7 May 2012


  7
2012............................... Montereal, Canada
May


संकटकाळीच विश्वास कामी येतो
मॉनटेरियल, कॅनडा – ७ मे २०१२

संपूर्ण विश्व एकाच उर्जेने बनले आहे, हे सगळे एकाच गोष्टीने तयार झाले आहे. जेंव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होतो, आणि तुम्ही या तत्वाचा विचार करता – या सगळ्या गोष्टी एकाच उर्जेपासून बनल्या आहेत, त्यामुळे इथे अनेक शक्यता आहेत, त्यावेळी तुम्हाला मोठा आधार वाटतो. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतोय?
मती (बुद्धी) ३ प्रकारच्या असतात.
एक बुद्धी सुप्तावस्थेत असते आणि कधीच काम करत नाही; झोपलेली आणि फक्त नकारात्मक विचार करणारी. याला तामसिक बुद्धी म्हणतात.
त्यानंतर राजसिक बुद्धी, बऱ्याच लोकांमध्ये ही दिसून येते. प्रत्येक जण याच बुद्धीच्या सहाय्याने काम करतो. राजसिक बुद्धी म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळा आहे असे मानणे. हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, हा माणूस असा वागतो, ती बाई तशी वागते; जिथे दुजाभाव असतो. अनेक लोक, अनेक व्यक्तिमत्वे आहेत, असा विचार करणे आणि त्यालाच सत्य मानणे, असे करण्याने तुम्हाला कधीकधी खूप उन्नत वाटते तर कधी खाली गेल्याची जाणीव होते. याला राजसिक बुद्धी म्हणतात.
त्यानंतरची आहे सात्विक बुद्धी जे उन्नतीचे लक्ष्य आहे. सात्विक बुद्धीला सगळ्या विविधतेत एकच उर्जा दिसते. हीच वास्तवता आहे, हेच सगळ्या मागचे सत्य आहे. तीच चेतना वेगवेगळया रुपात दिसते.
मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही कठपुतळीचा खेळ बघितला आहे का? राजसिक बुद्धी या सगळ्या बाहुल्यांना वेगवेगळी पात्रे समजते. सात्विक बुद्धी ला माहित असते की ह्या सगळ्या पात्रांना नाचवणारा एकच आहे. वास्तविक हा एकपात्री प्रयोग आहे. पडद्यामागून एकच व्यक्ती त्याच्या १० बोटांनी वेगवेगळया कथा पडद्यावर साकारत असतो, आणि त्यांना नाचवत असतो. तुम्ही ते कठपुतळीचे खेळ बघीतले आहेत ना? दोऱ्याने आपल्या १० बोटांना बांधून ते बाहुल्या फिरवत असतात. सात्विक बुद्धी या विश्वाच्या निर्मितीमध्ये एकत्व, एक सत्य, एक वास्तव, एक चेतना पाहते, जेंव्हा तुम्हाला हे सत्य उमगेल तेंव्हा तुम्हाला फरक दिसला, जाणवला तरी तुम्ही अविचल राहाल. 
ज्या घराचा पाया भक्कम असेल ते भूकंपात कोसळणार नाही. ते धक्के सहन करेल. ज्याला हे माहित आहे की हे सगळे एकाच चित्तशक्ती ने बनले आहे तोच खरा आघातशोषी.  सगळे द्रव्य एकच चेतना आहे. मी ती एक चेतना आहे आणि बाकी सगळे सुद्धा तीच एक चेतना आहेत. ज्याला हे कळले तो मुक्त झाला. ‘मी मुक्त आहे, मला कसली चिंता नाही’ यालाच मुक्ती म्हणतात.
तुम्हाला माहित आहे आर्ट ऑफ लिविंगच्या ३० वर्षांच्या कालावधीत कोणतेही मोठे विवाद झाले नाहीत, पूर्ण जगात संस्थेबद्दल आदर आहे. नुकताच एक विवाद झाला. सगळी माध्यमे, मोठे राजकारणी, सगळ्यांनी माझ्या एका वाक्यावर टिप्पणी केली.    
