स्वतः दु:खी न होणे तसेच दुसऱ्यांना दु:खी न करणे हाच आयुष्याचा उदेश्य होय


  9
2012................................... Montereal, Canada
May
आयुष्यात दोन स्थिती उद्भवतात:
एक म्हणजे जेंव्हा तुम्ही आरामदायक आणि आनंदी असता आणि दुसरी म्हणजे जेंव्हा तुम्ही त्रस्त आणि दु:खी असता. म्हणून हा आरामदायीपणा आणि आनंद टिकविण्यासाठी तुमची सेवा करायची तयारी पाहिजे.

आपण जेंव्हा आनंदी असतो तेंव्हा सेवा करीत नाही. सर्व साधारणपणे मन त्यादृष्टीने विचार करीत नाही. तुम्ही जेंव्हा आनंदी असता तेंव्हा तुम्हाला तो आनंद उपभोगायला आवडते आणि मग त्यावेळेला करुणा, दया किंवा सेवा हे विचार मनात फिरकत पण नाहीत पण त्याच वेळी त्यांची खरी गरज असते. तुम्ही जेंव्हा आनंदी असता तेंव्हा सेवा केलीत तर तो आनंद टिकून राहतो.

आम्हाला काय मागणे मागण्याची गरज आहे तर आनंदी असताना सेवा करायची तयारी पाहिजे आणि दु:खी असताना ते विसरून स्वतः मध्ये डोकावून बघण्याची गरज असते. आणि आपण हेच मागितले पाहिजे. ‘मी जेंव्हा दु:खी होईन तेंव्हा ते विसरून स्वतः मध्ये डोकावून बघण्याची शक्ती मला मिळावी’.

तुम्ही येथे समरस होऊन हे ज्ञान घेताना जग विसरण्याची कला शिकायला पाहिजे.

एकदा एका सत्संगात एका वयस्कर महिलेने असा प्रश्न विचारला की ”परमेश्वराने हे जग दुखी का केले आहे?
त्याचे उत्तर असे आहे की ’होय, त्याने ते तुमच्यासाठी तसे केले आहे. तुम्ही एवढे दु:खी असून सुद्धा तुम्ही स्वतःमध्ये डोकावून न पाहता देवाकडे वळत नाही. नाहीतर तुम्ही केंव्हा अंतर्मुख होणार?      ‘

प्रश्न: प्रिय गुरुजी, शिवलिंगाचा अर्थ काय?
श्री श्री रविशंकर: लिंग म्हणजे एक प्रकारची खुण कि जी सत्य आणि वास्तव ओळखण्यासाठी वापरली जाते. जे डोळ्याला दिसत नाही पण खुणेमुळे ओळखता येते ते लिंग. जेंव्हा मूल जन्माला येते तेंव्हा ते मुलगा कि मुलगी हे कसे ओळखतात? शरीरात असा एकच भाग असतो कि ज्यावरून ते बालक म्हणजे मुलगा कि मुलगी ते ठरवितात. नाहीतर सर्व लहान मुले काही वयापर्यंत सारखेच दिसतात. पण एक भाग मात्र खात्रीने सांगू शकतो कि ती पुढे कोण होणार आहेत.  आणि म्हणूनच जननइंद्र्यींना पण लिंग म्हणतात. स्त्रीलिंग म्हणजे जी पुढे स्त्री होणार असते आणि पुल्लिंग म्हणजे जो पुढे पुरुष होणार असतो तो. लिंग म्हणजे जे अजून पुरते वाढलेले नाहीये परंतु त्याद्वारे ओळख होऊ शकते ते. लिंगाचा हा खरा अर्थ होय. शिव-लिंग म्हणजे जे अभिव्यक्त झालेले नाही असे देवत्व. जे अभिव्यक्त होऊ शकत नाही असे देवत्व, जे व्यक्त होण्याच्या पलीकडले आहे ते, जे व्यक्त झालेले नाही ते ओळखण्याची खुण. कोणत्याही प्रतीकाच्या पलीकडले ते समजण्यासाठी हे शिवलिंग होय.

