करणे नव्हे तर काहीही न करणे होय. तुम्हाला काहीही न करायला उपयुक्त स्थिती तयार करणे ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट.
मग आता हे कसे होईल? आपण बऱ्याच पद्धती आणि मार्ग बघीतले, जसे शारीरिक कौशल्य, योगा, ताई-ची इत्यादी काही प्रमाणात मनाला शांतता मिळवून देऊ शकतात. अगदी संपूर्ण नाही पण शारीरिक व्यायाम काही प्रमाणात ध्यानस्थ व्हायला मदत करतात.
दुसरे, म्हणजे प्राणायाम. हा अधिक महत्वाचा आहे कारण आपल्यात ५ शरीरे अंतर्भूत आहेत (पंचकोश). पहिले, स्थूल शरीर, नंतर प्राणिक शरीर, जे जैविक सूर किंवा विद्युत चुंबकीय शक्ती आहे. त्यानंतर मन किंवा चेतना; त्यानंतर अंतप्रेरणेचे शरीर, जे शुद्धीकृत चेतना आहे, त्यानंतर निव्वळ आनंद.
आपण नेहेमी असा विचार करतो की मन हे शरीरात आहे, पण वास्तविक याच्या बरोबर उलटे आहे, शरीर मनाच्या आत आहे. मी नेहेमी आभासी हाताचे उदाहरण देतो. हात जरी कापून टाकला तरी माणसाला त्याचे अस्तित्व जाणवतेच, याचाच अर्थ सूक्ष्म शरीर असते. श्वास घेण्याच्या विविध तंत्रांनी, प्राणायामाने मन प्रसन्न, शांत आणि आनंदी होते.
त्यानंतर पंचेन्द्रीयांद्वारे स्वाद, वास, दृष्टी, ध्वनी आणि स्पर्श, मन ध्यानस्थ होते.
त्यानंतर भावना, अत्यंत शुद्ध भावनांद्वारे, प्रेम, सहिष्णुता, सेवाभाव याद्वारे काही प्रमाणात मन प्रसन्न, शांत आणि ध्यानस्थ होते. भावनांद्वारे ही तुम्ही तीच ध्यानस्थ अवस्था प्राप्त करू शकता.
त्यानंतर बौद्धिक आकलनातून. याबद्दल मी नेहेमी एक उदाहरण देतो, तुम्ही जेंव्हा अवकाश संग्रहालयात जाता किंवा अंतराळाविषयक सिनेमा बघता तेंव्हा तुम्ही पृथ्वीकडे संपूर्ण ब्रह्मांडाच्या नजरेतून पाहता, तेंव्हा तुमच्या लक्ष्यात येते की पृथ्वी किती लहान आहे, आणि तुम्ही या सृष्टीच्या तुलनेत किती लहान आहात. ही उत्तेजित बुद्धी आयुष्याबद्दलचा एक नवीन दृष्टीकोन दाखवते आणि मन ध्यानस्थ होते. मनाची ती कलकल एकदम बंद होते.
मनाची सतत कलकल चालू असते, दुसऱ्यामध्ये दोष काढणे किंवा स्वतःमध्ये, पण जेंव्हा तुम्हाला ह्या सृष्टीच्या विशालातेबद्दल लक्षात येते, तेंव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटू लागतात. या सृष्टीचे अफाट अस्तित्व तुम्हाला त्या प्रसन्नतेत, शांततेत घेऊन जाते. त्यामुळे उत्तेजित बुद्धी मुळे सुद्धा ध्यान लागते.
प्रश्न: अहंभावाचे रुपांतर स्वत्व समजण्यात होण्यासाठी भक्ती मार्ग कसा उपयोगी पडेल या बद्दल बोलाल का?
श्री श्री:भक्ती म्हणजे काय? तर ती प्रेमाची एक अवस्था आहे. अहं म्हणजे काय? तर अलग असण्याची भावना, एक सीमा, एक व्यक्तित्व. प्रेमात ओळख विसरवण्याची ताकत आहे, प्रेमात विलीनीकरण होते. अहं एकांगी असतो प्रेम आणि अहं काही वेळा वेगवेगळया भूमीका निभावतात आणि काही वेळा सहअस्तित्वात असतात.