आपले काही शिक्षक आणि स्वयंसेवक सुद्धा नाराज झाले. ‘असे का झाले, अरे बापरे ही नकारात्मक प्रसिद्धी झाली’ वैगरे वैगरे. मी सांगितले ‘ठीक आहे, मी म्हणालो की सरकारने शाळा चालवू नयेत. स्वयंसेवी संस्थेने, धर्मप्रसारक संस्थेने किंवा अध्यात्मीक संस्थेने चालवलेल्या शाळेतून हिंसक कृत्ये करणारे विद्यार्थी बाहेर पडत नाहीत. कोणताही मंत्री आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवत नाही. ते सगळे आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवतात. मी जेंव्हा असे म्हणालो तेंव्हा एक धमाका झाला. मी एका संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात हे म्हणालो. मला आर्ट ऑफ लिविंगच्या प्रसिद्धी विभागाकडून रात्री १० वाजता ताबडतोब फोन आला ‘गुरुजी, माध्यमे या बद्दल विचारत आहेत, आम्ही काय सांगू?’ मी सांगितले ‘काळजी करू नका, विवाद होत असेल तर होऊ द्या. त्यांना काही उत्तर देऊ नका, आणि काही सांगू नका’  या विवादामुळे काय झाले? राष्ट्रीय वाहिन्यांवर परिचर्चा सुरु झाली – सरकारी शाळांना श्री श्री योग्य न्याय देत आहेत का? त्यांनी असे उद्गार काढायला नको होते, त्यांनी माफी मागावी  इत्यादी इत्यादी.
बरेच लोक हे बघत होते काही या बाजूने काही त्या बाजूने. त्यांनी आमच्या लोकांनाही बोलावले, आमचे काही शिक्षक गेले, बसले आणि त्यांनी आम्ही केलेल्या कामाबद्दल सांगितले. संपूर्ण देशाला आम्ही केलेल्या कामाची माहिती मिळाली, आम्ही १८५ मोफत शाळा चालवतो ही माहिती टीवी वर प्रसारीत झाली, अन्यथा हे शक्य नव्हते.
१-२ दिवस जी गोष्ट नकारात्मक वाटत होती तीच आज आमच्या बाजूने होती. मी हे सांगतोय कारण सकृतदर्शनी गोष्टी वेगळ्या वाटत असल्या तरी प्रत्यक्ष त्या वेगळ्या असतात. त्यामुळे हैराण होऊ नका, विचलित होऊ नका. शांत आणि प्रसन्न चित्ताने लक्षात घ्या की सगळे एकाच गोष्टीपासून बनले आहे, ती गोष्ट म्हणजे मी आहे, आणि तीच इतर सगळे आहेत.
हे ज्ञान समजणे आत्ता जर अवघड वाटत असेल तर मी सांगतो ते अशक्य नाही. तुम्ही जेंव्हा सत्संग मध्ये असता तेंव्हा तुम्हाला ते उमगते, तार जोडली जाते, पण तुम्ही स्वयंपाकघरात जाता आणि ते बदललेले असते. तुम्ही घरी जाता तेंव्हा अधिकच बदल. ‘सर्व काही एक म्हणजे काय? आता मी संकटात आहे. तो माणूस माझे ऐकत नाही, तो माझ्या बद्दल तक्रारी करत असतो’ इत्यादी. पण हे अशक्य नाही.
सात्विक बुद्धी जेंव्हा जागृत होते त्याला सत्व शुद्धी म्हणतात जेंव्हा तुमच्यात शुद्ध बुद्धी जागृत होते तेंव्हा आतून एक मुक्ती जाणवते; शारीरिक जडत्वातून मुक्तता, भावनिक त्रासातून मुक्तता आणि संकल्पनात्मक असण्यातून मुक्तता.
आपण आपल्या डोक्यात खूप कचरा साठवतो. आपण लोकांचा स्वभाव असा असावा किंवा तसा असावा असा विचार करतो. आपण लोकांनी असे वागावे किंवा तसे वागावे असे गृहीत धरतो. असे का असावे? आयुष्यात तुमच्यासाठी खूप अनपेक्षित गोष्टी असतात. कधी तुम्हाला वाटते की अमुक व्यक्ती तुमचा चांगला मित्र आहे आणि अचानक तोच मित्र बदलून तुमच्या त्रासाचे कारण बनतो. तुमच्या पैकी किती लोकांना हा अनुभव आला आहे (बरेच लोक हात वर करतात) (श्री श्री हसत) बघा !! 
