आसक्ती हे चेतनेच्या परिपक्वतेचे लक्षण आहे


22
2012............................... Banglore, Karnataka
May

बंगलोर आश्रम
प्रश्न : गुरुजी, योगसार उपनिषदमध्ये आपण म्हटले आहे की, दिव्यत्व हे व्यक्तिनिरपेक्ष आहे. गुरु हा सापेक्ष आणि दिव्य दोन्ही आहे. आम्हाला याविषयी अधिक सांगाल का? देव हा व्यक्तिनिरपेक्ष कसा?
श्री श्री रविशंकर : होय, तो दोन्ही आहे. जसे तुम्हाला आकार आहे तरी तुम्ही निराकार देखील आहात. तुमच्या शरीराला आकार आहे, पण तुमच्या मनाला आकार आहे का?... नाही! तशी ही दिसून येणारी सृष्टी ही दैवाची प्रचीती आहे आणि हे दिसून येत नाही, पण ज्याची जाणीव होते असे हे वातावरण निराकार आहे.

प्रश्न : गुरुजी, आपण म्हणालात, उपनिषदात सांगितले आहे की, जेव्हा आत्मा स्वतःला प्रकट करतो तेव्हा  ज्ञानाचा साक्षात्कार होतो. मग यामध्ये आसक्तीचा संबंध येतो कुठे? माझ्यात असलेले काहीतरी स्वतःबद्दलचे संपूर्ण ज्ञान करून घेण्याची इच्छा बाळगते तरी तेच स्वतःला प्रकट करीत नाही; हे असे कसे?
श्री श्री रविशंकर : बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा फळ पिकते तेव्हा त्याचा रंगदेखील बदलतो. सफरचंद जेव्हा पिकते तेव्हा त्याचा रंग बदलतो. पपई पिकल्यावर पिवळी होते. तसेच आसक्ती हे चेतनेच्या परिपक्वतेचे लक्षण आहे.
प्रश्न : गुरुजी, आत्मा जर एकच आहे तर मग प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे कसे होते आणि तो एका शरीरातून दुसर्‍या शरीरात कसा नेला जातो?
श्री श्री रविशंकर : आत्म्याचे दोन स्तर असतात - सर्वात्मा आणि जीवात्मा. जशी फुग्यातदेखील हवा असते आणि बाहेरदेखील; पण फुग्यातली हवा बंदिस्त असते. तसा जीव असतो. जीवाचा प्रभाव दिसून येतो; पण फुग्यातली हवा आणि बाहेरची हवा ही सारखीच असते.
प्रश्न : गुरुजी, प्रत्येक गोष्टीचे काही अनिष्ट परिणाम असतात. मग प्रबोधनाचे दुष्परिणाम काय असतात?
श्री श्री रविशंकर : प्रबोधनाचा कोणताही अनिष्ट परिणाम नसतो. त्याचा थेट परिणाम होत असतो.
प्रश्न : गुरुजी, आपण अलीकडेच एका सत्संगमध्ये अंधारमय ऊर्जेचा (dark energy) उल्लेख केला होता. कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. गुगलवरील माहिती वाचून ते समजणे खूप कठीण आहे.
श्री श्री रविशंकर : अंधारमय उर्जेविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. हे ब्रह्मांड अंधारमय उर्जेने व्यापले आहे. सूर्य गोलाकार आहे असे ते म्हणतात, त्याचे कारण सूर्याभोवती अंधारमय ऊर्जा आहे; जी सूर्याला गोलाकार ठेवते. म्हणजे सर्व ग्रह, तारे यांचे अस्तित्व अंधारमय उर्जेतच आहे.
जसे आकाश अंधारमय असते आणि त्या आकाशातले तारे हे प्रकाशाचे बिंदू असतात, त्यामुळे आपल्याला वाटते यातील फक्त तारे हेच वास्तव आहेत. पण शास्त्रज्ञ म्हणतात तसे नाही. ताऱ्यांमधील पोकळी एखाद्या दाट महासागराप्रमाणे ऊर्जेने पूर्णपणे भरलेली आहे. ती आहे अंधारमय उर्जा. आपल्या प्राचीन काळातील लोकांना हे माहित होते. ते याला शिव-तत्व म्हणत. सर्वम् शिवामयम् जगत्. संपूर्ण ब्रह्मांड शिवतत्वाने धरून ठेवले आहे.
