तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावीच लागतात

२ मार्च २०१२

आज इथे आश्रमात कुणीतरी सात चंदनाची झाडं चोरून नेली. पहाटे एक ते चारच्या दरम्यान आपल्या वेद्पाठ्शाळेतून, जिथे मुले वेदाभ्यास करतात तिथून ही झाडं तोडली आणि चोरून नेली. आश्रमाचे अधिकारी या घटनेने खूपच अस्वस्थ झाले. इतकी सुरक्षा व्यवस्था असून, इतके सुरक्षा रक्षक असूनही असे घडले. सगळ्यांनी मिळून ती झाडं लावली, जोपासली आणि आता ती झाडं मुळापासून उखडून घेऊन गेले.
मग आता काय करावं ?
कालच वर्तमानपत्रात एक लेख आला होता की सर्वात उत्तम अशी चंदनाची झाडं कर्नाटकात सापडतात. आणि ६५ टक्के व्यापार असा बेकायदेशीरपणे होतो. हे चंदन चोर खरे तरबेज असतात. ते आश्रमात येऊन अशी झाडं तोडतात की कुणाला जरासाही आवाज येत नाही. काल अशीच सात झाडं कापून चोरून नेली.
तुमच्या घरातून काही चोरीला गेले तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल, हो की नाही ?
मग काय होतं ? त्या तुम्हाला न दिसणाऱ्या चोराचा तुम्हाला राग येतो. चोर कोण आहे तेही तुम्हाला माहीत नाही. मग तुमच्या समोर नसलेल्या कुणाचा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या मनाचे काय होते ? तुमचं डोकं दुखायला लागतं, तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं आणि तुम्हाला छान वाटत नाही.
मग मी म्हणतो, चोऱ्या तर युगांपासून होत आल्या आहेत. ही आपली कर्म भूमी आहे. आपण सगळे इथे आपले कार्य करायला आलो आहोत. काही चांगलं काम करून जातात, तर काही वाईट काम करून जातात. सगळे जण जातात आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळतेच. चोराला आज नाही तर उद्या त्याच्या कर्माची किंमत मोजावीच लागेल. आपण जेव्हा चांगले काम करतो तेव्हा आपल्याला नक्की माहीत असते की आपल्याला त्याचे फळ मिळणारच, म्हणजे यात नवीन काही नाही.
म्हणूनच रुद्रभिषेकात आपण म्हणतो,’ नमो वंचते परीवंचते स्तयुनाम पतये नमो नमो निशअग्नीशुद्धीमते तस्कर नाम पतये नमो नाम:’
तस्कर म्हणजे चोर. या श्लोकात म्हटले आहे, ‘ तू अशा लोकांचाही देव आहेस जे फसवणुकीत आणि चोरी करण्यात गुंतलेले असतात.’ याचाच अर्थ असा की चोरी करणे हे फार पूर्वीपासून,युगांपासून चालत आले आहे. जग हे असे आहे. ही कर्मभूमी आहे त्यामुळे तुम्हाला जी कर्म करायची आहेत ती तुम्ही इथे कराल.
कर्म करा पण हे लक्षात घ्या की तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावी लागणारच.
मग इतरांच्या कर्माची तुम्ही कशाला चिंता करायची ? जी व्यक्ती चूक करेल ती त्याच्या कर्माची फळे भोगतील. मी काय म्हणतोय कळतंय कां ?
चुकीचे कर्म करणारी माणसे या जगात नेहमीच असतील.आश्रमातही असे लोक आहेत. ते इथे असतात पण बाहेर जाऊन आश्रमाला नावे ठेवतात. लोक म्हणतात,” गुरुजी तुम्ही त्यांना आश्रमातून बाहेर कां काढत नाही ?”
मी म्हणतो, “ नाही, ते त्यांच्या कर्माची फळं भोगायलाच इथे आले आहेत. जर कुणी काही चूक केली तर त्यांना कुणीही वाचवू शकत नाही. तर मग, ते जे करायला इथे आले आहेत ते त्यांना करू द्या.”
