28 April 2012


28
2012............................... Germany
April


शांती ही देवाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी आहे

बॅड अँटागोस्त जर्मनी, 
२८ एप्रिल, २०१२
( प्रश्नांच्या टोपलीतील प्रश्न बघत बघत गुरुजी म्हणतात, )                                                        सुरवात करण्यासाठी एखादा चांगला प्रश्न शोधतोय. सगळे प्रश्न सारखेच आहेत. खरं म्हणजे जर बरोबर उत्तर ऐकले तर प्रत्येक प्रश्नाची एकच प्रतिक्रिया असते. जेव्हा बरोबर उत्तर मिळते तेव्हा तुम्ही काय म्हणता ? “ हो, मला पटतंय.” जर उत्तर बरोबर नसेल तर तुम्ही, “ हो, मला पटतंय.” असं म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणाल, “ नाही, हे उत्तर बरोबर नाही.” पण जेव्हाही तुम्हाला बरोबर उत्तर मिळते तेव्हा तुम्ही काय म्हणता ? तुम्ही म्हणता, “ होय.” तर, प्रत्येक बरोबर उत्तर तुम्हाला होकाराकडेच नेते. पण जर प्रत्येक प्रश्नातून आणखी प्रश्न निर्माण होत राहिले तर मग तो न संपणारा प्रवास होऊन जातो. एका दृष्टीने ते चांगले आहे कारण तो बुद्धीला व्यायाम आहे पण त्या पलिकडे काही नाही. फक्त एक करमणूक आहे. पण मग प्रश्न अजिबात नसावे की काय? नाही, ते गरजेचे आहेत. बुद्धीला चालना मिळणे आवश्यक असते. बुद्धीमत्ता ही खूप महत्वाची आहे. अतिशय प्राचीन अशा भगवद्‌गीतेतही श्रीकृष्ण सगळे ज्ञान देतो आणि शेवटी म्हणतो, “ तू विचार कर, विश्लेषण कर आणि आणि मग ठरव तुझ्यासाठी सर्वात उत्तम काय आहे ते.” आणि मग तो म्हणतो, “पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासाठी जे उत्तम आहे तेच मी सागेन आणि मी सांगेन तेच तू निवडशील.” गुरु शिष्यातील हा संवाद खूपच रंजक आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी तो वाचायला हवा. आईन्स्टाईन सह जगातील श्रेष्ठ वैज्ञानिकांनी, तो वाचला आहे. आणि ते म्हणाले की त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले कारण प्रश्न विचारू नका असे त्यांना नेहमी सांगितले गेले होते. जात आणि धर्म म्हणजे नेहमी असेच मानण्यात आले आहे की , काहीही प्रश्न विचारू नका, फक्त आंधळेपणाने जसे सांगितले तसे करत रहा. पण योग, वेदांत तत्वज्ञानात असे सांगितलेले नाही. त्यात बुद्धीला दाबून टाकत नाहीत. त्यात असे म्हटले आहे की,” तुमची बुद्धी वापरा.पूर्णपणे वापरा.पण एवढे लक्षात ठेवा की बुद्धी म्हणजे सर्वस्व नाही. सत्य त्याच्याही पलिकडे आहे, एक पायरी पुढे. म्हणून बुद्धीमध्ये अडकू नका पण त्याचं वेळी बुद्धिमत्ता चमकू द्या. बुद्धीचे शमन केल्याने भक्ती आणि प्रेम हे बुद्धीच्या पलिकडे जाते. 
प्रश्न : बऱ्याच जणांच्या मनात लहानपणीच, त्यांचा कल डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक वगैरे बनण्याकडे आहे हे स्पष्ट असते. आणि ते त्याला धरून असतात. दुर्दैवाने मला तसे काही वाटत नाही. मी काही आता लहान नाही आणि मला अजूनही नेमकी दिशा न मिळाल्यामुळे भीती वाटते. मी काय करू ? 