प्राचीन भाषा हि खूप शक्तिशाली आहे. कोठे ठेवलेला एक दगड लिंग होऊन जातो याचा अर्थ असा कि त्या दगडाद्वारे मी जे व्यक्त झालेले नाही त्याचा विचार करीत आहे.

प्रश्न: जन्मभर अविवाहित राहणे हा मध्यम मार्ग आहे का? स्त्री-पुरुष तत्वाशिवाय आम्ही परमेश्वराची संपूर्ण अभिव्यक्ती कशी समजू शकतो?

श्री श्री रविशंकर: असे पहा कि तुमच्यात स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही अभिव्यक्ती आहेत. फक्त अविवाहित राहणे हा काही योग्य मार्ग नाही, तशी पद्धत नाहीये. जेंव्हा तुम्ही म्हणजे फक्त शरीर नाही हे आपोआप लक्षात येते, आणि स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग हे फक्त शरीराला लागू आहेत, चेतनेला नव्हे. चेतना हि त्याच्या पलीकडची असते.

जेंव्हा तुम्हाला हि जाणीव होते की चेतना हि ह्या सर्वांच्या पलीकडली आहे तेंव्हा तुम्ही त्या ऐहिक सुख-भोगाच्या पलीकडे जाता. नाहीतर काय सगळ्या जन्मामध्ये, कुत्रा, मांजर, घोडा, अगदी मनुष्यप्राणी सुद्धा फक्त स्त्री आणि पुरुष हेच समजून घेत आलोत. तुम्हाला फक्त तेच समजून घ्यायचे असेल तर तसे करा. पण त्याच्या मागे किती लागणार? केंव्हातरी असे वाटेलच कि “आता बस झाले, मला आता आत डोकावून पाहु देत.” आणि तेंव्हाच मन अंतर्मुख होते.

म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टींना नकार देऊ नका, पण जेंव्हा तुमच्यातील उर्जा वाढून त्याचवेळी त्या तापातून, उत्कंठेतून बाहेर पडावेसे वाटेल तेंव्हाच खरे होय.

म्हणूनच असे म्हटले आहे की समाधीचा एक मिनट हा १००० शरीरसंबंधसारखा असतो. एका शरीर संबंधात तुम्ही जेवढा आनंद घेता त्याच्या १००० पट हा एका समाधीत मिळतो, आणि समाधीचा एक मिनट हा काही अब्ज वर्षांच्या विश्रांतीसारखा असतो.

जर तुम्हाला ते हवे असेल तर तुम्हाला या नेहमीच्या गोष्टींच्या पलीकडे जायला पाहिजे. असे पहा कि काही गोष्टी मिळवायला काही गोष्टी सोडायला लागतात.
तुम्हाला जर चांगले जेवण जेवायचे असेल तर सारखे अबर-चबर खाणे बंद करायला पाहिजे. सकाळपासून जर तुम्ही पोटात बटाटा वेफर ढकलत बसलात तर जेवणासाठी तुम्हांला भूक राहणार नाही. तुम्ही जर पुरेसे भुकेलेले असाल तरच जेवणाचा आनंद घेऊ शकाल.

प्रश्न: माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत कि ज्यांना मी माफ करू इच्छितो. मी अनेक वेळा असे ठरवितो कि त्यांना माफ करून विसरुन जायचे, पण मधेच मला भूतकाळ आठवून, मी त्यांचा द्वेष करायला लागतो. मला यातून बाहेर पडायचे आहे, मी काय करू?

श्री श्री रविशंकर: मग आताच त्यांना माफ करून टाका.

त्यांना दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून ते तसे वागले. तुम्ही त्यांचा एक स्वतंत्र व्यक्ती , जी आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकते असा विचार करू नका. त्यांनी तसे वागावे हे आधीच ठरल्याप्रमाणे आहे. ते तसे वागले कारण त्यांच्या हातात काहीच नाहीये, गरीब बिचारे ते तरी काय करणार. त्यांच्यावर दया करा. त्यांना तसे वागणे भाग पडले एवढेच, बस ते सारे आता संपले आहे.

