क्षमा न करता तुम्ही सुखी होऊ शकता का?

27
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना

प्रश्न : गुरुदेव, मी प्रेम करीत असलेल्या व्यक्तीने मला दुखावले आहे. मला त्यांना क्षमा करणे कठीण वाटते आहे. मी काय करू?

श्री श्री : तुमच्यासमोर काय पर्याय आहेत?

एक आहे, तुम्ही त्यांना क्षमा करू नका. जर क्षमा करणे इतके कठीण वाटत असेल तर त्यांना क्षमा करू नका. मला काळजी आहे ती याची की तुम्ही आनंदी आणि शांत आहात का? क्षमा न करता तुम्ही आनंदी, समाधानी आणि शांत होऊ शकता का? नाही! मग केवळ सोडून द्या! 

अशी अनेक माणसे आहेत; असे अनेक काटे आहेत. तुमच्या पायाला टोचणे हा काट्याचा स्वभावच असतो. आता, तुम्ही तो काटा काढा आणि फेकून द्या, आणि तुमच्या मार्गाने चालू पडा. तुम्ही तो काटा स्वतःजवळ ठेवून आणि, ‘का रे बाबा मला कशाला टोचालास? तुझे असे मला टोचणे किती तीक्ष्ण होते! मी तुला कधीहि क्षमा करणार नाही कारण तू मला टोचालास!’ असे त्याला सवाल विचारु शकत नाही.

काटा म्हणेल, ‘अरे, हे पहा, तो माझा स्वभाव आहे. मी याच्याशिवाय अजून काही करू शकत नाही. मी केवळ हेच करू शकतो! आणि तुम्ही मला सवाल करीत आहात, मी तुम्हाला का टोचलो? मी तुम्हाला दगा का दिला? लोकांना दगा देणे हा माझा स्वभावच आहे. तुम्ही माझ्या मार्गामध्ये आडवे आलात आणि म्हणून रस्त्यात आपण एकमेकांना असे भिडलो!’

हे सोडून पुढे चालणे हेच आता चांगले आहे की त्यांच्या मागे मागे धावणे चांगले आहे!

ज्यांनी तुम्हाला दगा दिला अश्या कोणाच्या मागे तुम्ही का धावता आहात? ज्याने तुम्हाला दगा दिला अश्या माणसाचा तुम्ही का विचार करीत बसता? त्यांना काढून फेकून द्या! तुमच्या जीवनाच्या बाहेर त्यांना काढून फेका! 

जेव्हा तुम्ही क्षमा करू शकत नाही तेव्हा तुम्हाला त्यांना संपवावे लागते! जर तुम्ही बंदूक घेऊन त्यांना खरोखर संपवले तर तुमचाच अंत होईल. तुमची रवानगी तुरुंगात होईल. बरेचसे लोक हेच करतात.

जो बुद्धिमान असतो तो त्यांच्याबद्दल केवळ विचार करणे बंद करून टाकतो. किंवा मग त्यांना त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटेल आणि ते विचार करतील, ‘ काय अडाणी माणूस आहे, त्यांच्या जीवनाला ज्ञानाच्या एका थेंबानेसुद्धा स्पर्श केलेला नाही. त्यांना माहित नाही की जर तुम्ही कोणाला दुखावले तर तेच दुःख त्यांच्याकडे दसपट येणार आहे. त्यांना जास्तच सोसावे लागणार आहे. ते अडाणी आहेत, आणि हा त्यांचा स्वभाव आहे.’

असा विचार करा की हा त्यांचा स्वभाव आहे, ते दुर्बुद्ध आहेत! त्यांना माहित नाही ते काय करीत आहेत ते. असे म्हणा, ‘मला अश्या लोकांबरोबर काही देणेघेणे ठेवायचे नाही. मला अश्या माणसांबद्दल विचार करीत बसायला वेळ नाही.’ उलट, स्वतःला व्यस्त ठेवा.

