आपत्त्तीमध्ये श्रद्धा कशी टिकवून ठेवावी?

23
2013
Jun
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, जर्मनी आणि युरोपच्या काही भागातून आम्ही इतक्यातच सर्वनाशी पुराचा सामना केला. आपले पर्यावरणाप्रतीचे कर्तव्य यावर तुमचा काय संदेश आहे आणि सामाजिक माध्यमे यात आम्हाला कसा काय पाठींबा देऊ शकतात?

श्री श्री : नैसर्गिक आपत्त्या येत राहतात आणि मानवी चुकांमुळे त्यात वाढ होते. अशा जागा जिथे आपल्याला माहिती आहेत की या प्रकारच्या आपत्ती घडतात, आपली त्यांना तोंड देण्याची तयारी अतिशय थोडी असते. ही अशी बाब आहे ज्याने मला फार चिंता होते.

केदारनाथ इथे हजारो लोकांचे प्राण अतिशय भयानक अश्या पुरामध्ये गेले आहेत. आपले पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष हे काही अंशी याला कारणीभूत आहे. आपण पर्यावरणाची घ्यायला पाहिजे तशी काळजी घेत नाही. हिमालय पर्वताचे वितळणे ही एक मोठी समस्य आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड करीत आहोत. अधिक शक्ती मिळवण्याच्या नावाखाली आपण अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या आपण निराळ्या प्रकारे करू शकलो असतो.

दुसरी गोष्टी म्हणजे जरी हजारो लोक तिथे जात असतील तरीसुद्धा भारतातील तीर्थयात्रेकरू हे दुर्लक्षित आहेत. मी तर म्हणेन की त्यांनी या भागांमध्ये अधिक चांगले मार्ग आणि जलद सुटकेकरिता पर्यायी मार्ग बनवले पाहिजे. पूर हे येणारच, विध्वंस होणारच, परंतु आपण निदान लोकांचे जीव तरी वाचवू शकतो.

कँलगँरी आणि युरोप इथे लोकांच्या जीवाला इतका अपाय झाला नाही. त्सुनामीनंतरच्या नजीकच्या वर्षांमध्ये आपण इतके जीव गमावलेले नाहीत. ही तर हिमालयन त्सुनामी आहे. आपले आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ते तिथे आहेत आणि लोकांना मदतीच्या जिन्नसा देत आहेत. आपले कार्यकर्ते हे जर्मनी आणि कँलगँरी इथेसुद्धा कार्य करीत आहेत.

मी या कोणत्याही कार्यकर्त्यांना सांगितलेले नाही की त्यांनी जाऊन मदत कार्य करावे. आपले चैतन्य जेव्हा उंचावते तेव्हा असे घडून येते. आपली हृदयाला मानवी मुल्ये जाणवतात. अशा परिस्थितीत ते स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देते आणि लोक यात उड्या मारतात आणि माणसांचे भले करण्याकरिता उत्तमोत्तम कार्य करतात.

या अशा प्रसंगातून आपल्या मानवतेची परीक्षा घेतल्या जाते; तुम्ही खरोखर मानव आहात की यंत्रमानव आहात ते. अशा प्रसंगांमधून आपल्याला दुर्दैवी लोकांसाठी आणि ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी आपला मदतीचा हात पुढे करावा लागतो. म्हणून मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र यावे आणि कधीही आणि कुठेही अरिष्ट ओढवेल तिथे मदत करावी.

सरकारने काळजी घेतली पाहिजे. अश्या आपत्तींचा अंदाज आधीच वर्तवण्यासाठी हवामान खाते आहे ज्यामुळे वेळीच काळजी घेऊन लोकांचे प्राण वाचवता येतील.या दिशेने बरेच कार्य करता येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतःचे एक शास्त्र आहे. नेक इरादा असलेल्या व्यक्तींनी याला हातभार लावावा आणि पुढे येऊन अश्या परिस्थितीत मदत करावी; आणि ते तशी मदत करीत आहेत. जे अपत्तीग्रस्तांचे जीवन चांगले करण्याकरिता प्रयत्न घेत आहेत त्यांचा मी खरोखर आभारी आहे.

इथे मला भारतीय सेना आणि जवान ज्यांनी लोकांची मदत करण्याकरिता आपला जीव धोक्यात घातला त्यांनासुद्धा मी धन्यवाद म्हणतो. त्यांचे समर्पण आणि मदत ही अमूल्य आहे आणि आपण त्यांना त्यांच्या यत्नांकरिता त्यांचे आभार मानले पाहिजे.