त्यामुळे जेंव्हा प्रेम असते तेंव्हा अहं नसतो आणि जेंव्हा अहं असतो तेंव्हा प्रेम नसते.
जेंव्हा तुम्हाला आव्हान स्वीकारायचे असेल तेंव्हा प्रेम उपयोगी नाही, अहं कामी येतो. अहं आव्हाने स्वीकारतो. पण जेंव्हा तुम्हाला आराम करायचा आहे, मजा करायची आहे त्यावेळी अहं उपयोगी नाही, तर प्रेम कामी येईल. तुमच्या लक्षात येतंय मी काय सांगतोय?
म्हणूनच निसर्गाने तुमच्यात प्रेम आणि अहं दोन्ही गोष्टी ठेवल्या आहेत, पण तुम्ही फक्त अहंमध्ये अडकणे म्हणजे जणू तुमचा पाय बुटात अडकणे, तुम्हाला कळत नाही की तुमचा पाय त्यातून कसा सोडवावा. जणू तुम्ही बुट घालून अंघोळ करताय, बुट घालूनच झोपताय. तुम्हाला तुमचे बूट काढून घरात आराम कसा करावा हे समजले पाहिजे.
प्रेम ही तुमच्या आयुष्यात घडलेली पहिली घटना आहे. मूल जन्मल्या जम्नल्या जेंव्हा डोळे उघडते आणि आईकडे पाहते ते प्रेम आहे. त्या पहिल्या कटाक्षात ते आईकडून प्रेमाचा स्वीकार करते आणि आईला प्रेम देते. वयाच्या ३ –या वर्षी अहं अस्तित्वात येतो. ३ वर्ष्यानंतर तुमची ओळख मजबूत होते आणि वाढत जाते, पण कधी कधी तुम्ही त्यात अडकू शकता.
जेंव्हा तुम्ही वयस्कर होता, खूप वृद्ध लोकांकडे पाहता तेंव्हा त्यांचात तुम्हाला अहं दिसत नाही. ते परत लहान मुलांसारखे होतात. ९० वर्ष्यापुढे अहं टिकणे जवळपास अशक्य असते. ३ वर्ष्या आधी आणि ९० वर्ष्या नंतर तुमच्यात अहं नसतो. हे म्हणजे सेक्स सारखे आहे, याला वयाची मर्यादा आहे, त्यानंतर हे शक्य नाही, आणि त्याआधी सुद्धा नाही. पण त्यांची आपापली एक भूमिका आहे.
प्रश्न: श्री श्री, माझ्या काही मित्रांना असे वाटते की पृथ्वी अती लोकासंख्या, नैसर्गिक संपत्ती, जसे समुद्र, जंगले यांच्या ऱ्हासामुळे संपेल. बऱ्याच लोकांना खूप निराश वाह्यला होते. मी त्यांना सांगतो की या सगळ्या अराजकतेत सुद्धा एक दैवी शक्तीच आहे. माझा प्रश्न आहे, तुम्हाला असे वाटते का की मी नुसत्या हवेत गप्पा मारतो आहे की
श्री श्री: काळजी असणे चांगले आहे, पण त्याबद्दल विभ्रम असू नये. त्यात फरक आहे. विभ्रम असेल तर तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही आणि तुमची मानसिक शांतता हरवू शकता. त्याचबरोबर तुम्ही असे म्हणू शकत नाही ‘ठीक आहे देव सगळ्याची काळजी घेईल आणि आपण जे चालले आहे ते तसेच चालू ठेऊ’ तुम्ही असेही म्हणू शकत नाही की ‘आम्ही या पर्यावरणाचा कितीहि उपभोग केला तरी काहीही करून निसर्ग आम्हाला ते देतच राहील’
आपल्याला आपल्या पर्यावरणाचे रक्षण केलेच पाहिजे. जेंव्हा हा ऱ्हासाचा टप्पा आला आहे तेंव्हा लोकांना सुद्धा याची जाणीव होते आहे. निसर्गाने किंवा त्या मोठ्या मनाने ही जाणीव लाखो लोकांच्या मनात करून दिली आहे. 
