रायबरेली उत्तर प्रदेश येथे महासत्संग
१९ मार्च २०१२ 

औपचारिकता म्हणजे भेटवस्तू गुंडाळण्याच्या कागदासारखी असते. आपण एखादी वस्तू विकत घेतली की ती कागदात बांधलेली असते. त्याचप्रमाणे आयुष्यात औपचारिकतेला तेवढेच महत्व द्यायला हवे. इतर वेळी आपण अनौपचारिक असले पाहिजे. त्यालाच आपण सत्संग म्हणतो. सत्संग म्हणजे काय ? जिथे आपण ममत्वाने आणि आपलेपणाने, हृदयांमधील संबंधाने बसू शकतो, तो सत्संग.
केवळ आपलेपणाच्या भावनेनेच जीवनातील निरसपणावर  मात करता येऊ शकते. एकदाका जीवन नीरसपणाने  भरून गेले की सर्व प्रकारचे त्रास सुरु होतात. मंदपणा आणि निरसता हे आयुष्यातील सर्व वासना आणि चुकांचे कारण असते.
तुम्ही तुमच्या स्वत:च्या जीवनाकडे बघितले तर; समजा तुम्ही पन्नास वर्ष, साठ किंवा सत्तर वर्ष जगणार असलो तर आपण ही वर्ष कशी घालवतो ? वेळेचा अंदाज करा. जर तुम्हाला सत्तर वर्षांचे आयुष्य असेल तर, त्यातील १० टक्के आपण आंघोळ आणि स्वच्छता करण्यात घालवतो. समजा आपण आंघोळ करण्यात, शौचाला जाण्यात  रोज दोन तास घालवत असलो तर याचा अर्थ सत्तर वर्षातली सात वर्ष आपण बाथरूममध्ये घालवतो. हे धक्कादायक आहे की नाही? यांच प्रमाणे ७ वर्ष खाण्यापिण्यात जातात. आपण जर दिल्ली किंवा मुंबई सारख्या ठिकाणी रहात असलो तर १५ वर्ष ट्रॅफिक जॅ‍ममध्ये जातात. आणि अर्धा वेळ आपण झोपेत घालवतो म्हणजे २५ ते ३० वर्ष आपण झोपेत घालवतो.मग बाकी काय उरले ? जर तुम्ही नीट हिशोब केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण जेमतेम ३ ते चार वर्ष आनंदी, खुश असण्यात, हसण्या खिदळण्यात आणि मुक्तपणे खेळण्यात घालवतो. म्हणजे आपण फक्त ही तीन वर्षेच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. बाकीच्या काळात आपण फक्त जगण्याची तयारी करत असतो.  ‌‍‍‍
हे म्हणजे रात्रभर अंथरूण घालत बसण्यासारखे, चादर आणि ब्लँकेट घालत बसण्यासारखेच आहे. तो पर्यंत सकाळ झाली, झोपायला वेळच नाही मिळाला. आपण आपले सगळे आयुष्य आनंदी आणि सुखी होण्याच्या तयारीतच घालवतो पण आनंदी कधीच होत नाही. आणि आपण जर विचारलं, काय करताय तर ,” पैसे कमावतोय.” असं उत्तर येतं. कोणासाठी ? “मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी, नातवंडा, पतवंडासाठी” संपूर्ण आयुष्य भावी पिढ्यांसाठी पैसे कमावण्यात घालवलं आणि मग आनंद नाही, खुशीही नाही की देवाशी काही नातं नाही. याला आयुष्य म्हणायचं? संपूर्ण आयुष्यभर आपण पैसे कमावतो आणि बँकेत ठेवतो आणि मग आपण मरून जातो आणि मुलं त्या पैशांसाठी भांडत बसतात कोर्टात खटला दाखल करतात. कोणी स्वत:च्या पैशांसाठी कोर्टात खटला दाखल करत नाही. न्यायालयात सध्या चालू असलेले सर्व खटले हे पूर्वजांच्या मालमत्तेसाठी आहेत. मग त्यामुळे आपणच आपल्या कुळात भांडण लावून देतो. हे जीवन नाही.
जीवन काय आहे ?
आपल्याला जीवनात किती समाधान लाभले आहे याचा आपल्याला विचार करायला हवा.
बघा आपण जेव्हा लहान मूल होतो तेव्हा काहीही त्रास सहन करावा लागला की आपण काय करायचो? आपण रडत रडत आईकडे जायचो आणि तिच्या मांडीवर झोपून जायचो. आपण आपल्या आईकडे धावायचो. कां ? कारण आपल्याला माहीत होते की आई आपले दु:ख दूर करेल. मग आपण जरासे मोठे झालो की मग आपण वडिलांकडे जातो. आपल्या देशात एक मार्गदर्शक, गुरु असण्याची परंपरा आहे त्यामुळे आई, वडिलांना एखादा प्रश्न सोडवता आला नाही की आपल्याला त्या गुरुकडे, मार्गदर्शकाकडे जाता यायचे. इथे बसल्या जेष्ठ नागरिकांनो, तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होतात तेव्हा शाळेच्या शिक्षकांबरोबर किती घट्ट नाते जुळलेले असायचे, हो की नाही ?                   तुमच्या मनात काही असले तर तुम्ही सरळ जाऊन तुमच्या शिक्षकांशी बोलायचात. ते तुम्हाला दिलासा द्यायचे. गावात शिक्षकाला महत्वाचे स्थान होते. आजकाल ते सगळे नाहीसे झाले आहे.  