एक चेतना हे चक्र, हे विश्व चालवते.
जो ह्याचा हृदयापासून अनुभव करतो तो म्हणतो ‘ओह! मुक्ती !! मला आता बसून ह्या माणसाबद्दल, त्याच्या बद्दल ह्या बाई बद्दल विचार करायची गरज नाही’ या सगळ्यामुळे डोके शांत राहत नाही, असे व्हायला नको, सगळे एकाच चेतनेचा भाग आहे. सगळे एका कळसूत्री बाहुली प्रमाणे वर खाली, इकडे तिकडे करत असतात, त्यांचे कर्म त्यांना तसे वागायला लावत असते. 
ह्या ज्ञानामुळे तुम्हाला मुक्त वाटत नाही का? प्रचंड मुक्तता !!
ह्यामुळे कशापासून मुक्तता मिळते? तर लालसेपासून मुक्ती, तीटकारयापासून मुक्तता.
जेंव्हा तुम्ही हे जाणता, तेंव्हा शारीरिक पातळीवर दारू, अमली पदार्थ यासारख्या हानिकारक बंधनातून तुमची मुक्तता होते.
त्यानंतर भावनिक बंधने – त्याने माझ्याकडे बघीतले, त्याने नाही बघीतले. मी तिच्यावर प्रेम केले तिने त्याला होकार नाही दिला. पूर्वी ते माझ्यावर प्रेम करायचे, पण आता सगळ्यांना काय झाले माहित नाही. या गोष्टी होणार नाहीत. या सगळ्या भावनिक कचऱ्याला जी आपण डोक्यात जागा देतो, स्वतःचे प्रेम सिद्ध करणे असो किंवा दुसऱ्याकडे प्रेमाचे प्रमाण मागणे असो, या सगळ्या गोष्टी गळून पडतील.
त्यानंतर प्रत्येक गोष्टींची संकल्पना असणे, हा सुद्धा एक कचरा आहे. संकल्पना बद्दल मोठमोठी पुस्तके, खंड लिहिले गेले आहेत. हे म्हणजे ज्याने हत्ती पाहिलादेखील नाही त्याने हत्ती वर खंडच्याखंड लिहिण्यासारखे आहे.
कल्पना करा जेंव्हा टीव्ही नव्हता त्याकाळी, कोणीतरी हत्तीचे हाताने काढलेले चित्र पाहून हत्तीच्या वागण्यावर आणि त्याला कसे सांभाळावे यावर प्रबंध लिहिला आहे. ही तशीच परिस्थिती आहे.
ज्या लोकांना चेतना म्हणजे काय याची सुतराम कल्पना नाही असे लोक त्याबद्दल खंडच्याखंड लिहीत आहेत, आणि ते मोठ्या प्रमाणार वाचले देखील जात आहेत, हा त्यातला मजेशीर भाग. तुम्हाला या संकल्पनामधून मुक्ती मिळते – या माणसाचे ऐक, त्याचे ऐक.
सगळे एकाच गोष्टीपासून बनले आहे. किती सुंदर आहे, नाही का ?
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणालात भूतकाळ आणि भविष्य हे या क्षणी आहे. वेळ ही एकरेशीय नाही. मी यावर विचार केला आणि गोंधळात पडलो आहे. कृपया तुम्ही या बद्दल थोडे खोलात जाऊन बोलाल का?
श्री श्री: थोडेसे गोंधळलात? तुम्ही पूर्ण गोंधळून जायला हवे (हशा). तुम्हाला पुरते गोंधळवून टाकणे हे माझे कामच आहे. भविष्यातील योजना या आत्ता करत असता, बरोबर. त्या तुम्ही या क्षणीच करत असता. भूतकाळातील चिंता सुद्धा तुम्ही या क्षणीच करत असता. फक्त हा क्षणच अस्तित्वात आहे. संपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ या क्षणातच आहे.
प्रश्न: अष्टावक्र गीतेत तुम्ही सांगितले आहे की मनाला शरीर रूप धारण करायला ८४ हयात घालवाव्या लागतात. याचा अर्थ काय?