आज अनेक लोकांना पर्यावरणाची काळजी वाटत आहे, जी पूर्वी कधी वाटली नाही. तुमच्या लक्षात येतंय मी काय सांगतोय? आज छोट्या खेड्यात सुद्धा लोकांना याची जाणीव आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात लोक पृथ्वीचे रक्षण, सेंद्रिय शेती, रासायनिक खते न वापरण्याबद्दल बोलत आहेत. ही गोष्ट खेडोपाडी पोहोचली आहे.
त्याच वेळी लोक त्याचाबद्दलइतके विभ्रमित्, रागीट आणि कासावीस होतोत की ‘अरे आपण आपल्या पर्यावरणाला नष्ट करत आहोत’
मी तर म्हणेन, तुम्ही शांत रहा. विभ्रमीत होवू नका पण काळजी सोडू नका.
प्रश्न: समाधी म्हणजे काय?
श्रीश्री: ‘धी’ म्हणजे प्रज्ञा (बुद्धी) आणि समाधी म्हणजे जिथे मन पूर्णपणेनिश्चल असते; जिथे तुमची पूर्ण यंत्रणा संतुलनात काम करत असते, त्यालाच समाधी म्हणतात.
शरीर, मन, वृत्ती, सगळे अशा एकसूत्रतेत व प्रसन्न असतात.
समाधीचे अनेक वेगळे प्रकार आहेत.
एक म्हणजे लयासमाधी, जेव्हा तुम्ही एखादे संगीत ऐकता आणि तुम्ही त्याचात पूर्णपणे हरवता. तुम्हाला माहित असते की तुम्ही आहात पण हे माहित नाही कुठे आहात.
पुढची आहे प्रज्ञा समाधी, असम्प्रज्नता समाधी, इत्यादी.
अशी पण एक समाधी आहे जिथे विचार आहेत, कल्पना आहेत, पण तुम्ही खूप स्थिरचित्त आहात आणि एक अशी समाधी पण आहे ज्याचात विचार नाहीयेत फक्त भावना आहेत.
असे समाधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. असे म्हंटले जाते की ‘समाधीच्या एका क्षणात लाखो वर्षांची विश्रांती आहे’. कोटी कल्प विश्राम- एका क्षणात लाखो वर्षांची विश्रांती, समाधी. असेही म्हंटले आहे की समाधीतल्या एका क्षणाची विश्रांती ही सेक्स पेक्षा १००० पटींनी जास्त आहे.
त्यामुळे योगी ब्रम्हचारी असतात हे खूप स्वाभाविक आहे, त्यांना त्या अत्यानंदासाठी इतर कोणाची गरज लागत नाही. तुम्ही फक्त बसा आणि तो परमानंद तुमच्यात जागृत होईल. म्हणूनच ब्रम्हचर्य ही उपासना नसून तुमच्या शरीरातील कणाकणात रोमांच आणि शाश्वत सुख भरलेले आहे. सेक्स करताना सुद्धा तुम्हाला शाश्वत सुखाची अपेक्षा असते. मी असे ऐकतो की कधीकधी लोकांना त्याची अनुभूती येते आणि कधी नाही, मात्र लोक त्याने थकतात असेही ऐकले आहे.  
समाधी मध्ये मात्र तो सखोल अनुभव घेतानाही तुम्ही थकत नाही. त्यात उत्तेजना नसते, काही कडकड नसते, थकवा नसतो, तर एक उच्चतम उर्जा तुम्हाला प्रफुल्लित करत असते, म्हणूनच ब्रम्हचर्य आपोआप घडते.
प्रश्न:जेंव्हा कोणी जवळचा माणूस निधन पावतो, तेंव्हा त्या दुःखातून बाहेर पडायला ध्यानाची मदत होते का?
श्री श्री: होय, मदत होते.
जेंव्हा कोणी जवळचा माणूसमरण पावतो, पैलतीरावर जातो, ध्यानाने त्या दुःखा तून बाहेर पडायला नक्कीच मदत होते. मृत्यू हा अटळ आहे, त्याच्या इतकी निश्चित गोष्ट दुसरी नाही, हे नक्की. तुम्ही तुमचे आयुष्य कसेही जगले असाल तरी तुम्ही मरणार. यशस्वी किंवा अयशस्वी, तुम्ही मरणार. प्रसिद्ध व्यक्ती किंवा अप्रसिद्ध, तुम्ही मरणार. गरीब किंवा श्रीमंत, आजारी किंवा निरोगी, तुम्ही मरणार. फक्त आजारी लोकच मरतात असे नाही तर धडधाकट लोकही मरतात. प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे, मृत्यू ही निश्चित गोष्ट आहे. एकदा का तुम्ही हे सत्य, ही वस्तुस्थिती स्वीकारली की तुम्ही म्हणू शकता ‘ओह, तुम्ही गेलात, आत्ता पुरता अलविदा. मी काही दिवसांनी परत तुम्हाला भेटेन’ .