प्रश्न : एक अभूतपूर्व आपत्ती केदारनाथ इथे ओढवली आणि हजारो लोकांनी प्राण गमावले आणि त्यांची ताटातूट झाली. ते सर्व तीर्थयात्रेला प्रार्थना करण्यासाठी गेले होते आणि त्यांना या आपत्तीला तोंड द्यावे लागले. या स्थितीत अनेक लोकांच्या श्रद्धेला तडा गेला असेल. आम्ही याला कसे हाताळावे?

श्री श्री : सर्वप्रथम, आपण हे समजून घेतले पाहिजे की देव हा समदर्शी आहे. निसर्ग हा निःपक्षपाती आहे. तो हे बघत नाही की तुमचे काय आणि माझे काय. देव केवळ केदारनाथ इथे वास करीत नाही. तो सर्वत्र आहे. तो तुमच्या हृदयात आहे. तो सर्व ठिकाणी आहे.

जिथे अनेक यात्रेकरू जातात अश्या तीर्थयात्रेच्या स्थळांवर मोठ्या जमावाला हाताळण्याच्या पुरेश्या सोयी उपलब्ध नाहीत आणि आपल्या देशातील सर्व तीर्थयात्रेच्या स्थळांवर बरेच दुर्लक्ष झालेले आहे. या ठिकाणी चांगल्या सोयी, चांगल्या सडका, चांगल्या दळणवळणाची साधने असायला हवीत आणि यावर जितके दिल्या गेले पाहिजे तितके लक्ष पुरवलेले नाही.

असे अनेक प्रसंग येतात जेव्हा श्रद्धा डळमळीत होते, परंतु काहीही होऊ दे आपण ‘सत्याचा नेहमी विजय होतो’ आणि जे चांगले असते त्याला न्याय हा मिळतोच या आपल्या श्रद्धेला घट्ट पकडून ठेवले पाहिजे.ही वेळ प्रार्थना करण्याची आहे. जेव्हा आपत्ती येतात, जेव्हा आपल्या मनावर भयाचा पगडा असतो तेव्हा प्रार्थनेने मदत होते. अवसान गळू देऊ नका. प्रत्येक जागा ही देवाच्या मालकीची आहे. आपत्ती या येतातच आणि आपत्तीच्या काळातच तुमच्या श्रद्धेची कसोटी होते. तुमच्या श्रद्धेला पकडून राहा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही काय मदत करू शकता ते.

कित्येक जीव वाचवल्या गेले आहेत. त्या जीवांकरिता आभार माना. आणि ज्यांनी जीव गमावला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करा. या प्रचंड दुःखातून त्यांचे कुटुंब बाहेर येऊ देत. या दुर्दैवी प्रसंगातून बाहेर येण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो. ही प्रार्थना आपण केली पाहिजे. जे वाचवल्या गेले आहेत त्यांच्याकरिता प्रार्थना करा आणि त्यांनी सहन केलेल्या अश्या भयंकर परिस्थितीतून त्यांना वाचवण्यासाठी देवाचे आभार माना.

मानवी दुःखांतिकेचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. आता आपण जागे व्हायला पाहिजे आणि अश्या बिकट आणि अवघड भूभागातील अडचणी लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. योग्य रस्ते आणि चांगली दळणवळणांची साधने आणि परिवहन व्यवस्था आपण केली पाहिजे. हे अत्यंत तातडीचे आहे. दीर्घकाळापासून लोक तिथे जात आहेत आणि या आपत्तीमुळे ते तिथे पुन्हा जायचे थांबवणार नाहीत.

या शोकांतीकेपासून आपण धडा घेऊ या. या ग्रहावर मानवी निष्काळजीपणामुळे अश्या प्रकारची शोकांतिका परत कधीही घडता कामा नये. याच्या पलीकडे पण काही वर्तवू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. म्हणून आपण मानवी निष्काळजीपणा जितका अधिक शक्य होईल तितका अधिक कमी केला पाहिजे.

प्रश्न : ब्राझील इथे इतक्यात झालेली निदर्शने यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झाला आहे. आपण याला कसे काय हाताळावे?

श्री श्री :  जेव्हा लोकांना न्याय मिळत नाही किंवा जेव्हा ते समाजातील भ्रष्टाचारामुळे कंटाळून जातात तेव्हा त्यांचा भडका उठतो. लोक निदर्शने करण्यास, निषेध नोंदविण्यास एकत्रित होतात. लोक जागृत होत आहे ही एक चांगली खुण आहे.

