5 April 2012


आपली चेतना हि पुरातन आहे.

बाली, ५ एप्रिल २०१२

समुद्राकडे पहा, न थांबता, सतत लाटा येत असतात, त्यांना त्याचा कधीच कंटाळा येत नाही.

पक्षी नेहमी गाणी गात असतात, त्यांना पण त्याचा कधी कंटाळा येत नाही. आयुष्यभर ते रोज सकाळी गात असतात पण ते कधीही कंटाळत नाहीत. फक्त मनुष्यप्राण्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत असतो. “ ओह ! परत तेच!” आणि आपल्याला हा उबग का येतो तर स्मृती मुळे.

तुम्ही पूर्वी केलेली ती गोष्ट आठवून कंटाळता. स्मृती हे जसे मनुष्याला आशीर्वाद आहे त्याप्रमाणे तो एक शाप हि आहे. तुम्हाला त्याचा कंटाळा येतो कारण तुम्हाला काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन करण्याची गरज भासते आणि मग अशा तऱ्हेने रचनात्मक बदलाची प्रक्रिया सुरु होऊन परमेश्वरावर लक्ष केंद्रित करता. नाहीतर तुम्ही पण प्राण्यांप्रमाणे त्याच त्याच गोष्टी रोज करीत बसला असता. पण तुम्ही तसे करीत नाही कारण तुम्हाला ते परत परत करण्याचा कंटाळा येतो. होय कि नाही?

म्हणून त्या अर्थाने हा कंटाळा किंवा उदासीनता हा एक आशीर्वादच आहे. हि तुमची उदासीनता तुम्हाला पुढे जाऊन साधक बनायला प्रवृत्त करते आणि मग तुम्ही एक वेगळीच उंची गाठू शकता. त्याच वेळी हि उदासीनता एक अभिशाप आहे कारण ती तुम्हाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही मग तुमचे मन एका गोष्टीवरून दुसऱ्या दुसरीकडे उगीचच भटकत बसते. त्या सर्वांचा मग कंटाळा येऊन तुम्ही कशाचाच आस्वाद घेऊ शकत नाही.मी काय म्हणतोय ते येतेय लक्षात?

उदासीनता तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाते तेंव्हा तो एक आशीर्वाद बनतो. पण जेंव्हा हि उदासीनता तुम्हाला निराश करून मरगळ आणते तेंव्हा तो एक अभिशाप असतो.

उदासीनता तुम्हाला या दोन वेगळ्या मार्गांनी नेऊ शकते.

जेंव्हा तुम्ही उदासीन असता, तेंव्हा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही आणि मग जेंव्हा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही तेंव्हा दु:खी आणि उदास होता. असा तुमचा उदासीनते कडे प्रवास घडतो. किंवा मग तुम्ही उदास असल्याने, खडबडून जागे होता आणि मग शोध सुरु करता. मग तुमच्या असे लक्षात येते कि तुमचा अंतरात्मा तर नेहमीच ताजातवाना असतो! तो तर नेहमीच नवीन असतो. तुम्ही त्या अल्पकालीन, वर वरच्या उदासीनतेला कंटाळून आत्मनिरीक्षणाला सुरवात करून खोलवर डोकावून पाहायला लागता. आता लक्षात येतेय मी काय म्हणतोय ते?

म्हणून हि उदासी हा तर आशीर्वाद आणि शाप आहे. आशीर्वाद आहे कारण तो तुम्हाला रोजच्या रटाळ जीवनापासून लांब नेऊन तुम्हाला स्वतःची जाणीव करून देतो आणि परत जीवनात आणून सोडतो आणि शाप आहे कारण तो तुम्हाला स्थिरता देत नाही, दोन्हीही.
जे लोक प्रेमात पडलेले असतात ते कधीच कंटाळत नाहीत. कारण हृदयाला कंटाळा माहित नाही. बुद्धीला मात्र कंटाळा माहित आहे. पण आयुष्यात हृदय आणि बुद्धी दोन्हींची गरज असते. तुम्ही जर हृदयाच्या अधिपत्याखाली असला तर उगीचच भावूक होऊन जाता आणि जर जर बुद्धीच्या आधीन असाल तर ते हि काही बरे नव्हे. या दोन्हीचे संतुलन साधने म्हणजेच योग होय. हृदय आणि बुद्धी यांचे असे संतुलन अध्यात्मात असते.

खास करून अशा लोकांसाठी कि ज्यांना आपण आयुष्यात पराभूत झालो आहोत असे वाटते. ज्या कोणाला आपण पराभूत झालो आहोत असे वाटत असेल, तर त्यांनी जागे व्हायची गरज आहे! आयुष्य हे निरंतर आहे.

एका वर्षात ३६५ दिवस असतात आणि अशा अनेक वर्षांचे आयुष्य बनते. मग जर तुम्हाला एक दोन दिवस आयुष्य वाया गेले असे वाटले तर ते काही फारसे मनाला लाऊन घेऊ नका. आपण या पृथ्वीतलावर अनेक जन्म घालवले आहेत आणि आपली चेतना हि पुरातन आहे.

