क्षमा ही काळाची गरज

03
2013
Apr
जॉर्जिया, यू.एस.ए.
प्रेम आणि ॐ शांती शांती शांती ( आपल्यापैकी प्रत्येकाला आणि सर्व जगाला देव शांती प्रदान करो.)

माननीय डीन, डॉ.लॉरेन्स कार्टर; अध्यक्ष, जॉन विल्सन; बिशप रेव्हरंड, डॉ. बार्बरा किंग; रेव्हरंड, डॉन स्ट्रीक्टलँड आणि सर्व व्यासपीठावरील तसेच प्रेक्षागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर. प्रेम आणि क्षमा या विषयावर बोलताना मला आज खूपच आनंद होत आहे. हा विषय इतका अफाट आणि सुंदर आहे आणि तरीही मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने अगदी मूलभूत आहे. तर आता बघुया की मी ‘प्रेम आणि क्षमा’ या विषयाला किती न्याय देऊ शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे प्रेम ही गोष्ट आहे जी लपवता येत नाही. तुम्ही प्रेम लपवू शकत नाही आणि ते पूर्णपणे व्यक्तही करू शकत नाही. ते तुमच्या डोळ्यात,तुमच्या हसण्यात, तुमच्या देहबोलीत दिसून येतं. तुम्ही कधीच तुमचं प्रेम लपवू शकत नाही. त्याचप्रमाणे ते तुम्ही कधी पूर्णपणे व्यक्तही करू शकत नाही.

ही अशी अवस्था जगातल्या सर्व प्रेमिकांनी अनुभवली आहे. त्यांनी ते कितीही सांगितले तरी त्यांना वाटत राहते की, ‘मला जसे करायचे आहे तसे मी पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहिये.’

प्रेमाचं हे असं आहे.

त्याचप्रमाणे सत्य ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही सत्य टाळू शकत नाही आणि त्याची धड व्याख्याही करू शकत नाही.

सौंदर्य ही अशी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही मालकीहक्क सांगू शकत नाही आणि त्याचा त्यागही करू शकत नाही.तुम्ही कधीच सौंदर्य टाकून देऊ शकत नाही. आणि सत्य, प्रेम आणि सौंदर्य हे तिन्ही मिळून जीवन आहे. पण आपला अनुभव काही वेगळाच असतो.

आपल्याला जीवनात नेहमीच प्रेमाचा अनुभव येत नाही. आपल्याला तिरस्कार, हेवा, हाव, उर्मटपणा या सगळ्या नकारात्मक भावना अनुभवाला येतात.

लहानपणी, आपण सगळेच शुध्द प्रेम स्वरूपातच जन्माला आलो. मग आपण मोठे झाल्यावर काय झाले ? ही निरागसता आपण कुठे हरवून बसलो ? काय झालं आपल्याला ? 

या नकारात्मक भावनांकडे आपण खोलवर जाऊन बघितले तर आपल्याला दिसते की या नकारात्मक भावनांच्या आतही प्रेमच आहे.

आपल्याला परिपूर्णता / बिनचूकपणा आवडतो म्हणून आपल्याला राग येतो. जे जे परिपूर्णतेवर प्रेम करतात ते रागीट असतात. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी परिपूर्ण / बिनचूक हव्या असतात आणि त्या तश्या नसल्या की तुम्हाला राग येतो. त्याचप्रमाणे हाव म्हणजे काय आहे ? जेव्हा तुम्हाला वाटते की माणसांपेक्षा वस्तू महत्वाच्या आहेत तेव्हा तुम्ही त्याला हाव म्हणता. जेव्हा एखाद्या व्याक्तीवरचे तुमचे प्रेम हे त्याच्या भल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला हेवा म्हणतात. जेव्हा तुमचे स्वत:वरच अति जास्त प्रेम असते तेव्हा त्याला उर्मटपणा म्हणतात.

प्रेम वजा सुज्ञपणा, यामुळे ह्या सर्व नकारात्मक भावना निर्माण होतात.

प्रेम आणि त्यासोबत विवेक असेल तर तुम्ही समजूतदार आणि दिव्यात्वाच्या मार्गावर राहाल. आणि तुम्हाला विवेकाशी जोडण्यासाठी, इथे उपस्थित असलेल्या सर्व परमपूज्य धर्मगुरूंचा तुमच्यासाठी हाच संदेश आहे.