या पलीकडे दैवत्वाचा विश्वास, देव आहे, एक शक्ती आहे आणि आपण तिला अगदी प्रिय आहोत. श्रीकृष्ण प्रथम अर्जुनाला म्हणतो,” अर्जुना तू मला खूप प्रिय आहेस.” नंतर श्री कृष्ण असेही म्हणतो, “ मला तू सुद्धा प्रिय आहेस.”
आधी भक्त म्हणत नाही तर देव म्हणतो की, “ तू मला खूप प्रिय आहेस.” आपण खरेतर विश्वास ठेवायला हवा की देवाला आपण खूप प्रिय आहोत. झाले, आपले काम झाले. एकदा हा विचार आपल्या मनात आला की मग काही करायचीच गरज नाही. देव आपल्यावर खूप प्रेम करतो, आपण त्याला खूप प्रिय आहोत. जसे मुलाच्या असे कधीच मनात येणार नाही की आईने घरी स्वयंपाक केला असेल की नाही. आई  घरी आहे हे पुरेसे आहे. तो घरी जाईल तेव्हा जेवण तयार असेलच. असा विचार कधी मनात तरी येतो कां की घरी फोन करून विचारावे की आईने स्वयंपाक केला आहे की नाही. नाही ! जेवणाच्या वेळी घरी गेले की आई ताटात जेवण वाढून देते. आपल्या आईवर असलेला हा दृढ विश्वास, असाच देवावरही असायला हवा की देव माझा आपला आहे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि तो माझ्यावर सगळ्याचा वर्षाव करेल. त्याने हे सगळे माझ्यासाठी निर्माण केले आहे. ही भावना तुम्ही कधी व्यक्त करणार? दहा वर्षांच्या साधने नंतर? आयुष्याच्या शेवटी? कधी करणार तुम्ही हे? सांगा मला. इतका विश्वास निर्माण व्हायला तुम्हाला किती काळ लागणार? देवाचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे, मी त्याला खूप प्रिय आहे. ही भावना तुमच्यात जागवायला किती काळ लागणार? आज या क्षणापासून .
हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल?  गंगेवर जायचे किंवा हिमालयात जाऊन तपस्या करायची? काय करायला लागेल? तासनतास तपस्या करायला हवी? आपलेपणा वाटायला किती वेळ लागतो? तुम्ही एक कार्ड छापून घेता आणि तुमच्या भावाचे किंवा बहिणीचे लग्न होते आणि एक मेहुणा किंवा वहिनी घरात येते. एखाद्याला तुमचा मेहुणा किंवा वहिनी बनवायला किती वेळ लागतो? नाते जुळायला किती वेळ लागतो? हे काळावर अवलंबून नाहिये. नाते काळावर अवलंबू नाहिये. जर आपण अंत:करणातून दैवात्वाशी नाते जोडले तर बघा जीवनात काय चमत्कार घडतील. मी तुमच्याकडे हेच सांगायला आलो आहे.  मला फक्त हेच म्हणायचे आहे की ज्याने तुम्हाला बनवले त्यानेच तुमच्या आजी आजोबांना , पणजी पणजोबांना बनवले. ज्याने तुमच्यासाठी एवढे सगळे केले तो तुमच्यावर खूप प्रेम केतो, तुम्ही त्याला खूप प्रिय आहात. तुम्ही हे विसरला आहात आणि मी तुम्हाला याचीच आठवण करून द्यायला आलो आहे. जो पर्यंत तुही हे ध्यानात ठेवाल तोपर्यंत नैपुण्य, सुबत्ता, सत्ता, भक्ती, मुक्ती, शांती हे सगळे तुम्हाला जीवनात मिळेल.
काय वाटते तुम्हाला ? आजपासून तुम्हाला असे वाटायला लागू शकते कां ? देव माझा आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असे ना कां ? अजिबात फरक पडत नाही. नाते पक्के करायला काहीच वेळ लागत नाही. तुमच्या सगळ्यांकडे सेल फोन आहे नां ? किती जणांकडे सेलफोन आहे ? हात वर करा. जवळ जवळ सगळ्यांकडे फोन आहे. सेलफोन चालण्यासाठी काय काय लागते ? फोन चार्जड लागतो आणि सिमकार्ड लागते. हे दोन्ही असले तरी, जर तो रेंजमध्ये नसेल तर फोन चालत नाही. म्हणजे या तिन्ही गोष्टी लागतात- रेंजमध्ये असावे लागते,सेलफोन चार्जड असावा लागतो आणि सीम कार्ड असावे लागते. जीवनातही तसेच आहे. सर्वात पहिले म्हणजे श्रद्धा, श्रद्धा म्हणजे ती रेंज, देव माझा आहे आणि मी त्याचा आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो. माझ्या आनंदाची आणि दु:खाची काळजी घेणे हे त्याचे काम आहे आणि तो ते करेल. दु:खापासून माझा बचाव करणे आणि मला आनंद देणे हे त्याचे काम आहे आणि तो ते करेलच असा विश्वास.
