उर्जेची सात केंद्रे (चक्रे)

26
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना

प्रश्न : गुरुदेव, लैंगिक उर्जा आणि ध्यानाने मिळणारी उर्जा हे दोन्ही समान आहेत का?

श्री श्री : होय, शरीरात केवळ एकच उर्जा असते, पण ती निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या चक्रांमधून दिसून येते. लैंगिक उर्जा, प्रेमाची उर्जा, बौद्धिक उर्जा, चटपटीतपणा, जागरुकता, संताप, हे सर्व एकमेकांबरोबर जोडलेले आहे.

तुम्ही सात चक्रां (उर्जा केंद्रां) विषयी ऐकले असेल; केवळ एक उर्जा  असते जी अनेक प्रकारे अभिव्यक्त होते.

पहिल्या चक्र  हे पाठीच्या कण्याच्या तळाला असते. तिथे उर्जा उत्साह किंवा आळस  या प्रकारात आविष्कृत होते.

जेव्हा तीच जीवन उर्जा दुसऱ्या चक्रामध्ये  येते आणि लैंगिक उर्जा किंवा सृजनशील किंवा निर्मितीक्षम उर्जा  म्हणून दिसून येते.

तीच उर्जा वरती नाभीमध्ये सरकून तिसऱ्या चक्रामध्ये  येते आणि लोभ, मत्सर, औदार्य आणि आनंद  या आपल्या चार भावना आहेत त्या चार वेगळ्या प्रकारे दिसून येते. म्हणूनच या सर्व चार भावना या उदराबरोबर निगडीत असल्याचे दर्शविले जाते.

मत्सर ही अशी भावना आहे जी एखाद्याला पोटात जाणवते. औदार्य हे मोठे पोट असलेले म्हणजे सांता क्लाँज यांच्याशी निगडीत दाखवले जाते. आनंद हा अतिशय प्रचंड मोठे पोट असलेले म्हणजे आपले लंबोदर गणपती आणि हसणारा बुद्ध यांच्याबरोबरसुद्धा दर्शविले जाते.

चौथ्या चक्रामधून  हृदय चक्रामधून तश्याच भावना येतात; प्रेम, घृणा आणि भय  या तीन वेगवेगळ्या भावना आविष्कृत होतात.

जेव्हा उर्जा पाचव्या चक्रामध्ये  पोचते तेव्हा ती घश्याच्या पातळीपर्यंत पोचते, आणि ती दुःख आणि कृतज्ञता  यांचे प्रतिक असते. जेव्हा आपल्याला दुःख होते तेव्हा आपला कंठ दाटून येतो, आणि जेव्हा आपलाल्या कृतज्ञ वाटते तेव्हासुद्धा कंठ दाटून येतो.

ती समान उर्जा जेव्हा भुवयांच्या मध्ये सहाव्या चक्रामध्ये  पोचते आणि संताप आणि सावधपणा  म्हणून प्रकट होते. क्रोध, सावधपणा, ज्ञान, आणि विवेक हे सर्व तिसऱ्या नेत्राच्या केंद्राबरोबर निगडीत आहेत.

 तीच समान उर्जा सातव्या चक्रामध्ये ,डोक्यावर जाते आणि निखळ परमानंद  म्हणून आविष्कृत होते. म्हणूनच कोणत्याही पवित्र स्थानच्या अनुभवामध्ये जेव्हा तुमच्या मनाला पूर्ण परमानंद जाणवतो तेव्हा मन ताबडतोब डोक्याच्या वर जाते. काहीतरी डोक्याच्या वरच्या दिशेने सुसाट जाते आणि तुम्हाला परमानंद जाणवतो.

म्हणून, उर्जेच्या ऊर्ध्व हालचाली आणि अधोगतीच्या हालचाली या जीवनाच्या सर्व भावना आहेत. 

संकेतस्थळ : http://www.artofliving.org/meditation/free-online-meditation

प्रश्न : गुरुदेव, मला प्रार्थना कशी करावी हे शिकायचे आहे. प्रार्थना कशी करावी याबाबत तुम्ही काही शब्द बोलू शकाल काय?

श्री श्री : प्रार्थना ही स्वयंस्फुर्त गोष्ट आहे. ती दोन प्रसंगी घडते, जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, आणि तुमची कृतज्ञता व्यक्त करत असता. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे असहाय्य असता, आणि मदतीची याचना करीत असता.