प्रश्न: शरीरसंबंध आणि आध्यात्मिकता या दोन्हीत माझी खूप ओढाताण होतीय. या दोन्हीमध्ये गुंतल्यामुळे माझ्यात एक प्रकारची अपराधीपणाची भावना वाढीस लागली आहे. मी विवाहित असून माझ्या पत्नीबरोबर माझे नाते चांगले वाढीस लागले आहे.

श्री श्री रविशंकर: तुम्ही विवाहित असल्यामुळे तुमचे ते कर्तव्य आहे, तुमचा तो धर्मही आहे. जेंव्हा तुम्ही विवाहित असता तेंव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर मोठे होत असता आणि त्यांना मोठे व्हायला मदत करायला पहिजे.

तुम्ही योग वसिष्ठ वाचलेत का? त्यात लीला नावाच्या स्त्रीची गोष्ट आहे. योग वसिष्ठ वाचा.

प्रश्न: मानस शास्त्रज्ञ आणि विशेषकरून पाश्चिमात्य विचारवंतांचे असे म्हणणे आहे कि प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा हेतू काय ते शोधून तो साध्य करण्यासाठी झटावे. आत्म-साक्षात्काराशिवाय प्रत्येक आत्म्याचा या आयुष्यासाठी काही हेतू असू शकतो काय?

श्री श्री रविशंकर: प्रत्येक आत्मा हा या पृथ्वीतलावर काही काम करीत असतो.

प्रत्येकजण आपले काम स्वतः ठरवीत असतो, आपला व्यवसाय स्वतः निवडीत असतो. पण त्यामध्ये काही एक साधर्म्य आहे कि जे मानस शास्त्रज्ञ विसरतात. काय ते साधर्म्य?
मानवी मूल्ये, एकमेकात वाटलेली मूल्ये, आणि आनंद. हल्ली ते याचा विचार करू लागले आहेत.
“तुम्ही आनंदी आहात काय?” हे आता विचारायला पाहिजे.

जर तुम्ही जर आनंदी नसाल तर तो मिळविण्यासाठी अंतर्मुख व्हा. तो बाहेर कोठे शोधायची गरज नाहीये. एकदा का तुम्ही अंतर्मुख व्हायला लागलात कि तुमच्या जीवन-कमळाची एक एक पाकळी उमलायला लागेल.

स्वतः दु:खी होणे तसेच दुसऱ्यांना दु:खी करणे हाच आयुष्याचा उदेश्य होय. हे जेंव्हा तुम्हांला कळेल तेंव्हा आयुष्याचा हेतू आपोआप लक्षात येईल.

जास्तीतजास्त लोकांचे जास्तीतजास्त चांगले करा. तुम्ही जेथे कोठे असाल, तेथे ज्याची आवश्यकता असेल ते बना. तुमचे १००% लक्ष द्या. लोकांना त्यांच्या संघात असायला पाहिजे अशी व्यक्ती तुम्ही आहात काय? तुम्ही संघात खेळू शकता का? जर नसाल तर तसे व्हायला पाहिजे. जेंव्हा हे अनेक कंगोरे घासून पुसून काढले कि मग आयुष्याचा हेतू लक्षात यायला  वेळ लागणार नाही.

हा हेतू तुम्हांला का लक्षात यायला हवाय? कारण त्याने तुम्हांला समाधान मिळणार आहे.

काही हेतू असलेली गोष्ट का करावीशी वाटते? तर त्याने समाधान मिळते. तुम्ही जर काही हेतू न ठेवता काही केले तर त्यात समाधान मिळत नाही. तर हेतू असणे किंवा हेतू नसणे हे समाधान केंद्रित असते.

तुम्हांला जर समाधान मिळत असेल तर प्रत्येक छोटी गोष्ट फार उपयोगी होते.

‘मला हेतू पाहिजे” असे जेंव्हा तुम्ही म्हणता, तेंव्हा ते तुम्हांला केंद्र-स्थानी ठेऊन केलेले विधान असते आणि त्यातून तुम्हांला काय फायदा होणार असा विचार असतो. पण जेंव्हा तुम्हांला समाधान मिळते तेंव्हा संपूर्ण आयुष्याचे सार्थक झाले असे वाटते.

