कर्माची फळे फार विचित्र असतात


  4
2012............................... Banglore, Karnataka
June

४ जून २०१२
तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आहे कि तुम्ही कोणाचे काहीही वाकडे केले नसतानाही लोक तुमचे शत्रू बनतात? (खूप हात वर जातात) इतके सारे ! आणि आता मला सांगा, तुम्ही काही खास उपकार न करताही लोक तुमचे मित्र बनले आहेत असा किती जणांचा अनुभव आहे? (खूप हात वर जातात) आता हे बघा! तुम्ही कोणाला दुखावले नाही, तरी लोक तुमचे शत्रू बनतात आणि तुम्ही कोणाचे काही चांगले न करताही ते तुमचे चांगले मित्र बनतात. कर्माची तऱ्हाच निराळी आहे.
म्हणूनच असे म्हणतात कि कर्माची फळाची कोणीच कल्पना करू शकत नाही अशी असतात.’ होने वाला कर्म और करने वाला कर्म, इनमे बहोत फरक है.’
आपण काहीही केले तरी घडणाऱ्या गोष्टी घडतच राहतात. म्हणूनच म्हणतात कि कर्माची तऱ्हाच निराळी आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तुमचे मित्र आणि शत्रू एकीकडे ठेवा आणि विश्राम करा, तुमच्या स्वतःमध्ये विश्राम करा आणि तुमचे लक्ष परमेश्वराकडे ठेवा. हेच भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले.
तुमचा समतोल ढळू देऊ नका. तुम्हाला माहीत नाही कधी, कुठे काय होईल ते. कधी मित्र शत्रू बनेल किंवा कधी शत्रू मित्र बनेल. या जगात कोणाला काहीही माहिती नाहीये. म्हणून कायम परम सत्य हे तुमचे ध्येय असू द्या आणि तुमची कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा आणि प्रामाणिकपणे ध्यान करत रहा.
प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी गुरूंना भेटणे चांगले असते.
श्री श्री : हो. तुम्हाला माहिती आहे, चंद्रामुळे समुद्रावर परिणाम होतो. पौर्णिमेच्या दिवशी लाटा उंच असतात. चंद्राचा प्रभाव पाण्यावर पडतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपले शरीर पाण्यानी बनले आहे.
आपल्या शरीरात ६०% पाणी असते आणि त्यामध्ये क्षार असतात, जसे समुद्रामध्ये असतात. म्हणजे आपले शरीर हे समुद्राच्या पाण्याची एक छोटी डबी आहे. म्हणूनच चंद्राचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो आणि ज्याचा शरीरावर प्रभाव पडतो त्याचा मनावरही परिणाम होतो.
आणि म्हणूनच, आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे कि एकादशीच्या दिवशी उपवास करायचा. त्यांनी हे अशासाठी सांगितले आहे कि, जेंव्हा पोट रिकामे असते, तेंव्हा आपल्या शरीरातील विषारी द्रव्य निघून जातात. उपवासाने शरीराची शुद्धी होते आणि न पचलेले अन्न, विषारी द्रव्ये निघून जातात.
म्हणून तुम्ही पौर्णिमेच्या आधी ३ दिवस उपवास केलात तर पौर्णिमेला तुम्हाला काही आजार होणार नाही, असे मानले जाते.
तुम्ही प्रत्येक एकादशीला उपवास करावा असे नाही, पण वर्षातून २ ते ३ दिवस तरी उपवास करावा.