एक पद्धत आहे जे जसे येते आहे तसे ते स्वीकारीत जायचे, त्याची फिकीर करायची नाही आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनून राहायचे. दुसरी पद्धत आहे की जागे व्हायचे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, जे तुम्हाला योग्य वाटत नाही त्याच्याविरुद्ध उभे ठाकायचे. या दृष्टिकोनाचे स्वागत आहे. आपण याचे खरोखर कौतुक केले पाहिजे.

एका गोष्टीकडे आपण निश्चित लक्ष ठेवले पाहिजे की जमावाने असामाजिक किंवा हिंसक होता कामा नये. निदर्शने शांत असतील, ते एका कारणासाठी आहेत आणि कोणत्या व्यक्तीच्या विरुद्द नाहीत कारण लोक बदलतात आणि स्वतःचे रुपांतर घडवून आणणे प्रत्येकाला शक्य असते हे आपण लक्ष ठेवणे जरुरी आहे. लोकांमध्ये परिवर्तन येते हे आपण ओळखले पाहिजे. म्हणून अश्या निदर्शांचा शिष्टाचार आपण पाळला पाहिजे आणि ही निदर्शने शांततापूर्वक आणि हेतुपूर्वक असली पाहिजे.

जेव्हा आपण शांत नसतो तेव्हा आपण हेतू आणि ध्येय हेसुद्धा गमावून बसतो. माझे तर म्हणणे आहे की कोणत्याही लढा हा अहिंसेच्या तत्वावर आधारित असला पाहिजे. ते एका कारणासाठी असले पाहिजे आणि एकाद्या व्यक्तीच्या विरुद्ध असता कामा नये. जन आणि मालमत्ता यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये. या नियमांवर हे घडले पाहिजे.

चांगला हेतू असणारी माणसे निदर्शने सुरु करतात आणि नंतर ध्येयावर केंद्रित राहणे मुश्कील होऊन बसते कारण असामाजिक तत्त्वे प्रवेश करतात आणि हिंसाचार सुरु करतात. इथेच लोकांनी हिंसाचार आणि नासधूस यांच्या वाईट परिणामाबाबत जागरूक होणे गरजेचे आहे.

जर निषेध नोंदविताना किंवा निदर्शनाच्या अग्रभागी अहिंसा ठेवली तर त्याचे स्वागत केले पाहिजे. जर हिंसेला सुरुवात झाली तर ती शांत करण्याकरिता बळाचा उपयोग करणे याच्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. हे अतिशय कठीण होऊन बसते. मी पुन्हा जोर देऊन सांगतो की आपण शांततापूर्ण क्रांती, अहिंसात्मक क्रांती घडवून आणली पाहिजे. आजच्या घडीला याची फार फार गरज आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, हिंसाचाराचा वापर न करता आम्ही आमच्या नागरी आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण कसे करू? सरकार ही ध्रुवीकरण प्रबलीत करीत आहे आणि ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत आहे अशा परिस्थितीत समाजात तद्भाविता कशी काय निर्माण करावी?

श्री श्री : मोठ्या ध्येयामध्ये अनेक अडचणी आणि अनेक अडथळे येतात. जेव्हा आव्हाने ही मोठी असतात तेव्हाच आपल्याला आपल्या नीतीमूल्यांना पकडून ठेवले पाहिजे. मला माहिती आहे की जेव्हा अन्याय होत असतो तेव्हा शांत राहणे हे कठीण असते, आणि खास करून जेव्हा हिंसाचार होत असतो. आपल्याला ती अधिक काळजी घेतली पाहिजे आणि आपली तडफ जिवंत ठेवली पाहिजे. आपण असे म्हटले पाहिजे की काय वाट्टेल ते होवो आपण आपल्या लोकशाही हक्कांच्या ध्येयाला पडकून ठेवले पाहिजे.

जेव्हा तुमचा निर्धार पक्का असतो तेव्हा मी सांगतो की ज्या लहानसहान अपयशांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल ती काहीच नसतील. तुम्ही तरीसुद्धा पुढेच जात राहाल. 

न्याय मिळवणे आणि तुमचे मानवी हक्क आणि मानवी मुल्ये पाहिजे असणे हे तितके सोपे नाही. ही मजल फार लांबची आहे. समाजात निहित हितसंबंध असतात आणि केवळ सत्तेला कवटाळून बसणारे लोक असतात. काहीही विचार न करणारे लोक असतात आणि त्यांना केवळ हिंसाचाराची भाषा कळते. जेव्हा असे दृश्य असते तेव्हा आपल्या ध्येयाचा पाठपुरावा शांतपणे आणि अहिंसेच्या मार्गाने करीत असताना आपल्याला अधिक खबरदारी घेणे जरुरी आहे.