आणि मग जर उपयोगी पडायचे हाच आयुष्याचा हेतू असेल तर तसे उपयोगी पडा. येतेय लक्षात? जेंव्हा तुम्ही कोणाच्या उपयोगी पडता तेंव्हा तुम्हांला समाधान मिळते. आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जेंव्हा तुम्ही ठरविता कि उपयोगी पडायला पाहिजे, तेंव्हा मग तुम्ही कोणतीही गोष्ट केलीत तरी तुम्ही उपयोगी पडू शकता हे लक्षात येईल.

प्रश्न: एका वाया गेलेल्या विवाहात अडकल्यानंतर आत्म-साक्षात्कार होऊ शकतो का? माझ्या जोडीदाराचे नकारात्मक वागणे आणि राग राग करणे हे माझ्यात भिनल्यानंतर पण ते शक्य आहे काय?

श्री श्री रविशंकर: होय, होय, होय होय! तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे आभार माना. तुमची चांगली प्रगती होऊन तुम्ही चांगले भक्कम होऊ शकता. ते नकारात्मक आहेत आणि तुम्ही सकारात्मक आहात, आणि त्यांनी कितीही आरोप केले तरी तुम्ही तुमचे स्मित-हास्य सोडले नाही. तुम्हांला चांगलीच संधी आहे, ठीक आहे.

प्रश्न: टोरोंटो विद्यापीठ यांच्या पाठ्यपुस्तकात असे विधान केले आहे कि कोणत्याही स्त्रीला पुरुषाचा जन्म घेतल्याशिवाय आत्म-साक्षात्कार होत नाही. त्यासाठी त्यांनी वेदाचा दाखला दिला आहे.

श्री श्री रविशंकर: हे पूर्ण चुकीचे आहे. त्यांना ते चुकीचे असल्याचे पत्र लिहून लगेच कळवा. वेदात कोठेच असे काही म्हटले नाहीये. ते काय सूत्र आहे हे त्यांनी मला सांगावे. हे काही खरे नाहीये.

असे स्मृतीत म्हटले आहे आणि स्मृती म्हणजे काही वेद नव्हेत, तर ते वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या वेळी लिहिले आहे. प्राचीन काळी अनेक राजे-राजवाड्यांनी आपल्या प्रजेने कसे वागावे याचे नियम केले होते. त्यापैकी एक म्हणजे मनु-स्मृती होय आणि त्यात असे म्हटले आहे कि स्त्री हि स्वातंत्र्य द्यायला लायक नाही कारण ती आयुष्यभर आधी वडील, मग पती आणि नंतर मुलगा यांच्यावर छायेखाली असते. आणि पूर्ण आयुष्यभर तिला ते हवे असल्याने ती स्वतंत्र होऊ शकत नाही.
पण तसे स्मृतीत म्हटले आहे, म्हणजे एका राजाचे तसे मत आहे. स्त्रियांना आत्म-साक्षात्कार होऊ शकत नाही असे वेदात कोठेच म्हटले नाहीये. त्यावेळी तर गार्गी , मैत्रेयी सारख्या आत्म-साक्षात्कार झालेल्या स्त्रिया पण होत्या.
त्यांना योग वासिष्ठ्य वाचायला सांगा. वेदातील पाठ हे योग वासिष्ठ्य मध्ये आहेत. आत्म-साक्षात्कार झालेल्या चुडला , लीला यांच्या कथा त्यात आहेत. या दोघींना प्रथम आत्म-साक्षात्कार झाला आणि मग त्यांच्या पतींना त्यांच्याद्वारे आत्म-साक्षात्कार  झाला. पाठ्यपुस्तके बदलायला आपण त्यांना सांगितले पाहिजे.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला आध्यात्मिकता आत्म-साक्षात्कार यात विशेष रुची नसून मला तुमच्यात जास्त रुची आहे! मी तुम्हांला कसे प्राप्त करावे?
श्री श्री रविशंकर: एकच गोष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगत आहात. मी म्हणजेच आध्यात्मिकता आणि तुम्ही मला आध्यात्मिकता आणि आत्म-साक्षात्कार यापासून वेगळे करू शकत नाही. ते केवळ अशक्य आहे.