प्रेम कसे करावे हे आपल्याला शिकावे लागत नाही. प्रेम हा आपला स्वभाव आहे. आपले शरिर जसे अॅमिनो आम्ल,प्रथिने आणि कर्बोदके वगैरे पासून बनलेले आहे, तसे आपला आत्मा प्रेमापासून बनला आहे. आपण प्रेम आहोत.

प्रेम ही केवळ एक भावना किंवा भावनिक उद्रेक नाहिये. प्रेम हा आपला स्वभाव आहे. देवाने ते आपल्याला जसे बहाल केले तसे ते सांभाळण्यासाठी विवेकाची गरज आहे. आणि जगातले सगळे धर्मग्रंथ आपल्याला हेच सांगतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये देवाचे स्वरूप ‘ अस्ती, भाती, प्रीती’ असे सांगितले आहे. ( अस्तित्व, तेज आणि प्रेम)

देवाचे अस्तित्व आहे, तो स्वयं तेजस्वी आहे आणि तो प्रेमरूप आहे. तो एकमेव आहे. अनेक नाही. सहसा लोकांना वाटते की हिंदुस्थान म्हणजे अनेक देव. तसे नाहिये. एकच देव अनेक वेषांत, स्वत:ला निनिराळ्या रूपात व्यक्त करतो. पण देव फक्त एकच आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकाच गव्हापासून आपण चपाती, ब्रेड, केक हे सगळं करतो.हे सगळे पदार्थ म्हणजे गव्हाची निरनिराळी अभिव्यक्ती आहे. त्याचप्रमाणे एकच देव अनेक रूपात व्यक्त होतो.

देव म्हणजे प्रेम आहे आणि आपणही तेच आहोत. कुठेतरी हे ज्ञान आपण हरवून बसलो. आपण निरागसता हरवून बसलो. आपण आपल्यात भिंती उभ्या केल्या. तेव्हाच अशा नकारात्मक भावना आणि वृत्तींना या जगात सुरवात झाली.

स्वत:चा विकास करण्यासाठी आणि प्रार्थनेत खोलवर जाण्यासाठी आपण पाच दिवसांची सुट्टी घेउन पाच अनुभव घ्यायला हवे.

पहिला अनुभव म्हणजे आपण एक दिवस तरुंगात घालवायला हवा. तुरुंगात जाण्यासाठी तुम्हाला काही गुन्हा करायची गरज नाही. फक्त तिथे जा, एक दिवस तिथे घालवा, कैद्यांशी बोला. ह्या लोकांशी तुम्ही बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, सगळ्या समाजाने आणि जगाने ज्यांचा धिक्कार केला आहे त्या प्रत्येकात एक चांगला माणूस दडलेला आहे. आणि तुम्हाला दिसून येईल की तुमच्यात क्षमाभाव अचानक उभारून आला आहे. प्रत्येक गुन्हेगाराच्या आंत एक बळी पडलेला मदतीसाठी आक्रंदन करत आहे.

तुम्ही जेव्हा व्यापक दृष्टीकोनातून बघता, तेव्हा तुम्हाला दिसते की गुन्हेगारही बळी पडलेला माणूस असतो. गुन्हेगाराच्या तात जेव्हा तुम्ही बळी पडलेला माणूस बघता,तेव्हा तुम्हला क्षमा करावी लागत नाही, क्षमा आपोआप होते. खरं म्हणजे तुमच्या हृदयात उत्स्फूर्तपणे करुणा वाटू लागते.

समजून घेण्याच्या अभावामुळे, चुकीच्या शिक्षणामुळे, चुकीची माहिती, भावनिक उद्रेकामुळे, संताप, राग आणि वैफल्य यांना कसा आवर घालावा हे न कळल्यामुळे गुन्हे होतात. भावना अनावर झाल्या की त्यातून काहीतरी कृती घडते आणि तोच गुन्हा बनतो. विवेकामुळेच या ताबा सुटलेल्या भावननवर नियंत्रण करता येते. विवेकाच तुम्हाला कृती करण्या आधी विचार करायला लावतो.

जेव्हा कृती आधी घडते आणि मग त्यावर नंतर विचार होतो तेव्हा गुन्हा घडतो.