प्रश्न : अष्टवक्र गीतेमध्ये आपण महात्मा गांधीना एवढा हिंसक मृत्यू का आला याबद्दल सांगितले आहे. जीजसला क्रूसवर मृत्यु का आला याबद्दल आम्हाला सांगाल का?
श्री श्री रविशंकर : आपण याबद्दल, का झाले, काय आणि केव्हा झाले असे खोलात जावे असे मला वाटत नाही. ब्रह्मांडात घडणाऱ्या सर्व गोष्टींना फक्त एकच कारण आहे परम् कारण कारणाय - शिवतत्व! ईश्वरी इच्छा! आपण हे सर्व त्यावर सोडून देऊ.

प्रश्न : पाप किंवा कर्म यास कोण जबाबदार आहे?  आत्मा की शरीर? आणि जर आत्मा यास जबाबदार असेल तर त्याचे भोग शरीराला का भोगावे लागतात?
श्री श्री रविशंकर : हे बघा, अशा पारिभाषिकतेमध्ये आणि गोंधळात पडू नका. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर स्वतः संशोधन करा. आपण कोण आहोत? आपणास कर्म आहे की नाही? जर कर्म असेल तर ते कोठे आहे, या सर्वाचा तुम्ही स्वत: विचार करा.
याचे उत्तर जर मी तुम्हाला दिले तर त्याने तुमचे समाधान होणार नाही; कारण ते तुमच्या अनुभवांच्या पातळीवरचे नसेल. म्हणून मी सांगितलेले तुम्ही आता ऐकाल आणि काही दिवसांनी तुम्ही काही नवीन प्रश्न घेऊन याल. आणि मग पुन्हा पुन्हा हे चक्र चालूच राहील.
सर्वात उत्तम म्हणजे, शांत व्हा, गहन ध्यानधारणा करा आणि यातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप अनुभवता येतील.
प्रश्न : गुरुजी, पुष्कळ प्रयत्न करूनदेखील मी अयशस्वी का होतो? अशा वेळेस आपण काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : जर तुमचे ध्येय तुम्हाला खरोखरच साध्य करायचे असेल तर त्या ध्येयाला धरून रहा. पण जर भरपूर प्रयत्न करूनही ते निरर्थक जात आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल, तर दुसरे काही सोपे असे काम करा.
भारताचे एक पंतप्रधान होते, फार थोड्या महिन्यांसाठीच ते पंतप्रधान होते. या सद्गृहस्थांनी मला एकदा त्यांच्या दिल्लीबाहेरच्या फार्म हाउसवर बोलावले. मी ते मान्य केले आणि मी तिकडे गेलो. मी तिथे असताना मला ते म्हणाले, गुरुजी, गेल्या ४० वर्षांत मी सर्व काही केले. ही खुर्ची, हे पंतप्रधानपद मिळवण्यासाठी मी चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे राजकारण केले. आता मी पंतप्रधान आहे. आणि  आता मला वाटते, या पदासाठी मी संपूर्ण आयुष्यभर झटलो पण हे निरर्थक आहे. पूर्वी मला आनंदाने झोप लागत असे, पण आता आजूबाजूला ५० रक्षक असतात. मी माझ्या स्वत:च्या घराबाहेर बसूदेखील शकत नाही. मी संपूर्ण आयुष्यभर व्यर्थ संघर्ष केला.
मी म्हणालो, हे समजण्यासाठी तुम्हाला फारच वर्षे लागली. पण ठीक आहे, किमान तुम्हाला ते समजले तरी. बऱ्याच लोकांना हे समजतदेखील नाही.
उत्तर आफ्रिकेमधील हुकुमाशहांचे काय चालले आहे? केवळ सत्ता टिकवण्यासाठी ते हजारो लोकांना मारत आहेत. हा  मूर्खपणा आहे. या सद्गृहस्थांना हे निरर्थक आहे याची किमान जाणीव तरी होती. मी त्यांना म्हटले, त्यादृष्टीने तुम्ही भाग्यवानच आहात.
म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट खरोखरच साध्य करायची असेल तर त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करा, पण जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्याच गोष्टीवर शक्ती खर्च करणे जास्त योग्य आहे असे वाटले तर त्या मार्गाने जा.