ध्यानाने तुम्हाला दुःख बाजूला सारायला तर मदत होईलच पण जेंव्हा तुम्ही ध्यान करता तेंव्हा त्या कंपनाने गेलेल्या माणसाला सुद्धा शांती मिळते.
प्रश्न: जेंव्हा कठीण परिस्थिती येते तेंव्हा तिचा स्वीकार करू की तिच्याशी लढू?
श्री श्री; जर तुम्हाला वाटत असेल तर लढा.
जेंव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही १००% प्रयत्न केले आहेत आणि आता कुठल्याही प्रकार लढू शकत नाही, तेंव्हा प्रार्थना करा, मदतीसाठी प्रार्थना!!
प्रथम तुम्ही परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करा आणि मग लढा. लढून झाले की परत स्वीकार करा. दोन स्वीकारांच्या (परिस्थितीचा) मध्ये लढणे हेच योगाचे सार आहे.
योग म्हणजे काय? प्रसन्न चित्ताने परिस्थितीचा स्वीकार, दूरदृष्टी ठेवून कार्य करणे होय.
प्रश्न: मृत्यू नंतर आत्म्याचे काय होते?
श्री श्री: परत यायची तयारी करतो!
तो दुसरे शरीर धारण करण्यासाठी जाऊन रांगेत उभा राहतो, लाखो या जगात येण्यासाठी वाट पाहत आहेत. ज्या लोकांची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आहे त्यांना म्हणूनच मी सांगत असतो की तसे करू नका. तुम्ही हे शरीर धारण करण्यासाठी खूप मोठ्या रांगेत वाट बघितली आहे, त्याचा नाश करू नका, हे आयुष्य खूप अनमोल आहे.
प्रश्न: मी या शरीरात येण्या अगोदर कुठे होतो?
श्री श्री: खूप चांगला प्रश्न आहे! मी या शरीरात येण्या अगोदर कुठे होतो?
ही चेतना खूप जुनी आहे; मन हे अश्मयुगापेक्षा जुने आहे. मी सांगतो हा प्रश्न तुमच्या जवळ ठेवा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर शोधायची घाई करू नका.
या प्रश्नातच तुम्हाला उत्तर सापडेल, तुम्हीचे ध्यान अधिक सखोल होईल. मी आता इथे आहे, पण सगळीकडे सुद्धा आहे.
प्रश्न: ध्यानातून बाहेर येण्यासाठी गजर लावण्याची गरज आहेत का?
श्री श्री: नाही, त्याने एकदम धक्का बसण्याची शक्यता आहे. तुम्ही जर ठरविले की मी २०-३० मिनिटेच ध्यान करेन तर तुम्ही आपोआप डोळे उघडाल. तुमच्या शरीरातले घड्याळ तुमच्या ठरवण्यानुसार चालते. तुम्ही सगळ्यांनी ही प्रक्रिया बघीतली आहे? तुम्ही फक्त मनात ठरवा की मला ५ वाजता उठायचे आहे, आणि सकाळी बरोबर ५ वाजता तुमचे डोळे उघडतील. तुमच्या शरीरात एक घड्याळ कार्यरत आहे, त्याचा वापर करा.
ध्यानासाठी फक्त २० मिनिटे बसा. सुरवातीला फार वेळ बसू नका, नाहीतर ध्यानातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमचे  घर कुठे आहे, मोटारीच्या चाव्या कुठे आहेत हे विसरायला होईल. त्यामुळे मी सांगेन की सुरवातीला २०-३० मिनिटे पुरेशी आहेत. जास्त वेळ बसणे शक्य देखील नाही, तुमचे डोळे आपोआप उघडतील आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. जास्त वेळ बसण्याची स्वतःवर जबरदस्ती करू नका. कमीतकमी २० मिनिटे आणि जास्तीतजास्त अर्धा तास.