सत्याचा नेहमी विजय होतो असे नैतिक धैर्य आपल्या माणसांना आपण दिले पाहिजे. जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सत्याचा विजय होईल तेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि अत्यंत जरुरी असलेल्या धैर्याने येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकाल. 

जेव्हा आपण उदास, तणावग्रस्त आणि क्रोधीत होतो तेव्हा आत कुठेतरी आपण डगमगतो आणि आपली उर्जा गमावून बसतो. कोणतेही मोठी कार्य करण्यास आपल्याला प्रचंड उर्जेची आवश्यकता असते आणि ही प्रचंड उर्जा आपल्या आतून एक प्रकारच्या शांततेतून येते.

दुसरी गोष्ट म्हणजे संवादाकरिता नेहमी दार उघडे ठेवा.

तिसरे म्हणजे कोणतीही व्यक्तीला किंवा व्यवस्थेला वाईट असे लेबल लावू नका. एकदा का तुम्ही लेबल लावले की मग संवादाकरिता तुम्ही दार बंद करता. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश लोकांना वाईट असे लेबल लावले नाही. त्यांनी संवादाचे ते दार सदैव त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते. त्यांच्या अगणित अत्याचारानंतरसुद्धा गांधीजी संवादाकरिता त्यांच्याकडे जात राहिले. इतर लोक किंवा सरकार हे लोकांच्या विरुद्ध आहे असा आपण विचार करता कामा नये. त्याने आपण अजून क्रोधीत होऊ, आणि जेव्हा आपण क्रोधीत होतो तेव्हा आपण आपली अधिक उर्जा गमावून बसतो.

सर्वात उत्तम म्हणजे संवादाकरिता उपलब्ध राहणे, न्याय, लोकशाहीचे अधिकार, शांती, समृद्धी आणि प्रगती याबाबतीत तुमच्या दृष्टीकोनात तुम्ही खंबीर राहा. स्वतः अविचल राहा आणि निदर्शने करताना लोकांना अविचालीत आणि शांत राहण्यास प्रोत्साहन द्या. मला माहिती आहे की हे बोलणे फार सोपे आहे आणि करणे एकदम कठीण, परंतु तरीसुद्धा आपण या दिशेने सरकले पाहिजे म्हणजे मग विजय हा आपलाच असेल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, पाकिस्तानातील मुस्लीम हे शांतीप्रिय आहेत, म्हणून आम्ही पाकिस्तानांतून दहशतवाद कसा काय नष्ट करू शकतो?

श्री श्री : दहशतवादाला आवर घालण्यासाठी आपण संवाद कसा काय साधू शकतो हे आपण पाहायला पाहिजे आणि दहशतवाद्यांच्या मनात जाणीव निर्माण केली पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण विविधतेचा स्वीकार केला पाहिजे आणि विविधतेचा आनंद लुटला पाहिजे. विविधता हे तंट्याचे किंवा भांडणाचे कारण होऊ शकत नाही, विविधता ही उत्सव साजरा करण्याची गोष्ट आहे.

प्रत्येकजण निराळे आहे.प्रत्येकजण वेगळे वस्त्र परिधान करून आहेत, आणि प्रत्येकाची जीवनशैली ही निराळी आहे. आपण वैविध्य स्वीकारले पाहिजे आणि वैश्विक कुटुंबाचा दृष्टीकोन ठेवायला पाहिजे. आपण सगळे एक विश्व कुटुंबाचे आहोत जरी आपल्या भाषा वेगळ्या आहेत, धर्म वेगळे आहेत, संस्कृती निराळी आहे आणि राष्ट्र वेगळे आहेत. विविधतेचा हा उत्सव साजरा करणे हे तरुण मनांवर बिंबवले पाहिजे. एकदा का त्यांना हे माहिती झाले की मग ते अतिरेकी किंवा दहशतवादी होणे शक्यच नाही.

दहशतवाद येतो जेव्हा त्यांना वाटते की केवळ त्यांच्याकडेच स्वर्गाची चावी आहे. ही भ्रामक कल्पना किंवा हा एक गैरसमज आहे जो त्यांना अशा स्थानी नेऊन ठेवतो.अतिरेकी आणि दहशतवादी मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या संबंधात मी आलेलो आहे. दोन प्रकारचे अतिरेकी असतात, एक असतात धार्मिक अतिरेकी आणि दुसरे असतात वैचारिक अतिरेकी.