श्री श्री रविशंकर: काळजी करू नका. आयुष्यात सगळे ठरलेले असते. जर तुम्हाला काय करावे ते कळत नसेल तर ध्यान करा आणि तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते करा.
मी तुम्हाला सांगतो, सर्व व्यवसाय सारखेच असतात. कोणताही व्यवसाय नसलेले लोक आनंदी असतात. डॉक्टरांचेच  बघा. ते किती त्रासात असतात पूर्ण आयुष्यभर त्यांना रुग्णांच्या सानिध्यात रहावे लागते. दिवसाचे पंधरा तास त्यांना रुग्णांसोबत रहावे लागते आणि त्यांचा त्रास ऐकून घ्यावा लागतो. आणि जरी त्यांना उपाय सांगितला तरी ते परत तोच प्रश्न विचारत राहतात. जर तुम्ही कुणाला सांगितले की तुम्हाला काहीही आजार झालेला नाही तरी ते तुमच्यावर रागावतात. तुमची तब्येत बरी असली तरी बऱ्याच डॉक्टरांना, “नाही, तुम्ही आजारी आहात असे म्हणावे लागते.” मग ते खुश होतात. आणि मग तुम्ही म्हणता की, “हं, हा डॉक्टर बरोबर आहे. त्याला माझा त्रास कळला. आणि त्याने तो अगदी बरोबर सांगितला.” डॉक्टरांची अवस्था सोपी नाही. ते सुट्टी घेऊन कुठे तरी निघून गेले असे होऊ शकत नाही. मध्यरात्री सुद्धा त्याना बोलावणे येऊ शकते. बहुतेक वेळा त्यांना अंदाज करून औषध द्यावे लागते आणि मग रात्रभर ते बेचैन असतात. हे या व्यवसायातलं गुपित आहे. तुमचं डोकं दुखत असलं तर ते तुम्हाला अॅस्प्रीन देतील पण कोणत्याही त्रासासाठी काय औषध द्यावे हे त्याना नेहमीच माहीत असते असे नाही. काही वेळा त्यांना अंदाज बांधावा लागतो. इंजिनियर लोकांचे बघा. रात्रंदिवस मशीन बरोबर काम करून ते मशीन सारखेच बनतात, असं तेच म्हणतात, मी म्हणत नाहिये. इंजिनियर लोक स्वत:च असं म्हणतात की, “ओह, किती कंटाळवाणे आहे, रात्रं दिवस मशीन, मशीन आणि मशीन.” त्यांच्या स्वप्नातसुद्धा त्याना मशीन दिसतात. ते गाड्यांच्या कारखान्यात काम करत असले तर त्याना स्वप्नात गाड्या दिसतात. गाड्यांमध्ये माणसे नसतानासुद्धा चालणारऱ्या गाड्या. इथे गाड्यांच्या कारखान्यात काम करणारा एक जण म्हणाला, “मला रोज फिरत्या पट्यावरून पुढे जाणाऱ्या गाड्या किंवा ट्रक् दिसतात. त्यात माणसे नसतात ! “. वकील, त्यांना तर त्यांच्या अवस्थेबद्दल बद्दल विचारायची सोय नाही. ते वाट बघत असतात की कुठे काय गडबड होते म्हणजे मग त्यांचा चरितार्थ चालेल. जर सगळे काही सुरळीत चालले असेल तर वकिलांचा चरितार्थ चालणार नाही. दोन भावात जर भांडण झाले तर वकील आनंदाने हसू लागतात. “त्यांनी माझ्याकडे यावं म्हणजे मी पैसे कमवू शकेन.” सुदैवाने त्याना जास्त विचार करावा लागत नाही कारण जगात भरपूर भांडणे चालू आहेत आणि सगळ्यांना त्यांच्याकडेच जावे लागते. ते म्हणतात, “या, मी तुमची समस्या सोडवतो.” पण ती पटकन सुटत नाही. ते त्याला पुढे पुढे ढकलत रहातात. कोणताही वकील खटला पटकन सोडवत नाहीत. कां सोडवतील? जितका जास्त दिवस खटला चालू रहातो तेवढे त्यांच्यासाठी बरे असते. दर वेळी हजर रहाण्याबद्दल ते त्यांच्या अशिलाला बिल लावू शकतात. खटला असाच हातातून जाऊ देण्याइतके ते मूर्ख नसतात. तुम्ही कोणताही व्यवसाय बघा, त्यात त्रुटी असतातच.                                                                         