एकदा एक तरुण माझ्याकडे आला. तो म्हणाला की, तो सी.ए.च्या परीक्षेत सात वेळा नापास झाला आहे आणि आता त्याने पुन्हा त्या परीक्षेला बसावे असे त्याच्या पालकांची इच्छा आहे.
मी म्हणालो, तुला असं कशासाठी करायचे आहे? तू सात वेळा नापास झाला आहेस, आता तुला पास होण्याची खात्री वाटते का?
तो म्हणाला, नाही, पास होण्याची मला अजिबात खात्री नाही.
जर तुला पास होण्याची खात्रीच नाही तर वेळ वाया का घालवत आहेस? काहीतरी व्यवसाय कर. एखादी नोकरी कर. शहाणपणाच्या अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत.

प्रश्न : गुरुजी, मी जेव्हा इतरांबरोबर माझी स्वत:ची तुलना करतो तेव्हा मला त्यांचा द्वेष आणि मत्सर वाटतो. मला माझी ही सवय सोडायची आहे. त्यासाठी मी काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुला ही सवय सोडायची इच्छा आहे म्हणजे अर्धा मार्ग तर पार झालाच आहे. प्रयत्न चालूच ठेव. साधना आणि सत्संग यासाठी जास्त वेळ दे म्हणजे तू यातून आपोआप बाहेर पडशील.

प्रश्न : गुरुजी, देवाच्या नावाचा जप करण्याला नक्की महत्व काय आहे? महाराष्ट्रात असे म्हटले जाते की विठ्ठलाच्या नावाचा जप जर मनापासून केला तर योगसाधना केल्याने होणारे फायदे मिळतात.
श्री श्री रविशंकर : आपण हे दररोज सकाळी सत्संगमध्ये करतच असतो. आपण दिव्यत्वाचा जप करतो.
होय, जप करत राहिल्यामुळे तुम्ही अजाप अवस्थेत (मनाची अशी अवस्था जिथे मंत्राचा जप आपोआप होत राहतो) जाता. तुम्ही शांत होता. तुम्ही जप करण्याच्याही पलीकडे जाता. समाधी अवस्थेच्यादेखील पलीकडे जाता. याला भाव समाधी म्हणतात. भाव समाधी ही अशी गोष्ट आहे ज्याचा अभ्यास केला पाहिजे; पण ज्ञानाखेरीज भक्ती पूर्ण होत नाही. ज्ञान आणि भक्ती एकत्रच असले पाहिजेत.
प्रश्न : गुरुजी, अंडे शाकाहारी की मांसाहारी?
श्री श्री रविशंकर : सत्संगमध्ये बसून अंड्याविषयी चर्चा, मला हे योग्य वाटत नाही. अंड्याचे जाऊ दे. आपण ब्रह्मांडाविषयी बोलू. इथे आपण चर्चा करतो शरीराची आणि ब्रह्मांडाची, अंड्याची नव्हे. अंड्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता.
कालच मी एका डॉक्टरकडून ऐकले, त्याने बरेच संशोधन केले आहे की, प्रत्येकाने दररोज १० मिनिटे सूर्याकडे टक लावून पाहिले पाहिजे. असं म्हणतात की, प्रत्येकाच्या डोळ्यात काही विशिष्ट पेशी असतात ज्या आपल्या शरीरात सूर्याच्या उर्जेपासून रक्त तयार करतात. काहीसे प्रकाशसंश्लेषणासारखे. वनस्पती सूर्याच्या किरणांपासून हरितद्रव्य तयार करतात. सूर्यकिरणांतील तोच घटक आपल्या डोळ्यातील रक्तपेशी शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर रक्तात करतात. ते एक उत्तम सादरीकरण होते. म्हणून रक्त शुद्ध करण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी सूर्याकडे टक लावून पाहिले पाहिजे. आपल्या वाडवडिलांनीदेखील हेच तर सांगितले आहे.
संध्यावंदन म्हणजे काय आहे? हातात पाणी घेऊन, उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे रहावे. हातातील पाणी पूर्णपणे ओघळून जाईपर्यंत सूर्याकडे टक लावून पहात रहावे. असे ३ वेळा करावे. याला साधारणत: १० मिनिटे लागतात. यानंतर सूर्याकडे पाहातच गायत्री मंत्राचा जप करावा. संध्याकाळीदेखील असेच करावे.
जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेव्हा आपल्या शरीरात उर्जेचा संचार होतो.
असे म्हटले जाते की, आपण आहारात कच्चे धान्य, कच्च्या पालेभाज्या, फळे आणि रस असे अन्न घेतले पाहिजे. आपल्या आहारतील ८०% अन्न हे कच्चे तर २०% अन्न हे शिजवलेले असले पाहिजे. ब्रेन ट्युमर, कॅन्सर हेदेखील फक्त तीन आठवडे कच्चे अन्न घेणे आणि सूर्याकडे टक लावून पाहणे याने बरा झाल्याची उदाहरणे दिली जातात. अर्थातच सुदर्शनक्रियेनेदेखील ते बरे होतात.
तसेच आपण आपल्या शरीरावर अनेक क्रीम्स् लावतो, ती क्रीम्स् आपण जर खाल्ली तर आपण मरून जाऊ. कारण त्यामध्ये हानिकारक रसायने वापरलेली असतात. आपण जेव्हा ही क्रीम्स् आपल्या शरीरावर चोळतो, तेव्हा आपले शरीर क्रीम शोषून घेते आणि ते थेट आपल्या रक्तात मिसळले जाते. म्हणूनच आपण आपल्या शरीरावर असे कुठलेही पदार्थ लावू नयेत जे आपण खाऊ शकत नाही. म्हणूनच आयुर्वेदिक क्रीम्स् शिवाय इतर क्रीम्स वापरणे चांगले नाही. उंदीर मारण्यासाठीच्या विषात जे घटक पदार्थ वापरले जातात, तेदेखील काही क्रीम्समध्ये वापरले जातात. म्हणून असे एखादे क्रीम जर आपण खाल्ले तर आपला मृत्यू होऊ शकतो; तसेच हे क्रीम आपण शरीरावर लावतो तेव्हा आपला हळूहळू मृत्यू होतो.
पूर्वीच्या काळी त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी चिखल, दुधावरची साय, डाळीचे पीठ आणि हळद याचा वापर केला जात असे. तसाच आपणही तो आता केला पाहिजे.
मी याकडे स्वत: लक्ष देईन. आपण असे डाळीच्या पीठापासून अजून काही पदार्थ तयार केले पाहिजेत जे खातापण येतील आणि अंगालाही लावता येतील. मी आपल्या डॉक्टरांना सांगून असे क्रीम तयार करुन घेईन ज्याच्यात कोणताही विषारी पदार्थ नसेल.
प्रश्न : विवेक जागृत झाल्याने माणूस संवेदनशील बनत नाही का? आणि तसे असेल तर अनेक विद्वान लोक अनिष्ट मार्गाने कसे जातात?
श्री श्री रविशंकर : या जगात सर्व प्रकारचे लोक असतात. काही लोक चांगले असतात, काही सामान्य असतात, तर काही लोक ढिम्म असतात. आणि आपणाला या सर्वांबरोबर जमवून घ्यावे लागते. ढिम्म लोक तुम्हाला मिळणारी संधी जास्त बळकट करतात. सामान्य लोक तुमच्यातील कौशल्याला वाव मिळवून देतात तर चांगले लोक तुम्हाला आधार देतात. म्हणून तुम्हाला या तीनही प्रकारच्या लोकांशी जुळवून घेतले पाहिजे.

प्रश्न : गुरुजी, मला मुक्तीबद्दल फार काही माहीत नाही, मग मला मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा कशी होणार?
श्री श्री रविशंकर : जेव्हा तुम्ही बंधनात आहात असे तुम्हाला वाटते तेव्हाच मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा होते. जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची बंधने नसतात तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळवण्याची तीव्र इच्छा होणार नाही.
ज्याला आनंदी राहण्याची इच्छा नसते त्याला मुक्ती मिळते, आणि ज्याला मुक्ती मिळवण्याची इच्छादेखील नसते त्याला प्रेम मिळते. जे प्रेम करतात ते मुक्ती मिळवण्याची काळजी करत नाहीत. प्रेम करणारा असाच विचार करतो की कसली मुक्ती? मला त्याची काही गरज नाही. गोपी म्हणत, आम्हाला काही मुक्ती नको; आम्हाला कसले ज्ञान नको; आम्हाला फक्त प्रेमात राहू दे, आम्ही आनंदी आहोत.