प्राचीन ग्रंथात याचा “द्रव्य गुण संबंध”, म्हणजे पदार्थ आणि त्याचा गुणधर्म असा उल्लेख आहे. त्याच्या गुणधर्मावर पदार्थाची ओळख अवलंबून असते.

पिठीसाखर आणि मीठ हे दोन्ही सारखेच दिसतात, पण त्यांच्या चवीवरून त्यांची ओळख होते.
मला माहित आहे कि बऱ्याच वेळा बऱ्याच महिला त्यांच्या तंद्रीत किंवा काळजीत खिरीत मीठ टाकतात.

मला प्रामाणिकपणे सांगा कि तुमच्यापैकी किती जणींनी याआधी असे केले आहे? (अनेक हात वरती येतात). ती दुधाची खीर असते पण ती खारट लागते.

म्हणजे त्याच्या गुणधर्म वरून पदार्थाची ओळख असते. ते खूप जवळचे संबंध असतात.

प्रश्न: मी माझे मन विसरू इच्छितो, तर ते शक्य आहे काय?

श्री श्री रविशंकर: पण वाहन चालविताना नको!
पोकळ आणि रिकामे ध्यान करतांना मन आपसूक विरघळून जाते.

तुम्हांला ते विरघळण्याची इच्छा निर्माण झाली आहे हा मूळ प्रश्न आहे. आहात तसे रहा, मन पण अगदी आहे तसेच राहु दे. त्यात जर कचरा भरला असेल तर असु देत.

तुमच्या मनातील सर्व कचरा हे जैविक खत आहे. आणि तुम्ही त्यापासून सुटका करून घेऊ इच्छिता हा एक मोठा प्रश्न आहे. ते एक फार मोठे काम आहे आणि कृपा करून तसे करू नका. परमेश्वराने तुम्हांला मन दिले आहे,  ते आहे तसेच राहु द्यात. हे एक सूत्र आहे कि “ आहे तसे राहु द्यात.”

प्रश्न: गुरुजी, नकारात्मक आणि आपल्याला काबूत ठेवणाऱ्या राजकारणी लोकांशी कसे वागावे? थोडक्यात आपल्या वरिष्ठांशी.

श्री श्री रविशंकर: त्यासाठी तीन गोष्टीची गरज आहे, कौशल्य, सबुरी, आणि सकारात्मकता. त्याने काम होईल.
आणि त्याने जर काही झाले नाही तर एकत्र या, समूहाने रहा हि सोपी गोष्ट तर करू शकता. त्यांच्या विरुद्ध संघ स्थापन करा आणि मग सहजपणे काम होऊ शकते. पण त्याने यश मिळेलच अशी खात्री देता येत नाही. यशासाठी कौशल्य, सबुरी, आणि सकारात्मकता पण पाहिजे. पण जर तुम्ही मला विचारलं तर प्रार्थना सर्वात चागली.

मी काल सांगितल्या प्रमाणे हे सर्व एकच गोष्टीपासून बनले आहे. तुम्ही जर मनात पक्का इरादा केलात कि हा माणूस आज बदलायला पाहिजे, आणि मग तो इरादा घेऊन त्याच्याकडे गेलात तर असे लक्षात येईल त्याचे वागणे बदलले आहे.

असे पहा कि जगात अनेक वेळा मित्र हे शत्रूसारखे वागतात, तुमच्या बाबतीत असे झाले आहे कि नाही? जेंव्हा तुम्ही एखाद्यासाठी खूप काही करता आणि तो सुद्धा शत्रू सारखा वागतो आणि काही वेळा तुम्ही ज्याला शत्रू मानता तो तुमच्या मदतीला येतो. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. इतिहासाची पणे उलटलीत तर असे लक्षात येते कि प्रत्येक खंडात, प्रत्येक देशात, प्रत्येक खेड्यात अशा घटना घडलेल्या आहेत.

म्हणून विश्वास ठेवण्यायोग्य म्हणजे स्वत्व, सत्य आणि चेतना हे होत आणि हेच सर्वस्व होय.