प्रश्न: ध्यान करताना मला वेदना का होतात?
श्री श्री: तुम्हाला माहित आहे वेदना का होतात? कारण ध्यानामुळे तुमच्या आतील प्रेम जागृत होते. तुमच्या आतील प्रेम ध्यानामुळे वर येते. प्रेम हे वेदनेशी जोडले आहे. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतोय?
तुम्हाला दुःख वाटू शकेल, तुमच्यातील काही भावना, अश्रू येऊ शकतील. त्यांना निवाडा करू नका, फक्त त्यांच्या बरोबर रहा. जर खुपच असह्य वाटले तर काही खोल श्वास घ्या, त्या वेळी प्राणायाम करा आणि तुमच्या लक्षात येईल की गोष्टी शांत होत आहेत.
प्रश्न: कुठल्याही चांगल्या कामासाठी योगदान देत असताना आयुष्यात समतोल कसा साधावा?
श्री श्री: हे एक आव्हान आहे.
जेंव्हा तुम्ही ठरवता, विचार करता आणि म्हणता की मी दोन्ही करू शकतो तेंव्हा या दोन्ही गोष्टी विरोधी वाटत असल्या तरी तुम्ही यशस्वी व्हाल. जेंव्हा तुमच्या हे लक्षात येईल की ‘मी एका निमित्यासाठी काम करत आहे आणि ते माझ्या नोकरी/व्यवसायापेक्षा मोठे आहे’ तेंव्हा तुम्ही दोन्ही करू शकता. 
जेंव्हा तुमची काहीतरी करण्याची धडपड तुमच्या नोकरी पेक्षा मोठी होते तेंव्हा तुम्ही म्हणाल ‘मला नोकरी नको मी काहीतरी चांगल्या निमित्यासाठी काम करीन’ . हा खूप कठीण मार्ग आहे पण चांगले परिणाम प्राप्त करून देणारा आहे, खूप संतुष्टता देणारा आहे. कुठीलीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी काही त्याग करावेच लागतात. जर तुम्हाला तुमच्या सुखद क्षेत्रात राहायचे असेल तर दोन्हीचा सुवर्णमध्य साधा. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की ‘मला सुखाची चिंता नाही, चांगल्या निमित्यासाठी काम ही माझी तळमळ आहे आणि मला हे करायचे आहे’ त्यावेळी त्यात उडी मारा.
प्रश्न: संगीत ध्यानाला कसे उपयुक्त ठरते?
श्री श्री: संगीत नक्कीच मदत करते. संगीत एक चैतन्यपूर्ण वातावरण बनवते, ज्याने तुम्हाला ध्यान चांगले व्हायला मदत होते, संगीत हा त्याचाच एक भाग आहे. तुम्हाला माहित आहे का, ७०% इंग्रजी भाषा संस्कृत आहे? तुमच्या पैकी किती जणांनी हे ऐकले आहे? सिस्टर म्हणजे स्वशा; डॉटर म्हणजे दुहिता; गो म्हणजे गोच्छ. इंग्रजीचे मूळ संस्कृत आहे.
प्रश्न: त्याने (देवाने) आयुष्य का बनवले?
श्री श्री: त्याने आयुष्य का बनवू नये? त्याने हे आयुष्य बनवले कारण तुम्ही हा प्रश्न विचारू शकाल. त्याने हे आयुष्य बनवले नसते तर तुम्ही हा प्रश्न विचारू शकला नसता. मला कल्पना नाही, मला वाटते देवाला सल्लागाराची गरज आहे, त्याने गोष्टी जातील केल्या आहेत. 
प्रश्न: आत्ताचा क्षण कसा स्वीकारावा?
श्री श्री: आत्ता या क्षणी मी जसा तुमचा प्रश्न स्वीकारला आहे, आणि मी इथे आहे. समजले? हे उस्फुर्त आहे.
वर्तमान अटळ आहे. जे अस्तित्वात आहे ते या क्षणीच आहे. भविष्याबद्दलचे विचार सुद्धा या क्षणीच आहेत. तुमची भविष्याबद्दलची काळजी ही भविष्यात नसते, ती वर्तमानात असते. भूतकाळातल्या आठवणी सुद्धा वर्तमानात असतात. तुमची भूतकाळातील काळजी सुद्धा वर्तमानात असते. तुम्ही फक्त जागे व्हा आणि समजून घ्या की वर्तमान अटळ आहे.