धार्मिक लोक, त्याची समस्या तर जास्तच कठीण आहे. रामायणात एक छान गोष्ट आहे. तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे कां? एक भटका कुत्रा रस्त्यातून चालला होता आणि कुणीतरी त्याला दगड मारला आणि त्याचा पाठलाग केला. म्हणून मग तो कुत्रा न्यायालयात गेला. असे म्हणतात कि रामाच्या न्यायालयात सर्वांना न्याय मिळत असे, अगदी प्राण्यांना सुद्धा. कुत्रा म्हणाला की रस्ता सर्वांसाठी आहे. तो म्हणाला, “इथे कुठेही असे लिहिलेले नाही की या रस्त्यावर कुत्र्यांना परवानगी नाही. मी रस्त्यावर चालत होतो आणि या माणसाने मला मारले. तुम्ही त्याला शिक्षा करा.” मग श्रीरामाने त्या माणसाला विचारले की हे खरे आहे कां ? तो माणूस खोटे बोलू शकला नाही आणि कुत्र्याला मारल्याचे त्याने कबुल केले. त्याकाळी जो त्रासास बळी पडला असेल त्याला विचारले जायचे की दोषी व्यक्तीला काय शिक्षा द्यावी ? त्याप्रमाणे कुत्र्याला विचारले की त्याला दगडाने मारणाऱ्या माणसाला काय शिक्षा द्यावी ? तेव्हा तो म्हणाला, “ त्याला एखाद्या धार्मिक संस्थेचे मुख्यपद द्या. एखाद्या आश्रमाचा गुरु करा.” लोक म्हणाले ही तर अगदी विचित्र शिक्षा आहे. कुत्रा म्हणाला, “ विचारत काय बसलात ? मी सांगतो तसे करा. मी देखील माझ्या मागच्या जन्मात गुरु होतो आणि बघा काय झाले ? त्यावेळी मारायच्या आधी माझ्या मनात विचार आला की मी एक भटका कुत्रा असायला हवा होतो. गुरु होण्यापेक्षा ते जास्त बरे झाले असते. बघा, त्यामुळेच मी आता कुत्रा झालो आहे. मला किती त्रास होता. ह्याने सुद्धा आता आश्रमाचा मुख्य व्हायला हवे. मग त्याला कळेल की जीवनात त्रास म्हणजे काय, दु:ख म्हणजे काय आणि भोग म्हणजे काय ? अशी ही रामायणातली गमतीशीर गोष्ट आहे.’                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     
या जगातली प्रत्येक नोकरी, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक काम सोपं नाहिये. प्रत्येक व्यवसाय अवघड आहे. कोणचेही काम सोपे नाही. आणि एखद्या धार्मिक संस्थेचे मुख्य होणे तर अजूनच वाईट कारण तुम्हाला सर्वांचीच काळजी घ्यायची असते. जर तुम्ही एखाद्या माणसाकडे बघितले नाही तर तो तक्रार करतो की तुम्ही माझ्याकडे बघितले नाही. काल तुम्ही मला दु:खी केलेत. तुम्ही सर्वांना आनंदी करायला आला आहात पण त्यात तुम्ही कुणालातरी दु:खी केलेत. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघत असता तेव्हा ते दुसरीकडे बघत असतात आणि जेव्हा ते तुमच्याकडे बघत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघावे असे त्याना वाटत असते नाहीतर ते दु:खी होतात. काय करावं? आणि तंत्रज्ञानाने तर ते आणखीनच बिघडवल आहे. तुम्हाला माहीत आहे मला किती इमेल आलेत ? मागच्या दोन आठवड्यात जवळ जवळ १,०१,०००. प्रत्येक आठवड्यात जवळ जवळ १०,००० इमेल येतात. आणि मला ते बघावे लागतात. कधी ८,००० तर कधी २,००० पण ते सगळे साठत जातात. त्यामुळे कोणताही व्यवसाय असला तरी काळजी करू नका. सगळे व्यवसाय सारखेच असतात. तुम्हाला जगण्यासाठी योग्य अशी नोकरी बघा. तुम्हाला अति हावरटपणा करायची गरज नाही आणि तुम्हाला अभाव असल्याचेही जाणवायला नको. आपल्या मनात, आपल्या अंत:करणात सुबत्ता असायला हवी. पैसा ही अशी गोष्ट आहे जी कधीच पुरेशी नसते. अब्जाधीश लोकही विचार करत असतात की त्यांचे पैसे कसे वाढतील, दुपटीने की तिपटीने. ही स्पर्धा कधीच संपत नाही.                  
