अपमान- एक छुपा आशीर्वाद

17
2013
Apr
कँलगँरी, कॅनडा

प्रश्न : मी माझ्या अतिशय बलवान अहंकारापासून सुटका कशी मिळवू?

श्री श्री : अरे, कृपा करून असे करू नका! तुम्ही स्वतःच्या अहंकारापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करू नका.

जर तुम्हाला तुमचा अहंकार तुमची सर्वात मोठी समस्या वाटत असेल तर त्याला खिश्यात किंवा पर्समध्ये ठेवा. त्याला असू द्या.

जर तुमचा अहंकार तुम्हाला त्रास देत असेल तर स्वतःला संपूर्णपणे अपमानित करून घ्या. तुम्ही असे कराल का? बस्स हेच तर आहे! सर्वात मोठी समस्या ही आहे की तुम्हाला अपमानित व्हायचे नाही. अपमानित व्हा आणि तुम्हाला दिसून येईल की तुमचा अहंकार नाहीसा झाला आहे. 

जीवनात जर कोणी कुठे तुम्हाला अपमानित केले तर लक्षात ठेवा की ती तुम्हाला मृदू बनवण्याची योजना आहे. हा एक आशीर्वाद आहे; या प्रसंगाला तुम्ही सुहास्य वदनाने सामोरे जायला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल, परंतु तुमच्यात बदल घडून येतो आहे, ज्याने तुम्ही इतके आश्चर्यचकित व्हाल. नंतर कोणीही तुमच्या आतील हास्य, प्रेम आणि अनुकंपा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही.

आपण कधीही अपमान किंवा टीका यापासून अंग चोरता कामा नये. जर टीका मिळाली तर तिचा स्वीकार करा.

तुम्हाला माहिती आहे आपण किती वेळा आपल्या मुठी घट्ट आवळतो; मी हा असाच आहे, हे माझे, माझे, माझे आहे!  आणि ज्याक्षणी कोणीतरी आपल्यावर टीका करते तेव्हा आपण मागे हटतो. आपल्याला इतरांच्या टीकेची इतकी भीती वाटते. मी तर म्हणतो की ही सर्वात कमकुवत माणसे आहेत.

जर कोणी तुमच्यावर टीका केली तर त्याचे स्वागत करा! जर त्यात काही तथ्य असेल तर ते घ्या. ते तुमच्यावर टीका करून, तुमच्या विरुद्ध बोलून तुमची मैत्री हरवण्याचा धोका स्वीकारत आहेत.

तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की लोक आहेत ती तुम्हाला या जगात निभावून नेण्यास मदत करण्यासाठी. लोकांकडे शत्रू म्हणून पाहू नका. जगाला शत्रू आणि विरोधकांनी भरलेले मानतात जे ते मूढच आहेत. जे जगाकडे मित्रांनी भरलेली जागा मानतात आणि ही सर्व लोक केवळ मदत करण्यासाठीच आहेत असा विचार करतात ते बुद्धिमान आहेत. 

एका बुद्धिमंतांच्या दृष्टीकोनातून पाहाल तर असे दिसून येईल की जो कोणी तुमच्यावर टीका करीत आहे तुमच्यासाठी तो काही चांगले करीत आहे. ते तुमच्या चुका दाखवीत आहेत, तुमची मैत्री तुटण्याचा धोका स्वीकारून.

नाहीतर सामान्य माणूस केवळ असे म्हणेल,’ ठीक आहे, आपण या अमुक तमुक माणसाची मैत्री का तोडायची? केवळ छान छान गोष्टी बोलायच्या आणि रामराम. तुमचे दुर्गुण दर्शवण्याची काय गरज.’

म्हणून जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करीत असेल तर ती ऐका. जर त्या टिकेमध्ये काही तथ्य असेल तर तिचा स्वीकार करा. जर त्या टिके मागे मत्सर असेल तर त्यांच्या प्रती अनुकंपा दर्शवा. ती त्यांची समस्या आहे; ते त्यांच्या मत्सरावर उपाय करतील. ते त्यांचे नैराश्य तुमच्यावर काढीत आहेत. आणि एका दृष्टीने ते नैराश्य बाहेर काढून त्यांचे मन हलके करण्यास तुम्ही त्यांची मदत करीत आहात.

जर ते अनुकंपेने, तुमच्याबरोबर असलेल्या मैत्री खातर बोलत असतील तर तुमची त्या दृष्टीने त्याचा स्वीकार कर. तर, तुम्हाला शांत मनाने रचनात्मक टीका करता आली पाहिजे, आणि त्याच शांत मनाने टीकेचा स्वीकार करता आला पाहिजे. याने तुमच्या अहंकाराचे रुपांतर होईल.