श्री श्री: बरोबर, ८४ वेगवेगळी आयुष्ये. वेगवेगळी शरीरे धारण करून आणि पार करूनच तुम्ही इथे पोहोचला आहात. हे ८४शी वे असू शकेल.
प्रश्न: काही लोक देवाचा साक्षत्कार होण्यासाठी धडपडतात, आणि काहीना त्याचा काहीही फरक पडत नाही, असे का?
श्री श्री: मेपलची झाडे फक्त इथेच का उगवतात, फ्लोरिडा मध्ये का नाही?
प्रश्न:  जगात इतकी गरिबी का आहे?
श्री श्री: तुम्हाला त्याची जाणीव व्हावी आणि तुम्ही काहीतरी करावेत म्हणून. जर विरोधाभास नसेल तर तुम्हाला हे कळणारही नाही. आजारपण आहे म्हणून आरोग्याची किंमत आहे. गरिबी आहे म्हणून धनाला किंमत आहे, बरोबर? विरोधाभास अस्तित्वात आहे आणि तो एकमेकांना पूरक आहे. मी इथे गरिबीची वकिली करत नाहीये, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका.
प्रश्न: माझ्या नवऱ्याला अशी भीती वाटते की, मी जर येशूला तारणहार मानले नाही तर मी त्याच्या बरोबर स्वर्गात असणार नाही. तो कट्टर कॅथोलिक आहे. मला कळत नाही मी त्याच्या बरोबर एकाच स्वर्गात असेन का?
श्री श्री: तुम्ही स्वतःच्या भल्यासाठी त्याच्या बरोबर वाद घालून इथे नरक तयार करू नका. त्याला सांगा ‘होय तुझे बरोबर आहे, मी त्याच स्वर्गात जाण्यासाठी जवळचा मार्ग अवलंबित आहे. मला जीससनेच हे करायला सांगितले आहे आणि मी त्याने सांगितले तेच करत आहे’
प्रश्न: प्रिय गुरुजी, मला जी मुलगी आवडते ती माझ्यापासून दूर जाते. काय करू?
श्री श्री: तुम्ही ज्या प्रकारे तुमचे प्रेम व्यक्त करत आहात त्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तुमचे प्रेम खूप उत्कट आहे, आणि ते व्यक्त करताना तुम्हाला बरेच कष्ट पडत आहेत. तुम्ही जर खूप जोराने उडणाऱ्या फवाऱ्यासमोर उभे असाल तर तुम्हाला त्यापासून बाजूला जावे लागेल. लक्षात येतंय? तर तुम्ही जोराने उडणाऱ्या फवाऱ्यासमोर उभे राहिलात तर तुम्हाला जोराचा मार बसेल, त्याच्या समोर उभे राहता येणार नाही ते वेदनादायक असेल.
तुम्ही तुमचे प्रेम सरलतेने, नाजूकपणे व्यक्त करा. कधीकधी प्रेम खूप व्यक्त केल्याने कोंडमारा होऊ शकतो, कदाचित तुमच्या बाबतीत हेच होत असेल. तुम्ही मौन कोर्स मध्ये आहात हे चांगले आहे, शांततेत ह्याचे मुल्यांकन करा.
प्रश्न: गुरुजी, कामाच्या ठिकाणी अपेक्षा कमी ठेवण्यसाठी काय करता येईल? कामाच्या ठिकाणी मी बऱ्याच योजना आखतो आणि त्यामुळे मी खूप अपेक्षा ठेवतो.
श्री श्री: ठीक आहे, अपेक्षा ठेवा आणि सोडून द्या.
प्रश्न: ध्यान हीच विश्रांती आहे तर ध्यान झाल्यानंतर आपण विश्रांती का घेतो?