याच्याबरोबरच आणखी दोन गोष्टी लागतात. आपल्याला आपले मन स्वच्छ ठेवायला लागते आणि समाजात सेवा करायला लागते. या दोन गोष्टी करायला लागतात. थोडा वेळ आपल्याला बसून काही गोष्टी कराव्या लागतात. एक माणूस म्हणून प्रत्येकाचे काही कर्तव्य असते. आपल्याला आपली कर्तव्ये पार पाडायला हवी. आपली मने स्वच्छ ठेवायचे काम आपल्यालाच करायला हवे. भोवतालच्या लोकांची आपल्याला झेपेल तशी सेवा करणे ही आपलीच जबाबदारी आहे.
तर ज्या तीन गोष्टी आपण करायला हव्यात त्या म्हणजे सेवा, साधना, आणि सत्संग. सत्संग म्हणजे श्रद्धा, विश्वास. या तीन गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत. जर तुम्ही या तीन गोष्टी नियमीत केल्या तर तुम्ही बघाल की जे काम करायचे तुमच्या मनात असेल ते सहज होऊन जाईल.
आपल्या देशात अशी परंपरा आहे की जे आजारी लोक असतील त्याना तीळ आणि पाणी देतात. तुमच्या पैकी किती जणांनी हे बघितले आहे ? जे लोक निवर्तले असतील त्यांच्या नावाने आपण तर्पण विधी करतो. तर्पण म्हणजे काय महिती आहे कां ? त्याचा अर्थ आहे समाधान करणे. गेलेल्या व्यक्तीची मुले म्हणतात, “तुमच्या मनात काही इच्छा राहिल्या असतील तर त्या सोडून द्या, त्या तीळासारख्या आहेत, त्या सोडून द्या. आम्ही त्या पूर्ण करू. ते जाउ दे आणि पूर्णपणे देवात विलीन होऊन जाऊ दे. तुम्ही पुढे चला.” या भावनेने आपण तिळ आणि पाणी अर्पण करतो. लहान लहान इच्छामध्ये अडकून पडू नका, समाधानी व्हा. 
जेव्हा आपल्याला स्वत:साठी काही नको असेल तेव्हा आपल्यात एक खास शक्ती येते. आपण आशीर्वाद देण्याच्या लायक बनतो. जर आपल्याला दुसऱ्यांना आशीर्वाद द्यायचे असतील आणि आपणच समाधानी नसलो तर आपण कसे काय आशीर्वाद देणार ? तर मग आशीर्वाद द्यायला कोण लायक आहे ? जे स्वत: समाधानी आहेत तेच, ज्यांना स्वत:साठी काही नको आहे तेच. जर ते म्हणाले की, “तुझी इच्छा पूर्ण होऊ दे“ तर ती खात्रीने होईल, नक्कीच होईल. सर्वात चांगले म्हणजे जसे आपले वय वाढेल तसे समाधानही वाढेल. आपण जितके जास्त समाधानी तितके आपण जास्त प्रगल्भ असतो. 
आनंद दोन प्रकारचे असतात. एक घेण्याचा आणि दुसरा देण्याचा. आपल्या लहानपणी आपण घेण्याचा आनंद घेतला. जर तुम्ही मुलाना काही द्यायला लागलात तर ते घ्यायला तयारच असतात. पण जसजसे आपले वय वाढते आपल्याला दुसऱ्या प्रकारचा आनंद मिळतो. तो कोणता ? देण्यातला आनंद. उदाहरणार्थ घरात आई किंवा आजी असते. आजी जेव्हा घरात एकटी असते तेव्हा ती स्वत:साठी पाच तऱ्हेच्या भाज्या, चार प्रकारची पक्वान्न बनवत नाही. पण जेव्हा मुलं घरी येतात किंवा पाहुणे येतात तेव्हा ती अनेक पदार्थ करून वाढते. म्हणजे देण्यात आनंद आहे आणि हा प्रगल्भ आनंद आहे, प्रगल्भ सुख आहे. पण बरेचदा आपण हे विसरून जातो. आणि सगळं आयुष्य कहीतरी मिळण्याची अपेक्षा करत बसतो आणि असमाधानी रहातो आणि एक प्रकारचे दु:ख पसरते.