प्रश्न : गुरुजी, धर्म आणि देव यांचा संबंध काय?
श्री श्री रविशंकर : मला एक सांगा, देवाचा संबंध कशाशी नाही? देवाचा संबंध धर्माशी पण तसाच अधर्माशीदेखील आहे. अधर्म नष्ट करून धर्मची उन्नत्ती करणे ही देवाची जबाबदारी आहे. म्हणून देवाचा संबंध सगळ्याशी आहे.
तशाच प्रकारे, पूजा-विधीमध्ये म्हटले आहे, धर्माय नमः अधर्माय नमः. आपण दोहोसही नमः म्हणतो. या जगात धर्म आणि अधर्म दोन्ही आहे आणि देवाचा संबंध या दोन्हीशी आहे अधर्माचा नायनाट करून धर्म प्रस्थापित करण्यासाठी.
प्रश्न : गुरुजी, शिवतत्त्व म्हणजे काय?
श्री श्री रविशंकर : तुम्ही जेव्हा म्हणता की, हे नाही, हे नाही, हे नाही, आणि सर्व काही काढून टाकता, तेव्हा जे राहते ते म्हणजे शिवतत्त्व
प्रश्न : गुरुजी, मी ऑनलाईन (इंटरनेटवरून केला जाणारा) व्यवसायात खूप पैसे गुंतवले आणि ते सर्वच्या सर्व गमावले. तेव्हापासून माझे सत्संगमधील स्वारस्य कमीच झाले आहे. मी काय करावे?
श्री श्री रविशंकर : हे पहा, एक ना एक दिवस प्रत्येक गोष्ट ही जाणारच आहे. बरोबर? तुला पण जायचे आहे आणि मलापण जायचे आहे. सामान्यतः आपण प्रथम जातो आणि नंतर आपला व्यवसाय. इथे तुझा व्यवसाय प्रथम गेला आणि त्यानंतर तू जाणार. म्हणून जे गेले ते विसरून जा आणि पुढे चालत रहा.
जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तू काही तुझ्या व्यवसायासह आला नव्हतास. जेव्हा तू लहान बाळ होतास तेव्हा तुझी कोणीतरी काळजी घेतली, बरोबर? कोणीतरी तुला अन्न भरवले, तुझा हात धरून तुला चालवले, तुला झोपवलेसुध्दा. तशाच पद्धतीने कोणी ना कोणीतरी तुझी काळजी घेईलच. जीवनचक्र चालूच राहते.
होय, तुला वाईट वाटणारच. तू तुझ्या आयुष्यभराची कमाई कोठेतरी लावलीस आणि तू अपयशी झालास. तू व्यथित होणे स्वाभाविकच आहे; पण आता तू तुझ्या सर्व व्यथा सोडून देण्यासाठी अगदी योग्य ठिकाणी आला आहेस.
प्रश्न : गुरुजी, लोभीपणाचा अंत कोठे होतो?
श्री श्री रविशंकर : दफनभूमी, तिथे तुम्ही लोभी असू शकत नाही.
हे फार दुर्दैवी आहे की लोभीपणाने आपल्या समाजास, खरे तर सर्व जगालाच ग्रासले आहे. भ्रष्टाचार फक्त भारतातच आहे असे समजू नका. मी जिथे जिथे गेलो तिथे हेच आहे. बल्गेरियामध्ये भ्रष्टाचार आहे, रशियामध्ये भ्रष्टाचार आहे, युक्रेनमध्ये भ्रष्टाचार आहे. प्रत्येक देश भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. ग्रीसमध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. तो देश भ्रष्टाचारामुळे बुडाला आहे. खूप देशांत भ्रष्टाचार ही समस्या बनली.
प्रश्न : गुरुजी, अनाहत नाद म्हणजे काय? तो निर्माण कसा करायचा? आणि त्याचे फायदे काय?