प्रश्न: राग चांगला आहे का?
श्री श्री: जर तुम्हाला रागाचा उपयोग कशासाठी तरी करायचा असेल आणि ती गोष्ट तुमच्या नियंत्रणात असेल तर तो चांगला आहे. जर तुमच्यावर रागाचे नियंत्रण आले तर तुम्ही संकटात सापडाल. मी काय सांगतोय लक्षात येतंय?
तुम्ही रागाचा उपयोग साधन म्हणून करू शकता, पण राग जर तुमचा उपयोग करून घेत असेल तर तुम्ही सगळे गमावाल, निमित्त सुद्धा हरवेल. बरेचदा लोकांच्या बाबतीत असे होते, ते अन्यायाच्या विरुद्ध लढताना सयंम सोडतात आणि ज्या करणा साठी ते लढत होते तेच हरवून बसते.
तिसऱ्या जगातील बऱ्याच देशात आणि इतरत्रही ते बसगाड्या जाळतात, आगगाडी जाळतात आणि खूप नुकसान करतात. प्रत्येक दंगलीमागे मग ती जगात कुठेही असो, त्यांना वाटत असते की ते अन्यायाविरुद्ध लढत आहेत. माझी WAR ची व्याख्याWorst Act of Reason (कारणासाठी केलेली सर्वात वाईट कृती) आहे. युद्धाला जाताना तुमच्या कडे कारण असते. युद्ध करणारा कोणीही त्याचे समर्थनच करील, पण त्याने अतीव नुकसान होते आणि तुम्हाला काहीही मिळत नाही. म्हणूनच तुम्हाला पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत. गांधीवादी तत्वांप्रमाणे शांततापूर्ण, अहिंसक आंदोलन हे सगळ्यात चांगले.
भारतात ऑगस्ट मध्ये आम्ही हेच केले, तुम्ही वर्तमानपत्रातून वाचले असेल. . IAC – India Against Corruption चे आपण संस्थापक सदस्य आहोत. एकही हिंसक कृत्य न करता कोणालाही त्रास न देता देशभरातून हे आंदोलन झाले.
आर्ट ऑफ लिविंग हा त्यातला महत्वाचा घटक, महत्वाचा दुवा होता. या भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनात कुठीलीही समाजविघातक शक्ती घुसणार नाही याची स्वयंसेवकानी काळजी घेतली.
भ्रष्ट्राचार आणि घुनेगारी विरोधातले हे आंदोलन हिंसक होऊ शकले असते, लोकांनी घरे जाळली असती, आणि इतर काही हिसक कृत्ये केली असती, पण असे काहीही झाले नाही. अहिंसेशी त्यांची बांधीलकी होती. संपूर्ण देशात त्या काळात गुन्हेगारीची टक्केवारी घसरली. प्रत्येक जण काही चांगल्या निमित्याने पुढे आला होता.
प्रश्न: पाप म्हणजे काय?
श्री श्री: ज्याने तुम्हाला आणि इतरांना दूरगामी यातना भोगाव्या लागतात ते पाप. ज्याने तुम्हाला तात्कालिक आनंद मिळतो, पण आयुष्याभर यातना भोगाव्या लागतात ते पाप. सुरवातीला जे कठीण वाटते पण दूरगामी तुमचा उद्धार करते ते पुण्य.
प्रश्न: ध्यानाचे गुपित काय ?
श्री श्री: अवकाश ३ प्रकारचे असतात. एक बाहेरचे, ज्यात ४ इतर सगळे अवकाश सामावतात. दुसरे अंतरंग ज्यातून विचार आणि भावना येतात; त्याला चित्आकाश म्हणतात.
तिसऱ्या प्रकारचे अवकाश जिथे फक्त परमानंद असतो. ही तिन्ही अवकाश जोडलेले असतात, बाहेरचे अवकाश, अंतस्थ अवकाश जिथे विचार, सूक्ष्म शरीर, कारणात्मक अवकाश जिथे फक्त प्रेम आणि परमानंद.