धन मिळण्यासाठी मन समाधानी असायला हवे. आपण जितके समाधानी असतो तितकी प्रगती करतो. जी व्यक्ती समाधानी असते त्या व्यक्तीने दुसऱ्यांना आशीर्वाद दिला तर तो फळाला येतो. हे आशीर्वादामागचे रहस्य आहे. हे एक श्रेष्ठ रहस्य आहे. काही जण आहेत जे उदारपणे आशीर्वाद देतात. मी आशीर्वाद देण्यात कंजूष नाहीय. मी खूप आशीर्वाद देतो. पण घेण्यासाठी व्यक्ती लायक असायला हवी. हे कसे होईल ? तुमचे मन शुध्द ठेऊन. मन स्वच्छ ठेऊन. मन स्वच्छ कसे ठेवायचे ? जेव्हा राग येतो तेव्हा अनेक भावना उठतात. मग कसे काय करायचे ? थोडा वेळ प्राणायाम, ध्यान करा. मग ते अगदी स्वच्छ होईल. वर्तमानात रहा. भूतकाळ काहीही असला तरी तो सोडून द्या. भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि बसून ध्यान करा. “ या क्षणाला मी शुद्ध आहे, मी एक सिध्द चैतन्य आहे.” असा विश्वास स्वत:मध्ये जागृत करा. “ मी शुध्द आहे मी दिव्य आहे.” आपण ही भावना आपल्यात जागवायला हवी. म्हणूनच अशी प्रथा आहे की आपण गंगेत एक डुबकी मारली तर सगळी पापे धुवून जातील. कारण पाप हा आपला स्वभाव नाही.
परदेशात म्हणतात की, “पाप हा माझा स्वभाव आहे.  आणि ते यावर विश्वास ठेवतात की तोच त्यांचा स्वभाव आहे. आपला जन्म पापातून झाला आहे. परदेशात असेच म्हणतात. पण या देशात आपण असे कधीच म्हटले नाही. “आपण शुद्ध चैतन्य आहोत काम शुद्ध” असेच म्हटले गेले आहे. आणि तुम्हाला तुमच्या शुद्धतेबद्दल खात्री असणे महत्वाचे आहे.
आपण रोज जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपल्या जीवनात समाधानाची, आनंदाची, खुशीची एक नवीन लहर निर्माण होते. यालाच मी जीवन जगण्याची कला म्हणतो. आज तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला लोक सुदर्शनक्रिया आणि प्राणायाम करताना दिसतील. मी आताच पाकिस्तानातून आलोय. पाकिस्तानातही त्यांनी किती उत्साहाने आणि जिव्हाळ्याने माझे स्वागत केले. त्यांनी मला असेही सांगितले की लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आले आहे. प्राणायाम करण्याने त्यांच्यात किती आनंद निर्माण झाला आहे. मनाला हलके वाटू लागले आहे, काळज्या कमी झाल्या, त्यांनी ज्याची इच्छा केली ती पूर्ण होऊ लागली. हे आपले ज्ञान फार महत्वाचे आहे.
एक माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांच्या काही गरजा असतात आणि काही जबाबदाऱ्या असतात. जर आपल्या जबाबदाऱ्या जास्त असल्या आणि गरजा कमी तर आपण जीवनात शांत राहू शकतो. पण जर आपल्या जबाबदाऱ्या कमी आणि गरजा जास्त असल्या तर मग आपण दु:खी होतो. यावर आपण लक्ष द्यायला हवे.
भारतात अशी प्रथा आहे की गावात कुणी संत किंवा गुरु आला की त्याला काहीतरी दक्षिणा द्यायची. रायबरेलीत  अशी प्रथा आहे कां ? मी तुम्हाला आज एक दक्षिणा मागतो. जर तुमच्या मनात काही त्रास असले तर कोणाबद्दल तिरस्कार किंवा काही दु:ख असेल तर ते मला दक्षिणा म्हणून देऊन टाका. तुमच्या ज्या काही काळज्या समस्या असतील त्या मला दक्षिणा म्हणून देऊन टाका. ठीक आहे? तुम्ही रिकामे व्हा. दुसऱ्याबद्दल तिरस्कार करू नका. जर काही काळजी किंवा समस्या असेल तर ती मला देऊन टाका आणि हसत रहा.
दुसऱ्यांच्या जीवनातही चांगुलपणा पसरवत रहा, सुगंध पसरवत रहा. मला हेच हवे आहे. हे मिळवणं कठीण आहे कां? जरी असलं तरी ते करा. लोक अशी अवघड कामे करत असतात. लोक कावडी घेऊन ५०० किलोमीटर चालतात किंवा अमरनाथला चालत जातात हे अवघड आहे. मी जे तुम्हाला मागतोय ते त्याहून अवघड नाहिये. असे ठरवा की ,“मी एकटा नाहिये. माझा सगळा त्रास मी तुम्हासं देऊन टाकतो गुरुजी. तुम्ही तो घ्या.”  तुम्ही तुमचे त्रास तुमच्या अडचणी मला देऊन टाका.
 हे होते आध्यात्माबद्दल.
आता आपल्याला समाजातही काही तरी करायला हवे. आपल्याला काय करायला पाहिजे ? आपण अज्ञानाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. आपण असा पण केला पाहिजे की गावात एकही व्यक्ती अशी राहू देणार नाही जी अशिक्षित आहे किंवा अंधश्रद्धाळू आहे. आपल्याला यावर काम करायला हवे. आपल्याला अज्ञान घालवायला हवे.