श्री श्री रविशंकर : अनाहत नादचा खरा अर्थ म्हणजे, जो दोन वस्तूंपासून निर्माण करता येत नाही तर जो आपोआप निर्माण होतो. गंभीर ध्यानधारणा करा, फक्त ध्यानस्थ असताना तुम्ही तो ऐकू शकता. प्रत्येकासच तो ऐकू येईल असेही नाही. कोणी अनाहत नाद ऐकू शकेल, कोणी प्रकाश अनुभवेल, कोणी अस्तित्व अनुभवू शकेल अनुभूती येण्याचे असे अनेक प्रकार आहेत.
प्रश्न : गुरुजी, हिंदू पुराणात म्हटले आहे की, पृथ्वी एका नागाच्या फण्याच्या आधारावर आहे. आणि जेव्हा तो नाग चिडतो तेव्हा संपूर्ण पृथ्वी हादरते. यामागे काय रहस्य आहे?
श्री श्री रविशंकर : सांसारिक शक्ती दोन प्रकारच्या असतात. एक असते अभिकेंद्री बल (Centripetal force) आणि दुसरी अपकेंद्री बल (Centrifugal force). या शक्तींची हालचाल ही सरळ रेषेत नसून ती सर्पाप्रमाणे असते. ही वस्तुस्थिती आपल्या पूर्वजांना माहीत होती. पृथ्वी नागाच्या फण्याच्या आधारावर नाही, पण नाग म्हणजे अभिकेंद्री आणि अपकेंद्री शक्ती, ही वस्तुस्थिती अशाप्रकारे समजावली आहे.
उदाहरणार्थ, भगवान शंकर गळ्याभोवती नाग गुंडाळून बसले आहेत यातून काय सूचित केले आहे, तर ध्यानस्थ अवस्था. जिथे डोळे मिटलेले असल्यामुळे ही व्यक्ती झोपली आहे असे वाटते; पण ते झोपलेले नाहीत, ते जागृत आहेत, हे समजावण्यासाठी भगवान शंकरांच्या मानेभोवती नाग दर्शविण्यात आला आहे. अन्यथा भगवान शंकर आपल्या मानेभोवती नाग कशाला गुंडाळून घेतील? ते संपूर्ण जगाचे स्वामी आहेत, त्यांना धारण करण्यासाठी अन्य काही मिळाले नसते का? जगाच्या स्वामीला कोणत्याही प्रकारचे कंठहार परिधान करता आले असते, त्याने गळ्यात नागच का गुंडाळला आहे? नाही, आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितले आहे त्यामागे अतिशय गहन रहस्ये दडलेली आहेत.
तशाचप्रकारे, शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी. नाग हे अभिकेंद्री बलाचे प्रतिक आहे. साप कधीही सरळ रेषेत चालत नाही. साप जेव्हा पुढे पुढे सरपटत जातो तेव्हा तो वक्र आकार बनवत जातो याला अभिकेंद्री बल म्हणतात. अभिकेंद्री बल म्हणजे जे सरळ रेषेत जात नाही. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते तशीच सूर्याभोवती फिरते. म्हणजे तिथे २ प्रकारच्या शक्ती आहेत - अभिकेंद्री बल आणि अपकेंद्री बल. हेच आपल्या पूर्वजांनी नागाची उपमा देऊन सांगितले आहे.
आणि हा नाग कशावर उभा आहे? तो उभा आहे कासवावर. कासव हे स्थैर्याचे प्रतिक आहे. खरोखर फार मजेशीर आहे हे सगळे.
असेही म्हटले जाते की, जर गुरु (the planet Jupiter) हा ग्रह नसता, तर पृथ्वी टिकून राहू शकली नसती. गुरु हा ग्रह काय करतो, अवकाशातून येणारे सर्व उल्कापाषाण गुरु हा ग्रह स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीचे रक्षण करतो. अवकाशातून उल्कापाषाण आणि इतर सूक्ष्म खगोलीय वस्तूंचा पृथ्वीवर वर्षाव चालूच असतो. गुरु हा ग्रह ते सर्व स्वतःकडे खेचून घेतो आणि पृथ्वीला वाचवतो.
नासाने याचे फार सुंदर स्पष्टीकरण दिले आहे.
गुरु हा संपूर्ण विश्वाचा पालक आहे असे आपण म्हणतो. म्हणून या ग्रहालादेखील गुरु असे नाव दिले आहे; कारण तो पृथ्वीचे रक्षण करतो.