भारतातील माओवाद्यांकडे कारण आहे आणि त्या कारणासाठी ते आपले प्राण त्याग करण्यास तयार असतात. त्यांना एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे इतरांना दुःख आणि हाल अपेष्टा दिल्याने त्यांच्या ध्येय पूर्ती करता मदत होणार नाही किंवा त्यांना त्याने कोणताही आनंद प्राप्त होणार नाही. आपण हे विविधतेचे शिक्षण लोकांपर्यंत नेले पाहिजे, त्यांच्याबरोबर संवाद प्रस्थापित केला पाहिजे आणि ‘केवळ मी बरोबर आहे आणि बाकीचे सर्व चुकीचे’ अश्या चुकीच्या अभिव्यक्तीमध्ये फसण्यापासून थांबवले पाहिजे.

जर या लोकांनी थोडेफार श्वसन केले, थोडे शिथिल झाले आणि सृष्टीतील सौंदर्य पहिले, विविधतेतील सुंदरता तर मला खात्री आहे की ते नक्कीच बदलतील. आणि मी अनेकांना त्यांची विचार करण्याची पद्धतीमध्ये बदल घडून येताना बघितले आहे. त्यांच्यात काही चुकीचे मतरोपण असते, काही अनोळखी भीती असते, किंवा ते स्वतः हिंसाचाराचे बळी असतात. हे ते कारण असू शकते ज्यामुळे ते इतकी अतिरेकी विचार प्रणाली स्वीकारतात जी स्वयं विनाशी आहे.

प्रश्न : अर्जेन्टिनामधील राजकीय वर्गाला आम्ही कसे काय समजवावे की समाज बांधण्याचा सर्वोत्तम मार्ग हा शांतीतून आहे?

श्री श्री : आपण राजकारणाला अध्यात्मीक, व्यवसायाला सामाजिक आणि धर्माला धर्मातीत करायला पाहिजे. हे उत्तर आहे. धर्मातीत असणे म्हणजे धार्मिक लोकांनी संपूर्ण जगाचा विचार केला पाहिजे, केवळ त्यांच्या धर्माचा किंवा त्यांच्या जातीचा नाही. त्यांच्या धर्माचे पालन करणाऱ्यांबरोबरच धार्मिक लोकांना नेहमी जवळीक वाटते. त्याने या अडथळ्यातून बाहेर यावे आणि संपूर्ण जगाकरिता प्रार्थना करावी.

त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यावसायिकाने थोडे फार सामाजिक अभियांत्रिकी करावी, किंवा काहीतरी सामाजिक जबाबदारी उचलून घ्यावी. ते याचा भाग असले पाहिजे.

राजकारणी लोकांनी प्रथम राष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे, नंतर त्यांचा पक्ष आणि नंतर स्वतःबद्दल. आज काय होते आहे तर ते सर्वात आधी स्वतःचा विचार करतात, नंतर पक्षाचा, आणि जर काही उरले तर मग राष्ट्राचा. या प्रथेला ताबडतोब पालटले पाहिजे.

जेव्हा ते मोठा भलेपणा करण्याची काळजी घेतली, समाजातील तमाम लोकांकरिता, तर मग साहजिक आहे की ते अध्यात्मिक असतील, त्यांना शांतता प्रिय असणे हे नैसर्गिक असेल आणि जगभरातील समाजात कोलाहल निर्माण करणारी संकुचित वृत्ती गायब होऊन जाईल.

सत्ता आणि पैसा येतात आणि जातात परंतु आपल्या वागणुकीतून, आपल्या कृतीमधून आपण जो चांगुलपणा निर्माण करतो तो कायम राहतो. हेच ते काय राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.त्यांचा निकटदृष्टीकोन असता कामा नये तर त्यांचा दृष्टीकोन हा अधिकाधिक लोकांचे दीर्घकालीन भले होणारा हवा. हे त्यांनी त्यांची कार्यप्रणाली म्हणून ठेवले पाहिजे. ती सर्वात आदर्श गोष्ट राहील.

म्हणून शांती ही पूर्णपणे महत्वाची आहे. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला अश्या कल्पना सुचतात. जेव्हा आपण शांत नसतो तेव्हा आपण फार विचलित असतो आणि आपण अश्या कृती करू आणि असे विचार मनात आणू ज्यामुळे शांती नाही तर अजून अशांती निर्माण होईल. म्हणून सर्वांनी ध्यान करणे जरुरी आहे!

प्रश्न : शांतता म्हणजे काय आणि आम्ही आमच्या जीवनात आमचा धर्म, संस्कृती आणि परिवार यांच्यामार्फत आणि शिशुवर्गापासून सुरुवात करून आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये शांतीच्या तत्त्वांची कशी काय अंमलबजावणी करावी

श्री श्री : आपण मुलांकडून जास्तीतजास्त शिकले पाहिजे. त्यांनी रोज एक नवीन मित्र बनवला पाहिजे हे आपण त्यांना समजावण्याची गरज आहे.