दुसरे म्हणजे आपल्याला भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे रहायला हवे. आपलेपणा संपतो तिथे भष्टाचार सुरु होतो. स्वत:च्या माणसांकडून कोणी लाच घेत नाही. जर कधी लाच घेतलीच असेल तर ती बाहेरच्या माणसाकडून.स्वत:च्या भावाकडून किंवा भाच्याकडून  कुणी लाच मागितली नसेल. स्वतःच्या कुटुंबियांकडून कोणी लाच मागितली आहे कां ? किंवा कुणी स्वत:च्या काकाला किंवा पुतण्याला लाच दिली आहे कां ? नाही ! फक्त जो बाहेरचा आहे त्याच्याकडूनच आपण लाच घेतली आहे किंवा दिली आहे. इथे कुणीही बाहेरचा नाहिये. तर आपण सर्वांनी असा पण केला पाहिजे की देशासाठी पुढचे वर्षभर मी लाच देण्याचे किंवा घेण्याचे थांबवीन. तुमच्या टेबलावर एक पट्टी लावा की “मी लाच घेत नाही”. जर तुम्हाला संकोच वाटत असेल किंवा वेळ नसेल तर, मी काय म्हणतो की इथे बसलेले जे सगळे युवक आहेत ते तशी चिट्ठी तयार करून तुमच्या टेबलावर लावतील.
जर तुमच्या टेबलावर चिट्ठी असेल तर तर देणाराही हात मागे घेईल आणि लाच देणार नाही. तुम्हालाही काही लाजिरवाणे वाटणार नाही किवा अवघड वाटणार नाही. तर तुम्ही एक वर्ष लाच न देण्याचा आणि न घेण्याचा आणि देशासाठी कष्ट करण्याचा पण करा. आपला देश कुठल्या उंचीवर पोहोचेल बघा.
बरेच लेक म्हणतात, “ तुमचे काम फक्त ध्यान घेणे आणि आध्यात्मावर बोलणे आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलू नका. राजकारण्यांना सोडून द्या. तुम्हाला काय वाटते ? मी सोडून द्यावे ?
(गर्दी म्हणते ,” नाही.”)
बघा, मला पटतंय ! मलाही असेच वाटते मला बोलले पाहिजे आणि म्हणूनच मी त्याबद्दल  बोलत रहातो.
देशभक्ती आणि देवाची भक्ती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. देशभक्ती पाहिजे कारण हा देश देवाचा आहे. ही त्याची निर्मिती आहे.आपण एखाद्या चित्रकाराला म्हणू शकतो कां की “मला तू आवडतोस पण तुझी चित्र नाही आवडत?” असं शक्य आहे कां ? तुम्ही एखद्या मूर्तीकाराला सांगा की, “ मी तुम्हाला ओळखतो पण तुमच्या मूर्ती ओळखत नाही.” तसं असेल तर तो मुर्तीकारच नाही. म्हणजेच जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो त्याला त्याच्या निर्मितीचे मोल कळेल, तो त्याचा आदर करेल, सन्मान करेल. प्रत्येक व्यक्तीचा आदर करेल. हेच भक्ताचे चिन्ह आहे. भक्ताची दोन चिन्ह आहेत. तो प्रत्येकाचा आदर करेल हे पहिले चिन्ह आणि दुसरे म्हणजे तो कधीही काळजी करणार नाही की त्याचे काय होईल, तो ह्याची काळजी करणार नाही.
तर, आपण सगळे एक शपथ घेऊया की आपण लाच देणार नाही आणि घेणार नाही. हात वर करा.
दुसरी शपथ आपण घ्यायची आहे ती म्हणजे, आपण महिलांचा आदर करू आणि स्त्रीभृण हत्या होऊ देणार नाही. भारतीय संस्कृतीत महिलांना पुरुषांच्या समान अधिकार दिलेला आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यात काही भेदभाव केला जात नसे. विषमता केली जात नसे. आणि या देशात पुरुषच नाही तर स्त्रियांनाही श्रद्धा, अंत्येष्टी करण्याचा अधिकार आहे. त्याना अधिकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो, त्या करतात.
इथे बसलेल्या महाराजजींना सुद्धा माझे म्हणणे पटत असेल. ते अनुमोद्नाचा हात वर करतायत. पुरुषांप्रमाणेच स्त्र्यांना अधिकार आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रिया जानवेही घालत असतं. सीतामय्याने तिच्या वडिलांचे तर्पण आणि श्रद्धा केले होते. याचे धर्मग्रंथात वर्णन आहे.
तर, पुरुष श्रेष्ठ आणि स्त्रिया कनिष्ठ असे समजू नका. दोघांना समान अधिकार आहेत. स्त्रीभृण हत्येवर बंदी असली पाहिजे. हा दुसरा मुद्दा. आपण सगळे शपथ घ्यायला तयार आहोत कां की आपण स्त्रीभृण हत्या होऊ देणार नाही.
