ध्यान तुम्हाला भाग्यवान बनवते


10
2012............................... Banglore Ashram
June

१० जुन २०१२ – बंगलोर आश्रम

आपला देश ऋषी आणि कृषीचा आहे. कुठल्याही पुजेआधी आपण ‘बीजवपन’ (मातीच्या भांड्यात धान्य पेरणे) आणि ‘अंकूरपना’ (बिजावर पाणी आणि दुध शिंपडणे) करतो. आयुष्य आणि पूजा वेगळ्या नाहीत. आपले आयुष्य पूजाच आहे. आपण जेंव्हा चालतो तीच प्रदक्षिणा होय. आयुष्याकडे बघायचा हा दृष्टीकोन असायला हवा. जीवनात शुद्धता असायला हवी.
जेंव्हा जीवनात शुद्धता असेल तेंव्हा मन कणखर होईल, बुद्धी तीक्ष्ण होईल आणि आयुष्यात उत्साह येईल. त्यामुळे जमिनीत बीज पेरायला सुद्धा ते योग्य वेळ पाहत असत. बिजरोपण अत्यंत भक्तीभावाने करत.
आपले पूर्वज जेवणापूर्वी हात जोडून प्रार्थना करत ‘अन्नदाता सुखीभव’, याचा अर्थ मला ज्याने अन्न दिले आहे तो सुखी राहो. आपण सगळ्यांनी हे केले पाहिजे. तुम्ही सगळे रोज हे कराल?
आपल्याला अन्न उपलब्ध करून द्यायला जबाबदार असलेली पहिली व्यक्ती म्हणजे शेतकरी. त्यानंतर व्यापारी आणि तिसरी घरातील गृहिणी. शेतकरी अन्न उगवतो, व्यापारी ते आपल्यापर्यंत पोहोचवायला मदत करतात आणि घरातील गृहिणी, आई ते शिजवून आपल्याला वाढतात. आपण प्रार्थना करतो की ते तीनही जण आनंदी राहो. त्यातील एकजण जरी दु:खी असेल तरी आपल्या आयुष्यावर परिणाम होईल.
शेतकरी पीक घेतात, पण जर व्यापारी आणि दलालांनी जर त्याची योग्य किंमत दिली नाही किंवा नीट वितरण केले नाही तर ती त्यांची मोठी चूक होईल. शेतकऱ्यांनी रसायने वापरून जमीन आणि पाणी विषारी करू नये. आपण जनुकीय परिवर्तीत पीके घेऊ नये. आपण जैविक शेती करावी. बरेच लोक नैसर्गिक शेती करत आहेत (http://www.artofliving.org/chemical-free-farming)
शेतकरी बियाणे खरेदी करायला पैसे खर्च करतात आणि मग कीटकनाशके वापरून त्यांच्यात विष कालवतात. आपण ते थांबवून जुन्या पद्धतीने शेती केल्यास शेतकरी आनंदी होतील. व्यापारी जर हव्यास सोडून नीट व्यापार केला तर ते आनंदी होतील. आणि जर घरातील गृहिणी आनंदी राहून जेवण बनवेल तर आपल्याला अन्न चांगले पचेल. त्यांनी जर अश्रू ढाळून अन्न शिजवले तर आपल्याला सुद्धा ते पचवायला अश्रू ढाळावे लागतील. आपल्याला अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी आणि वेगवेगळे आजार होतील. त्यामुळे हे तीनही लोक आनंदी राहण्यासाठी आपण ‘अन्नदाता सुखीभव’ हा मंत्र रोज जेवण्याअगोदर म्हणला पाहिजे.
बुद्धिवान माणसाचे काय लक्षण आहे? बुद्धिवान माणूस वाईटातील वाईट माणसातून काहीतरी चांगले काढून घेतो. प्रत्येक माणसात चांगले गुण दडलेले आहेत. बुद्धिवान माणसे गुन्हेगारातून सुद्धा चांगले गुण काढून घेतात. ते सांगतात ‘तू भूतकाळात केलेले सगळे विसरून जा. या पुढे तुझ्यातील चांगुलपणा पहा, तुझ्यात चांगुलपणा आहे’. ते त्यांना वर खेचतात.
मूर्खाचे लक्षण म्हणजे ते लोकांना खाली खेचतात. ते चांगल्या लोकांत सुद्धा वाईट गुण शोधतात, सगळ्यांच्यात दोष काढतात. चांगले मित्र आणि वाईट मित्र कसे ठरवाल? चांगल्या मित्रांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगितल्यानंतर ते तुम्हाला त्या अतिशय छोट्या आहेत हा विश्वास देतात. जर त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला आनंद आणि उत्साह वाटला तर ते चांगले मित्र आहेत. या उलट ज्यांच्याशी बोलल्यानंतर तुमच्या समस्या मोठ्या झाल्यासारख्या वाटतील ते चांगले मित्र नाहीत.
आपण लोकांशी बोलून निरउत्साही करतो किंवा त्यांचे मनोधर्य खच्ची करतो का हे तपासले पाहिजे. आपण नकळत तसे करत असतो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आसाम मध्ये १००० लोकांनी आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स केला आणि समर्पण केले. ते इथे (बंगलोर आश्रमामध्ये) प्रशिक्षणासाठी येणार आहेत. गृह मंत्रालय त्यांना इथे पाठवत आहे.