असे काही जण आहेत ज्यांनी जाणून बुजून चुका केल्या आहेत.( चुकीच्या विचारसारणीमुळे, गैरसमज झाल्यामुळे) आणि काहीजण असे आहेत की ज्याच्या हातून नकळत चुका झाल्या आहेत ( साजगपणाच्या अभावामुळे).अशा दोन स्थितीत हातून गुन्हा घडतो किंवा चूक केली जाते. विवेकाच्या, आनंदाच्या अभावामुळे किंवा आतमध्ये देवत्वाशी नाते जोडले गेलेले नसल्यामुळे लोक चुका करतात. जो आनंदी, समाधानी आणि प्रेमात असेल तो दुसऱ्याला इजा करू शकणार नाही. ते अशक्य आहे.

जर कुणी दुसऱ्याला इजा केली तर त्याचे कारण, त्यांच्या आंत खोलवर काहीतरी जखम झालेली असेल किंवा व्रण राहिला असेल तर ती बरी करायला हवी.

तर तुरुंगात एक दिवस घालवण्याची कल्पना खूप चांगली आहे. त्याने आपल्या जाणीवेची व्याप्ती वाढेल आणि ज्यांना क्षमेची गरज आहे त्यांना समजून घेता येईल. मग क्षमा करणे आपल्यासाठी सोपे होते.

दुसरा अनुभव आहे एक दिवस दवाखान्यात घालवण्याचा. जेव्हा तुम्ही व्यथा भोगत असलेले आजारी लोक बघता, तेव्हा तुमच्या चांगल्या प्रकृतीबद्दल तुम्ही देवाचे आभार मानता. तुमच्यात करुणा आणि कृतज्ञता फुलून येतात.

तिसरा अनुभव म्हणजे शाळेतील शिक्षक म्हणून एक दिवस घालवणे. विशेषत: अपंग मुलांच्या शाळेत. जर तुम्हाला त्यांना शिकवायचे असेल आणि ते शिकत नसतील तर त्यामुळे त्यांना स्वीकारून त्यांना समजेपर्यंत पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा संयम तुमच्यात तयार होतो. संयम ठेवून दुसऱ्याला कसे समजवायचे हे तुम्ही शिकता. शालेय शिक्षक होणे हे एक मोठे आव्हान आहे.

मी जी आकडेवारी ऐकली आहे त्यानुसार, जर्मनीमध्ये ४० % शिक्षक वैफल्यग्रस्त आहेत. विचार करा जी मुले शाळेत जात असतील त्यांचे काय होईल. त्यांना रोज दिवसभर वैफल्यग्रस्त चेहरा बघावा लागेल आणि ते स्वत:ही वैफल्यग्रस्त होऊन घरी येतील.. 

तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे आनंद असेल तर तुम्ही आनंद देता. जर तुमच्याकडे प्रेम असेल तर तुम्ही प्रेम देता. जर तुम्ही निराश असाल तर तुम्ही फक्त निराशाच देऊ शकता. ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण आपल्या मनाला आणि भावनांना कसे हाताळायचे तेच आपल्याला माहित नाही.

एक दिवस शालेय शिक्षक म्हणून घालवाल्याने आपल्याला जीवनात अज्ञान सहन करायला आणि त्यांना प्रेमाने शिकवायला प्रचंड संयम प्राप्त होईल.शिक्षक ही एक अशी व्यक्ती आहे जी निरपेक्ष प्रेम करते.

कुणीतरी मला एकदा विचारले,‘हे सगळं जे तुम्ही करताय, ते करून तुम्हाला काय मिळतं ? तुम्ही इतक्या देशांमध्ये फिरून, लोकांशी रात्रंदिवस बोलत, ही श्वसनाची शिबिरे घेत कां फिरताय ? तुम्हाला त्यातून काय मिळतंय ? ’

मी त्यांना विचारले . ‘ तुम्ही ‘ लीफ ऑफ पाय’ हा चित्रपट पाहिला आहे कां ?’

ते म्हणाले, ‘ होय.’

मी त्यांना विचारले, ‘ चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही कुणाला फोन करून सांगितलात कां की हा एक चांगला चित्रपट आहे आणि त्यांनी तो जरूर बघावा ?’