तिसरी शपथ आपण घेणार आहोत ती मद्यपानाच्या विरोधात. आपल्या देशातील दारिद्र्य तेव्हाच दूर होईल जेव्हा व्यसन मुक्ती होईल. दारूच्या नद्या वाहताहेत. जर कोणी निवडणूक जिंकले तर दारू पितात, जर तो हरला तरी तो दु:ख विसरण्यासाठी दारू पितो. एक गरीब माणूस जे काही कमावतो त्यातले ६० टक्के दारूवर घालवतो. दारू खेरीज कोणताही धंदा तेजीत नाहिये. त्यामुळे जर हे थांबवले नाही तर दारिद्र्य कायम टिकून राहील आणि देश दारिद्र्यातच अडकून पडेल.
ते आनंदात पितात आणि लग्न समारंभात पितात. कोणी मेलं तर ते पितात. कोणाचा जन्म झाला तरी ते पितात. जर तोटा झाला तर ते पितात धंद्यात फायदा झाला किंवा लॉटरी लागली तरीसुद्धा ते पितात. काहीही होऊदे, ते पितच रहातात. दारूची नदी वाहते आहे. आपल्याला हे थांबवायला हवे.
मातांनो, तुम्ही यांत महत्वाची भूमिका बजावू शकता. मुलाना रोज सांगत रहा की दारूला हातही लावायचा नाही. माता दारूची दुकाने बंद पाडू शकतात. जर तुमची इच्छा असेल तर नवरा, भाऊ, मुलगा अगदी वडील सुद्धा. सर्वांवर  प्रभाव पाडण्याची कुवत तुमच्यात आहे. तुम्ही ते तुमच्या हातात घ्या, दारूची दुकाने बंद पडली पाहिजेत.
किती लोकांना हे पटतंय ? हे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा आपला देश कधीच पुढे जाणार नाही. आहे तिथेच राहिल.
आणखी एक म्हणजे जाती जातीनंमधला भेद भाव. बिहार आणि यूपी मध्ये जितका जास्त भेद भाव आहे की तेवढा देशातल्या इतर कुठल्याही राज्यांत नाही. इथे खुपच जास्त आहे. समाजात जर आपल्याला मोठे परिवर्तन घडवून आणायचे असेल तर आपण जाती भेदात अडकता कामा नये. मनुष्य धर्म हा एकच धर्म आहे  यावर विश्वास ठेवा.
मी तरुणाना आवाहन करतो की देशाची सूत्रे तुम्ही तुमच्या हातात घ्यावी. ती बिघडलेल्या स्थितीत तुमच्या हातात येण्याच्या आधी तुम्ही आताच त्याचा ताबा घ्या म्हणजे तुम्ही देशाचे खूप जास्त नुकसान होण्यापासून देशाला वाचवू शकाल. म्हणून तुम्ही आतापासूनच तयार व्ह्यायला हवे.
आपण तीनवेळा ओंकार म्हणूया आणि एक छोटेसे ध्यान करुया.
बॉस्टनमध्ये एक शास्त्रज्ञ ओम् या शब्दावर संशोधन करत होता. त्याने ओम् रेकॉर्ड केला आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड करून त्याच्या संगणकावर ठेऊन मोजली. त्याला असे दिसले की ओमची फ्रिक्वेन्सी पृथ्वीच्या फ्रिक्वेन्सी शी जुळते. पृथ्वीची स्वत:च्या आसाभोवती फिरण्याची फ्रिक्वेन्सी आणि सूर्या भोवती फिरण्याची फ्रिक्वेन्सी ओमच्या इतकीच असल्याचे दिसून आले.
त्यामुळेच आपल्या देशात प्राचीन काळापासून लोक म्हणत आले आहेत की ओम् हा सृष्टीतला पहिला ध्वनी आहे,  निसर्गाचा आवाज आहे. बौद्ध लोकांचाही यावर विश्वास होता तसेच जैन, शीख, सनातनी आणि आर्य समाजी लोकांचाही यावर विश्वास होता. जगातील सर्व धर्माच्या लोकांचा थोड्याफार फरकाने यावर विश्वास होता. त्यामुळेच ते ‘आमीन’, ‘आमेन’ वर विश्वास ठेवतात. पण ओम् ही एक ध्वनी लहर आहे जी या सृष्टीमध्ये कायम निनादत आहे.
प्रश्न: गुरुजी कृपया आम्हाला वेदांबद्दल सांगा. वेद कुणीही वाचू शकतं कां ?
श्री श्री: होय. वेदात एक हजाराहून जास्त ऋषी, महर्षीं आहेत. त्यापैकी बरेच महर्षी वेगवेगळ्या जातींचे होते. त्याकाळी एकच धर्म होता, सनातन, पण जाती वेगवेगळ्या होत्या. सर्वजण वेद वाचू शकतात, स्त्रिया सुद्धा.
प्रश्न: गुरुजी आज संपूर्ण देश जाती व्यवस्थेवर विभागले गेले आहेत. त्यांना एकत्र कसे आणावे ?