मी ह्या वर्षी दावोस मध्ये गेलो होतो आणि तिथे सगळे अब्जाधीश लोक होते. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर बघीतले तर अजिबात तृप्ती नाही, आनंद नाही किंवा समाधान नाही. पावित्र्य नाही, उन्नतीचा भाव नाही. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ? छोट्या झोपडीतही तुम्हाला हसू दिसेल पण एका महालात ते तुम्हाला दिसणार नाही. महालात कदाचित तुम्हाला शांत मनही दिसणार नाही. 

प्रश्न : आमची वाईट कर्म कशी पुसून टाकावी? मी स्वत:बद्दल खुपच विचार करतो. मी स्वत:वर प्रेम कसे करू ?
श्री श्री रविशंकर: भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तुमचे कर्म पुसून टाकू शकत नाहीत. तुमच्यासाठी ते मी करेन. तुम्ही तुमच्या वाईट कर्माची चिंता करू नका, तुम्ही फक्त तुमचे काम करत रहा. भूतकाळातील तुमची वाईट कर्म पसून टाकण्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही ज्ञानात राहिलात, सत्संगात असलात, ध्यान करत असलात, सुदर्शन क्रिया करत असलात की ती आपोआप पुसली जातील. ह्या सर्व गोष्टी तुम्ही कां करतां ? तर ह्या सर्वामुळे तुमची वाईट कर्म पुसली जातील. वाईट कर्म म्हणजे काय ? तुमच्या मनावर, आत्म्यावर झालेले वाईट संस्कार. तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही म्हणू शकता, ” गुरुजी माझ्या सगळ्या काळज्या मी तुम्हाला देतो. कृपया त्यांची काळजी घ्या. आणि मग ते सगळे निघून जाईल ? 

प्रश्न : तुमच्यात इतकी करुणा कशी काय आहे ? मी परत परत  त्याच त्याच चुका करून तुमचा अपमान केला आहे तरी तुम्ही माझ्यावर रागवत कसे नाही. मला माझीच घृणा वाटू लागली आहे.
श्री श्री रवीशंकर : काळजी करू नका. जे होऊन गेले त्याच्याबद्दल विचार करत बसू नका. तुम्हाला माहीत आहे , लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेव्हा अनेक वेळा पडते. दहा वेळा पडला तरीपण तो उभे रहायचे सोडत नाही. उभे रहायला येईपर्यंत तो प्रयत्न करत रहातो.
तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, तुमचं खूप चांगलं चाललं आहे. चालू राहू द्या. तुम्हाला निदान चुकल्याच दु:ख तरी आहे. ते तुमचा वारंवार चुका करण्यापासून बचाव करेल. 
तुम्ही चुका कां करता माहीत आहे कां ? कारण तुम्हाला वाटते की त्यापासून तुम्हाला काहीतरी आनंद मिळतोय. नशा करणे, मद्यपान करणे, सिगारेट ओढणे हे वाईट आणि घातक असते तरी तुम्ही ते करता, कां ? कारण तुम्हाला वाटते की त्यापासून तुम्हाला आनंद मिळतोय. ते फक्त तुम्हाला आनंदाचे आमिष दाखवते.
