विश्वास हे आयुष्याच्या वाहनाचे इंधन आहे


24
2012............................... Banglore Ashram
May

२४ मे २०१२ – बंगलोर आश्रम

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी भौतिक गोष्टींच्या इच्छा, हाव यापासून बऱ्यापैकी मुक्त झालो आहे, पण जेंव्हा तुमच्याकडे येतो तेंव्हा अध्यात्मीक तहान वाढतच जाते. यावर काय उपाय आहे?
श्री श्री: ठीक आहे. जेंव्हा कोणी व्यावहारिक जगापासून दूर जाऊन ‘स्व’ कडे जातो तेंव्हा असेच होते. आयुष्यात स्वारस्य असावे, ते निरस नसावे. हा मार्ग निरस नाही. आयुष्यात काही रस असावे, नाही का? अन्यथा ते “शुष्क वैराग्य” होईल. आपल्या जवळ जेंव्हा कोणी आपल्या जवळचा असतो, प्रेमाचा माणूस असतो तेंव्हा आयुष्य मजेदार होते. आयुष्यात जर कोणी असा नसेल ज्याच्यावर आपण खूप प्रेम करू तर मग आयुष्यात मजा नाही, त्यात काही रस नाही. त्यामुळे प्रेमाचा अनुभव होणार नाही. त्यामुळेच हे स्वारस्य, रस गरजेचा आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, जे दैवत्व माझ्यात आहे, ते सगळ्यांत आहे, आणि सगळीकडे आहे.

प्रश्न: गुरुजी, आपण ‘साक्षी भावात’ कसे राहावे?
श्री श्री: तुम्ही साक्षी भावात असण्यासाठी काहीच करायची गरज नाही; तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईल. तुम्ही जितके शांत व्हाल, विश्राम कराल तितका जास्त साक्षात्कार होईल, तुम्हाला त्यासाठी काहीही करायची गरज नाही. आजकाल काय होते, सगळे साधक विचारत असतात ‘मी काय करू, मी काय करू’ आणि गुरु त्यांना सांगत असतात ‘हे करा, ते करा, ते करा’ त्याने दोघेही निराश होतात. मी सांगतो, काहीही करायची गरज नाही, आराम करा! विश्राम ही कर्तृत्व, शांतता आणि परिपूर्णत्व यांची जननी आहे. सगळ्याचे मूळ विश्राम हे आहे. विश्रामात ‘राम’ आहे, तो मिळवण्यासाठी फार प्रयत्न करायची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर खावे आणि झोपावे!
मित् आहार, मित् व्यवहार, मित् भाषी, हित भाषी, हे सगळे अत्यावश्यक आहे.      

प्रश्न: गुरुजी, आयुष्य सोपे आहे की अवघड? बुद्धिझम मध्ये असे म्हणतात ‘आयुष्य अवघड आहे हे पहिले सत्य आहे’ तुम्ही म्हणता की आयुष्य मौज आहे. काय सत्य आहे? मला असे सांगू नका की दोन्ही सत्य आहे.
श्री श्री: का? मी तेच म्हणीन. दोन्ही बरोबर आहे. जेंव्हा एखाद्या दु:खी माणसाला तुम्ही सांगाल की आयुष्य आनंद आहे, त्याला ते समजणार नाही. त्याला आयुष्य हे फक्त दुःख आहे असेच वाटेल. परंतु जसजसा तो ज्ञानीं होईल, त्याला जाणीव होईल ‘दु:ख कुठे आहे?’ जसा तो ज्ञान मार्गावर पुढे वाटचाल करेल तसा तसे दु:ख नाहीसे होईल. तुमच्या आयुष्यातून दु:ख नाहीसे करणे हाच योगा आणि ध्यानाचा फायदा आहे. तुम्ही विनाकारण काळजी करत होतात, आयुष्य हे आनंद आहे हे तुमच्या लक्षात येते.
जागे व्हा आणि भूतकाळात वळून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही विनाकारण काळजी करत होतात. तुमच्या पैकी किती जणांना तसे वाटते?
परीक्षेचे निकाल काळ जाहीर झाले. काही दिवसांपूर्वी तुम्ही काळजीत होतात, मी पास होईन का? आता तुम्हाला असे नाही वाटत तुम्ही विनाकारण काळजी करून वेळ वाया घालवलात? सगळे ठीक झाले. उदाहरणदाखल आश्रम शाळेच्या विद्यार्थी घ्या; सगळे विशेष श्रेणीत पास झाले. काळजी केल्याने वेळ वाया जातो, आणि मन विचलित होते. म्हणूनच असे म्हणले जाते कोणताही उपक्रम झाल्यानंतर, असे लक्षात येते की काळजी करणे व्यर्थ होते. म्हणूनच आनंद हे वास्तव आहे, आनंद हा कायम आपल्या बरोबरच होता, तो आपला स्वभाव आहे. चिंता ह्या एखाद्या ढगा प्रमाणे येतात आणि जातात. जे कधीही बदलत नाही तेच सत्य होय, ज्याप्रमाणे आकाश हे सत्य आहे आणि ढग येतात आणि जातात.  