प्रश्न: गुरुजी, मी तुमच्याइतका शक्तिमान कसा बनू? या जगात सगळ्यांना ‘शक्तिवान’ असणे आवडते.
श्री श्री : सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे विश्राम; सखोल विश्रांती आणि प्रेम. जर या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर बाकीच्या आपोआप येतील.
हे बघा, आता तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे, तुम्हाला विपुलतेची अनुभूती व्हायला हवी. हे समजून घ्या कि तुमच्याकडे सर्व आहे आणि कशाचीही कमी नाहीये. आणि तुम्हाला तुमच्यामध्ये काही दोष किंवा कमी आढळली, तर ध्यान करा, तुमची साधना करा. साधनेने तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवू शकाल.  
प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात कि या अध्यात्मिक मार्गावर, माणसाने सर्व काही सोडून द्यावे आणि हेतू किंवा ध्येय यापासून मुक्ती मिळवावी. मी एक व्यस्त व्यावसायिक आहे. कुठल्याही हेतुशिवाय मी जबाबदारी कशी घेऊ शकेन?
श्री श्री : हे बघा, दोन गोष्टी आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. या दोन्हीमध्ये गल्लत करू नका. दोन प्रकारच्या वृन्तिंकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे. एक म्हणजे जेंव्हा तुम्ही अंतर्मुखी होता(निवृत्ती). तुम्ही असा विचार करता कि सर्व काही ठीक आहे आणि मला काहीही नको आहे. यालाच ध्यान म्हणतात. आणि जेंव्हा तुम्हाला बाहेरच्या जगात काम करायचे असते (प्रवृत्ती), तेंव्हा छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन ती सुयोग्य रीतीने आणि जबाबदारीने करणे.
राम आणि कृष्ण यांच्या जीवनाचा संदेश हाच आहे. जिथे कुठे तुम्हाला काही दोष दिसेल, त्याकडे लक्ष देऊन तुम्ही तो दोष नाहीसा करू शकता. आणि जेंव्हा तुम्हाला निवृत्ती घ्यायची असते, तेंव्हा समजा कि, ‘सर्व काही ठीक आहे.’ अशी वृत्ती तुम्हाला ध्यानात जाण्यासाठी मदत करेल. हाच निवृत्तीचा मार्ग आहे. 
म्हणूनच ज्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती यामधला फरक माहीत आहे, त्याला सात्विक समजले जाते. त्यालाच विद्वान समजले जाते.
विद्वान माणसाची लक्षणे काय आहेत? – असा माणूस जो वाईट माणसामध्ये सुद्धा चांगुलपणा शोधू शकतो;जो सर्वांमध्ये चांगुलपणा बघतो. तूम्ही तुरुंग पाहिलात तर अगदी निर्ढावलेल्या गुन्हेगारामधेही तुम्हाला काहीतरी चांगले सापडतेच. अपराधी माणसामधेही काहीतरी चांगले पहाणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे.
म्हणूनच शहाणा माणूस, सर्वात वाईट माणसामधेही काहीतरी चांगले शोधतो, पण मूर्ख माणूस सर्वात चांगल्या माणसा मधेही काहीतरी वाईट शोधून काढतात.
अमेरिकेमध्ये कोणीतरी एका पुस्तकामध्ये लिहिले आहे कि, रामकृष्ण परमहंस वेडे होते. त्यांनी असेही सिद्ध केले कि त्यांच्यामध्ये खूप खूप दुर्गुण होते आणि विवेकानन्दान्मधेही हे दुर्गुण होते आणि सर्व हिंदू साधुंमध्ये काही न काही दुर्गुण होते आणी याबद्दल त्याने संपूर्ण पुस्तक लिहिले आहे.
हे अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे, कि चांगल्या लोकांमध्ये काहीतरी वाईट शोधणे. चांगल्या माणसाचे लक्षण हे आहे कि जो अगदी वाईट माणसाला सुद्धा चांगले वागण्यासाठी प्रेरणा देतो.

प्रश्न: भगवान श्रीकृष्णाची निरनिराळी रूपे होती, मृदू, सुंदर, अनंत, दयाळू, पण आपण कायम त्यांची पूजा ‘मनमोहन’ म्हणून का करतो?
श्री श्री : नाही, तुम्ही गुजरात मध्ये गेलात तर तिथे रणछोडदास या स्वरूपामध्ये पूजा केली जाते. तर काही ‘बालकृष्ण’ म्हणून पूजा करतात. तुम्हाला हव्या त्या आवडत्या स्वरूपामध्ये तुम्ही पूजा करू शकता. कृष्णाने म्हटले आहे, कि ज्या स्वरूपात तुम्ही माझी पूजा कराल त्या स्वरूपामध्ये मी तुमच्यापाशी येईन. आपण आता ‘भगवान’ कृष्ण म्हणतो पण कृष्णाच्या काळात काही लोक त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलत असत. असे खूप थोडे लोक होते कि ज्यांनी त्या काळात कृष्णाचे खरे स्वरूप समजून घेतले होते. कृष्णाने स्वत: म्हटले आहे, ‘ मूर्ख लोक मला समजून घेत नाहीत. ते मी म्हणजे हे शरीर समजतात. त्यांना माझ्या या शरीरापलीकडचे अनंत, सर्वव्यापी स्वरूपाची ओळख नाही. लोकांना वाटते, कि मी सर्वसाधारण मनुष्य आहे.’
म्हणूनच म्हटले आहे, कि देव सर्वव्यापी आहे., या सृष्टीच्या कणाकणात आहे; तुमच्यात, माझ्यात आणि सर्वांच्यात. म्हणूनच तो परमात्मा आहे.