श्री श्री: मी तेच तर म्हणतोय. एखादयाला चांगला डॉक्टर हवा असेल तर तो त्याची जात विचारत नाही. ते फक्त चांगला डॉक्टर शोधत असतात. एक चांगला वकील हवा असेल तरी माणूस चांगल्या वकिलाकडे जातो. त्याची जात कुणी विचारत नाही. फक्त निवडणुकांच्या वेळी धर्माची बाब पुढे येते. आपल्याजातीचा माणूस आपल्या बाजूने उभा राहिल याची काही खात्री नाही. एखादी दुसऱ्या जातीची व्यक्ती जी नीट ताळ्यावर असेल, सच्ची असेल, प्रामाणिक असेल तर तीही आपल्या भल्यासाठी काम करेल. म्हणूनच माणसाने जातीभेदाच्या पलिकडे गेले पाहिजे.
रोटी बेटी व्यवहाराच्या बाबतीतही जातीला खूप महत्व दिले जाते. तरीही, मला वाटतं, आजकालचे तरुण खुपच पुढारलेले आहेत.
प्रश्न: गुरुजी, द्वेषावर उपाय का ?
श्री श्री: द्वेषावर उपाय हा आहे की ज्याचा तुम्ही द्वेष करता तोही मरणार आहे आणि तुम्ही देखील मरणार आहात, याची जाणीव होणे. इथल्या प्रत्येकाचा शेवट होणार आहे. या जगात सात अब्ज लोक आहेत, ज्यांच्या पैकी एक व्यक्ती त्याच्या सारखी असेल आणि अनेक लोक त्याच्या पेक्षा सरस असतील. अशाप्रकारे जर तुम्ही एका व्याप्त दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिलेत तर तुम्हाला दिसेल की द्वेष कमी झाला आहे.
प्रश्न: गुरुजी, युगांपासून शेतकरी सर्वात जास्त कष्ट करत आले आहेत पण दिवसेंदिवस ते जास्तच गरीब होत चालले आहेत. त्यांचे काय करावे ?
श्री श्री: एक म्हणजे शेतकरी जी आयात केलेली रासायनिक खतं वापरत आहेत त्याने जमिनीची पत खराब होते आणि पीक कमी प्रमाणात येते. रसायनिक खते वापरून शेती करणे शेतकऱ्यांनी टाळले पाहिजे.
आपल्या देशात कितीतरी प्रकारचे गहू आहेत, आणि कितीतरी स्थानिक तांदुळाचे प्रकार आहेत. आपल्याला त्याबद्दल माहितीही नसते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की आपल्या देशातला गहू, आपल्याकडचा प्राचीन गहू, जो दिसायला तेवढा चांगला नाहिये पण त्यात १२ टक्के फॉलिक अॅसिड असते. फॉलिक अॅसिडमुळे हृद्य विकार होण्याचा आणि हृदयाचा झटका येण्याचा संभव कमी होतो. पण बाहेरून आयात केलेल्या गव्हात त्याच प्रमाणात फॉलिक अॅसिड नसते असे म्हणतात.पण आपण स्थानिक बियाणे जवळ जवळ नष्ट केली आहेत कारण हे हायब्रीड बियाणे जास्त मोठे, जाड आणि जास्त आकर्षक दिसते. त्यामुळे आपण ते विकत घेतले आणि आपले बयाणे हरवले. नुकताच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी आपले स्थानिक बियाणे जतन करण्याचा एक मोठा प्रकल्प उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाब येथे हाती घेतला आहे. ते स्थानिक बियाणे वापरताहेत आणि उत्पन्नही वाढले आहे. तुम्ही जर सेंद्रीय खाते वापरली तर तिप्पट जास्त उत्पन्न मिळेल. आज मी तुम्हाला एक मंत्र सांगतो, जो आपण जेवण्याच्या आधी म्हणायचा आहे. ‘अन्नदाता सुखी भव.’ जेवणाच्या आधी एकदा किंवा दोनदा तुम्ही हे म्हणायचे आहे.
‘जे मला हे अन्न उपलब्ध करून देत आहेत ते सुखी होऊ देत. ‘
जेव्हा तुम्ही रोज हा मंत्र म्हणता तेव्हा त्यात तिघे येतात. एक म्हणजे शेतकरी, दुसरा म्हणजे व्यापारी जो धान्य विकत घेऊन विकतो, तिसरे म्हणजे घरातील स्त्री जी तुम्हाला अन्न शिजवून वाढते.
जर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी असेल तर तुमचे पोटाला अन्न पचवता येणार नाही. जर शेतकरी आनंदी असतील तर आपले शरीर रोगमुक्त राहिल.म्हणून शेतकऱ्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
जर घरातील स्त्रीने अश्रू ढाळले तर तुम्ही कसे आनंदी राहू शकाल ? हे अशक्य आहे. स्त्रीचे अश्रू सारी पृथ्वी हादरवते. स्त्रीच्या अश्रुमध्ये आग असते, त्यामुळे त्यांना अश्रू ढाळू देऊ नका. जर असंमंजसपणामुळे त्यांचे अश्रू वाहू लागले तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. सगळं असूनही त्या रडत रहातात आणि कुणी विचारलं, ”तुम्ही कां रडताय?” तर म्हणतात, “ मी रडत नाहिये, माझा चेहराच तसा आहे.” काही जणांना चेहरा रडवा करून फिरण्याची सवयच लागलेली असते.