प्रार्थना ही घडून येते, तुम्ही प्रार्थनेचे पीक उगवू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन करू शकता आणि पाहू शकता की तुम्ही कोठे होतात आणि आता इथपर्यंत कसे काय पोहोचलात.

तर दुसरे म्हणजे असे तुम्ही इतर लोकांच्या जीवनाकडे पाहू शकता आणि बघा की किती लोक या ग्रहावर दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि तुम्ही किती भाग्यवान आहात! या मृदू जागरूकतेमुळे तुम्ही प्रार्थना कराल आणि कृतज्ञता व्यक्त कराल.

प्रार्थना ही सुरुवात आहे आणि ध्यान हे तिची परिणीती आहे. प्रार्थना म्हणजे देवाने जे सर्व काही दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानणे, आणि ध्यान म्हणजे तिथे उपस्थित राहणे, देवाला जे म्हणायचे आहे ते ऐकला.

मी तुम्हाला प्रार्थना करण्यापासून परावृत्त करीत नाही. प्रार्थना ही ध्यानाच्या आधीची पातळी आहे. तुम्ही प्रार्थना करू शकता, आणि मग बसा आणि ध्यान करा.

प्रश्न : गुरुदेव, सर्वात सकारात्मक जागांमध्येसुद्धा आणि कित्येकवेळा प्रार्थना करतानासुद्धा भीतीदायक आणि वाईट विचार का येतात याचे मला नवल वाटते. कृपा करून मदत करा.

श्री श्री : हरकत नाही. विचार हे विचार आहेत. जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात की हे विचार येत आहेत तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात, कारण हे विचार येतात आणि जातात.

नकारात्मक विचार हे अनेक कारणांमुळे येतात :

१. शरीरामध्ये योग्य अभिसरण नसणे, आणि अयोग्य श्वास किंवा मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळणे.

२. मलोत्सर्जन चांगले न होणे; जर तुमचा मलोत्सर्ग झाला नाही तर तुमच्या लक्षात येईल की नकारात्मक विचार येत आहेत.

३. प्राणाची पातळी खालावणे किंवा उर्जा नसणे.

याच्यावर इलाज आहे :

१. अभिसरण सुधारा. उठा, व्यायाम करा, गाणी गा, नाचा, योग, ध्यान, प्राणायाम करा; यासर्वांमुळे मदत होईल.

२. थोडेफार शुद्धीकरण  वर्षातून एकदा किंवा दोनदा करा. जर तुम्ही श्री श्री योग लेवल II केला नसेल ज्यामध्ये तुम्ही पाणी पिणे शिकता आणि तुमची संपूर्ण प्रणाली शुद्ध करता किंजल (घसा आणि पोट साफ करते) आणि शंख प्रक्षालन  (मुखापासून ते गुदाद्वारापर्यंत संपूर्ण मूळ पचनसंस्थेचे शुद्धीकरण) याच्यामार्फत, तुम्ही तो केला पाहिजे. जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता आणि एक व्यायामाचा संच करता तेव्हा पाणी तुमच्या शरीराला शुद्ध करते आणि तुमच्या प्रणालीतील सर्व विषारी द्रव्ये बाहेर काढून लावते. हेच कारण आहे की योग्यांनी प्राचीन काळापासून क्रिया  करण्याचा सल्ला दिला आहे.याने अनेक लोकांना स्वच्छ विचार करण्यास मदत झाली आहे.

३. चांगली सांगत ठेवा. संगतीमुळेसुद्धा तुमच्या उर्जेची पातळी खालावू शकते.

हे सर्व केल्यानंतरसुद्धा जर तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर हरकत नाही, ते जसे येतात तसे ते निघून जातील. जर तुम्ही त्यांना घाबरलात तर ते ते तुमच्यासोबत राहतील. जर तुम्ही घाबरला नाहीत तर ते तुम्हाला सोडून जातील.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा आपण म्हणतो आपण साक्षीदार आहोत तेव्हा आपल्या म्हणण्याचा निश्चित अर्थ काय? योग्य कृती घडणे नक्की करण्याकरिता साक्षीदार होणे आणि भाग घेणे याचे संतुलन कसे करावे?