जर तुमचे हृदय मोठे असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते अडाणी आहेत, त्यांना माहित नाही ते काय करीत होते; त्यांनी जे केले ते अति लोभामुळे किंवा मत्सरामुळे केले, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल अनुकंपा असेल.

याचा काही अर्थ लागतो का?

प्रश्न : गुरुदेव, मी अतिशय उदास आहे. मी पुन्हा तुमच्यापासून शारीरिकदृष्ट्या लांब होणार. या ताटातूटीच्या भावनेवर मी कसा काय विजय मिळवू?

श्री श्री : नाही, नाही, नाही. मी तर वाऱ्याप्रमाणे आहे, आणि सूर्य व चंद्र यांच्याप्रमाणे; तुम्ही माझा एक भाग आहात, मी तुमचा भाग आहे. केवळ आनंदी राहा आणि समाजात काहीतरी चांगले काम करीत राहा. तुमच्याकडे जे काय आहे ते तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना द्या. अनेक लोक आहेत जे दयनीय आहेत, आणि आपण त्यांना त्या अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी काहीतरी करू शकतो, हो ना?

आपण आनंदाच्या लहरी निर्माण करायला पाहिजे. तुम्ही जिथे कुठे आहात, तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला तुमच्या तळघरात बोलवा किंवा जिथे कुठे जागा मिळेल तिथे जमा आणि भस्त्रिका, थोडे व्यायम करा,नाचा, गा आणि १०-१५ मिनिटे थोडे ध्यान धरा. ध्यानाच्या अनेक टेप आहेत. प्रत्येकजण ध्यानाच्या टेप घेऊ शकतात आणि तुमच्या जागी ध्यान धारणा करू शकता. किंवा तुम्ही शिक्षकाला बोलवा, ते तुम्हाला प्रस्तावानापर भाषण देऊ शकतात. तुम्ही एक उत्सव साजरा करण्याची लहर, आनंदाची लहर निर्माण करू शकता.

प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक साधनेच्या तीन पातळ्यांबद्दल तुम्ही कृपा करून आम्हाला सांगू शकाल काय?

श्री श्री : पहिली अवस्था आहे आण्व उपाय,  ज्याच्यामध्ये प्राणायाम, ध्यान, मंत्रोच्चार, व्यायाम आणि योग यांचा समवेश असतो.

दुसरी अवस्था आहे शक्त उपाय.  ही जरा जास्त तरल आहे; हे सर्व सर्व केल्यानंतर तुम्ही अनुभवता ती स्तब्धता असते; ही फार आंतरिक आहे.

यात तुम्ही अतिशय कमी यत्न करता, खरे तर सर्व काही घडत असते. इथे कोणी कर्ता नसतो, कोणी काही करत नसते, तरीसुद्धा ते घडत असते;तुम्हाला शक्त उपाय  तुम्हाला जाणवतो; तो फार तरल असतो.

तिसरी अवस्था, शाम्भव उपाय  ही शक्त उपायाच्या एक पायरी पुढे आहे; केवळ प्रतीबोधन असते, केवळ जागरूकता असते. त्याचा अचानक साक्षात्कार होतो, तुम्हाला काहीच खुणगाठ नसते, तुम्हाला त्यात काहीच म्हणता येत नाही, तुम्हाला त्याबाबत काहीच करता येत नाही.

तुम्ही चालत असता, तुम्ही सूर्यास्त पाहत असता, अचानक काहीतरी घडते, काहीतरी उलगडते. तुम्ही कोणालातरी भेटता; अचानक तुम्हाला पराकोटीच्या आनंदाची भावना जाणवते.

तुम्ही ध्यान करीत असाल, झोपलेले असाल, किंवा काही काम करीत असाल, तुमच्यामध्ये अचानक एक जागरूकता, एका जाग्रणाचा उदय होतो. तो आहे शाम्भव उपाय; वरदान, आशीर्वाद किंवा प्रेम किंवा कशामुळे तरी हे घडून येते.