प्रश्न: मला आर्थिक जुळवाजुळव करताना खूप कष्ट पडत आहेत. गेली १५ वर्ष मी संघर्ष करत आहे. ज्योतिष्यांनी सांगितले आहे की काही पूजा केल्याने माझे भाग्य बदलेल. कृपया सल्ला द्याल का?
श्री श्री: ओह, तुमचे खर्च तुमच्या कमाई पेक्षा जास्त आहेत. तुमची भरभराट होवो असा संकल्प करा, तेव्हडे पुरेसे आहे. पूजा करणे चांगले आहे, काही पूजा चांगल्या आहेत, पण खूप पूजा करणे जरूर नाही. तुम्ही ध्यान करा, सत्संगला जा. रुद्राभिषेक आणि हवन करा. जेंव्हा तुम्ही हवन करता, तेंव्हा वातावरण आणि मन शुद्ध होते. पण कधी कधी ते खूप धार्मिक विधी आणि पूजा करायला सांगतात त्याची फार गरज नाही.

प्रश्न: माझे एका परजातीय व्यक्तीवर प्रेम आहे; माझे पालक सनातनी विचारांचे आहेत. त्यांना हे समजूच शकत नाही. मी माझ्या परीने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने काही फरक पडला नाही. मी काय करू? माझा ‘धर्म’ काय आहे? मी माझ्या साठी जगावे की त्यांच्यासाठी.

श्री श्री: थोडे कौशल्याने घ्या. परिणामांचे मुल्यांकन करा. ते जर दुराग्रही असतील तर त्यांना या दैन्यातून नेण्यात अर्थ नाही. तुम्ही सुद्धा आनंदी राहणार नाही. तुम्ही दोघेही दु:खी राहाल. तुम्ही तुमचे कौशल्य लावून त्यांना समजावा, काही मध्यम मार्ग काढा, त्यानेहि काही झाले नाही तर परिणामांचा विचार करून निर्णय घ्या. 

प्रश्न: पण धर्मा काय सांगतो? एक मुलगी म्हणून मी त्यांना दुखवू शकत नाही, पण मला माझे आयुष्य सुद्धा आहे.
श्री श्री: तुमचे बरोबर आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही तसे करा. पण आता तुम्ही जर तुमच्या पालकांची एकुलती एक मुलगी असाल तर तुम्हाला त्यांची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला जरी भावंडे असतील तरीही अडचण आहे. तुमचे कौशल्य पणाला लावून त्यांना समजवा, नाहीतर दुसऱ्यांच्या आनंदासाठी कधीकधी त्याग करावा लागतो.