श्री श्री : जर तुम्ही महामार्गाच्या बाजूला उभे राहिलात आणि त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहत राहिलात, किंवा जर तुम्ही भोजनालयात बसलात आणि सगळ्यांना जेवताना पाहत राहिलात तर ते म्हणजे साक्षीदार होणे होय. याचा अर्थ भाग न घेणे, परंतु काय घडते आहे याचे केवळ निरीक्षण करणे. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये उठणाऱ्या अनेक विचारांचे तुम्ही अगोदरपासून साक्षीदार आहातच. तुम्ही प्रत्येक विचारामध्ये भाग घेत नाहीत; नाहीतर तुम्हाला वेड लागायची पाळी येईल.

प्रश्न : गुरुदेव, मानवतेच्या उत्क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची काय भूमिका आहे? वैज्ञानिक म्हणत आहेत की संविशेषता लवकरच येईल; याचा अर्थ अशी पाळी जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुधिमत्तेपेक्षा वरचढ होईल आणि या ग्रहावर वर्चस्व प्रस्थापित करेल. आपण काळजी करायला पाहिजे का?

श्री श्री : नाही, तुम्ही याच्यामुळे चिंतीत होण्याची अजिबात गरज नाही. माझ्याकरिता चिंतेची एकच बाब आहे ती म्हणजे लोक त्यांची बुद्धिमत्ता का वापरत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्तेचे वरदान दिले आहे आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की ती ते वापरत नाही!

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मी असे ऐकले आहे की स्वयं आणि वर्तमान क्षण यामध्ये छुपी शक्तिशाली जोडणी आहे. याबद्दल तुम्ही कृपा करून स्पष्टीकरण देऊ शकाल काय?

श्री श्री : होय, स्वयं हे नेहमी हजर असते आणि हा तुमचा वर्तमान आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, सरते शेवटी जर कर्ता करविता जर देव आहे तर मग सजीव प्राणी कर्मांकरिता किंवा कृतीच्या परिणामासाठी कसा काय जबाबदार होतो?

श्री श्री : हे बघा, कर्तेपणा आणि सुखी होणे हे एकमेकांबरोबर असतात. जर तुम्ही कर्ते नाही तर मग त्याची फळेसुद्धा तुम्हाला अनुभवता येणार नाही. तुम्ही असे नाही म्हणू शकत, ‘मी कर्ता नाही; देवाने मला जास्त अन्न खायला लावले पण माझे पोट दुखत आहे.’

मी तर म्हणेन, ‘देवाचे पोट दुखत आहे. तुम्ही मध्ये कुठून आलात?’

जर तुम्ही खाल्ले तर तुमचे पोट दुखेल; जर देवाने खाल्ले तर पोटदुखीसुद्धा देवालाच होईल. अपचनाचा त्रास हा तुम्हाला होत नाहीये. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

माझ्या विचाराने आपण संपूर्ण तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला थोडीफार मोकळीक आहे, आणि काही गोष्टी या त्याच्या ऐपतीच्या बाहेर आहेत. 

जीवन हे इच्छा स्वातंत्र्य आणि प्रारब्ध या दोन्हीचा संयोग आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात आणि काही इतर गोष्टी नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की माझ्या नियंत्रणात काहीही नाही, आणि तुम्ही असे म्हणू शकत नाही की सगळे काही माझ्या नियंत्रणात आहे, दोन्ही विधाने चुकीची आहेत. 

उदाहरणार्थ, पाऊस पडणे अथवा न पडणे यावर तुमचे काही नियंत्रण नाही. परंतु जर पाऊस पडत असेल तर भिजायचे किंवा नाही हे तुमच्या नियंत्रणात आहे. पाऊस हा प्रारब्ध आहे, परंतु न भिजणे हे तुमचे इच्छा स्वातंत्र्य आहे. रेनकोट घाला किंवा छत्री घ्या आणि तुम्ही कोरडे राहाल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, साक्षात्काराची इच्छा ही साक्षात्कार मिळण्यात अडथळा होऊ शकते का? साक्षात्काराची इच्छा असणे ही वाईट गोष्ट आहे का?

श्री श्री : नाही, ती अडथळा होण्याचे काही कारण नाही. त्याच्याबद्दल क्षोभित होणे ही अडथळा ठरू शकते, परंतु इच्छा असणे ठीक आहे. जर ती अगोदरपासूनच असेल तर तुम्ही काय करू शकता?