श्री श्री: होय, कधी कधी जर काही अनुभव अपूर्ण राहिले असतील किंवा काही तणाव नाहीसे होत असतील तर शरीराला काही वेळ झोपून, विश्रांती घ्यावीशी वाटते. प्रत्येक ध्यानात अंतरंगात काही बदल होत असतात, त्यामुळे शरीराला वाटले तर काही वेळ विश्रांती घेणे चांगले. हे सक्तीचे आहे असे नाही, सगळ्यांनीच आडवे पडायला हवे असे काही नाही. जर शरीराला गरज वाटली तर तुम्ही आडवे पडू शकता. त्यामुळे आम्ही नेहेमी सांगतो ‘जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही झोपून विश्रांती घेऊ शकता’ प्रत्येक सूचना अभ्यासपूर्वक नीट दिली आहे. नाहीतर अशी सूचना दिली असती की ‘सगळ्यांनी आडवे पडा आणि विश्रांती घ्या’  ही आज्ञा नाही, जर तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तर तुम्ही हातपाय मोकळे करून आडवे पडून विश्रांती घेऊ शकता, त्याने बरे वाटते. त्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि आराम वाटतो.
प्रश्न: लोकांनी प्रामुख्याने कोणता प्रश्न विचारावा अशी तुमची इच्छा आहे?
श्री श्री: ‘मी हा प्रश्न गुरुजींना विचारावा का?’ हा चांगला प्रश्न आहे.
प्रश्न: गुरुजी, जर नकारात्मकतेकडे जाणे ही मनाची प्रवृत्ती असेल तर काय करावे? हा माझ्यासाठी बंध आहे. मला यापासून मुक्ती हवी आहे, मला सकारात्मक व्हायचे आहे. मला या क्षणी कमजोर वाटत आहे.
श्री श्री: कोण म्हणते तुम्ही कमजोर आहात? तुम्ही सूर्य आहात, तुम्ही कमजोर कसे? जागे व्हा, स्वतःला कमजोर म्हणू नका.
हे म्हणजे सिंहाने स्वतःच्या कपाळावर ‘मी शेळी आहे’ असे स्टीकर लावण्यासारखे आहे, कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. सिंहाने जाऊन ‘मी मेंढरू आहे, मी शेळी आहे’ असे सगळ्यांना सांगण्यासारखे आहे, आणि तुम्ही हेच करत आहात.
तुम्ही हे बिरूद काढून फेकून द्या. तुम्ही कमजोर आहेत असे कधीही म्हणू नका. तुमचा भूतकाळ कसाही असो, तो फेकून द्या, ह्या क्षणात राहून पुढे चला. तुम्ही १० वेळेला नव्हे १०० वेळेला पडलात तरी हरकत नाही; पुढे चालत रहा. उठा आणि पुढे चला, तुम्ही पडलात तर चालेल, उठा आणि धावा. साधकाचे, हेच लक्षण आहे.
लहान असताना तुम्ही तुमच्या पायावर उभे राहण्याआधी किती वेळेला पडला असाल. तुम्ही उभे राहण्याच्या प्रयत्नात कितीतरी वेळ रांगत होतात, कितीतरी वेळा पडला असाल पण शेवटी तुम्ही चालायला लागलात. हे सुद्धा तसेच आहे. मी १० वेळा पडलो आहे, मी आता कधीही उभा राहू शकत नाही, मी आता मांजराप्रमाणे २ हात आणि २ पायावर चालेन. मी कधीही उभा राहणार नाही’ असे कधीही म्हणू नका, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही पक्षी आहात, तुम्ही पडाल पण तुमच्याकडे पंख आहेत. उठा आणि परत उडायला लागा.     
एक आठवडा इथे राहून अध्यात्मिकतेशी नाते जोडून, गुरु आणि या परंपरेशी जोडले गेल्यानंतर ‘मी कमजोर आहे’ असे म्हणणे स्वीकारले जाऊ शकत नाही, ते एक अजाण मत आहे.
प्रश्न: लग्नाचा उद्देश काय आहे?
श्री श्री: तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना हा प्रश्न विचारा.
मला वाटते, ही एक महत्वाची संस्था आहे. जर तुम्हाला मुले हवी असतील तर तुम्ही नक्कीच विवाह करा, आणि त्यांना सुरवातीपासून चांगले शिक्षण द्या. लग्न संस्थेमध्ये तुम्ही द्रवता आणि तुमच्या जोडीदाराला सांगता ‘माझ्या सर्व इच्छा मी तुला देतो, आणि तुझ्या तुझ्या सर्व इच्छा मी घेतो’ तुम्ही एकमेकांच्या इच्छा वाटून घेता, त्यामुळे तुमच्या इच्छेपेक्षा दुसऱ्याची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे.