त्यांच्या चुकी बद्दल आपण विचार करून तणाव कशाला वाढवायचा ? हीच हुशारी आहे.
जर कुणी तुम्हाला शिवीगाळी केली तर तुम्ही कशाला त्रासता ? त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. तो त्याचे कर्म करतोय. त्याला असे शब्द वापरायचेत, वापरू द्या.
उलट तुम्ही त्याला म्हणायला हवे, “ तुला जे बोलायचे ते बोल. तू इथे तुझे कर्म करायला आला आहेस ते कर आणि जा.”
या पृथ्वीवर जन्मलेले सगळेच जण स्वर्गात जाणार नाहीयेत. काही नरकातही जाणार आहेत ! नाहीतर नरक मोकळा राहील. (गुरुजी हसून म्हणतात.)
जे इथे येऊन चुकीची कामे करतात ते नरकात जातील. तुम्हाला कळतयं नां ?
मी कुणाला शिकवतो किंवा कुणाला चोरी करू नको म्हणून सांगतो, ते फक्त त्या व्यक्तीबद्दलच्या करुणेपोटी.’मला त्याचा त्रास होतो म्हणून चोरी करू नकोस किंवा शिवीगाळी करू नकोस’ असे मी कधीच सांगत नाही. मला काहीच आणि कोणीच त्रास देऊ शकत नाही.
जर तुम्ही वाईट शब्द बोललात तुम्हाला त्या कर्माची फळे भोगावी लागतीलच.
म्हणूनच मी सुखावणारे शब्दच बोलतो आणि काहीही असुखद बोलत नाही. तुम्ही वाईट शब्द वापरले तर मला वाईट वाटते म्हणून नाही. शब्द हे शब्द आहेत, तुम्ही काय बोलता याने काही फरक पडत नाही.
पण काही लोकांच असतं असं वागणं, काय करणार ?
जी काही चुकीची कामे करेल त्याला त्याची फळे भोगावी लागणारच. म्हणूनच असे म्हटले आहे की जर तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप झाला तर तुम्ही त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. दुसऱ्याच्या चुकीने तुम्ही दु:खी व्हायची गरज नाही. तुम्ही हे लक्षात घ्यायला हवे की ते त्यांच्या कर्माची फळे भोगायला इथे आले आहेत आणि ते तेच करतायत.
दुसऱ्यांच्या चुकांबद्दल तुम्हाला करुणा वाटायला हवी आणि स्वत:च्य चुकांबद्दल पश्चाताप. दुसऱ्यांच्या चुकांबद्दल तुम्हाला करुणा असेल तरच तुम्ही त्याना काही शिकवू शकता. मी काय म्हणतोय, आलं कां लक्षात ?
जर तुम्ही एखादी चूक केली असेल तर ती चूक पुन्हा होणार नाही असा संकल्प करा. असे केल्यानंतरही तुमच्या हातून ती चूक पुन्हा पुन्हा झाली तरी ती चूक पुन्हा करणार नाही या संकल्पाला धरून रहा. संकल्प केल्यानंतरही या चुकांच्या चक्रातून बाहेर पडता येत नसेल तर देवाची प्रार्थना करा आणि त्याला समर्पित करा. स्वत:चा चुकांपासून बचाव करण्याचे हेच दोन मार्ग आहेत.
इतरांचा चुकांपासून बचाव करण्यासाठी करुणेची गरज आहे. “ यामुळे तुम्हालाच त्रास होईल, तुम्हाला कां समजत नाहिये ?” असे तुम्हाला म्हणावे लागेल. तरीही त्यांनी चुका केल्या तर तुम्ही काय करू शकणार ?