आणखी एक गोष्ट आहे. एक सज्जन बाजारात गेला आणि त्याने एका संताने मंत्रून दिलेला एक शंख घेतला. तो एक खास शंख होता. एक गुढ शंख. तुम्ही त्याला काहीही मागा आणि तो तुम्हाला ते देई. त्याच्या एका मित्राने तो शंख बघितला आणि त्यालाही तसाच शंख हवा होता. बरेचदा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्याची गरज असते म्हणून नाही तर केवळ दुसऱ्या कोणाकडेतरी आहे म्हणून. तुमच्या मित्राकडे आहे म्हणून तुम्हाला ही हवे. तुमच्या मित्राने औडी किंवा बेन्झ घेतली म्हणून तुम्हालाही औडी किंवा बेन्झ हवी. काय फरक पडतो ? तुम्हाला फक्त जाण्यासाठी गाडी हवी आहे. पण तुमच्या मित्राने मोठी गाडी घेतली म्हणून तुम्हालाही जास्त चांगली गाडी हवी. तर तोही शंख घेण्यासाठी बाजारात गेला. दुकानदाराने त्याला शंख दाखवला आणि म्हणाला तुम्ही काहीही मागितले तर त्याच्या दुप्पट तुम्हाला तो देईल.
समजा तुम्हाला एक गाडी हवी आहे तर शंख म्हणेल एकच कशाला तुम्ही दोन घ्या. ही गोष्ट कुणी ऐकली आहे कां ? नाही ? तुम्ही माझी पुस्तके वाचत नाही , माझ्या टेप्स ऐकत नाही ? ! तर त्याने तो शंख घेतला आणि तो घरी गेला. त्याने शंखाला एक किलो सोने मागितले. शंख म्हणाला, “ एक कशाला ? दोन किलो घे.” 
तर तो म्हणाला, “बरं दोन किलो दे.”                                                                  शंख म्हणाला, “ दोन कशाला ? चार किलो घे.”  तर तो म्हणाला, “बरं चार किलो दे.”   
शंख म्हणाला, “ चार कशाला ? आठ किलो घे.” तर तो म्हणाला, “बरं आठ किलो दे.मला आणखी नको आहे.”  
शंख म्हणाला, “ आठ कशाला ? सोळा किलो घे.”                                                         शंख फक्त दुप्पट करत राहिला. दिले काहीच नाही. तो म्हणाला, “ मला काहीतरी दे.”                   
शंख म्हणाला,” काहीतरी कशाला बरेच काही घे.”  त्या माणसाने कान टवकारले आणि म्हणाला, “ वाह” .
तुमच्या सवयींमुळे तुमचे नेमके असेच हेते. सवयी तुम्हाला फक्त आनंदाचे आमिष दाखवतात पण आनंद कधीच देत नाहीत. वाईट सवयी घालवण्यासाठी या तीन गोष्टींपैकी एक गोष्ट लागते. प्रेम, भीती किंवा हाव.
कशाबद्दल तरी खूप जास्त प्रेम किंवा प्रेमाच्या माणसाला दिलेले वचन की तुम्ही पुन्हा तसे करणार नाही यामुळे तुम्ही वाईट सवयींमधून बाहेर येऊ शकता. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील की जर तुम्ही दारू प्यालात तर तुमचे पित्ताशय खराब होईल आणि तुम्ही मराल, तर तुम्ही दारूला स्पर्शही करणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी शब्द दिला की जर तुम्ही चाळीस दिवस प्यायला नाहीत तर तर ते तुम्हाला दशलक्ष डॉलर्स देतील तर तुम्ही थोडी जास्तच काळजी घेऊन पंचेचाळीस दिवस पिणार नाही. तर हाव, भीती आणि प्रेम या तीन गोष्टी तुम्हाला वाईट सवयींपासून दूर ठेवू शकतील. करुणामय रहाणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. इतक्या वर्षात जवळ जवळ ५६ वर्षात मी कुणालाही वाईट शब्द बोललो नाहिये. ह्यात काही विशेष कमावले असे नाही. हे शरीर असेच बनले आहे. मी असाच बनलो आहे. मी कधीच वाईट शब्द बोलू शकत नाही, अगदी मी बेचैन असतानाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की “तू मुर्ख आहेस”, त्या पलिकडे काही नाही. तेही मी फक्त सात ते आठ वेळा बोललो असेन. मी माझ्या हाताच्या बोटावर मोजू शकतो. शपथ घेणं, शाप देणं किंवा दुसर्याला दोष देणं हे मला शक्य नाही. मी तसं कधीच केलं नाहिये. माझ्या बाजूने कधीच कुणाला वाईट शब्दाने दुखावले नाहिये. तरीही लोक दुखावले गेले असतील तर ती त्यांची समस्या आहे. मी काय करू शकतो ?