प्रश्न: व्यावसायिक आयुष्यात गर्विष्ट लोकांना कसे हाताळावे?
श्री श्री: त्यांच्या गर्वाला प्रोत्साहन द्या. हे जर गर्विष्ठ असतील तर त्यांना २ प्रकारे हाताळले जाऊ शकते. एक म्हणजे त्यांचा ‘अहं’ प्रोत्साहित करा. त्यांना सांगा ‘तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही इतके कार्यक्षम कसे असता? मला तुमच्या कडून काही शिकायला पाहिजे’ त्यामुळे ते तुमच्या बाबतीत आनंदी होतील. समजले?
त्यांची थोडी प्रशंसा केल्याने तुमचे काही बिघडत नाही. मुर्ख लोकांची थोडी प्रशंसा करून काम करून घेतले पाहिजे. तुम्ही प्रशंसा करा किंवा करू नका चांगले लोक नेहेमीच काम करतात. गर्विष्ट आणि मुर्खा लोक प्रशंसेच्या मागे लागतात, त्यामुळे तुम्ही थोडी प्रशंसा करून कामे करून घ्या.
त्यांच्या गर्वामुळे त्यांना भोगावे लागेल, त्याची चिंता तुम्ही कशाला करता? त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगले आहे कारण त्यामुळे ते भानावर येतील. संकटाचे आपले स्थान आहे. एखाद्याचा ‘अहं’ मोडून त्याला ज्ञान मार्गावर आणण्याचा काळ आता गेला. हल्ली एखाद्याचा ‘अहं’ मोडणे खूप कठीण आहे. ‘अहं’ नेहेमीच उफाळून वर येतो. त्यामुळे तुम्ही त्यांची प्रशंसा करणे चांगले, ते सुद्धा आपोआप त्यातून शिकतील.

प्रश्न: मुलांना वाढवताना चांगली मूल्ये कशी शिकवावीत?
श्री श्री: स्वतः ती मूल्ये जगून !!

प्रश्न: मला आश्रमात राहायचे आहे. मला वाटते की मी माझ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत आणि आता मला इथे राहून साधना, सत्संग, सेवा करायची आहे. माझे नातेवाईक आणि सासरचे लोक माझ्या निर्णयाला विरोध करत आहेत.
श्री श्री: तुम्हाला माहित आहे, संपूर्ण जग माझा आश्रम आहे. तुम्ही कुठेही रहा तो आश्रमच आहे. शिवाय मी एका ठिकाणी राहत नाही, मी प्रवास करत असतो. मी इथे २ महिन्यांनंतर आलो आहे, आणि मी इथे २ आठवडे आहे. मी इथे येत जात असतो. तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि सासरच्यांना प्रेमाने जिंका. तुम्ही साधना आणि सेवा करून तुमच्या घराला आश्रम करा. इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा या. तुम्ही सगळे सोडून आश्रमात जातो असे त्यांना सांगितले तर ते काळजीत पडतील. त्यांना वाटेल ‘ही आपली सून घर सोडून जात आहे’, असे करू नका.     

प्रश्न: मी जेंव्हा जेंव्हा आश्रमात येतो तेंव्हा घरच्यांना सांगत नाही. मी कॉलेजमध्ये सुद्धा खोटी कारणे सांगुन इथे येतो. मी हे कौशल्याने हाताळत आहे; पण कधी कधी मला खोटे बोलायचा कंटाळा येतो.

श्री श्री: नाही, तुम्ही खोटे सांगता काम नये, तुम्हाला इथे सारखे सारखे येण्याची गरज नाही. तुम्ही कुठेही असाल तरी रोजचे ध्यान करा. तुम्हाला मी तसाही रोज दिसतो. आत्ता सुद्धा हा सत्संग इंटरनेट वर दाखवला जात आहे आणि जगातील लाखो लोक मला पाहत आहेत. वर्षातून एक दोन वेळेला येणे ठीक आहे पण तुम्ही जर रोज यायला लागलात तर घरातून विरोध स्वाभाविक आहे. मी त्यांच्या जागी असतो तर मी सुद्धा याला विरोध केला असता.
असे करू नका. तुमच्या अभ्यासावर, व्यवसायावर लक्ष द्या, आणि एक आदर्श व्यक्ती बना. नुसते इथे आश्रमात येऊन माझा चेहेरा बघण्यापेक्षा शिकवण अनुसरा.

