सुटकेचा केवळ एकच मार्ग

13
2013
Aug
बंगलोर, भारत

सत चित् आनंद  हे देवाचे रूप आहे, जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो तेव्हा आपण आतून अतिशय आनंदी होतो.

प्रश्न : गुरुदेव, मी गायत्री मंत्राला सार्वजनिक ठिकाणी वाजवलेले ऐकले आहे. दीक्षा घेणे किती महत्वाचे आहे?

श्री श्री : या सर्व तपशिलांमध्ये आपण नंतर कधीतरी जाऊ या.

गा-य-त्री -तीन प्रकारची दुःखे आहेत. आपल्याला तीन शरीर आहेत, भौतिक शरीर, तरल आणि नैमेत्तिक शरीर. आणि या तीनही पातळ्यांवर दुःख आहे. मानवी जीवनामध्ये या तीनही ओलांडून जायचे असते, आणि गायत्रीचा हाच अर्थ आहे. जो ते म्हणतो तो या दुःखाच्या सागरात तरुन परमानंदाकडे जातो.

प्रश्न : गुरुदेव,तुम्ही म्हणालात की संस्कृत भाषेमध्ये पाणी आणि प्रेम यांच्याकरिता एकच शब्द आहे. या संदर्भामध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करणे याला काही महत्व आहे का?

श्री श्री : होय,ते प्रतीकात्मक आहे.

प्राचीन काळी लोक हाताच्या ओंझळीत पाणी घेऊन, सूर्याकडे टक लावून पाहायचे आणि ते पाणी अर्पण करायचे. सूर्याकडे टक लावून पाहणे फार चांगले आहे, कारण आपले डोळे हे प्रकाशसंवेदी आहेत. म्हणून सूर्याकडे टक लावून पहिल्याने सूर्याची उर्जा शरीरात येते.

सूर्याकडे टक लावून पाहणे हे आता जगभर माहिती झाले आहे. जेव्हा लोक सूर्याकडे टक लावून पाहतात तेव्हा त्यांची भूक कमी होते, त्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गोष्टी घडतात.

जगभरात जेव्हा एखाद्याला अतीव वेदना होतात किंवा अतिशय प्रेमाचे भरते येते तेव्हा एक वाक्प्रचार वापरतात. तो वाक्प्रचार काय आहे? मला माझे हृदय रिते करावेसे वाटते आहे.

हृदय रिते करण्यामुळे तुम्हाला अर्पण केल्याची भावना वाटते. म्हणून जेव्हा तुम्ही शिवलिंगाला पाणी अर्पण करता तेव्हा सर्वस्व अर्पण केल्याचे ते प्रतिक असते, जिथे आपल्याला वाटते, ‘माझ्याकडे जे काही आहे, मी जो काही आहे ते सर्व,माझ्या देवा, तुझेच आहे.’

नमः न ममः अशी प्रार्थना आहे, माझे काहीही नाहीये, माझे जीवन माझे नाही,ते संपूर्णपणे तुझे आहे.

तर सर्वस्व रिते करण्याचे प्रतिक म्हणून आपण पाणी घेतो (कारण संस्कृतमध्ये पाणी म्हणजेच प्रेम आहे) आणि शंकराला अर्पण करतो.  तशी शंकराला पाण्याची काही गरज नाही.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, वैदिक ज्ञान अभ्यासक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांना गायत्री मंत्र आणि संध्यावंदन  याबद्दल अधिक माहिती पाहिजे आहे. तुम्ही कृपा करून यावर बोलाल का?

श्री श्री : तुम्हाला माहिती आहे जीवन हे चैतन्याच्या तीन पातळ्या आहे- जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि निद्रा अवस्था. जेव्हा जागृत अवस्था संपते तेव्हा स्वप्नावस्था सुरु होते; जेव्हा स्वप्नावस्था संपते आणि निद्रावस्था सुरु होते, आणि जेव्हा निद्रावस्था संपते आणि जागृत अवस्था सुरु होते, या संधीस्थानांवर काहीतरी अप्रतिम घडते. ते काय असते? या तिन्हीच्या पलीकडे असलेल्याची तुम्हाला एक झलक मिळते. 

मनाला केवळ या तीन अवस्थांची अनुभूती होते, परंतु जेव्हा ते थांबते तेव्हा तुम्हाला कोठेतरी एका अवस्थेचा अनुभव येतो जी ना जागृत अवस्था असते ना स्वप्नावस्था असते ना निद्रावस्था असते. आणि हा अनुभव इतका दिव्य असतो. आणि समग्र निर्मितीचा हाच पाया आहे. त्या अवस्थेची झलक ज्याला योग असे म्हणतात. 

आता, हि अवस्था काय करते, ती सर्व गंड दूर करते आणि जीवनाला एक अतिशय रुंद कक्षा देते.