ते म्हणाले, ‘ होय, मी माझ्या कितीतरी मित्रांना सांगितले की हा खूप चांगला चित्रपट आहे आणि त्यांनी तो जरूर बघावा.’

मी त्यांना विचारले की असे करण्याबद्दल त्या चित्रपट निर्मात्याने काही प्रलोभन दाखवले होते किंवा कमिशन देऊ केले होत कां ?’

ते म्हणाले, ‘ नाही.’

आनंदाचा स्वभाव असा आहे की तो आपल्याला वाटावासा वाटतो. जर तुम्हाला तुमच्यात काही आनंद वाटला तर तुम्हाला तो दुसऱ्याना सांगावासा वाटतो.मी अगदी तेच करतो आहे. वाटणं आणि काळजी घेणं. ( शेअरिंग आणि केअरिंग)

आपण घ्यायलाच हवा असा चौथा अनुभव म्हणजे मनोरुग्णांच्या दवाखान्यात एक दिवस घालवणे. तुमच्या भोवती जी काही असंबध्द बडबड चालू असेल ती ऐका. तुम्हाला हे लक्षात येईल की सगळं जगच तसं आहे. प्रत्येक जण काही तरीच बोलत आहे. एकदा कां तुमच्या हे लक्षात आले की मग तुमचे बटन्स कुणाला दाबता येणार नाहीत. (तुमच्या भावनांना कुणी धक्का लावू शकणार नाही. तुम्हाला आतून एकदम सामर्थ्यवान वाटेल. तुमच्याबद्दल कुणी काही मानहानिकारक बोलले तरी तुम्ही बेचैन होणार नाही. टीका झाली तरी तुम्ही ठाम उभे राहाल. जर एखाद्या टीकेत काही तथ्य असेल तरच तुम्ही त्या टीकेचा विचार कराल.जिथे कुठे एखादी विधायक टीका करण्याची गरज पडेल तिथे तुम्ही ती करू शकाल.

पाचवा अनुभव म्हणजे एक दिवस शेतकऱ्याबरोबर शेतात घालवणे. तुम्ही या पृथ्वीची काळजी घ्यायला लागाल. तुम्ही पर्यावरणाची काळजी घ्यायला लागाल.जर आज आपण पृथ्वीची काळजी घेतली नाही तर आपण ती पुढच्या पिढीला देऊ शकणार नाही. येणाऱ्या पिढीला जास्त चांगली परिस्थिती मिळायला हवी. शुध्द हवा, पाणी आणि जमीन.रोगराई इतकी वाढते आहे कारण आपण इतकी हानिकारक अशी रासायनिक खते आणि जंतूनाशके वापरत आहोत. जमिनीतील पोषणमूल्ये जमिनीतून निघून जात आहेत.

‘अमेरिकन न्युट्रिशनल इन्स्टिट्यूट’ असे सांगते की आज अमेरिकेत पिकणाऱ्या केळ्यामध्ये ३० आणि ४० सालाच्या दरम्यान पिकवल्या जाणाऱ्या केळ्यांच्या तुलनेत खूप कमी पोषण मूल्ये असतात. आपल्या भाज्या आकाराने मोठ्या असतीलही पण त्यात खूप कमी पोषण मूल्ये असतात. कारण आपण रासायनिक खाते आणि जंतूनाशके यामुळे जमिनीचा कस कमी केला आहे. आपल्याला पृथ्वी मातेची काळजी घ्यायला हवी. पृथ्विमातेवरचे प्रेम लोकांवरचे प्रेम हे देवावरच्या भाक्तीसारखेच आहे. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्ही म्हणालात की तुम्ही देवावर प्रेम / भक्ती करता पण या लोकांची तुम्हाला पर्वा नाही तर त्याला काही अर्थ नाही. आपण प्रेमाची मागणी करायला लागलो की ते नष्ट होत जातं.नातेसंबंधात सहसा हेच होतं. प्रेमात पडणं आणि प्रेमातून बाहेर पडणं ह्या दोन्ही गोष्टी अगदी पटकन होतात. अगदी जसे आपण श्वास आंत घेतो आणि बाहेर सोडतो तसेच. कां, तर आपण त्याची मागणी करायला लागतो.