प्रश्न: माझी आई सांगते, तू जर खोटे बोलून, आम्हाला दुखावून आर्ट ऑफ लिविंगच्या कार्येक्रमाना गेलात तर तुम्हाला त्याचे अपेक्षित फळ, पुण्य मिळणार नाही. हे बरोबर आहे का?

श्री श्री: होय, एका अर्थाने बरोबर आहे.

प्रश्न: गुरुजी, पण ती समजून घेत नाही. ती क्रिया सुद्धा करत नाही. मी बळजबरी केली तरी ती क्रिया करत नाही. कृपया माझ्या आई, वडिलांची काळजी घ्या.

श्री श्री: आता तुम्ही तुमचे काम मला दिले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेणे अपेक्षित नाही का? ठीक आहे, मी माझे काम करत आहे, हेच तर होते आहे. लोक मला सांगतात ‘गुरुजी, हे करा, ते करा’ मला सगळीकडून आज्ञा मिळत असतात!!

प्रश्न: मी जेंव्हा दुसऱ्या लोकांच्या चुकांचा विचार करतो, मी उन्मत्त होतो; आणि जेंव्हा माझ्या चुका पाहतो तेंव्हा माझा अहं दुखावतो. मी काय करू?

श्री श्री: तुमच्या कमजोरी कडे पहा आणि जाणून घ्या की कोणीतरी त्या दूर करायला आहे. विश्वास असू द्या की कोणीतरी त्या दूर करायला आहे. फक्त या विश्वासामुळे तुम्ही पुढे जाल. ‘या माझ्यातील उणीवा मी तुम्हाला समर्पित करत आहे’ या विश्वासाने तुमच्या उणीवा समर्पित करा. तुम्हाला समर्पित करणे अवघड जात असेल तर हे जाणा की कोणीतरी यातून बाहेर पडायला मदत करेल. जसे शाळेतील मुलाला माहित असते की त्याला मोजणी येत नाही पण त्याला विश्वास असतो की शिक्षक त्याला शिकवतील. तो जेंव्हा पुस्तकाचे पहिले पण उघडतो आणि त्याला काय लिहीले आहे ते उमगत नाही, तरीही त्याला विश्वास असतो की त्याला ते समजेल कारण त्यासाठी शिक्षक आहेत. 
विश्वास असल्याशिवाय आयुष्याचा गाडा पुढे जात नाही. विश्वास हे आयुष्याच्या गाडीचे इंधन आहे. विश्वास हे इंधन सुद्धा महाग होत चालले आहे !! तुम्ही हे इंधन महाग होऊन दिले नाहीत तर आयुष्याची गाडी पुढे जाईल आणि इच्छित स्थळी पोहोचेल.

प्रश्न: जर सर्व काही देवाने निर्माण केले असेल तर देवाला कोणी निर्माण केले?
श्री श्री: तुम्हाला कोणी सांगितले की सर्व देवाने निर्माण केले? तुम्ही या कोणी निर्माण केले, कोणी विनाश केला यात का अडकून बसता. जे आहे ते आहे. देवाला संबोधण्यासाठी “स्वयंभू” हा शब्द वापरतात, त्याचा अर्थ ज्याने स्वतःलाच निर्माण केले. तो कायमच अस्तित्वात होता. आपण म्हणतो सूर्य उगवला. आपण पाहतो सूर्य उगवतो, मावळतो; पण सूर्य कधीच उगवत नाही किंवा मावळत नाही. वास्तविक सूर्य तिथेच आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही याचा अर्थ तो नाही असा नाही. त्यामुळे जे अस्तित्वात आहे आणि कधीहि जन्माला येत नाही त्याला देव म्हणतात.