आपण विचार की माझे शरीर, माझे मन इ.इ. हे जीवन आहे,नाही! जीवनात याच्यापेक्षा अधिक भरपूर काही आहे. उदाहरणार्थ हा अनुभव जो विचार आणि भावना यांच्या पलीकडे जातो आणि स्तब्धतेच्या अश्या निराळ्याच पातळीवर जातो ज्याला संध्या असे म्हणतात. वंदन म्हणजे त्या आंतरिक अवस्थेची आराधना करणे.

तुम्ही नेहमी संध्यावंदन कधी करता? जेव्हा संक्रमण होते. जेव्हा सूर्योदय होतो, संपूर्ण सृष्टीचे संक्रमण होत असते. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा पुन्हा संक्रमण होते. म्हणून नेहमी सूर्योदय, सूर्यास्त आणि दुपारच्या वेळी तुम्ही केवळ बसता आणि ध्यान धरता आणि प्राणायाम करता.

गायत्री मंत्र हे मानव जातीला मिळालेले मोठे वरदान आहे.

तो मंत्र काय म्हणतो? मला दिव्यात्वामध्ये चिंब होऊ दे, आणि देव माझे सर्व पाप नष्ट करू दे. सर्व पाप जाळणाऱ्या हे दिव्य प्रकाशा, मला तुझी आराधना करू दे आणि त्या दिव्य प्रकाशात मी चिंब होऊ दे. आणि ही दिव्यता माझ्या बुद्धीला प्रेरित करू दे.

हे पहा, आपल्या सर्व कृती या आपल्या बुद्धीमार्फतच होतात, बरोबर? विचार येतात आणि मग तुम्ही कृती करता.म्हणून तुम्ही देवाला प्रार्थना करता की चांगले विचार तुमच्या मनात येऊ दे. तुम्ही देवाला प्रार्थना करता, ‘माझ्या बुद्धीला तू काबीज कर. माझ्या बुद्धीला प्रेरित कर’; धियो योनः प्रचोदयात् 

धि  चा अर्थ आहे बुद्धी. माझ्या बुद्धीला तू (देव) मार्गदर्शन कर, प्रज्वलित कर आणि प्रेरित कर.

जेव्हा योग्य विचार येतील तेव्हा तुमची कृती ही नेहमीच योग्य असेल. जेव्हा अंतःस्फूर्तीचे विचार येतील तेव्हा तुमच्या कृतीला फळ मिळेल. म्हणून सर्वोत्कृष्ट विचारांकारिता प्रार्थना करावी. माझे मन, माझ्या जीवनाची संपूर्ण उर्जा ही दिव्यत्वात चिंब होऊ दे. हे ते आहे.

प्रश्न : महिला गायत्री मंत्राचा जप करू शकतात का?

श्री श्री : होय. असे कोठेही म्हंटलेले नाही की महिला करू शकत नाही.

हे फार दुर्दैवी आहे की कधीतरी मध्ययुगामध्ये स्त्रियांचे हे हक्क काढून घेतल्या गेले. आश्रमामध्ये आम्ही हे पुनःस्थापित केले आहे. अनेक स्त्रिया शिकत आहेत.

पहा, तो पुरुषप्रधान समाज होता. पुरुषांनी विचार केला की जर स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप केला तर त्याने त्यांना अनेक शक्त्या; रोगनिवारक शक्ती आणि संकल्प शक्ती प्राप्त होतील. ते ज्याची कशाची इच्छा करतील तश्या सर्व गोष्टी घडू लागतील. म्हणून पुरुष म्हणाले, ‘नाही, आपल्या बायका या आधीच इतक्या शक्तिशाली आहेत, आपल्याला त्यांना आणखी शक्तिशाली करायचे नाही. म्हणून आपण त्यांना या मंत्राचा जप करू द्यायचा नाही.’

याच कारणासाठी मुठभर लोकांनी याला अत्यंत संरक्षित गुपित म्हणून जपले.

सामान्य लोकांना योग आणि प्राणायाम हेसुद्धा शिकवले जात नव्हते कारण त्याने इतकी मानसिक शक्ती मिळते म्हणून. त्याने माणसाची आत्मिक शक्तीसुद्धा वृद्धिगत होते. आणि म्हणूनच त्यांनी हे एक मोठे गुपित म्हणून लपवून ठेवते, कोणालाही ते कळू दिले नाही, शिकू दिले नाही किंवा त्याचा सराव करू दिला नाही. परंतु आम्ही म्हंटले असे चालणारच नाही, हे मानव जातीच्या मालकीचे आहे.

म्हणूनच तुमची जी काही श्रद्धा असेल, तुमचा जो काही धर्म असेल, प्राणायाम, ध्यान आणि जप याने सर्वांचा फायदा व्हायला पाहिजे.