चाळीस पन्नास मुलांच्या वर्गात जर तुम्ही विचाराल की त्यांचे किती मित्र आहेत तर उत्तरात नेहमी हाताच्या बोटावर मोजण्याइतके हेच मिळते, आणि ते त्या मित्रांसोबत वर्षभर राहतात. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाला आपण बाहेर आणण्याचे काम केले पाहिजे. आणि ते घडून येण्यासाठी रोज एक नवीन मित्र बनवण्यासाठी आपण त्यांना सांगायला पाहिजे. तुमचा अपमान होत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. हसा आणि सोडून द्या. विनोदबुद्धी आणि खेळकरपणा ठेवा. विविधतेचा आदर राख. 

जर कोणी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले असतील किंवा वेगळे दिसत असतील किंवा काहीतरी निराळे करीत असतील तर त्यांना परग्रहावरून आल्यासारखी वागणूक देऊ नका पण त्यांना तुमचा भाग असल्याची भावना वाटू द्या. 

धर्माचा उद्देश्य हे आपल्या जीवनात प्रेम आणि शांतता आणणे हे आहे. आपण एका वैश्विक सत्य, वैश्विक आत्मा आणि वैश्विक प्रेम यांच्याबरोबर जोडले जाणे आणि तसेच आपल्या सोबत असणाऱ्या माणसांची मदत करणे हेच धर्माचे कारण आहे. तर धर्माचे सार आहे दिव्यत्वाचा, प्रकाशाचा, प्रेमाचा आंतरिक अनुभव घेणे आणि हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि यावरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक विविधता. संस्कृती ही दर काही किलोमीटरवर बदलते. तुम्ही एक शंभर किलोमीटर प्रवास करून जा आणि बोलीभाषा बदलेले, अन्न बदलेले आणि ही विविधता तर आपल्या सृष्टीतील सौंदर्य आहे. आपण याचे कौतुक केले पाहिजे. याला तंट्याचा मुद्दा बनवण्यापेक्षा आपण याला उत्सव साजरा करण्याची संधीमध्ये बदलून टाकले पाहिजे. हे अतिशय महत्वाचे आहे आणि हे सर्व करण्याकरिता आपल्याला उर्जेची आवश्यकता आहे.

जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा आपल्याला उर्जा कशी काय मिळू शकेल? इथेच तर आपल्याला काही श्वसनाचे व्यायाम करणे, योग्य आहार घेणे आणि जीवनात काही विनोद असणे जरुरी आहे आणि सर्वात महत्वाचे आहेत ती रोजची दहा ते पंधरा मिनिटे जी शिथिल होण्यास अथवा ध्यान करण्यास असतात. मी याची शिफारस सगळ्यांना करतो. केवळ दहा ते पंधरा मिनिटे, बसा आणि शिथिल व्हा, तुमच्या मनाला शिथिल करा, तुमच्या बुद्धीला शिथिल करा, आतल्या दिशेने जा, स्वतःच्या श्वासाचे निरक्षण करा, तुम्हाला कळेल की तुम्ही एक उर्जेचे कारंजे आहात, तुम्ही प्रेमाचा सागर आहात आणि तुम्ही कल्पनांचा डोंगर आहात.

प्रश्न : कोरियामध्ये आत्महत्येचे प्रमाण फार जास्त आहे. कोरियातील मुले ही अशा वातावरणात वाढून राहिली आहेत जिथे अतिशय स्पर्धा आहे आणि संस्कृती व अध्यात्म यांचा अभाव. कृपा करून आमच्यासाठी तुमचे ज्ञानाचे शब्द पाठवा.

श्री श्री : जेव्हा उर्जेची पातळी खालावते तेव्हा तुम्ही उदास होता आणि जर ती आणखी खालावली तर आत्महत्येच्या प्रवृत्ति निर्माण होतात. नीट श्वसनाचे व्यायाम, थोडे ध्यान आणि चांगली व प्रेमळ सांगत याने उर्जेची पातळी उंचावते.

नेहमी जेव्हा कधी आपली मनात काही नकारात्मक विचार आले की आपण ते कोणाबरोबर वाटून घेतो आणि ज्यांना आपण मित्र म्हणवतो असे लोक या नकारात्मकतेला दूर करायचे सोडून ती अजून घट्ट करतात. ते म्हणतात, ‘होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि सर्व काही निराशाजनक आहे!’ वास्तविक पाहता त्यांनी तुमचा उत्साह आणि उर्जा यांची पातळी वाढवायला पाहिजे.