प्रश्न: माझी बायको आणि आई यांच्यात कुरबुरी चालू असतात, त्यांचे आपापल्यापरीने बरोबर असते. मला कळत नाही काय करावे?
श्री श्री: अशा वेळी शांत आणि तटस्थ राहणे योग्य. कोणाच्याही बाजूने बोलू नका. तुमच्या आईला सांगा ‘सुना या अश्याच असणार’ तसेच तुमच्या पत्नीला सांगा ‘माझी आई तुझ्या आई सारखीच आहे, ते तसेच असतात, तिचे फारसे मनावर घेऊ नकोस’ ज्ञानामुळेच अशा समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकाल.    

प्रश्न: मंदिरातील कलशाचे काय महत्व आहे?
श्री श्री: कलश वास्तू आणि वास्तुशास्त्र या दृष्टीने महत्वाचा आहे. तो विद्युत लहरी आणि कंपने नियंत्रित करतो. दुसरे म्हणजे तो दैवी शक्तीचे प्रतिक आहे. तो वैश्विक उर्जा पृथ्वीवर आणण्याचे माध्यम आहे.  

प्रश्न: मी गेली २५ वर्ष नोकरी करत आहे, पण मला अजूनही स्वाभिमान आणि अहंभाव यातील फरक समजत नाही.
श्री श्री: तुमचा स्वाभिमान कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण अहंभाव इतरांवर अवलंबून आहे. जिथे अहंभाव असेल तिथे तुम्हाला वेदना होतील, आणि त्याने दु:ख होईल. पण स्वाभिमान तुम्हाला शांतता मिळवून देईल, समजले?
तुमचा अहंभाव तुम्हाला दुखावेल, पण स्वाभिमान दुखवू शकत नाही. समाजात असे बरेच मूढ लोक आहेत जे दुसऱ्याला शिवीगाळ करत असतात. तुम्ही कितीही चांगले करा, ते कायमच नकारात्मक बोलत असतात. आपण त्यामुळे विचलित होऊ नये. 

प्रश्न: मी तणावामुळे माझे काम करू शकत नाही
श्री श्री: तुम्ही हसत हसत तुमचे काम करत रहा, लोकांची पर्वा करू नका. कोणीतरी काहीतरी म्हणाले म्हणून तुमचे काम सोडू नका. तुम्ही राजा प्रमाणे चाला, जर कोणी तुम्हाला चुकीचे काम करायला सांगितले तर नम्रपणे त्यांना सांगा की तुम्ही असे काम करणार नाही. ‘काही चुकीचे काम करून मला तुरुंगात जायचे नाही’ असे सांगून तुमचे चांगले काम करत रहा. ज्या कामाने तुम्हाला भविष्यात त्रास होणार आहे असे काम न करण्याचा निश्चय करा. जेंव्हा आपण असे करू, स्वतःचा आदर करू त्यालाच स्वाभिमान असे म्हणतात.

प्रश्न: जगामध्ये करोडो हिंदू लोक आहेत, पण हिंदू देव देवतांचा अपमान केला जातो. देव आपल्यावर रागावला आहे का?
श्री श्री: नाही, देव रागावला नाही, काही लोक असे करत आहेत, पण तुम्ही त्याची काळजी करू नका.
हिंदू धर्माचा कोणीही अपमान करू शकत नाही. जे कोणी हे करत आहेत तो त्यांचा नादानपणा आहे. कोणी माध्यमातून किंवा चित्रपटातून हिंदू धर्माबद्दल वाईट दाखवत असतील तरी आपण दुखीः होण्याचे कारण नाही. हिंदू धर्म हजारो वर्षेपासून अस्तित्वात आहे, आणि तसाच चालू राहील. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल कोणी काही म्हणाले तरी तो त्यांचा नादान आणि मुर्खपणा सगजून सोडून द्यावे. तुम्ही रागाने आणि सूड भावनेने बस जाळून, दगडफेक करून किंवा कोणाला इजा पोहोचवून समाजात हिंदू धर्माचा आदर वाढणार नाही. आपल्या आचरणातून, मृदुलता, सेवा आणि इतरांना शिक्षित करून तो वाढेल.