आजकाल अनेक हॉस्पिटलमधून, च्या जपाचा वापर केल्या जात आहे.

मद्रासमध्ये हॉस्पिटलमध्ये आजारातून बरे होण्यासाठी ते ॐ चा जप करतात. हे मंत्रोच्चार फार शक्तिशाली आहेत.

प्रश्न : गुरुदेव, लोकांनी एका जन्मामध्ये पाप केले तर देव त्यांना पुढच्या जन्मामध्ये शिक्षा का देतो? तुम्हाला कशाची शिक्षा दिल्या जात आहे हे माहित असले तर फार बरे होईल, नाही का?

श्री श्री : कर्म हे अनेक प्रकारचे असते. काही गोष्टी अश्या असतात ज्या तुम्ही आज केल्या तर त्याचे तुम्हाला लगेच फळ मिळते.

समजा की आग लागली आहे आणि तुम्ही त्यात हात घातला तर तो आज भाजेल का उद्या? तो आता याक्षणी भाजेल. पण जर तुम्ही आंब्याचे बी पेरले, तर त्याला मोठे होऊन आणि फळ देण्यासाठी किती वर्षे लागतील? सहा वर्षे. सहा वर्षांनंतर तुम्हाला फळ मिळेल. आणि जर तुम्ही फणसाचे झाड लावले तर त्याला फळ देण्यास दहा वर्षे लागतील.

एका सज्जन माणसाने लोखंडाचा कारखाना सुरु केला तर त्याच्यापासून नफा कमवायला अनेक वर्षे लागतील. खरा नफा आहे तो त्याच्या मुलांना मिळेल. या कारखान्याला चालू करण्याकरिता ज्याने इतके कष्ट केले आणि जीवनभर इतका घाम गाळला त्याला त्याची फळे मिळत नाहीत. जेव्हा त्याच्यापासून नफा मिळू लागतो त्याची मजा पुढची पिढी चाखते.

भगवद्गीतेत म्हंटले आहे, ‘गहना कर्मणो गतिः’ कर्माची पद्धत अनाकलनीय आहे. अनेक प्रकारचे कर्म असतात, वैयक्तिक कर्म, सामाहिक कर्म; काळाकरिता कर्म असते. प्रत्येक स्थालाकरिता कर्म असते.

त्सुनामी येते आणि एका क्षेत्रातील कित्येक लोक मृत्युमुखी पडतात. केवळ ते क्षेत्र का? ते त्या क्षेत्राचे कर्म असते. 

तर तुम्ही कर्मामध्ये जितके खोलवर जाल तितके ते अद्भुत आहे.

हिंदू धर्मामध्ये, उपनिषदामध्ये, सहा दर्शनापैकी एक आहे कर्म मीमांसा. ते कर्माविषयी संपूर्ण सांगते.

ते पुस्तक इतके मोठे आहे की तुम्हाला त्यासाठी कोणी विद्वान सापडणे कठीण आहे. जवळजवळ ३५-४० वर्षांपूर्वी बनारसमध्ये केवळ एक सज्जन होते ज्यांनी मिमांसेचा अभ्यास केला होते. आज याच्यावर आपल्याकडे एकही विद्वान नाही.

तसेच बौद्ध धर्माने याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे. आणि जैनांनी यावर बरेच संशोधन केलेले आहे. पण सर्वात उत्तम आहे सेवा  करणे.

जेव्हा तुम्ही इतरांची सेवा करता, जेव्हा सांत्वनाची आवश्यकता असणाऱ्या लोकांचा तुम्ही परिहार करता तेव्हा ते तुमच्यासाठी सर्वात चांगले कर्म आणते. म्हणूनच धर्मदायी काम हे प्रत्येकाच्या जीवनाचा हिस्सा असले पाहिजे.

ध्यानामुळे वाईट कर्म धुतल्या जाते आणि धर्मादायी कामामुळे चांगले कर्म येते.  दोघांनी हातात हात गुंफून चालले पाहिजे. ज्ञानाकरिता, स्तब्धतेकरिता, शांततेकरिता आतल्या दिशेने जा आणि प्रेम हे त्याचे बाह्य आविष्करण आहे.

ज्ञान आणि प्रेम, जीवनातील दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी. 

जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा तुम्हाला दोन प्रश्न विचारल्या जातील, तुम्ही किती ज्ञान मिळवले आणि तुम्ही किती प्रेम देऊ केले?

प्रश्न : गुरुदेव, तुम्हाला स्वप्ने पडतात का?

श्री श्री : माझे देशाकरिता स्वप्न आहे. मला भ्रष्टाचार-मुक्त, हिंसाचार-रहित, तणाव-मुक्त आणि आनंदी समाज पाहायचा आहे.