प्रत्येक वेळी जेंव्हा तुम्ही प्रेम, खुशी किंवा शांतता अनुभवता तेंव्हा तुम्ही त्या अंतरंगाला अनुभवता,त्या स्फूर्तीतून ध्यान लागते. ध्यानामुळे ती उर्जा तुम्हाला मिळते, हे दुहेरी घडते. जेंव्हा उत्साह वाढेल तेंव्हा ध्यानही चांगले होते.
प्रश्न: स्वतः बद्दल अनुकंपा दाखवणे इतके कठीण का असते?
श्री श्री: कारण आपल्याला स्वतःला दोष देण्याची सवय लागली आहे. अध्यात्मीक मार्गातील पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणे थांबविले पाहिजे. हा नियम तुम्ही लागू केलात तर तुम्ही अध्यात्मीक मार्गावर लवकर प्रगती कराल. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्मीक मार्ग म्हणजे काय? तर स्वतःशी जोडले जाणे, तुमच्या अंतरंगाशी जोडले जाणे. जर तुम्ही स्वतःला दोष देत राहिलात तर तुम्ही स्वतःशी कसे जोडले जाल? स्वतःच्या अंतरंगाजवळ कसे जाल? जो सतत दोष देत असेल त्याच्या जवळ जायला कोणीही तयार होणार नाही. ध्यानातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आत्मनिंदा. जर तुम्ही स्वतःला दोष देत राहिलात तर तुम्हाला कधीही शांतता मिळणार नाही, तुम्ही अंतरंगापर्यंत पोहोचणार नाही, पैलतीरी जाणार नाही. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका.
प्रश्न: नृत्य कशाचे प्रतिक आहे?
श्री श्री: जेंव्हा तुम्ही खुश असता तेंव्हा तुमची प्रत्येक हालचाल नृत्य असते. तुम्ही तुमच्या प्रकारे आयुष्यभर नाचत असता. विवेक, बुद्धिमत्ता तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत नाचायला शिकवते. लयबद्ध हालचाल म्हणजे नृत्य. लयबद्ध आवाज म्हणजे संगीत. लयबद्ध आयुष्य म्हणजे उत्सव!
प्रश्न:संपूर्ण जगासाठी एक सरकार आणि संपूर्ण जग एक कुटुंब या बद्दल तुम्हाला काय वाटते?
श्री श्री: आत्ता संपूर्ण जग एक कुटुंब व्यावहारिक आहे. संपूर्ण जगासाठी एक सरकार हा विचार मी राजकारण्यांवर सोडतो. त्यांनी जागतिक बँक स्थापन केली आहे, पण संपूर्ण जगासाठी एक सरकार या कल्पनेला ते आत्ता तयार असतील असे मला वाटत नाही. कमीतकमी संयुक्त राष्ट्रसंघाने मागे राहण्यापेक्षा जास्त ताकतवान व्हावे आणि स्वतः गोष्टीत लक्ष घालावे, जगासाठी ते हितकारक ठरेल.
प्रश्न: (श्रोत्यातून कोणीतरी उस्फुर्तपणे प्रश्न विचारला जो नीट ऐकू आला नाही)
श्री श्री: ऐका, तुम्ही श्वास घेताय? होय. नक्कीच, हे तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे आणि सगळ्यांना माहित आहे.
इथे काय होते? हवा तुमच्या शरीरात जाते आणि तीच तुमच्या शरीराबाहेर जाते आणि जगभर प्रवास करते. तुम्ही असे म्हणू शकता का ‘ही माझी हवा आहे’ ?
सूक्ष्म पातळीवर तुम्ही तिची मालकी सांगू शकत नाही. स्थूलमानाने नक्कीच तुम्ही असे म्हणू शकता ‘हे माझे शरीर आहे’!!
तुमचे शरीर सतत एक उर्जा, कंपने उत्सर्जित करत असते. तुम्हाला या ब्रम्हांडातून उर्जा मिळत असते आणि तिथेच ती जातही असते. शरीरात सतत एक उर्जेचा स्त्रोत वहात असतो आणि तुमच्या शरीरातील पेशी सतत बदलत असतात.
तुम्ही सतत उर्जेची अद्लाबदल करत असता. तुम्ही एक विशिष्ट कंपन आहात, वारंवारता आहात.