केवळ गरीब माणसे आत्महत्या करितात असे नाही तर श्रीमंत माणसेसुद्धा आत्महत्या करतात कारण आत्महत्येच्या प्रवृत्ती करिता त्यांची मनःस्थिती जबाबदार असते. याचे भौतिक संपदेबरोबर काही देणे घेणे नसते. मी तर म्हणेन की आत्महत्येची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीला कोणीतरी ध्यान, काही श्वसनाचे व्यायम शिकवले पाहिजे म्हणजे त्यांची उर्जेची पातळी उंचावेल. आणि हे शक्य आहे.

स्वतःविरुद्ध हिंसा ही दुसऱ्याच्याविरुद्ध हिंसेइतकीच वाईट आहे. तर जग हे एकीकडे सामाजिक हिंसा आणि दुसरीकडे आत्महत्या यामध्ये अडकले आहे. केवळ अध्यात्मच आहे जे त्यांना केंद्रित करू शकते आणि त्यांना या दोन टोकांपासून वाचवू शकते.

जर तुम्हाला कोणी थोड्याजरी आत्महत्येच्या प्रवृत्तीचे आढळले तर कृपा करून त्यांना थोडा योग करण्यास सांगा. त्यांना चांगल्या संगतीत आणा, त्यांना गायला आणि नाचायला लावा, आणि त्यांना हे समजावा की जीवन हे केवळ थोड्या भौतिक अवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. कोणाकडून टीका किंवा कौतक यापेक्षा जीवन खूप काही जास्त आहे. जीवन हे एक नाते किंवा नोकरी याच्यापेक्षा खूप मोठे आहे. नातेसंबंधातील अपयश, नोकरीतील अपयश आणि जे मिळवायचे होते ते जीवनात न मिळणे ही आत्महत्येची करणे आहेत. तुमच्या चेतनेमध्ये उठणाऱ्या छोट्याछोट्या इच्छा यापेक्षा जीवन फार मोठे आहे. जीवनाकडे एका मोठ्या दृष्टीकोनातून पहा आणि स्वतःला कोणत्या तरी सामाजिक कार्यामध्ये, सेवेमध्ये गुंतवून घ्या. 

सेवेमुळे लोक शहाणे रहातात आणि मानसिक उदासीपासून दूर राहतात. मानसिक उदासी ही आर्थिक मंदीपेक्षा फार खराब. हे निभावून नेण्याची आणि आपल्या नजीकच्या लोकांना मदत करण्याची आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे. डी आर्ट ऑफ लिविंग अश्या लोकांबरोबर काम करण्यात अतिशय गुंतलेले आहे आणि हे उदासी आणि आत्महत्येची प्रवृत्ती यांच्या संकटाचे उच्चाटन करण्याकरिता आणखी लोकांनी सहभागी झालेले मला फार आवडेल.

प्रश्न : व्यसनाधीनता ही समजतील सर्वात मोठी गंभीर समस्या आहे, यातून बाहेर कसे पडावे? तसेच व्यसनाधीन मुलांच्या पालकांसाठी तुमच्याकडे काही सल्ला आहे का?

श्री श्री : मुलांनी व्यसन जडेल आणि ज्यामुळे त्यांना अपाय होईल अशा पदार्थांना हात लावू नये अशा प्रकारचा अडथळा पालकांनी मुलांच्या मनात निर्माण केला पाहिजे. आपण त्याच्याविरुद्ध पूर्वग्रह निर्माण केला पाहिजे, एक मानसिक अडथळा जो त्या दिशेने पाहण्यापासूनसुद्धा थांबवेल. हे जरुरी आहे.

जसे एखादे झाड वाढवताना तुम्ही त्याच्या आजूबाजूला कुंपण लावता त्या झाडाचे संरक्षण करण्याकरिता. अगदी त्याचप्रमाणे आपण बालमनांना जपले पाहिजे, त्याकरिता काही मानसिक कुंपण घालणे जरुरी आहे. आपण त्यांना काही संकल्पना दिल्या पाहिजे ज्यांच्या आधारामुळे ते त्या दिशेने एक इंचसुद्धा पाऊल टाकणार नाही.

जे आता व्यसनाधीन आहेत त्यांना त्यातून बाहेर काढा, त्याचे तीन मार्ग आहेत: प्रेम, लोभ आणि भीती.जर त्यांचे कोणावर प्रेम आहे तर त्यांना प्रेम असलेल्या व्यक्तीची शप्पथ घ्यायला लावा की ते त्याला आता परत कधीच हात लावणार नाही. किंवा त्यांना सांगा की ते अतिशय भाग्यवान बनतील जर ते व्यसन असलेल्या पदार्थांना हात नाही लावतील.