प्रश्न : गुरुदेव, कृपा करून तुम्ही इच्छाहिनतेबाबत बोलू शकाल काय?

श्री श्री : हे पहा, आपली ज्ञानेंद्रिये ही निसर्गतः बाहेरच्या दिशेन धावत असतात. हा नैसर्गिक कल असतो, जेव्हा तुम्ही झोपून उठता, तेव्हा डोळ्यांना बघायचे असते, कानांना ऐकायचे असते, नाकाला वास घ्यायचा असतो, त्वचेला स्पर्श हवा असतो, आणि जिभेला चाखायचे असते. तर ज्ञानेंद्रियांचे बाहेरच्या दिशेने धावणे आणि समस्त निर्मितीची मजा लुटणे हा नैसर्गिक कल असतो. परंतु मजा लुटायची ज्ञानेन्द्रीयांची क्षमता फार मर्यादित असते.

आज आपण बागेत गेलो आणि तेथील दृश्य फार सुंदर होते, पण तुम्ही किती वेळ ते सुंदर दृश बघत बसणार?

ज्ञानेन्द्रीयांद्वारा मजा लुटायची इच्छा सर्व प्रथम मनात उठते, परंतु ज्ञानेंद्रियांची क्षमता मर्यादित असते.

समजा तुम्हाला गोड खायला किंवा सफरचंदाची खीर खायला आवडते; खाऊन खाऊन तुम्ही किती खाणार? एक वाटी, दोन वाट्या, तीन वाट्या? तीच तुम्हाला आवडणारा पदार्थ तिसऱ्यांदा जेव्हा तुम्हाला वाढल्या जाईल तेव्हा तो त्रासदायक होईल. याचे कारण असे की आपल्या ज्ञानेन्द्रीयांद्वारा मजा लुटायची आपली क्षमता मर्यदित आहे.

मनाची जास्तीतजास्त पाहिजे असण्याची हाव आणि ज्ञानेन्द्रीयांकडे असलेली मजा लुटायची मर्यादित क्षमता  यामध्ये नेहमीच असंतुलन दिसून येईल.

याचे तीन प्रसंग असू शकतील :

१. गोष्टी उपलब्ध नसणे; मनाला अन्न पाहिजे असेल परंतु ते उपलब्ध नसेल.
२. अन्न उपलब्ध असेल परंतु मनाला त्याची मजा लुटायची इच्छा नसेल.
३. मनात इच्छा असेल, अन्नसुद्धा उपलब्ध असेल, परंतु ज्ञानेन्द्रीयांना त्याची मजा लुटायची
     कार्यक्षमता नसेल.

तुम्हाला हे तीन प्रसंग कळताहेत का?

एक सद्गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला,’ गुरुदेव, मी ५० वर्षाचा आहे आणि मी जोडीदार शोधात आहे, पण मला योग्य व्यक्ती मिळत नाहीये’.

मी म्हणालो, ‘ थांब, आणि अजून २० वर्षे शोध घेणे सुरु ठेव!’

जर तुम्ही त्याबाबत इतके चोखंदळ असाल, आणि काही तरी शोधात असाल, तर मग तुम्हाला ते जरी मिळाले तरी तुम्हाला त्यात मजा येणार नाही. का? कारण तुमचे मन त्यावरून उडून गेले असेल. उपलब्ध असलेल्या गोष्टी, मनाची प्रवृत्ती आणि ज्ञानेन्द्रीयांची क्षमता यांच्यामध्ये असंतुलन असते; या सगळ्यांची जुळून येणे जरुरी आहे. केवळ तेव्हाच तुम्हीला या ग्रहावर काही आवडू शकेल. 

मनाची चळवळ, गोष्टींची उपलब्धता, आणि ज्ञानेन्द्रीयांची क्षमता, यांचे कधीही एकमेकांबरोबर जुळून येत नाही.

आता समजा की सगळे काही उपलब्ध आहे. तुम्हाला भूक लागलेली आहे, तुम्हाला अन्न पाहिजे आहे, आणि तुम्हाला त्यात मजा येणार आहे, परंतु हे फार क्षणिक आहे. हे फार थोडा काळ राहते आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. असे सगळे आहे! आणि यातून काय निष्पन्न होते? वैफल्य!

पूर्ण झालेल्या इच्छेने विफलता येते, अपूर्ण असलेल्या इच्छेनेसुद्धा नैराश्य येते. आपण काय केले पाहिजे? काय उत्तर आहे?