ज्याच्या नशिबातच चुका करणे आहे त्याला या जगात आजपर्यंत कुणीही थांबवू शकलेले नाही. ज्याला जे करायचे ते तो करेलच. दुर्योधनाला युद्ध करण्याची खुमखुमी होती.श्रीकृष्णाने त्याला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला, एकदा नाही तर तीनदा तरीही त्याला युद्ध थांबवता आले नाही. युद्ध झालेच ! ही आपली कर्मभूमी आहे, आपल्या कर्मांपासून मुक्ती मिळवून पुढे जाण्यासाठी आपण इथे आलो आहोत हे लक्षात घेऊन, आपण प्रयत्न करायला हवा.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असे वाटते की चूक करून तुम्ही तुमचे नुकसान करून घेतले आहे. इतर लोक किती जास्त मूर्खपणाने वागतात आणि स्वत:चे किती मोठे नुकसान करून घेतात याचा विचार करा.
अती हावरटपणानेही नुकसान होते. एकाने पन्नास लाख रुपये कमावले. दुसरा एक जण त्याला म्हणाला, “तुझे पैसे मला दे मी तुझ्या पन्नास लाख रुपयांचे दोन कोटी रुपये करून देईन. त्याने ते पैसे घेतले आणि पळून गेला.आता हा गृहस्थ रडायला लागला. कालच हा चंदिगढचा माणूस मला भेटला आणि म्हणाला, “ गुरुजी, कुणीतरी माझे पन्नास लाख रुपये घेऊन पळून गेला. ती माझी आयुष्यभराची कमाई होती.”                                मी म्हटलं, “ तुझ्या हावरटपणामुळे हे असं झालं. जाऊ दे. ते तुझं कर्म होतं.”मी काय म्हणतोय तुला कळतयं नां ? याचा अर्थ असा नाही की कर्म म्हणून तुम्ही ते सोडून द्यावं. तुम्ही प्रयत्न करून त्याला पकडण ही तुमची जबाबदारी.
तर,इथे आश्रमात असलेल्या सगळ्यांना मी हा उपाय सांगितला की तो त्याचं काम करायला आला होता , तुम्ही काळजी करू नका. जेव्हा सगळेजण शांत झाले तेव्हा मी त्यांना पोलिसात तक्रार दाखल करायलाही सांगितले. आणि जो या चंदन चोराला पकडून देईल त्याला २५,००० रुपयांचे बक्षिस जाहिर करायलाही सांगितले.
आता तुम्हाला हे दोन्ही उपाय एकमेकाच्या विरोधी वाटतील. एका बाजूला आपण म्हणतोय की तुम्ही चोराला पकडायला हवे आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की ते कर्म आहे आणि तेही खरे आहे. आपण जर असा विचार केला की ते सगळ्यांच कर्म होतं आणि म्हणून मग चोराला पकडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याच विचारात स्वस्थ बसून राहिलो तर ती अकर्मण्यता होईल. चोराला पकडणं ही आपली जबाबदारी आहे. पण मनातल्या मनात हे लक्षात घ्या की हा सगळा कर्माचा खेळ आहे हे निसर्ग नियम आहेत जे लागू होताहेत. 
तुम्ही असं म्हणू शकत नाही की जगात एकही चोर नसेल, ते शक्यच नाही. आपण ज्ञानात राहणं आणि आपली कर्तव्य करणं हे एकाच वेळी कसं करू शकतो ते बघायला हवे. काही लोक फक्त ध्यानात रहातात आणि काहीच कर्म करत नाहीत.काही लोक ज्ञानाशिवाय नुसते कर्मच करत रहातात. दोन्ही अपूर्ण आहे. त्यामुळे जे काही करायचे असेल ते करा पण ज्ञानाला सोडू नका.  
मी म्हटलं, “ जर कुणी तुमचे पन्नास लाख रुपये घेऊन पळाले असेल तर, त्याला सोडू नका. तो कुठे आहे ते शोधून काढा पण त्याच वेळी हे लक्षात घ्या की त्याने त्याचे काम केले,तर त्यात काय ? अशा प्रकारे तुम्ही तुमचा समतोल राखला पाहिजे.

The Art of living
© The Art of Living Foundation