इथल्या जोडप्यांसाठी आज माझा एक सल्ला आहे. जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरचे लक्ष कमी झाले आहे किंवा प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण कमी झाले आहे तेव्हा तुम्ही त्यांना असे विचारु नका की, ‘ तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करता कां ?’ त्याऐवजी त्यांना विचारा की, ‘तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम कां करता ?’ जरी ते तुमच्यावर प्रेम करत नसले तरी त्यांचे तुमच्यावरचे प्रेम वाढते. तुम्ही कुणावर खर्च प्रेम करता हे सिध्द करण्याच मोठं ओझं असतं. प्रेम पूर्णपणे व्यक्त करता येत नाही.

जगातली एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली. पौर्वात्य देशात, ते प्रेम अजिबात व्यक्त करत नाहीत. ते त्यांचं प्रेम शब्दात व्यक्त करत नाहीत. आणि इकडे पाश्चिमात्य देशात आपण ते शब्दात खूप जास्त प्रमाणात मांडतो. आपण सारखे, ‘हनी, हनी’ म्हणत रहातो आणि मग मधुमेह होतो.

पौर्वात्य देशात नवरा, त्याच्या बायकोला त्याच्या आयुष्यात कधीच, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत नाही. आपल्याला पूर्व आणि पश्चिम यांच्यातला सुवर्णमध्य साधायला हवा. मला वाटतं, प्रेम व्यक्त करायला हवं आणि त्याचं वेळी ते लपवूनही ठेवायला हवं.जेव्हा तुम्ही प्रेम शब्दात मांडत नाही तेव्हा ते तुमच्या कृतीतून दिसतं. एखाद्या बी सारखं. जर तुम्ही जमिनीत खूप खूल्वर पेरली तर तीला अंकुर फुटणार नाही. आणि तुम्ही ते जमिनीवर ठेवलं तरी ते अंकुरणार नाही. तुम्हाला ते जमिनीच्या थोडं खाली पेराव लागेल, म्हणजे त्याला अंकुर फुटेल आणि त्याचं झाड होईल. आपण प्रेम व्यक्त तर करायला हवं पण थोडं आतही ठेवायला हवं म्हणजे ते आपल्या कृतीतून बाहेर येईल.

मी जेव्हा तरुण मुलगा होतो, तेव्हा मी एकदा शिंप्याकडे शर्ट शिवायला टाकायला गेलो. त्या काळी शिवणयंत्र नव्हती, हातानीच शिवायचे. शिंपी त्यांच्या टोपीत सुई खोचून ठेवायचे आणि पायाखाली कात्री ठेवायचे. मला वाटायचं की यातून त्या माणसाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. ज्यांनी कापलं जात ते त्याने पायाखाली ठेवलं, आणि जे शिवतं, जोडतं, ते त्याने डोक्यावर ठेऊन त्याचा आदर केला.

जगातल्या ज्या शक्ती लोकांना अलग करतात, तोडतात त्यांना खाली ठेवा आणि ज्या शक्ती लोकांना एकत्र आणतात त्यांचा सन्मान करायला हवा. 

एक शिंपी हा संदेश पोहोचवू शकला.

संपूर्ण जग हे प्रेमाच्या संदेशांनी भारलेले आहे. आपल्याला ते शोधण्याची आणि आपल्या जीवनात आणण्याची नजर पाहिजे. 

तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची मागणी करू नका. त्यांना हे जाणवू द्या की तुम्ही त्यांच्यासाठी आहात. आपले परमपूज्य ज्ञानी धर्मगुरू त्यांच्या प्रार्थना सभांमधून हेच करतात.ते फक्त देवाच्या प्रेमाचा योग्य मार्ग दाखवतात. ते आपलेपणाची भावना व्यक्त करतात.हेच सर्वात श्रेष्ठ कार्य आणि वृत्ती आहे.

तर प्रेम आणि क्षमा हातात हात घालून जातात. जेव्हा क्षमा ही करुणा बनते तेव्हा हे आणखीनच सोपे होते.

तुमच्या घरातले कुत्राचे पिल्लू तुम्ही घरी गेल्यानंतर कसे वेड्यासारखे करते बघितले ना ? ते त्याचे प्रेम कसे व्यक्त करत असते. तो काही बोलत नाही पण त्याचे तुमच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करते. तेच प्रेम संपूर्ण सृष्टीत झाडे, निसर्ग यांच्याकडून व्यक्त होत असते.

मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देवाचा आशीर्वाद असो.