उत्तर आहे आत बघणे. जिथून आनंद निर्माण होतो त्या आनंदाच्या स्रोत्राकडे जा. जेव्हा तुम्ही आनंदाच्या उगमस्थानाकडे जाता तेव्हा ज्ञानेन्द्रीयांची क्षमता वाढते, मनात समाधान निर्माण होते, आणि तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वस्तू उपलब्ध होतात. तिन्हीपण होते जेव्हा ज्ञानेन्द्रीये आतल्या दिशेने वळतात, आणि हे ज्ञानेन्द्रीयांचे आत वळणे म्हणजेच इच्छाहीनता होय. 

आपल्याला इच्छाहीनता, उत्कटता आणि अनुकंपा या तीन गोष्टींची आयुष्यात गरज आहे. 

आपण नेहमी असा विचार करतो की इच्छाहीनता म्हणजे कंटाळवाणे, निरास आणि रसहीन आहे; आणि अशीच तर स्वतःला इच्छाहीन म्हणवणारी लोक असतात, निर्जीव. नाही, असे असणे म्हणजे इच्छाहीनता नव्हे. माझ्या मते इच्छाहीनता म्हणजे जे जिवंत आणि उत्साहाने खळाळणारे असते.

संस्कृतमध्ये एक जुनी म्हण आहे, ‘ कोणता आनंद, कोणती मजा अशी आहे जी इच्छाहीनता तुमच्यापर्यंत आणू शकत नाही?’

याचा अर्थ असा की इच्छाहीनता तुमच्याकडे ते सगळे आनंद घेऊन येईल जे तुम्हाला नेहमी जीवनात पाहिजे होते. 

तुम्हाला उत्कटतेची गरज आहे. तुमचे श्वास आत घेणे उत्कटता आहे, तुमचे श्वास बाहेर सोडणे उत्कटता आहे आणि या दोन्हीच्या मध्ये अनुकंपा आहे.

जर तुमच्याकडे केवळ उत्कटता असेल तर तुम्ही थकून जाल आणि निराश व्हाल. ज्या लोकांकडे तीव्र उत्कटता असते, ते अनेक गोष्टी करतात आणि शेवटी थकून जातात. तुम्हाला माहिती आहे का? कारण ते त्याला पकडून बसतात. ते त्यांचे हृदय आणि आत्मा त्यामध्ये ओततात. ते इतका ताण देतात, आणि तरीसुद्धा त्यांच्या हातात काहीही गवसत नाही. ही अतिशय दुर्दैवी स्थिती आहे.

हे अनुकंपेने बदलू शकते, आणि म्हणूनच अनुकंपेमुळे इतका मोठा फरक येतो.

तर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा उत्कटता, जेव्हा तुम्ही आतल्या दिशेने वळता तेव्हा इच्छाहीनता आणि सदैव अनुकंपा ही गुरुकिल्ली आहे.

प्रश्न : जेव्हा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीचे दुसऱ्यावर प्रेम असेल तर काय करावे?

श्री श्री : तुमचे प्रेम अटरहित असण्याची ही परीक्षा आहे हे जाणून घ्या. ते तुम्हाला अटरहित प्रेमात पडण्याची संधी देत आहेत. 

तुम्ही याचा उपयोग बलवान होण्यास आणि प्रेमात वृद्धिगत होण्यास वापरू शकता किंवा मग तुम्ही निराश, हताश, क्रोधीत आणि मत्सरग्रस्त होऊ शकता.

तुम्हाला काय आवडेल? मत्सरामध्ये वाढ होणे आणि मत्सराच्या सर्व भावना तुम्हाला ग्रस्त करणे; वाईट वाटणे, निराश होणे आणि तुमच्या कंपनांना खराब करणे, किंवा दुसऱ्यांकरिता आनंदी होणे, तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्तीला उत्तम शुभेच्छा करणे!

मला माहिती आहे की दुसरा पर्याय फार कठीण आहे, परंतु पहिलासुद्धा सोप्पा नाहीये. मत्सर जवळ बाळगून राहणे हे तर अजून कठीण आहे, हो ना? याचा विचार करून पहा.

असो, आयुष्य फार छोटे आहे. सगळे काही एक दिवशी संपून जाणार आहे. याचा विचार करा, तुम्हाला फार शांत वाटेल.

जेव्हा कधी तुम्ही क्षुब्ध व्हाल, तुम्हाला अन्यायची,अस्वस्थतेची जाणीव होईल, किंवा तुम्हाला झोप येत नसेल किंवा परिस्थिती हाताबाहेर असेल, तेव्हा लक्षात ठेवा की हे सर्व संपणार आहे! सगळ्याचा अंत होणार आहे, आणि तुम्ही इथून गेलेले असाल. तुम्हाला छान झोप लागेल. पुन्हा, हे इच्छाहीनता झाली.