ज्या कोणत्या प्रकारे जमेल त्यांना मदत करा यातून बाहेर येण्यासाठी. होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांच्यामध्ये अनेक उपचार आहेत. योग आणि ध्यान हे सुद्धा फार चांगले आहेत. केवळ योग आणि ध्यान यामुळे मिलियन्स लोकांना मी व्यसनाधीनतेपासून दूर झालेले पहिले आहे.

प्रश्न : जर कोणाला असे वाटत असेल की योग, ध्यान आणि प्राणायाम हे धर्मातीत नाही आहे, तर तुमचा त्यांच्यासाठी काही सल्ला आहे का?

श्री श्री : ज्यांना योग, ध्यान आणि प्राणायाम धर्मातीत वाटत नाही अशा लोकांनी त्याचा प्रयोग केलेला नाही आणि त्यांची पूर्वग्रहदूषित मते आहेत. एखादा व्यायम किंवा एखादे तंत्र हे प्रत्येकासाठी आहे, त्याचा उपयोग प्रत्येकाला होतो. त्याने मन शांत होते आणि अधिक सृजनशील बनते. म्हणून लोकांनी आधी त्याचा प्रयोग केला पाहिजे आणि नंतर जर त्यांना दिसून येईल की ते किती धर्मातीत आणि किती वैश्विक आहे ते.

योग हा कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा अथवा त्यांच्या विश्वास प्रणालीचा विरोध करीत नाही. हा एक गैरसमज आहे आणि तो सहजपणे दूर करता येतो केवळ एकदा केल्याने.

प्रश्न : जगात अनेक धर्म आहेत. धर्म हे फुट पडण्याचे कारण आहे का किंवा धर्मामुळे एकजूट होते का?

श्री श्री : ज्ञानाशिवाय, विवेकाशिवाय धर्म हे लोकांमध्ये दुफळी निर्माण करीत आहे असे भासते. ते तुमचा गाभा बनते किंवा तुमच्या व्यक्तित्वाची एकुलती एक ओळख.

सर्वप्रथम वेगवेगळ्या धर्मांमध्ये तंटे उत्भवतात, नंतर तुम्हाला अंतर धर्मामध्ये भांडणे दिसतील आणि मग गट निर्माण होतात. हे सर्व घडते ते ज्ञानाच्या आणि समजुतीच्या अभावामुळे.

एक विवेकी माणूसाचा प्रत्येक धर्मामुळे फायदा होतो. आपल्या जीवनाचे मूल्य धर्म वाढवतो आहे का याकडे तो लक्ष ठेवतो. या विवेकाशिवाय जर तुम्ही धर्माला केवळ स्वतःची ओळख म्हणून धरून बसलात आणि स्वतःच्या परिपक्वतेकरिता नाही तर मग तो नक्कीच विभाजनाचे काम करेल.

आपली ओळख सर्वात आधी अशी पाहिजे की आपण सर्व एकाच प्रकाशाचा भाग आहोत. आपली दुसरी ओळख अशी की आपण सर्व एका मानवी समाजाचा हिस्सा आहोत, एक वैश्विक कुटुंबाचा हिस्सा. आणि तिसरी ओळख आपला देश किंवा भाषा होऊ शकते. चौथी ओळख असेल आपला धर्म. आणि पाचवी ओळख आपला वारसा किंवा आपला परिवार हे होऊ शकते.

तुमच्या इतर ओळखी असू देत, परंतु जेव्हा तुम्ही हे विसरता की तुम्ही मानवी समजाचा, एका वैश्विक प्रकाशाचा हिस्सा आहात, तेव्हा धर्माचा उपयोग आपल्या समाजामध्ये फुट पाडण्यासाठी आणि आपल्या नाशासाठी केल्या जातो. विवेकामुळे तुम्ही विविधतेचा उत्सव साजरा करू शकता आणि प्रत्येक धर्मातून त्याचा उत्कृष्ट्पणा घेऊ शकता म्हणजे मग तुमचे एका चांगल्या मानवामध्ये रुपांतर होते.

प्रश्न : श्री श्री, सर्वांकरिता तुमचा काय संदेश आहे?

श्री श्री : या धरतीवरील प्रत्येक चेहरा हे विश्वाचे एक पुस्तक आहे, देवाचे पुस्तक. प्रत्येकजण हे प्रेमाचे कारंजे आहे. हे प्रेम व्यक्त होऊ द्या, या कारंज्याला वाहू द्या; आणि या घडीला आपल्या ग्रहाला संपन्न करा. तुम्हा सर्वांना प्रेम आणि आशीर्वाद.