एक भक्त आपल्या इच्छा देवाला देतो आणि सांगतो ‘या माझ्या सगळ्या इच्छा, पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे ते माझे काम नाही, मी मुक्त आहे, माझ्या सगळ्या इच्छा तुझ्या स्वाधीन’
जेंव्हा तुम्ही आपल्या इच्छा समर्पित करता तेंव्हा तुम्हाला त्यांचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे लग्नात नवरा म्हणतो ‘माझ्या सगळ्या इच्छा मी तुला देतो आणि त्यापासून मुक्त होतो. मी फक्त तुला हवे असेल ते करीन’ आणि बायको सुद्धा तेच म्हणते. ‘माझ्या सगळ्या इच्छा मी तुला देते आणि तुला हवे असेल तेच करते’.  एक प्रकारे ते एकमेकांना हवे असेल ते करण्यास बांधील होतात. आपल्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षाचा त्याग करून, दुसरा आपली काळजी घेईल हा विश्वास.
बोटीमधल्या दोन जपानी प्रवाश्यांची एक छोटी गोष्ट आहे. एक नवदाम्पत्य हनिमूनला बोटीमधून जात होते, अचानक वादळामुळे बोट हेलकावे खाऊ लागली. त्यातली स्त्री अस्वस्थ झाली, पण पुरुष शांत होता आणि हसत होता. बायको त्याला म्हणाली ‘मी इथे इतकी कासावीस झाली आहे, ही बोट आता बुडणार म्हणून घाबरले आहे, पण तुम्ही इतके शांत. आपण आता बुडून मरणार, याची तुम्हाला काळजी वाटत नाही?’ अचानक त्याने त्याचा मफलर तिच्या गळ्यात टाकला, तिने हसत त्याच्याकडे बघीतले आणि म्हणाली ‘हे खेळायची वेळ आहे का? आपल्या भविष्याचा विचार करा. ही मस्करी करायची वेळ नाही’  तो म्हणाला ‘तुला आत्ता भीती वाटली नाही का? मी हा मफलर तुझ्या गळ्यात घातला आहे. मी तुला ठार मारणार आहे’ ती हसली आणि म्हणाली ‘जेंव्हा मफलर तुमच्या हातात आहे तेंव्हा मी का घाबरू? मला माहित आहे की तुम्ही मला काहीही इजा करणार नाही’. तो म्हणाला ‘माझे निसर्गाशी आणि देवाशी असेच नाते आहे. जेंव्हा माझे आयुष्य त्याच्या हातात आहे तेंव्हा या अश्या वादळात तो मला मरू देणार नाही. मला असे खोटे पाडणार नाही. माझ्या आयुष्याची दोर त्याच्या हातात आहे, तर मी कशाला घाबरू?
त्याच क्षणी तिने अध्यात्मिकातेची कास धरली, आणि गोष्टीत पुढे सम्रुद्र शांत झाला, आणि त्या दोघानीही प्रार्थना केली.
संकटकाळीच विश्वास कामी येतो, आणि मजेशीर गोष्ट म्हणजे संकटकाळी पहिली गोष्ट लोक गमावतात आणि ती म्हणजे विश्वास.  जेंव्हा त्याची अत्यंत गरज असते तेंव्हाच लोक विश्वास गमावतात, म्हणूनच विश्वास ही एक देणगी आहे, तो तुम्ही कमावलेला नाही.  कोणीही असे म्हणू शकत नाही ‘माझा इतका विश्वास आहे, तर माझ्या बाबतीत असे का झाले?’ यात तुम्ही काय केले, विश्वास हा तुम्हाला मिळालेली भेट आहे. तुम्हाला जेंव्हा बोट दिली आहे तेंव्हा वल्हेसुद्धा दिले आहे. तसाच विश्वास हा तुम्ही कमावलेला नाही, तर संकटकाळी तो आवश्यकच होता. विश्वास हा तुम्हाला मिळालेली देणगी आहे हे लक्ष्यात घेणे अत्यंत, अत्यंत, अत्यंत महत्वाचे आहे.