पहिली अवस्था, आण्व उपाय,  ही अपरिहार्य आहे. दुसरी अवस्था, शक्त उपाय,  ही प्रगत मार्गक्रमण आहे. तिसरी अवस्था, शाम्भव उपाय,  ही एक उपहार आहे.

प्रश्न : गुरुदेव, आर्ट एक्सेल शिबिरातील मुलांपैकी एकाचा हा प्रश्न आहे. प्रसिद्ध आणि महत्वाची व्यक्ती होणे कसे वाटते?

श्री श्री : मला एक लहान मुलगा व्हायचे आहे आणि मला लहान मुलगा म्हणूनच राहायचे आहे. एक लहान मुलगा होण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की त्यांनी कधीही मोठे होता कामा नये.

मला तर वाटते की मी मोठे होऊच नये; मला लहान मुलगा व्हायचे आहे आणि मला लहान मुलगा म्हणून कायम राहायचे आहे. आपण सर्वांना तसेच वाटले पाहिजे; मोठे होणे आणि प्रसिद्ध होणे या सर्वाची पर्वा करता कामा नये. केवळ निष्पाप मुले; हे एकदम छोटेसे जग आहे.

प्रश्न : गुरुदेव, या देहाची आसक्ती मी कशी काय सोडू? मी या शरीरात आहे आणि तरीसुद्धा मी शरीर नाही हे मला लक्षात घेणे अशक्य वाटते.

श्री श्री : तुम्हाला काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, जरा थोडा वेळ थांबा; शरीर तुमच्यापासून वेगळे होईल, तुम्हाला शरीरापासून विभक्त होण्याची गरज नाही.

आरामात राहा. मला वाटते की तुमच्याजवळ भरपूर रिकामा वेळ आहे स्वतःबद्दल विचार करत बसण्यासाठी. जरा बाहेर पडा आणि काहीतरी चांगले काम करा; जगाला तुमची आवश्यकता आहे, लोकांना तुमची गरज आहे.

प्रत्येकाला काहीतरी खुबीचे वरदान मिळाले आहे. हे कौशल्य स्वतःसाठी नाहीये. संगीतकाराचा गळा चांगला आहे, ते बाथरूममध्ये गाणे म्हणण्यासाठी नव्हे; त्याचा मधुर आवाज असतो ते इतरांचे मनोरंजन करण्यासाठी. लेखकाचे भाषेवर चांगले प्रभुत्व असते, ते स्वतःला पत्रे लिहिण्यासाठी आणि नंतर ती वाचत बसण्यासाठी नव्हे; लेखकाची कला असते ती इतरांना आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धाला चालना देण्यासाठी.

त्याचप्रमाणे, जर तुमची विनोदबुद्धी चांगली असेल तर तुम्ही स्वतःवर हसत बसणार नाही; तुमच्या विनोदबुद्धीचा तुम्हाला काहीही उपयोग नाही, ती आहे सर्वांच्या उपयोगाकरिता.

तुम्हाला मिळालेले प्रत्येक वरदान हे असते वाटून घेण्यासाठी इतरांबरोबर, समाजाबरोबर. जर तुम्ही उत्तम शल्यविशारद आहात तर तुम्ही स्वतःची शस्त्रक्रिया करू शकत नाही. एका चांगल्या शल्यविशारदाचे कौशल्य आणि ज्ञान हे त्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या स्वतःच्या काहीही उपयोगाचे नसते; त्याला दुसऱ्या शल्यविशारदाकडे जावे लागते.

प्रश्न : गुरुदेव,आयुष्यभर मी ज्ञान शिकतो आहे, ज्ञानाचा शोध घेतो आहे आणि ज्ञानाचे विश्लेषण करतो आहे. जेव्हा मी दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये आलो तेव्हा मला सांगण्यात आले की विचार करणे, विश्लेषण करणे बंद करून केवळ ध्यान धरा जे मला करता येत नाहीये. कृपा करून मदत करा.