एक विशिष्ठ वारंवारता सुझान, आणखीन एक वारंवारता जेफरी, आणखीन एक मायकेल तुम्ही प्रत्येक जण म्हणजे एक टीवी चॅनेल सारखे आहात. 
एका टॉवरपासून अनेकचॅनेल प्रसारीत केले जातात आणि ते कोणाचाही घरात टी.वी. वर दिसू शकतात.
तुम्ही असे म्हणू शकत नाही की, ‘बी.बी.सी. माझ्या टी.वी. वर दिसतय तर ते माझ्या शेजारच्याच्या टी.वी. वर कसे दिसेल?’ त्या सारखाच लहरी असतात.
तुमची चेतना सुद्धा एक लहरी आहे, त्यात खूप शक्यता आहेत, खूप मार्ग आहेत.
जेंव्हा सूर्य तुमच्या खिडकीतून आत येतो तेंव्हा तुम्ही असे म्हणू शकत नाही की ‘ओह सूर्य माझ्या खिडकीतून आत आला आहे, मी त्याला पकडले आहे!’ तोच सूर्य शेजारच्या खिडकीत सुद्धा असेल आणि पूर्ण जगभर असेल. हा सर्वांगीण विचार झाला.
आपल्याला एकांगी विचाराची सवय आहे. जे जन्माला आले आहे, ते मरणारच, हा एकांगी विचार. सर्वांगीण विचार करा. वेदांताने तुम्हाला सर्वांगीण विचाराची सवय होते. पूर्वीच्या लोकांना सर्वांगीण विचार माहित होता त्यामुळे ते कदाचित या शब्दाचा वापर करीत, कदाचित असे किंवा कदाचित तसे.
जैन धर्मात आणि जैन तत्वज्ञानात ते ‘कदाचित’ हा शब्दप्रयोग करतात. ही समजायला खूप मजेशीर गोष्ट आहे. सर्वांगीण विचाराने बुद्धीला चालना मिळते आणि त्याने दिसण्याच्या पलीकडचे सत्य कळायला मदत होते.
सूर्य इथे आणि तिथे पूर्णपणे आहे. तुम्ही एक कंपन आहात. शरीररूपे तुम्ही सगळीकडे असू शकत नाही पण मनाने, चित्ताने तुम्ही अनेक ठिकाणी असू शकता. तुम्ही फुलाला स्पर्श करता तेंव्हा तुमचे कंपन त्यात जाते.
तुम्ही जैविक कुलुपाबद्दल ऐकले आहे का? त्या कुलपाना जेंव्हा तुम्ही स्पर्श कराल तेंव्हाच ते उघडतील. या कुलपाबद्दल तुम्ही २०-२५ वर्षे पूर्वी बोलला असतात तर लोक हसले असते. सगळे शक्य असते.
त्यामुळे सगळ्या फक्त एक लहरी आहेत.हे सारे विश्व म्हणजे लहरीच आहेत.
प्रश्न: औषधे घ्यायला नकार देणे म्हणजे आत्महत्या आहे का?
श्री श्री: नाही! जर कोणी औषधे घ्यायला नकार देत असेल आणि त्यांना नैसर्गिकरित्या जे व्हायचे ते होऊ द्यायचे असेल तर त्याला आत्महत्या म्हणता येणार नाही. ते ठीक आहे. पण जर कोणी क्लेशामुळे स्वतःचा गळा घोटत असेल तर ती माझ्या मते आत्महत्या आहे. मी त्याला आत्महत्या म्हणेन.
जेंव्हा कोणी कोमात असेल आणि त्यांना जबरदस्तीने अन्न दिले जात असेल किंवा मशीनद्रारे जिवंत ठेवले असेल तर मी म्हणेन की त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्या जे व्हायचे ते होऊ देत, त्यांना जबरदस्तीने भरवू नका. हे माझे वैयातिक मत आहे, पण या बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जेंव्हा तुम्हाला माहित असेल की ते जगू शकणार नाहीत, किंवा ते त्यांचे रोजचे जीवन जगू शकणार नाहीत तेंव्हा त्यांना एखाद्या भाजीपाल्यासारखे वाचवण्यात अर्थ नाही. मी म्हणेन सगळ्या नळ्या काढा आणि निसर्गाला त्याचे काम करू द्या.