‘मग काय?’ मग काही नाही. ‘मी विश्वास कसा वाढवू?’  काही करू नका, विश्राम करा, तुम्ही काही करू शकत नाही. मी इतकेच सांगतोय की तुमच्यातील कर्तेपणा सोडून द्या? आता तुम्ही विचाराल ‘मी कर्तेपणा कसा सोडू?’ हा अगदीच खुळचट प्रश्न लोक विचारतात. ‘मी कर्तेपणा कसा सोडू?’’ तुम्ही कर्ते नाही, हेच तर मी सांगतोय. कर्तेपणा सोडण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा कर्ते असायला हवे. पण तुम्ही कर्ते सुद्धा नाही, तर मग सगळेच झाले, तुम्हाला काही करायचे नाही, समजले?
ह्या ज्ञानामुळे प्रचंड मुक्तीचा अनुभव होतो ‘मी कशाहीबद्दल काहीही करू शकत नाही’ आता मला हे विचारू नका ‘मी कशाहीबद्दल काहीही करू शकत नसल्याबद्दल मी काय करू?’ (श्री श्री स्मित करतात)
प्रश्न: अध्यात्मीक मार्ग हा प्रत्येकासाठी वेगळा, अनोखा आहे का? असेल तर तुमच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन कसे मिळेल?
श्री श्री: होय आम्ही प्रत्येकाला व्यक्तिश शिकवतो, आणि तरीही सगळ्यांबरोबर शिकवतो. जगात ७ अब्ज लोक आहेत आणि खूप थोडे शिक्षक, तरीही आम्ही प्रत्येकाला शिकवू. या ७ अब्ज लोकांमधील ०.०००००००००००००००००१ टक्के लोकांमधील तुम्ही एक आहात.
प्रश्न: गुरुजी, मी सध्या आयुष्याच्या अवघड परिस्थितीतून जात आहे, आणि मला एकामागोमाग एक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मी समस्या सोडवण्याचा अध्यात्मिकदृष्ट्या, व्यावहारिक, ज्योतिषशास्त्रीय प्रयत्न करत आहे, पण कशाचाही उपयोग होत नाही. मी नियमित साधना करत आहे, अजून काय करू?
श्री श्री: पण आयुष्य चालते आहे. मागे वळून पहा, जर तुम्ही कोणत्याही समस्या सोडवल्या नसतील तर तुम्ही अस्तित्वात कसे आहात? तुम्ही शांत बसून वास्तव समजावून घ्या, किंवा दुसऱ्या कोणाला तरी मुल्यांकन करायला लावा. मागच्या १० वर्ष्यात तुम्हाला फक्त समस्याच आल्या का? आणि जर आल्या असतील तर १० – १५ वर्ष्यात तुम्ही एकही समस्या सोडवली नाहीत? तसे असेल तर मग समस्या सोडवण्याची गरज नाही, कारण ज्या समस्या आल्या त्या गेल्या सुद्धा, आणि तुम्ही जिवंत आहात, आणि साधना करत आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे, याचा अर्थ समस्या तुमचे काहीही वाकडे करू शकल्या नाहीत. समस्या आल्या आणि गेल्या, तुम्हाला काहीही करायची गरज पडली नाही. तुमच्या लक्ष्यात येतंय मी काय म्हणतोय?   
कुठलीही गोष्ट सामन्यीकृत करू नका, तिला खुणचिट्ठी लावू नका. ‘माझे आयुष्य अपयशी आहे, मला सतत समस्या आहेत’ सतत समस्या आहेत, अशक्य आहे !!
ज्यांना मोठ्या समस्या आहेत त्यांच्याकडे बघा, माझ्या समस्यांकडे बघा. मला रोज किती प्रश्नांना उत्तर द्यावे लागते माहित आहे? कोणीतरी म्हणाले ‘गुरुजी, तुम्ही प्रत्येक प्रश्नाला $१० जरी आकारले असते तरी तुम्ही बिल गेट पेक्षा मोठे झाले असता’ शक्य आहे, मी त्या माणसाशी सहमत आहे. तुम्हाला माहित आहे मला किती ई-मेल येतात? १०१००० इ-मेल.