प्रश्न: आपण वाईट सवयीतून बाहेर कसे पडावे? हे ठसे परत परत येत राहतात.
श्री श्री: वाईट सवयीतून बाहेर पडण्यासाठी जास्त प्राणायाम करा. आपल्या संगतीवर सुद्धा ते अवलंबून आहे. तुमच्याकडे जर खूप रिकामा वेळ असेल तर वाईट सवयीबद्दल मनात येईल. तुम्ही जर समाजासाठी काही करत असाल तर या वाईट सवयी आपोआप नाहीशा होतील.

प्रश्न: गुरु निवडण्यापूर्वी ‘गुरु दीक्षा’ घेणे गरजेचे आहे का?
श्री श्री: तुम्हाला गुरु शोधायची गरज नाही. तुम्ही आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी शिकता आणि जिथून शिकता त्यात गुरुतत्व असते. आई ही आपली पहिली गुरु आहे. जसे तुम्ही मोठे होता शिक्षक तुम्हाला शिकवतात. या प्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात गुरुचे अस्तित्व असते, गुरुतत्व कायम असते. जेंव्हा आपल्या मनाला असे वाटेल की आयुष्यात प्रगती करण्यासारखे काही आहे तेंव्हा गुरुतत्त्व तिथे आहे.   

प्रश्न: ‘राहू काळात’ कोणतीही पूजा करू नये असे म्हणतात. पण रविवारचा आश्रमातील सत्संग नेहेमी राहू काळात का असतो?
श्री श्री: राहू काळात पूजा करू नये असे कोठेही म्हणले नाही. खरेतर राहू काळात पूजा केलेली चांगली, पण या काळात लग्न, वास्तूशांती करू नयेत.
या काळात कुठलेही व्यावहारिक काम करू नये असे म्हणले आहे; याचा अर्थ देवाचे नाव घेऊ नये किंवा सत्संग करू नये असा नाही. राहू काळात सत्संग करणे चांगले आहे.
ग्रहणाच्या वेळी किंवा राहू काळात सत्संग करणे चांगले आहे, किंबहूना कोणत्याही वेळी संत्संग करणे चांगले आहे. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आणि देवाचे नाव घेण्यासाठी कोणतीही शुभ वेळ बघायची गरज नाही, दिवसाचे चोवीसही तास यासाठी चांगले आहेत.