प्रश्न : कृपा करून पाचवी ते तेरावी मिती, आणि परिमाण भौतिकशास्त्र आणि अध्यात्म यांच्यातील नाते याबद्दल चर्चा करावी. 

श्री श्री : वेदांत हे शुद्ध परिमाण भौतिकशास्त्र आहे.

वेदांत काय म्हणतो किंवा वेदांचे ज्ञान काय आहे की संपूर्ण निर्मिती ही एकाच गोष्टीपासून बनलेली आहे, इथे दोन गोष्टी नाहीत. आणि अगदी हेच परिमाण भौतिकशास्त्रसुद्धा सांगते की सर्व काही तरंग लहरींचे काम आहे. अशा प्रकारे जे भिन्न वाटत असले तरी तो केवळ भास आहे, आणि वास्तविक पाहता हे सर्व काही केवळ एकच आहे.

जगातील श्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक बंगलोर आश्रमात बोलत होते. ते म्हणाले,’ मी ४० वर्षे द्रव्याचा अभ्यास केला, केवळ याचा शोध लावण्यास की ते अस्तित्वात नाही. त्याल अस्तित्वच नाही!’ ते नेहमी म्हणायचे ,’ जेव्हा मी बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी पुरातन तत्वज्ञान बोलतो आहे, जे अगदी बरोबर आहे कारण हे सर्व काही नाहीच आहे! अध्यात्मिक ज्ञानसुद्धा हे सांगते की सगळे काही नाहीये, आणि काही नाही ते सर्व काही आहे. 

तुमचे ध्यान ही तुमची काही नाहीबरोबर भेट घेण्याची नियोजित वेळ आहे! 

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही मला ॠषी कपिलबद्दल जास्त सांगू शकाल काय? त्यांच्याबद्दल फार थोडे माहित आहे.

श्री श्री : ॠषी कपिल हे कँलिफोर्नीया येथे राहत होते. त्यावरूनच कँलिफोर्नीया हे नाव पडले. कपिलारानिया हे कँलिफोर्नीयाचे वैदिक नाव आहे.

एके काळी वैदिक ज्ञान हे संपूर्ण दक्षिण अमिरेका आणि उत्तर अमेरिका येथे प्रचलित होते. शास्त्रांमध्ये असे म्हंटले आहे की भारत आणि कपिलारानिया यांच्यात १२ तासांचा फरक होता.जेव्हा तिथे दिवस असतो तेव्हा इथे रात्र असते आणि त्याचप्रमाणे उलटे; आणि हे कँलिफोर्नीयाला,ज्याला कपिलारानिया म्हणतात, त्याला एकदम समर्पक आहे.

कपिल हे देवाहुती या महिलेचे पुत्र होते. आजचे डेट्रॉईट शहराचे देवाहुती बरोबर काही नाते आहे, आणि देवाहुती या नावातूनच डेट्रॉईटला त्याचे नाव मिळाले.

देवाहुतीचा पुत्र कपिलारानिया कँलिफोर्नीयाला राहायचा. तो भगवान कृष्णाचा आधीचा अवतार होता. तो संख्या दर्शन  या तत्त्वज्ञानाचा शोधकर्ता होता.

संख्या म्हणजे निरनिराळे घटक आणि तत्वे ज्याने संपूर्ण विश्व बनलेले आहे उदाहरणार्थ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी इत्यादी मोजणे. याचप्रमाणे २४ वेगवेगळी तत्वे त्यांच्या तत्वज्ञानात उपस्थित आहेत, म्हणून त्याला संख्या योग असे म्हणतात.

चेतना आणि द्रव्य कसे भिन्न आहेत याबद्दल त्यांचे भाष्य आहे आणि चेतना आणि द्रव्य यांचे नाते त्यांनी तपशीलवार विवरण केले आहे.

भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायालासुद्धा संख्या योग  म्हंटले आहे, यामध्ये भगवान कृष्ण मन आणि आत्मा हे द्रव्यापेक्षा कसे वेगळे आहेत आणि आत्मा अमर आहे हे सांगतात. हे स्वयंचे ज्ञान दिले गेले आहे.

प्रश्न : संस्कृतींमध्ये मतभेद का होतात? माणुसकी लुप्त का पावते? कृपा करून तुम्ही यावर काही प्रकाश पडू शकाल काय?