प्रश्न : माझ्या अगदी प्रेमाची असलेली, जिच्या बरोबर मी गेली चार वर्ष आहे, तिने मला सांगितले की तिचे दुसऱ्या कोणावरतरी प्रेम आहे. तो तिला पाच महिन्यांपूर्वी भटला. मी काय करावे ? मी तिच्यावर खरेच प्रेम करतो आणि मला तिला घालवायची नाहिये. तिचा विचार पक्का होईपर्यंत तिने मला थांबायला सांगितले आहे. मी थांबावे की सोडून द्यावे ?
श्री श्री रविशंकर : एका दृष्टीने मला तुझी समस्या कळते आहे.पण दुसऱ्या बाजूने मला याचा काहीच अनुभव नाही. त्यामुळे मी तुला सल्ला देऊ शकत नाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की काही वेळ बाजूला हो आणि शांत रहा. तुझ्या आयुष्याबद्दल विचार कर की पूर्वी ते कसे होते. जेव्हा ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात नव्हती तेव्हाही तू आनंदी होतास ? जर त्या व्यक्तीने तुझ्यातली ठिणगी चेतवली असेल, तुला प्रेम अनुभवायला मिळाले असेल तर तिचे फक्त आभार मान. भविष्यात तिच्या शिवायही आयुष्य चालू राहिल. मी तुला सांगतो, तू फक्त पुढेच जाशील. जर ही व्यक्ती निघून गेली तर तुला दुसरी जास्त चांगली व्यक्ती भेटेल. हे नक्की. तू केंद्र बिंदू आहेस हे ध्यानात ठेव. तुझा आत्मा त्या दुसऱ्या व्यक्तीत ठेऊ नकोस तो तू तुझ्याकडेच ठेव.आणि जर ती व्यक्ती परत आली तर चांगलं आहे नाहीतर पुढे जात रहा. ह्या ज्ञानामुळे तुझे प्रेम तिरस्कारात न बदलण्यासाठी तुला मदत होईल. सहसा लोक कुणावरतरी प्रेम करतात आणि मग त्याचे असे थक्क करणाऱ्या कडवटपणात आणि तिरस्कारात रुपांतर होते. तर असे होऊ देऊ नका. जर तुमचे कुणावर प्रेम असेल तर सोडून द्या. जर ते तुमचे असेल तर ते तुमच्याकडे परत येईल. जर ते तुमच्याकडे परत आले नाही तर ते कधीच तुमचे नव्हते, हे जाणून घ्या आणि पुढे चला.

प्रश्न: मी अशा विचारात मोठा झालो आहे की देव जिवंत असू शकत नाही. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो आहे आणि सर्व सुंदर ज्ञान ऐकले आहे. आणि मला असे वाटते आहे की मी जिवंत देवाला भेटतो आहे. पण देव जिवंत असू शकत नाही. माझ्या मनाला काही उमजत नाहिये. मला हे माहीत आहे की तुम्ही ज्ञान आणि प्रेमाच्या स्वरुपात आहात. पण तुम्ही व्यक्ती आहात म्हणावे तर मी तुम्हाला पूर्णपणे नीट मारू शकत नाही. मी दिव्यत्वाला बघू शकतोय, स्पर्श करू शकतोय, दु:ख सुद्धा होतयं पण उमजत नाहिये. कृपया सांगा.       