हसा आणि इतरांनाही हसवा.स्वत: अडकू नका आणि इतरांनाही अडकवू नका !
प्रश्न: गुरुजी, उत्तरप्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी वस्तु फुकट देऊन टाकण्याचा एक पायंडा पडलाय. राजकारणी सुद्धा लोकांना फुकट काही गोष्टी देण्याचे आश्वासन देतात. अशावेळी लोकांचा स्वाभिमान कसा वाढणार ? सगळं फुकट मिळण्याची अपेक्षा असते.
श्री श्री: काही हरकत नाही. आणखी काही काळ असेच चालू दे. स्वाभिमान आपोआपच वाढेल आणि मग व्यक्ती स्वत:च म्हणेल, “ मला फुकट गोष्टी नको.” जसे स्वत:ची परिस्थिती सुधारली की माणूस म्हणतो, “मला माझ्या मुलांना मोफत शाळेत नाही पाठवायचे.” त्याला पैसे देऊन मुलांना शाळेत पाठवायचा अभिमान वाटतो. अगदी रिक्षावालाही म्हणतो, “ नाही, मी पैसे खर्च करून मुलांना चांगल्या शाळेत पाठवीन.” ही शाश्वत गोष्ट आहे ते आपोआप जागृत होईल 
प्रश्न: जेव्हा आम्ही तुमच्या सोबत असतो तेव्हा आम्ही आमच्या समस्या विसरून जातो मग त्या कितीही मोठ्या असोत. तुम्हीच सांगा आंम्ही आमच्या समस्या तुम्हाला कशा अर्पण करायच्या ?
श्री श्री: जेव्हा त्या येतील तेव्हा त्या मला अर्पण करा.
बघा, मी १५२ देशात प्रवास केला आहे आणि प्रवास करतच असतो. मला कुठेही असे वाटले नाही की मी परदेशात आहे, आणि त्या देशातील लोकांनाही ते मला प्रथमच भेटत आहेत असे किंवा मी परदेशी आहे असे वाटत नाही. त्यांनाही माझ्याबद्दल आपलेपणा वाटला जो मला त्यांच्याबद्दल वाटला. म्हणूनच मी म्हणतो, आपण जे आत असतो तेच बाहेर दिसतो. आपण जसा विचार करतो, आपल्या ज्या भावना असतात त्याने इतरांमध्ये परिवर्तन घडून येते. 
या भागातील युवकांना मी सांगेन की तुम्ही सगळे ध्यान शिकवणारे प्रशिक्षक व्हा. संपूर्ण जगात भारतातील शिक्षकांची खूप गरज आहे. जर भारतातील योगा आणि प्राणायाम प्रशिक्षक निनिराळ्या ठिकाणी गेले तर ते जगात बरच चांगले काम करू शकतील. त्याने आजार कमी होतात. शरीराला बळकटी येते, मन आनंदी रहाते, बुद्धी तीक्ष्ण होते. असे अनेक फायदे आहेत.
प्रश्न: गुरुजी आयुष्यात समाधान कसे आणावे ?
श्री श्री: ध्यानाने.
प्रश्न: लोकांनी देवाला पाहिलेले नाही किंवां ऐकलेले नाही. मग देवाशी एकरूप कसे वाटेल ?
श्री श्री: म्हणूनच संत, महात्मे आणि गुरु आहेत, तुम्हाला हे सांगायला की, “तो तुमचाच आहे, विश्वास ठेवा.”. हे बघा आपल्याला सगळं काही माहीत होऊ शकत नाही .काही गोष्टी जाणून घ्या आणि काही समजून चला. म्हणून मी म्हणतो, “काही गोष्टी जाणून घ्या, काही गोष्ट धरून चाला आणि सर्वांना प्रेमाने पुढे घेऊन चला”
प्रश्न: गुरुजी, मोक्ष म्हणजे काय?
श्री श्री: तुम्ही मुलांना जाऊन विचारा की परीक्षा झाल्यावर त्याना कसे वाटते ? ते पुस्तकं फेकून हुश्श करतात. “ हा... संपली संपली ! “ तोच मोक्ष आहे.
एखादे दिवशी तुमच्या मनात असा सुटकेचा भाव येतो , “ मी समाधानी आहे, मला आत्ता या क्षणाला काहीही नको, मी आयुष्याबद्दल समाधानी आहे.” तोच मोक्ष.
मोक्ष हा बंधनाच्या विरुद्ध आहे. जेव्हा बंधन सुटते तेव्हा तोच मोक्ष .



The Art of living© The Art of Living Foundation