श्री श्री : हे पहा, इथे विचार,विश्लेषण आम्ही करतो! तुम्ही विश्लेषण करा पण मशीन इतकेसुद्धा वापरू नका की त्याला सर्वथा परीक्षणासाठी वेळ द्यावा लागेल. तुम्ही खूप वेळ गाडी चालवली तर तिला डागडुजीसाठी देता ना? ध्यान धरणे म्हणजे तुमच्या मनाला डागडुजीसाठी गँरेजमध्ये घेऊन जाणे.

विश्लेषणात्मक विचारांमुळे जर तुम्ही या यंत्राकडून अधिक काम करून घेतले तर ते मोडकळीला येईल. म्हणून तुम्हाला संतुलन राखणे जरुरी आहे. ध्यान म्हणजे तुमच्या बौद्धिक यंत्रणेची डागडुजी करणे होय.  त्याला टाकून देऊ नका. आम्ही असे कधीही म्हणत नाही, ‘विश्लेषण करू नका, स्वतःची बुद्धी बंद करून ठेवा!’. बिलकुल नाही! तुम्ही तुमच्या बुद्धीचा अधिकाधिक उपयोग केला पाहिजे, पण वेळोवेळी त्याची डागडुजीसुद्धा करा.

प्रश्न : गुरुदेव, कर्म शास्त्राच्यानुसार तुमच्या पुर्वसंचीतानुसार गोष्टी तुमच्या नशिबी येतात, आणि आकर्षणाच्या नियमानुसार जाणतेपणी किंवा अजाणतेपणी तुम्ही स्वतःचे अनुभव स्वतःच निर्माण करीत असता. मी गोंधळलेलो आहे. कृपा करून समजावा.

श्री श्री : असे काही कर्म आहेत जे तुम्ही पुसून टाकू शकता. असे काही कर्म आहेत जे तुम्ही पुसून टाकू शकत नाही; महामार्गावरून खाली उतरण्याचा तो निर्गम मार्ग आहे, तुम्ही केवळ याच ठिकाणाहून निर्गम करू शकता. जर तुम्ही तो निर्गम मार्ग चुकावलात तर तुम्हाला गाडी सरळ चालवत नेण्याशिवाय आणि पुढच्या निर्गम मार्गापर्यंत पोहोचणे याशिवाय काही पर्याय नाही.

जीवन हे असेच आहे; अनेक निवडी आहेत ज्या तुम्ही करू शकता; अनेक मोक्याची वळणे येतात जिथे तुम्ही वळू शकता, परंतु तुम्ही एक ठिकाण चुकवले तर तुम्हाला पुढचे वळण येईपर्यंत थांबावे लागेल. काळजी करू नका; जीवनमार्गावर अनेक मोक्याची वळणे येतात. आता, जर तुम्ही दोन मोक्याच्या वळणांवर असाल तर तुम्हाला असहाय्य वाटेल; आणि ते प्रारब्ध आहे.

प्रश्न : गुरुदेव, मी विचार करतो की जीवन हे एक मायाजाल आहे. या आपल्या जीवनात आपले कशावरही नियंत्रण आहे का? जन्म आणि मृत्यू यावर आपले नियंत्रण आहे का? कृपा करून हे स्पष्ट करून सांगाल का?

श्री श्री : होय, आपले नियंत्रण आहे. जर आपले कशावरही नियंत्रण नाही तर मग प्रश्न विचारण्याचे तरी कष्ट कशाला घ्या?

जीवन हे इच्छास्वातंत्र्य आणि प्रारब्ध या दोहोंचा सुंदर मिलाफ आहे.  अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता, आणि काही गोष्टी ज्या तुमच्या नियंत्रणाच्या पलीकडच्या आहेत त्यांचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे.

या सर्व विषयांबद्दल मी ‘Celebrating Silence’ या आणि बाकीच्या पुस्तकांमध्ये बोललो आहे; त्यांची पाने चाळीत राहा.