श्री श्री : हा फार चांगला प्रश्न आहे. आज बंगलोर आणि बॉस्टन इथे बाँबस्फोट झाले. ही असहिष्णुता झाली, अहिंसेची संस्कृती हरवली आहे. म्हणूनच आपण सर्वांना आपले काम केले पाहिजे. तुम्हाला नाही का वाटत? आपण सर्वांनी मिळून काही काम करूया का?

दुर्दैवाने भारतातसुद्धा, राजकारण्यांनी परिस्थिती खराब करून ठेवली आहे. लोकांना सर्वसाधारण शिक्षण देण्याऐवजी ते जातीय-आधारित शिक्षण संस्थांना प्रोत्साहित करीत आहेत. यामुळे केवळ उग्रवादाला खतपाणी मिळते आहे. हे फार दुर्दैवी आहे.

याप्रकारचा धार्मिक उग्रवाद संपला पाहिजे, नाहीतर हे जग सुरक्षित जागा उरणार नाही.

सत्य आणि वास्तव याची विशाल समजूत असणे जरुरी आहे. प्रत्येक धर्माचा आदर करा, सगळ्यांना मान द्या. केवळ माझा मार्ग हा देवाचा मार्ग आहे आणि बाकीचे सगळे नरकात जाणार आणि मी फक्त स्वर्गात जाणार असे म्हणू नका.

अशा प्रकारचे लोक बाकीच्यांचे जीवन नरक बनवतात. या लोकांना वाटते की इतर धर्मियांना मार्गातून काढून टाकून ते देवाची सेवा करीत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे.

मुलांना शिकवणे जरुरी आहे. नाहीतर, हेच सत्य आहे,बाकीचे सर्व अश्रद्धावान लोक आहेत आणि त्यांना जगण्याचा काही अधिकार नाही असा विचार करीत मोठे होतील. याप्रकारची मनोवृत्ती फार घातक आहे.

तुमच्यापैकी कितीजणांना ही समस्या वाटते? आपण ही मनोवृत्ती बदलली पाहिजे, विस्तीर्ण समजूत आणली पाहिजे, आणि आपण सर्वांनी यादिशेने काम केले पाहिजे.

आपण इथे बोलत असताना, तिथे इराकमध्ये एक कार्यक्रम होतो आहे. आरोग्य मंत्री आणि खेळ मंत्री यांनी येऊन इराकमध्ये तरुणांनी आयोजित केलेल्या आपल्या शिबिराचे उत्घाटन केले.

आज त्यांनी दुसरी सुदर्शन क्रिया केली, आणि त्यांच्या समजुतीमध्ये संपूर्णपणे रुपांतर घडून आले आहे. या तरुणांना आता जनतेपर्यंत पोच्याचे आहे, त्यांना योग, ध्यान आणि सुदर्शनक्रिया करायला लावायची आहे. ही अतिशय चांगली बातमी आहे. आपण हे करायला पाहिजे; आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला पाहिजे.

प्रश्न : कोणत्याही कार्याची अथवा नात्याची सुरुवात फार मस्त असते; ते टिकवणे कठीण. एखादी व्यक्ती किंवा प्रसंगापासून मी अलिप्त होतो जेव्हा त्याचा अंत जवळ येतो. मी माझी उर्जा कायम कशी काय टिकवून ठेवू?

श्री श्री : तो सगळा भूतकाळ सोडून द्या,आत्ता जागे व्हा! ‘अरे मी कमकुवत आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही’, असे स्वतःला लेबल लावू नका. तो सगळा भूतकाळ होता!

तुम्ही काय किंवा कोण आहात हे तुम्हाला माहित नाही याचा स्वीकार करा. तुमच्याकडे किती उर्जा आहे हे तुम्हाला माहिती नाही; तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला माहिती नाही, आणि बस्स इतकेच!तुमच्यात तुम्हाला एक नवीन उर्जेचा संचार होताना जाणवेल, आणि तुमची मनोवृत्ती, तुमची वागणूक, तुमची जाणीव आणि तुमची अभिव्यक्ती या सगळ्यात बदल घडून येईल.

तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी जे स्वतःला लेबल लावले आहेत ते केवळ तुम्हाला काढून टाकायचे आहेत. कळले?

प्रश्न : मला असे सांगितले गेले आहे की जेव्हा गुरु एका व्यक्तीकडे पाहतात तेव्हा ते त्याला एक व्यक्ती म्हणून न पाहता त्याचे वलय बघतात, काय हे खरे आहे का?

श्री श्री : मला वाटते की त्याबाबत तुम्ही तर्क करीत राहा.