प्रश्न: चांगल्या लोकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे की नागरिकांचे?
श्री श्री: हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. तुम्ही पोलिसांचे कौतुक करायला हवे. मी झारखंड मध्ये होतो तेंव्हा पोलीस अधिकारी मला भेटायला आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते ते म्हणाले ‘गुरुजी, मी मागच्या वर्षी माझी २०० माणसे गमावली आहेत. मी जेंव्हा पोलीस भारती करतो तेंव्हा त्यांच्या कुटुंबाला तोंड दाखवू शकत नाही कारण उद्या नक्षलवादी समस्येमुळे माझ्या माणसांचे काय होणार आहे ते मला माहित नाही. पोलीसही चांगली माणसे आहेत. ते त्यांचे आयुष्य आणि वेळ यांचा त्याग करत आहेत. ते सण साजरे करू शकत नाहीत. रात्रंदिवस कामावर असतात. त्यांचे वैयक्तिक आयुष्य कठीण आहे, ते त्यांचे कर्तव्य करत आहेत पण हे बिना आभाराचे काम आहे. लोक आणि राजकारणी पोलिसांची खरडपट्टी काढत असतात. ते मधल्यामधे भरडले जातात, पण मी सांगतो ते कायदा आणि सुव्यवस्था राखतात याकडे बघा. सामान्यतः कोणीही ‘पोलीस’ असे म्हणाले की त्याचा अर्थ ते वाईट आहेत असा काढतात. आपण असा विचार करता कामा नये. आपण ते करत असलेल्या बिनआभाराच्या कामाबद्दल कृतज्ञ असायला हवे.
मी गेली १५ वर्ष पोलिसांच्या समस्येबद्दल ऐकत आहे. त्यांना चांगले काम करावेच लागते आणि वर बोलणीही खावी लागतात. आपण पोलिसांना आपल्यापासून वेगळे समजू शकत नाही, ते आपल्यातीलच आहेत. आयुष्यात इतक्या खस्ता खाऊन सुद्धा ते आपले रक्षण करतात. आपण त्यांना दुषणे देण्यापेक्षा त्यांचे आभार मानले पाहिजेत.

प्रश्न: मातेचे चरण आणि गुरुचरण यात काय अंतर आहे?
श्री श्री: मातेमध्ये काही अंश स्वार्थ असू शकतो, पण गुरु मध्ये नाही.

प्रश्न: आपल्या देशात १२ ज्योतीर्लीगे आहेत. कृपया त्यांचे महत्व सांगाल का?
श्री श्री: आपल्या देशाला अखंडित करण्यासाठी ती वेगवेगळया ठिकाणी स्थापित आहेत. त्या निमित्याने लोक या वेगवेगळया ठिकाणी प्रवास करतील आणि हा देश एक आहे हे जाणवेल.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणता की ध्यानाने आपले भाग्य उजळते हे कसे?
श्री श्री: ध्यानाने तुमच्यातील कंपने सकारात्मक होतात.  तुमच्यातील कंपने जितकी सकारात्मक तितके तुमचे भाग्य चांगले, हे नैसर्गिक आहे.

प्रश्न: माझ्या आयुष्यात खूप गोंधळ आहे.
श्री श्री: थोडा वेळ द्या, गोंधळ आपोआप निघून जाईल. जेंव्हा आपले मन गोंधळलेले असेल तेंव्हा आपले निर्णय चुकतात, आपल्याला वाटते की आपण दुसरे काहीतरी करायला पाहिजे होते.

प्रश्न: आपण अहंकारावर कशी मात करावी?
श्री श्री: नैसर्गिक रहा. सगळ्यांशी मित्रत्वाने रहा. आपण जितके नैसर्गिक राहू अहंभाव आपोआप गळून पडेल. अहंकाराने आपल्या आणि दुसर्यांच्यात एक कृत्रिम भिंत उभी राहते आणि आपण विचार करतो की आपण जे म्हणू तेच बरोबर आहे. याने आपल्याला आणि दुसऱ्यांना त्रास होतो. आपण जर नैसर्गिक राहून असा विचार केला की हे सगळे आपलेच आहेत, आपल्या विचारात एक मोकळेपणा असेल तर आपल्या मनावर कोणतेही दडपण येणार नाही. मन मनाला मोकळे वाटेल.
म्हणूनच आपण लहान मुलाप्रमाणे नैसर्गिक असायला हवे. त्याने ‘कार्य सिद्धी’ होते. आपण ज्या ज्या इच्छा करू त्या पूर्ण होतील.  

प्रश्न: मी बायोटेक्नॉलॉजी मध्ये एम. टेक. केले आहे. मला जैविक शेती करायची आहे. मी जैविक शेती हा व्यवसाय म्हणून कसा सुरु करू?
श्री श्री: आजकाल यात खूप संधी आहेत. जर जैविक शेतीच्या मालाचे वितरण नीट झाले तर खूप मदत होईल. म्हणूनच आम्ही ‘श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ अग्रीकल्चर सायन्स’ हे संस्था सुरु केली आहे, त्यांच्याशी बोला. आपण या साठी नक्कीच काही तरी करू.