तो पौर्णिमेचा चंद्र पहा. एखाद्या पौर्णिमेला जर ढग येऊन त्याचे चांदणे जर पृथ्वीवर बरसले नाही तर चंद्र कधी दुखी होत नाही. एखाद्या पौर्णिमेला जर चंद्र दर्शन झाले नाही तर काय? चंद्र तर आहे तिथेच आहे. त्याप्रमाणे तुमच्यात पूर्ण असा परमात्मा आहे,आणि जर एखाद्या दिवशी जर तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही वाईट वाटून घेऊ नका.

तुमच्यात अनेक चांगले गुण आहेत आणि जर एखाद्या दिवशी जर त्यातले काही गुण दाखवायची संधी मिळाली नाही तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला दोष देऊन त्यावर फार विचार करू नका. लक्षात येतेय मी काय म्हणतोय ते? आपण स्वतःबद्धल कधी कधी खूप विचार करून, त्याचे विश्लेषण करून मग उदास होऊन बसतो. कधी स्वतःला उगीचच नको तेवढा दोष देतो.

त्याचा फार विचार करू नका, इतक्या आयुष्यात एक वाया गेले म्हणून काय झाले? ज्यांना स्वतःबद्धल खूप कमीपणा वाटतोय त्यांच्याविषयी मी बोलतोय. माझ्या या बोलण्याचा विपर्यास करून ते सर्वांना लागू नाहीये हे ध्यानात ठेवा, नाहीतर सांगत सुटल कि “गुरुजी म्हणाले कि हे आयुष्य वाया गेले तरी हरकत नाही. चला, मजा करू यात आणि सर्व साधना विसरून जाऊ यात.’ नाही, मला असे सांगायचे नाहीये.!

जे अगदीच अगतिक झाले आहेत त्यांना मी तसे सांगू इच्छितो, कि जागे व्हा, इतके आयुष्य वाया गेले तर वाईट वाटून घेऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाहीये. भविष्य-काळ हा उज्ज्वल आहे.

जेंव्हा तुम्ही भूतकाळात डोकावता तेंव्हा अशी पश्चातापाची वेळ येते. जेंव्हा तुम्ही चालता चालता मागे वळून पाहता तेंव्हा अशी पश्चातापाची पाळी येते. जेंव्हा तुम्ही पुढे पाहत असता, तेंव्हा सर्व काही उज्ज्वल आहे हेच दिसते. मागचा विचार सोडा कारण त्याने फक्त निराशाच पदरी येते. ते सर्व सोडून पुढे चला.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला तुमच्याबद्धल खूप आपलेपणा वाटतो, तरी तुमचे आशीर्वाद मिळविण्यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटणे जरुरी आहे काय?
श्री श्री रविशंकर: नाही, त्याची काही गरज नाहीये. पण ज्या अर्थी तुम्ही हा प्रश्न विचारताय तेंव्हा त्यामागे काही भावना किंवा इच्छा आहे. काळजी करू नका, तुम्ही अनायसे इथे आलाच आहात. आपण आता समोरासमोर पाहु यात, बोलू यात.

प्रश्न:  या मार्गावर चालताना धर्माचे पालन करणे कितपत महत्वाचे आहे? धर्म हा तुमच्या व्यवसायावर अवलंबून असतो कि तुमच्या ध्येयावर?
श्री श्री रविशंकर: धर्म हा तुमच्या प्रतीबद्धतेवर अवलंबून असतो. तुम्ही ज्यासाठी वाहून घेतले आहे तो तुमचा धर्म! जेंव्हा तुम्ही या मार्गावर असता तेंव्हा धर्म हा नैसर्गिकपणे आपोआप येतो.

प्रश्न: गुरुजी, प्राण आणि श्वास हे एकमेकांशी संबंधित कसे आहेत?
श्री श्री रविशंकर: श्वास घेण्याने प्राणशक्ती वाढते. प्राण हा तर जीवन शक्ती आहे. त्या दोन्हीचा आंतरिक संबंध आहे.

प्रश्न: मी योग्य जीवन साथी कसा निवडू?
श्री श्री रविशंकर: तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीला हा प्रश्न विचारायला पाहिजे. मला यात काहीच अनुभव नाहीये. ज्या कोणाला पहिल्याच अनुभवात जीवन साथी न भेटता, त्यासाठी त्यांनी अनेक प्रयास केल्यावर ज्यांना जीवन साथी मिळाला आहे त्यांना विचारा. ज्या जोडप्यांना खुपसा अनुभव आहे त्यांना विचारा. आणि मग तुम्हाला सापडल्यावर मला पण सांगा.
आता, तुम्हाला योग्य जीवन साथी हवा आहे. तुम्हाला योग्य जीवन साथी मिळेल, पण त्या जीवन साथीला पण योग्य जीवन साथी हवा असेल. त्या व्यक्तीसाठी तुम्ही योग्य जीवन साथी आहात काय? हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यांच्या दृष्टीने तुम्ही जर योग्य जीवन साथी नसाल तर काय?

प्रश्न: पुनर्जन्म जर असेल तर तो याच पृथ्वीवर होतो कि इतरत्र पण होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर: याच पृथ्वीवर फक्त!



The Art of living
© The Art of Living Foundation