श्री श्री रविशंकर : देव म्हणजे प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि तो आपल्या प्रत्येकात आहे. जे देव नाही असे काहीच नाही कारण संपूर्ण सृष्टी प्रेमाने बनली आहे. तर देव म्हणजे एक व्यक्ती नाहिये. ते एक क्षेत्र आहे. तो सर्वव्यापी आहे, तो तुमच्यातही आहे. जर तो तिथे नेहमीच असेल तो इथे आत्ताही आहे.
तुमचं बरोबर आहे, काही लोकांना वाटते देव कुठेतरी स्वर्गात आहे. त्याने सर्व काही निर्माण केले आणि तो आतां निवर्तला, गेला. जसे तुम्ही कधी कधी गेलेल्या लोकांनां धन्यवाद देण्याचा विधी करता तसेच तुम्ही देवालाही कुणीतरी गेलेली व्यक्ती मानता आणि त्यांचे आभार मानता.
लोकांना कळत नाही, देव हे जीतजागतं अस्तित्व आहे, आत्ता, इथे जिवंत आहे. केवळ मौनाच्या सखोलतेतच तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. जेव्हा मन शांत असते आणि तुम्ही म्हणता की, “ मला कहीही नको आहे.” जे काही आहे ते फक्त तुम्ही आहात. या भावनेने जेव्हा तुम्ही बसता, ती उर्जा, ती शांतता, ते प्रेम त्यावेळी तो इथे आणि आत्ता असतोच आणि तुमहाला त्याचा अनुभव येतोच.
म्हणूनच लोक गौतम बुद्धांकडे गेले आणि त्यांना देवाबद्दल विचारले. त्यांनी कधीच काही सांगितले नाही, ते शांतच राहिले.
गौतम बुद्ध कधीच देवाबद्दल बोलाले नाहीत. त्यांच्या सत्संगामध्ये ही अट असायची की कुणीही त्यानां देवाबद्दल विचारायचे नाही. तिथे अकरा प्रश्नांना बंदी होती. एक म्हणजे देव. तुम्ही जरी विचारले तरी ते उत्तर द्यायचे नाहीत. कारण लोकांच्या मनात संकल्पना असतात आणि त्यांना असं वाटतं की त्याना देवाबद्दल खूप काही माहीत आहे आणि मग ते वाद घालू लागतात.
सर्वात उत्तम म्हणजे ते तुम्ही देवावरच सोडून द्या, त्याला थोडं मोकळं सोडायला हवे आहे. त्याला जरा विश्रांती हवी आहे. भारतात देवाला नागावर आनंदाने विश्रांती घेत पहुडलेला दाखवला आहे आणि एकीकडे निर्मिती चालूच आहे.
त्यामुळे मी म्हणतो की एक चांगला माणूस बना आणि वेळोवेळी स्तब्ध व्हा आणि अंतर्मनातल्या शांततेचा अनुभव घ्या. तुम्हाला गुपितातली गुपितं कळतील, तुमच्यासाठी सगळे दरवाजे सहजपणे उघडतील. आणि मग तुम्हाला जाणवेल की लोक सगळीकडे कशाबद्दल बोलत होते. सर्व ग्रंथांमध्ये हेच लिहिले आहे. बायबल, कुराण किंवा वेद सगळीकडे तेच सांगितले आहे. हे खरे आहे, ते इथेच आहे, आत्ता, माझ्यात हे जाणवणे. पुन्हा सांगतो, असे समजू नका की एक दिवस काहीतरी सिद्धी प्राप्त होईल. ते तर आत्ताच झाले आहे ! शांत रहा. शांती ही देवाकडे जाणारी पहिली पायरी आहे. दुसरी आहे खुशी आणि आनंद. तिसरी आहे प्रेम. देवापर्यंत पोहोचण्याच्या या तीन पायऱ्या आहेत.