मागच्या महिन्यात मी १२ देशात १८ शहरातून फिरलो. १९ तास मी व्यस्त होतो. आताच मी मोठ्या दौऱ्यावरून आलो आहे आणि लगेच मला १०० प्रश्नांना उत्तर द्यायचे आहे. लोकांना आहेत तसे स्वीकारा, वेगवेगळया प्रकारचे लोक आहेत, द्विदृवी,  छीनमनस्कता, आणि इतर वेगवेगळे लोक. मला कधी कोणावर वैतागलेले बघीतले आहे का? कल्पना करा अशा परिस्थितीत शहाणे राहणे कठीण असते. मी ऐकले आहे की मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्या पेशात काही काळानंतर स्वतः रुग्ण होतात, कारण ते लोकांच्या समस्या ऐकत राहतात.
मायकेल फिशमन एकदा डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णांसाठी कोर्स घेत होता, त्याने सांगितले ‘गुरुजी, त्यातील डॉक्टर कोण आणि रुग्ण कोण हे ओळखणे कठीण होते’ यात कितपत तथ्य आहे माहित नाही पण मी ऐकले आहे की या क्षेत्रातील डॉक्टर स्वतः रुग्ण होतात.
AIIMS (ऑल इंडिया इंस्नटीतुट ऑफ मेडीकल सायन्स) ने नुकतेच एक सर्वेक्षण केले, त्यात म्हंटले आहे ७८% डॉक्टर आजारी आहेत ते स्वतःच रुग्ण आहेत. सर्वेक्षणाचे हे निरीक्षण, थक्क करणारे आहे, नाही!!
ज्यांना खूप जास्त समस्या आहेत त्यांच्याकडे बघा, तुम्हाला तुमच्या समस्या क्षुल्लक वाटतील. जगात सगळीकडे समस्या आहेत. कोणाला समस्या नाहीत? येशूला सुद्धा मोठ्या समस्या होत्या. संपूर्ण काथोलिक चळवळ येशूच्या शिकवणूकीपेक्षा, समस्यांपासून उफाळून आली. सगळे व्यथावर केंद्रित होते, नाही? शिकवणूक तर होतीच पण व्यथा महत्वाच्या होत्या. क्रॉस, ख्रिस्तप्रतिमा ही ख्रिस्तनांची निशाणी आहे.
कृष्णाच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे. त्याला शेवटपर्यंत अनेक समस्या होत्या. त्याला शेवटी सगळे सोडून द्यावे लागले. त्याने जवळच्या लोकांना सांगितले ‘तुम्ही सगळे उत्तरेकडे जा. हे माझे शहर बुडणार आहे’. त्याचे स्वतःचे नातेवाईक अहंकारी होऊन आपसात भांडत होते. कृष्णाचे नातेवाईक, सैनिक आणि राज्यातील सगळे लोक भयंकर अहंकारी झाले होते, कारण त्यांना वाटले की ज्ञानोदयी कृष्ण आपल्याच मालकीचा आहे. ‘स्वतः देव आमचा आहे आणि आम्ही त्याच्या परिवारातील आहोत, आमचे कोण काय वाकडे करणार?’ अहंकारापोटी ते स्वतःशी लढले आणि दुसऱ्याबरोबर स्वतःचा विनाश केला. म्हणूनच मी सांगतो इथे परिपूर्णता, बिनचूकपणा बघू नका, जे जग परिपूर्ण नाही. जेवढी परिपूर्णता तुम्ही आणू शकाल तेवढी आणा, आणि सोडून द्या.
तुम्हाला जमेल तेवढे नक्कीच करा, गोष्टी अपरीपूर्ण सोडा असा त्याचा अर्थ नाही. जेवढी परिपूर्णता जमेल तेवढी आणण्यासाठी तुमचा जन्म आहे, तेवढे पुण्य तुम्हाला मिळेल. या मार्गावर जेवढे तुम्ही चालाल जेवढा तुमच्यातील गुणांचा उत्कर्ष होईल, आणि तितके तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही काहीच केले नाहीत तर दुखीः राहाल. जेवढे तुम्ही करायला हवे ते करा आणि मुक्त व्हा.